Skip to main content

नेमेचि येतो. . %@#!

सकाळी दचकून जाग आली तर मी कुठे आहे ते पहिल्यांदा लक्षात येईना.
मी गादीवरुन उठून चौरंगासमोर कधी येऊन बसले, माझ्यासमोर कॉन्स्टिट्यूशनचा ठोकळा का आहे, काहीच कळेना. मी अजूनही बेडरुममध्ये झोपलेय, त्या झोपेतल्या स्वप्नात मी चौरंगासमोर अभ्यास करते आहे, आणि मग त्या स्वप्नातल्या मला कॉन्स्टिट्युशन वाचता वाचता झोप लागलिये असं वाटायला लागलं. मग स्वप्नातल्या झोपेत तरी नीट झोपूयात म्हणून पुन्हा बेडरुममध्ये जाऊन झोपले.
सकाळी जाग आली तीच आठ्या भरलेल्या कपाळाने आणि दिवसातला पहिला विचार,"बोर बोर झालंय!"

त्यानंतर काही केलं नाही..करण्यासारखं काही नव्हतंच आणि असलं असतंच तरी काही करावंसं वाटलं नसतं. डोक्यात फ़टाफ़ट विचार येत होते. कुठलाही विचार दोन सेकंदांहून जास्त वेळ टिकत नव्हता. एक तासांपूर्वी स्वच्छ आंघोळ करुनही अस्वच्छ, पारोसं वा्टत होतं. सगळ्या अंगालाच कंटाळा लागलाय असं वाटत होतं.
या कंटाळ्यातून आलेल्या डेस्परेशनपायी काल मी ’अपने दोस्तों को सुनाईये अपना मनपसंद गाना’ वाला एयरटेलचा कॉलसुद्धा मन लावून ऐकला.

पहिल्यापहिल्यांदा मला कंटाळा आलाय हे अमान्य करण्याचा मी प्रयत्न केला, नाही असं नाही.
त्यासाठी मी स्वत:लाच चॅलेंज दिलं - कंटाळ्याला किमान पाच वेगवेगळ्या भाषांमधले शब्द सांग.
दोन मिनीटं विचार करुन उत्तर आलं- उन्युई, तेदियो, नोय्या, लांगव्हिल्ह, तैकुत्सु, बोअरडम, आलस्यम. घे!
मला मल्टीलिंग्वल कंटाळ्याला फ़ाउल धरता येत नाही.त्याला सिरीयसली घ्यावंच लागतं.
येलोस्टोन नॅशनल पार्क मध्ये दर ९१ मिनीटांनी उसळणारा एक गरम पाण्याचा झरा आहे म्हणे! त्याला ’फ़ेथफ़ुल गिझर’ म्हणतात.
दर दीड-दोन महिन्यांनी उपटणारया माझ्या सिरीयसली घेतल्या जाणारया कंटाळ्यासाठी मीसुद्धा एखादं विशेषण तयार करायच्या विचारात आहे.

बघू! अभ्यास करु, जाईल कंटाळा करत गव्हर्नर जनरल्स ची यादी मनातल्या मनात म्हणून बघितली. कॅनिंग-एल्गिन-लॉरेन्स-मायो-नॉर्थब्रुक (जमतंय जमतंय)-लिटन-रिपॉन-डफ़रीन.. . . रिपॉन-डफ़रीन... . नंतरचे कर्झन-मिंटो-हार्डींग्ज-चेम्सफ़र्ड आठवतायेत पण मधले कोणतरी दोन चचलेत . .रिपॉन-डफ़रीन... .
प्च! मी नाद सोडला.
भूगोल उघडला तर ऍटलासमधले लोहमार्ग मला सुरवंटासारखे भासायला लागले आणि मी पुस्तक खाटकन मिटलं.
मग मी अभ्यास ठेवलाच.

मग काय करावं बरं म्हणत ’ढिंकटिका ढिंकटिका ढिंकटिका ढिंकटिका हेहेहेहे हेहेहेहे’ हे गाणं आपल्या कॉलरट्यूनवर लावू की नको? हो तर का हो? नाही तर का नाही? यावर सिरीयसली विचार केला
पण तो दोन मिंटातच संपला.

