Skip to main content

२०१३ विधानसभा अंदाज व प्रत्यक्ष निकाल: राजस्थान

आपण एकेक राज्य विचारार्थ घेऊया. सर्वप्रथम राजस्थान कडे बघुयात. त्याची सद्यस्थिती व इतिहास असा:

राजस्थान २००८

पक्ष जागा मतांची टक्केवारी
काँग्रेस ९६ ३६.८
भाजपा ७८ ३४.३
बसपा ७.६
सीपीएम १.६
अपक्ष १४ १५
इतर ४.७
राजस्थान २००३

पक्ष जागा मतांची टक्केवारी
काँग्रेस ५६ ३५.६
भाजपा १२० ३९.२
बसपा
लोकदल २.६
अपक्ष १३ ११.६
इतर ७.२

असे दिसते की २००३ पेक्षा २००८ मध्ये काँग्रेसची मते केवळ १.२%नी वाढली मात्र तुलनेत जागा मात्र ४० वाढल्या. त्याचवेळी भाजपाची मते ४.९%ने कमी झाली व ज्यामुळे भाजपाला ४२ मतांचे नुकसान झाले. अर्थात भाजपाची मते कमी झाली तरी ती सगळी काँग्रेसला मिळवता आली नव्हती तर ती इतर पक्षांत विभागली गेली होती. (अर्थातच कारण अ‍ॅन्टि-इन्क्म्बन्सी)

२००९चे लोकसभा निकाल बघितले तर हा कल काँग्रेसकडे अधिकच झुकलेला दिसतो. भाजपाला विधानसभेत निवडून दिलेल्या मतदारसंघांपैकी केवळ २३ क्षेत्रातून भाजपाला लोकसभेत बहुमत होते तर काँग्रेसला ७९ क्षेत्रात. शिवाय काँग्रेसने भाजपाकडून (विधानसभेत भाजपा जिंकली आहे अशा) ५१ विधानसभा क्षेत्रात आघाडी मिळवली होती तर हा करिश्मा भाजपाला केवळ १४ क्षेत्रात करता आला होता.

तुर्तास अंदाज वर्तवण्यासाठी प्रत्येक मतदारसंघाचा विचार करून अंदाज देत आहे.
त्याआधी माझे गृहितक मांडतो:
-- २००३मध्ये भाजपापासून दूर गेलेल्यांपैकी किमान ६०% मतदार पुन्हा भाजपाला मत देतील
-- काँग्रेस प्रखर अ‍ॅन्टि-इन्क्म्बन्सीला सामोरी जात आहे (किमान २% ते २.५% मतांचे नुकसान)
-- मोदींच्या देशपातळीवर नेतृत्त्व घोषणेमुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांपेक्षा अधिक उत्साह आहे. अर्थात प्रचार अधिक व अधिक जोमाने (हा प्रभाव इतका आहे की वसुंधरा राजेंच्या पक्षांतर्गत विरोधकांचा प्रभाव बराच कमी झाला आहे / केला गेला आहे). शिवाय यामुळे बहुतांश ठिकाणी लढत ही भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी टोकदार झाली आहे.
-- भाजपा व काँग्रेस निवडणूका होईपर्यंत कोणत्याही नव्या मूलभूत चुका करत नाहीत.

अंदाजः

पक्ष माझा अंदाज CNN-IBN इंडीया टुडे इंडीया टिव्ही-सी वोटर CNN-IBN एग्झिट पोल प्रत्यक्ष निकाल
काँग्रेस ८३ ६०-६८ ७६ ६४ ४९-५७ २१
भाजपा ९६ ११५-१२५ १०५ ११८ १२६-१३६ १६२
बसपा ४-८
सीपीएम
अपक्ष १३
इतर ८-१२ १९ १५ १२-२०

सदर धाग्यावर तुमचेही अंदाज, राजस्थान निवडणूकांसंबंधीच्या बातम्या, चर्चा आल्यात तर अधिक मजा येईल. शेवटी निकाल लागल्यावर याच धाग्यावर प्रत्यक्ष विदा दिला जाईल

