मनोरमाबाई रानडे
आजच्या दिनविशेषात रविकिरण मंडळातील कवयित्री मनोरमा रानडे ह्यांचा १३ जानेवारी १८९६ हा जन्मदिन आणि १३ जानेवारी १९२६ हा मृत्युदिन अशी नोंद आहे. ती वाचून सुचलेले काही विचार.
श्री.बा. (श्रीधरपंत) आणि मनोरमा (जिजी) रानडे हे रविकिरणमंडळाचे पहिले सूत्रधार आणि आधारस्तंभ. हे जोडपे त्या काळात इतर समाजापासून अगदी उठून दिसण्याइतके वेगळे होते. त्यांचा प्रेमविवाह झाला होता आणि दोघेहि कविता करत असत आणि मित्रांच्या सभेत त्यांचे वाचनहि करीत. सुशिक्षित स्त्रीने कविता करून त्या बैठकीत वाचून दाखवायचा हा त्या काळात अगदी निराळा असा प्रघात होता. लवकरच यशवंत, माडखोलकर, माधवराव पटवर्धन, गिरीश असे इंग्रजी वाङ्मयावर वाढलेले आणि इंग्लिश रोमॅंटिक काव्यातून स्फूर्ति घेणारे त्यांच्या काव्यबैठकींमध्ये सामील होऊ लागले. ह्या बैठकी रविवारी कोणाच्या ना कोणाच्या घरी होत असत आणि त्यातून रविकिरण मंडळाची कल्पना उद्भवली. ९ सप्टेंबर १९२३ ह्या दिवशी प्रसिद्ध झालेल्या मंडळाच्या कवितांच्या प्रथम प्रकाशनाला ’किरण’ असे नाव देऊन ’एका ध्येयध्रुवाभोवती परिभ्रमण’ हा विचार व्यक्त करणारे सप्तर्षींचे प्रतीक त्यासाठी सुचविण्यात आले. मंडळाच्या पहिल्या प्रकाशनात माधवराव, माडखोलकर, यशवंत, गिरीश (शं.के.कानिटकर), द.ल.गोखले, श्रीधरपंत रानडे, मनोरमाबाई ह्यांच्या कविता आणि दिवाकरांच्या नाटयछटा असे साहित्य प्रकाशित झाले. (’झेंडूची फुले’ मधील पुष्कळशी विडंबनकाव्ये ह्या रविकिरणी काव्याची खिल्ली उडविण्यासाठी अत्र्यांनी लिहिली आहेत. रविकिरण मंडळात रवि केवळ माधवराव आणि बाकीची नुसतीच किरणे होती असेहि प्रस्तावनेत अत्रे लिहितात.) अशा रीतीने माधवराव, यशवंत, गिरीश आदींचा साहित्यप्रवास प्रारंभ होण्यामागे श्रीधरपंत आणि मनोरमाबाई कारणीभूत होत्या.
रविकिरणमंडळ हा जसा एक कविसंप्रदाय होता तसा तो सामाजिक जीवनाचाहि नवा प्रयोग होता. रानडे जोडप्याच्या घरी होणाया काव्यचर्चेत अनेक नव्या विचाराचे तरुण भाग घेऊ लागले आणि त्यांमध्ये आन्ध्रातून पुण्यास फर्गसन कॉलेजात शिकायला आलेली वरदा नावाची एक तरुणीहि होती. माधवराव आणि तिच्यामध्ये काही प्लेटॉनिक म्हणता येईल असे नाजूक नाते निर्माण होऊ लागले होते. माधवराव एव्हांना डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये आजीव सदस्य म्हणून दाखल झाले होते आणि फर्गसन कॉलेजमध्ये फारसीचे प्राध्यापक म्हणून कामहि त्यांनी सुरू केले होते. अभ्यास, शिक्षण आणि काव्य ह्या क्षेत्रांमध्ये काही करून दाखवायचे अशा ईर्ष्येने त्यांनी ह्या सदस्यत्वाची सुरुवात केली होती. माधवरावांच्या तरुणवर्गातील लोकप्रियतेचा दुस्वास करणारे अन्य काही पुराणविचारांचे आजीव सदस्यहि होते. वरदा आणि माधवरावांची सलगी, टेनिसकोर्टावर दोघांचे टेनिस खेळणे ह्याचा मोठा बाऊ करून त्यांनी माधवरावांना दोन वर्षांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले. हद्दपारीची ही दोन वर्षे माधवरावांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये १०० रुपये पगारावर शिक्षकाची नोकरी करून काढली.
