Skip to main content

जर्मनी - स्वित्झर्लँड : वास्तव्य

१.तयारी | २.अन्न | ३.लोक | ४.वास्तव्य | ५.प्रवास व घटना | ६.छायाचित्रे
=====

आमच्या या प्रवासादरम्यान हॉटेलमध्येही (फ्राफ्रु) राहिलो, एका परिचित भारतीय कुटुंबासोबतही (स्टुटगार्टचे एक उपनगर) राहिलो, होस्टेल्समध्येही राहिलो (हेडलबर्ग, इंटरलाकेन, बासेल), गेस्टहाऊसमध्ये राहिलो (ग्रॅफनॉर्ट) आणि एका जर्मन कुटुंबासोबतही राहिलो (म्युनिक). प्रत्येक ठिकाणचे अनुभव वेगळे असले तरी अनुभवसंपन्न करणारे होते.

फ्रँकफुर्टच्या हॉटेलात जाण्यापेक्षा पहिल्यांदा ते शोधून तिथे पोचण्याचा क्षणच अधिक आनंददायी होता. जर्मनीत शिरल्यावर इंग्रजी इथे पुरेसे नाही या ऐकीव माहितीचा प्रत्यय येऊ लागला होताच. त्यात येथील बहुतांश होस्टेल्स आणि स्वस्त होस्टेल्स रेड लाइट एरियात आहेत (हे खरंय), शिवाय तिथे रात्री मगिंगचा धोका संभवतो (हे खरे-खोटे माहिती नाही) असे कळल्याने तसेच नव्या देशा पहिल्याच दिवशी अ‍ॅडव्हेन्चर नको या विचाराने एका उपनगरात, राहत्या वस्तीतील हॉटेल निवडले होते. मात्र तिथे जायला दोन ट्रेन्स बदलून जायचे होतेच. रेल्वेस्टेशनवर ट्रेनची माहिती सुस्पष्ट असल्याने इच्छित स्टेशनपर्यंत पोचायला फारसा त्रास झाला नाही. नकाश्याबरहुकूम चालत ५-७ मिनिटांवर हॉटेल आहे असे लिहिले असले तरी प्रत्यक्षात ते अधिक लांब निघाले आणि पाठीवरील वजनामुळे तर ते अधिकच दूर वाटत होते. शेवटी तिथे पोचलो; तर हॉटेलात लिफ्ट नसल्याचा साक्षात्कार झाला आणि आमच्या बॅगाही आम्हालाच उचलायला लागणार होत्या. बरं झालं पाठीवरच्या सॅक्स घेतल्या असं म्हणून स्वतःचीच पाठ थोपटत गड चढलो. जरा खाल्ल्यावर व एक 'इन्स्टंट चहा' प्यायल्यावर मात्र प्रश्न पडू लागले. प्यायचे पाणी कुठले का आम्रिकेसारखे नळाचे पाणी पिणेबल असते? रूमवर ठेवलेल्या मिनरल बाटल्यांतील पाणी प्यायल्यास वेगळा चार्ज बसेल का? तीन बेड्सची रूम का दिली आहे? वगैरे प्रश्नांचा भडिमार इंग्रजीतून फोनवर केल्यावर मग समजले की ऐकणारा रिसेप्शनिस्ट बदलला आहे आणि इंग्रजी 'ही' ची जागा इंग्रजी न येणार्‍या मराठी 'ही'ने घेतली आहे. :) खरंतर हॉटेलवर खास वेगळा म्हणावा असा कोणताही अनुभव आला नाही. इलेक्ट्रिकची उलट दिशेने चालू-बंद होणारी बटणे, उलट दिशेने जाणार्‍या गाड्या वगैरेचे नावीन्य नसल्याने त्याचे काही वाटले नाही.