सदर अंदाज हा अत्यंत वैयक्तिक असून यासाठी कोणताही सर्व्हे घेतलेला नाही. निव्वळ आकडेमोडीवर आधारीत अंदाज काढून, एकेक मतदार संघाचा इतिहास अभ्यासून व्यक्त केलेला ढोबळ + 'कंसर्व्हेटिव्ह' अंदाज आहे. या अंदाजासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केलेला नाही

मन Mon, 18/11/2013 - 15:16

-- काँग्रेस प्रखर अ‍ॅन्टि-इन्क्म्बन्सीला सामोरी जात आहे (किमान २% ते २.५% मतांचे नुकसान)

छे हो.
एवढे कुठे आपले नशीब.

मन Mon, 18/11/2013 - 15:30

In reply to by ऋषिकेश

हल्ली काँग्रेस हरु शकते ह्यावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे.
त्यातही कारभार चांगला नसल्याने, किंवा अ‍ॅण्टी इन्कम्बबन्सी असल्याने सरकारी बाजू निवडणूक हरते ह्यावरचा विश्वास उडत चालला आहे.
निवडणुकीची गणिते फारच वेगळी असतात. त्याचा आणि प्रशासनाचा संबंध असेलच असे नाही.
तुम्ही पब्लिकवर किती इंप्रेशन मारताय ह्याला महत्व नाही.
तुम्ही स्थानिक पातळीवरची कोण कोण माणसे आपल्याकडे वळवून घेता ते महत्वाचे.
(समजा ढोका कोला आणि मेप्सि ह्या दोन प्रॉडक्टची नवीन मार्केट मध्ये स्पर्धा सुरु होत आहे.
तयत प्रॉडक्टचा दर्जा,चव वगैरे इतकं महत्वाचं वाटत नाही. ते मागाहून अ‍ॅडजस्ट करुन घेता येतं.
महत्वाचं हेच की स्पर्धकाच्या बॉटलिंग सप्लाय लाइन मध्ये अडाथळे किती आणता; मार्केट मधून त्याचा एकदम माल कसा गायब करता वगैरे.
एकदा त्याचा माल गायब झाला, की पब्लिक तुमची वस्तू घेते; त्याची सवय लागली, की मग उशीराहून पुन्हा त्याचा माल यायला लागला तरी पब्लिकची सवय बदलणे लै अवघड जाते.)
.
वेगळ्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला मुंबैच्या काही सीट्स जिंकायच्या आहेत ना? मग उगी आमचा पक्ष चांगला वगैरे पेपर्स्मधून प्रचार करुन उपयोगाचं नाही.
जाउन हितंद्र ठाकूरला रिक्वेस्ट करा; त्याचं मन वळवा. तो तुमच्याकडे आला की एकदम मोठ्ठा वोट्-सेट हाती गावेल.
तसच मग इतर क्षेत्रांत्र जाउन त्या त्या विभगातल्या सामंतांची मनं वळवायची; अगदि गवळी वगैरेंनाही रिक्वेस्ट करायची.
.
ही गणितं आणि प्रत्यक्ष जनभावना वगैरे ह्याचा संबंध असलाच तर अत्यल्प/नगण्य आहे.

