Skip to main content

एक लेखक - एक वाचक!

आमच्या ‘वाचकघर’च्या एका मिटींगचा विषय होता -- ‘माझा आवडता पुरूष लेखक’. त्यानिमित्ताने मिलिंद बोकीलांच्या सर्व पुस्तकांचे एकत्रित वाचन अन अभ्यासच झाला तेव्हा!
सुरूवातीला ‘दुर्ग’, ‘एकम’ ह्या दिवाळी अंकांतील मिलिंद बोकीलांच्या कलाकृतींतून त्यांची ओळख झाली. ते लिखाण आवडले अन मग झपाटल्यासारखी त्यांची इतर पुस्तके वाचली गेली.‘शाळा’ तेव्हा नुकतीच प्रकाशित झाली होती. अन ती वाचावी की नाही, आपल्याला ती कितपत रुचेल अशा संभ्रमात होते.

कसं असतं, आपल्या मन:स्थितीवर आपलं वाचन आणि त्यानुसार इतरांचं लेखन आपल्या मनाला भिडणं अवलंबून असतं. हा अनुभव वारंवार घेतल्याने ‘शाळा’करी जीवनात पुन:प्रवेश नकोसा वाटत होता.
पुस्तकांच्या साथीने स्वत:ला उलगडत जगण्याच्या त्या दिवसांत स्त्री-विषयक लिखाण जास्त आवडत असे. ‘लेखक कोण’ ह्याने काही फरक पडण्याचे दिवस नव्हते ते! ‘घरपोच वाचनालय’ अन ‘दरमहा वाचकघर’ ह्यामुळे वाचनात सातत्य होते. मनात येईल तेव्हा, हवे ते मिळत राहिले, मी वाचत राहिले.

दृश्यमय वर्णनशैली, अंतर्मने उलगडण्याची प्रक्रिया, पात्रांचे माणूसपण दाखवणारे गुणविशेष, त्यांची मानसिक आंदोलने अन त्याला समांतर वातावरण असणे ही मिलिंद बोकीलांच्या लिखाणाची मला जाणवलेली वैशिष्ट्ये. तसेच, स्वतंत्र विचारांच्या स्त्री-व्यक्तिरेखा हेही!कोणत्याही व्यवसाय-नोकरीतील असो, सुशिक्षित-अशिक्षित असो, शहर-खेड्यातील असो, स्वदेश-परदेशातील असो...
स्त्रियांचं भावविश्व अन तिचं असणं सगळीकडे सारखंच ! तिच्या मनाला जे वाटतं-पटतं तेच ती करते. ती पुरूषांपेक्षाही जास्त विचारी, खंबीर, समजूतदार असते. वेळप्रसंगी पुरूषांनाच तिचा आधार घ्यावा लागतो. तीदेखील त्यांना सांभाळून घेते, उघडं पाडत नाही.
‘साथिन’ - रेवती, ‘अधिष्ठान’ - गायत्री, ‘आभास’ - सिस्टर तेरेझिया, ‘ओझं’ - यशोदा, ‘झेन गार्डन’ - कल्याणी, ‘उदकाचिया आर्ती’ - रोहिणी...
काही कथा स्त्री-प्रधान नसूनही स्त्रियांच्या मानसिकतेचे अस्तर लावलेल्या. समजूतदार, हुशार, स्वतंत्र विचारांच्या, कणखर असलेल्या.
‘निरोप’ - अंजी, ‘भावी इतिहास’ - सुमा, ‘चक्रव्यूह’ - प्रतिमा, ‘लेमन ट्री’ - सुजाता....(‘निरोप’ मधील ‘अंजी’ वाचताना ‘मंथन’ चित्रपटातील ‘म्हारे घर आना, ना ना भूलो ना...’ असं मनातल्या मनातच म्हणणारी स्मिता पाटील डोळ्यांसमोर उभी राहिली.

