Skip to main content

आभाळाच्या सागरात चांदोबाची होडी...

आभाळाच्या सागरात चांदोबाची होडी
चला बसा होडीमधे मजा करू थोडी

उसळती लाटा निळ्या
निळ्या अंधाराच्या
आदळूनी होडीवर
होतात रुप्याच्या

नजरेला येत जाते दुधाळशी गोडी
चला बसा होडीमधे मजा करू थोडी

लुकुलुकु पोहतात
मासे चांदण्यांचे
कुठे कुठे लागतात
बेटही ढगांचे

आरामात पाहा सारे करू नका खोडी
चला बसा होडीमधे मजा करू थोडी

एरवी या सागराचे
पाणी काळेभोर
चांदोबाची होडी म्हणजे
उजेडाचा मोर

होडीला या जगामधे नाही कुठे जोडी
चला बसा होडीमधे मजा करू थोडी

- ग्लोरी

गवि Thu, 08/12/2011 - 14:51

अहो.. खूप छान आहे हो..

निरागसता प्रचंड लोभस आहे. मराठी संस्थळांवर असं खूप कमी लिखाण येतं..

आणि बालकविता म्हणजे काहीतरी एकदम बाष्कळ री ला री जोडून केलेली असते बर्‍याचदा, पण तुमच्या कविता खूपच सकस आहेत.

तिरशिंगराव Thu, 08/12/2011 - 16:09

तुमच्या कवितांची
लागलीये गोडी
फिरुन व्हावे सान
अन मज्जा यावी थोडी||

ऋषिकेश Fri, 09/12/2011 - 10:14

हे गाणे देखील आवडले!
बालसाहित्य असा विभाग करायला लावणार तुम्ही ;)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 09/12/2011 - 10:48

गविंशी सहमत; तुमच्या बालकवितांमधली निरागसता प्रचंड लोभस आहे. या कवितेलाही लय आहे.

पण मला पहिली कविताच सगळ्यात जास्त आवडली. कारण त्यात नवीन जमान्यातल्या गोष्टीचा, फोनचा उल्लेख आहे.

मी Fri, 09/12/2011 - 12:32

आभाळाच्या सागरात चांदोबाची होडी
चला बसा होडीमधे मजा करू थोडी

ड्रीमवर्क्स चा फिशींग रॉड घेउन चांदोबावर बसलेला मुलगा अठवला ! :) ते पहिलं चित्र फारच मनमोहक आहे, तशीच ही कविता.

राजेश घासकडवी Fri, 09/12/2011 - 16:36

लहान मुलांसाठी असली तरी साध्या शब्दांत आकाशाच्या समुद्राचं चित्र उभं केलेलं आहे. लुकूलुकू पोहणारे चांदण्याचे मासे, ढगांची बेटं वगैरे खूप आवडलं.

धनंजय Fri, 09/12/2011 - 23:46

छान.

खरे सांगायचे तर उंदराच्या फोनच्या गाण्याइतके आवडले नाही. त्या मानाने हे थोडेसे कृत्रिम वाटले. पण छानच आहे.

अतृप्त आत्मा Sun, 11/12/2011 - 11:32

कल्पना+शब्द+आशय+लय+ठेका+चांगली कविता=ग्लोरी

ग्लोरियस :-)
ग्लोरियस :-)
ग्लोरियस :-)
ग्लोरियस :-)
ग्लोरियस :-)
ग्लोरियस :-)
ग्लोरियस :-)