ऋषिकेश Mon, 18/11/2013 - 16:03

In reply to by मन

सहमत आहेच.. हे फॅक्टर्स महत्त्वाचे आहेतच.
पण कसंय की
१. आपल्याकडे मतदान 'गुप्त' असते आणि यामुळेच ही 'मॅनेज्ड' मते बदलतात हे एक
२. अशी एकगठ्ठा मते सोडली तरी स्विंग वोट्सचे प्रमाण प्रचंड असते. फक्त ही मंडळी मतदानाला बाहेर निघत नाहीत. जेव्हा जेव्हा यांना काहीतरी ठोस निर्णय घेता येतो तेव्हाच ते मतदानाला उतरतात. तसे झाले की मग वर म्हटलेल्या एकगठ्ठा मतांचा प्रभाव कमी कमी होऊ लागतो.
३. शिवाय गेल्या पाचक वर्षात अनेक मोठ्या राज्यांमध्ये पक्षांना ठाम बहुमत मिळाले आहे. केवळ स्थानिक बलशाली गटांना बाजुने वळवून हे जमत नाही. या गटांच्या म्होरक्यांनाही शेवटी जनभावनेलाही बघावे लागते. उद्या मायावतीने कोणत्याशा गटप्रमुखाला हाताशी धरले म्हणून तिला रत्नागिरीत एकगठ्ठा मते मिळणार नाहीत.

अवांतरः महाराष्ट्रापुरते बोलायचे तर गणेश मंडळे, दहिहंडी मंडळे, नवरात्रोत्सव वगैरे मंडळे कोणत्या पक्षाकडे आहेत व कोणत्या पक्षाच्या मंडळांना अधिक देणग्या मिळाताहेत त्यावरून कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा (व लोकांच्या कलाचा) बराचसा अंदाज लागतो

'न'वी बाजू Mon, 18/11/2013 - 21:50

'परिणाम'??????

आपणांस 'निकाल' तर म्हणावयाचे नसावे ना?

(बाकी, मूळ विषयात गती नसल्याकारणाने, पास.)

ऋषिकेश Tue, 19/11/2013 - 08:41

In reply to by 'न'वी बाजू

हिंदीचा प्रभाव हो दुसरं कै नै :)
बदल केला आहे.

मन Tue, 19/11/2013 - 09:22

In reply to by ऋषिकेश

किती आय डीं ची भाषेवर हिंदीचे परिणाम झाले हे हिंदीप्रभावाचे परिमाण म्हणून मोजता यावे काय?

राजेश घासकडवी Tue, 19/11/2013 - 00:35

गेल्या चार वेळच्या निवडणुकांच्या निकालांची आकडेवारी वापरून मी एक मॉडेल तयार केलं. गेल्या तीन वेळच्या जागांची सरासरी काढायची आणि गेल्या दोन वेळच्या जागांची सरासरी काढायची. या दोन्हीची सरासरी काढायची. २००८ चे आकडे 08(p) उत्तम प्रेडिक्ट करता येतात. हेच मॉडेल १३ सालच्या निकालांना लावलं तर येणारे आकडे 13 (p) मध्ये दाखवले आहेत.

...........93.... 98.... 03.... 08.. 08(p) 13 (p)
INC... 76... 153.. 56... 96... 100.. 89...
BJP... 95... 33... 120.. 78... 80... 88...
IND... 21... 7..... 13... 15... 12... 13...
JD..... 6..... 3..... 2..... 0..... 3..... 1.....
BSP... 0..... 2..... 2..... 6..... 2..... 4.....
OTH... 0..... 1..... 5..... 3..... 3..... 4.....
CPM... 1..... 1..... 0..... 3..... 1..... 1.....

वैमानिक हत्ती Tue, 19/11/2013 - 08:36

In reply to by राजेश घासकडवी

या पश्चातबुध्दीचा उपयोग काय? १९८५ मध्ये कॉग्रेसने दीडशेपेक्षा जास्त जागा मिळविल्या त्या १९९० मध्ये खाली आल्या ३५-४० पर्यंत. १९९० मध्ये भाजपला ८५ तर जनता दलाला ५५ तर १९८५ मध्ये भाजपला ८-१०.तेव्हा हेच मॉडेल १९८५,१९९०,१९९३ च्या निवडणुकांनाही लागू पडेल का? निवडणुकीत मते का फिरतात हे लक्षात न घेता नुसते आकड्यांशी खेळले तर असेच फसवे निष्कर्श निघतील.

