Skip to main content

भारताची प्रगती १: प्रास्ताविक

आज २६ जानेवारी. प्रजासत्ताक दिवस. त्यानिमित्ताने गेला बराच काळ डोक्यात घोळणारं लेखन सुरू करत आहे. ही लेखमाला लिहायला दुसरं तत्कालिक कारण म्हणजे रामदासांचा 'घृतं पीबेत' हा अतिशय वाचनीय लेख. स्मरणरंजनात्मक लेखनात सहज रमून जायला होतं. त्यात तो लेख रामदासांसारख्यांनी लिहिलेला असला तर विचारायलाच नको. त्या जादूई दिवसांची सगळी गोड, कडू जादू जिवंत होते. 'काय दिवस होते राव! गेले ते. आता पुन्हा नाही यायचे.' प्रत्येकाच्याच जीवनात असे सोनेरी आठवणींचे दिवस असतात. जेव्हा सगळं काही सुंदर होतं. आता नाही राहिलं ते. त्यांच्या आठवणी उजळून येताना त्यावेळचे डाग पुसून येतात. 'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' बनून येतात. नॉस्टॅल्जियाची वाईन जितकी मुरलेली तितकी चवदार लागते.

राजहंस पाण्यावर चालताना दिसतो तेव्हा मोठा डौलदार दिसतो. देखणा दिसतो. पाण्यावरती इथून तिथे लीलया, ऐटबाजपणे जातो. आपल्या लहानपणी आपण आईवडलांकडे आदर्श म्हणून बघतो, ते आदर्शही असेच राजहंसासारखे दिसतात. आपण, त्यांची लहानगी पिल्लं त्यांच्याकडे बघून भारावलेले असतो. त्यावेळचं जग खूप सुंदर असतं. सगळं नवीन, ताजंतवानं असतं. सकाळच्या कोवळ्या उन्हासारखं. उन्हं थोडी चढतानाही आईवडलांच्या पंखांची सावली असते. पण कधी ना कधी आपण मोठे होतो. मोठे झाल्यावर, स्वतः राजहंस झाल्यावर मात्र आपल्याला पाण्याचा जोर जाणवतो. वरून संथ, शांत दिसत असलं तरी पाण्याखाली खळबळ चालू असते, पाय सर्व शक्तिनिशी हलवत रहावं लागतं हे समजतं. दोन घास मिळवण्यासाठी आणि पिलांना भरवण्यासाठी किती धडपड करावी लागते हे लक्षात येतं. आईवडिलांनी ज्यापासून आपल्याला सुरक्षित ठेवलं ते टक्केटोणपे आपल्याला स्वतःला खावे लागतात. आणि मग सध्याचा काळ हा अडचणींनी, कष्टाने भरलेला वाटायला लागतो. पण लहानपणी मनावर उमटलेलं गोंडस चित्र पुसलं गेलेलं नसतं. ते आदर्श म्हणून शिल्लक रहातातच. त्या आदर्श पंखांखालचं स्वप्नमय आयुष्य जगता येत नाही पुन्हा. मग आपलंच कुठेतरी चुकतंय असं वाटतं. त्या मागच्या काळची ओढ लागते.

देशाचं, समाजाचंही आयुष्य असंच सिंहावलोकी असतं असं मला वाटतं. भूतकाळाकडे एका गूढरम्य आदराने बघितलं जातं. हे सार्वत्रिक आहे. मात्र त्या आदराचा थोडा अतिरेक होताना दिसतो कधीकधी. पूर्वी कधीकाळी कसं चांगलं होतं आणि आता त्याचा पार बट्ट्याबोळ झाला आहे अशी एक भावना सगळीकडे दिसून येते. नॉस्टॅल्जियाच्या सुखद नशेच्या हॅंगोव्हरसारखी ती डोकं भणभणून टाकते.

