Skip to main content

राजीव साने - लोकसत्ता - १८ ऑक्टोबर - 'सम्यक' निसर्ग- एक शुद्ध भंकस

राजीव साने हे नेहमीच रुढाच्या विरुद्ध किंवा वेगळ्या दिशेने जाणारे विचार मांडतात. युगांतर हे त्यांचं पुस्तक असंच अचाट आणि मुद्देसूद होतं. त्यांचे विचार सर्वांना १०० टक्के पूर्णपणे पचनी पडतीलच असं नव्हे, पण त्यांची मांडणी अशी काही लाजवाब असते की काही नाही तर निदान त्या मांडणीच्या आकारासाठी तरी त्यांचं लेखन वाचावं.. लोकसत्तामधे सध्या ते "गल्लत,गफलत,गहजब" हे सदर लिहीतात. त्यातले सर्वच लेख रोचक असतात पण तरीही त्यातला हा एक अत्यंत वेधक लेख.. यावर चर्चा व्हावी अशी इच्छा होती..आज अन्यत्र एक लेख वाचताना या लेखाची आठवण झाली.

आजुबाजूला अशी चर्चा होण्यासारखं कोणी नसल्याने जालावर या लेखाचा दुवा देऊन पाहतो आहे.

http://www.loksatta.com/sampadkiya-news/nature-exactly-a-pure-nonsense-…

काही वाक्ये क्वोट करतो:

निसर्गसौंदर्य हासुद्धा मानवी संवेदनांनी आणि कल्पनांनी घातलेला 'घाट' असतो. क्रौर्य व विध्वंस नको वाटणे, सुसंवाद व सौंदर्य हवेसे वाटणे या निखळ मानवीच भावना आहेत. निसर्गनियमांत त्यांना तसूभरसुद्धा स्थान नाही. मनुष्याचा मुख्य स्वभावधर्म, अंतर्बाहय़ कृत्रिमता निर्मिणे हाच आहे. कृत्रिमतेला हीनार्थ चिकटविणे, म्हणजे संस्कृती (आंतरिक) व समृद्धी (बाहय़) या दोन्हींना नाकारणे होय. त्यातूनच माणूसघाणे निसर्गप्रेम उद्भवते.

अशा सुयोग्य पर्यावरणवादाला आपण 'मानवकेंद्री व प्रबुद्ध-आíथक पर्यावरणवाद' असे म्हणू. परंतु काही पर्यावरणवादी प्रवाह, ही सीमा ओलांडून व गूढवादाचा आश्रय घेऊन, 'स्वत:ला 'सम्यक' (नॉर्मल) राखण्यासाठी धडपडणारा निसर्ग नावाची गोष्ट अस्तित्वात आहे व त्याची हाक फक्त 'आम्हालाच' ऐकू येते,' अशा थाटात प्रचार करतात.

मुख्य मुद्दा असा की, 'खुद्द निसर्गाला एक सम्यक अवस्था असते व ती मानवामुळे ढळते,' ही चक्क एक अंधश्रद्धा आहे. खोल (डीप) व जहाल (रॅडिकल) पर्यावरणवादी, कोणत्या मखलाशा करून ही अंधश्रद्धा पसरवतात, हे आपण आज पाहणार आहोत. प्रथम निसर्ग म्हणजे जणू आदर्शच ही समजूत तपासून पाहू या.

अशा बहुविध आघाडय़ांवर चाललेले तुंबळ युद्ध, असे जीवसृष्टीचे वर्णन करता येईल. त्यात माणसाला क्रौर्य व किळस वाटेल असे बरेच काही असते. भक्ष्याला फक्त पॅरालाइझ करून जिवंतपणी पोखरले जाते. स्वत:चे दुबळे पिल्लू खाऊन त्या अन्नातून सशक्त पिलांसाठी दूध बनविले जाते, तर कुठली मादी अ‍ॅडव्हान्स डोहाळजेवण म्हणून नरालाच खाऊन टाकते. पहिले अंडे फोडून बाहेर आलेले पिल्लू, इतर अंडी घरटय़ातून ढकलून फोडून टाकते. जर भूक भागवण्याचाच प्रश्न असेल तर, मांजर हे उंदराला खेळवून छळून का मारते? खरे तर मूल्यदृष्टय़ा, आपण निसर्गापासून 'काय शिकावे' यापेक्षा काय 'शिकू नये', हेच भरपूर आहे.

खरे तर मनुष्याची एन्ट्रीच झालेली नसताना, भयानक नसíगक आपत्ती, जसे की पृथ्वीतील लाव्हय़ाची उलथापालथ, हिमयुग, उल्कावर्षांव इत्यादींमुळे, जीववैविध्याचे प्रचंड विनाश होऊन गेलेले आहेत. अशा घटना यापुढे होणार नाहीत याचीही शाश्वती नाही. मोठय़ा पीछेहाटी झेलूनही उत्क्रांती, पुन:पुन्हा तिच्या मंद वेगाने चालू राहून, येथवर पोहोचली आहे. मोहेंजोदरो, हडप्पा येथे गाळाखाली बुडालेली शहरे सापडली. त्या काळी दर माणशी दर वर्षी २४ टन कार्बन-डाय-ऑक्साइड सोडणारी अमेरिका, अस्तित्वातच नव्हती. कृष्णाची द्वारका बुडाली तेव्हा 'पापे' वाढली असतीलही, पण ज्वलन वाढल्याचा उल्लेख भागवत पुराणात नाही.

मुळात, शुद्ध कॉसमॉसच असते, पण मानवी स्वार्थाद्वारेच 'कली' शिरावा तसा केऑस शिरतो, हे खरे नाही. उलट कॉसमॉस बांधण्याची ओढ ही मानवी 'ऋतेषणा' (रॅशनॅलिटी-हंगर) होय.

लेखातले मुद्दे बिनतोड आहेत आणि त्या मांडणीमुळे कुठे बारीकश्या तपशिलाचा विरोध करावा असं वाटलं तरी ते अवघड जातं.

मन Wed, 18/01/2017 - 11:23

लेखातले मुद्दे बिनतोड आहेत आणि त्या मांडणीमुळे कुठे बारीकश्या तपशिलाचा विरोध करावा असं वाटलं तरी ते अवघड जातं.