त्यानंतर ‘लोकसत्ता - पुस्तकांचे पान’साठी पुस्तक परिचय (परीक्षण हा भारी भारदस्त शब्द आहे!) लिहिण्याच्या निमित्ताने ‘एकम’ पुन्हा एकदा नव्याने आणि ‘समुद्र’ पुन्हा-पुन्हा वाचली गेली. ‘एकम’ची नायिका ‘आगळ्या-वेगळ्या’ विचारांची देवकी आणि ‘समुद्र’ ची ‘एकात सामावलेल्या अनेकांना बघणारी’ नंदिनी... ह्यादेखील बोकीलांनी चितारलेल्या स्त्रीत्वात चपखल बसणार्‍या!

‘साथिन’ मधील रेवतीने मनोधैर्य गोळा केल्यानंतर नवर्‍याजवळ आपलं मन मोकळं केलं असतं तर काय बरं घडलं असतं? वारंवार मनात येत राहणारा हा प्रश्न ! त्याचं उत्तरच जणू ‘समुद्र’ च्या वाचनाने मिळालं.एकाच बीजाचं असं निरनिराळ्या कोनांतून झालेलं दर्शन...
‘साथिन’ लेखकाने वयाच्या पंचवीस-तीशीत लिहिलेली अन ‘समुद्र’ पन्नाशीच्या उंबरठ्यावर लिहिलेली. एकाच व्यक्तीने, वेगवेगळ्या टप्प्यावर लिहिलेल्या, समान सूत्रावर आधारलेल्या दोन वेगवेगळ्या कथा.... कुटुंबसंस्था-विवाहसंस्था हा भरभक्कम पाया असणार्‍या खास भारतीय अन पुरूषप्रधान समाजातील स्त्री-पुरूष विवाहबाह्य संबंधांकडे कशा नजरेने बघतात? ह्या पायावर स्वत:ला कसं जोखतात?
‘दुर्ग’ची सुचेता आणि ‘रण’ची नमिता ह्या तर लग्नबंधनात न अडकण्याचा निर्णय घेतलेल्या. स्वत:च्या आई-वडीलांच्या अनुभवांतून तावून-सुलाखून निघाल्याने स्वयंसिध्द झालेल्या दोघीजणी!‘बायकांच्या मनात काय चाललेलं असतं काही कळत नाही’ असं ‘समुद्र’ मध्ये लिहिणार्‍या ह्या लेखकाला ‘बाई’चं मन इतकं कसं काय कळतं?
‘समुद्र’चा नायक भास्कर वाचताना जाणवलं, पुरूषांच्या अंतरंगातही लेखक डोकावतोच की ! मग ह्याच नजरेने ‘निरोप’, ‘भावी इतिहास’, ‘चक्रव्यूह’, ‘लेमन ट्री’, ‘विदेश’, ‘दुपार’ मधील समस्त पुरूष-व्यक्तिरेखा आठवू लागल्या....
(‘चक्रव्यूह’ मधील कलेक्टरने कोणता निर्णय घेतला असेल हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे !)

थोडक्यात, स्त्री-पुरूष असा भेद न मानता, ‘माणूस’ म्हणून रेखाटलेल्या सगळ्या व्यक्तिरेखा. त्यांचं आपसांतील संबंधांचं हळवेपण, नाजूक-चिवट बंध, एकमेकांना समजून घेत जगणं.... माझ्यासारख्या वाचकाच्या मनात खोलवर झिरपत राहणारं !
कलाकृतीच्या माध्यमातून वास्तव जीवनाला सर्वांसमोर आणणारा लेखक... मिलिंद बोकील!

