बंदा आणि खुर्दा - 1 : सबनीस!

(काही माणसं अशीच भेटतात. क्षणीक म्हणा किंवा दूरगामी म्हणा, पण प्रभाव टाकून जातात. त्या माणसांचं जागोजागच्या सामाजिक व्यवहारांमध्ये एखादं छोटंसं योगदान असतं. पण त्यासंदर्भातील बातम्यांपलीकडं त्यांचं व्यक्तिमत्त्व समोर येतंच असं नाही. किंबहुना बातम्यांतील नोंदींपलीकडं ते येत नसतंच. अशीच ही काही माणसं. वेगवेगळ्या संदर्भात प्रत्यक्ष भेटलेली. आजही आपल्या सभोवताली कुठं ना कुठं असणारी. त्यांचं योगदान बंद्या रुपयासारखं आणि तेवढंच असेल, एरवी ही माणसं खुर्द्यातच गणली जातील. पण, ती आहेत, इतकंच या लेखमालेसाठी पुरेसं आहे.)

---

"तुझी आज मास्तरशी भेट करून देतो." शरद म्हणाला. वर्ष 1990.

शरद म्हणजे शरद पाटील. तो स्वतःच मास्तर. आता हा दुसरा कोण मास्तर, हा प्रश्न डोक्यात आलाच. पण त्याचा लगेचच खुलासा झाला. "प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनीस."

हे नाव आधी ऐकलं होतं. उत्तम कांबळे यांच्याशी बोलताना आलेलं नाव. सबनिसांनी कॉम्रेड शरद् पाटील यांच्या एका समीक्षापद्धतीवर टीका करणारं लिहिलं होतं. तेव्हा उत्तम कांबळे म्हणाले होते, "असेल सबनिसांचं काही म्हणणं. पण कॉम्रेड काही अशा पद्धतीनं कंडेम करता येत नाही."

इथं एक खुलासा आवश्यक. हे दोन्ही शरद पाटील वेगळे आहेत. कॉम्रेडचं नाव शरद् असंच लिहायचं असतं. दुसरे शरद पाटील. पायमोडके आणि धडके, असं विनोदानं म्हणता येईल; पण विचारांच्या आघाडीवर नेमके उलटे.

हे सगळं तेव्हा (आणि तसं आत्ताही) माझ्या आवाक्यातलं नव्हतं. पण त्यानिमित्त ही माणसं समजून घेता येतात म्हणून मी अशा गोष्टी मनापासून ऐकायचो आणि मनातच साठवून ठेवायचो. तर, त्या चर्चेतून या माणसाला एकदा भेटावं असं वाटत होतंच. ती संधी आली. तेव्हा शरदनं अशी माणसं गाठून देण्याचा एक उपक्रमच माझ्यासाठी राबवला होता. त्यातलं हे एक प्रकरण.

संध्याकाळी डेडलाईन संपली साडेसात - आठच्या सुमारास. शरदच्या स्कूटरवरच निघालो. विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या मागे सबनीस रहायचे. एक छोटेखानी बंगली म्हणता येईल असं घर. पक्कं बांधकाम. पुढं-मागं आठ-दहा फुटांची आणि दोहो बाजूला तीनेक फुटांची मोकळीक. घरासमोरचा रस्ता दुपदरी. घराला चारेक फुटी उंची असेल अशा कुठल्या तरी फुलझाडांचं कुंपण होतं. त्याच्या समोर अनेक दुचाकी लागलेल्या होत्या. त्यातच आमची एक भर.

घरासमोर डावीकडच्या बाजूला मोकळीक होती. त्यात एका बाजूला एक लोखंडी मोकळी कॉट होती. त्यावर तिघं-चौघं बसले होते. शेजारी दोन-चार खुर्च्या होत्या. त्यावर काही जण. बरेच जण खाली मांडी घालून किंवा कसेही विखुरलेले होते. वीसेक जण असावेत. अंगणातल्या बल्बचा प्रकाश असेल तेवढाच. त्यामुळं आत शिरेपर्यंत मला त्यातले अनेक चेहरे ओळखूच आले नाहीत. आमचं स्वागत झालं.

"ये रे, बेटा... ये..." कॉटवरून आवाज आला.

शरद पुढं सरकला. मीही गेलो. कॉटवरून काशिनाथ साबरे उठला. त्याचा जोडीदार गौतमही उठला. हे दोघंही आंबेडकरी चळवळीतले. युवक कार्यकर्ते. खरं तर हा युवक असा विशेष उल्लेख इथं कामाचा नाही हे नंतर कळलं. सबनिसांकडची सगळी बैठकच युवकांचीच असायची. पक्षभेद नाही. पण आंबेडकरी अधिक. मग विखुरलेला कोणी डावा असायचा. विखुरलेलेच, उजवे असायचे.

शरद कॉटवर बसला. मीही त्याच्याशेजारी बसलो. शरदनं ओळख करून दिली. "हे सबनीससर..." ते शरदच्या पलीकडं कॉटच्या कडेवर तक्क्या टाकून रेलले होते.

मी परिचयाचा नमस्कार केला. शरदनं माझी ओळख करून दिली. मी सबनिसांकडं एकदा नीट पाहून घेतलं. खुरटी दाढी. पावणेसहा फूट उंची. मध्यम वयातल्या प्राध्यापकाला शोभेलसं पोट सुटलेलं. गडद गव्हाळ रंग. डोक्यावरचे केस किंचित मागं सरकू लागलेले. डोळे उठावदार. समीक्षा, विचार वगैरे प्रांतात कॉम्रेडला ठोकू पाहणारं हे व्यक्तिमत्त्व प्रत्यक्षात दिसायला मात्र एखाद्या जिल्हा परिषद सदस्यासारखं होतं. पांढरा शर्ट, पांढरी पँट, हातावर कडं किंवा सोन्याची साखळी असा वेष असता तर सबनीस खपूनही गेले असते त्या वर्तुळात.

"कसा आहेस रे बेटा?" हा प्रश्न माझ्यासाठी होता. बेटा हे संबोधन खास आवडीचं दिसत होतं. आपल्यापेक्षा लहान माणसासाठी सबनीस ते योजतात, की "तू लहान आहेस" हे 'सांगण्यासाठी' असा प्रश्न पडावा, असा सूर वाटायचा. पण नंतर कळत गेलं की, ते प्रेमापोटीच असायचं.