ह्म्म. तसं वाटतय खरं.

http://www.aisiakshare.com/node/5741 ह्या धाग्यात मिलिन्द ह्यांचा हा प्रतिसाद दिसला --

अर्थात मरणासन्न/ मरणाकडे वाट्चाल करणार्या व्यक्तीचा!
will the right of every egg and sperm to birth (in place of compulsory wastage) be recognized? Why or why not? : हा पूर्णपणे मानवी-नैतिक आणि समाजशास्त्रीय प्रश्न आहे (निसर्ग न-नैतिक असतो!) . निसर्गात बालमृत्यूचे प्रमाण अफाट असल्यामुळे निसर्ग अर्भकेही अफाट निर्माण करू पाहतो . त्या सर्वांना पुढील विकासाचा न्याय आपण देऊ शकत नाही हे आपण भारतात पहात आहोतच . याउलट उत्तर आणि पश्चिमेकडील देशात लोकसंख्यावाढीचा दर गेली अनेक दशके ऋण आहे. त्यामुळे तिथले नैतिक तत्त्व वेगळे असणार हे उघड आहे .

म्हणून धागा वर काढतो आहे.

ऋषिकेश Thu, 07/11/2013 - 11:31

खरंय.. मुळात नीती-अनिती या कल्पना माणसाने निर्मिलेल्या असल्या तरी/म्हणूनच त्या माणसापुरत्याच सिमीत असाव्यात हे उत्तम.

बाकी याच विषयावर.. "सेव्ह द अर्थ" म्हणजे नक्की काय? अश्या अंगाने मी मागे ऐसीवरच (चक्क) धनंजयसोबत मतभेद व्यक्त केले होते.. धागा मात्र मिळत नैये. (बहुदा घासकडवींचा धागा होता) ती चर्चाही रोचक है

अनुप ढेरे Thu, 07/11/2013 - 12:06

लेख रोचक आहे. 'नैसर्गिक' या शब्दाची व्याख्या आणि 'नैसर्गिक' आणि 'अनैसर्गिक' यातला फरक काय असा प्रश्न पडला होता. उत्तर नाही माहीत. बहुदा असा काही फरक नसतोच. केवळ आपल्या जगण्याला अनुकूल गोष्ट आणि प्रतिकूल गोष्ट एवढेच प्रकार असतात.

मी Thu, 07/11/2013 - 12:09

लेखातील काही मजकुर पर्यावरण तज्ञ माधव गाडगी़ळांशी संबंधीत असावा, त्यांबद्दल काही माहिती.

१. गाडगीळ समितीचा पश्चिम-घाटासंबंधी अहवाल.
२. सरकारने अहवालातील फक्त काहीच मुद्द्यांची घेतलेली दखल.
३. नाराज गाडगीळांचे पत्र.

राजेश घासकडवी Fri, 08/11/2013 - 07:31

In reply to by अपरिमेय

अत्यंत बिंदूगामी. ललित, विनोदी, आणि महत्त्वाचा मुद्दा पोचवणारं...

द प्लॅनेट डझंट केअर, इट जस्ट इज.

जयदीप चिपलकट्टी Sat, 09/11/2013 - 01:36

In reply to by अपरिमेय

A very stupid video. हाच तर्क लावून असे अनेक निष्कर्ष काढता येतील.

फ्रान्समध्ये लास्को गावी एका गुहेमध्ये क्रो-मॅग्ननने (म्हणजे माणसाचा पूर्वज) केलेली भित्तिचित्रे आहेत. ती पंधरावीस हजार वर्षांपूर्वींची आहेत, याचा अर्थ त्यांनी बरंच पाऊसपाणी पाहिलेलं आहे. पण कार्लिनी तर्कानुसार ती आधुनिक मानवाच्या कोणत्याही कृतीने आणखी खराब होऊ शकतील असं समजणं हे अौद्धत्याचं (hubris) लक्षण आहे. तेव्हा हजारो लोक ती बघायला गेल्यामुळे गुहेतला कार्बन डायॉक्साइड अतोनात वाढून ती नष्ट होताहेत असा स्पष्ट पुरावा आपण नजरेआड करायला हवा, अाणि त्यांची काय वाट लागायची ती लागू द्यायला हवी. After all, the paintings don't care. They just are. हाच तर्क लढवून कुमरानचे डेड सी स्क्रोल्स, गीझाचे पिरॅमिडस, सिस्टीन चॅपेलचं छत या सगळ्याचा लवकरच निकाल लावता येईल. कारण कोणत्याही खूप जुन्या वस्तूची जपणूक करणं म्हणजे आपल्या कृतीमुळे काही फरक पडतो असं समजण्यासारखं आहे, आणि अशा प्रकारचा अौद्धत्यपूर्ण विचार आपल्याला शोभत नाही.

We think some aluminum cans, and some plastic bags are going to make a difference?! असं एक वाक्य व्हिडिअोमध्ये आहे. अॅल्युमिनियम कॅन्सचं जगातलं वार्षिक उत्पादन शंभर अब्जांपेक्षा जास्त आहे आणि प्लॅस्टिक बॅग्सचं पाचेकशे अब्जांपेक्षा जास्त आहे. (नक्की संदर्भ देत बसत नाही, कारण खरा आकडा अब्जांत आहे यापलीकडे महत्त्वाचा नाही.) It is dishonest to say 'some' when one really means 'billions'. 'काही' कॅन्समुळे फरक पडत नाही याचा अर्थ काही अब्जांमुळेही पडणार नाही असा नाही. तो नक्की काय पडतो यावर उहापोह करता येईल. पण प्रश्न a priori नगण्य नाही. एखाद्या वस्तूवर आपल्या नियंत्रणाबाहेरच्या अनेक गोष्टींचा परिणाम होतो याचा अर्थ असा नव्हे की आपल्या नियंत्रणातल्या गोष्टींच्या परिणामाचा विचारच करू नये.

राजेश घासकडवी Mon, 11/11/2013 - 06:45

In reply to by जयदीप चिपलकट्टी

कार्लिनी तर्कानुसार ती आधुनिक मानवाच्या कोणत्याही कृतीने आणखी खराब होऊ शकतील असं समजणं हे अौद्धत्याचं (hubris) लक्षण आहे.