’नक्षत्रांचे देणे’ काढलं. वाचलं
त्यावर उतारा म्हणून माझ्या कविता वाचल्या.
त्यानंतर माझा धिक्कार कसा केला जावा याबद्दलचा मसुदा मनातल्या मनात तयार केला.त्यावर पुढील कंटाळ्याच्या वेळी अंमलबजावणी केली जावी अशी डायरीत नोंद करुन ठेवली.
गूगलवरुन कंटाळ्यावरचे कोट्स शोधून काढले. त्यात बर्ट्रांड रसेल साहेब म्हणतात,
" मनुष्यजमातीमधली अर्ध्याहून अधिक पापं ही कंटाळ्याच्या भीतीमधून केली गेलेली असतात".
आता हे खरं की काय?
असं कुठलंतरी पाप करुन मी तुरुंगात गेले तर तुरुंगात वेळ घालवण्याकरता काय करावं ह्या विचारात पुढचा अर्धा तास बरा गेला.
नंतर पुन्हा ब्लॅंक!
मी एम्पीथ्री प्लेयर कानाला लावून बसले.
पण ज्या गाण्याने मागचा कंटाळा सुरु झाला होता ते गाणंच कानात वाजायला लागल्यावर योगायोगाचं हसूही येईना.

ओरिगामीचे कागद पुढ्यात ओढून ’पीगॅसस’ करायला घेतला पण अर्ध्यावरच मी हवा गेल्यासारखी पिळपिळीत झाले आणि ड्रॉवरमधल्या पूर्ण व्हायची वाट बघत पडून असलेल्या अकशे एकुणतीस कागदी मॉडेल्समध्ये आणखी एकाची भर पडली.
धाप्पकन खुर्चीत बसले.
पॅसिफ़िकच्या किनारयावर राहणारया माझ्या मित्राने मला पॅसिफ़िकबद्दल एकही ओळ लिहून का पाठवू नये याचा विचार करायला लागले.
मग कधीतरी तो विचार संपला.
थोडावेळ गबदूलपणे बसून राहिले.
मग टी.व्ही ऑन केला. खटॅक खटॅक बटणं दाबत मी सध्याचं ’इन व्होग’ गाणं ’भाग भाग डी.के.बोस’ वाजत असलेल्या चॅनेल वर आले.
पांडासारखा एकच डोळा लालकाळा असलेल्या इम्रानला आणि त्याच्या मागच्या शिमग्यातली सोंगं काढलेल्या पंटर्सना बघून करमणूक झाली खरी पण लागोपाठ वेगवेगळ्या चॅनेल्सवर तेच तेच गाणं ऐकल्यावर ते मला ’भाग भाग डी.के.बोस डी.के.बोस डी.के.बोस डी.के.बोस’ ऐवजी’भाग भाग डी.के.’ बोस डी.के’.’बोस डी.के’.’बोस डी.के’(बोस डी.के. फ़ास्ट फ़ास्ट म्हणून पाहा) भाग’ असं ऐकू यायला लागलं.
मी वैतागून टीव्ही सुद्धा ऑफ़ केला

लोकं कंटाळा आला की डायरी लिहीतात म्हणे. मी पण लिहायचे.
पण प्रत्येक कंटाळ्यात डायरी लिहीताना पुढे केव्हातरी माझा कंटाळा डायरीत लिहीण्याला इम्यून झाला. मग मी लिहीणं सोडलं आणि डायरया वाचायचा सपाटा लावला. मग यथावकाश मला डायरया वाचायचाही कंटाळा आला.
मी डायरी उघडली. गेले दोन आठवडे ’असह्य डोकेदुखी’शिवाय नोंद नाहीये.
आता अचानक भूकंप होऊन मी डायरीसकट गाडले गेले तर शंभर शतकांनंतर झालेल्या उत्खननामध्ये सापडलेल्या माझ्या या डायरीमधून सद्य समाजाच्या सांस्कृतिक, ऐहिक, धार्मिक, आर्थिक परिस्थितीची कल्पना येऊ शकेल काय? त्याची कल्पना येण्यासाठी माझी डायरी महत्वाचा दस्तावेज ठरु शकेल काय? माझ्या डायरीत असलेल्या-
’चालायला लागलो की कुठेतरी पोहोचतोच आपण’,
’आयुष्य ही एक ओव्हररेटेड संकल्पना आहे’,
’हा एक प्रश्न आपल्या पोटात हजार प्रश्नांना वाढवतो’,
आणखीही काही हॉरीफ़िक नोंदींशिवाय टु-जी स्पेक्ट्रम, वंगारी मथाई, पाणीपुरीवाले याबद्दल लिहायला हवं अशी मेंटल नोट करुन ठेवली.