'देश रसातळाला चालला आहे... स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षं झाली तरी जनतेला तिची फळं मिळालीच नाही.... श्रीमंत अधिक श्रीमंत होतात, गरीब अधिक गरीब होतात... विषमता वाढते आहे...' वगैरे ओरड अनेक वेळा ऐकू येते. त्यात काहीच तथ्य नाही असं मला म्हणायचं नाही. भारतात आसपास नजर फिरवली तर परिस्थिती दारूण आहे हे लक्षात यायला वेळ लागत नाही. एका बाजूला विपुल नैसर्गिक समृद्धता आणि दुसऱ्या बाजूला अतोनात गरीबी. एका बाजूला दिवसाला दोन वेळ जेवण मिळवण्याची मारामार तर एका बाजूला अपार नासाडी. एके ठिकाणी पुराने वाताहत तर दुसरीकडे अवर्षणामुळे उपासमार. हे कधी बदलणार? असा प्रश्न मनात उद्भवणं स्वाभाविकच आहे. वर्षानुवर्षं काही विशेष फरक न दिसल्यामुळे एक हताशपणा येतो. या हताशपणातून हरामखोर राजकारणी, नाकर्तं सरकार, मोडकळलेली नोकरशाही या सगळ्यांना शिव्या द्याव्याशा वाटतात. मनात साठून राहिलेला राग बाहेर येतो. हे सगळं असंच चालायचं, आपण काही करून व्यवस्था बिलकुल बदलणार नाही अशी खात्री पटते. एक प्रकारचं नैराश्य साचून रहातं.

प्रश्न असा आहे की हे नैराश्य बाळगणं रास्त आहे का? समाजाने स्वतःविषयी असा न्यूनगंड ठेवणं कितपत योग्य आहे? या प्रश्नांकडे उघड्या डोळ्यांनी बघणं हा या लेखमालेचा उद्देश आहे. तुम्ही किती आशावादी किंवा निराशावादी आहात त्यानुसार भारताच्या ऐहिक प्रगतीविषयी वेगवेगळी विधानं करता येतात. (ऐहिक प्रगतीत मी केवळ पैसा अपेक्षित नाही. मी इथे पैसा, पैशाने विकत घेता येणारी सुखं, आरोग्य, आयुर्मान, मोकळा वेळ, शिक्षण, समाजाचं एकंदरीत स्वास्थ्य, अशा सर्व मूलभूत गोष्टींविषयी बोलतो आहे. लेखमालेत याविषयीही थोडी चर्चा होईलच)

१. अत्यंत दारूण परिस्थिती आहे. आणि दिवसेंदिवस ती बिघडत चाललेली आहे. एके काळी भारतात सुवर्णयुग होतं. आता काय आहे?
२. परिस्थिती दारूण आहे. यापुढेही काही फार सुधारणा होईल अशी आशा बाळगणं मूर्खपणाचं आहे.
३. परिस्थिती गेल्या काही वर्षांत थोडीशी सुधारल्यासारखी वाटते खरी. पण ती श्रीमंतांचीच. गरीबांची अवस्था होती तितकीच वाईट आहे.
४. विसाव्या शतकात, विशेषतः स्वातंत्र्यानंतर परिस्थिती थोडी सुधारली आहे खरी. पण म्हणावी तितकी नाही. त्यामुळे पुढे खूप भलं होईल याबाबत उदासीन आहे.
५. स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणावर प्रगती झालेली आहे. तिची फळं वरच्या वर्गांना व सुशिक्षितांना बऱ्याच प्रमाणात मिळालेली आहेत.
६. परिस्थिती वाईट असली तरी गेल्या काही दशकांमध्ये न भूतो न भविष्यति अशी प्रगती झालेली आहे. तिचे परिणाम समाजाच्या मोठ्या थराला दिसत आहेत. त्यामुळे उज्ज्वल भविष्याची आशा आहे.
७. सद्य परिस्थिती चांगली नाही हे खरं असलं तरी आजचा काळ हा खऱ्या अर्थाने भारतातल्या बहुतेकांसाठी कुठच्याही काळापेक्षा अधिक चांगला आहे. आणि परिस्थिती दिवसेंदिवस वेगाने सुधारत चाललेली आहे.