श्रीधरपंत आणि मनोरमाबाई हे जोडपे जसे माधवरावांना काव्याच्या रस्त्यावर आणण्यास जसे अल्पस्वल्प कारणीभूत झाले तसेच माधवरावांच्या पुढील जीवनाला एक अनिष्ट कलाटणी देण्यामागेहि त्यांचा नकळत हात लागला होता. ते असे झाले:
माधवरावांनी दोन वर्षांसाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटी सोडतांना असे आश्वासन दिले होते की ते ही दोन वर्षे वरदाशी कसलाहि संबंध ठेवणार नाहीत. (आज असले आश्वासन मागणे आणि ते दिले जाणे ही एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनधिकृत ढवळाढवळ मानली जाईल ते कोणी करायचा प्रयत्नहि करणार नाही. पण तो काळच निराळा होता असे म्हणता येते.) श्रीधरपंत आणि मनोरमाबाई ह्यांची प्रामाणिक इच्छा अशी होती की वरदा आणि माधवराव ह्यांची भेट घालून त्यांना विवाहास उद्युक्त करणे. त्यानी हे अजाणतेपणे आणि केवळ माधवरावांना साहाय्य करावयाचे इतक्याच हेतूने केले होते. सोसायटीला माधवरावांनी दिलेल्या आश्वासनाची त्यांना काहीच माहिती नव्हती. माधवरावांना पूर्वसूचना न देता आणि त्यांना अपेक्षित नसतांना त्यांनी माधवराव आणि वरदा ह्यांची भेट नाशिकमध्ये घडवून आणली. (नाशिकचा उल्लेख आठवणीमधून करत आहे, तूर्तास मजपाशी संदर्भ नाही.) ह्या भेटीमधून अपेक्षित असे काही बाहेर पडले नाहीच पण तिची बित्तंबातमी पुण्यात पोहोचून शब्द मोडल्याच्या कारणासाठी माधवरावांना सोसायटी कायमची सोडावी लागली. गणिताचे प्राध्यापक वि.ब.नाईक, रसायनशास्त्राचे कोल्हटकर असे सोसायटीचे जुने सदस्य, जे माधवरावांच्या पाठिराख्यांपैकी होते, तेहि माधवरावांना मदत करू शकले नाहीत.
ह्यानंतर थोडयाच दिवसांनी मनोरमाबाई केवळ ३० वर्षाच्या असतांना दिवंगत झाल्या.
(गं.दे.खानोलकरलिखित 'माधव जूलिअन' हे पुस्तक मी बरेच वर्षांपूर्वी वाचले होते. त्यातून आठवणींवरून हा लेख लिहिला आहे. माधवरावांच्या ’वरदा’ दिवसांवर एक चांगला लेख होऊ शकेल. सवड मिळाली म्हणजे लिहीन.)
धाग्याचा प्रकार निवडा:
'वरदा' भेट
या निमित्ताने आत्ताच 'समग्र माधव जूलियन्' चाळत असताना सहज ही कविता दिसली. (पहिल्या दोन आणि मधल्या दोन अोळी देतो आहे.)
होतों भेटत नित्य अन् भटकलों अेकत्र रात्रींवनी
…….
दोघांची पडतां अचानक अशी ही गाठ गण्डस्थलीं
चित्ता आठवणी जुन्या हलविती त्या गोड काळांतल्या
…….
