आवधूऽत चिंतन श्री गुर्देव दत्त
आवधूऽत चिंतन श्री गुर्देव दत्त
आयुष्यातल्या सुरुवातीच्या वर्षांमधे ज्या व्यक्ती आयुष्यात येतात त्यांचा परिणाम मोठा असतो हे वेगळं सांगायला नको. बगारामकाका ऊर्फ बाबाकाका या माणसाबद्दलही हे खरंच आहे.
हा माझा सख्खा काका. वडलांचे चार भाऊ नि एक बहीण. त्यातला हा दोन नंबरचा. प्रत्येक जवळच्या नातेवाइकाच्या आपल्या अगदी लहानपणीच्या आठवणी असतात, तशी या काकाची पहिली आठवण म्हणजे त्याची बोचणारी लांबच्या लांब दाढी आणि तपकिरीचा उग्र वास. तपकीर हा पदार्थ, त्याच्या नावापासून नि त्याच्या उग्र वासापर्यंत, मनात सर्वप्रथम या माणसामुळे ठसला. त्या वयापर्यंत पाहिलेल्या कुठल्याही माणसापेक्षा त्याचं हे ध्यान वेगळं होतं. मळकट पांढरा शर्ट, मळकट धोतर. खाकी झोळी, वाढलेली दाढी, या जोडीला विसंगत दिसणारा काळ्या फ्रेमचा काहीसा जाडसर चष्मा. हे यांचं पहिलं दर्शन.
नंतर कळू लागलं तसतसं कळत गेलं की, हा काका ब्रह्मचारी, 'आध्यात्मिक' मार्गातला आहे. इतर काकांच्या पत्नी नि मुलं असतात तसं याचं काही नाही. माझ्या बालपणीच्या वर्षांत तर याचं घरही नव्हतं. आमच्या नि अन्य कुठल्या चुलत घराण्यात आठवड्यापुरती त्याची सोय असायची. या दोन घरांखेरीज त्याची बिऱ्हाडं म्हणजे आश्रम - एक गावातला नि एक सोलापूरचा.
काकाचा अध्यात्ममार्ग दत्तसंप्रदायाचा. त्याचे एक "दंडवते महाराज" नावाचे गुरू होते. हे दंडवते म्हणजे आडनावाने दंडवते असे नसून, दत्ताच्या काही ठिकाणांची त्यांनी नि बहुदा काही शिष्यांनी दंडवत घालत घालत केलेली यात्रा म्हणून यांचे नाव दंडवते असे पडलेले. या गुरूंचा आमच्या गावात एक नि गाणगापूर/सोलापूर या ठिकाणी एकेक असे आश्रम होते. तिथे त्या गुरूंचा नि शिष्यगणाचा नि गुरुपरिवाराचा मुक्काम असायचा.
काकाच्या 'आश्रम' या गोष्टीचा जसजसा संपर्क येत गेला, तसतसा, देवादिकांमधली, 'अध्यात्मा'च्या संदर्भातली उतरंड हळुहळू लक्षात यायला लागली. दत्त या दैवताची अंधारी देवस्थानं, सौम्य भाषेत सांगायचं तर काहीशी गरीब आणि कठोर भाषेत बोलायचं तर कळकट्ट, जीर्ण अवस्थेतली मंदिरं हे पाहता, हे दैवत या उतरंडीत बरंच खाली आहे हे दिसायला लागलं. गावातली गणपतीची मंदिरं त्या मानानं उच्चभ्रू वाटायची. एकंदर मनःशांती, प्रसन्नता - निदान किमान स्वच्छता - या मूल्यांच्या मागे दैवताचं उच्चभ्रूत्व, पर्यायाने समाजाच्या वरच्या थरातल्या लोकांना वाटणारी त्या दैवताबद्दलची आस्था आणि त्या आस्थेचं अर्थशास्त्र कारणीभूत ठरतं हे एकंदर बालमनाला कळत-नकळत जाणवत होतं. काकाच्या गुरूंचा आश्रम काळवंडलेला, भर दिवसाही काहीसा अंधारा वाटेल असा. त्यात परत दत्ताच्या मूर्तीखेरीज अन्य लो-बजेट दैवतांचं consortium तिथे भरलेलं. म्हणजे, नवग्रहांची तिथे दैवत म्हणून स्थापना झालेली दिसत होती. यातही, शनी या दैवताचा भाव सर्वार्थाने मोठा. साडेसाती चालू असलेल्या व्यक्तींची दर शनिवारी तेथे येऊन तेल (आणि बहुदा अन्य काही पदार्थही) वाहण्यासाठी इथे रीघ लागायची. आणि इतकं कमी पडतंय म्हणून तिथे मारुतीही होता. त्यालाही तेल वाहायची साडेसातीची पद्धत असते, किंबहुना शनी-मारुती ही बहुदा समस्या-समाधान या जातीची जोडी असते हे यथावकाश कळलं. या आश्रमात/मंदिरात येणाऱ्या लोकांचे भावसुद्धा गांजलेले वाटायचे. आयुष्यात अडलेले लोक, नापास होत असलेली मुलं, लग्न ठरवण्याचा प्रयत्न करूनही न जुळणाऱ्या मुली नि त्यांचे आईबाबा असा सगळा वर्ग. त्या मानाने गणपतीच्या देवळात तरुण मुलामुलींची सलज्ज कुजबुज किंवा, वृत्तपत्रीय भाषेतला गमतीदार शब्द वापरायचा तर, सगळी तरुणाई लोटलेली.