मी तेव्हा तिथं नवीनच होतो. त्यामुळं अशावेळी ऐकण्याकडंच माझा कल असतो तोच मी कायम ठेवला. पण माझी 'ख्याती' त्यांच्यापर्यंत आधीच पोचलेली असावी. कारण त्यांच्या बोलण्यात नवेपणा काहीही नव्हता. त्या घडीला तिथं सुरू असलेली चर्चा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अनुशेष भरून काढण्यासंदर्भात काशिनाथ आणि मंडळींनी सुरू केलेल्या आंदोलनाविषयी होती. अशा काही आंदोलनांचे सबनीस दिग्दर्शक असायचे. तीच भूमिका ते त्यावेळी बजावत होते.

"बॅकलॉग भरून काढावा लागेल रे बेटा त्यांना. ते असे सुटू शकत नाहीत..." नीतिधैर्य वाढवण्याचं काम सुरू होतं. मग त्यात दलित, मागास समाज वगैरेंचं उत्थान, त्यांच्यावर वरच्या वर्गाकडून होत असलेला अन्याय हे मुद्दे असणारच. काशिनाथ आणि मंडळींनी धरणे आंदोलन सुरू केलं होतं. कुणी तरी एकदम, उपोषण करूया, असं सांगितलं.

"नाही रे बेटा. उपोषण नाही करायचं. आधीच आपण उपाशी आहोत. त्यात परत उपोषण नाही. दणका दिला पाहिजे. बँकेत घुसा. काम बंद पाडा. मी आहे तुमच्या पाठीशी..."

सबनिसांचं 'मार्ग'दर्शन सुरू होतं. आता, माझा त्याच्याशी तसा काही संबंध नव्हता. तरीही सबनीस मला विचारते झाले, "काय करायचं?"

हा प्रश्न 'काम बंद पाडा'शी संबंधित आहे की आणखी काही हे क्षणभर मला उमजलं नाही. पण एकूणच उपदव्यापी स्वभाव असल्यानं मी बोलून गेलो, "भरती होईतो धरणे सुरू राहणार हे तुम्ही जाहीर केलंय. भरती तर होणार नाही. धरणे मागं कसं घ्यायचं हा पेच असेल तर एक मार्ग आहे..."

प्रतिक्रियेचा अंदाज घेत मी थांबलो. सगळे ऐकत होते. "संचालक मंडळानं आधी ठराव करावा, की इतका-इतका अनुशेष बाकी आहे आणि तो भरण्यासाठी अमूक-अमूक कार्यक्रम आम्ही हाती घेऊ..."

आता हा खरं तर राजकीय पेच टाकलेला होता. संचालक मंडळ समग्रपणे कॉंग्रेसचं, आणि त्यातही 'शाहू' पुढाऱ्यांचं. त्यामुळं असा ठरावदेखील पुरेसा आहे, असं माझं मत. कारण त्यातून कमिटमेंट लेखी येत होती. आणि बँकेच्या येत्या निवडणुकीवेळी ती पुरेशी होती. हे मत धरणे संपवण्यापुरतंच. एकदम सबनिसांसकट सगळे त्याच्याशी सहमत झाले. क्षणभर मी हरभऱ्याच्या झाडावरच. पण मंडळी तयारीची होती. काशिनाथ आणि शरद तर नेमकेपणानं तयारीचे होते. तो भरतीचा पुढचा कार्यक्रम काय असेल याची रुपरेषा त्यांनी तिथंच मला उलटेसुलटे प्रश्न विचारून निश्चित केली आणि लगेचच सबनिसांचा 'आदेश' झाला शरदला, की त्यानं आता पुढच्या चर्चेत उतरावं.

ही सारी चर्चा सुरू होती तोवर साडेदहा वाजत आले होते. माझं, शरदचं जेवण राहिलं होतं. ते कळताच सबनीस घराच्या दिशेनं पहात ओरडले, "लल्या, खिचडी टाक..."

लल्या म्हणजे ललिता. सबनिसांची बायको. इतरांना बेटा, तसंच हे लल्या. आता, सबनीस डाव्या विचारांचे. त्यात त्यांच्या अंगणात कार्यकर्त्यांचा अड्डा. म्हणजे मग, रात्री-बेरात्री 'खिचडी' असं ओरडण्याचा अधिकार अशांकडं 'असतोच'. सबनीस तो बजावत होते. रात्री साडेदहा ही काही, सारं काही आवरलेलं असताना अशा अड्डेकऱ्यांसाठी नव्यानं रांधायला सांगायची वेळ नाही... माझं विचारचक्र सुरू होतं. त्यात मधल्या काळात आणखी चार-पाच जणांची अड्ड्यात भर पडली होती. माझी थोडी चुळबूळ झालेली पाहून सबनीसच म्हणाले, "अरे जेव रे बेटा. खिचडी खा. थोडा वेळ थांब..."

इलाज नव्हता. कारण आग्रहाचा सूर जरा अधिकच प्रेमाचा होता. गळेपडू म्हणता येईल असा. मी थांबलो. थोड्या वेळानं खिचडी आली. पाच-सहा ताटं. सोबत तेल, लोणचं, चटणी आणि नागलीचे (नाचणी) पापड. सबनिसांसह आधी जेवून आलेल्यांचा अपवाद वगळता आम्ही सारेच जेवलो. एका ताटात दोघं-तिघं असं कसंही. मग चहाचा एक राऊंडही झाला. या काळात झालेली चर्चा मात्र थोडी परिचय अधिक वाढवून घेण्याच्या दिशेनंच. जेवणानंतर थोडा उर्मटपणा करत मी सिगरेटही ओढून घेतली. मध्यरात्रीनंतर केव्हा तरी आम्ही तिथून निघालो. मनात एक प्रतिमा तयार झाली होती; मास्तरकडं येत-जात राहिलं पाहिजे...