कवितेखाली २ मे १९२३ अशी तारीख आहे, तेव्हा तिचा या 'वरदा' भेटीशी संबंध असूही शकेल असं वाटतं. आता 'गण्डस्थल' हा नाशकासाठी 'कोड' आहे किंवा कसं हे माहित नाही. (बाकी अत्र्यांनी मधूनमधून असभ्यपणा केलाही असेल, पण विडंबन करायची खाज सुटावी असं माधव जूलियनांच्या काव्यात बरंच काही आहे हे निश्चित.)
कॉलेजच्या नावाचा उच्चार 'फर्गसन' असा लिहिलेला कित्येक वर्षांनी वाचायला मिळाला. जुन्या पिढीतले लोक तो तसा आवर्जून करत असत, पण आजकाल पुण्यात तो कुठेच ऐकायला मिळत नाही. (अर्थात अलिकडे पुणेकरांना 'सिंहगड' देखील नीट म्हणता येत नाही, पण ते एक असो.)
अर्थात अलिकडे पुणेकरांना
अर्थात अलिकडे पुणेकरांना 'सिंहगड' देखील नीट म्हणता येत नाही
'सिंव्हगड' हा खरा उच्चार करायची बर्याच लोकांना लाज वाटते असे निरीक्षण आहे. मग उत्तर भारतीय प्रभावाखाली 'सिंघ्गड' किंवा 'सिंह्गड' सारखा धेडमराठी उच्चार करतात हल्कत मेले.
'सिंव्हगड' हाच जुन्या काळापासूनचा रूढ उच्चार आहे याला प्रमाणही आहे. भारत इतिहास संशोधन मंडळाने 'शिवचरित्रप्रदीप' नामक पुस्तक काढलेले आहे. त्यात शिवकालीन व पेशवेकालीन काही पत्रे, राजव्यवहारकोशाचे वरिजिनल संस्कृत टेक्स्ट, इ.इ. मसाला आहे. त्यात एके ठिकाणी एका पत्रात 'सिव्हगड' असे रूप आलेले आहे. मोडीत लिहिलेल्या पत्रांची अनुस्वार गाळण्याची पद्धत पाहिली तर वरिजिनल फॉर्म "सिंव्हगड" असाच असणारे हे उघड आहे.
सिंव्हगड' हा खरा उच्चार
सिंव्हगड' हा खरा उच्चार करायची बर्याच लोकांना लाज वाटते असे निरीक्षण आहे. मग उत्तर भारतीय प्रभावाखाली 'सिंघ्गड' किंवा 'सिंह्गड' सारखा धेडमराठी उच्चार करतात हल्कत मेले.
किंचितही पटत नाही, दर ५-१० किलोमीटर वर जिकडे उच्चार बदलतात तिकडे फक्त उच्चार बरोबर नाही म्हणून कुणाला धेडमराठी ठरवू नये.
वऱ्हाडी मध्ये पण सिंव्हगड न म्हणता (क्वचित काही कुटुंब सोडल्यास) सिंह्गड असाच उच्चार करतात, मी पुण्यात आल्यावर सिंव्हगड म्हणायला लागलो त्यामुळे उच्चाराला धेडमराठी असा शब्द वापरणे फारच चुकीचा आहे नाहीतर वऱ्हाडी भाषेला पण धेडमराठी म्हणावे लागेल.
उच्चमराठीचा माणूस आणि बहिणाबाईचा मानूस धेडमराठी का?
बरेचदा पुणेरी उच्चार येत नाही आणि धेडमराठी उच्चारल्यास पुणेरी लोक चेहऱ्यावर विचित्र हावभाव आणतात परत उगाच न समजल्यासारखं करून परत विचारतात त्यामुळे कधीकधी complex येउन, वऱ्हाडी हिंदीचा सहारा घेतात असे निरीक्षण आहे.
बघा पटत का ते :)
ज्यांच्या बोलीतील मूळ उच्चार
ज्यांच्या बोलीतील मूळ उच्चार सिंह्गड आहे त्यांचं ठीके. पण ज्या बेल्टमध्ये (रीड पश्चिम म्हाराष्ट्र) सिंव्हगड असा उच्चार कमीतकमी पेशवेकाळापासून आहे त्या बेल्टमधल्यांनी तरी तसा करावा की!!! मी पाहिलेले तसे लोक सगळेच काय वर्हाडी नव्हते, किंबहुना त्यांतील फारच कमी लोक वर्हाडी असतील.