काकाच्या या धार्मिकतेचा प्रभाव किंवा सावट आमच्या कुटुंबावर पडलं यात काही नवल नाही. मी आणि माझी सख्खी नि चुलत भावंडं कमी-अधिक फरकानं या चक्रात आलो. वाढत्या वयात अन्य मुलं मैदानावर किंवा टीव्हीसमोर असताना, सायकलवर हुंदडताना आश्रमात, प्रसंगी उघड्याने, बसलेल्या त्या दीन अवस्थेमधे माझ्या मनात चाललेला एकमेव विचार मला आठवतो: मला इथे वर्गातल्या कुणा मुलानं, आणि त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे मुलीनं, पाहू नये. आता मागे पाहिल्यावर जाणवतं की, आमचे मित्रमैत्रिणी दत्तभक्तीची चेष्टा उडवताना, दत्ताच्या संदर्भातल्या 'श्रीपाद', 'पादुका', 'गाणगापूर', 'दिगंबर' या शब्दांचा उल्लेख आवर्जून आणायचे.
काका आणि आश्रमातल्या काही जुन्याजाणत्या बाबा लोकांचं इथे प्रस्थ होतं. लोकांच्या समस्यांवर 'तोडगे' सुचवले जात होते. यामधे जारणमारण तंत्रविद्या हे प्रकार नसावेत. मुख्यतः दत्तसंप्रदायाची काही स्तोत्रं, जप, काही पथ्यं, भस्म-अंगारे, रुद्राक्ष वगैरे गोष्टी. या तोडग्यांचं पथ्यही कडक. रोज सायंकाळी स्नान करून पुरुषाने गुरुचरित्र वाचायचं. ही बहुधा दत्ताच्या अवतारांची पोथी. स्त्रियांनी ही वाचणं वर्ज्य. प्रस्तुत कालावधीत घरातल्या कोणत्याही स्त्रीला पाळी आली, तर जणू आकाशच कोसळावे इतपत शुचितेचा आग्रह. तिने वेगळं काय बसायचं... पुरुषानंही ही पोथी वाचताना आपलं केसाळ अंग दाखवत उघड्यानं काय बसायचं... भस्माचे पट्टे काय ओढायचे... उत्तरीय म्हणून उघड्यानं राहायचं आणि अधरीय काय घालायचं, तर धाबळी या शब्दानं वर्णिलेलं पांढरट रंगाचं, कांबळ्यासारखं खरखरीत वस्त्र. एखाद्याला अस्थम्याचा त्रास असेल, तर तो मरेल अशा प्रकारचा धूप काय लावायचा... हे गुरुचरित्र म्हणजे काय प्रकर्ण आहे, नृसिंहसरस्वती इत्यादी लोक कोण नि कुठल्या कालावधीमधे होते, वगैरे माहिती खूप नंतर रा. चिं. ढेरे यांच्या पुस्तकात वाचायला मिळाली. (ती वाचताना मात्र फरसाण खात गादीवर पारोशाने लोळत अंगात शर्टपँट घालूनच ती वाचली होती हे येथे नमूद करणे भाग आहे.)