जपण्याजोग्या नाजूक वस्तु जपाव्यात याला त्याचा विरोध दिसला नाही. त्याचा विरोध आहे तो एवढा प्रचंड इतिहास असलेल्या आपल्या आख्ख्या ग्रहाला तसं जपण्याजोगं, नाजूक समजावं याला. त्याचा मुद्दा असा आहे की कोण कुठला मानव? दहावीस लाख वर्षांपूर्वी जन्मला. त्यात गेली जेमतेम दहा हजार वर्षं थोडाफार वाढायला लागला. आणि गेल्या शंभर दोनशे वर्षांत काहीतरी हातपाय हलवायला लागला आणि त्याला गेल्या पन्नास वर्षांत आपण ग्रहाचा नाश करतोय असा साक्षात्कार होतोय? ही जुर्रत जरा जास्त वाटते असा मुद्दा आहे.

कोणा प्राण्याने आपल्या वजनाने दुसऱ्या प्राण्याला चेचून टाकू नये हे ठीकच. मात्र हत्तीच्या पाठीवर बसलेल्या झुरळाने 'अरे, आपण हत्तीला चेचून नष्ट करतो आहोत' या भावनेने डिप्रेस्ड होणं विनोदी आहे - असा त्याचा मुद्दा आहे.

बाकी अल्युमिनमचे कॅन तयार झाल्याने पृथ्वीचा नाश कसा होतो हे मला अजून समजलेलं नाही. ग्रहाचा पोटात इतर मूलद्रव्यांशी संलग्न झालेलं अल्युमिनम बाहेर काढलं, शुद्ध केलं आणि पेप्सीची चित्र लावून लोकांमध्ये वाटलं. आणि त्यांनी ते फेकून दिलं. याने आपल्या ग्रहाला नक्की काय फरक पडतो?

जयदीप चिपलकट्टी Mon, 11/11/2013 - 15:17

In reply to by राजेश घासकडवी

> त्याचा विरोध आहे तो एवढा प्रचंड इतिहास असलेल्या आपल्या आख्ख्या ग्रहाला तसं जपण्याजोगं, नाजूक समजावं याला. त्याचा मुद्दा असा आहे की कोण कुठला मानव? दहावीस लाख वर्षांपूर्वी जन्मला. त्यात गेली जेमतेम दहा हजार वर्षं थोडाफार वाढायला लागला…

एखादी वस्तू किती जुनी आहे आणि ती किती काळात खराब करता येते यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. वर म्हटल्याप्रमाणे कित्येक हजार वर्षं तग धरून असलेल्या भित्तिचित्रांची परिस्थिती शोचनीय व्हायला काही दशकं पुरली. इस्टर आयलंडवर लाखो वर्षं असलेली जंगलं उजाड व्हायला दोनेकशे वर्षं पुरली. (अतिरंजित उदाहरणच घ्यायचं तर अठ्ठावीस वर्षं उभे असलेले ट्विन टॉवर्स नष्ट व्हायला एक सकाळ पुरली.) मानवी कृतींमुळे पृथ्वीच्या पर्यावरणावर किती आणि काय परिणाम होतात हा गुंतागुंतीचा आणि तपशीलाचा प्रश्न आहे. पण 'पृथ्वीच्या वयाच्या मानाने मानवी कृती अलिकडच्या असल्यामुळे असा परिणाम गंभीर असणं शक्य नाही' या युक्तिवादात काहीच जीव नाही.

> बाकी अल्युमिनमचे कॅन तयार झाल्याने …. आपल्या ग्रहाला नक्की काय फरक पडतो?

काहीच नाही. आपल्याला फरक पडतो का हा मुद्दा आहे. बॉक्साईटच्या खाणींमुळे अनेक ठिकाणी पाण्याचं प्रदूषण होतं, आणि त्यामुळे या पाण्यावर अवलंबून असणाऱ्यांना (माणसं, प्राणी, झाडं इत्यादि) फरक पडतो. याचा अर्थ कॅन्स सरसकट वाईट असा नाही. कदाचित हे प्रदूषण खूप कमी किंवा शून्य करता येईल अशाप्रकारे खाण चालवून हा प्रश्न सोडवता येईलही. पण सोडवायला काही प्रश्नच अस्तित्वात नाही अशी कार्लिनची समजूत दिसते.

नितिन थत्ते Mon, 11/11/2013 - 16:52

In reply to by जयदीप चिपलकट्टी

>>काहीच नाही. आपल्याला फरक पडतो का हा मुद्दा आहे.

म्हणजेच ग्रह वाचवणे हा मुद्दा नसून (आपल्या स्वार्थामुळे आणि लार्ज स्केल अ‍ॅक्टिव्हिटीजमुळे आपल्यालाच धोका आहे) आपल्याला स्वतःला वाचवणे हा मुद्दा आहे.

जीवजाती नष्ट होतात का यापेक्षा त्या नष्ट झाल्याने आपल्याला फरक पडतो का हा प्रश्न आहे.

बरोबर ना?

राजेश घासकडवी Mon, 11/11/2013 - 19:01

In reply to by जयदीप चिपलकट्टी


एखादी वस्तू किती जुनी आहे आणि ती किती काळात खराब करता येते यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.

मान्य. मला वाटतं आता 'वी आर जस्ट हॅगलिंग अबाउट द प्राइस'. खराब करण्याची मनुष्याची शक्ती इतकी तोकडी आहे, की आपण ग्रहाची वाट लावू शकतो/लावत आहोत अशी कल्पना करणंही धार्ष्ट्याचं आहे असं त्याचं मत आहे. ते अगदीच चुकीचं नाही. उदाहरणार्थ, गेल्या दोनेकशे वर्षांत कार्बनडायऑक्साइडचं प्रमाण ३०० वरून ४०० पर्यंत गेलेलं आहे खरं. पण पाचशे मिलियन वर्षांपूर्वी ते ६००० च्या आसपास होतं.

आपल्याला फरक पडतो का हा मुद्दा आहे.

मान्य. आपल्याला नक्की काय फरक पडतो हे तपासून बघितलं पाहिजेच. फक्त 'निसर्गाने दिलेले साठे मनुष्य हावरटपणे संपवून टाकतो आहे' अशा विधानांमधून जे मानवजातीचं नैतिक मूल्यमापन केलं जातं ते मला आक्षेपार्ह वाटतं. या मूल्यमापनाचं मूळ निसर्ग-मानव द्वैतात आहे.