फ़ोन वाजला.
गळ्याला पटटा लावणारया, मास्टर ऊग्वे सारख्या दिसणारया (संदर्भासाठी पहा: कुंग फ़ू पॅंडा) माझ्या दूरच्या आजोंबाचा कॉल होता. माझ्याशी लग्न करायला उत्सुक किमान पंध्रा शाह्याण्णव कुळी मराठा मुलांची नावं निर्विकार चेहरयाने ऐकली. त्या पाच मिनीटांच्या कॉलमध्ये मी शेकडो मूगाची पोती गिळली आणि ’रॉंग नंबर’ बोलून फ़ोन ठेवून दिला. परत फ़ोन नाही आला. आता बहुधा कधीच येणार नाही.
पाणी प्यायला किचनमध्ये गेले. तीनदा पाणी ओतलं, तीनदाही प्यायले नाही तरीसुद्धा पुढच्या वेळी पाणी ओतताना ग्लास रिकामा बघून खूप चक्रावले आणि नंतर भ्याले.

फ़ोनची डायरी उघडली. डो्ळे मिटून चार नंबंरांवर बोट ठेवलं, कॉल लावले.
मस्त चाललं होतं त्यांचं.
एक जण गर्लफ़्रेंडबरोबर कॅफ़े कॉफ़ी डे मध्ये खिसा खाली करायला गेला होता. दुसरीला काहीतरी छान सुचलेलं लिहून काढत होती, उरलेले दोघं झोपले होते. मी अशी कंटाळ्यात लडबडलेली असताना ते तिथे आनंदात आहेत बघून तुफ़ान चीडचीड केली आणि भैरवीला "आय ऍम अ बिच! यू नो द्यॅट, डोण्ट यू!’ हे भरतवाक्य टाकलं आणि फ़ोन ठेवून दिला. त्यांच्यापैकी एकानेतरी उलटून मला फ़ोन करावा, ताडताड बोलावं असं वाटत होतं पण
नंतर कोणाचाही कॉल आला नाही.

एकदोघांना टुकार एसेमेस पाठवले. त्या टुकार एसेमेसवरच्या त्यांच्या स्मायलींचे पीक घेतल्यासारख्या वाटणारया त्याहूनही टुकार प्रतिक्रिया वाचून मी कपाळ बडवून घेतलं.

हातात ऍपी फ़िजची बॉटल घेऊन घळाघळा रडत सेलिन डियॉनचं ’ऑल बाय मायसेल्फ़’ गायले. रडण्याचा भर ओसरल्यावर किमान चार लाईक्स मिळतील असे कोणते स्टेटस फ़ेसबुकवर टाकावे याचा विचार केला. त्यात पाच मिनीटं जरा बरी गेली. माझे ’रिलेशनशिप स्टेटस ’ सिंगल वरुन 'कमिटेड' वर बदलणार एव्हढ्यात चार थेंब पाऊस आल्याने लाईट्स गेले.

भर पावसात गाडी काढली, किल्ल्यात भटकायला गेले. किल्ल्यात एकटीच भटकताना सिगरेटी फ़ुंकणारया पोरांच्या टोळक्याने आपल्याला कॉर्नर केलं तर कुठली किक एकाच वेळी दोघांना लोळवेल याचा भराभर विचार सुरु केला. त्याचवेळी खच्चून ओरडता यावे म्हणून घसा साफ़ केला, पण ह्या! पाण्याला घोडा बिचकतो तसे एकट्या फ़िरायला येणारया पोरीला पाहून ती पोरं बिचकली आणि भलतीकडेच दूर निघून गेली.
मग मी तटावर बसून अथर्वशीर्ष म्हटलं. माझ्या आवाजाचाच कंटाळा आल्यावर थांबवलं.