या धार्मिक वाङ्मयावरून एका विवक्षित विषयाचा उल्लेख येणं अपरिहार्य आहे. माझ्या या कळत्या-न-कळत्या वयात लैंगिकतेचा पहिला सणसणीत, इन-युअर-फेस असा झटका जर का अतिशय अनपेक्षितरीत्या कुठून बसला असेल, तर तो होता पुराणादिक 'धार्मिक' वाङ्मयातून! घरातल्या सर्वांत कर्मठ समजल्या जाणाऱ्या काकानं जी पुस्तकं दिली, त्यांतल्या काही पुस्तकांमधे जे होतं, त्याला विश्वरूपदर्शन किंवा विचित्रविश्वाचे विकृद्दर्शन असे म्हणावे लागेल. सरस्वतीचा जन्म, ब्रह्मदेवाचे तिच्यामागे लागणे, इंद्राची लालसा, परशुरामाची कथा... आणि एके दिवशी, या पुस्तकांच्या संग्रहातून हाती पडले 'नवनाथ कथासार'! बाप रे, यातल्या एकेका 'नाथाच्या' अवतारामधे लैंगिकतेची वर्णनं ठासून भरलेली होती. काही उदाहरणं पुरेशी होतीलः स्त्रीराज्यात अर्थातच केवळ स्त्रिया राहायच्या. त्यांची वंशवृद्धी कशी व्हायची? तर त्या नगरीच्या बाहेर मारुती बसायचा. त्याच्या भुभुःकाराने स्त्रियांना गर्भ राहायचा.
- कित्येक व्यक्तींचा जन्म हा पुरुषाचे 'रेत' सांडून, 'ऋतुस्नात' स्त्रीच्या द्रवाशी त्याचा संयोग होऊन, एखाद्या प्राणी/पक्षी/माशाने खाऊन, त्या श्वापदाला गर्भ राहून व्हायचा.(पहा: मीननाथाचा जन्म.)
- रेत, ऋतुस्नात, गुह्यांगे असे कितीतरी शब्द मला ही धार्मिक पुस्तकं वाचूनच कळलेले आहेत.
या साऱ्या धार्मिक पुस्तकांमधले जेंडर स्टीरिओटाईप्स, त्यातली एकूणच मूल्यव्यवस्था हा (थोडं सौम्यपणे बोलायचं तर) भयानक रोचक आणि (किंचित तीव्रपणे बोलायचं तर) प्रसंगी उलटी येईल इतपत विकृत मामला आहे.
यापैकी 'नवनाथ कथासार' आता ऑनलाईन उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी लाभ घ्यावा. http://navnath.net/simple_marathi.html
काकाच्या ओळखीमधे एक वृद्ध गृहस्थ होते. वेदशास्त्रपुराणे आणि इतर धार्मिक साहित्याचे वाचक. १४-१५ वर्षांचा असताना, त्यांच्या संग्रहातून मला 'अनंगरंग' या प्राचीन ग्रंथाचा मराठी (आणि बहुधा संक्षिप्त) अनुवाद मिळाला होता. तोवर नवनाथ कथासार वाचून झाल्यानं 'अनंगरंगा'चा धक्का प्रचंड नव्हता; मुख्य म्हणजे त्यातला संपूर्ण आशय लैंगिक कृतींच्या, अवयवांच्या, विचारांच्या संदर्भातला असला, तरी इतर कृतक्-धार्मिक साहित्यातल्या मजकुराप्रमाणे त्याचं स्वरूप लैंगिक भावना चाळवणारं नव्हतं. काही आकृत्याही होत्या. हे सारं पौगंडावस्थेत असलेल्या समजूतदारपणाच्या अभावामुळे पुरेसं 'मजेदार' वाटलं होतं. आधुनिक ज्ञानाच्या संदर्भात या साऱ्याचे संदर्भ आता पुरातन गोष्टींच्याइतपतच शिल्लक असले, तरी यात काहीतरी विचार आहे, पुराणं आणि इतर उठवळ प्रकार आणि हे यांत फरक आहे याची जाणीव तेव्हाही झालेली होती.
याच वयात वरवर चाळायला मिळालेलं एक विनोदी पुस्तक म्हणजे 'ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश म्हणजे मृत्यू' हे (बहुधा स्वामी शिवानंद असं लेखकाचं नाव असलेलं) पुस्तक. त्यात रक्ताच्या काही हजार थेंबांतून वीर्याचा एक थेंब बनतो (का याच्या उलट कायसंसं) असे विनोदी उल्लेख होते. त्या वयात हे सर्व वाचायची भूक खूप असली, तरी दुर्दैवाने (?) मला हे पुस्तक इत्थंभूत वाचता आलेले नव्हते.
