Skip to main content

मांगल्याचे औक्षण करूनी

ही कविता आजच इतरही संस्थळावर मी प्रकाशीत केलेली आहे. इतर ठिकाणी प्रकाशित साहित्य इथे चालणार नसेल तर संपादकांची/ संचालकांनी ही कविता काढून टाकल्यास माझी हरकत नाही.
सर्वांना दिवाळीच्या खूप सार्‍या शुभेच्छा!


मेंदी भरले पाऊल घेऊन
पहाट अवतरली..
अलगद नाजूक, धरतीवरती
चाहूल थरथरली..

जागी झाली सृष्टी सारी
ऐकून भूपाळी
निळेजांभळे क्षितिज तेव्हा
झाले सोनसळी

क्षितिजावरती डोकावुनीया
हळूच तो हसला
आळसावल्या चराचराला
सूरही गवसला

लगबग झाली दहादिशांतुन
तया पाहण्याला
ओलेत्याने सज्ज जाहल्या
जणू स्वागताला

धरतीवरती शिंपण झाले
सडा रांगोळ्यांचे
मनी मानसी दीप उजळले
नविन आशांचे

काळोखाची संपून जाईल
मुजोर बळजोरी
आकांक्षांची किरणे येतील
हसून सामोरी

नविन आशा आकांक्षांनी
भरु दे ही झोळी
मांगल्याचे औक्षण करूनी
हसेल दिवाळी..

- प्राजु

प्राजु Tue, 25/10/2011 - 22:53

हे काय?? पहिल्या चारच ओळी बोल्ड आणि रंगित झाल्या. बाकीच्या का नाही.??
संपादक, सुधारणा कराल का यात?

श्रावण मोडक Wed, 26/10/2011 - 00:09

In reply to by प्राजु

ते रंग राहू देत एक वेळ. शीर्षकात भलतेच रंग उधळले जाताहेत. ते आधी दुरूस्त करा. मंगल्याचे? मांगल्याचे वाचून घेता येते, पण डोळ्यांत खुपतंच.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 26/10/2011 - 02:09

In reply to by प्राजु

प्राजु, परिच्छेद बदलला की पुन्हा फॉरमॅटींग करावं लागतं. कवितांचं स्वसंपादन करता आलं पाहिजे; येत नसेल तर मी 'परमिशन्स'मधेबदल करते.

आडकित्ता Wed, 26/10/2011 - 00:14

मी खरंच मांगल्याचे वाचलेलं.
अन एंटर मारला की कलर जातो.. वरून कलर दिसण्यासाठी ते input format बदलावं लागतंय ते वेगळंच.

क्षिप्रा Wed, 26/10/2011 - 00:27

"काळोखाची संपून जाईल
मुजोर बळजोरी
आकांक्षांची किरणे येतील
हसून सामोरी"

छान लिहिलं आहे..
अनेक बाबतीत प्रसंगोचित आहे :)
जाता जाता: हे कडवं ऐसीअक्षरेविषयीही आहे का? म्हणजे "आकांक्षांची किरणे" ह्या संदर्भात?