अशा बालिश-किनरया आवाजाऐवजी जरा घोगरा-सेक्सी आवाज असता तर बरं असं वाटत राहिलं. माझ्यात आता आहे त्याऐवजी काय असतं तर बरं या विचारात अर्धा तास खरंच बरा गेला.
उद्यापासून कंपलसरी सलवार कमीज घालायचे आणि केस कमरेपर्यंत वाढवायचे असा निश्चय करुन मी तट उतरले.
कंटाळलेल्या लोकांमध्ये दोन प्रकार असतात.
१. कंटाळा का येतो हे माहीत असलेले
२.कंटाळा कशाचा आलाय हे नेमकेपणाने माहीत असलेले
मी दुसरया वर्गात मोडते. मला तोचतोचपणाचा कंटाळा आहे.
दोन चार जागी कडमडुन-दीड लिटर पेट्रोल जाळून घरी परतताना तोचतो रस्ता घ्यायचाही कंटाळा आला.मग चुकीचा रस्त्याने घरी यायचा प्रयत्न केला. येताना मेडीकल स्टोअरमधून ’बजाज आलमंड ड्रॉप्स केश तेल ’ घेतलं.
पावसात ’इटर्नल सनशाईन ऑफ़ द स्पॉटलेस माइंड’ सारखं मन लख्ख बिख्ख होइल असं वाटलं होतं पण तसं काही झालं नाही. बहुधा त्यातलं ’Everybody gotta learn sometime' एव्हढंच बेथला मला शिकवायचं असावं. मघाच्या भयानक कंटाळ्यातही किल्ल्याच्या तटावरुन समुद्रात उडी टाकून जी्व-बीव देऊन कोस्ट्गार्डच्या पाठी नस्तं लफ़डं लावलं नाही ह्या देशाप्रती दाखवलेल्या जबाबदारीबद्दल स्वत:ची पाठ थोपटली.

एक २० रुपयाचं पूर्ण कुरकुरे खाल्लं, पापड तळुन खाल्ले, रम केक खाल्ला, लिम्का प्यायले. मग अचानक लक्षात आल्यासारखं घटाघट पा्णी प्यायले. आज दोन-चार पिंपल्स नक्की उगवणार.

मग मी उगीच आजूबाजूला बघितलं, खांदे उचकले, आरशात पाहून तोंड वेडंवाकडं केलं. त्यानेही माझ्याकडे बघून खांदे उचकल्यावर आरशाला नाक लावून "हे काय होतंय मला?" हे वरुन त्यालाच विचारलं. त्याच्याकडून काहीच उत्तर आलं नाही.
मग काही करण्यासारखं उरलंच नाही.
गादीवर पडले अन पडल्या पडल्या झोप लागली.
.
.
आज मी खूपच बरी आहे.
पण आज-उद्या धौलपूर हाऊस मध्ये इंटरव्ह्यू ला ’कंटाळ्या’वर पाच मिनीटं बोलायला सांगीतली तर यातलं किती आणि काय काय बोलू शकेन हे मात्र सांगता येत नाहीये अजून.

**

वरचं सगळं एका पत्रात लिहून काढलं. मग ते कोणाला पाठवण्यात अर्थ नाही असं वाटून कालची तारीख घालून फ़ाईलला लावून ठेवलं.
लिहीलेल्या पण कधीच कुणालाच न पाठवलेल्या पत्रांची संख्या आता झाली २३.
Rungli Rungliot!

............सा… Wed, 22/02/2012 - 02:55

>> अशा बालिश-किनरया आवाजाऐवजी जरा घोगरा-सेक्सी आवाज असता तर बरं असं वाटत राहिलं. >> =)) =)) आई शप्पत माझ्यासारखा विचार बर्‍याच मुली करतात तर ;)

लेख वाचून धम्माल करमणूक झाली.