चिंतातुर जंतू Thu, 07/11/2013 - 12:44

लेखातलं उद्धृत :

काही पर्यावरणवादी प्रवाह, ही सीमा ओलांडून व गूढवादाचा आश्रय घेऊन, 'स्वत:ला 'सम्यक' (नॉर्मल) राखण्यासाठी धडपडणारा निसर्ग नावाची गोष्ट अस्तित्वात आहे व त्याची हाक फक्त 'आम्हालाच' ऐकू येते,' अशा थाटात प्रचार करतात.

असं म्हणून काही पर्यावरणवादी अतिरेक करतात असं सान्यांना म्हणायचं असावं. माझ्या मते हे फारच धूसर आहे. म्हणजे मी सान्यांशी तत्त्वतः सहमत असलो, तरीही असे पर्यावरणवादी नेमके कोणते, आणि जे (सान्यांच्याच शब्दांत) 'अनामिक हानिग्रस्तांवर होणारा, तसेच अद्याप जन्मालाच न आलेल्या पुढील पिढय़ांवर (संसाधन-उधळपट्टीद्वारे) होणारा, अन्याय रोखण्यासाठी' झगडतात असे पर्यावरणवादी कोणते हे ठरवणंच कठीण जाईल असं मला वाटतं. म्हणजे काहीसं The Devil is in the detail.

मनुष्यजात अस्तित्वात नसतानासुद्धा जैववैविध्याचा नाश होत होता असं साने म्हणतात. तेदेखील ठीकच आहे. पण जेव्हा माणसाच्या कृतीमुळे जैववैविध्य नाश पावतं तेव्हा ते काय वेगानं नाश पावतं, आणि त्यामुळे नक्की काय हानी होते हे पाहूच नये आणि खुशाल जंगलं-झाडं तोडत राहावं असा अर्थ त्यातून कुणी घेत असेल, तर ते धोक्याचं आहे. आणि तसा (सोयीस्कर) अर्थ त्यातून घेतला जाऊ शकतो.

ऋषिकेश Thu, 07/11/2013 - 14:16

In reply to by चिंतातुर जंतू

प्रतिसाद मार्मिक आहे. मुळे लेखनाच्या (सान्यांच्या) भुमिकेशी मिही तत्वतः सहमत असलो तरी:

पण जेव्हा माणसाच्या कृतीमुळे जैववैविध्य नाश पावतं तेव्हा ते काय वेगानं नाश पावतं, आणि त्यामुळे नक्की काय हानी होते हे पाहूच नये आणि खुशाल जंगलं-झाडं तोडत राहावं असा अर्थ त्यातून कुणी घेत असेल, तर ते धोक्याचं आहे.

याच्याशी सहमत आहे. मात्र याचा अर्थ माणसाने म्हणजे 'निसर्गापेक्षा वेगळे असे कोणीतरी' निसर्गतील जैववैविध्याचा नाश केला आहे अशी भावना असु नये हे एक. जैववैविध्याचा (कोणत्याही वेगात) नाश होणेही तितकेच नैसर्गिक आहे जितके त्याची जोपासना होणे आहे हे दुसरे.

-तुर्तास इतकेच

चिंतातुर जंतू Thu, 07/11/2013 - 14:31

In reply to by ऋषिकेश

>> मात्र याचा अर्थ माणसाने म्हणजे 'निसर्गापेक्षा वेगळे असे कोणीतरी' निसर्गतील जैववैविध्याचा नाश केला आहे अशी भावना असु नये हे एक.

माणूस निसर्गात जेवढा हस्तक्षेप करतो ते पाहता मला माणूस जे काही करतो ते सगळं नैसर्गिकच असं म्हणायला जड जातं. प्लास्टिक, किरणोत्सारी पदार्थ, डिटर्जंट्स, ब्लीच, कीटकनाशकं, प्रतिजैविकं आणि इतर काही काही निर्माण करणारा माणूस मी निसर्गाहून वेगळा मानतो.

ऋषिकेश Thu, 07/11/2013 - 14:45

In reply to by चिंतातुर जंतू

ओके. आतापर्यंत इतर जीवांना न जमलेल्या/समजलेल्या/मिळालेल्या गोष्टी जशा माणसाने बनवल्या आहेत तसेच माणूस तयार करू शकत नाही -माणसाला माहिती नाहित- व माणसाला व इतर प्राण्यांना घातक आहेत अश्या काही गोष्टी/पदार्थ इतर जीव तयार करत असतातच. त्यामुळे मला माणूस निसर्गाचा भागच वाटतो.

अवांतरः बाकी दिलेल्या यादीतील किरणोत्सारी पदार्थ, ब्लीच, प्रतिजैविकं फक्त माणसाने बनवले यावर विश्वास नाही.

चिंतातुर जंतू Thu, 07/11/2013 - 15:10

In reply to by ऋषिकेश

अमुक पदार्थ निसर्गातही आढळू शकतो का, की फक्त माणूसच ते बनवतो हा आणि एवढाच मुद्दा नाही. माणसानं हे पदार्थ किती प्रमाणात बनवले असाही मुद्दा आहे. जेव्हा एखाद्या पदार्थाचं 'इंडस्ट्रिअल प्रॉडक्शन' होतं असं आपण म्हणतो, तेव्हा तो प्रचंड प्रमाणात बनत असतो. इतकंच नव्हे, तर इतक्या प्रमाणात बनवण्यासाठी ज्या प्रक्रिया वापरल्या जातात, त्यात इतरही पदार्थ बनतात. हे सगळं इतक्या प्रमाणात करणारा माणूस निसर्गाचा एक भागच असतो आणि तो जे काही करतो, त्याला कोणत्या तरी अर्थानं नैसर्गिकच म्हणावं असं मला तरी वाटत नाही.

ऋषिकेश Thu, 07/11/2013 - 15:29

In reply to by चिंतातुर जंतू

अगदीच मुलभूत फरक आहे या बाबतीतल्या आपल्या मतात.

