Skip to main content

होम्स, शेरलॉक, शेरलॉक होम्स

पहिलाच लेख लांबलचक आहे, याबद्दल क्षमस्व! या लेखाला समीक्षा म्हणावे की नाही, याबाबतही साशंक आहे.

---------------------------------------------------------------------------------

लोकहो, खरे म्हणजे मला तुम्हाला घाबरवायचे नाही. पण वेळच तशी आली आहे. आपल्या पृथ्वीवर एक मोठी उलथापालथ झालेली आहे. मला त्या उलथापालथीचे नेमके स्वरुप लक्षात आलेले नाही हे खरे, पण I have got a shrewd idea and my shrewd ideas normally turn out to be accurate! मला असा संशय आहे, की पुढील दोनपैकी एक गोष्ट घडलेली आहे- एकतर या पृथ्वीतलावर एक सिल्व्हरटंग जन्माला आला आहे (सिल्व्हरटंग म्हणजे एखादी कथा मोठ्याने वाचून त्यातील एखादे पात्र पुस्तकातून बाहेर काढून वास्तव जगात आणू शकणारी व्यक्ती- संदर्भ: इंकवर्ल्ड ट्रिलजी) किंवा कोणीतरी बुकजंपिंगची कला अवगत केलेली आहे (बुकजंपिंग म्हणजे वास्तव जगातून एखाद्या पुस्तकात किंवा एखाद्या पुस्तकातून दुसर्‍या पुस्तकात उड्या मारणे व त्यातील पात्रांची इतरत्र ने-आण करणे- संदर्भ: थर्सडे नेक्स्ट कादंबर्‍या), कारण बीबीसीच्या नव्या ‘शेरलॉक’ या मालिकेतला ‘शेरलॉक होम्स’ हे पात्र साकारणारा आणि इतर वेळी ‘बेनेडिक्ट कंबरबाच’ या नावाने वावरणारा इसम हा तुमच्या-आमच्यासारख्या मर्त्य मानव नसून डॉयलच्या कथांतला शेरलॉक होम्सच आहे अशी माझी पक्की खात्री झाली आहे.

का ते सांगण्यासाठी या शेरलॉकचे वेगळे वर्णन करण्याची गरजच नाही (आता इथून पुढे कथेतील शेरलॉक होम्स या पात्राचा उल्लेख ‘होम्स’ असा केला जाईल आणि या टीव्हीमालिकेतील शेरलॉक होम्सचा उल्लेख ‘शेरलॉक’ असा केला जाईल. हेच तत्त्व जॉन वॉटसन या पात्रालाही लागू. याचे कारण पुढे कळेलच). वॉटसनने केलेले होम्सचे सगळे वर्णन आठवा आणि वेगवेगळ्या कथांतून आपल्याला दिसलेले त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू आठवा, ते सगळे या शेरलॉकशी तंतोतंत जुळतात.
पण होम्स-वॉटसन आणि शेरलॉक-जॉन यांत एक मोठा फरक आहे. होम्स आणि वॉटसन आहेत व्हिक्टोरियन काळातील लंडनमध्ये राहणारे, तर शेरलॉक आणि जॉन आहेत आजच्या, २१व्या शतकातल्या लंडनमध्ये राहणारे. या फरकामुळे अर्थातच होम्स-वॉटसन आणि शेरलॉक-जॉन यांत वरवरचे असे बरेच आनुषंगिक फरक निर्माण झाले आहेत. होम्स घोडागाड्यांतून फिरायचा, तर शेरलॉक कॅबा उडवतोय. वॉटसन त्याच्या कथा मासिकात पाठवायचा, तर जॉन त्या कथा त्याच्या ब्लॉगवर पोस्ट करतोय. होम्स लोकांची माहिती जमवून स्वतःचे कोश बनवायचा, तर शेरलॉक मोबाईल आणि लॅपटॉपवरून इंटरनेट वापरून आपला रिसर्च करतोय. होम्स छोट्या-मोठ्या चौकश्यांसाठी तार करायचा, तर शेरलॉक टेक्स्टिंग करतोय. होम्स-वॉटसन एकमेकांना आडनावाने हाक मारायचे, तर शेरलॉक-जॉन फर्स्ट नेम बेसिसवर आहेत.