खवचट खान Wed, 22/02/2012 - 00:02

मालक लवकर -या ल्याह्यची सोय करून द्या पाहू! 'डायरया वाचला' वाचून नुकताच गिळलेला लंच कीबोर्डवर सांडतो की काय असं वाटून गेलं.

लेख वाचून कंटाळा आला. हे या लेखाचे यश आहे असे वाटते.

राजन बापट Wed, 22/02/2012 - 00:13

रोचक लेख. ब्लॉग एंट्रीसारखा वाटला.

लेखकाने वर्ण्यविषयाला वाचकांपर्यंत अत्यंत यशस्वीरीत्या प्रोजेक्ट केलेले आहे असा सन्मानपर अभिप्राय नोंदवणार होतो .... :) (कृपया हलकेच घ्या !)

मणिकर्णिका Wed, 22/02/2012 - 00:18

In reply to by राजन बापट

मु.सु, लेखाचं जॉनर 'मौजमजा' आहे, आणि मौजमजाचा काँटेक्स्ट कळतो की मला राव. नखरे करायला ते 'ललित'मध्ये थोडीचेय?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 22/02/2012 - 05:49

कंटाळ्याबद्दल केलेलं रंजक लिखाण आवडलं.

काही वर्षांपूर्वी अधूनमधून तरीही नियमितपणे येणार्‍या कंटाळ्याची आठवण झाली. अगदी आपली सगळी गुपितंही ज्या मित्रांबरोबर शेअर करावीत त्या मित्रांचे चेहेरेही रोजच्या रोज बघायचा कंटाळा यायचा. मग भर थंडीत, रिपरिप पावसात सगळीकडे मरगळ पसरलेली असताना आम्ही काही लोकं जीवाचं मँचेस्टर करायचो. ही नशा काही महिने पुरायची.
पुढेपुढे ही नशाही कमी पडायची म्हणून का काय, ऑनलाईन खरेदी, घरातल्या घरात स्काईप वापरून एकमेकांशी बोलणं, सगळ्यांनी कारच्या टपावर बसून गप्पा मारणं, खिडकीतून स्वतःच्या किंवा इतरांच्या खोलीत शिरणं, सायकलच्या हँडलवर बसून सायकल चालवणं, कपड्यांच्या दुकानांच्या कॅटलॉगवर चित्रकारी करणं, सडके किंवा चांगले टोमॅटो किंवा अंडी घराच्या छपरावर मारणे असे lame प्रकार करून झाले. शेवटी विद्यापीठ आणि सुपरवायझर्सना आमची दया आली. त्यांनी आम्हाला पदव्या दिल्या आणि आमची त्या सुंदर, मनमोहक, सुबक, निसर्गरम्य, शांत आणि रम्य खेड्यातून आमची सर्वांची बोळवण झाली.
आता कधी मांडी ठोकून जमिनीवर बसल्यानंतर बूड हलवून एखादी गोष्ट आणायचा आळस आला तरी चुकूनही त्याला कंटाळा आला असं म्हणत नाही.

थोडक्यात, कंटाळा आला असेल तर गुड लक.

मणिकर्णिका Wed, 22/02/2012 - 19:27

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कोपरापासून गं बाई.
मी कंटाळ्याचा सामूहिक समाचार नाही घेतलाय अद्याप. माझ्या कंटाळ्यात मी बहुतेक्करुन मिसळत नाही दुसर्यांच्यात ना दुसरे त्यांचा कंटाळा शेअर करत. माझा कंटाळा म्हनजे घरापासून बेकरीत जायला किती पावलं लागतात हे मोजणं, पाढे उलटे बोलून बघणं, आईच्या एका रडक्या सिरीयलमध्ये नेमकी किती गाणी ऐकून होतात ते बघणं वगैरे वगैरे. एकदम सोलो.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 23/02/2012 - 03:31

In reply to by मणिकर्णिका

समविचारी लोकांबरोबर पण माणसाबाहेर रहावं लागलं की असं होतं. त्या तीन वर्षांच्या पुढची पायरी म्हणजे अंटार्क्टीका आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. सुरूवातीचे काही महिने वगळता निदान आम्हाला इंटरनेटतरी होतं! वर्षानुवर्ष तिथे लोकं त्याशिवाय कसे रहायचे कोण जाणे!