या १ ते ७ च्या पट्टीवरती प्रत्येक जण कुठे ना कुठे असतो. माझा असा दावा आहे की बहुतेक जण सत्य परिस्थितीत असलेल्या चित्रापेक्षा किमान २ आकडे अधिक निराशेकडे झुकलेले असतात. हे असं का असावं याची काही कारणं म्हणजे
- माध्यमांमध्ये हळुवार प्रगतीच्या बातम्यांऐवजी सनसनीखेच धक्कादायक बातम्यांना प्राधान्य दिलं जातं.
- आपल्यातच झालेली आर्थिक प्रगतीदेखील आपल्याला अंगवळणी पडते. मग आपल्या अपेक्षा वाढतात, आणि काय मिळालं यापेक्षा अजून काय मिळवायचं आहे याचा विचार अधिक होतो.
- काहीशी निराशात्मक प्रवृत्ती अंगवळणी पडलेली आहे.
- पूर्वी कधीतरी जग सुंदर होतं, ते आता राहिलं नाही हे आपल्याला आपल्या मोठ्यांकडून ऐकून ऐकून खरं वाटायला लागतं.
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे 'सद्य परिस्थिती वाईट आहे' या योग्य विधानाचं 'परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चाललेली आहे' असं नकळत रूपांतर होतं. या दोन विधानांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे.

भारताची ऐहिक परिस्थिती सुधारत आहे, प्रगती होत आहे आणि त्यात अभिमान बाळगण्यासारख्या अनेक गोष्टी वेगाने होत आहेत असा मला दाखवून द्यायचं आहे. वरच्या आशा-निराशेच्या विधानांमध्ये ६ किंवा ७ ही विधानं अनेक बाबतीत लागू आहेत. कशी ते आपण या लेखमालेतच बघू. ते पहाताना वर दिलेल्या पाच कारणांचाही थोडा ऊहापोह करू. लेखांचं स्वरूप हे एकामागोमाग येणाऱ्या क्रमशः मालिकेपेक्षा एकाच सूत्रात गुंफलेल्या स्वतंत्र लेखांप्रमाणे असेल. हलत्या पाण्यावर दिसणाऱ्या प्रकाशाच्या तुकड्यांसारखं. एक सलग चित्र होण्यासाठी वेगवेगळ्या कोनातून दिसलेले वेगवेगळे तुकडे एकत्र जोडावे लागतात.

या तुकड्यांमध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहून राजहंसाने स्वतःला बदक म्हणवून घेणं कमी केलं तरी तेवढंच यश मला रगड.

Node read time
4 minutes
4 minutes

नितिन थत्ते Fri, 27/01/2012 - 12:29

थर्मोडायनामिक्सच्या दुसर्‍या नियमावर बहुतेक बुद्धिजीवी वर्गाचा गाढ विश्वास असतो. "Disorder in the universe is always increasing". :)

सिरिअस प्रतिसाद थोड्या काळाने देईन,

ऋषिकेश Fri, 27/01/2012 - 14:33

लेखमालेचे स्वरुप समजले नाही म्हणजे येत्या लेखांत भारताने केलेली प्रगती विशद करणार आहात का? तसे असल्यास उत्तम आहे! वाट पाहतोय
बाकी माझे मत ७ च्याही पुढे आहे. सद्य परिस्थिती वाईट नाही आणि पुढेही प्रगती होत राहिलच!

शिवाय १०-२० वर्षांनी जेव्हा असंच कोणीतरी २०१२ च्या आठवणी जागवेल तेव्हा "वा! तो काय सुखाचा काळ होता" असे सुस्कारे तेव्हाही ऐकु येतील याची खात्री आहे. तेव्हा हा काळ वाईट आहे असं नाहिच्चे

............सा… Fri, 27/01/2012 - 22:48

मायबोलीवरचा पुढील लेख वाचला आणि मनात विचार आला खरोखर भारतात झपाट्याने सुधारणा होते आहे -
http://www.maayboli.com/node/32228

जे काही लोक भारतात आहेत त्यांनी समस्यांना धीरोदात्तपणे तोंड देऊन मार्ग काढण्यास सुरुवात केली आहे. सुवर्णयुग लवकरच अवतरेल खरं पाहता.