बाकी पुणेरी=शुद्ध हे समीकरण मी "वट्ट" मानत नाही. मिरजेची मराठी मला जास्त भावते. तस्मात ते एक असोच.
मला सिंव्हगड असा उच्चार आहे
मला सिंव्हगड असा उच्चार आहे असं खूप उशीरा कळलं. माझ्या घरात आसपास बहुतेक लोक सिंहगड (अनुनासिक सि) असा उच्चार करीत असत.
शिवाय फर्गसन असा उच्चार केव्हातरी ८० च्या आसपास (बॅडमिंटनचा उगम पुण्यात झाला असा शोध लागला त्याच सुमारास) सुरू झाला. त्या आधी फर्ग्युसन असा उच्चार करीत असत.
फर्गसनबद्दलची माहिती रोचक आहे
फर्गसनबद्दलची माहिती रोचक आहे पण जुन्या पुस्तकांत फर्गसन असे वाचल्यागत आठवतेय.
'सिंहगड' हा उच्चार रोचक आहे-'सींहगड' असा होतो तो बहुतेकदा. हा ऐकलाय पण तुलनेने कमीच. जास्तीकरून ऐकलाय तो सिंव्हगडच. अनुस्वाराचा म् किंवा न् करणार्या बिगरमराठी भारतीयांना हा " ंव्" असा उच्चार अज्जीच पचनी पडत नाही जबकि वरिजिनल संस्कृतमध्ये असाच उच्चार होता असे वाचल्याचे आठवते.
८० ते ८४ आम्ही पुण्यात शिकत
८० ते ८४ आम्ही पुण्यात शिकत होतो तेव्हा सकाळमध्ये वाचकांच्या पत्रव्यवहारात फर्गसन की फर्ग्युसन रोड अशी चर्चा घडल्याचे स्मरते.
अतिअवांतरः त्याच काळात केव्हातरी बॅडमिंटनचा उगम पुण्यात (की भारतात ते नक्की आठवत नाही) झाल्याचे सकाळमध्ये छापून आले. तेव्हापासून पुण्यात बॅडमिंटन संस्कृती* फोफावली. (शिवाय मॉडर्न कॉलेजच्या आवारात आशियातले सर्वात मोठे बॅडमिंटन कोर्ट चालू झाले).
*बॅडमिंटन संस्कृती म्हणजे कडाक्याच्या थंडीत सकाळी हाफपॅण्ट घालून स्कूटरवरून बॅडमिंटन खेळायला जाणे आणि नंतर रूपालीत बसून चहा पिणे. ;)
सिहगड / फर्ग्यु(र्ग)सन
'सिंहगड' हा उच्चार रोचक आहे-'सींहगड' असा होतो तो बहुतेकदा. हा ऐकलाय पण तुलनेने कमीच.
हा मुंबईच्या बाजूस थोडाफार प्रचलित असावा काय? कारण, माझ्या उभ्या आयुष्यात असा उच्चार फक्त माझ्या एका मुंबईकर कझिनच्या तोंडून कन्सिस्टण्टली ऐकलेला आहे. बाकी, पुण्यात 'सिव्हगडा'व्यतिरिक्त ('सि' अनुनासिक) अन्य काहीही ऐकलेले नाही.
फर्गसनबद्दल: तत्त्वतः 'फर्गसन' हे त्या नावाचा 'मूळ', 'खरा' उच्चार म्हणून योग्यच आहे. (बोले तो, तो गवर्नर स्वतःच्या आडनावाचा उच्चार अर्थात 'फर्गसन' असाच करत असावा.)
मात्र, पुण्यात वाढत असताना१, त्या कॉलेजच्या नावाचा उल्लेख मात्र स्थानिकांच्या तोंडून 'फर्ग्युसन' याव्यतिरिक्त इतर कोणता ऐकलेला नाही.२ 'फर्गसन' असा उल्लेख त्या मानाने खूपच उशिरा ऐकू येऊ लागला. (थत्तेचाचांप्रमाणेच माझेही निरीक्षण आहे.)