राजेश घासकडवी Wed, 22/02/2012 - 06:32

तरल विनोद. शाम मनोहरी शैलीत केलेलं वर्णन छान जमलं आहे.

पॅसिफ़िकच्या किनारयावर राहणारया माझ्या मित्राने मला पॅसिफ़िकबद्दल एकही ओळ लिहून का पाठवू नये याचा विचार करायला लागले.
मग कधीतरी तो विचार संपला.

या पाच मिनीटांच्या कॉलमध्ये मी शेकडो मूगाची पोती गिळली

किल्ल्यात एकटीच भटकताना सिगरेटी फ़ुंकणारया पोरांच्या टोळक्याने आपल्याला कॉर्नर केलं तर कुठली किक एकाच वेळी दोघांना लोळवेल याचा भराभर विचार सुरु केला.

वगैरे अनेक टंग इन चीक विनोदी वाक्यं पुन्हा पुन्हा वाचण्यासारखी.

सकाळी जाग आली तीच आठ्या भरलेल्या कपाळाने आणि दिवसातला पहिला विचार,"बोर बोर झालंय!"

ही भावना फार लोकांना नीट समजत नाही. मला वाटतं बहुतेक जण खूप शिस्तबद्ध असतात. त्यांना हा कंटाळा झटकून वगैरे देता येतो. आणि जीवनोपयोगी, आवश्यक कामं करता येतात. ते तिसऱ्या प्रकारचे लोक असतात.

३. कंटाळ्यात फार रस न घेता त्याच्याकडे दुर्लक्ष करणारे.

शिवाय चौथी कॅटेगरीही असतेच.

४. कधीच कंटाळा न येणारे

ही भयंकरच कंटाळवाणी लोकं असतात. आमच्या हॉस्टेलमध्ये एक जण होता तसा. सर्व लोकं मेसच्या अन्नाला शिव्या देत असताना हा मुकाट्याने ते अन्न पूर्णब्रह्म म्हणून खायचा. एकदा तो वैतागून म्हणाला 'का लोक सारखी तक्रार करतात? हे अन्न आहे. आपल्याला भूक लागलेली असते. खायचं. फूड इज फूड.'

ते लोक सुखी वगैरे देखील असतात.

श्रावण मोडक Wed, 22/02/2012 - 12:30

In reply to by राजेश घासकडवी

प्रतिसाद वाया गेला राव. तुमच्याकडून अपेक्षा आणखी थोड्या वेगळ्या होत्या. कारण हा लेख असा आहे की त्याचे जरूर विडंबन करावे. पहा बरं -
शीर्षक - नेमेचि येतो. . %@#! - विडंबनाची गरज नाही. पुढची चिन्हे वाचकाच्या मनात अनेक प्रतिमा उभ्या करतात.
पुढं पहिलं वाक्य - "सकाळी दचकून जाग आली तर मी कुठे आहे ते पहिल्यांदा लक्षात येईना." - स्वाभाविक असतं. रात्री जास्त झाली की होतं असं, हे ध्यानी घेऊन पुढं वाचायचं. "मी गादीवरुन उठून चौरंगासमोर कधी येऊन बसले, माझ्यासमोर कॉन्स्टिट्यूशनचा ठोकळा का आहे, काहीच कळेना." आता गादीवरून उठून जिथं बसायचं तिथंच बसलं पाहिजे. विडंबनाचा स्कोप इथून एक्स्प्लोड होत जातो. मग कॉन्स्टिट्यूशनचं कॉन्स्टिपेशन व्हायला वेळ लागत नाही... आणि हे असं न करता या लेखाचा तुम्ही फक्त समीक्षणात्मक आस्वाद घ्यावा? छे.
लेख ब्लॉग एंट्रीसारखा आहे हे खरंच. मौजमजा या सदरातही नेमका बसतो. पण ती मौजमजा, सन्जोप राव म्हणतात तशी, वरच्या स्तराची आहे. लगे रहो...