परंतु मगाशी म्हटल्याप्रमाणे, हे सगळे फरक केवळ वरवरचे. दोघांचा ‘आत्मा’ मात्र एकच. होम्स आणि शेरलॉक दोघांसाठीही गुन्ह्यांचा छडा लावणे हे प्राणवायूसारखे आहे. सोडवायला केस नसताना दोघेही कंटाळून व्यसनांना कवटाळतात. दोघांचाही सायन्स ऑफ डिडक्शनवर विश्वास आहे. दोघांपैकी कुणालाही सूर्यमालेबद्दल काही माहिती नाही आणि दोघांपैकी कोणालाही भावना कळत नाहीत.

या शेवटच्या दोन परिच्छेदांतली एक गंमत लक्षात आली का तुमच्या? या आधीच्या परिच्छेदात होम्स आणि शेरलॉक या दोघांबद्दल बोलताना मी साधा वर्तमानकाळ वापरला आहे, जणू काही त्या विधानांतून मला
त्यांचे कालातीत होम्सत्व दाखवायचे आहे. याऊलट त्याआधीच्या परिच्छेदात मात्र त्या दोघांच्या या कालातीत होम्सत्वाची कालिक प्रकटने दर्शवण्यासाठी मी होम्स-वॉटसनबद्दल बोलताना रीती भूतकाळ वापरलाय आणि शेरलॉक-जॉनबद्दल बोलताना चालू वर्तमानकाळ वापरलाय. मी नकळतपणे केलेल्या या वाक्यरचनेतूनच मालिकेचे मुख्य उद्दिष्ट सफल झालेले दिसून येत आहे. म्हणजेच काय, तर शेरलॉकच्या पात्राद्वारे होम्सची व्यक्तिरेखा तिच्या गाभ्याला जराही धक्का न लागता, जशीच्या तशी आजच्या काळात आलेली आहे.

या मालिकेत केवळ पात्रेच नव्हे, तर अख्ख्या कथावस्तुचाही असा ’कालानुवाद’ केलेला आहे. पहिल्या सिझनचा पहिला भाग हा ’स्टडी इन स्कार्लेट’ वर बेतलेला होता. शेवटच्या दोन भागांत मात्र एकच अशी कथा घेतली नव्हती. याऊलट सध्या चालू असलेल्या सीझनमध्ये मात्र तिन्ही भाग एकेका कथेवर आधारलेले आहेत. पहिला भाग ’अ स्कॅंडल इन बोहेमिया’ वर आधारलेला होता, दुसरा भाग ’द हाऊंड ऑफ बॅस्करव्हिल्स’ वर बेतलेला होता तर तिसरा भाग हा ’फायनल प्रॉब्लेम’चे रुपांतरण असणार आहे. एकेका कथेवर आधारित असलेल्या भागांचे वैशिष्ट्य हे, की त्यांनी त्या त्या कथेतील महत्त्वाच्या घटना, त्यांची वैशिष्ट्ये या गोष्टींना फारसा धक्का लावलेला नाही. ’द हाऊंड्स इन बॅस्करव्हिल’मध्ये एक भयानक कुत्रा हे सूत्र समान आहे. परंतू, येथे बॅस्करव्हिल हॉलच्या जागी बॅस्करव्हिल रिसर्च सेंटर आले आहे. त्या भयानक कुत्र्याच्या मागे बॅस्करव्हिल कुटुंबावरील शाप नसून जेनेटिक एक्स्पेरिमेंटेशन आहे. एकुणात काय, तर कथेचे मुख्य घटक तेच ठेवले आहेत, पण त्यांची पार्श्वभूमी कालानुरूप बदलली आहे आणि त्यामुळे त्या कथाही अधिक विश्वसनीय झाल्या आहेत. मार्क गॅटिस या मालिकालेखकाने या भागाचे रूपांतरण करण्याच्या प्रक्रियेबद्दल एका मुलाखतीत दिलेली माहिती वाचनीय आहे.

या मालिकेतला हा कालानुवाद एकुणातच खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचा नीट अभ्यास करण्याची गरज आहे. हा कालानुवाद वेगवेगळ्या स्तरांवर झालेला आहे. सगळयात पहिला आणि लगेच डोळ्यात भरणारा स्तर म्हणजे शेरलॉक आणि वॉटसन यांची वेशभूषा (डिअरस्टॉकर आणि पाईप यांचं गायब होणं), त्यांचे घर, त्यांच्या आसपासच्या वस्तू (लॅपटॉप इ.)- थोडक्यात काय, तर नेपथ्य.