हेडलबर्गमध्ये आम्ही पहिल्यांदाच हॉस्टेलवर राहत होतो. आमच्या नशिबाने म्हणा किंवा कसेही आमचा पहिलाच अनुभव अतिशय आनंददायी होता. दोन मैत्रिणींनी चालवलेले हे हॉस्टेल तसे (तुलनेने) लहानसे होते. पण त्याहून छान होती त्यांनी हॉस्टेलला दिलेला पर्सनल टच, लिहिलेल्या सूचना. साधी गाद्यांची खोळ कशी बदलायची ही सूचनाही सचित्र होती, त्या फोटोतील मुलीही छान होत्या की त्या इन्स्ट्रक्शन्स पुन्हा पुन्हा वाचाव्यात ;) मला सर्वाधिक आवडले ते तेथील किचन आणि त्याहून अधिक त्यांची रीडिंग अँड असेंब्ली रूम. त्या रूममध्ये चिक्कार पुस्तके तर होतीच, त्याच बरोबर गिटारपासून ल्यूडोपर्यंत टाईमपास करायला अनेक गोष्टी ठेवल्या होत्या. शिवाय एक मोठा जगाचा नकाशा, एक युरोपचा आणि एक जर्मनीचा नकाशा होता. यात तुम्ही ज्या शहरातून/गावातून आला होतात तिथे एक टाचणी टोचायची होती. या नकाश्यावर सर्वाधिक टाचण्या युरोपातून होत्या. अन्य देशांपैकी अमेरिकेचे दोन्ही कोस्ट, ऑस्ट्रेलिया, जपान, चीन येथून आलेले पर्यटकांची भरपूर संख्या होती. पण सर्वात लक्षणीय होते ते साऊथ कोरिया तेथून भलत्याच जास्त संख्येने पर्यटक आलेले होते. त्या चिमुकल्या देशात टाचण्या टोचायला जागा नसल्याने मंडळी शेजारी समुद्रात टाचण्या टोचत होते, इतके की अख्खा साऊथ चायना सी टाचण्यांनी भरला होता. अपेक्षेप्रमाणे भारतातून हॉस्टेलिंग करणारे अत्यल्प होते. मुंबईतून ४, पुण्याहून १ (ज्यात आमच्या दोन टाचण्यांची भर पडली), गुरगाव १, चेन्नई, बेंगळुरू २-२ व दिल्लीहून काही (४-५) इतक्याच टाचण्या होत्या.

मी आणि गौरी आमच्या कोरियन रूममेट्सबरोबर जेवणं आटपून रीडिंग रूममध्ये बसलो होतो. एक प्रौढ जपानी जोडपंही काही वेळात तेथे आलं. त्या बाईला काहीतरी बोलायचं होतं पण इंग्रजी येत नसावं त्यामुळे ती नुसतीच हसून बसली. गौरीला जपानी भाषा येत असल्याने तिने जपानीत अभिवादन केल्यावर त्या काकू जरा खुलल्या. जपानी बोलणार्‍या भारतीय मुलींचं त्यांना कौतुक वाटत असावं. इथवर ठीक होतं. मला जपानी येत नाही म्हटल्यावर एक दयार्द्र कटाक्ष टाकून गौरीशी गप्पा सुरू केल्या. काही वेळ गप्पा झाल्यावर गौरीने मी काही महिने जपानमध्ये होते हे सांगितलं, कुठे? म्हटल्यावर गौरीने ती राहत होती त्या तालुक्याचे नाव सांगितले. तर त्या जोडप्यापैकी पुरूष खूश होऊन उभा राहिला त्याचे हेड ऑफिस त्याच तालुक्यात होते. मग जरा गप्पा झाल्यावर गौरी राहायला कुठे होती? असा प्रश्न आला. त्यावर गौरीने गावाचं नाव सांगितलं. आपल्या लहानशा गावासारखं ते छोटं गाव होतं. ते ऐकून त्या काकू ताडकन उठल्या आणि मोठमोठ्याने आनंदी चित्कारकर्त्या झाल्या. ते चक्क त्यांचं माहेर होत! त्या बाई ज्या कौतुकाने उठल्या नी उभ्या राहून "सो देस ने! " का असंच कायसंसं ओरडल्या की मला तर त्या आता गौरीला उचलून घेऊन जातात की काय वाटू लागलं ;)आपल्या माहेरच्या गावी ही जपानी बोलणारी भारतीय मुलगी जाऊन आली आहे याचा त्यांना तुफान आनंद झाला होता. मग त्याचे शब्द इतक्या वेगात कोसळू लागले की गौरी पार वाहून गेली ;) आता ही बाई सारं जग विसरून आपल्या गावाबद्दल इतकं भरभरून बोलत होती की आम्ही उर्वरित तिघेही त्या आनंदी चेहर्‍याकडे नुसते पाहत राहिलो होतो. आता गौरी तिच्या 'माहेरची' झाली होती. त्यानंतर शहरांत बागडताना नेहमी ते दोघे जेव्हा जेव्हा दिसले की तेव्हा तेव्हा ती बाई आनंदाने अगदी हाका मारून आम्हाला अभिवादन करत होती. (हेडलबर्ग इतकं छोटं आहे की आपल्या होस्टेलवरचे सगळे एकमेकांना कुठेना कुठे दिवसभर भेटतच असतो. तुम्ही हे पाहिलंत का? नाही? मग इथे जा हे मस्तंय वगैरे माहितीची, पाण्याची प्रसंगी अन्नाची देवाणघेवाणही होत असते) आपण काहीही न करता आपण दुसर्‍यांना कधीकधी इतका आनंद देतो की आपलं मनही आनंदून जाता याचा प्रत्यय आला.