निव्वळ काही घटक माणूस (किंवा कोणताही जीव) इतर जीवांपेक्षा बर्‍याच अधिक प्रमाणात बनवू शकतो म्हणून त्याला निसर्गबाह्य करणे मला योग्य वाटत नाही. (म्हणजे माणूस हे करतो ते योग्य आहे असे नव्हे. ते माणसाच्याच पुढिल पिढ्यांना (प्रसंगी आताच) अपायकारक आहे त्यामुळे मीही त्याच्या विरोधातच आहे. पण माझा विरोध हा शुद्ध स्वार्थापायी आहे. ते अनैसर्गिक आहे अशी समजूत करून घेऊन मग निसर्ग वाचवणे कसे आपल्याच (माणसाच्या) हातात आहे वगैरे पारमार्थिक (आणि काहिशी आत्मप्रौढ) भुमिका घेत केलेला नाही :) )

असो.

राजेश घासकडवी Fri, 08/11/2013 - 08:25

In reply to by चिंतातुर जंतू

माणसानं हे पदार्थ किती प्रमाणात बनवले असाही मुद्दा आहे.

थोडी आकडेमोड करून बघू.

एके काळी हवेत ऑक्सिजन नव्हता. सुमारे अडिच बिलियन वर्षांपूर्वी सायनोबॅक्टिरिया आले आणि त्यांनी हवा बदलायला सुरूवात केली. त्यांनी इतक्या ऑक्सिजनची निर्मिती केली की संपूर्ण हवेत सुमारे २०% ऑक्सिजन भरून राहिला. अर्थातच हा ऑक्सिजन अनेक प्रजातींसाठी मारक ठरला आणि त्या नष्ट झाल्या. पण तूर्तास आपण फक्त 'किती प्रमाणात' याचा विचार करतो आहोत.

या बदलाला २०० मिलियन वर्षं लागली. या काळात किती ऑक्सिजन तयार झाला? तर वातावरणाचं वस्तुमान सुमारे ५ बिलियन गुणिले बिलियन किलो आहे. त्याचे वीस टक्के म्हणजे १ बिलियन बिलियन किलो. याला २०० मिलियन वर्षांनी भागलं की ५ बिलियन किलो उत्तर येतं. हे खरं तर 'नेट गेन' आहे. म्हणजे मुळात कितीतरी जास्त प्रमाणात निर्माण केला गेला असावा. कारण बराच ऑक्सिजन इतर पदार्थांशी अभिक्रिया करतो.

आता दरवर्षी पाच बिलियन किलो किंवा पाच मिलियन टन अतिरिक्त प्रदूषक वायू सोडणं, असं दोनशे मिलियन वर्षं करत रहाणं त्या बॅक्टेरियांना शोभतं का?

प्राणिमात्र Thu, 07/11/2013 - 15:54

या सर्व विवेचनात एक मुद्दा राहून जातोय असे मला वाटते. . . "उत्क्रांतीतील संघर्षांनेच बाद ठरून नष्ट पावणारे जीववैविध्य, हे निर्माण होणाऱ्या वैविध्याच्या ९९ टक्के असते"... यासाठी नैसर्गिक रित्या लागणारा जो वेळ आहे तो मानवी हस्तक्षेपामुळे भीषण रित्या कमी होतो. त्यामुळे नष्ट पावणारे जीववैविध्य हे निर्माण होणाऱ्या वैविध्याला लागणारा वेळ देतच नाहीये. आणि हा मानवी हस्तक्षेप ज्या विकासासाठी आवश्यक आहे असे सान्यांचे म्हणणे आहे तो विकास म्हणजे जर फ़क़्त आर्थिक सुबत्ता हाच असेल तर खूप लोकांकडे खूप सारे पैसे आणि खर्च करण्याची क्षमता यातून ज्या प्रकारची संस्कृती निर्माण होताना दिसतेय सध्या ती किती लोकांना हवीशी वाटतेय याचाही विचार अतिशय गंभीरपणे केला जायला नको का?

अस्वल Fri, 08/11/2013 - 05:55

मुख्य मुद्दा असा की, 'खुद्द निसर्गाला एक सम्यक अवस्था असते व ती मानवामुळे ढळते,' ही चक्क एक अंधश्रद्धा आहे. खोल (डीप) व जहाल (रॅडिकल) पर्यावरणवादी, कोणत्या मखलाशा करून ही अंधश्रद्धा पसरवतात, हे आपण आज पाहणार आहोत.

हे चुकीचे नाही का ?
अण्वस्त्रे आणि जैविक अस्त्रे , निसर्गाला ज्याचे वावडे आहे अशा प्लास्टिक सारख्या गोष्टी माणूसच बनवतो.
पृथ्विपलीकडे जावे तर LEO /MEO /GEO स्तरांवरसुद्धा आपण कचरा निर्माण करू शकतो, जिथे जेमतेम काही अणुरेणू अपेक्षित आहेत.
त्यापलीकडे सुद्धा धूमकेतू आणि उल्का ह्यांवर यान उतरवण्याची क्षमता आपण जवळपास सिद्ध केलेली आहे.
ह्या व अशा गोष्टींमुळे मानवाला केवळ "अजून एक जीव" इतक्या हलक्या पातळीवर लेखून चालणार नाही.

मानव निसर्गबाह्य नक्कीच नाही - पण तो निसर्गाला एका विशिष्ट तऱ्हेने बदलू शकतो हे निर्विवाद सत्य. त्याला अंधश्रद्धा म्हणणे एक रंजक विचार किंवा बौद्धिक खेळ म्हणूनच ठीक आहे.
बाकी सर्व कार्लिन मार्मिक बोलून गेलाय!

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/11/2013 - 06:23

सानेंचे विज्ञानासंदर्भातले दोन लेख या सदरात वाचले आणि दोन्ही मला आवडले नाहीत. एक या धाग्यात उल्लेख केलेला, दुसरा अणूऊर्जेसंदर्भातला. (अणूऊर्जेच्या लेखामुळे मी त्या विषयाचा किंचित अभ्यास केला एवढा काय तो व्यक्तिगत फायदा झाला.) काहीच धड सांगितलेलं, लिहीलेलं नाही. नाकारता येण्यासारखंही काही नाही आणि +१ म्हणावं असंही विधान नाही. कोणत्यातरी व्यक्तीचे विचार पटत नाहीत हे सांगताना नक्की कोण व्यक्ती हे सांगायचं नाही आणि काय विचार पटले नाहीत ते ही नीट सांगायचं नाही.