पुढचा स्तर आहे, एका शॉटमध्ये एस्टॅब्लिश न करता येणाऱ्या गोष्टींचा- पात्रांचे वागणे (टेक्स्टिंग), पात्रांच्या सवयी (निकोटिन पॅचेस), त्यांचा पूर्वेतिहास (वॉटसन आणि जॉन दोघेही अफगाणिस्तानात लढले आहेत असे दाखवले आहे, परंतू दोन्ही युद्धे वेगवेगळी). या स्तरावरील कालानुवादात दोन भाग आहेत- एक एक सवय घेऊन तिचा दुसऱ्या काळातला इक्विव्हॅलंट शोधणे हा एक भाग आणि त्या इक्विव्हॅलंटवर आजच्या काळातील सामाजिक, पर्यावरणीय, राजकीय इ. इ. परिस्थितीचा कसा परिणाम होईल याचा विचार करणे हा दुसरा भाग. म्हणजे, होम्सच्या व्हिक्टोरियन काळातील पाईपसाठी सिगारेटी हा चांगला पर्याय होता, परंतु “It’s impossible to sustain a smoking habit in London these days” असे म्हणत शेरलॉक निकोटिन पॅचेसचा आश्रय घेताना दाखवला आहे.

याच्या पुढील स्तर आहे तो संवादांच्या कालानुवादाचा. या मालिकेत बरेचसे संवाद नव्याने लिहिले आहेत. नवीन संवादांबरोबरच होम्सच्या काही लोकप्रिय संवादांचाही समावेश आहे. जसे, ‘द गेम इज अफूट’. या कारणास्तव, संवादलेखनाचेही दोन भाग बनतात- नवे संवाद अशा प्रकारे लिहिणे, की जेणेकरून त्याची भाषा व सांस्कृतिक संदर्भ आजचे असतील, तरी त्यांतून केलेली विधाने व केलेली शब्दरचना व वाक्यरचना ही त्या त्या पात्राच्या स्वभावाशी सुसंगत असेल व त्याचबरोबर ते संवाद आपल्याला मांडावयाच्या कथेला पोषक असतील. जुन्या संवादांचा कालानुवाद करताना त्यांत जे वाक्यविशेष व रुपके वापरलेली असतात, त्यांचे त्या संवादातले स्थान, कार्य, प्रभाव, काव्यात्मकता, त्यामागचा त्या पात्राचा विचार इ. गोष्टी पाहून तशा प्रकारचे नव्या भाषेतले वाक्यविशेष व नव्या संस्कृतीतली रुपके वापरायची असतात. उदा. वर उल्लेखलेला संवाद या मालिकेत ‘द गेम इज ऑन’ हे रुप घेऊन आला आहे. आणखी एक उदाहरण म्हणजे, आपल्याला सूर्यमालिकेबद्दल काहीच माहिती का नाही हे वॉटसनला सांगत असताना होम्स आपल्या स्मरणशक्तीला अ‍ॅटिकची, म्हणजे घरातल्या माळ्याची उपमा देतो. शेरलॉक मात्र अशाच प्रकारच्या संवादात स्मरणशक्तीला कॉम्प्युटरच्या हार्ड ड्राईव्हची उपमा देतो.

पुढील स्तर आहे तो मूळ कथेतल्या मुख्य घटकांसाठी एक्विव्हॅलंट्स शोधण्याचा (मूळ कथेतील नटी आयरीन ऍडलर ही मालिकेत डॉमिनेट्रिक्स बनली आहे, तर तिच्याकडे राजघराण्यातल्या ज्या व्यक्तीची नको त्या अवस्थेतील छायाचित्रे आहेत, ती व्यक्ती एक स्त्री आहे). येथे त्या एलिमेंट्सचे कथेतले स्थान, त्याचा कथानकावर पडणारा प्रभाव आणि त्यांचे कार्य या गोष्टी लक्षात घेऊन त्यानुसार इक्विव्हॅलंट्स शोधावे लागतात. वर दिलेल्या उदाहरणाबाबत बोलायचे झाल्यास, मूळ कथेतील छायाचित्रांचे महत्त्व हे त्यांच्यामुळे विवाहपूर्व प्रेमप्रकरणाचे बिंग फुटण्याची शक्यता असल्याने वाढले होते. आताच्या काळात विवाहपूर्व प्रेमप्रकरणे असणे वावगे नाही. त्यामुळे या छायाचित्रांची स्फोटकता राखण्यासाठी आयरीनला डॉमिनेट्रिक्स बनवलं आहे आणि राजघराण्यातली ती व्यक्ती स्त्री आहे असं दाखवलं आहे.