सन्जोप राव Wed, 22/02/2012 - 07:03

हा जुना वाक्प्रचार वाचून खूप बरे वाटले. कॉलेजात असताना कॉलेजच्या वार्षिकांकात 'काय लिहावं बरं?' या विषयावरचा एखादा लेख हमखास असे. प्रस्तुत लिखाण तसे पण त्याहून बर्‍याच वरच्या स्तरावरचे वाटले. समाजातल्या विक्षिप्तांच्या संख्येबरोबरच कंटाळा आलेल्यांची संख्या पण वाढली पाहिजे असे कुठल्यातरी भाषणात म्हणायला कुणाला तरी सांगितले पाहिजे.

नंदन Wed, 22/02/2012 - 13:05

आवडला. स्ट्रीम-ऑफ-कॉन्शसनेस शैलीतलं लेखन फारसं वाचायला मिळत नाही, ते साधणंही अवघड. पण हे मुक्तक जमून आलंय.

मन Wed, 22/02/2012 - 13:41

हलकंफुलकं,साधं सोपं जे काही लिहिलय ते आवडलं. इतकं, ते आवडलय हे सांगायचा मी कंटाला दाखवू शकलो नाही.
घासकडवींचे विश्लेषण आणि त्यातही ". कंटाळ्यात फार रस न घेता त्याच्याकडे दुर्लक्ष करणारे" हे क्लासच.
३१४बाईंचे उपद्व्याप धन्य. युके नंतर भारतातूनही त्यांना का पिटाळून लावण्यात आलं असेल ह्याचा अंदाज आला.

सर्वात गमतीशीर म्हणजे "कामाला लागा" असा प्रतिसाद देणारा आयडी आहे "आळश्यांचा राजा" धन्य धन्य ते संस्थळ.

--मनोबा

मी Wed, 22/02/2012 - 14:02

जबर...बोलघेवडा माणूस लिहायला लागला तर असंच लिहील असं वाटावं एवढं छान.

धनंजय Wed, 22/02/2012 - 20:52

मजा आली. सन्जोप राव यांच्या प्रतिसादाला +१.

ऋषिकेश Thu, 23/02/2012 - 10:50

अ(ति)प्रसिद्ध काव्यकुमार श्री संदीपराव खर्‍यांच्या 'कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो' या ओळी आठवल्या....
.....
.....

बरीच प्रतिक्रीया लिहिणार होतो पण आता 'टंकाळा' आला आहे :)

चिंतातुर जंतू Thu, 23/02/2012 - 12:04

पुढच्या वेळेस कंटाळा आला की जॉर्ज पेरेकसारख्या याद्या बनवून इथे प्रकाशित करा ही विनंती. या याद्या वाचायला अतिशय रोचक वाटतात. आंतरजालावर त्यांची उदाहरणे शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा नमुन्यादाखल हे सापडले:

स्रोतः http://vocamus.net/jlh/2009/03/19/a-list-of-georges-perec/
“A list of urgently needed supplies (coffee, sugar, cat litter, Baudrillard book, 75-watt bulb, batteries, underwear, etcetera).”

स्रोतः http://www.frieze.com/issue/article/georges_perec_a_users_maual/
Attempt at an Inventory of the Liquid and Solid Foodstuffs Ingurgitated by Me in the Course of the Year Nineteen Hundred and Seventy-Four (1976) - ‘one thrush paté... fourteen cucumber salads… seven pigs’ trotters… one chicken kebab… two guava sorbets… one Saint-Emilion ‘61… four Guinness’.

पेरेकपासून प्रेरणा घेऊन केलेली एक यादी इथे पाहायला मिळेलः
http://numberof.blogspot.in/2010/04/perec-and-his-lists.html

सानिया Thu, 23/02/2012 - 20:52

थोडाथोडका असता तर म्हटले असते की उद्यापुरता ठेवून उरलेला वाटून टाका. पण एवढ्या घाऊक कंटाळ्याचे करायचे काय हा प्रश्नच आहे!