राजेश घासकडवी Tue, 19/11/2013 - 09:45

In reply to by वैमानिक हत्ती

हेच मॉडेल वापरून २००३ चे आकडे (आधीच्या ३ निवडणुकांवरून) काढले तर फसतात - कॉंग्रेसला १०४ (प्रत्यक्षात ५६) आणि भाजपाला ६८ (प्रत्यक्षात १२०). त्याआधीच्या निवडणुकांसाठी भाकितं कशी येतात हे तपासून पाहिलेलं नाही. मात्र अत्यंत शास्त्रशुद्ध तंत्रं वापरून, मोठ्ठे पोल घेऊन केलेली भाकितंही इतकीच चुकलेली पाहिलेली आहेत. उदाहरणार्थ २००४ सालची लोकसभेच्या निवडणुकांची भाकितं. मग मी म्हणतो, की या साध्यासुध्या पद्धतीलाच का दोष द्यावा?

अजो१२३ Tue, 19/11/2013 - 11:19

In reply to by राजेश घासकडवी

मात्र अत्यंत शास्त्रशुद्ध तंत्रं वापरून, मोठ्ठे पोल घेऊन केलेली भाकितंही इतकीच चुकलेली पाहिलेली आहेत.

म्हणून काहीही मॉडेल्स बनवणार का?
अहो, नेम धरून मारलेल्या गोळीचा निशाणा चूकणं वेगळं आणि मुद्दाम तिसरीकडे झाडलेल्या गोळीचा निशाणा चुकणं वेगळं.

राजेश घासकडवी Tue, 19/11/2013 - 11:58

In reply to by अजो१२३

अहो, नेम धरून मारलेल्या गोळीचा निशाणा चूकणं वेगळं आणि मुद्दाम तिसरीकडे झाडलेल्या गोळीचा निशाणा चुकणं वेगळं.

तसं नाही. उघड्या डोळ्याने नेम धरून मारलेली गोळी आणि डोळ्यावर फडकं बांधून मारलेली गोळी सारख्याच प्रमाणात चुकत असेल तर ती बंदूक निरर्थक आहे असं म्हणता येतं.

ऋषिकेश Tue, 19/11/2013 - 12:01

In reply to by राजेश घासकडवी

खरं आहे.
पण मुळात डार्ट बोर्ड बराच मोठा आहे, त्यावर डोळे उघडे ठेऊन त्या बंदुकीने १० गोळ्या मारल्या व त्यातील ८ अगदी बैलाच्या डोळ्यावर/भोवती बसल्या व डोळे झाकून मारलेल्या गोळ्यां पैकी ८ डार्ट बोर्डावर कशाबसा बसल्या (बैलाचा डोळा दूरच) तरी तुमच्यामते बंदूक खराब आहे असं प्रतीत होतंय

नितिन थत्ते Tue, 19/11/2013 - 12:04

In reply to by ऋषिकेश

आठ गोळ्या बैलाच्या डोळ्याजवळ लागलेल्या दिसून येत नाहीत असं गुर्जींचं म्हणणं आहे.

अजो१२३ Tue, 19/11/2013 - 12:06

In reply to by ऋषिकेश

नाहीतर काय. म्हणावं तुम्हाला किती मॉडेलं बनवायची ती बनवा पण त्या शास्त्रीय मॉडेलवाल्यांना मदत करण्यासाठी.

ऋषिकेश Tue, 19/11/2013 - 08:43

In reply to by राजेश घासकडवी

गंमत म्हणून ठिकाय.. पण मी काढलेले अंदाज हे आतापर्यंत प्रकाशित झालेल्या कोणत्याही अंदाजांपेक्षा बरेच वेगळे आहेत. म्हणजे भाजपाला सत्ता मिळेल असं वाटतंय पण ते निसटतं बहुमत असेल असा माझा अंदाज आहे तर बहुतांश मिडीयाने ११० ते १२०+ जागा एकट्या भाजपाला देत अगदी क्लीअर बहुमत देऊ केलंय

राजेश घासकडवी Tue, 19/11/2013 - 09:50

In reply to by ऋषिकेश

गंमत म्हणून ठिकाय..