एरवी ते चांगलं लिहीतात.

राजेश घासकडवी Fri, 08/11/2013 - 08:15

सानेंच्या लेखाबद्दल एकच मुख्य आक्षेप म्हणजे दहा हजार शब्दांच मटेरियल ते एक हजार शब्दांमध्ये कोंबतात.

'नैसर्गिक' हा शब्द आपण वेगवेगळ्या अर्थाने वापरतो हा त्यांचा एक व्यापक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. किंबहुना देव हा शब्द जसा वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या अर्थाने येतो, तसाच निसर्ग हा शब्दही. आणि या शब्दाच्या वेगवेगळ्या अर्थयोजनेपायी प्रचंड गल्लत होते. निसर्ग आणि मानव असं द्वैत तयार केलं की मानवाने निर्माण केलेलं नाही ते नैसर्गिक अशी बऱ्याच वेळा व्याख्या होते. मग त्याला 'मानव करतो ते वाईटच, आणि निसर्ग करतो ते रम्य, सुंदर, योग्य' असं मानणारी मनोभूमिका जोड देते.

जॉर्ज कार्लिनने अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की हा ग्रह इतक्या प्रचंड वस्तुमानाचा, गेली साडेचार अब्ज वर्षं आहे. प्रचंड उलाढालींमधून गेलेला आहे. या उलाढालींमधूनच अगदी अलिकडे दहाएक लाख वर्षांपूर्वी माणसाचा जन्म झाला. आणि गेल्या दहाएक हजार वर्षात त्याने सुसंस्कृत व्हायला सुरूवात केली. गेल्या हजारभर वर्षांत त्या प्रयत्नांना यश यायला लागलं. आणि खऱ्या अर्थाने गेल्या शंभरेक वर्षांतच स्वतःचे प्रश्न सुटायला लागले. आणि उसकी ये मिजाज की आपण या ग्रहाचाच नाश करतो आहोत असं त्याला वाटावं?

मानवकेंद्री मानसिकतेतून आलेल्या अनेक कल्पना मोडून पडल्या आहेत.
- मला देवाने निर्माण केलं (नाही बाबा, तुझा जन्म इतर प्राण्यांप्रमाणेच उत्क्रांतीतून झाला)
- माझ्यासाठी पृथ्वी निर्माण केली (छे रे, पृथ्वी आपोआप निर्माण झाली. त्यानंतर अनेक अब्ज वर्षं इतर प्राणी जगल्यानंतर तुझा जन्म झालाः
- मी विश्वाचा केंद्रबिंदू (काहीही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. इतकंच नाही सूर्यासारखे तारे या आकाशगंगेत अब्जांनी आहेत. आणि हो, अब्जांनी अशा आकाशगंगा आहेत)
याच लायनीत बसणारी
- ओह माय गॉड, मी इतका शक्तिवान बनलो आहे, की मी पृथ्वीचाच विनाश करतो आहे. बघा बघा, माझ्यामुळे पृथ्वी गेल्या दोनशे वर्षांत सुमारे दोन डिग्रींनी तापली!
ही कल्पना आहे.

नगरीनिरंजन Fri, 08/11/2013 - 09:15

In reply to by राजेश घासकडवी

नेमके आणि मार्मिक!
आणखी काही कल्पनांवर काही शास्त्रज्ञ फिक्शनल पेपर्स प्रसिद्ध करत असतात. त्या अशा:
१.समुद्रातल्या मोठ्या माशांची संख्या माणसामुळे ९५%नी कमी झाली आहे
२.माणसामुळे समुद्राची अ‍ॅसिडिटी वाढत आहे. :-)
३.माणसामुळे प्राण्यांचा र्‍हास होत असून त्याला सिक्स्थ मास एक्स्टिंक्शन म्हणावे.
४.माणसामुळे भारतातल्या दख्खन घाटातली जंगले एक लाख चौकिमी पासून तेरा हजार चौकिमीवर आली आहेत.
५.माणूस कारणीभूत ठरलेल्या तापमानवाढीमुळे उत्तर ध्रुवावर २०२० पर्यंत बर्फरहित उन्हाळा पाहायला मिळेल.
६.माणसामुळे हवामानात बदल होत असून त्यामुळे अन्नधान्याची उपलब्धता कमी होणार आहे.

आणि सगळ्यात अचाट म्हणजे
७.आशावाद हा मानवी मेंदूतला 'बग' आहे आणि डिप्रेस्ड माणसांना नॉर्मल माणसापेक्षा वस्तुस्थितीची चांगली जाण असते.=))

"विश्व आणि मानवी मूर्खपणा दोन्ही अमर्याद आहेत, पण विश्वाबद्दल मला खात्री नाही" असे एक शास्त्रज्ञ म्हणून गेला आहे. आजचे शास्त्रज्ञ(शास्त्राज्ञ?!) ते वाक्य खरे करण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. शिवाय त्यांना काही सांगायचीही चोरी झाली आहे.
काय करणार? आपण लोकशाहीत राहतो ना!
“There is a cult of ignorance and there has always been. The strain of anti-intellectualism has been a constant thread winding its way through our political and cultural life, nurtured by the false notion that democracy means that “my ignorance is just as good as your knowledge.” असं Isaac Asimov म्हणून गेलाय म्हणे. त्यामुळे या लोकांना रोखताही येत नाही.
डोकं ताळ्यावर असलेली आणि "आल इज वेल" असं सांगून सर्वांना प्रगतीच्या मार्गावरून भरकटण्यापासून वाचवणारी माणसे या जगात आहेत हे मानवजातीचे नशिब!