दत्तसंप्रदायामधल्या गांजलेपणाचं सर्वात दाहक दर्शन हे मला दत्ताच्या काही ठिकाणांना झालेल्या एका यात्रेदरम्यान घडलं. या यात्रेची एकंदर व्यवस्था ज्याच्या-त्याच्या दृष्टिकोनानुसार गमतीची/रोचक/तापदायक/गलथान/आरामदायक वाटावी अशी. पुलंच्या 'म्हैस' या प्रसिद्ध कथेत शोभेल अशी बस. त्या कथेमधे बस 'सड्यावर यायला' जसे दोन तास लोटतात तीच गत; फक्त दोन तासांऐवजी सहासात तास. बसचं गंतव्यस्थान बहुधा सोलापूर किंवा गाणगापूर यांच्या अधेमधे असलेली नरसोबाची वाडी आदी स्थान. बसमधे 'दिगंबरा दिगंबरा'सारखी गाणी, भस्माचे पट्टे लावलेली संसारी जनता आणि 'सिद्ध' लोकांचा समुदाय. मजल दरमजल करत बस रात्रीअपरात्री पोचणार एका धर्मशाळावजा ठिकाणी. तिथे अपरात्री एका देवळाच्या आवारात मिणमिणत्या उजेडात जेवणं. राहण्याची काहीशी गैरसोयीची व्यवस्था. हे सर्व एका लहान मुलाकरता मुलंमुलं मिळून गंमत करण्याच्या, परंतु त्याचबरोबर स्त्रीवर्गाचे निषेधाचे उद्गार ऐकण्याच्या, एकंदर प्रकारातल्या विसंगती टिपण्याच्या कळत्या-नकळत्या वयातलं. गाणगापूरला दुसऱ्या दिवशी सकाळी कडाक्याच्या थंडीत या सर्व भाविकांची लहान मुलं आणि स्त्रिया यांच्यासकट सकाळी सहाच्या सुमारास गावाच्या दहाएक मैल टापूत अनवाणी पायांनी घातलेली अष्टतीर्थ या प्रकाराची घातलेली प्रदक्षिणा. यामागची आख्यायिका (काहीशी) अशी की, 'नृसिंहसरस्वती' या दत्ताच्या 'अवतारी' पुरुषाने नदीकाठच्या सात-आठ ठिकाणी आपली स्नानाची ठिकाणं निवडलेली होती. यांपैकी प्रत्येक ठिकाणी जाऊन डुबकी मारणं. या सर्व प्रकारातलं कारुण्य याहून अधिक काय वर्णावे. दुपारच्या जेवणानंतर सायंकाळी गाणगापूरच्या प्रसिद्ध दत्ताच्या देवळात घेतलेलं दर्शन ही घटना मी कधी विसरू शकेन असं मला वाटत नाही. संध्याकाळचे सहासात वाजलेले असावेत. देवळात पोचल्यानंतर तिथे भिकारी वाटतील अशा लोकांचा समुदाय मंदिराच्या मंडपात जमलेला. देवळात भिकारी असायचेच; परंतु हा प्रकार वेगळा होता. तिथले बहुतेक सगळे लोक अंगात आलेले होते. "दत्त्या..." अशी हाक मारून अर्वाच्य शिव्या देत ते पायरीच्या दिशेने पुढेपुढे सरकत होते. पायरीपर्यंत आल्यानंतर त्यांना कुणीतरी अंगारा लावायचें नि त्यानंतर ते शांत होताना दिसत होते. एरवी शूरवीर असण्याच्या गप्पा मारणारा, दहाएक वर्षांचा मी, ते पाहून गोठलो होतो. बरोबरीच्या मुलांमधल्या काहींची - विशेषतः काही मुलींची - अवस्था याहून अधिक शोचनीय होती, हेवेसांनल. या सर्व गदारोळातून वाट काढून भाविकांची मांदियाळी त्या पायऱ्यांवरून त्या गाभाऱ्यापर्यंत पोचली. तिथे जे दर्शन घडलं, त्यात दत्ताची मूर्ती नव्हतीच. होते ते वरवंट्याच्या आकाराचे दोन गुळगुळीत, संगमरवरी वाटतील असे दगड. या होत्या (बहुदा नृसिंह सरस्वती यांच्या) निर्गुणी पादुका. देवदेवता, अध्यात्म, या साऱ्या गोष्टींवरचं भ्रमाचं पटल पुरतं गळून पडेल अशी ताकद या, सकाळच्या सहा वाजण्याच्या कडाक्याच्या थंडीत नदीत आठ ठिकाणी मारलेल्या डुबक्यांपासून सुरू झालेल्या आणि या संध्याकाळच्या दर्शनाने संपलेल्या, दिवसात होती हे इथे नमूद करणं भाग आहे. पुढे हेच वर्णन अनिल अवचट यांच्या 'धार्मिक' नावाच्या पुस्तकातल्या दत्तभक्तीवरच्या प्रकरणात वाचल्यानंतर ओठांवरची स्मितरेषा आणि त्याचबरोबर त्या दिवसाच्या कष्टप्रद आठवणी या दोन्ही एकाच वेळी उमटल्या होत्या.