अर्थातच. माझ्या या सरासरीच्या पद्धतीमागे 'तुमच्या निष्कर्षापेक्षा माझी उत्तरं बरोबर येतात' असं दाखवून देण्याचा उद्देश नाही. मात्र सर्वच तज्ञांच्या अंदाजांइतकीच या पद्धतीने चूक/बरोबर उत्तरं येत असतील तर मात्र तज्ञांचा अंदाज या प्रकारच्या मॉडेलपेक्षा सरस कसा ठरतो, असा जनरल प्रश्न विचारण्याचा अधिकार राखून ठेवतो आहे इतकंच.

इतर मीडियावाल्यांनी दिलेल्या अंदाजांचे दुवे मिळतील का?

ऋषिकेश Tue, 19/11/2013 - 10:16

In reply to by राजेश घासकडवी

नोव्हेंबरच्या सुरवातीला CNN-IBN चा अंदाजः भाजप (११५-१२५), काँग्रेस (६०-६८)

त्यानंतर आठवडाभराने इंडीया टूडेचा अंदाजः राजस्थान - भाजप (१२०), काँग्रेस (७६)

नितिन थत्ते Tue, 19/11/2013 - 09:33

सर्वांसाठी एक सूचना.....
एकदा ठरवा बुवा. निवडणुकीत मिळणारी मते कल, लाटा, धोरणे, करिष्मा यांनी ठरतात की गुंडगिरी, वाटलेले पैसे यांनी ठरतात?

दुसरे कारण असेल तर उगाच वाफ कशाला दवडायची? आणि धागा मौजमजा या सदरात टाकून द्यावा.

मन Tue, 19/11/2013 - 10:10

In reply to by नितिन थत्ते

मला दुसरे कारण पटते सामान्य पातळीवर.
टोकाची परिस्थिती असते, तेव्हा दुसर्‍या कारणात उल्लेख केलेले घटक प्रभावी ठरत नाहित.
.
तुम्ही हुशारीनं तुमच्या प्र्श्नाचं उत्तर ठ्रवायची जबाबदारी इतरांवर टाकली आहे.
स्वतःचे उत्तर कुठेच जाहिर केले नाहित. ;)

नितिन थत्ते Tue, 19/11/2013 - 10:29

In reply to by मन

आमचे मत.....

मतदान रिग करून. (ह घ्या).

इंदिराबैनी पहिला विजय मिळवला तेव्हा हा विजय गाईचा*, बाईचा की शाईचा असा प्रश्न पराभूतांच्या गोटातून आला होता.

*गाय वासरू हे तेव्हा पक्षाचे निवडणूक चिह्न होते.

सुनील Tue, 19/11/2013 - 10:19

In reply to by नितिन थत्ते

एकदा ठरवा बुवा. निवडणुकीत मिळणारी मते कल, लाटा, धोरणे, करिष्मा यांनी ठरतात की गुंडगिरी, वाटलेले पैसे यांनी ठरतात?

आँ! ते आत्ताच कसे सांगणार? आधी निकाल तर येऊदेत!

निकाल आमच्या बाजूने लागला तर, कल, लाटा, धोरणे करिष्मा इ.इ..

त्यांच्या बाजूने लागला तर, गुंडगिरी, वाटलेले पैसे इ.इ.

शिंपल;)

नितिन थत्ते Tue, 19/11/2013 - 10:32

In reply to by सुनील

हो तर !!

आमच्या बाजूने निकाल लागला तर मतदार शहाणा, स्मार्ट वैग्रे.
विरुद्ध लागला तर सगळा अशिक्षितांचा बाजार !!

ऋषिकेश Wed, 20/11/2013 - 17:39

नुकतेच राजस्थानच्या २०१०च्या जिल्हापरिषदेच्या निकालांचे तासभर खपून एक्सेलीकरण केले.
ज्या १०२० जागांचा निकाल मिळवला त्यापैकी ५६३ तब्बल जागा काँग्रेसला तर भाजपाला ३६० जागा मिळत होत्या. काँग्रेसचा २०१०पर्यंत वरचष्मा होताच. यावरून भाजपाला निवडणूक जिंकणे किती अवघड आहे याचा अंदाज यावा.