---

सबनिसांचा उल्लेख आम्हा मंडळींत आपसात 'मास्तर' असा एकेरी, कधी 'प्राडॉ' असा आदरार्थी व्हायचा. प्रत्यक्षात समोरासमोर बोलताना बहुतांशी 'सबनीससर' किंवा 'सर' असाच. पाठीमागं उल्लेख एकेरी केला तरी आदर तोच. विद्यावर्धिनी महाविद्यालयात हे गृहस्थ मराठी विषय शिकवायचे. पण एकूण पिंड सतत भांडत राहण्याचा, उद्योगी आणि उपद्व्यापीही. त्यांच्या हातून कॉम्रेड शरद् पाटलांच्या 'अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र' या मांडणीवर टीका करणारं लेखनही तसंच झालं असावं, असंही मला सुरवातीला वाटायचं. त्यात तथ्य नव्हतं. मास्तर त्याविषयी सिरियस होते. लेखन, माझ्या मते, बरंचसं चुकीचं असलं तरीही. एक होतं, त्या काळात त्यांनी कॉम्रेडला लक्ष्य केल्यानं त्यांची अशा वर्तुळांमध्ये एकदम प्रतिष्ठा वाढलेली असावी. कारण, त्या टीकेच्या निमित्तानं होणाऱ्या चर्चेत त्यांचं नाव सारखं येत रहायचं आणि मग अनेकदा त्यांचा उल्लेख काहीसा जबाबदारीनं झालेला मी अनुभवला. आज आता त्या दोघांची मांडणी काय होती, हे सांगता येणार नाही. ती पुस्तकांतूनच पहावी लागेल. पण त्या काळात सबनिसांची मांडणी तरी पटली नव्हती हे निश्चित.

एकदा आमच्यात हा विषय निघालाच. आता फारसं आठवत नाही. पण सबनिसांनी सुरवात "बेटा, अशा पद्धतीनं जातीय विश्लेषणच चुकीचं आहे..." अशी केली, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, मुळात सबनिसांना कॉम्रेडला खोडून काढायचं आहे ते जातिसिद्धांताविषयीच. कॉम्रेडची कम्युनिस्ट पक्षातून (बहुदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष) हकालपट्टी होऊन तेव्हा कित्येक वर्षं झालेली होती. त्याच्या मुळाशी पोथीनिष्ठ कम्युनिस्टांचं वर्गसिद्धांताचं प्रेम होतं, कारण कॉम्रेडनं त्यालाच आव्हान देऊन जातिसिद्धांत पुढे केला होता. ते कॉम्रेडनं नुसतंच केलं नव्हतं, त्यामागं त्यांची दीर्घ तपश्चर्या होती. मार्क्सच्या विचारांना त्यांनी दिलेली फुले-आंबेडकरी विचारांची जोड ही त्या अर्थानं मूलगामी स्वरूपाची. त्यात दोष असतील, त्रुटी असतील, उणिवाही असतील. पण अन्वीक्षेची पद्धत त्यांनी मांडली हे नाकारणं सोपं नाही. ते नाकारण्यात लोकप्रियतेच्या आघाडीवर मार्क्सवाद्यांनाही यश आलेलं नव्हतं. तुलनेनं कॉम्रेडचं योगदान स्वीकारलं जात नसलं तरी, वाखाणलं जात होतं हे नक्की. अशात कॉम्रेडनी 'अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र' लिहिलं. तो धागा सबनिसांनी पकडला.

उत्तम कांबळे यांनी मला जे सांगितलं होतं, त्या संदर्भात मी सबनिसांच्या मांडणीचा विचार करायचो. मला कळायचंच नाही, की अचानक उठून कॉम्रेड शरद् पाटील यांच्या घनगंभीर राजकीय अंगानं जाणाऱ्या समीक्षाविषयक सिद्धांताला सबनिसांसारख्या केवळ साहित्याच्या क्षेत्रातील व्यक्तीनं अंगावर का घ्यावं? कारण, माझी समज अपुरी होती. सबनिसांनी जेव्हा जातीय विश्लेषणालाच आव्हान देत आपलं म्हणणं मांडायला सुरवात केली, तेव्हा मला कळलं, की हे वाटतं तितकं साधं-सरळ समीक्षेचं प्रकरण नाही. याच्या मागं राजकीय विचारबैठक आहे. आणि ती पारंपरिक पोथीनिष्ठ कम्युनिस्टांची असावी. पुढं मग सबनिसांकडं काही कम्युनिस्टांचं येणं-जाणं दिसलं आणि त्यावर शिक्कामोर्तब झालं.

पण हे अर्थातच सोपं नव्हतं आणि नाही. 'अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र' हा कॉम्रेडच्या एकूण मांडणीचा एक विस्तार जगण्याच्या एका क्षेत्राविषयीचा. तो खोडण्यासाठी आधी त्यांची वर्ग-जातीविषयक मांडणी खोडून काढावी लागते. सबनिसांच्या मांडणीत फक्त विस्ताराचा समावेश होता.

मग एकेक गोष्टी उकलत गेल्या. त्या काळात तिथं होणाऱ्या बऱ्याच आंदोलनांचे सबनीस पडद्यामागचे 'दिग्दर्शक' असायचे. ते पडद्यामागं का रहायचे हा प्रश्नच. त्याचं कारण सबनीसांचा जगण्याचा मार्ग हेच असावं. सबनीस महाविद्यालयात नोकरी करायचे. ती नोकरी टिकली पाहिजे, ते सारं सोडून आपण काही समाज परिवर्तनाच्या लढाईत थेट उतरू शकत नाही; पण आपल्याकडं आहे त्या क्षमतांचा अशा मुद्यांसाठी वापर झाला पाहिजे, या भावनेनं अनेक मंडळी अशी काही ना काही कामं करत असतात. सबनिसांनी निवडलेला मार्ग हा दुसरा होता. पण त्या मार्गावरची त्यांची वाटचाल मात्र किंचित वेगळी होती. ही अशी अनेक माणसं लढायांमध्ये मागंच राहतात. सबनिसांना पुढं यायचं असायचं. पण ते 'गोष्टी सांगेन युक्तीच्या चार' एवढंच काम करत. त्यामुळं ते भाषणाला वगैरे हमखास पुढं असायचे. पण मी त्यांना कधीही मोर्चात, धरणं धरून बसलेल्यांमध्ये पाहिलं नाही. ती मर्यादा त्यांनी 'आखून' घेतली असावी. प्रत्यक्ष जमिनीवर, त्या अर्थानं, ते उतरले नाहीतच.