ही ओळख मनात पक्की झाली अन वाचलं गेलं....
‘समुद्रापारचे समाज’!
बैरॉईट, फिलिपीन्स, अ‍ॅमस्टरडॅम, थायलंड, जपान, कोस्टारिका, झिम्बाब्वे अशा देशांतून ‘सामाजिक कार्यकर्त्यां’साठी मुद्दाम आयोजित केलेल्या बैठकांच्या अन कार्यशाळांच्या निमित्ताने तसेच आदिवासी समाज, जपानमधील दलित समाज ह्यांच्या अभ्यासासाठी मिलिंद बोकीलांनी जो डोळस प्रवास केला त्याविषयी लिहिलेले लेख.. प्रवासवर्णने नव्हेतच ही!‘माणसाने हे विश्वचि माझे घर असं मानून, माणूस म्हणून, माणुसकीचा ओलावा जपून स्वत: जगावं अन इतरांनाही जगू द्यावं..’ निव्वळ ह्याच अंत:प्रेरणेतून लिहिलेले हे लेख!‘कातकरी -
विकास की विस्थापन?’ हेदेखील एक वाचनीय पुस्तक!

एवढं सारं वाचल्यानंतर ‘शाळा’ चे वाचनही ‘must'च झाले जणू! पौगंडावस्थेतील मुलग्यांच्या भावजीवनाशी परिचय घडवून देणारी आणि शेवटाने उदास-आनंद देणारी ही कादंबरी!

अलिकडेच, दिवाळी अंकांतील ‘महेश्वर’ वाचली, ‘मेंढा’ गावाला फेरफटका मारला. ‘गोष्ट मेंढा गावची’ अन ‘गवत्या’ बाकी आहे अजून !

बघू या, कधी वाचून होतेय .....

चित्रा - ०७.०७.२०१३

समीक्षेचा विषय निवडा

राजेश घासकडवी Sun, 16/02/2014 - 11:19

एका लेखकाच्या आवडलेल्या लिखाणाचा आढावा घेणारा लेख आवडला. मी स्वतः बोकिलांचं शाळा सोडल्यास इतर काही वाचलेलं नाही. शाळा खूप आवडली होती. इतर पुस्तकांबाबत

बघू या, कधी वाचून होतेय .....

असंच म्हणतो.

गवि Tue, 18/02/2014 - 11:12

बोकीलांनी दिवाळी २०१३ मधे एका अंकात फार म्हणजे फार सुंदर कथा लिहीली आहे.

एका धनगरी वस्तीवर पिसाळलेल्या कुत्र्यांना विष घालण्याच्या कामावर पशुवैद्य आणि टीमला प्रोटेक्शन देण्यासाठी गेलेल्या पोलीसाच्या नजरेतून लिहीलेली कथा. भयंकर वेगळ्या प्रकारच्या वातावरणात असते प्रत्येक कथा.

नाव आणि अंक दोन्ही ध्यानात नाहीत, पण कथा भयंकर अस्वस्थ करणारी आहे. हा मनुष्य कथा सांगण्याच्या बाबतीत बाप मनुष्य आहे.

काही कथांमधे थोडं खेचत राहिल्यासारखं आवर्तन होत राहतं.. उदा, समुद्र, .. आणखी एक गडकिल्ला चढत असण्याविषयीची कथा (नाव विसरलो.) त्याचा क्वचित किंचित कंटाळा येऊ शकतो. पण तोही त्यांचा एक प्रयोग असावा.. किंवा ती कथा त्या पुन्हापुन्हा फिरणार्‍या विचार आणि एकसारख्या पॅटर्नच्या घटनांशिवाय अपूर्ण राहात असावी.

अर्थात सर्वच कथांचं तसं नाही.

बाकी "उदकाचिया आर्ती", किंवा "जनाचे अनुभव पुसता" किंवा "समुद्रापारचे समाज" सारख्या सामाजिक रिपोर्टिंगमधे हाच तो कथाकार मनुष्य असे कितीही जीव तोडून सांगितले तरी पटत नाही. तिथे ते पूर्ण वेगळी व्यक्ती असतात.

मेघना भुस्कुटे Tue, 18/02/2014 - 11:24

In reply to by गवि

आणखी एक गडकिल्ला चढत असण्याविषयीची कथा - दुर्ग (दुर्ग आणि रण या संग्रहातली) का? मलाही त्या कथा त्याच त्या बोकील छापाच्या वाटल्या.