काकाच्या अनुषंगाने जवळून पाहिलेल्या दत्तभक्तीच्या या टापूमधे शेगावचे संत गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, अक्कलकोटचे स्वामीसमर्थ या दैवी पुरुषांची आमच्या शहरातली देवस्थानं आणि त्यांची हेडक्वार्टर्स यांचीही दर्शनं घडली. त्यामधल्या विसंगती जाणवत गेल्या. आस्तिकतेशी असलेलं नातं तुटण्याच्या प्रक्रियेमधे 'बरं, जर का हा जो देव त्याच्या तेहेतीस कोटी भावंडांसकट आकाशात राहत असला, तरी त्याच्यापर्यंत पोचायला मला या विविध एजंट्सची गरज काय? आणि मग असल्या एजंट्सची गरज असलेली ही व्यापारी संस्था आणि माझा (मला नक्की काय ते माहीत नसलेला) आत्मा या प्रकारांचा आपापसांत नक्की संबंध काय?' हे महत्त्वाचे टप्पे कार्यभूत होते.
तत्कालीन एकत्र/विभक्त कुटुंबपद्धती, त्यांचा खासगीपणावर झालेला परिणाम, चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत स्त्रियांचं असलेलं समाजातलं, कुटुंबातलं स्थान, आस्तिकता-नास्तिकता आणि त्यांतील धर्मकर्म, पथ्यं, सोवळंओवळं या प्रकाराचा घरातल्या स्त्रिया-मुलांवर होत असलेला परिणाम, एकंदर स्वतंत्र विचार करण्याच्या प्रवृत्तीवर पडलेलं आस्तिकतेचं जूं या साऱ्याचा संबंध बगारामकाकाशी जोडला जातो असं आज मागे वळून पडताना मला वाटतं. इथे थोडं कौटुंबिक पातळीवरचं खासगीपण लिखाणात येणार, ते अपरिहार्य आहे. उपरोक्त विषयांवर काका आणि त्याच्या धार्मिकतेचा आमच्या आणि आमच्या चुलत भावंडांच्या घरांवर झालेला परिणाम जरी माझ्या दृष्टीने अत्यंत नकारात्मक होता, तरी ही सर्व गेल्या पिढीतली मंडळीही स्वतः धार्मिक प्रवृत्तीची होती हे नमूद करायला हवं. आणि ब्रह्मचारी, एकटा असलेल्या या भावाबद्दल भावांच्या मनात प्रेम होतं.
ही आस्तिकता आणि हे रक्तानात्याचं प्रेम या दोन गोष्टी धार्मिकतेच्या खाली दबले जाण्याच्या प्रवृत्तीपासून वेगळं काढणं तितकंसं सोपं नाही. माझी आई आणि तिच्या सर्व जावा यांनी काकाला वर्षानुवर्षं बरंच सहन केलं. आमच्या आधीच टीचभर असलेल्या घरात वर्षानुवर्षं काकाची सोवळीओवळी आणि धर्मकर्म पाळणं आणि त्याचबरोबर मुंबईच्या लोकलने जाऊन नऊ ते पाच नोकरी करणं या गोष्टीकरता मी मनोमन आईला शांततेचं नोबेल पारितोषिक देऊन कधीच मोकळा झालेलो आहे. परंतु आजदेखील आई आणि माझ्या बाकीच्या काकवा या ब्रह्मचारी बगाराम काकाबद्दल, त्याच्या धर्मिकतेव्यतिरिक्त कुठल्याही नसलेल्या नखऱ्याबद्दल जिव्हाळ्याने बोलतात, तेव्हा त्याच पार्श्वभूमीवर 'या माणसाने आमच्या खेळाच्या वेळा नासवल्या' याबद्दल मनात पराकोटीचा कडवटपणा बाळगणारा मी अंतर्मुख होतो. हा आमचा काका त्याच्या इतर सर्व भावंडांच्या नंतर निधन पावला. आम्हा चुलत भावंडांनी मिळून त्याची व्यवस्था केली. त्याच्या धार्मिक श्रद्धांमुळे त्याला वृद्धाश्रमात ठेवणं योग्य नाही, म्हणून शेवटपर्यंत तो सर्वांच्या घरात थोडा-थोडा काळ होता. आजच्या काळात, आईवडलांपैकी कुणी नसलेल्या एका वृद्ध व्यक्तीच्या प्रकृतीचीच नव्हे - तर शेवटपर्यंत त्याच्या, तोपर्यंत सर्वांनाच चुकीची वाटायला लागलेल्या, मूल्यांचीही - काळजी वाहून शेवटपर्यंत त्याची शुश्रूषा केली जाणं हा मला काकाच्या सर्व देवदेवता आणि बाबामहाराज यांच्या आख्यायिकांमधल्या चमत्कारांपेक्षा मोठा चमत्कार वाटतो खरा.