नगरीनिरंजन Sat, 28/01/2012 - 09:42

माझ्यासारख्या सिनिकल आणि निराशावादी लोकांना जरा आशावादी विचारांची गरज आहेच.
प्रगती ही स्थिती आणि व्यक्तिसापेक्ष असते हे बर्‍याच बुद्धिजीवी म्हणवणार्‍या लोकांना पचनी पडत नाही हे खरं असलं तरी सध्या सर्वत्र स्वीकारल्या गेलेल्या आधुनिक अर्थशास्त्राच्या तत्वांप्रमाणे बर्‍याच लोकांची प्रगती झाली आहे हे नक्की.
राजेश घासकडवी यांच्या लौकिकाप्रमाणे लेख मुद्देसूद आणि सर्वंकष माहितीपूर्ण असतील यात शंका नाही. तरीही काही मुद्द्यांचा उहापोह व्हावा अशी अपेक्षा नोंदवून ठेवतो.
१. प्रगतीचा आलेख मांडताना १९९१ पुर्वीची स्थिती आणि नंतरची स्थिती अशी तुलना करता आली तर चांगले होईल. त्यायोगे बंदिस्त अर्थव्यवस्थेत कितपत प्रगती झाली आणि जागतिकीकरणानंतर किती झाली हे लगे हाथ पडताळता येईल.
२. माध्यमांमध्ये सनसनाटी बातम्या असतात हे खरेच परंतु वेळीवेळी प्रसिद्ध होणारे सर्वेक्षण अहवालसुद्धा बर्‍याचदा काळे चित्र तयार करतात. मध्यंतरी कुपोषित मुलांचा अहवाल आला त्याची दखल पंतप्रधानांनीही घेतली. पुण्यात ३०% लोक झोपडपट्टीत राहतात अशी एका संस्थेने जाहीर केलेल्या अहवालाबद्दलची बातमी वाचली होती. अशा अहवालांमध्ये पुर्वीच्या स्थितीत आणि सद्यस्थितीत तुलना नसते त्यामुळे प्रत्यक्षात प्रगती झाली असली तरी ते कळत नाही. या अहवालांच्या विश्वासार्हतेबद्दल किंवा ते किती गंभीरपणे घ्यायचे यावरही भाष्य करता आले तर उत्तम.
३. झालेल्या प्रगतीत सरकारी धोरणे, योजना आणि खाजगी उद्योग यांच्यापैकी कोणाचा प्रभाव जास्त पडला हेही जाणून घ्यायला आवडेल.

लेखमालेसाठी शुभेच्छा!

आळश्यांचा राजा Sat, 28/01/2012 - 12:29

In reply to by नगरीनिरंजन

सध्या सर्वत्र स्वीकारल्या गेलेल्या आधुनिक अर्थशास्त्राच्या तत्वांप्रमाणे बर्‍याच लोकांची प्रगती झाली आहे हे नक्की.

अधोरेखित भाग महत्वाचा वाटतो. सहमत आहे. अदिती यांनी दिलेल्या प्रतिसादात म्हटले आहे की सध्या बर्‍याच लोकांकडे स्वयंचलित वाहने आली आहेत, आणि ही बाब त्यांना प्रगती वाटते. (एखाद्याला ही प्रगती न वाटता एक वाढीव समस्या वाटू शकते. तसेच, काही गोष्टींमधील अपयश दर्शवणारी गोष्टही वाटू शकते. उदा. सार्वजनीक वाहतूक नियोजनाचे अपयश; किंवा इंधनाच्या नियोजनातील अपयश, आणि पर्यायाने उर्जेची नासाडी; किंवा शहरांमधील अव्याहत वाहतुकीमुळे नष्ट झालेली शांतता, रस्त्यांवरुन शहरामध्ये फेरफटका मारणे हा आनंद न राहता त्रासदायक अनुभव ठरणे, इत्यादि.) उद्या शहरांमध्ये आरामदायी आणि विश्वासार्ह मेट्रो ट्रेन्सचे जाळे पसरले, तर लोकांकडची वाहने कमी होणे/ वापर कमी होणे हे प्रगतीचे चिन्ह मानले जाऊ शकतेच.