याच्या पुढचा स्तर आहे, तो कालानुरुप बदललेली पात्रे, बदललेली परिस्थिती, कथेतले बदललेले घटक यांमुळे कथानकाच्या बदलत जाणारय़ा ओघावर नियंत्रण आणून ते पात्रांच्या स्वभावाशी, वागण्याशी सुसंगत करणे. याचे उदाहरण द्यायचे झाले, तर या मालिकेतील मॉली या नवीन पात्राचे द्यावे लागेल. व्हिक्टोरियन काळात एखादी मुलगी होम्सवर भाळून सतत त्याच्या मागेपुढे करणे कितपत कालसुसंगत होते ते माहीत नाही, परंतु आताच्या काळात शेरलॉकच्या दिशेने कोणत्याही मुलीने पाऊल न टाकणे निव्वळ अशक्य. या कारणास्तव कदाचित मॉलीची व्यक्तिरेखा कथानकात घालण्यात आली आहे. असे असूनही शेरलॉकचे मॉलीशी होणारे बोलणे, वर्तन हे खास शेरलॉकी शैलीतले आहे. त्यामुळे मॉलीच्या व्यक्तिरेखेचा प्रवास कुठेही खटकत नाही.

या सर्व स्तरांवरच्या या यशस्वी कालानुवादामुळे ‘शेरलॉक होम्स’ ही व्यक्तिरेखा आता संकल्पनेच्या पातळीवर गेली आहे आणि डॉयलचा होम्स व गॅटिस-मोफॅटचा शेरलॉक हे त्या सांकल्पनिक ‘शेरलॉक होम्स’चे दोन वेगवेगळे कालानुवाद झाले आहेत असे वाटते. होम्स, शेरलॉक, शेरलॉक होम्स यांच्यात स्रोत पात्र-लक्ष्य पात्र असे नाते आहे, असा विचार केल्यास कदाचित या कालानुवादाकडे अधिक चांगल्या पद्धतीने पाहता येईल.

या कालानुवादानंतर मोठे आव्हान उभे राहते, ते पुस्तक ते छोटा पडदा या माध्यमांतराचे. आणि या विशिष्ट मालिकेबाबत बोलायचे झाले, तर यात कथा ज्या क्रमाने घेतल्या आहेत, तो क्रम डॉयलच्या मूळ कथाक्रमापासून भिन्न आहे. त्यामुळे मालिकेच्या पटकथालेखकांना संपूर्ण मालिकेतून जी कथा लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, त्यादृष्टीने कथानकात बरेच बदल केले गेले आहेत (उदा. आयरीन ऍडलर आणि मॉरियार्टीचे संगनमत).

इतक्या लोकप्रिय व्यक्तिरेखा आणि १२० वर्षे सतत लोकांच्या वाचनात राहिलेल्या व त्यामुळे वाचकांना तोंडपाठ झालेल्या कथा मालिकाबद्ध करताना मूळ कथांना व्यापून राहिलेली एक भावना- उत्कंठा टिकवून धरण्याचे शिवधनुष्यही पटकथालेखकांना पेलायचे होते. तेही त्यांनी यशस्वीपणे पेलले आहे. याचे सुंदर उदाहरण म्हणजे, मूळ कथेतला खलनायक- जॅक स्टेपलटन हा ’द हाऊंड्स ऑफ बॅस्करव्हिल’ या भागात नाहीच आहे. त्यामुळे हे सगळे कोण घडवून आणते आहे ही उत्कंठा शेवटपर्यंत टिकून राहते.