विशेषांक प्रकार
उत्तम लेखन. गावाकडे आमच्या
उत्तम लेखन. गावाकडे आमच्या नव्या घरी अप्पा (काका) राहायचे. व जुन्या घरी आम्ही. आमचे घाटपांडे घराण्याचे रामाचे मंदीर. त्यामुळे रामाचे प्रस्थ घरात मोठे. पण अप्पांच्या कडे मात्र दत्ताचे प्रस्थ. आपला देव हा राम असताना आप्पा दत्ताच्या नादी का लागतात हे मला मोठे कोडे वाटायचे. घरी धार्मिक कुळाचार हा आमच्याकडेच व्हायचा. आप्पा त्यात दत्ताची आरती मोठ्या खुबीने घुसवायचे. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन अस काही तरी तल्ल्लीन होउन म्हणायचे.
छानच
"आध्यात्मिक" मार्गातला आहे.
लहानपणापासून माझ्या पापभिरू/देवभोळ्या वगैरे वडिलांच्या तोंडूनही वरील वाक्याऐवजी "तो अध्यात्माच्या 'लायनीतला' आहे." किंवा "नाही रे तो नोकरी/धंदा करत नाही. त्याने अध्यात्माची लाईन पकडलीये" असेच येत असे/असते. त्यामुळे की काय कोण जाणे अध्यात्म/धर्म वगैरे बाबी या पोटे भरण्यासाठी उपलब्ध असलेल्या 'लायनीं'पैकी एक लाईन आहेत असाच समज माझा झाला असावा असे आता वाटते.
या लेखातील अनुभव रोचक वगैरे आहेच, पण त्यातील विस्कळीतपणामुळे की काय कोण जाणे अगदी समोर बसून गप्पा माराव्यात इतका सहज व 'खरा' वाटतो.
अवांतरः
खरं तर इथे हे लिहिणं अस्थानी आहे पण असं काही वाचलं की एक प्रश्न डोक्यात येतो. मी ज्या ज्या परदेशात 'सेट' झालेल्या व्यक्तींना भेटलो आहे किंवा भारताबाहेरच कायमचे रहाणार्या व्यक्तींना भेटलो आहे, त्यापैकी बहुसंख्यांच्या पूर्वायुष्यात या आत्यंतिक कर्मठपणाचा/धार्मिकपणाचा/प्रतिगामीपणाचा मोठा/लक्षणीय वाटा दिसून आला आहे. (अर्थात काही अपवाद आहेतच, पण माझ्या अनुभवापुरते ते नियम सिद्ध करण्यापुरतेच आहेच). एके काळी माझा समज असा होता की परदेशात स्थायिक होण्यामागे 'पैसा' हे अनेक कारणांतील सर्वात महत्त्वाचे कारण आहे. पण आता पैसासोबत किंबहुना त्याहून किंचित अधिक इथे भोगलेले प्रतिगामी वातावरण याला अधिक कारणीभूत आहे असे वाटू लागले आहे. (म्हणजे स्वतः भोगले ते पुन्हा भोगावे लागू नये हे आहेच शिवाय आपल्या अपत्यांनाही ते भोगावे लागू नये असेही आहे). धार्मिक टोके गाठणे, स्त्रियांना पराकोटीची दुय्यम वागणूक, कर्मकांडांचा वैयक्तिक जीवनात हटवादी शिरकाव आदी गोष्टींचा या 'ब्रेन ड्रेन'मागे मोठा वाटा आहे असे वाटु लागले आहे.
मला परदेशात चार-सहा महिन्यांपेक्षा अधिक रहायचा कंटाळा येतो. तिथे लोक रहाण्यासाठी का इतके झटतात याचा मला नेहमीच अचंबा वाटत राहिला आहे. पण त्याचे कारण मला आर्थिक मिळकत सोडल्यास वैयक्तिक/कौटुंबिक पातळीवर इथे आणि तिथे फारसे वेगळेपण भोगावे लागत नाही हे यामागचे इंगित असावे असे वाटू लागले आहे.
वरच्या लिखाणाशी याचा थेट संबंध नाही पण असं काही वाचलं/ऐकलं की आपण किती 'लकी' आहोत असे वाटू लागतं आणि वर लिहिलेत तसे विस्कळीत विचार मनात डोकावतात.