बादवे - आणखी एक कबुली. मला 'शाळा' आवडत नाही. म्हणजे मराठीत वेगळी आहे वगैरे ठीक आहे. पण तिचं जितकं कौतुक झालं, तितकी काय ती आवडायला नाही. बोकीलांनी त्यात सगळं काही थोडथोडं घालून (थोडा 'वनवास'प्रकारचा पौंगडवयीन शॄंगार, थोडी मवाली भाषा, थोडं सेक्सबद्दलचं त्या वयातल्या मुलांचं आकर्षण, प्रचंड भाबडेपणा) तिचा काला करून ठेवला आहे, असं मध्यंतरी परत वाचताना वाटलं. अर्थात - या मताला प्रचंड विरोध असणार, हे मला माहीत आहे.

ऋषिकेश Tue, 18/02/2014 - 11:30

In reply to by मेघना भुस्कुटे

(थोडा 'वनवास'प्रकारचा पौंगडवयीन शॄंगार, थोडी मवाली भाषा, थोडं सेक्सबद्दलचं त्या वयातल्या मुलांचं आकर्षण, प्रचंड भाबडेपणा) तिचा काला करून ठेवला आहे, असं मध्यंतरी परत वाचताना वाटलं

यात आक्षेप नक्की कशाला आहे?
प्रत्यक्षात असं नसतं असें वाटतंय का जास्तच वास्तवदर्शी आहे असा आक्षेप आहे? की याची मोहक वगैरे वीण न करता काला झाला असे म्हणायचे आहे.

गवि Tue, 18/02/2014 - 11:33

In reply to by मेघना भुस्कुटे

त्यात सगळं काही थोडथोडं घालून (थोडा 'वनवास'प्रकारचा पौंगडवयीन शॄंगार, थोडी मवाली भाषा, थोडं सेक्सबद्दलचं त्या वयातल्या मुलांचं आकर्षण, प्रचंड भाबडेपणा) तिचा काला करून ठेवला आहे,

असं (फक्त इनग्रेडिएंट्सची नावं बदलून) कोणत्याही दीर्घकथा / कादंबरीविषयी म्हणता येईल... रामायण महाभारतापासून आजच्या नवीनतम रचनांपर्यंत.

काला म्हणायचं की चटकदार भेळ की निरनिराळ्या जायकेदार थरांची बिर्याणी हे कसं ठरवावं..?

जर असे मिच्चर नसेल तर आपण सपक किंवा सपाट म्हणतो..

इत्यादि.

मेघना भुस्कुटे Tue, 18/02/2014 - 12:33

In reply to by गवि

याची मोहक वगैरे वीण न करता काला झाला.

हं. नि हे माझं मत आहे. आणि जीव गेला तरी माझ्याकडून महाभारत नि शाळा यांची तुलना होऊ शकत नाही.

ऋषिकेश Tue, 18/02/2014 - 13:09

In reply to by मेघना भुस्कुटे

अर्थातच मोहव वगैरे वीण नाहीये हे मान्यय. पण तरीही एकूण प्रोडक्त मला वेधक वाटते.
एखाद्या गोधडीसारखी ठिगळे जोडलेली कथा आहे पण तरी एकसंधता हरवलेली नाहीये की आस्वादात उणेपणा देत नाही. तु म्हणतेस तसा व्यक्तीसापेक्ष आवडता "पोत" नसण्यापुरतीच टिका असेल तर ती स्वीकार्ह आहे
(छ्या! आता वादही घालायचा कसा म्हणा, मुळात असे हे काही घडतच नाही वगैरे म्हणाली असतीस तर जरा मजा आली असती ;) )

गवि Tue, 18/02/2014 - 13:16

In reply to by ऋषिकेश

आधी असं जनरल मत होतं की मनुष्य जितकं जास्तजास्त वाचतो तितका त्याला वाचनाचा "टॉलरन्स" येतो (तितक्याच इफेक्टसाठी जास्त द्रव्य सेवन करावे लागणे-- याप्रमाणे.. मात्र इथे द्रव्याची क्वांटिटी नसून वेगळेपणा हे युनिट मानावे..)