प्रेक्षकांना या मालिकेत खास रस वाटण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे शेरलॉकच्या विचारप्रक्रियेला मालिकेत दिलेले दृश्य स्वरुप. शेरलॉक जेव्हा घटनास्थळावरची एक एक वस्तू पाहतो, तेव्हा ती पाहून त्याने काढलेले एकेक निष्कर्ष आपल्याला पडद्यावर लिखित स्वरुपात दिसतात. शेरलॉक जेव्हा लंडनच्या रस्त्यांचा नकाशा आठवायचा प्रयत्न करतो, तेव्हा तो आपल्यालाही दिसू लागतो. त्यामुळे शेरलॉकच्या मनात काय चालले आहे ते आपल्याला दिसत राहते आणि हेच इतरांना कळत नाही आहे हे पाहून शेरलॉकप्रमाणेच आपल्यालाही मजा वाटते. आजवर पडद्यावर अनेक शेरलॉक होम्स पाहिले असले, तरी मनाला सर्वाधिक भुरळ पाडणारी त्याची गोष्ट म्हणजे त्याच्या मेंदूत फिरणारी चक्रे- ती या मालिकेत दिसतात, त्यामुळे हा शेरलॉक अधिक जवळचा वाटतो. खरे म्हणजे, शेरलॉकच्या विचारप्रक्रियेला दृश्य स्वरुप देणे हे गेल्या दोन वर्षांत आलेल्या होम्स रूपांतरणांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. रॉबर्ट डाऊनी ज्युनियर अभिनीत आणि गाय रिची दिग्दर्शित ’शेरलॉक होम्स’ या चित्रपटातही ’स्लो मोशन’च्या सहाय्याने होम्सची विचारप्रक्रिया दाखवली आहे. याच चित्रपटात होम्सचे वेषांतर ज्या पद्धतीने दाखवले आहे, तेही उल्लेखनीय.

’शेरलॉक’ मालिकेच्या या भागांचे कथालेखनाच्या दृष्टीने आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व भागांत डॉयलच्या ६० होम्सकथांचे विखुरलेले संदर्भ आणि त्यांची विनोदपूर्ण हाताळणी. जॉनने आपल्या ब्लॉगवर लिहिताना कथांना ’द गीक इंटरप्रीटर’, ’द स्पेकल्ड ब्लॉंड’ अशी नावे दिली आहेत. एका भागात जॉनने लपवून ठेवलेल्या सिगारेटी धुंडाळताना शेरलॉक चपला उलट्यापालट्या करून बघतो. ’अ स्टडी इन पिंक’ मध्येही एका घरात एक प्रेत सापडते, इथेही RACHE ही अक्षरे लिहिलेली सापडतात. लगेच पोलिसांचा फॉरेन्सिक एक्स्पर्ट जर्मन भाषेतल्या ’राखं’ या शब्दाबद्दल बोलू लागतो, तर होम्स त्या खोलीचे दार त्याच्या तोंडावर आपटतो, व तो शब्द ’राखं’ नसून ’रेचल’ आहे असे सांगतो आणि आपली हसून हसून पुरेवाट होते.

आता इतके चर्‍हाट लावून झाल्यावर थोडक्या शब्दांत या मालिकेचे परीक्षण द्यायचे म्हटले तर मी असे म्हणेन- बेनेडिक्ट कंबरबाचचं होम्ससदृश रुपडं, त्याने विलक्षण समज आणि संयम दाखवून केलेला अभिनय, पटकथालेखकद्वयीने केलेला उत्तम कालानुवाद हा या मालिकेचा मुख्य ऐवज, त्यावर शेरलॉकच्या विचारप्रक्रियेला दृश्यस्वरुप देऊन, प्रेक्षकांची उत्कंठा कायम राखण्यासाठी मूळ कथेत बदल करून आणि मूळ होम्सकथांतील विविध संदर्भाची मधूनच पेरणी करून पटकथालेखकांनी ‘प्रतिमेहूनही वास्तव उत्कट’ असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण केली आहे. बाकी कोणाचे असो वा नसो, माझे मन मात्र या मालिकेने नक्कीच जिंकले आहे. यासाठी सिल्वरटंग मार्क गॅटिसला आणि बुकजंपर स्टिव्हन मोफॅटला माझे मनापासून धन्यवाद.

निखिल देशपांडे Sun, 29/01/2012 - 19:45

पहिल्या सिझनचे पारयण झालेच होते... दुसर्‍या सिझनची वाट पाहात होतो.. पहिला भाग पाहुन झाला आहे उरलेले दोन लवकरच.
सगळ्यात मोठी तक्रार आहे ती म्हणजे वर्षाला फक्त ३ भाग "यह बहुत नाइन्साफी है"
तुम्ही लिहिलेला सगळा लेख शब्द न शब्द पटला.
मी लिहिणार होतो पण कंटाळा केला

सन्जोप राव Sun, 29/01/2012 - 20:23

In reply to by निखिल देशपांडे

अगदी हेच. पहिला सीझन बघून झाला आहे. दुसरा सीझन कुठून डाऊनलोडवावा?
'इट इज अ थ्री पाईप प्रॉब्लेम' च्या जागी 'इट इज अ थ्री पॅच प्रॉब्लेम' अशा गमतीजमती या भागांची मजा अधिक वाढवतात.