सबनिसांचा उल्लेख आमच्या चर्चेमध्ये एकदा कुजबुजत्या शब्दांमध्ये 'मास्तर पूर्वी नक्षलवादी होता' असा झाला. ज्या गटात मी होतो, त्यात तो झाला असल्यानं मी हसलो. दोन कारणांमुळं. नक्षलवादी होता, यावर माझा विश्वास नसतो. तो असेल तर असतोच. फक्त त्यानं सशस्त्र क्रांती सोडलेली असते, तो थोडा सनदशीर मार्गाकडं आलेला असतो. दुसरं कारण म्हणजे ते कुजबुजणं. ते तर मला अशक्य भाबडेपण वाटलं होतं. बोलणाऱ्यांचा दोष नव्हता. कारण मास्तरच तसं बोलायचा. मी नक्षलवादी होतो, हे मास्तरनं नंतर अनेकदा सांगितलं. मी काही त्यानं प्रभावित झालो नाही, कारण मला ती गरज वाटत नव्हती. मास्तरनंच हे पिल्लू कधीतरी सोडलेलं असावं. ते अशा लोकांमध्ये सोडलेलं होतं, की त्यांच्या भाबडेपणातून त्याचा प्रसार होत गेला. ते मास्तरला अपेक्षीत होतं की नाही, हे सांगता यायचं नाही. पण हे खरं की, मास्तरचं एक वेगळं रेप्युटेशन त्यातून तयार झालं. मास्तर एकाचवेळी आदरणीय ठरला त्या गटामध्ये, आणि त्याचवेळी त्याचा थोडा दराराही बाहेर निर्माण झाला. उगाचच. मास्तरला त्याचा लाभ खचितच झाला. एरवी, कॉम्रेडच्या मांडणीला आव्हान दिल्यानंतर पूर्ण तयारी नसलेल्या माणसाची वासलातच लागायची. इथं ते झालं नाही किमान काही काळ. त्याचं कारण या दराऱ्यात, किंवा रेप्युटेशनमध्ये दडलेलं असावं. आजच्या भाषेत, अशा स्ट्रेन्ग्थ्स लीव्हरेज करण्यात मास्तर पटाईत होता.

सबनिसांच्या नजरेला एक धार होती. एक तर डोळेच उठावदार. एखाद्याचं बोलणं ते ऐकायचे तेव्हाही ही नजर तशीच स्थिर असायची. ते पहायचे तेव्हा त्यात मार्दव कधी दिसायचंच नाही. म्हणजे, ते दुसऱ्याचा मुद्दा ऐकत असायचे, पण नजरेत दरारा कायम. त्यांच्या विचारव्यवहारात तो दरारा त्या क्षणी असेलच का? व्यक्तीशः मला तरी तसा तो वाटला नाही. कारण मांडलेल्या मुद्यावर शांतपणे ते बोलायचे तेव्हा आपल्या चुकाही दुरूस्त करण्याचा त्यांचा कल होता. त्यावेळी बोलताना त्यांचा सूर सौम्य असायचा. आवाजात खर्ज नसायचा. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एरवी कोणताही मास्तर वर्गात बोलण्याच्या सवयीपोटी मोठ्यानेच बोलतो. सबनीस त्याला अपवाद. घरच्या मैफिलीत त्यांचा आवाज संयत. भाषणाच्या वेळी माईकची गरज पडू नये. अर्थात, त्यांना माईक लागायचा. कारण तोही प्रभावाचा एक भाग असतोच.

मला मास्तरच्या घरची मैफल आवडायची, कारण तिथं सुदृढतेनं एकमेकांची मापं काढता यायची. तिथं अठरापगड मंडळी यायची. बहुतेक सारे युवकच. त्या सगळ्यांशी माझा जवळचा संबंध होता. त्यांना माझं, मला त्यांचं माप काढता यायचं ते त्या मैफिलीत. मग गावच्या राजकारणापासून सुरवात व्हायची. कॉंग्रेस हे तर आमचं आवडतं लक्ष्य. मास्तर टीका करायचा कॉंग्रेसवर. पण तो गटबाजीत नसायचा. ती टीका करताना मास्तर राजकारण समजावून द्यायचा. आंबेडकर, फुले, मार्क्स ही नावं त्याच्या बोलण्यात येत जायची. डावी चळवळ आणि महाराष्ट्र याविषयी त्यांच्याकडं माहिती असायची. अनेकदा मूळ कारणंही ठाऊक असायची. त्याचं मार्क्सिस्ट पद्धतीनं ते विश्लेषणही करायचे. मग, उत्पादन साधनांवर मालकी मिळवली पाहिजे, असली वाक्यं मास्तर सहजगत्या सांगून जायचा. समोर बसलेल्या पोरांचं त्यातून थोडंफार राजकीय शिक्षण होत जायचं.

पण एक होतं, त्या पोरांची जशी मास्तरचं पाठबळ ही ताकद होती, तशीच मास्तरचीही ती पोरं ही ताकद होती. मास्तर कायम भांडणात दंग. विद्यावर्धिनी महाविद्यालयात त्यांचा काही संघर्ष होता. अंतर्गत राजकारण. ज्यांच्याशी संघर्ष होता, ते बाबा हातेकर आंबेडकरी चळवळीचेच. ही आंबेडकरी चळवळीतील दुफळी तिथंही दिसायची. काशिनाथ वगैरे मंडळी मास्तरच्या बाजूनं. हातेकरांकडं गवई गटाची मंडळी असायची. पण, हा सत्तेचा समतोल असावा त्यातला. दोन्ही बाजू सांभाळूनच रहायच्या.

मास्तरला ही एक नशा होती. मग पोरांच्या आंदोलनात तो उतरायचा. मास्तरचं भाषण जड नसायचं. पोरांशी पोरांच्या भाषेत पोरांसाठी बोलायचा तो. ही पोराटकीही नव्हती. भाषा कशी, तर कॉलेजच्या कट्ट्यावरची. त्याचं एक मासलेवाईक उदाहरण आहे. परवानगी नसताना वर्षभर एक बी.पी.एड. महाविद्यालय एका कॉंग्रेस पुढाऱ्यानं चालवलं. वर्ष संपत आलं आणि विद्यापीठासह सरकारनं हात वर केले. पोरांचं भविष्यच दावणीला लागलं. एक तर प्रवेशासाठी देणग्या दिलेल्या. त्यांचं आंदोलन उभं राहिलं. आंदोलनाला मी पडद्यामागून मार्ग दाखवत होतो. त्या मुलांच्या बैठका माझ्या खोलीवर व्हायच्या. आंदोलनाला वजन यावं म्हणून त्यात मास्तरला ओढायचं आम्ही ठरवलं. हे आंदोलन सनदशीर मार्गानं. धरणं, मोर्चा असं सुरू होतं. सरकार काहीही करत नसल्यानं निघालेल्या मोर्चासमोर मास्तरचं भाषण झालं. त्यावेळी जे काही भाषण झालं ते अफाट होतं. गांधींच्या मार्गांवर टीका करताना मास्तर सुटला होता. "गांधी झाला म्हणून काय झालं? त्याच्याही *डीत तेच असतं जे तुमच्या-माझ्या असतं. आणि त्याला सुगंध नसतो तर दुर्गंधच असतो..." पोरांनी रस्ता बंद केला पाहिजे पुढाऱ्यांचा, यावर मास्तरनं असा भर दिला होता. हे तिथंच थांबलं नाही. भाषणाच्या शेवटी त्यांनी खिशातून एकदम एक गांधी टोपी काढली, दुसऱ्या खिशातून काडेपेटी काढली आणि कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांचा निषेध असं म्हणत ती जाळून टाकली.