यामुळे मनुष्य चोखंदळपणाकडून हळूहळू अँटि-पॉप्युलर प्रकारचा छिद्रान्वेष करु लागतो.

हे वाचनाबाबतच नाही तर सिनेमांबाबतही होतं.

वपु, चेतन भगत इत्यादिंच्या जोडीला बोकीलही "मिडिऑकर" मधे जाऊन बसायला वेळ लागत नाही.

पण आता हे पाहून असंही वाटतंय की,

(उदा. या मुलीचे) इतके वाचून झाल्यावरही मोहक विणीची आवड आणि आग्रह कसा टिकला याचे आश्चर्य वाटते आहे.

अवांतरः मी एका अत्यंत प्रसिद्ध साहित्यविषयक ज्येष्ठ व्यक्तीला कोणाच्यातरी ठीकठाक कथेला "खोली आहे पण टोक येत नाहीये.." आणि इतर कोणाला "उंची आहे पण खोली नाही" इत्यादि सांगताना ऐकले आहे.
;)

मेघना भुस्कुटे Tue, 18/02/2014 - 15:03

In reply to by ऋषिकेश

जसजसं अधिक वाचावं, तसा टॉलरन्स वाढत जातो असं मला अजिबात वाटत नाही. थोडा बनचुकेपणा येण्याचा धोका असतो. पण त्या बदल्यात बरंच ट्रॅश जे एरवी तुडवूनच पुढे जावं लागलं असतं, ते वाचण्यातून सुटकाही होते. या एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत. बाकी टॉलरन्समध्ये जे काही बदलतं, त्याला छिद्रान्वेष म्हणावं का? काय की. मला वाटतं, ते पाहणार्‍याच्या दृष्टिकोनावर आणि गरजेवर अवलंबून आहे.

'शाळा' वेगळं पुस्तक आहे? काही लोकांसाठी काही काळ असेल. माझ्याकरता नाही. मला आता बोकीलांची शैली अत्यंत प्रेडिक्टेबल आणि सरधोपट वाटते. विशेषकरून 'शाळा'मधून ते मला सुखद अपेक्षाभंग - मनोरंजन - नवीन दृष्टिकोन यांतलं काहीच देऊ शकत नाहीत. त्यामुळे ते पुस्तक मला ओव्हररेटेड वाटतं.

गवि Tue, 18/02/2014 - 15:14

In reply to by मेघना भुस्कुटे

आता एक मूलभूतच प्रश्न विचारावासा वाटतो. हा केवळ वाचनालाच लागू नाही.. सर्वत्रच आहे.

प्रेडिक्टेबल नसणारे लोक रंजक असतात हे मान्य.

पण प्रेडिक्टेबल असणं हा इन इटसेल्फ दोष आहे असं म्हणायचं का?

श्रीकृष्ण बटाटवड्याची चव एके फाईन दिवशी धक्का देण्यासाठी तुरट बनली किंवा आजीची चकली नेहमीच्या प्रेडिक्टेबल खुसखुशीतपणाऐवजी कडकच झाली तरच त्या वड्यात अन चकलीत जास्त मजा टिकून राहते का?

हे दुरित बदल सोडा... अनेक इतरही बाबतीत कन्सिस्टंट आणि प्रेडिक्टेड डिलिव्हरी मिळणे याला आपण पॉझिटिव्ह गुण देत असतो. नात्यातही स्थैर्य पाहायला जातो.

मग अनप्रेडिक्टेबल असणं यात अधिक पॉईंट्स का मिळावेत? प्रेडिक्टेबल असण्याला स्पेशालिटी का म्हणू नये? सतत अनप्रेडिक्टेबल असणे हेही प्रेडिक्टेबल होत जातं याचा विचार केला आहे का?