तरीही २०१३मध्ये असे काय व्हावे की सगळ्या जनमतचाचण्या १२०+ जागा भाजपाला दाखवत आहेत?

मला तर हे निकाल बघुन ९६ जागाही ऑप्टिमिस्टिक वाटू लागल्या आहेत

नितिन थत्ते Wed, 20/11/2013 - 19:40

In reply to by ऋषिकेश

:)

लोकल निवडणुकांमधले मुद्दे वेगळे असतात असे वाटते.
अण्णा प्रकरणाच्या हाईटला महाराष्ट्रात नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्यात कॉ-राकॉने दणदणित यश मिळवले होते.

विधानसभांचे निकाल वेगळे असू शकतात.

तसेच उमेदवार निवडीचा परिणाम होत असू शकेल. बंडखोरी वगैरे. जी जिल्हापरिषद पातळीवर अधिक असेल.
सर्व्हे हे ओव्हरऑल पक्षीय कल पहात असतील.
अमूक उमेदवार कमी किंवा जास्त मते मिळवू शकेल.

अक्षय पूर्णपात्रे Wed, 20/11/2013 - 20:31

-- २००३मध्ये भाजपापासून दूर गेलेल्यांपैकी किमान ६०% मतदार पुन्हा भाजपाला मत देतील
-- काँग्रेस प्रखर अ‍ॅन्टि-इन्क्म्बन्सीला सामोरी जात आहे (किमान २% ते २.५% मतांचे नुकसान)

यावरून गृहीतकेच अंदाज आहेत असे वाटते. अ‍ॅन्टि-इन्क्म्बन्सी वगैरे आहे असे मानले तरी त्याचा परिणाम २-३% कसा होईल यावर प्रकाशाची तिरीप तरी पडायला हवी होती.

अवांतर: संस्थांनी केलेल्या पोल्सना एकत्रपणे पाहता आले तर थोडीफार मजा येईल.

ऋषिकेश Thu, 21/11/2013 - 11:06

In reply to by अक्षय पूर्णपात्रे

२ ते ३ %ना ठोस असा आधार नाही. तुम्ही म्हणताय तसा आळशी अंदाज हा शब्दप्रयोग योग्य ठरावा.
याहून अधिक ठोस अंदाज वर्तवण्यासाठी आवश्यक विदा माझ्यापाशी नाही त्यामुळे असे काहितरी गृहितक मांडणे गरजेच आहे.

राजस्थानातील आधीच्या काही निवडणूका बघितल्या तर काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत फार मोठा फरक नाही मात्र १ ते १.५ टक्के मतेही बर्‍याच जागांमध्ये बदलत आहेत. २०१०पर्यंत काँग्रेस वरचढ होती असे दिसत असले तरी एकूण मिडीयातील बातम्या व काही सर्वेवरून अ‍ॅन्टीएन्कम्बसी आहे असेच वाटते. ती किती आहे हे क्वांटिफाय करण्यास लागणारा विदा माझ्यामाशी नाही पण जास्तीत जास्त ३ ते कमीतकमी २ टक्के इम्पॅक्ट व्हावा असा अंदाज आहे.

बाकी विविध संस्थांचे अंदाज एकत्र दाखवायची कल्पना आवडली. मुळ धाग्यात बदल केला आहे. इतरही अंदाज येत जातील तसतसे तेही अ‍ॅडवत जाईन

ऋषिकेश Thu, 05/12/2013 - 10:26

राजस्थानच्या एग्झिट पोल कडे बघता माझे अंदाज साफच धुळीला मिळाल्यासारखे वाटते आहेच. शिवाय बहुतांश चॅनेलांचे "प्री-पोल" अंदाजही मागे पडले आहेत.
भाजपाला तब्बल ४३% मते मिळतील असा अंदाज आहे. इथे मोदी फॅक्टर चांगलाच चालल्याचे दिसते आहे

राजेश घासकडवी Sun, 08/12/2013 - 11:34

एनडिटिव्हीवर आत्तापर्यंत १९५ जागांचे कल आलेले आहेत
कॉंग्रेस ३२
भाजपा १३८

भाजपाला ५५ जागा गेल्यावेळपेक्षा जास्त. कॉंग्रेसला ३४ जागा कमी. सत्ताबदल - हो.