वाहनांच्या शिवाय, अनेक अशा कन्झ्युमेबल वस्तु आहेत, ज्यांच्या उत्पादनाला आणि वापराला आपण बर्‍याच वेळा प्रगती समजतो. त्याला कारण आपण सध्या स्वीकारलेला मापदंडच आहे. भूतानच्या राजांनी पुरस्कृत केलेला ग्रॉस हॅपिनेस इंडेक्स याविषयी राघो गुरुजींनी काही लिहीले तर ते विषयाला धरुनच राहील.

मध्यंतरी कुपोषित मुलांचा अहवाल आला त्याची दखल पंतप्रधानांनीही घेतली. पुण्यात ३०% लोक झोपडपट्टीत राहतात अशी एका संस्थेने जाहीर केलेल्या अहवालाबद्दलची बातमी वाचली होती. अशा अहवालांमध्ये पुर्वीच्या स्थितीत आणि सद्यस्थितीत तुलना नसते त्यामुळे प्रत्यक्षात प्रगती झाली असली तरी ते कळत नाही. या अहवालांच्या विश्वासार्हतेबद्दल किंवा ते किती गंभीरपणे घ्यायचे यावरही भाष्य करता आले तर उत्तम.

सहमत आहे. कुपोषित मुलांच्या अहवालाबाबत माझा स्वतःचा अनुभव हेच सांगतो. थोडे तथ्य, आणि बराचसा पूर्वग्रह असे या अहवालाचे स्वरुप आहे. वाईटातल्या वाईट गोष्टीला तयार रहायला हरकत नसावी या न्यायाने अशा अहवालाने फारसे काही बिघडत नाही हा भाग निराळा.

आळश्यांचा राजा Sat, 28/01/2012 - 12:37

In reply to by आळश्यांचा राजा

http://hungamaforchange.org/

इथे कुपोषणासंबंधातील अहवाल वाचायला मिळेल. असे अहवाल येणे हे देखील माझ्यामते आशावादीच आहे. समस्या ओळखणे, तिची मांडणी करणे हे समस्या सोडवण्याचाच भाग आहेत.

राजेश घासकडवी Sat, 28/01/2012 - 22:51

In reply to by आळश्यांचा राजा

वाहनांच्या शिवाय, अनेक अशा कन्झ्युमेबल वस्तु आहेत, ज्यांच्या उत्पादनाला आणि वापराला आपण बर्‍याच वेळा प्रगती समजतो.

हे अतिशय पटलं. वस्तू वाढल्या की आनंद वाढला, प्रगती झाली असं सरसकट विधान करणं बरोबर नाही. त्यामुळे वस्तूंपेक्षा मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलेलं आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, स्वातंत्र्य, न्याय, समाजातली गुन्हेगारी, विषमता वगैरे. अर्थात या सर्व भागल्या जात आहेत की नाही, हे मोजण्यासाठी काही वस्तू मोजाव्या लागतातच. उदाहरणार्थ आरोग्याचा विचार करताना दरडोई किती डॉक्टर्स, किती रुग्णालयं उपलब्ध आहेत वगैरे मोजावं लागतं. किंवा विषमता कमी झाली आहे असा युक्तिवाद देताना एके काळी ज्या चैनीच्या वस्तू किंवा सुविधा मूठभर लोकांनाच मिळत होत्या त्या आता सर्वांना (किंवा जवळपास सर्वांना) मिळतात हे दाखवून द्यावं लागतं. काही वेळा प्रत्यक्ष आनंद वाढण्यापेक्षा दुःख कमी झालं असाही युक्तिवाद करायला लागतो.

प्रगती मोजण्याचे निर्देशांक - त्यांचे फायदे, तोटे, मर्यादा वगैरेंबाबतही थोडी चर्चा होईलच.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 28/01/2012 - 10:36

लहानपणी अनेक अर्थतज्ञांची व्याख्यानं ऐकली. ते सगळे म्हणायचे भारताचा उज्ज्वल काळ २०२० च्या आसपास असेल. तेव्हा हे काही समजायचं नाही, पण जाणून घेण्याची उत्सुकता होती. ज्योतिषी सांगतो तसं बोलणार्‍या या लोकांकडे लक्ष का द्यायचं हे समजत नव्हतं. उत्पादक आणि अनुत्पादक प्रजेच्या संख्येचं गुणोत्तर, लोकसंख्येचं वर्गीकरण वगैरे प्रकार नंतर कळायला लागले. पण त्यांनी दाखवलेला आशावाद तेव्हा भाबडा वाटत असे.