पोरांच्या उत्साहात भर पडायला काहीही वेळ लागण्याचं कारण नव्हतं. त्यानंतर आठ दिवसांत त्यांचा प्रश्न काही तरी तोडगा निघून मार्गी लागला, कारण त्या आठ दिवसांत कलेक्टर ऑफिसच्या समोर त्याच आंदोलनाचं अस्तित्त्व होतं. कॉलेजची झाडून सगळी मुलं जमली होती. अनेक कागदपत्रं काढून सरकारी अधिकाऱ्यांनीही कसे घोळ केले आहेत वगैरे गोष्टी बाहेर येत गेल्या आणि नमतं घेण्याशिवाय सरकारपुढं पर्याय राहिला नाही.

सबनिसांमुळं हा प्रश्न मार्गी लागला असं काही काळ म्हटलं जायचं. तसं इतरही काही आंदोलनांबाबत म्हटलं जायचं. 'लढ बाप्पू' म्हणणं, या योगदानाचं ते फलीत असावं हे मला काही पटायचं नाही. आणि मी शरदशी त्यावरून वाद करत बसायचो. सबनिसांच्याच अंगणात. सबनिसांची नाळ युवकांशी अधिक जुळायची, त्याचं आणखी एक कारण असावं. गांधीमार्ग त्यांना मंजूर नसायचा, हे ते असावं. उपोषण म्हटलं की मास्तर खवळायचाच. तसंच सत्याग्रह वगैरेबाबत. आपली बाजू सत्यच आहे ना, मग त्याला मिठी मारून बसल्यानं काय होणार असला युक्तिवाद. तरुण मंडळींना ते भावणारंच.

पण एक झालं. त्यावेळी आमच्या त्या एकूण परिसंस्थेतील काही मंडळींचं मिळून आम्ही एक काल्पनिक रायरंग फेडरेशन तयार केलं होतं. सभेत किंवा जाहीर कार्यक्रमात हुकमी रडणं, डोक्यातून भलतंच काही तरी तिरपाट काढून त्या जोरावर चार अनुयायी मिळवणं, काही विशिष्ट लकबी आणि शैलींच्या आधारे प्रसिद्धीचा सोस धरणं असं करणारी मंडळी त्यात होती. हे त्यांचे रायरंग. त्याचं अध्यक्षपद पूर्वीच्या समाजवादी, नंतर बहुतांश समाजवादी कॉंग्रेसी होतात तशा कॉंग्रेसी झालेल्या व्यंकटराव रणधिरांना दिलं होतं. कारण ते सभेत रायरंग करण्यात मातब्बर. स्वतः रडतील, पण कहाणीही अशी सांगतील की, समोरचाही रडेल. सबनिसांना आम्ही त्या रायरंग फेडरेशनचं उपाध्यक्षपद देऊन टाकलं. सबनिसांनी ते 'निभावलं' असं आता म्हणता येतं हे नक्की.

---

सबनीसांमधला तो 'नक्षलवादी' माझ्यासाठी हास्यास्पद ठरला होता त्याची सिद्धता नंतरच्या काळात झाली. तीही अचानक.

कधी तरी एकदा कुठल्या तरी जाहीर कार्यक्रमात बोलताना सबनिसांनी काही विधाने केली. विधाने मला आता आठवत नाही. त्यांना तितकं महत्त्वही नाही. पण त्या विधानांचा अर्थ सबनिसांनी आंबेडकरांचा अनुदार उल्लेख केला अशा आशयाचा ठरत होता. हे घडलं तेव्हा सबनिसांचा उर्ध्वगामी प्रवास सुरू होऊन तीनेक वर्षेच झाली असावी. कुठंतरी सबनिसांच्या त्या विधानांची बातमी आली. त्याच्या नंतर लगेचच एके दुपारीच मला फोनवर निरोप मिळाला, 'मास्तरच्या घरी अर्जंट मीटिंग आहे. आलंच पाहिजे.' मला त्या क्षणी माहितीच नव्हती. थोडी चौकशी माझ्याच स्तरावर केली. तेव्हा मला विधानांविषयी माहिती समजली. मीटिंगविषयी माहिती घेण्याच्या फंदात मी पडलो नाही. कारण ती त्यासंदर्भातच असावी, असा अंदाज होता. संध्याकाळी मी गेलो. सगळीच मंडळी होती. नेहमीची, आणि पाहुणे कलाकारही. त्यात कॉंग्रेसचे होते, भाजयुमोचे होते, छात्रभारतीचे होते... पदाधिकारी, कार्यकर्ते अशी मंडळी. सगळं चित्र माझ्यासमोर मांडलं गेलं तेव्हा मी चक्रावलोच. एकूण कटकारस्थान असंच चित्र माझ्यासमोर निर्माण झालं.

सबनिसांची विधानं ही आता संधी होती. आंबेडकरांविषयी अनुदार विधानांबद्दल सबनिसांचा निषेध आणि कारवाईची मागणी असा घाट रचला आहे... त्यामागे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची (हा कॉम्रेड शरद् पाटील यांचा पक्ष; भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे राज्य प्रवक्ते धरमचंद चोरडिया त्याचं 'दोन तालुक्यातील राष्ट्रीय पक्ष' असं वर्णन करायचे) मंडळी आहेत वगैरे कथानक झालं. कॉम्रेडच्या पक्षाची मंडळी म्हणजे मुख्यत्वे करून सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची मंडळी. निषेधाची बैठक ठरली आहे, वगैरे सारं सांगून झालं.