निखिल देशपांडे Sun, 29/01/2012 - 23:45

In reply to by सन्जोप राव

रावसाहेब लिंक देतोय पण मी जर एखादा लेख लिहिला तर त्यात शुद्धलेखनाच्या दोन चुका कमी काढा :-)
http://ovfile.com/j3eh7h6kmah2

राजेश घासकडवी Sun, 29/01/2012 - 20:46

लेख अप्रतिम झाला आहे. त्यामुळे लांबीबद्दल क्षमा मागण्याचं काहीच कारण नाही. असंच लांबरुंद आणि सखोल लेखन येऊ द्यात.

या लेखाला समीक्षा म्हणावं का असा प्रश्न विचारला आहे. मला वाटतं ही त्या मालिकेची समीक्षा आहेच. पण त्यापेक्षा व्यापक होऊन 'रूपांतर, भावानुवाद, कालानुवाद' म्हणजे काय याविषयी टिप्पणी आहे. आदर्श अनुवाद घेऊन त्याचे पैलू तपासून तो आदर्श का आहे हे याचं वर्णन केल्यामुळे वाचकांना नवीन शिकायला मिळतं.

या लेखात कालानुवाद मधल्या काळ ऐवजी भाषा शब्द सगळीकडे वापरला आणि दृक्कश्राव्य माध्यमाऐवजी लेखनातले संदर्भ वापरले तर उत्तम भाषांतर कसं असावं, त्यात कुठल्या कुठल्या अंगांचा विचार व्हावा हे स्पष्ट होतं.

बावनकशी लेखन.

ऋषिकेश Mon, 30/01/2012 - 09:26

वा वा वा! काय म्हणायचं या लेखनाला!? समीक्षा परिक्षण बगैरे शब्द रुक्ष वाटावेत.. वेगळीच शैलीच नव्हे तर लेखनाचा संवादी सुर वेगळाच बाज तयार करतो. मालिका बघायचा योग आलेला नाही मात्र या परिक्षणाने उत्सुकता प्रचंड वाढलेली आहे.

बर्‍याच दिवसांनी एखाद्या लेखनाला पाच चांदण्या द्यायचा योग आला. असेच येऊदे मस्त मस्त!

अदिति Mon, 30/01/2012 - 11:59

अतिशय सुरेख लेखन झाले आहे. खूप मनापासून लिहिलायस हे जाणवतं आहे. होम्स आणि अनुवाद हे तुझे दोन अतीव जिव्हाळ्याचे विषय एकत्र आल्यावर असा रंगलेल्या मैफलीसारखा लेख तयार होणारच :)
असेच आणखी लेख लिहावेस असा आग्रह आहे!

अदिति

श्रावण मोडक Mon, 30/01/2012 - 13:59

लेखन आवडले. :)

राधिका Mon, 30/01/2012 - 19:58

सर्व प्रतिसादांबद्दल व चांदण्यांबद्दलही धन्यवाद. :-)

मेघना भुस्कुटे Mon, 06/02/2012 - 08:50

शेरलॉक पाहून वीकान्त सत्कारणी लावला.
राधिका, मोलाच्या माहितीबद्दल आणि ती पुरवण्याच्या तालेवार शैलीबद्दल तुमचे मानावेत तेवढे आभार कमीच आहेत. अजून येऊ द्या.

ऋषिकेश Tue, 17/04/2012 - 09:55

एकदाचा योग आला. कालच पहिला एपिसोड पाहिला.
पहिला एपिसोड बघुनच या शेरलॉक मालिकेच्या प्रेमात पडलो आहे!
मालिका 'टू गुड टु एक्सप्लेन' आहे! असले शिवधनुष्य राधिकाच पेलू जाणे

मेघना भुस्कुटे Tue, 17/04/2012 - 10:01

In reply to by ऋषिकेश

वेलकम टु दी क्लब. :)
हेवा वाटतो मला तुमचा. अजून आख्खे पाच भाग (आणि पायलट धरला तर सहा) पाहायचे शिल्लक आहेत तुम्हाला!