=====================================================================================================
१ बोले तो, मी पुण्यात वाढत असताना. फर्गसनसाहेब पुण्यात लहानाचा मोठा झाल्याबद्दल निदान ऐकलेले तरी नाही.
२ याचा 'फर्गी' असाही एक आंग्लाळलेला, लाडात आलेला संक्षेप ऐकण्यात आलेला आहे; चूभूद्याघ्या.
बरेचदा पुणेरी उच्चार येत नाही
बरेचदा पुणेरी उच्चार येत नाही आणि धेडमराठी उच्चारल्यास पुणेरी लोक चेहऱ्यावर विचित्र हावभाव आणतात परत उगाच न समजल्यासारखं करून परत विचारतात त्यामुळे कधीकधी complex येउन, वऱ्हाडी हिंदीचा सहारा घेतात असे निरीक्षण आहे. >>>>> +१११११११११११११ सहमत...
नाशिकच्या काही भागात (जिथे आणि ज्यांच्या बरोबर मी राहिलो तिथेतरी) "करेन" न म्हणता "करेल" असं म्हणतात ... त्यामुळे मी नाशिकहून पुण्यास आलो तेव्हा नविन नविन मी देखील "करेल" असेच म्हणत असे... आणि तेव्हा पुणेकर मित्र "काय.. काय" असं मुद्दाम पुन्हा पुन्हा विचारत असे... नंतर मी करेन (भरेन, येईन, देईन, मरेन) असं म्हणायला लागलो... पण मग अजुन एक पुणेरी म्हणाले "अरे ... "करेन" "करेन" काय ... "करीन" वगैरे म्हणावं" .... इतका संताप झाला की पुन्हा "करेल" वरच यावं असं वाटलं...
+१
पुणेरी लोकांचा तसा अट्टाहास गर्हणीय आहे. सुदैवाने आम्हांस कुठे अनुभवाला आला नाही. होता होईल तिथवर आम्ही आमची प्रोटोबोली दक्षिण महाराष्ट्रीय नैतर कोल्हापूर+सोलापूर मिश्रण रेमटवत असतो.
सीओईपीत असताना मुंबै ते गडचिरोली अन नाशिक ते सिंधुदुर्ग, औरंगाबाद ते सोलापूर अशा अख्ख्या महाराष्ट्रातील पोरांशी संबंध आला. कुणाचे मराठी सुधरायच्या भानगडीत आम्ही कधीच पडलो नाही.
तुम्ही मुळचे पुण्याचे
तुम्ही मुळचे पुण्याचे नसल्यामुळे तुम्ही त्या भानगडीत पडला नसाल (किंवा तो तूमचा स्वभावच नसावा) .. नाहीतर तूम्ही नक्कीच ती संधी गमावली नसती ;)
असो.. आता विषय निघालाच आहे तर मला सांगा ... काय बरोबर आहे ... 'करेन' की 'करीन'?
(बाकी पुण्याच्या (तेच पुणेकरांच्या) मराठीचा चाहता आणि इथे आल्यापासून मराठीमधे अमुलाग्र बदल झाला हे मान्य केलेच पाहिजे... तरी शुद्धलेखनाची म्हणावी तशी प्रगती नाहीच ..पण होईल तेही ;) )
हा हा हा लेखी करेन अन तोंडी
हा हा हा =))
लेखी करेन अन तोंडी करीन असे रूप दिसते असे निरीक्षण आहे.
पण एक कळत नै. प्रमाणभाषा आम्हांला मिरजेत यथायोग्य प्रकारे शिकवली गेली होती, तस्मात अमुक एका स्थानविशेषीं राहिल्यावर शिकण्याचा प्रकार कधी जाहला नाही. उलट मूळच्या प्रमाणभाषेस जवळ असलेल्या आमच्या बोलीत सोलापुरी तडका मिसळला. पुण्याच्या मराठीत विशेष असे काही कधी फारसे वाटले नाही. म्हणजे फार खास आणि फार वेगळे अशा दोन्ही अर्थी. स्वतःला जास्त शाणा समजत असल्याचा परिपाक असावा, दुसरे काही नाही =))
दोन्ही
आता विषय निघालाच आहे तर मला सांगा ... काय बरोबर आहे ... 'करेन' की 'करीन'?