सबनीस पुरते हबकले होते हे निश्चित. त्यांनी सर्वच पक्ष गोळा केले होतेच, शिवाय ती बैठक हायजॅक करण्याचा मार्ग ठरला होता. आता, कॉम्रेडचा आवडता शब्द वापरायचा तर, सविसंचे लोक समोर होते. ते बैठक हायजॅक करू देणाऱ्यांपैकी नव्हेत. मग काय करायचं? मी सहज सुचवलं की सभाशास्त्राचा अवलंब करावा लागेल. त्यानुसार बहुमत मोठं ठेवायचं. ते सबनिसांकडं खचितच होतं. कारण, ती त्यांची ताकद होती. सविसंची ती ताकद नव्हती. मग, तासाभरात पुढची व्यूहरचना ठरली. अध्यक्ष कोण असावेत इथंपासून सारं ठरवावंच लागतं अशा वेळी. तर तसं ते ठरलं. कोणी किती मुलांना आणायचं, त्यांचे गट कसे, नेतृत्त्व कोणाकडं हे जसं ठरलं, तसंच कोणी कोणता मुद्दा काढायचा वगैरेही ठरलं.

एकूण, आंबेडकरांसंदर्भातील मुद्यावरून निषेध होणं म्हणजे बाजार उठणं हे खरंच होतं. आपल्याला संपवण्याचा हा कट आहे, त्यामागे कॉम्रेड आहे, असं सबनिसांचं म्हणणं होतं. ते मला पटत नव्हतं. पण सबनिसांनी आंबेडकरांचा उपमर्द करण्याच्या हेतूनं काही विधान केलं असेल हे मानणंही अशक्य होतं. मला तर खात्री होती, कारण विचारांची मूस आणि विधानांचे दोन संभाव्य अर्थ. प्रसिद्ध झालेलं वृत्तही काटेकोर नव्हतं. पण आता तशा बाबीचा सामना करणं अटळ होतं. सभेसाठीची स्ट्रॅटेजी ठरली तरी, अजूनही सभा कुठं, कुणी बोलावली वगैरे काही कळत नव्हतं. ही बैठक सुरू असतानाच त्याची माहिती आली, आणि सबनीस आणखी अस्वस्थ झाले. आतल्या खोलीत बसून शरद, काशिनाथ वगैरे मंडळींसह काही प्रमुख कार्यकर्ते त्यांची समजूत काढत होते. पण त्यांची चुळबूळ काही थांबत नव्हती. बरंच काही ठरवून, त्यांना आश्वस्त करून मंडळी तिथून बाहेर पडली.

दुसरे दिवशी बैठक होणार होती. काय झालं माहिती नाही. सकाळी बैठकीच्या वेळेला मी उठलोच नाही. बैठकीची वेळ संपल्यानंतर तासाभराने फौज आली. मी प्रश्नार्थक पाहिलं फक्त. कोणीतरी बोललं, "कसलं काय, रायरंगी मास्तर! बैठक नाही आणि काही नाही..."

मग मला कळलं. बैठक वगैरे काही ठरलं नव्हतं. मास्तरला कुणी तरी तसं कळवलं काही तरी कुजबूज ऐकून, आणि त्यांनी तेवढंच डोक्यात ठेवलं. सारी मोर्चेबांधणी केली. शेवटी पोपट झाला, कारण ऐकलेली कुजबूज कुजबुजच ठरली. सभा वगैरे काही ठरलेलं नव्हतं. सगळी पोरं वैतागून परतली होती. कारण थोडा दंगा करण्याची त्यांची संधी गेली होती.

मागाहून मी चौकशी केली, तेव्हा मला कळलं. सविसंच्या मंडळींनी सबनिसांचा निषेध वगैरेचा विचारही केला नव्हता. त्यांच्या एका कार्यकर्त्यानं मला सांगितलं, 'हुतात्मा थोडाच करू त्यांचा. मुळात, त्यांच्या म्हणण्यात काही दम नाही. त्यांचा निषेध करणं वगैरे कॉम्रेडना शोभणारच नाही.' खरं होतं ते.

सबनीस सुटले. काही न घडताच सुटले.

त्यानंतरच्या काळात सबनिसांशी असलेला संपर्क कमी होत गेला आणि मास्तर फक्त आठवणीत मुरत गेला.

---

सबनीस हे जसे दिसले ते एवढेच. याचा अर्थ असा निश्चित नाही की, ते एवढेच आहेत. इतर अनेकांना सबनिसांचे अनेक वेगळे अनुभव आले असतील. चांगलेही, वाईटही. तो शेवटी दृष्टिकोनाचा आणि (गुणावगुण) ग्राहकाच्या स्थितीचा प्रश्न.

सबनिसांमध्ये काहीच उणं नव्हतं का? होतं. त्याची त्यांना टोचही असावी असं एक उदाहरण मला माहिती आहे. काही आरोप-प्रत्यारोपांनंतर एकदा त्यांच्याकडं बसलो होतो, तेव्हा बोलता बोलता ते म्हणाले की, त्यांनी प्लॉट विक्रीचे काही व्यवहार केले आहेत; ते अनैतीक मानता येतील; पण, एरवी काही नाही. वैयक्तिक जगण्यातही काही उणं-दुणं असावंच. लोकापवाद होतेच. पहिली पत्नी, दुसरी पत्नी हा मुद्दा आला की असे लोकापवाद अनेकदा असतातच.

अर्थात, तरुणांच्या संदर्भांमध्ये त्याची कुठं कधी अडचण झाली नाही. कार्यकर्त्यांचा एक अड्डा त्यांच्याकडं कायम असायचा आणि त्यातून काही कार्यकर्ते घडलेही.

सबनिसांचा नक्षलवाद बहुदा गांधीमार्गावरच्या टीकेपासून सुरू व्हायचा आणि तिथंच संपायचा. यामागं त्यांचा काही हेतू असावा का? नाकारता येत नाही. एकूण त्या काळात त्यांना सोस होता प्रसिद्धीचा. मग त्यापोटीच कॉम्रेड हे जसं लक्ष्य झालं, तसंच गांधीवाद हेही एक लक्ष्य झालं असावं. कारण, एरवी हे सगळं करणाऱ्या मास्तरचं स्थान बाकी 'प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनीस' असं आणि एवढंच राहिलं. पुढं त्या आघाडीवर त्यांनी विद्यापीठ गाठलं, विभागप्रमुख झाले, तिथल्या संशोधनाच्या संदर्भात काही वादांना त्यांनी आमंत्रणही दिलं, मग प्राचार्यही झाले. साहित्य संमेलनात ते दिसू लागले. चार पुस्तकंही नावावर झाली. परिसंवाद, चर्चा वगैरे तर मोजणीत नाहीतच. पण, कॉम्रेड आजही जसा महत्त्वाचाच राहिला, तसं सबनिसांना नाही होता आलं. ते सबनीसच राहिले आहेत. आजही आमच्या तेव्हाच्या ग्रूपसाठी फक्त 'मास्तर'!