खाद्यपदार्थांची उपमा अनेक वाचनप्रेमींना आवडणार नाही, पण एका सेन्सबाबत दुसर्‍या सेन्सचं उदाहरण इतपतच मर्यादित अर्थ त्याचा घ्यावा.

शिवाय वाचकांना बदल मिळावा म्हणून अनप्रेडिक्टेबिलिटी आणणे या यत्नांत लेखकाने मूळ इन्स्टिंक्टिव्ह लिखाण सोडून बदलत राहणं म्हणजे वाचकांचे लांगूलचालन असेही एकीकडे लोक म्हणतात.

मेघना भुस्कुटे Tue, 18/02/2014 - 15:24

In reply to by गवि

प्रकार १ - आम्हांला पुलंचा विनोद, त्यातला घरगुतीपणा, ऊब, निर्विषपणा, मध्यमवर्गीय जाणिवा, स्मरणरंजन... हे सगळं आवडतं. आम्हांला पुन्हा पुन्हा तेच ते आणि तितकंच वाचायचं आहे. आमच्या गरजा भागतात. धन्यवाद

प्रकार २ - आम्हांलाही हे सगळं आवडतं / नाही फारसं आवडत. (पण आता) त्यातल्या तोचतोचपणाचा कंटाळा येतो. याहून वेगळ्या प्रकारच्या जाणिवा हव्या आहेत.

वाचक दोन्ही प्रकारचे असू शकतात, किंवा एकच वाचक दोन निरनिराळ्या वेळांना वेगवेगळ्या प्रकारात मोडू शकतो. उघड आहे, पहिल्या प्रकारासाठी प्रेडिक्टिबिलिटी हा गुण आहे, दुसर्‍या प्रकारासाठी दोष.

मी मघापासून हे माझं मत आहे, असं घोकतेय. शिवाय मी काही समीक्षक नाही. माझ्या मतामुळे कोणत्याही लेखकाच्या दर्जाबद्दल निर्णयन होत नाही. तरी 'तुमचं मत म्हणजे छिद्रान्वेष', 'तुमचं मत म्हणजे उच्चभ्रू नखरे' असं का बरं ठरवू पाहताय? माझ्या वाचनाच्या अनुभवानुसार, माझ्या आयुष्यातल्या अनुभवांनुसार, माझ्या आवाक्यानुसार माझं आकलन तुमच्याहून निराळं असू शकतं की नाही?

गवि Tue, 18/02/2014 - 15:29

In reply to by मेघना भुस्कुटे

मी मघापासून हे माझं मत आहे, असं घोकतेय. शिवाय मी काही समीक्षक नाही. माझ्या मतामुळे कोणत्याही लेखकाच्या दर्जाबद्दल निर्णयन होत नाही. तरी 'तुमचं मत म्हणजे छिद्रान्वेष', 'तुमचं मत म्हणजे उच्चभ्रू नखरे' असं का बरं ठरवू पाहताय?

मीही माझं मत, रादर माझे प्रश्नच विचारतोय..

शिवाय माझ्यातरी मताने कुठे निर्णयन बिर्णयन होतंय..

छ्या.. हे आंतरजालावरचे "ते तर माझे वैयक्तिक मत" नावाचे जे काय सर्वदूर पसरलेले आहे ते म्हंजे धगधगत्या निखार्‍यांवर बाल्दीभर पाणी ओतणारे प्रकर्ण आहे बुवा.

तेव्हा पाच मिण्टे दीर्घश्वसन करुया कसे..!! ;)

जस्ट चिल चिल..

मेघना भुस्कुटे Tue, 18/02/2014 - 15:40

In reply to by गवि

बरं, ते मरू देत. आपापली मतंबितं. ठीक.

पण प्रेडिक्टेबिलिटी काही जणांसाठी गुण, काही जणांसाठी दोष, काही जणांसाठी कधी गुण / कधी दोष असू शकतो हे मान्य आहे का?