याशिवाय आम्ही इंटरलाकेन आणि बासेल येथेही हॉस्टेल्सवर राहिलो होतो. इंटरलाकेनला 'यूथ हॉस्टेल' वर राहिलो होतो. अतिशय चकचकीत हॉस्टेल. टेक्नॉलॉजिकली उच्च, भरपूर मोठे, अगदी मोक्याच्या जागी हे हॉस्टेल होते. आम्हाला मिळालेल्या रूम्सही इतक्या छान होत्या की समोरच बर्फाच्छादित शिखरे दिसत. लॉकर्स, बाथरूम्स आदी व्यवस्थाही उत्तम होती. तरी सतत हेडलबर्गच्या होस्टेलची तुलना होत होती आणि हे हॉस्टेल आम्हाला नावडत होतं. त्याचं एक मुख्य कारण म्हणजे इथला 'कोरडा' प्रोफेशनलिझम. हे हॉस्टेल इतकं मोठं आहे की त्यांना प्रोफेशनल राहणं भागही आहे. पण मग होतं काय की ते 'हॉस्टेल' न राहता बंक बेड्सची सोय करणारं चकचकीत हॉटेल होतं. इथे किचन नव्हतं, रीडिंग एरिया इतका मोठा होता की मंडळी आपापले ग्रुप करून बसत. हेडलबर्गसारखे विविध प्रांतातील लोकांशी गप्पा मारायचे प्रसंग अगदीच कमी आले - एखादा तो ही नावालाच. त्यात एकूणच इंटरलाकेन आम्हाला अख्ख्या ट्रीपमध्ये सर्वात कमी आवडलं कारण येथील टुरिस्टांचा बुजबुजाट - त्यांच्यापासून आम्ही शक्य तितके सतत पळत राहिलो!

बासेलचं वायएम्सीएचं हॉस्टेल पुन्हा प्रोफेशनल होतं पण इंटरलाकेन इतकं शुष्क नव्हतं. एकतर इथे किचन होतं, त्यात बासेल कला आणि आर्थिक आघाडीचंही मोठं केंद्र असल्याने टुरिस्टांपेक्षा वेगळ्या 'फ्लेवरची' जन्ता इथे होती. फ्रांस व जर्मनीच्या किनार्‍यावर असल्याने की काय माहीत पण मंडळी अधिक अघळ पघळ होती. इथे एक मोठ्ठी मजा झाली. आम्ही इथे ८ बेड्सची रूम घेतली होती. आम्ही लवकर चेकीन केल्याने रूमवर कोणी नव्हते. संध्याकाळी परतलो नेमके तेव्हाच उरलेल्या ६ बेड्सवर एक ग्रुपच चेक इन करत होता. आमची 'मिक्स डॉर्म' होती (म्हणजे स्त्री-पुरूष एकाच रूममध्ये). दुसर्‍या दिवशीच्या कोणत्या तरी इन्व्हिरॉनमेंटसाठीच्या कॉन्फरन्ससाठी फ्रान्सहून आलेला जो ६ जणांचा कळप होता त्यात फक्त एकच पोरगा होता नी आधी एका मागोमाग एक ५ मुली शिरल्यावर - त्यातही २-३ अतिशयच सुंदर - माझे तर "आज गोकुळात रंग खेळतो हरी"च झाले होते! मागून गौरी माझ्याचकडे बघतेय हे समजून अजूनच मजा येत होती ;). खरी 'मजा' तर दुसर्‍या दिवशी आली. मी अंघोळ वगैरे आटपून पुन्हा खोलीत आलो नी बघतो तर गौरी तिथे नव्हती नी तो मुलगा नी सोबत दोन मुलीही तयार होऊन बाहेर निघाल्या होत्या. मी गौरीची वाट बघत तिथेच मॅप बघत बसलो होतो. तर इथे या उरलेल्या तीन बयांनी बिंधास्त कपडे बदलायला सुरूवात केली. त्या कन्यकांना माझ्या तिथे असण्याचे काहीच वाटत नव्हते. मला काही समजायच्या आत त्या तीन मुली निव्वळ अंतर्वस्त्रात माझ्यासमोर बागडत होत्या. आता तर दारापर्यंत जाणेही शक्य नव्हते कारण त्या रस्त्यातच उभ्या होत्या. शेवटी काय करणार! "आलीया भोगासी... " म्हणत आलेले दृश्य (डोळ्याने) भोगत होतो! ;) नंतर कळले की आधी गौरी तिथे असतानाही आधीच्या मुला-मुलींनी कपडे असेच बदलले होते (तेव्हा या बया अंघोळीला गेल्या होत्या). त्यामुळेच त्यांनी दार उघडताच (बहुदा त्यांच्यापेक्षा अधिक लाजून) गौरी(च) बाहेर पसार झाली होती. नंतर एकमेकांची कहाणी ऐक(व)ताना आम्ही बासेलच्या रस्त्यात आम्ही जे काही हसलोय त्याला तोड नाही!