ऋषिकेश Mon, 09/12/2013 - 13:15

In reply to by विसुनाना

आभार.. धागा अपडेटवतो.

बाकी राजस्थानमध्ये काँग्रेसची अत्यंत दयनीय धूळधाण उडाली आहे. इतकी की काँग्रेसने सोडा त्यांच्या विरोधकांनाही अशी अपेक्षा नसेल.

तुमच्या मते (विसूनाना + सगळेच ऐसीकर) याचे कारण काय असावे?
गेहलोत सरकारचा पर्फॉर्मन्स इतकाही वाईट नव्हता. चार राज्यातील सरकारे जितका वाईट कारभार करतात तितकाच वाईट कारभार त्यांनीही केला होता. असे नक्की काय झाले असावे?

जिथे जिथे काँग्रेससरकारे होती त्यांना 'डबल-अ‍ॅन्टीइन्कम्बसी भोवली असेल काय?"

अजो१२३ Mon, 09/12/2013 - 17:59

In reply to by ऋषिकेश

गेहलोत सरकारचा पर्फॉर्मन्स इतकाही वाईट नव्हता. चार राज्यातील सरकारे जितका वाईट कारभार करतात तितकाच वाईट कारभार त्यांनीही केला होता. असे नक्की काय झाले असावे?

अहो, राजीव गांधींनी म्हणे चक्क भाजपच्या प्रचारासाठी सभा केल्या!!! मग काय होणार???

चेतन सुभाष गुगळे Mon, 09/12/2013 - 18:07

In reply to by अजो१२३

अहो, राजीव गांधींनी म्हणे चक्क भाजपच्या प्रचारासाठी सभा केल्या!!! मग काय होणार?? >>

आपणांस राहूल गांधी म्हणायचे आहे काय?

ऋषिकेश Wed, 11/12/2013 - 13:37

In reply to by अजो१२३

यापैकी सरकारने झोपा काढल्यावगैरेबद्दलचा राग असता तर इतर अनेक सरकारांप्रमाणे हे ही सरकार झोपले असते पण माझा प्रश्न होता त्याचा "इतका" दारूण पराभव होण्याइतके वाईट त्यांनी काय केले?

जर फक्त "सरकारने झोपा काढणे" हा सरकारला इतक्या मोठ्या प्रमाणात पराभव करण्यासाठी पुरेसे ठरू लागले असेल तर हा भारतीय मानसिकतेतील अत्यंत स्वागतार्ह बदल आहे असे म्हणावे लागेल.

वरच्या प्रतिसादानंटर अधिक माहिती मिळल्यावर पुढिल दोन गोष्टींचा या पराभवात मोठा वाटा आहे असे कळते:
१. भवरी देवी केसचा निकाल. या निकालानंतर दोन मोठे कॉंग्रेसचे नक्कीचे मतदार-गट दुरावले. हे कारण सर्वात मोठे मानले जाते. कारण यामुळे काँग्रेसचा पारंपरिक मतदार दूर गेला.
२. डबल अँटीइन्कम्बसी

अजो१२३ Wed, 11/12/2013 - 14:58

In reply to by ऋषिकेश

अहो, मध्य प्रदेशातही अर्थमंत्र्यांनी दिवे लावलेच होते.
आणि तिथे सिंगल anti-incumabancy होतीच.
इतका व्याप का करायचा, राजस्थानचा एखाद्दुसरा सजग floating voter निवडायचा आणि त्याला विचारायचं. दिल्लीत बसून ते जमतं.