पूर्ण

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

पदार्पणात सिक्सर! माणूस हा माणसासारखाच दाखवला ते विशेष आवडले.

मालिका लवकर पुढे सरकावी यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे सुचवतो! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

माणूस म्हणून माणूस, गुणदोषांसकट वर्णन... असेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सबनीसांना मी तसं ओळखते! पण माझ्यासाठी हा त्यांचा पूर्ण नवीन पैलू! हे लिखाण वाचल्यावर वाटलं , अरेरे! मी सबनीसांना भेटलेच नाही!
गोळीबंद लिखाण झालं आहे. माझ्यासाठी तर एका माणसाची पूर्ण नव्याने ओळख!
सुरवात एकदम तडाखेबंद झाली आहे , मालिका खूपच रोचक असेल हा अंदाज आहेच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यक्तिचित्र आवडले. व्यक्तिचित्राबरोबरच डाव्या चळवळीचे काही पैलूही समोर आले. सबनीसांविषयी काही ऐकलेले नाही. पुणे विद्यापीठ परिसरात काळ घालवल्याने वर वर्णन केलेले लोक पाहिलेले नसले तरी डोळ्यासमोर उभे राहिले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भवताल समजून घ्यायला शिकवणारे लेखन. अर्थातच महत्वपूर्ण. लेखमालिका नियमित चालत रहावी अशी माफक अपेक्षा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजकीय काय ते समजलं नाही पण व्यक्तीचित्र छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरेख! सबनीसांचं रायरंगी व्यक्तिचित्र आवडलं. वर्णनासोबतच वागण्यातले आणि विचारांतले टिपलेले सूक्ष्म बारकावे अप्रतिम. लेखमालेतल्या पुढील भागांची वाट पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सबनीस ही व्यक्ती मला तरी माहिती नव्हती. पण अश्या प्रवृत्तीचं आणखी कोणीतरी आजूबाजूला असतंच. एकाच लेखात अनेक विचार आल्यासारखे वाटले. मलाही त्यातले राजकीय विचार फारसे कळले नाहीत तरी त्याने फारसा फरक पडत नाही.
बाकी एखाद्या व्यक्तीला पाहिल्या भेटीपासून पुढच्या प्रत्येक भेटीत आपण जसं जाणत जातो तसंच लेखातही जाणवतं.

बाकी लोकांच्या निरनिराळ्या स्वभावांचे निरिक्षण आणि विचार करायला मला आवडते त्यामुळे लेखही आवडलाच.
ही लेखमाला अनेक वेगवेगळी स्वभाव वैशिष्ट्य घेवून चालू राहिल अशी अपेक्षा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

व्यक्तीचित्र आवडलं.छानच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यात त्यांच्या अंगणात कार्यकर्त्यांचा अड्डा. म्हणजे मग, रात्री-बेरात्री 'खिचडी' असं ओरडण्याचा अधिकार अशांकडं 'असतोच'. सबनीस तो बजावत होते. रात्री साडेदहा ही काही, सारं काही आवरलेलं असताना अशा अड्डेकऱ्यांसाठी नव्यानं रांधायला सांगायची वेळ नाही...

या मंडळींच्या चळवळी आणि समाजसेवा या लोकांसाठी, किंवा लोकांना दाखवण्यासाठी असतात अशी शंका येते. घरातल्या बाईने दिवसरात्र चहा टाकणे आणि ताटे मांडणे एवढेच करायचे. आमच्या काकांनी "माझी लेक मी राजकारण्याच्या/ आमदाराच्या/ मंत्र्याच्या घरात मुळीच देणार नाही, असली स्थळे मला सांगू नका" असे निक्षून सांगितल्याचे मला यावरुन आठवले. त्यांनीही हेच कारण सांगीतले होते. ते म्हणाले माझ्या लेकीचे मला वाटोळे करायचे नाही. ती दिवसभर चहाच टाकत बसेल.

बाकी निषेध सभा होणार म्हणल्यावर धांदल उडालेल्या सबनीस सरांचा नक्षलवाद हास्यास्पद खराच. आश्चर्य वाटते ते याचे, की प्रत्यक्ष मैदानात कधीच न उतरलेल्या मास्तरांविषयी पोरांच्या मनात आदर कसा काय टिकून राहिला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आश्चर्य वाटते ते याचे, की प्रत्यक्ष मैदानात कधीच न उतरलेल्या मास्तरांविषयी पोरांच्या मनात आदर कसा काय टिकून राहिला!

मला वाटतं वैयक्तिक स्तरावरून ते येत असावं. पोरांच्या बरोबर एकाच ताटात खिचडी खाणं, त्यांच्या घरी जाणं, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणं वगैरे. त्याला जोड त्या राजकीय शिक्षणाची. आदर टिकण्यास तेवढं पुरे होत असावं. मग काळ गेला की पोरांची वेगळी फौज दिसायचीच. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग काळ गेला की पोरांची वेगळी फौज दिसायचीच. Smile

नाउ धिस एक्सप्लेन्स!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखमालिका झोकात सुरू झाली आहे. तुमच्या 'राजे' पासूनच तुम्ही व्यक्तिचित्रण मस्त करता हे लक्षात आलं आहे. व्यक्तिचित्रणात राजकारणाचा भाग आल्यामुळे ते आणखीनच रोचक झालं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सध्या असंच म्हणते. मागाहून पदरची वाक्ये टाकते. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख छान जमलेला आहे.

खऱ्या हाडामांसाच्या व्यक्तीचं तिच्या गुणदोषांसकट वर्णन करणं कठीण काम असतं. विशेषतः दोष दाखवताना तारेवरची कसरत होते. शक्य तितकं अलिप्त राहून वर्णन केल्यामुळे ही कसरत इथे साधलेली आहे.