रोचक
यावरुन एक विचारावेसे वाटते. पूर्वीच्या काळी आसपास अथवा नात्यात असा कोणी काका अथवा आत्या वगैरे आध्यात्मिक अविवाहीत असायचे. कधी घरी असायचे कधी कोठल्या मठात. जसे सामान्यतः लोक नोकरी-लग्न-संसार यात अडकले असायचे तसे कोण्या न कोण्या कारणाने [बॉर्डरलाईन शारिरीक समस्या, बॉर्डरलाईन मानसीक समस्या, समलैंगिक असणे, नोकरी-लग्न-संसार यात पात्र/कौशल्य नसलेले अथवा स्वेच्छेने नाकारलेले] यात न उतरु शकलेले लोकांना ज्यांना अन्य पर्याय नव्हता त्यांना आध्यात्मिक करीयर असणे ही एक समाजाने केलेली सोय होती काय? अर्थात धार्मिक पगडा असलेल्या कुटुंबात लहानपणापासुन एखाद्या व्यक्तीला कुटूंबप्रथेने जबाबदारी वगैरे वगैरे मार्गाने जबरदस्ती ह्या मार्गात लोटले गेले असेलही.
आपल्या समाजात समस्या असलेल्या, बेकार असलेल्या, परंपरेने चाललेल्या चक्रात फिट न होउ शकणार्या लोकांना जी वागणूक मिळायची त्यापेक्षा असे अध्यात्मीक करियर असणे सोयीचे होते काय?
+१ -१
शक्यता इंटरेस्टिंग आहे. (रोचक शब्द वापरायचा कंटाळा आला)
पण अध्यात्माची आवड हीच एक बॉर्डरलाईन मानसीक समस्या असं माझं कट्टरवादी मत बनत चाललं आहे.
अर्थात कट्टरवादी मत बनणं ही पुन्हा बॉर्डरलाईन मानसीक समस्या आहेच.
पण त्याची जाण असणं म्हणजेच तुम्ही नॉर्मल असण्याचं सर्टिफिकेट असण्यासारखं आहे.
असं स्वतःच स्वतःला सर्टिफिकेट देउन घेणं ही सुद्धा एक नार्सिसिट बॉर्डरलाईन मानसीक समस्या आहेच. ;)
.
जोक्स अपार्ट, सहमत आहे.
शेवटच्या परिच्छेदामुळे हा लेख
शेवटच्या परिच्छेदामुळे हा लेख जन्रल क्याटेगरीतून स्पेश्शलमधे आलाय. एरवी तथाकथित धार्मिकतेबद्दल वाटणारा तिटकारा तसा बर्यापैकी सार्वत्रिक आहे.
अवांतर: वरचं ऋषिकेशचं निरीक्षण बाकी जबरा आहे.
अजून अवांतर: मी असल्या देवस्थानाला कधी गेलेले नाही. पण 'देऊळ'नं हा अनुभव माझ्यासाठी त्रिमित करून दिल्याचं जाणवलं.
भारतात राहूनही तुम्हाला
भारतात राहूनही तुम्हाला देवस्थानाला बखोटिला धरुन, भिडेला घालून कुणी नेलं नाही म्हणजे तुम्ही नशीबवान आहात.
असे काही वाचले की आधी म्हटले तसे नशीबवान वाटतेच.
देवस्थानाला जबरदस्ती नेलं नाही किंवा नारायण नागबळी वगैरे कांड करायला कोणी सुचवताच मी नकार दिल्यावर कोणी दबाव आणला नाही किंवा लग्नानंतर देवस्थळी गेल्याशिवाय हनीमूनला न जाण्याचा अजिबातच आग्रहच काय, साधे आडूनही सुचवलेही गेले नाही किंवा पत्रिका न पाहता लग्न करण्यास तात्विक/प्रॅक्टिकल असे कोणतेही विरोध झाले नाहीत किंवा नव्या घरात आजतागायत कोणी सत्यनारायण तरी घाल म्हणून मागे लागलेले नाही किंवा मुलीची पत्रिकाच न काढणे काय कोणतेही धार्मिक विधी कर म्हणूनही अवाक्षर नाही वगैरे बरेच काही मला 'नशीबवान' म्हणायला पुरेसे आहे. :)
आणि हे सगळे घरातील व्यक्ती / नातेवाईक या सगळ्या गोष्टी मनापासून करत असूनही!