स्विस खेड्यात राहायची माझी इच्छा खूप जुनी आहे. विशेषतः साउंड ऑफ म्युझिकमध्ये बॅकग्राऊंडला दिसणारी आल्प्समध्ये विसावलेली लहान खेडी मला आकर्षित करतात. त्यामुळे या ट्रीपला एक दिवस राहण्यासाठी ग्रॅफनॉर्टेचे गेस्ट हाउस निवडले होते. एंगलबर्गपासून ७-८ किमीच्या अंतरावर हे खेडे आहे. स्वित्झर्लँड मधील आमचा सर्वात सुखद अनुभव! या खेड्याचे - एकूणच परिसराचे - सौंदर्य शब्दात वर्णन करणे वृथा आहे. चारही बाजूने आल्प्सच्या हिमाच्छादित शिखरांनी वेढलेले हे खेडे आहे. दूर डोंगर उतारावर मोजकी - हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच - घरे, हिरवीगार कुरणे, त्यावर चरणारी गुरे-मेंढ्या, एक छोटेसे चर्च, काही गोठे नी हे एक गेस्टहाउस एवढाच त्या गावाचा जामानिमा. हे गेस्टहाउस एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने उघडलेले आहे. इथे खिडकीबाहेर बघत अख्खे आयुष्य घालवावेसे वाटावे इतके 'पिक्चर पर्फेक्ट' लोकेशन या गेस्ट हाउसला लाभले आहे.

आतापर्यंत आम्ही घेतलेला अनुभव हा प्रोफेशनल होता. आम्हाला स्थानिकही शहरांत दिसत होते, प्रसंगी त्यांच्याशी जुजबी संवादही होत असे, मात्र जर्मन मंडळी घरी राहतात कशी, काय खातात, त्यांचे अनुभव, मते याची त्रुटी होतीच. याचसाठी आम्ही आमचे शेवटचे ३ रात्रींचे म्युनिकचे वास्तव्य एअरबीएन्बी वरून एका जर्मन कुटुंबासोबत व्यतीत करायचे योजले होते. (इथे राहिलो होतो) बार्बेल नावाची मध्यमवयीन (साधारण ४०-४५ची असेल) स्त्री, तिचा आफ्रिकन-जर्मन नवरा (सोलो), त्यांचा मुलगा (योनास) असे कुटुंब आमचे होस्ट होते. या तिघांनाही इंग्रजी भाषेचा गंध नव्हता, नी आम्हाला जर्मन भाषेचा :) आम्ही मेट्रो व बस करून त्या उपनगरात पोचलो आणि तिचा फ्लॅट हुडकून काढला. आम्ही घरी गेल्यावर अतिशय सुहास्य चेहर्‍याने तिने आमचे स्वागत केले. अख्खे घर फिरवले रूम दाखवली. आम्ही तिला सोबत घरी शिवलेली एक पर्स भेट म्हणून दिली तर तिला शब्द पटकन आठवेनात, शेवटी तिने मिठी मारून भावना पोचवल्या. नंतर बहुतांश वेळ ती जर्मनीतून बोलत होती. आम्हाला जर्मन येत नाही हे तिला माहीत होते, मात्र तिला बोलायचेही होते. तिच्या घरीही एक टाचण्या टोचायचा मॅप होता, ज्यावर तिच्याकडे आलेल्यांचे शहर टाचणीने टोचलेले होते. आम्ही तिचे भारतातून आलेले पहिलेच गेस्ट होतो. बार्बेलवर एक फर्माससे व्यक्तिचित्र लिहिता येईल असे ते व्यक्तिमत्त्व होते. सतत प्रसन्न, मदतीस तत्पर, भावपूर्ण डोळे नी एकूणच एक्सप्रेसिव्ह! घर अतिशय 'सुंदर', स्वच्छ.