बोलीपुरते बोलायचे झाले, तर तुमच्या वैयक्तिक सवयीस अनुसरून दोन्हींपैकी कोठलेही रूप बहुधा ग्राह्य ठरावे. (म्हणजे, मी स्वतः 'करेन' म्हणतो, सबब, 'करेन' हे(ही) रूप बरोबर असले पाहिजे, हे माझे लॉजिक.)
प्रमाणलेखनात बहुधा 'करीन'ला प्राधान्य मिळावे, असे वाटते, परंतु खात्री नाही. (कोणास 'बालभारती'तील - किंवा मराठी भाषेत छापलेल्या महाराष्ट्रातील कोणत्याही अधिकृत शालेय पाठ्यपुस्तकातील - प्रतिज्ञा संदर्भासाठी उपलब्ध आहे काय? 'त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन, की करेन?' हे तपासावयाचे आहे. आगाऊ आभार.) मात्र, 'करीन' हे प्रमाणलेखनात योग्य जरी मानले, तरी 'करेन' हा विकल्प चूक मानला जाईल, किंवा कसे (आणि, पर्यायाने, त्याबद्दल गुण काटले जातील, किंवा कसे) याबाबत साशंक आहे.
- (भूतपूर्व पुणेकर) 'न'वी बाजू.
इनकन्सिस्टंट
प्रयत्न करीन.
वडीलधार्या माणसांचा मान ठेवीन.
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. :)
बालभारती इ. दुसरी
कन्सिस्टन्सीचा प्रश्न येतो कोठे?
दुव्याबद्दल आभार.
प्रमाण हे कन्सिस्टंट असलेच पाहिजे, असे थोडेच आहे?
एकदा 'बालभारतीतील प्रतिज्ञा' हे 'प्रमाण' मानावयाचे ठरले, की मग 'करीन', 'ठेवीन' हे प्रमाण ('करेन', 'ठेवेन' अप्रमाण), परंतु 'वागेन' प्रमाण ('वागीन' अप्रमाण). फार कशाला, तुमच्या 'प्रमाणा'तच यदाकदाचित एका ठिकाणी 'ठेवेन' आणि दुसर्या ठिकाणी 'ठेवीन' अशी रूपे आली ('प्रतिज्ञे'त तशी आलेली नसावीत, ही बाब अलाहिदा; केवळ उदाहरणादाखल), तर दोन्ही प्रमाण. (किंवा, दोन्ही रूपे आली असता कोणते कधी वापरावे याबाबत काही नियम दृग्गोचर झाल्यास त्याप्रमाणे प्रमाण.)
'प्रमाण' नेमके कशा प्रकारचे आहे, एखादा दाखला (किंवा दाखलासंच) / प्रघात (प्रघातसंच) या स्वरूपाचे, की लिखित नियमावली (की दोन्हींचे मिश्रण) यावर मला वाटते हे अवलंबून असावे.
(बाकी, 'कन्शिष्टन्सी इज़ द व्हर्च्यू ऑफ अॅन अॅस'.)
लॅटिनमध्ये 'कला' या अर्थी
लॅटिनमध्ये 'कला' या अर्थी 'आर्स' म्हणतात हा योगायोग रोचक आहे.
उदा. आर्स मॅथेमॅटिका.
आभार! सदत्र माहितीवरून उपलब्ध
आभार!
सदत्र माहितीवरून उपलब्ध असलेल्या विकीपानावर काही मजकूर चढवला आहे. आक्षेप असल्यास त्वरित कळवावे.