विसुनाना Wed, 18/04/2012 - 11:31

उत्तम ओळख.
या रसग्रहणामुळे 'नवा' शेरलॉक होम्स पहाण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि तसा तो पाहिला.(गूगलबाबा)

शेरलॉक होम्सचा हा नवा अवतार हे दशक आणि कदाचित शतकही गाजवेल यात शंका नाही.
भारतात ही मालिका दिसते का? आणि दिसत असेल तर कुठे? (बीबीसीच्या कुठल्या च्यॅनलवर?)

मी Wed, 18/04/2012 - 11:39

In reply to by विसुनाना

भारतात ही मालिका दिसत नाही, अवैध मार्गाने(टॉरंट) पहावी लागेल, "शेवटची समस्या"(शेवटचा भाग) भाग थोडा रटाळ आणि होम्सची प्रतिमा मलिन करणारा वाटला. एकंदर मालिका बघण्यासारखी आहे.

नंदन Thu, 07/06/2012 - 13:47

पहिल्या सीझनचे तिन्ही भाग आत्ताच पाहून संपवले. त्यानंतर हा वाचण्यासाठी राखून ठेवला लेख वाचला. अप्रतिम! होम्सच्या डिटेक्टिव्हगिरीइतक्याच शोधक नजरेने मालिकेतले बारकावे टिपलेले आहेत.

राधिका Fri, 08/06/2012 - 15:01

सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

विसुनाना, बीबीसी एंटरटेनमेंट या वाहिनीवर मध्यंतरी पहिला सीझन पूर्ण दाखवला होता. त्यामुळे ते दुसरा सीझनही दाखवतील असे वाटते.

राधिका

सन्जोप राव Sat, 09/06/2012 - 05:40

In reply to by मी

दुसर्‍या सिरीज मधला पहिला(A Scandal in Belgravia) भाग चुकुवू नये असा आहे. बाकीचे कंटाळवाणे आहेत.
हे तुम्ही हे भाग कशासाठी पहात आहात यावर अवलंबून आहे.

सर्किट Sat, 02/01/2016 - 22:28

कळवण्यास आनंद होतो की The abominable bride या ख्रिसमस-विशेषांकात मॉफ्टिसनी 'शरलॉक,जॉन' व 'होम्स, डॉ. वॉटसन' यांची भेट घडवून आणली आहे..
अधिक माहितीसाठी: http://www.bbc.co.uk/programmes/b018ttws
उसगावात या भागाचे पुनर्प्रसारण १० तारखेला पी.बी.एस. वर होईल: http://www.pbs.org/wgbh/masterpiece/programs/features/news/sherlock-spe…

मेघना भुस्कुटे Tue, 05/01/2016 - 10:11

In reply to by सर्किट

पाहिला. आनंदविभोर झाले.
शरलॉकच्या डोक्यातल्या भित्या, संकोच, अपराधभाव, गंड; मॉरिआर्टीचं गूढ आणि मेरीचं गूढ - अशा तिहेरी पेडांमधून हा खास भाग विणला आहे. सर्वसामान्य होम्सचाहत्यांना तो आवडायची शक्यता फारच कमी आहे. होमोफ्रेंडली चाहत्यांना तो अतिशय आवडला, त्याची विच्छेदनं झाली, पुढच्या भागांचे कल्पनाविस्तार झाले... पण हे सगळं डॉयलबुवांच्या होम्सपासून पुरेसं लांब गेलं आहे आणि हा धीटपणा दाखवल्याबद्दल मॉफ्टिसचं अभिनंदन करावं तितकं कमी आहे.

ऋषिकेश Tue, 05/01/2016 - 10:16

In reply to by मेघना भुस्कुटे

होमोफ्रेंडली चाहत्यांना तो अतिशय आवडला

याचा अर्थ ज्यांना तो आवडला नाही ते लगेच होमोफोबिक ठरू नयेत! होय ना?

मेघना भुस्कुटे Tue, 05/01/2016 - 10:20

In reply to by ऋषिकेश

मी असं कुठे बॉ म्हटलं? सगळ्या प्रकारच्या लोकांना सगळ्या प्रकारचे अर्थ लावण्याची मोकळीक आहे. कुठलंही अर्थनिर्णयन चूक वा बरंवाईट नाही, हेच तर मी केव्हाची बोंबलून राहिले आहे!