मन Fri, 08/11/2013 - 09:25

In reply to by नगरीनिरंजन

"तुमच्याच लढवय्या " शेतकरीची आठवण झाली. मोन्सण्टो नामक एक शेतकरी कसा पर्यावरण , मानवी जीवन व एकूणच आख्खे विश्व वाचवण्यासाठी धडपडतोय हे त्यात मस्त दाखवलं होतत.
.
त्याच वेळी घासू गुर्जींच्या मिपावरील ग्लोबल वॉर्मिंग बद्दलच्या लेख मालिकेची (ज्यात आकडेवारीसकट सूर्यानं ओकलेली ऊर्जा/उष्णता आणि मानवी क्रियांतून बाहेर पडलेली उष्णता ह्यांचं कोष्टक दिलं होतं) आठवण झाली.
.
आशावाद हा मानवी मेंदूतला 'बग' आहे की नाही ह्याबद्दल ठाउक नाही; पण डिप्रेस्ड माणसांना नॉर्मल माणसापेक्षा वस्तुस्थितीची चांगली जाण असते हे वाक्य भन्नाट आहे.
.
अधिक काय बोलणे, तज्ञांचे इथे उठणे बसणे, आपण केवल मौज पाहणे.

ऋषिकेश Fri, 08/11/2013 - 16:17

In reply to by नगरीनिरंजन

१ ते ६ आकड्यांमुळे जैवसाखळीत असे बदल होऊ शकतात ज्यामुळे माणसाचेच आयुष्य धोक्यात येण्याची शक्यता वाढते या कारणासाठी अश्या घटना ताळण्यास पूरक अशा काही गोष्टी/कृती करायला मी तयार आहे. शक्य तिथे/वाजवी असेल तिथे करतोही.

मात्र १ ते ६ आकड्यांत विषद केलेल्या गोष्टी टाळल्या तर पर्यावरण वाचेल/पृथ्वी वाचेल/निसर्ग वाचेल असे म्हटले की मला अर्थच समजत नाही. फक्त मासे/जंगलं/झाडं, त्यांची घरे वगैरे म्हंजे निसर्ग आणि मी, माझी कार, माझी बिल्डिंग (माणूस) निसर्गाचा भाग कसा नाही हे काही केल्या समजत नाही.

नगरीनिरंजन Fri, 08/11/2013 - 17:52

In reply to by ऋषिकेश

सगळं निसर्गाचाच भाग आहे. पृथ्वीवर घडणारी प्रत्येक गोष्ट निसर्गाचाच भाग आहे.
पेट्रीडिशमधले बॅक्टेरिया जोपर्यंत उपलब्ध अन्न संपत नाही तोपर्यंत वाढत राहतात आणि नंतर मरतात. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.
माणसाचे तसेच झाले तरी ते नैसर्गिक असेल.
फरक इतकाच की संपूर्ण ज्ञात विश्वात नसलेली "जाणीव" माणसात आहे आणि ज्ञात विश्वात इतरत्र नसलेला आणि आपोआप निर्माण झालेला जीवनरुपी चमत्कार जाणीवपूर्वक नष्ट केला जातोय.
जसा देवमाशाचा मोठा आकार किंवा वाघाचे दात त्यांच्या अस्तित्वासाठी उपयोगी आहेत तशीच माणसाची बुद्धी त्याच्या अस्तित्वासाठी उपयोगी आहे.
बुद्धीचा वापर माणसाने सर्व्हायव्हलसाठी करणे नैसर्गिक आहे.
बाकीच्या जीवसृष्टीचा नाश झाल्याने आपल्या अस्तित्वाला धोका पोचतोय हे कळूनही आपल्या बुद्धीचा वापर न करता आपल्यात आणि बॅक्टेरियात काही फरक नाही असा युक्तिवाद बॅक्टेरियाप्रमाणे वागणार्‍या काही 'सोशल कन्स्ट्रक्ट्स'साठी करणे हे नैसर्गिक नाही.

lakhu risbud Fri, 08/11/2013 - 10:39

निसर्ग असा आपण उल्लेख करतो तेव्हा निसर्ग म्हणजे एखाद्या मोठ्या कोर्पोरेशेन सारखा असावा अशी धारणा असते. ती फक्त काही अंशी खरी आहे,निसर्ग म्हणजे एक कायमस्वरूपी चालणारी प्रक्रिया आणि पद्धती असते.
ज्या प्रकारे माणूस जंगले,झाडे नष्ट करून एखाया ठिकाणची जीवशृष्टी धोक्यात आणतो त्याने निसर्गाला काहीच फरक पडत नाही. एखादी प्रजाती नष्ट झाल्याने अन्नसाखळी धोक्यात आली आणि त्या अन्नासाखाळीतील सगळेच जीव नष्ट झाले तरी निसर्गाला काही फरक पडत नाही. या प्रक्रिये मुळे जास्तीत जास्त काय होईल ? एखाद्या प्रदेशातील आपल्याला सुंदर भासणार्या हिरव्यागार भूभागाचे वाळवंटात रुपांतर होईल,तेथील ecosystem (मराठी शब्द??) वाल्वंटा च्या नुरूप ढळली जाईल,त्याप्रमानेच तिथे अन्न साखळी तयार होईल. प्रश्न असा आहे कि त्या भूभागातील माणसे या बदलणाऱ्या ecosystem नुरूप त्या वातावरणात तग धरू शकणार का ? त्यांच्या गरजा मुलभूत गरजा भागवू शकणार का ?
राजस्थान मधील वाल्वंट वर्षाला कितीतरी मिलीमीटर (८-१०) या गतीने हरियानात विस्तारत आहे आणि तेथील सुपीक जमीन वाळू मध्ये रुपांतरीत होत आहे असे मागे एका लेखात वाचले होते.
असे होण्याने निसर्गाचे काहीच बिघडणार नाही पण आपले धान्यौत्पादन नक्कीच कमी होणार .

अक्षय पूर्णपात्रे Sat, 09/11/2013 - 09:45

मनुष्याचा मुख्य स्वभावधर्म, अंतर्बाहय़ कृत्रिमता निर्मिणे हाच आहे.

येथे 'कृत्रिमता' हा शब्द कसा वापरलेला आहे हे स्पष्ट नसल्याने श्री साने यांना नक्की काय म्हणायचे ते मला कळू शकलेले नाही. उदा. अपत्यनिर्मिती करतांना मानव कृत्रिमता कशी निर्माण करतो हे कळत नाही. व्याख्यांचा घोळ न घालता ढोबळमानाने त्यांचा युक्तिवाद समजावून घ्यायचा म्हटले तरी मानवी अवस्थेपासून सुरूवात केल्याने काही मुलभूत मांडणी असल्याचा ग्रह होतो. पण प्रत्यक्षात मात्र अगदीच पादचारी 'निसर्ग किती मोठा, माणूस किती छोटा' पोकळपणा असल्याने लेख फारसा विचारप्रवर्तक वाटला नाही.