फर्गसन-फर्ग्युसन
मी जेव्हा ह्या कॉलेजात १९५८ मध्ये पीडी ला प्रवेश घेतला - हे पीडी + ३ वर्षे ह्या पॅटर्नचे पहिलेच वर्ष - तेव्हा आमच्या वरणभात इंग्रजीत आम्ही सर्वच जण कॉलजच्या नावाचा उच्चार फर्ग्युसन असा करत असू. ६०-६१ च्या सुमारास आमचे नव्याने मिळालेले friend-philosopher-guide आणि नव्या दमाचे प्राध्यापक स.शि. भावे ह्यांनी हा उच्चार फर्गसन असल्याचे सांगितले. (मराठी शिकविण्याची ह्यांची हातोटी आणि ज्ञान वेगळ्याच पातळीचे होते. दुर्दैवाने ह्याचे अकाली निधन झाले.) तेव्हापासून - आणि आमचे इंग्रजी अधिक साहेबाळल्यावर - मी ह्याचा उच्चार आलटून-पालटून कधी फर्गसन तर कधी फर्ग्युसन (अगदी हलका य, र्ग्यु वर वजन नाही)असा करत आलो आहे.
ह्या चर्चेच्या संदर्भात मी हा उच्चार काही उच्चार-मार्गदर्शन देणार्या संस्थळांवर जाऊन पाहिला. मला असे दिसते की फर्ग्युसन (अगदी हलका य, र्ग्यु वर वजन नाही)असा उच्चार सर्वमान्य दिसतो.
पहा:
http://www.howjsay.com/index.php?word=ferguson&submit=Submit
http://www.forvo.com/word/ferguson/
http://www.forvo.com/word/fergusson/
ह्या नावाचे Ferguson आणि Fergusson असे दोन्ही पर्याय दिसतात. कॉलेजच्या नावात Fergusson हा पर्याय आहे.
द.ल.गोखले
रविकिरण मंडळाचे एक मूळ सदस्य द.ल.गोखले ह्यांच्याबद्दल जालावर लिखित माहिती फारशी दिसत नाही. इकडेतिकडे त्रोटक उल्लेख मात्र आढळतात.
माधवरावांच्या पत्नी लीलाबाई ह्यांच्या 'आमची अकरा वर्षे' ह्या पुस्तकात द.ल.गोखले ह्यांच्याविषयी पान-सव्वापान मजकूर आहे. त्यावरून कळते की माधवराव से.अॅ.सोसायटीचे आजीव सदस्य झाले तेव्हा गोखले तेथे इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधवराव कोल्हापूरला गेले तेव्हा गोखले सांगलीस होते. (विलिंग्डन कॉलेज?)
माधवरावांना लांबलांबचे प्रवास पायी करून गावे आणि गडकिल्ले पाहण्याची फार आवड होती. (माथेरान ते महाबळेश्वर असल्या प्रकारचे प्रवास ते पायी करीत असत. अशा प्रवासांसाठी त्यांनी खाकी अर्धी पँट, खाकी शर्ट, हॅवरसॅक मुद्दान तयार करून घेतले होते.) अशाच पुणे ते बनेश्वर प्रवासात द.ल.गोखलेहि होते. हा आणि असे उल्लेख 'आमची अकरा वर्षे' मध्ये आहेत.
शं.के.कानेटकरलिखित 'स्वप्नभूमि' मध्ये द.ल.गोखले ह्यांचे उल्लेख विखरून सापडतात.विशेष म्हणजे त्या पुस्तकातील अनेक छायाचित्रांमध्ये ते आणि त्यांच्या पत्नी सुमतीबाईहि आहेत.
२७ सप्टेंबर १९६५ ह्या दिवशी पुणे विद्यापीठात उपकुलगुरु काकासाहेब गाडगीळ ह्यांच्या अध्यक्षतेखाली रविकिरण मंडळाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचा वृत्तान्त 'भटक्या' ह्या टोपणनावाने लिहिलेला 'स्वप्नभूमि'मध्ये छापलेला आहे. त्यात अन्य कवींबरोबर द.ल.गोखले ह्यांचाहि अल्पपरिचय देण्यात आला आहे. त्यांची काव्यनिर्मिति 'तोटकी आणि मोजकी' तरीहि 'सुगम, सुश्राव्य आणि सुंदर' अशी वर्णिली आहे. पुस्तकात सर्व उपस्थित कवि आणि उपकुलगुरु गाडगीळ ह्यांचा व्यासपीठावर बसलेला फोटो आहे. त्यात द.ल.गोखले दिसतात.