अर्थात माझी या संबंधीची मते सगळ्या परिचितांना पुरेशी ज्ञात आहेत - मी ठामपणे करवून देत असतो हे खरेच. पण त्यामुळे घरातील/जवळच्या नात्यातील/ मित्रांतील/नाते नाही पण तरी जवळच्या व्यक्तीपैकी कोणी मला वेगळी/दुय्यम/अन्याय्य/हेटाळणीयुक्त वागणूक दिल्याचा अनुभवही नाही (बाकी (चुकून असलेले) परिचित/ शेजारी वगैरे काय म्हणतात ते रोचक असले तरी माझ्यासाठी अजिबातच महत्त्वाचे नाही). पण त्यामुळे सार्याच धार्मिक/देवभोळ्या व्यक्ती 'साचलेल्या' नसतात असा माझा वैयक्तीक अनुभव आहे हे ही खरेच. [कदाचित म्हणूनच मला कोणत्याही सामाजिक प्रश्नात धार्मिक अँगल दिसत नाही - किंवा ठेवायची गरज वाटत नाही]
किळसवाणा गुंता
लेखातले सारेच अनुभव अगदी अंगावर आले. अस्तिकता, धार्मिकता, भक्ती आणि कर्मकांड यांचा असा एक किळसवाणा गुंता आपल्या देशात झालेला आहे.
संध्याकाळचे सहासात वाजलेले असावेत. देवळात पोचल्यानंतर तिथे भिकारी वाटतील अशा लोकांचा समुदाय मंदिराच्या मंडपात जमलेला. देवळात भिकारी असायचेच; परंतु हा प्रकार वेगळा होता. तिथले बहुतेक सगळे लोक अंगात आलेले होते. "दत्त्या" अशी हाक मारून अर्वाच्य शिव्या देत ते पायरीच्या दिशेने पुढेपुढे सरकत होते. पायरीपर्यंत आल्यानंतर त्यांना कुणीतरी अंगारा लावायचे नि त्यानंतर ते शांत होताना दिसत होते. एरवी शूरवीर असण्याच्या गप्पा मारणारा, दहाएक वर्षांचा मी ते पाहून गोठला होतो. बरोबरीच्या मुलांमधल्या काहींची - विशेषतः काही मुलींची अवस्था याहून अधिक शोचनीय होती, हेवेसांनल.
>>>>>>
गाणगापुरात अमावस्या-पौर्णिमेच्या रात्री तर कहर असत असे. (तो लोखंडी गर्डरने बनवलेला पाच मजली उंच मांडव आणि त्यावर विळखे देत वर-वर चढणार्या, आचकट-विचकट शिव्या देणार्या त्या 'अंगात आलेल्या' (खरेतर मनोरुग्ण) बायका.) मी हा प्रकार पाहिला तेव्हा आठवीत असेन. बाहेर येऊन भडाभडा ओकलो होतो. मनात कायमचा रुतून बसलेला अनुभव.
लेख आवडला
लेख आवडला. अगदी डोळ्यासमोर ते प्रसंग उभे राहिले. असल्या अनुभवानंतर या सगळ्या धार्मिक कान्डांचा वीट किंवा प्रत्यक्ष देवावरचीच श्रद्धा आटून गेली असल्यास नवल नाही.
नशिबाने माझ्या आयुष्यात असले काही असते याचीही मला जाणीव नव्हती. माझे वडील आम्हा मुलांना खावेसे वाटले तर गणपती घरात बसलेला असताना मटण घेऊन यायचे. लहानपणी कधीही कुठल्याही देवस्थानाला भेट दिल्याचे स्मरत नाही. आता माझी बहिण खूप देवाचं करते, मलाही मन:शांतीसाठी हे वाच ते वाच म्हणून मागे लागते. माझं मन त्यात रमत नाही हे गोष्ट वेगळी. पण जर तिला त्यातून मानसिक समाधान मिळत असेल तर तिने बैठकीला (ती कसली असते हेही मला माहित नाही.) जाण्यात मला काहीच गैर वाटत नाही. माझ्या मते ते एक प्रकारचे counseling च आहे. जोपर्यंत तुम्ही कुणाला त्रास देत नाही आणि तुमचे मत कुणावर लादत नाही तोपर्यंत तुम्ही मन:शांती कशात शोधता आहात हे माझ्या दृष्टीने गौण आहे.
आता तुमच्या काकांची गोष्ट वेगळी हेवेसांन.
आजच्या काळात, आईवडलांपैकी कुणी नसलेल्या एका वृद्ध व्यक्तीच्या प्रकृतीचीच नव्हे तर शेवटपर्यंत त्याच्या, तोपर्यंत सर्वांनाच चुकीची वाटायला लागलेली होती अशा मूल्यांचीही काळजी वाहून शेवटपर्यंत शुश्रूषा केली जाणं हा मला काकाच्या सर्व देवदेवता आणि बाबामहाराज यांच्या आख्यायिकांमधल्या चमत्कारांपेक्षा मोठा चमत्कार वाटतो खरा.
अगदी सहमत
स्वानुभवाचे छान संकलन.
स्वानुभवाचे छान संकलन.