सुवर्णमयी Thu, 23/02/2012 - 21:42

अप्रतिम लेखन.
काय सुरेख लिहिले आहे. मला त्यातल्या तांत्रिक बाबी फार कळत नाहीत पण अतिशय मनोवेधक आणि विचार करायला लावणार लेखन!
पुढील लेखनास शुभेच्छा.
सोनाली

रामदास Sun, 23/03/2014 - 11:10

In reply to by सुवर्णमयी

प्रतिसाद सुवर्णमयीने बर्‍याच दिवसात चार लायना लिहील्या त्यासाठी दाद द्यावी म्हणून लिहीला आहे.

Nile Fri, 24/02/2012 - 03:12

लेखातील वाक्यं आणि ठिकठिकाणच्या उपमा फार आवडून गेल्या. मागे एकदा मला असाच प्रचंड कंटाळा आला होता. दोन तीन आठवडे फक्त सीरीयल आणि दुध खात होतो. मग दूधही संपल्यावर नुस्तं सीरीयल खायचा प्रयत्न केला पण ते काय जमलं नाही. पण कंटाळा काही सोडेना. कंटाळ्यामुळे पलंगावरून उरणेच कमी केले. एकदा उठायला गेलो तर धपकन पडलोच. गावाला गेलेला रूममेट परत आला आणि मग आपोआप मनोरंजन होऊ लागलं. ;-)

सिफ़र Fri, 24/01/2014 - 12:08

बरेच दिवस झाले कंटाळ्यावर काही तरी स्वतःपुरताच लिहाव अस डोक्यात होत, तुमचं वाचल्यावर आता ते लिहिणार नाही.
मला कळलेला तुमच्या या
कंटाळ्याला किमान पाच वेगवेगळ्या भाषांमधले शब्द सांग.
:
बघू! अभ्यास करु, जाईल कंटाळा
:
ड्रॉवरमधल्या पूर्ण व्हायची वाट बघत पडून असलेल्या अकशे एकुणतीस कागदी मॉडेल्समध्ये आणखी एकाची भर पडली.
:
मी वैतागून टीव्ही सुद्धा ऑफ़ केला
;
कंटाळा डायरीत लिहीण्याला इम्यून झाला
:
किल्ल्यात एकटीच भटकताना सिगरेटी फ़ुंकणारया पोरांच्या टोळक्याने आपल्याला कॉर्नर केलं तर कुठली किक एकाच वेळी दोघांना लोळवेल याचा भराभर विचार सुरु केला… हे दिवास्वप्न
;
पण आज-उद्या धौलपूर हाऊस मध्ये इंटरव्ह्यू ला ’कंटाळ्या’वर पाच मिनीटं बोलायला सांगीतली तर यातलं किती आणि काय काय बोलू शकेन हे मात्र सांगता येत नाहीये अजून.
:

प्रवासात …जराही हसू आलं नाही
तुमच लिखाण फार रोचक वाटलं, आवडल. पण मौजमजा च्या धाग्यात का? हे काही कळल नाही

" मनुष्यजमातीमधली अर्ध्याहून अधिक पापं ही कंटाळ्याच्या भीतीमधून केली गेलेली असतात"
एक २० रुपयाचं पूर्ण कुरकुरे खाल्लं, पापड तळुन खाल्ले, रम केक खाल्ला,

हसू आल थोड कारण context बदलून विचार केला. बायका कंटाळल्या मुळेच श्यापिंग आणि ओव्हरइटिंग करत असावी अस सहज वाटून गेल ;)

फार अंगमेहनत न करता पोटं भरली की अस काहीस होत अस माझं माझ्यापुरत मत आहे त्यामुळे मला कंटाळा आला की मी सकाळी व्यायाम करतो आणि दिवसभर ताजातवाणा राहतो .
परत साहिरच हे गाणं पण ऐकतो.
खाली डब्बा खाली बोतल लेले मेरी जान , खाली से क्या नफरत करना खाली सब संसार !

सुचिता Mon, 27/01/2014 - 21:30

लेख वाचून कंटाळा आला म्ह्णजे लेखाचा नाही पण लेखिके सारखा . कदाचित हे च अपेक्षीत असावे. हेच लेखाचे यश असावे. पण लेख आवड्ला असे नाही वाटले.