जरा स्थिरस्थावर आम्ही जवळच डेली शॉप कुठे आहे असे तिला विचारले तर अर्थातच भाषेच्या अडचणीने तिला सांगता येईना. मी जरा वेळात तिथे जाते आहे तुम्हीही चला असे तिने आम्हाला कसेबसे सांगितले. मग काही वेळातच ती, आम्ही दोघे नी तिचा मुलगा योनास फिरायला चालत बाहेर पडलो. ते दुकान एखाद-दीड किमी लांब होते. बार्बेलने मग तिला लहानपणी शाळेत इंग्रजी होते त्यामुळे काही शब्द माहिती आहेत पण आता बोलायला विसरले आहे असे सांगितले. योनासला मात्र पाचवीपासून इंग्रजी असणार होते. मग एकमेकांच्या भाषेचा अंदाज घेत घेत अधिक गप्पा सुरू झाल्या. भाषेचा अडसर असल्याने फार काही बोलता येत नव्हते तरी अव्याहत पणे आम्ही तिघेही प्रयत्न करत होतो.
"तुम्ही मुळच्या जर्मनीतल्याच का? "
"हो, बर्लिनची. तुम्ही बर्लिन पाहिलं का? "
"नाही पाहिलं"
"एकदा चांगला आठवडा काढून बर्लिनला जा.. खूप आहे तिथे बघायला. " नी मग ती बर्लिनबद्दलच बोलत होती. तिची आजी महायुद्धाच्यावेळी बर्लिन सोडून गेली होती, युद्ध संपल्यावर परत आली नी तेव्हाचे बर्लिन बघून आजारीच पडली. पुढे बार्बेल झाल्यावर आईने बर्लिन सोडलं ते सोडलं. त्यावेळी तिचे डोळे शून्यात लागले होते.
मग आठवणी झटकल्यासारखं करून तिचा चेहरा पुन्हा सुहास्य झाला. आम्हीही विषय काढला नाही.
यथावकाश तिला आधीही एक नवरा होता व त्याच्यापासून झालेली मुलगी सध्या स्वित्झर्लँडमध्ये कॉलेजशिक्षण घेते आहे हे ही समजले.
"तिला मी म्हटलंय की शिकून झालं की इथे ये, पण तिला जर्मनीपेक्षा स्वित्झर्लेंड आवडतं म्हणतेय. त्यात तिचा बॉयफ्रेंड तिकडचा आहे मग कसली येते माझ्याजवळ! " वगैरे टिपीकल आईबाज वाक्ये ऐकून गंमतही वाटली आणि आपल्याशी कुठेतरी एक धागा जुळल्यासारखं उगाचच वाटलं! एकूणच तिच्याबरोबर बाजारहाट करून येणं हा एक पूर्णपणे वेगळा नी अनुभवसंपन्न करणारा अनुभव होता. त्यांच्या पद्धती, खरेदी करताना कंटेन्ट्स कसून वाचणं, दोन ब्रँडमध्ये तुलना करून चार पैसे कसे वाचतील याचा हिशोब करत खरेदी करणं, आवश्यक तेवढंच पण शोधून हवं तेच खरेदी करणं हे माझ्या आम्रिकन अनुभवाच्या पूर्ण विपरीत होतं. माझ्या लिमिटेड सँपलवरून एकूणच जर्मन जन्ता कुटुंबवत्सल वगैरे वाटलीच, शिवाय शिस्तशीर नी बचत करत जगणारी वाटली.