हा लेख वाचून (अर्थातच एवढंच नाही) असा आशावाद फोल नाही हे दिसतं. शाळेतल्या वर्गात तेव्हा एकाद-दुसर्‍याकडे स्वयंचलित वाहन असेल, आता जवळजवळ प्रत्येकाकडे निदान एक गाडी असेल. ही प्रगतीच आहे. त्या जोडीला येणारा चलनफुगवटा वगैरे हे पण दिसतंच; पण "डोंबलाची प्रगती!" असल्या पराकोटीच्या निराशावादापेक्षा "काय चांगलं झालं आहे" याबद्दल राजेशचं विवेचन वाचायला जास्त आवडेल.

नितिन थत्ते Sat, 28/01/2012 - 13:47

रामदासांचा लेख हे या लेखाचे कारण म्हटले असले तरी रामदासांच्या लेखाचा सूर "आधी डालडा खावा लागत होता आता समृद्धी आली आहे" असा आहे.

परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे अशी रड नेहमी चालू असते. पण ती रड व्यक्त करणारे लोक हे जुन्या व्यवस्थेत प्रिव्हिलेज्ड क्लास असलेले आणि नव्या व्यवस्थेत ती प्रिव्हिलेजेस गमावलेले लोक असतात. ही रड आर्थिक रड कमी आणि सामाजिक रड जास्त असते. पण थोडेतरी कारण आर्थिक असतेच.

मराठी (किंवा भारतातीलच एकूण) साहित्यात मुख्यत्वे ब्राह्मण समाजाचा वरचष्मा आहे/होता. त्यामुळे त्या वर्गाची दु:खे हीच सगळ्या समाजाची दु:खे आहेत असा भास होणे स्वाभाविक आहे. या वर्गात काही लोक तरी कुळकायद्यात जमिनी गमावलेले असणार. त्यांच्यासाठी स्वातंत्र्यानंतरचा काळ खरोखरचा खडतर असणार. माझ्या परिचयातले एक खोत होते. त्यांनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेऊन खोती पहायला सुरुवात केली. मध्यम वयात कुळकायद्यात जमीन गेली. शिल्लक राहिलेल्या जमिनीवर निर्वाह चालणे शक्य नसल्याने त्यांना पुढे नोकरी करावी लागली. शिक्षण मॅट्रिकपर्यंतच असल्याने गावात शाळामास्तर म्हणून नोकरी केली. खोताचा शाळामास्तर होणे हे निश्चितच वेदनादायक असणार. अशा लोकांच्या मनात आत्यंतिक कडवटपणा असणे स्वाभाविक आहे. आणि जुना काळ सुखाचा आणि नवा काळ दु:खाचा वाटणारच. (मुळात खोतांनी या जमिनी कशा मिळवल्या होत्या हा इतिहास या वेळी आठवणे संभवत नाही).

यात भर म्हणून शिक्षणाचा प्रसार होऊ लागल्याने इतर वर्गांमधले लोक शिकून पुढे येऊ लागले. त्यामुळे ज्या व्यवसायांवर या वर्गाचे (बाय डिफॉल्ट-कारण इतर कोणी नव्हतेच) प्रभुत्व होते तेथे स्पर्धा आली. आरक्षणांनी हा प्रश्न अधिक बिकट केला.

परंपरेने समाजात असलेला मान लोकशाहीच्या रेट्यात नष्ट झाला. आणि राजकारणातीलही महत्त्व क्रमाने कमी होत गेले. त्याचेही दु:ख होते. विशेषतः दीडदोनशेच वर्षांपूर्वीपर्यंत संपूर्ण सत्ता हाती असलेल्यांसाठी आणि नंतरही शिक्षणामुळे महत्त्व टिकून राहिलेल्यांसाठी हा मोठाच धक्का होता.

स्वातंत्र्यानंतर वाट लागली या भावनेची कारणं ही असावीत.