मन Mon, 11/11/2013 - 11:37

वीसेक वर्षापूर्वीचं स्वामीनाथन अय्यर ह्यांचा एक लेख आठवला:-
http://swaminomics.org/green-illusions-and-starvation/comment-page-1/#c…
त्याच लेखाखालील कमेंट मध्ये अजून दोन दुवे मिळाले:-
http://www.fao.org/organicag/oa-faq/oa-faq7/en/
http://newfarm.rodaleinstitute.org/columns/research_paul/2007/0207/fst_…
.
अवांतर वाटतील, पण कामाचेही आहेत.

नितिन थत्ते Mon, 11/11/2013 - 11:46

In reply to by मन

हजारो वर्षांपूर्वी आपण शेती करू लागलो तेव्हाच पर्यावरणाला काडी लागली याच्याशी सहमत. शेतीसाठी जमीन मिळवण्यासाठी जंगले जाळून टाकणे हा कॉमन उपाय केला जात होता.

आजही पावसाळ्यापूर्वी शेतात राब करून जमिनीतील सर्व प्रकारचे बीज नष्ट केले जाते. तांदूळ टिकावा म्हणून इतर सर्वांची सरेआम कत्तल.

मन Mon, 11/11/2013 - 12:13

In reply to by नितिन थत्ते

प्रमुख महसूल तसाच येइ.
इतिहासाच्या पुस्तकात अमुक राजाने तळी खोदली, कालवे काढले, रस्त्यांचे जाळे उभारले ह्यसोबतच खरेतर अधिकाधिक जमीन वनक्षेत्रातून काढून लागवडीखाली आणली ह्याचा उल्लेख का करत नाहित ठाउक नाही.
पण जो हे अधिक यशस्वीरित्या करे, त्याच्यावर जनता अधिक खुश असे; ते राज्य त्यातल्यात्यात सुखसंपन्न ठरे.
उदा:- सोळाव्या शतकात पुने, सुपे , चाकण अशा परिसरात वन्य जीवांचा अधिक वावर होता. शेतीयोग्य वातावरण नव्हते. भोसले घराण्याने जंगले साफ केली. जमीन लागवडीखाली आणली. लष्करी बळावर वन्य पशूंचा बंदोबस्त केला. त्यांना साहजिकच स्थानिकांचा अधिकच पाठिंबा मिळाला. तोवर, त्याभागाकडे बरेच दुर्लक्ष झाले होते.
.
हे फक्त एक उदाहरण, राजसत्ता मजबूत झाली, आणि अधिक संसाधनांची गरज असली की होतच असे.
अगदि सब सहारन वाळवंटाच्या कडेकडेने रोमन आश्रयाने अधिकाधिक शेती व परिणामी तिथल्या पाण्याचा प्रमाणाबाहेर उपसा झाल्याने सहारा वाळवंट वाढत गेले असे ऐकले आहे.असो. अधिकच अवांतर होते आहे. सॉरी.

अजो१२३ Mon, 11/11/2013 - 18:02

सम्यक् म्हणजे काय? शाळेत बुद्ध की जैन धर्माची तत्त्वे वाचताना हा शब्द आला होता, चिडचिड झाली होती अर्थ न कळल्यामुळे.

अनुप ढेरे Thu, 14/11/2013 - 21:06

In reply to by नितिन थत्ते

संघाच्या शाखेमध्ये एक आज्ञा असते. 'संघ सम्यक' म्हणून. सांगणार होतो पण थत्त्यांना आवडायचं नाही म्हणून नाही सांगितलं ;-)

मन Thu, 14/11/2013 - 21:23

In reply to by अनुप ढेरे

त्यांना आवडेल उलट!
तुम्हाला कॉन्स्पिरसी थिअरी ठाउक नाही का?
थत्ते हे खरे तर निस्सीम संघप्रेमी आणि काँग्रेस द्वेष्टे आहेत.
ते काँग्रेसचे कवतिक सुरु करुन लोकांना काँग्रेसविरोधी बोंबा मारायला उचकवतात.
पब्लिक उचकली ; कॉम्ग्रेस्च्या नावानं बोटं मोडू लागली की त्यांचा आत्मा शांत होतो.
.
वैयक्तिक होतय; त्याबद्दल सॉरी. ( इथे असं लिहिणं चूक वाटत असेल, तर खरद्-व्यनि करा, हा प्रतिसाद उडवून देतो.)
पण ही थिअरी खरच भन्नाट वाटली होती.

निनाद Fri, 15/11/2013 - 05:58

साने म्हणजे एकदम भंगार माणूस आहे हा! ताय्चे ते पुस्तकाही आहे माझ्याकडे पहिल्यांदा वाचल्यावर इंप्रेस झाले होतो. मग परत वाचल्यावर कळले की हा भंकस समाजवादी आहे.

चिंतातुर जंतू Fri, 15/11/2013 - 12:54

In reply to by निनाद

>> मग परत वाचल्यावर कळले की हा भंकस समाजवादी आहे.

हे कळलं नाही. अतिरेकी पर्यावरणवाद, अणुउर्जेला विरोध ही भंकस समाजवाद्यांची लक्षणं आहेत असा माझा समज उदारमतवादी उजव्यांनी करून दिला होता, पण साने तर त्याच्या विरोधात बोलताहेत असं दिसतं. मग भंकस समाजवाद्यांची लक्षणं तरी कोणती?

गवि Fri, 15/11/2013 - 12:57

In reply to by निनाद

साने म्हणजे एकदम भंगार माणूस आहे हा! ताय्चे ते पुस्तकाही आहे माझ्याकडे पहिल्यांदा वाचल्यावर इंप्रेस झाले होतो. मग परत वाचल्यावर कळले की हा भंकस समाजवादी आहे.

प्रतिसाद समजला पण एकदमच जेनेरिक आहे. विस्कटून सांगितल्यास उपकृत..

बाकी पटल्यास मत बदलण्यासाठी शंभर टक्के अनुकूलता आहेच.