त्यांच्याबाबत जालावर जरी त्रोटकच माहिती असली तरी पुणे-सांगली भागात त्यांना ओळखणारे बरेच जण असतील असे वाटते. असा शोध घेतल्यास माहिती मिळणे अवघड नसावे.
आभार! विश्वकोश त्यांची बोळवण
आभार!
विश्वकोश त्यांची बोळवण "मंडळाचे एक सदस्य द. ल. गोखले हे जातिवंत रसिक आणि अभ्यासक असूनही मराठी साहित्यात त्यांनी विशेष भर घातली नाही" या वाक्याने करतो. पश्चिम महाराष्ट्रात मी हल्लीच आलेलो असल्याने येथील जुन्या व्यक्तींशी फारसा परिचय नाही.
पुणे, सांगली येथे पूर्वीपासून रहाणार्यांपैकी कोणी काही सांगु शकेल काय?
कॉलिंग बॅट्या, मुसु (अशोक पाटिलांशी कोणाचा संपर्क असेल तर त्यांना पाहिती असण्याची शक्यता आहे).
बाकी वरील माहितीवरून विकीपानात थोडी भर घालतो आहे.
धेडगुजरी मराठी
श्रीधरपंत आणि मनोरमाबाई हे जोडपे जसे माधवरावांना काव्याच्या रस्त्यावर आणण्यास जसे अल्पस्वल्प कारणीभूत झाले >>
रस्त्यावर आणण्यास >> :P
मराठीलाच रस्त्यावर आणलेत की हो. :D
सुचलेला पर्यायः
श्रीधरपंत आणि मनोरमाबाई हे जोडपे जसे माधवरावांनी काव्यनिर्मिती करण्यास अल्पस्वल्प प्रमाणात कारणीभूत झाले
ह्यात धेडगुजरी काय दिसले?
श्रीधरपंत आणि मनोरमाबाई हे जोडपे जसे माधवरावांना काव्याच्या रस्त्यावर आणण्यास जसे अल्पस्वल्प कारणीभूत झाले >>
ह्यात 'धेडगुजरी' काय दिसते? सर्व शब्द प्रमाण मराठीत नेहमी वापरले जाणारे आहेत. 'धेडगुजरी' ह्याचा शब्दकोषामधील अर्थ पहा:
Barbarous mixture of languages - मोल्सवर्थ.
काही शब्द एका भाषेतले आणि काही भिन्न भाषेतले असे घालून केलेली रचना - आपटेकृत मराठी शब्दरत्नाकर.
दोष असलाच तर तो अनौचित्याचा आहे असे मी म्हणेन. लेखाचा जो एकूण डौल आहे - प्रमाणभाषा, गंभीर विषय, इ. - त्याच्याशी 'काव्याच्या रस्त्यावर आणणे' ही शब्दरचना जुळत नाही असे म्हणता येईल. 'काव्याच्या मार्गावर', 'काव्याच्या प्रान्तात' अशा प्रकारचे शब्दोपयोग अधिक जुळले असते असे म्हणता येईल. तरीहि, लिहिले आहे ते चुकीचे नाही आणि धेडगुजरी तर मुळीच नाही असे मला वाटते.
'धेडगुजरी' हा शब्द मात्र एकाच वेळी धेड आणि गुजर ह्या दोन समूहांबद्दल तुच्छता दर्शविणारा असल्याने politically incorrect आहे.
रोचक
रोचक लिखाण. "वर दे मला वरदेपरि" अशा प्रकारची रचना अत्र्यांनी योजलेली होती. या प्रकाराचे वर्णन हिडीस या एका शब्दाने करता येईल.
गं दे खानोलकरांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दलचे डीटेल्स जरूर लिहा.