दुसर्‍या दिवशी बार्बेलच्या मुलीने अचानक भेट दिली. तिला उत्तम इंग्रजी येत होतं. त्या दिवशी मदर्स डे असल्याने ती आईला भेटायला आली होती. ती सोलोशी सहज बोलत होती. त्याला ती सरळ 'सोलो' म्हणूनच हाकारत असली तरी आपल्या आईचा दुसरा नवरा असल्याने त्याच्याशी तुटक वागण्याचा मेलोड्रामा दिसला नाही :) आम्ही त्या दिवशी बार्बेलकडे ब्रेकफास्ट सांगितला होता. गौरी मीट खात नाही हे कळल्याने ती फारच टेन्शनमध्ये होती. तिच्या मुलीने नंतर आम्हाला सांगितलं की ती मीट न वापरता काही पोटभरीचं बनवतात हे इमॅजिनच करू शकत नव्हती. तिने शेवटी खास आमच्यासाठी केक बनवला होता. वासावरून बहुदा ब्रँडी वा स्कॉच ची "फोडणी" दिलेला असावा. अतिरुचकर! शिवाय वेगवेगळे ब्रेड्स, ब्रेझल्स वगैरे होतेच. यांचे कॉफी मशीनही एकदम वेगळे होते. काही मिनिटात झकास फेस असलेली कपुचिनो समोर हजर होती. तिच्या मुलीला - स्टेफीला - इंग्रजी येत असल्याने गप्पांना आता उत आला होता. स्टेफी आर्किटेक्चरची विद्यार्थिनी आहे. ती भारतातही येऊन गेली आहे. त्यामुळे बोलायला खूप विषय होते. स्वित्झर्लँड फारच सुंदर आहे हे तिचेही मत होते. पण त्याच बरोबर ती म्हणालीच "स्विसला एक बरंय, तिथे बॉम्ब पडले नाहीत, त्यामुळे सगळी जुनी घरं पिढ्यान्-पिढ्या जपता आली, 'आमची' घरंच काय माणसंही जपू शकलो नाही" जर्मनीच्या तुलनेत स्विसमध्ये सेटल व्हायचे ठरवलेल्या स्टेफीला जर्मनी मात्र "आमचे" म्हणताना बघून गंमत वाटली. एरवी नॉनस्टॉप बडबड करणारी बार्बेल मात्र स्टेफीकडे कौतुकाने बघत बसली होती. तू गप्प का विचारल्यावर "मी तुमच्या गप्पा 'बघतेय' नी मला खूप आनंद मिळतोय" असे ती म्हणाली.

आमच्या जर्मनीतल्या शेवटच्या संध्याकाळी आम्ही बाहेरून जेवून आलो तर घरी स्टेफीचा बॉयफ्रेंडही आला होता. ते चौघेही जण उत्तम हास्य विनोदात रंगलेले होते. एका सुंदर संध्याकाळी दिसलेले ते जर्मन कुटुंबाचे रूप अत्यंत मोहक होते. आम्ही येताच आम्हालाही त्यांनी गप्पांत ओढले. इतक्यात त्यांना आठवले नी त्यांनी सईसाठी (आमच्या मुलीसाठी) आणलेल्या गिफ्ट्सचा ढीग दिला. काही फॉक्स होते, बूट होते, बरीच चॉकलेटे होती, साबणाच्या फेसांचे फुगे करून उडवायचे खेळणे होते. 'मदर्स डे' ला ती तिथे एकटी आहे हे त्यांना कल्पूनच भरून आले होते (म्हणे). मग भारतात मदर्स डे असतो का? पासून सुरू झालेल्या गप्पा पुढे तास-दिडतास चालल्या होत्या. बाहेरून संधिप्रकाश डोकावत होता, आतमध्ये सोफ्यावर आम्ही दोघे बसलो होतो, समोर खुर्चीवर सोलो नी स्टेफीचा बॉयफ्रेंड होता, बार्बेल खालीच बसली होती नी स्टेफी तिच्या मांडीवर डोके ठेवून पहुडली होती. बार्बेलही तिच्या केसांशी चाळा करत होती. आम्ही सगळेच सतत काहितरी गप्पा मारत हसत-खिदळत होतो. खरंतर एका बाई नी तिचा दुसरा नवरा, पहिल्या नवर्‍यापासून झालेली मुलगी नी तिचा स्विस बॉयफ्रेंड नी आम्ही दोघे भारतीय नवरा-बायको, एकुण ४-५ तासही समोरासमोर भेटलो नसु पण तेवढ्यात केवढे नवे ऋणानुबंध जुळले होते.