अवांतर : जुना काळ चांगला आणि नंतर अधोगती झाली ही प्रत्येक काळातली रड असते. ५०-७० चे दशक हे हिंदी चित्रपटसंगीताचे सुवर्णयुग असे आपण समजतो पण शिरीष कणेकर मात्र अनिल बिस्वास आणि श्यामसुंदर वगैरेंच्या आठवणीत टिपे गाळताना दिसतील.

अतिअवांतर: काळ सारखा बदलत असतो हे लोक समजून घेत नाहीत हाही एक प्रॉब्लेम असतो. उदाहरणार्थ नॉस्टॅल्जिक लोक असे समजतात की गेली किमान पाच हजार वर्षे रोजच्या जेवणात पोळी/भाकरी, भाजी, आमटी/वरण, चटणी, कोशिंबिर, लोणचे हे पदार्थ असतात आणि आता सारं बदललं आहे. खरे तर हे सगळे किंवा यातले बरेचसे पदार्थ रोजच्या जेवणात असणे ही गेल्या ५०-६० वर्षांतीलच गोष्ट आहे. माझ्या आठवणीत लहानपणी आमच्या गावच्या घरी भाताशिवाय काहीही बनत नसे. पोळी ही सणालाच आणि भाकरी दिवसाच्या एकाच जेवणात असे. बाकी नाश्त्याला मऊभात, दुपारी आमटीभात/ताकभात (भाजी कधीकधी), मधल्यावेळी काही नाही आणि रात्रीच्या जेवणात पुन्हा आमटी भात असेच असे.

अतिअतिअवांतर: एकदा "जुना काळ चांगला" अशी नशा चढली की चुलीतला डोळ्यात जाणारा धूर सुद्धा गोग्गोड असतो. आणि गॅसवर बनवलेल्या जेवणाला "ती चव" नसते.

राजेश घासकडवी Sun, 29/01/2012 - 21:44

In reply to by नितिन थत्ते

रामदासांचा लेख केवळ ट्रिगर होता. घृतं पीबेत वरून भारतात आत्ता मिळतं तितकं तूप पूर्वी मिळायचं का? असा अवांतर प्रश्न पडला इतकंच. त्यामुळे त्यांच्या लेखाचं खंडन वगैरे करण्याचा प्रश्नच येत नाही.

ती रड व्यक्त करणारे लोक हे जुन्या व्यवस्थेत प्रिव्हिलेज्ड क्लास असलेले आणि नव्या व्यवस्थेत ती प्रिव्हिलेजेस गमावलेले लोक असतात. ही रड आर्थिक रड कमी आणि सामाजिक रड जास्त असते.

पटलं. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्रिव्हिलेजेस गमावणे हे एक कारण आहे खरं. विशेषतः महाराष्ट्रात ब्राह्मणी समाजात ही ओरड असण्यासाठी ते कारण लागू पडतंच. गंमत म्हणजे विषमता कमी झाली याच्या वैषम्यतातून ज्या तक्रारी होतात त्यातूनच कधीकधी 'पैसा वाढला तरी विषमता वाढली आहे' असे युक्तिवाद येतात.

पण या कडवट नॉस्टॅल्जियाची कारणं अधिक व्यापक असावीत, कारण जगभर वेगवेगळ्या काळांत, वेगवेगळ्या संस्कृतींमधून ते दिसून आलेलं आहे.

आडकित्ता Sun, 29/01/2012 - 00:36

या तुकड्यांमध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहून राजहंसाने स्वतःला बदक म्हणवून घेणं कमी केलं तरी तेवढंच यश मला रगड.

रगड सहमत.
सविस्तर प्रतिसादासाठी जागा रा़खून ठेवली आहे

मन Sun, 29/01/2012 - 11:11

लेख व प्रतिसाद सर्वच वाचनीय आहेत. ननिंच्या "सरासरी अंधश्रद्धा" मधील विदूषकाची गोष्ट ह्या निमित्तने आठवली.
दिलेल्या सात ग्रेडपैकी १ ते ७ असा कुठेही माझा स्वतःचा मूड स्विंग होत असतो.