मास्तरचं वर्णन वाचताना कायम तलवारबाजी, युद्धशास्त्र शिकवणाऱ्या गुरूचं चित्र राहिलं. शिक्षणशाळेच्या प्रांगणात मर्यादेत. हातात तलवार चालवायचं कसब आहे, पण खरोखरच्या धुमश्चक्रीत पडण्याची तयारी नाही म्हणा, इच्छा नाही म्हणा. दुर्दैवाने शास्त्रातली गतीही इतर मुरलेल्या योद्ध्यांइतकी नाही. असं असतानाही आपण मान्यवर योद्ध्यांच्या मालिकेत बसावं अशी इच्छा मिळणं हा नियतीचा क्रूर खेळ आहे.

मला बंदा रुपया आणि खुर्दा यातला आणखी एक फरक जाणवला. खुर्दा हळू हळू खर्च होतो. त्यांनी जे विचार दिले, कार्यकर्ते घडवले त्यातून होणारा परिणाम हा सहज मोजता येण्यासारखा नाही. दरवर्षी येणाऱ्या विद्यार्थ्यांवर संस्काराचे जे थोडे थोडे करत पैलू चढवले, त्यांचं एकत्रित तेज दिसत नाही. असा खुर्दा खर्च करत रहाण्यापेक्षा खण्णकन् वाजवून फेकलेला रुपया केव्हाही आकर्षित करतो, डोळे दिपवतो.

राजकारणाच्या क्षेत्राची पार्श्वभूमी असल्यामुळे निर्माण झालेल्या अपेक्षा मात्र काहीशा अपुऱ्या राहिल्या. हा लेख एक्स्पर्टने लिहिलेला जाणवत रहातं. अनेक पक्षांची नावं, वर्तुळं, व्यक्ती, आंदोलनं ही वाचकाला माहीत असल्याप्रमाणे येतात. पुन्हा एकदा लेख वाचल्यावर त्या सगळ्यांचे संदर्भ, नाती कळणं तितकं महत्त्वाचं नाही हे जाणवतं. पण तरीही ते कळले असते तर व्यक्तिचित्राच्या पार्श्वभूमीला अधिक उठाव आला असता हेही तितकंच खरं.

अदितीने म्हटल्याप्रमाणे लेखमालेची सुरूवात तर झोकात झालेली आहे. पुढचं लेखनही असंच दमदार येऊ दे ही शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! चित्रण आवडले.. नेहमीच्या 'नोंदी'पेक्षा (जाणीवपूर्वक) वेगळी (ठेवलेली) शैली मस्तच!
थोडे लाऊड थिंकींग
राजकीय 'पदसिद्ध' व्यक्ती आणि राजकीय विचारंनी प्रभावीत मात्र आधिकारीक पदांपासून दूर रहाणार्‍या तरीही राजकीय घडामोडींस कारणीभूत ठरणार्‍या व्यक्तींमधे एखाद्या विचारांचा -व्यक्तीचा प्रभाव असला तरी एक योग्य वेळ येताच आपल्यावर झालेल्या विचारांचे संस्कार आपल्याला साजेसे असे वळवून-वाकवून हातात काहितरी बदलण्याचे अधिकार मिळवताना दिसतात तर काहि आपल्या विचारांवर आयुष्यभर ठाम राहुन झगडताना दिसतात.
मला व्यक्तीशः यातील दुसर्‍या पद्धतीच्या लोकांबद्दल नितांत आदर वाटतो, त्यांच्या लढाऊ जीवनाला सलामही करतो; मात्र (हा 'मात्र' उरतोच नाही!?) त्यांनी इतकं लढून, लोकांना नेतृत्त्व देऊनही अधिकार, शक्ती यांपासून दूर राहुन शेवटी काहि मिळवतात का? की केवळ योद्धे म्हणून रहाणे आणि प्रस्थापितांशी झगडण्यात त्यांना 'कंफर्टेबल' वाटत असते? अशी (बर्‍याचदा विचारनिष्ठ) माणसे सहसा स्वतः 'प्रस्थापित' होणे टाळतात ते प्रस्थापितांविरुद्ध लढता येणार नाही म्हणून असेल का?

असो. बाकी बंदा आणि खुर्दा नावही आवडले. बर्‍याच व्यक्ती सामान्यतः खुर्दा असल्याप्रमाणे रहात असली तरी वेळप्रसंगी त्याच्या इतके बंदेपण मिळणे विरळ असते. अश्या खुर्दांमधील बंदेपण शोधणार्‍या आणि दाखवून देणार्‍या या मालिकेला शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

की केवळ योद्धे म्हणून रहाणे आणि प्रस्थापितांशी झगडण्यात त्यांना 'कंफर्टेबल' वाटत असते? अशी (बर्‍याचदा विचारनिष्ठ) माणसे सहसा स्वतः 'प्रस्थापित' होणे टाळतात ते प्रस्थापितांविरुद्ध लढता येणार नाही म्हणून असेल का?

फार चांगले निरीक्षण. प्रस्थापित होण्याची संधी असतानाही कुणी होत नसेल, तर काय कारण असावे? खरेच त्यागाची भावना असावी? की प्रस्थापिततेतून येणार्‍या जबाबदारीबरोबर आपल्या यापूर्वीच्या आचारविचारांची संगती टिकवणे अवघड वाटण्याची भिती असावी? की त्यागाची, त्यातून मिळणार्‍या मोठेपणाची नशा असावी? की सत्तेबाहेर राहून रिमोट कंट्रोल होण्यातली मौज आवडत असावी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे सबनीस "ते" सबनीसच का?

तसं असेल तर ट्यागिंग अस्वल आणि (इतरांचे धागे वाचत असतील तर) राकु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तेच वाटतात- नाव आणि इतर उल्लेखही जमताहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्वलाला अनुमोदन.
वाद ओढवून घेण्यांत हे पटाईत दिसतात. श्रामोंच्या वर्णनाबरहुकुम त्यांचे आत्ताचेही वागणे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा नेटवाचनप्रवेश थोडा उशिराच झाला आणि या लेखकाचं नाव येइपर्यंत -------.
भलतंच दमदार लेखन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नोंद असावी म्हणून :
हा लेख द्वेषमूलक असू शकतो. किंवा अगदी सत्यही. लेखकच जाणो. हा लेख वाचून एकंदरच साहित्य संमेलन नावाच्या गोष्टीची पूर्वतिडीक टोकाला गेली. आवरा यांना असं वाटलं.

लोकसत्तातील लेखात या लेखाचा उल्लेख आला आहे. त्यावरूनच मग शोध घेतला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

रोचक आहे तो ब्लॉगवरील लेख

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!