गप्पांचे ट्रॅक गाडीच्या रुळांसारखे वेगाने बदलत होते. जर्मनीतील शेवटची संध्याकाळ याहून पर्फेक्ट असणे ठरवूनही शक्य झाले नसते!

(क्रमशः)
---
१.तयारी | २.अन्न | ३.लोक | ४.वास्तव्य | ५.प्रवास व घटना | ६.छायाचित्रे

मेघना भुस्कुटे Tue, 17/06/2014 - 14:15

आत्तापर्यंतचा सर्वांत हृद्य भाग.

शेवटचा प्यारा वाचताना संध्याकाळ डोळ्यांसमोर उभी राहिली. आधीचे होस्टेलातली रम्य अनुभव वाचतानाही चित्र (आणि लेखकाचा तथाकथित कावराबावरा - 'सोशीक' चेहरा आणि मिश्कील डोळे) डोळ्यांसमोर आलंच म्हणा!

फार सुंदर चालू आहे लेखमाला. केवळ असल्या लेखमालांसाठी म्हणून तुम्हांला गलेलठ्ठ बोनस मिळत राहावेत हीच शुभेच्छा! ;-)

नंदन Tue, 17/06/2014 - 16:39

हा भाग अतिशय आवडला. आपल्या माहेरगावी राहून आलेल्या परदेशी युवतीबद्दल वाटणारा जिव्हाळा आणि कधीही न पाहिलेल्या मुलीचा 'मदर्स डे' हुकल्याबद्दल वाटणारी हळहळ - दोन्ही किस्से 'मम'ता ह्या शब्दाच्या आकसून मर्यादित झालेल्या अर्थाबद्दल पुनर्विचार करण्यास भाग पाडणारे.

चिंतातुर जंतू Tue, 17/06/2014 - 17:09

अनुभव आणि सांगण्याची शैली दोन्ही आवडली. मला स्वतःला मोठी हॉटेलं कधीच आवडली नाहीत त्यामुळे आतापर्यंत जेव्हा जेव्हा स्वतःच्या मर्जीनं फिरलो (युरोप, इंग्लंड आणि अमेरिका) तेव्हा घरगुती 'बेड अ‍ॅंड ब्रेकफास्ट', कुणाच्या तरी घरी किंवा हॉस्टेलमध्येच राहिलो. एक मासलेवाईक अनुभव : इटलीत फिरताना बोलोन्यामध्ये एका कुटुंबासोबत राहिलो होतो. मला आवडणाऱ्या दोन इटालियन अभिनेत्यांची पोस्टर्स त्यांच्या दिवाणखान्याच्या भिंतीवर लावली होती. आत शिरल्या शिरल्या ती मला दिसली. स्वागताची कॉफी पिता पिता 'मार्चेलो मास्त्रोइयानी आणि मोनिका व्हित्ती मला भयंकर आवडतात' असं सांगितल्यावर घरमालकिणीच्या दृष्टीनं मी व्हीआयपी झालो. मग मला राहायला मोठी खोली मिळाली; नाश्त्याची वेळ टळून गेली असतानाही नाश्ता मिळाला; 'नियमानुसार पासपोर्ट दाखवावा लागेल' अशी आल्या आल्या केलेली सूचना सोयीस्कररीत्या विसरली गेली; शिवाय खाण्यापिण्याची चंगळ, (फ्रेंच येणारा घरमालक आणि इंग्रजी येणारा मुलगा ह्यांच्या मध्यस्थीनं) प्रचंड गप्पा आणि इतर बरंच काय काय. घरमालक आधी थोडा जेवढ्यास तेवढं बोलत होता. त्यानं (शहानिशा करायला म्हणून की काय माहीत नाही) 'ह्यांचे कोणते सिनेमे पाहिलेस' असं मला विचारलं. मी लांबलचक उत्तर दिलं. मग तो हळूच डोळे मिचकावत म्हणाला 'हे तिला सांगू नकोस. ते उच्चभ्रू सिनेमे आहेत. तिला तसलं काही आवडत नाही'. पण त्यानंतर तो खुलला. माझी एकूण चंगळ झाली.