मेघना भुस्कुटे Tue, 18/02/2014 - 15:43

In reply to by गवि

चला! आता तुम्ही हे मान्य केलं नसतंत, तर पुढे वाद घालायचा प्रचंड कंटाळा आलेला असूनही केवळ माघार घ्यायची नाही म्हणून घालावा लागला असता. तर थ्यांक्यू!

मेघना भुस्कुटे Tue, 18/02/2014 - 15:46

In reply to by गवि

हे अतिअवांतर आहे. संपादकांनी हवे तर उडवावे वा हलवावे.

माणसाला प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्याच्याशी वाद घालतानाचा सूरच बदलतो. परवा गविंना भेटले नसते, तर हेच्च मत मी अजून कितीतरी कोरड्या - टोकदार शब्दांत मांडलं असतं. हां, आता हे बरं झालं की गैरसोईचं, त्याबद्दल मतमतांतरं संभवतात! ;-)

अनुप ढेरे Tue, 18/02/2014 - 12:19

आपल्या मन:स्थितीवर आपलं वाचन आणि त्यानुसार इतरांचं लेखन आपल्या मनाला भिडणं अवलंबून असतं.

हे वाक्य एकदम पटलं. हेच सिनेमांच्या बाबतीतही अनुभवलं आहे. एखादा सिनेमा प्रथम पहाता नाही आवडत. पण काही दिवसांनी वेगळ्या मूड मध्ये पाहिला गेला की प्रचंड आवडून जातो. नुस्तं मन:स्थिती नाही तर वयाचा पण फरक पडतो. १६-१७ वर्षाचा असताना एखादा पिक्चर खूप रटाळ वाटतो/बोर होतो, पण तोच पिक्चर ८-९ वर्षांनी पाहिल्यानंतर आवडून जातो.

आणि बोकीलांच्या पुस्तकांबाबत... फक्तं शाळा वाचलय.

बॅटमॅन Tue, 18/02/2014 - 17:55

शाळेचं न आवडणं कदाचित याही कारणामुळे असेल की ती एका मुलाच्या दृष्टिकोनातून लिहिलेली आहे. नववीतल्या पोरीचा दृष्टिकोन ठेवून लिहिली असती तर मेघनातैंना कदाचित अपील झाली असती काय ;) (शाळा न आवडल्याबद्दल आगौच निषेधवून ठेवतो ;) )

पण मुलांचा दृष्टिकोन जो कॅप्चर केलाय त्याला तोड नाही. अहद नाशिक-तहद कोल्हापूर आणि अहद मुंबै-तहद नागपूर अखिल मराठी माध्यमशिक्षित सर्वजण या वातावरणाशी नक्की रिलेट करतील. मग ती विशिष्ट शब्दसंपदा असो नैतर खुन्नस डिस्क्राईब करण्याची हातोटी- त्याचा क्लायमॅक्स होतो बुद्धिबळ स्पर्धेत बिबीकर विरुद्ध जोशी या सामन्यात. फेम इज द फ्रॅग्रन्स ऑफ हिरॉईक डीड्स आणि त्यानंतरची खुन्नस, एकट्या वजिराच्या जोरावर समोरच्याचा खातमा करणे हे सगळं सगळं इतकं इतकं अनुभवलं आहे की त्या वर्णनाच्या प्रेमात न पडणं अशक्य. साला तो सामना घ्यायला पाहिजे होता पिच्चरमध्ये असं राहून राहून वाटत होतं.

असो. मनापासून खच्चून आवडलेल्या कलाकृतीचा अ‍ॅनॅलिसिस एका लिमिटपुढे करायला आवडत नाही. म्ह. आवडला तरी एरवीसारखा सर्व हाडेलक्तरे टांगून 'हा आकृतिबंध-ही शैली-ती जाणीव' असे कोरडे विच्छेदन आवडत नाही. अर्थात, तेही इन जण्रल. पण आला मूड तर पेटवीन चूड हेही ओघाने आलेच.