सखी_अ Tue, 17/06/2014 - 19:47

मस्त झालाय हा भाग (वाटच पहात होते)....शेवटचा परिच्छेद आणि जर्मन कुटुंबांचा फोटो म्हणजे केकवरचे आईसिंगच.
एअरबीएन्बी ही जी कंपनी आहे ती काही बॅगराऊंड चेक करते का, तेही आंतरराष्ट्रीय पातळीवर? म्हणजे इतके अनोळखी लोक, तेही भाषा वगैरे येत असेल/नसेल ते होस्ट्च्या घरी येऊन राहणार मग काही सिक्युरिटी असते का?

ऋषिकेश Tue, 17/06/2014 - 19:59

In reply to by सखी_अ

काही प्रमाणात चेक/व्हेरीफाय करते परंतु तसे व्हेरीफिकेशन अनिवार्य नाही. उदा, गेस्टचा/होस्टचा फोन नंबर, होस्टने फोटोत दर्शवलेली जागा (तिथे त्या फोटोवर व्हेरीफाईड बाय एअर बीएन्बी असा मार्क असतो) इत्यादी गोष्टी व्हेरीफाय केलेल्या असतात. शिवाय पेमेंट आधीच घेतलेले असते (जे होस्टला चेकइनच्या दिवशी मिळते.) शिवाय काही सिक्युरीटी डिपॉझिट कबूल करून घेतलेले असते (गेस्टने काही तोडफोड वा अन्य गडबड केल्यास त्याच्या कार्डावरून एअरबीन्बीती रक्कम मिळवून देऊ शकते)

याव्यतिरिक्त मात्र फारशी सिक्युरीटी नसते व एअरबीएन्बीवाले त्यास जबाबदारही नसतात. मात्र होस्ट निवडताना आधीच्या गेस्टचे तसेच गेस्टला आपल्याकडे बोलावताना आधीच्या होस्टचे रीव्ह्यु मार्गदर्शक ठरू शकतात. शिवाय आवश्यक वाटल्यास गेस्ट/होस्टशी आधीच फोनवर बोलता येते (फोन एअरबीएन्बीवाले लाऊन देतात). अर्थात तरीही थोडी रिस्क ही राहतेच. त्याला फारसा इलाज नाही, आपण सतर्क राहून कमीत कमी रिस्क घेत आपला गेस्ट/होस्ट निवडायचा.

मिहिर Tue, 17/06/2014 - 20:01

फार आवडला हा भाग. मस्त सुरू आहे लेखमाला. :)

अंतराआनंद Tue, 17/06/2014 - 22:25

सही. आम्हीही फिरतोय तुमच्याबरोबर असं वाटतय. जर्मनीतली संध्याकाळ साक्षात डोळ्यासमोर उभी राहिली. चवीचवीने,शांतपणे वाचण्यासाठी बुकमार्क करून ठेवलयं.

शशिकांत ओक Thu, 19/06/2014 - 00:12

आपल्या माहेरच्या गावी ही जपानी बोलणारी भारतीय मुलगी जाऊन आली आहे याचा त्यांना तुफान आनंद झाला होता. मग त्याचे शब्द इतक्या वेगात कोसळू लागले की गौरी पार वाहून गेली (डोळा मारत) आता ही बाई सारं जग विसरून आपल्या गावाबद्दल इतकं भरभरून बोलत होती की आम्ही उर्वरित तिघेही त्या आनंदी चेहर्‍याकडे नुसते पाहत राहिलो होतो. आता गौरी तिच्या 'माहेरची' झाली होती. त्यानंतर शहरांत बागडताना नेहमी ते दोघे जेव्हा जेव्हा दिसले की तेव्हा तेव्हा ती बाई आनंदाने अगदी हाका मारून आम्हाला अभिवादन करत होती

गाववाले भेटले की 'नाही आनंदाला पारावार' अस होणारच... ओघवत्या शैलीत वाचकाला बरोबर नेण्याची हातोटी सुंदर...