Skip to main content

Somehow I want to die

Somehow I want to die

लेखिका - जुई

हाय् ! माझं नाव सुमुख धोंडे. मला मरायचं होतं, त्याची ही कथा.

'मी कसा जगलो', असं सगळे लिहतात म्हणून आपलं मी ठरवलंय, की मी कसा मेलो, ते लिहायचं. वाचा नाहीतर चावा. काहीजण हसतील पण. त्यांनी हसा. आपल्याला काय फरक पडतो?

तर मी कसा मेलो.

मला आपलं मरायचंच होतं. बरोबर आहे, माझ्यासारखी विलक्षण वेगळी इच्छा असलेल्या माणसाला जसं वागवलं जातं तसंच मला वागवयाला लागले लोक.

पुस्तकी शिक्षण वगैरे आपल्याला फारसं काही जमेना. आमच्या घरात थोडी अध्यात्माची परंपरा आहे. आई त्याला 'भिकेचे डोहाळे' म्हणते पण माझ्या अप्पांनी कायम त्याचं महत्त्व सांगितलं.

अप्पा म्हणजे माझा बाप. एक अवलिया.
अर्थात ते स्वतः काही उद्योगधंदा न करता दिवसेन् दिवस गायब होत. सिगारेटींच व्यसन कायमचंच.

माझी आईच आमचे घर चालवते आणि त्याचा तिला कोण अभिमान होता. असणारंच म्हणा ! अप्पा म्हणायचे, 'सहन करायचा तिचा अभिमान, गोंजारायचं तिला. म्हणजे निमूट आपल्याला हवं ते करत जगता येतं'. ते स्वतः त्यांची मर्जी आली की महिनोन् महिने गायब होत. मला त्यांच्यासारखं गायब व्हावं असं कधी नाही वाटलं, पण मला मरावं असं वाटू लागलं. त्याचं काय आहे, की जन्माला आलेला प्रत्येक जीव जगायच्याच मागे असतोय. एक माणूस हाच प्राणी असा आहे, ज्याला आत्महत्येची निवड करावीशी वाटते. ही माणसाचीच विशेषता आहे. हे सालं काय गूढ आहे, ते मरूनच बघायला पाहिजे.

हे विचार आले तेंव्हा मी अप्पांच्या गुरूंच्या तसबिरीकडे बघत होतो. म्हणजे मला साक्षात्कारच झाला, असं मी समजतोय. हे गुरू तरुण असतानाच गेले. मग आपण ठरवलं की मरून बघायचं.

तर त्या प्रयत्नांची ही कथा.

प्रसंग १

पहिल्यांदा मी नदीकिनारी गेलो... मला नं पाणी फार फार आवडतं. आमच्या घरात करंगळीधार स्नानं करून करून कंटाळा आला होता.

तेंव्हा म्हटलं मरताना तरी मस्त ऐशमध्ये भरपूर पाणी अंगभर, अंगात आणि अंगाबाहेर असेल, असं मरावं.

उडी मारली.

धप्प आवाज आला.

अस्मादिक बद्द्कन दगडावर आपटले. अहो नदीत गुडघाभर पाणी होते. दर वर्षीप्रमाणेच या वर्षी पण पुरेसा पाऊस कुठे झाला होता ?

साला... सडकून आपटलो.

पलीकडे चार पाच बाया धुणी धूत बसल्या होत्या. त्या लगबग आल्या, भरपूर कालवा केला... एक आजीबाई होती, तिने मुस्काडीत मारून वर धोपटले.

घरी आणून सोडले. आईने वर दोन थोबाडीत दिल्या आणि रडत बसली.

प्रसंग २

यावेळी बाहेर जाऊन काही तमाशा करण्याची रिस्क नको होती.
आमच्याकडे बाहेरच्या एकुलत्या एक खोलीत पंखा आहे. त्याचाच वापर करूया, असे ठरवले.

माळ्यावरून दोर काढला, पंख्याला बांधला. खाली स्टूल ठेवले.
या वेळी तरी नक्की मरणार मी. कोरडं कोरडं का होईना, पण मरण येणार.

धाप्पकन आवाज आला. अस्मादिक खाली जोरदार आपटले.
दोर तुटला होता. गळ्याला थोडेसे खरचटले बस्, बाकी काही झाले नाही.

या वेळी कुणी पहिले नाही त्यामुळे काही तमाशा झाला नाही, हे भाग्यच.

प्रसंग ३

या वेळी तरी नक्की...

दुपारची सुनसान वेळ...

बिल्डींगमध्ये दुसर्‍या मजल्यावरच्या शहांच्या ग्रिल्-बाल्कनीमध्ये चढलो. टेरेसवर जायचा रस्ता आमच्याकडे बंद करून ठेवलाय त्यामुळे असं - एक बाल्कनी चढूबाई दोन बाल्कनी चढू - करतच टेरेसवर जावं लागणार होतं.

शहांची मुलगी बाल्कनीत आली, तिने एकदम किंकाळी फोडली.
तिच्या त्या भयानक किंकाळीला घाबरून मी एकदम हात सोडून दिले.
वॉचमनला वाटलं चोर आला आहे. तो पळत मागे आला.
यावेळेस मोठ्ठा धप्प खाली पडलो, ते वॉचमनच्या अंगावर.

माझा हात मोडला, वॉचमनचा पाय.

आईला दोघांच्याही उपचारांचा खर्च करावा लागला. कधी कधी कीवच येते हो आईची. पण मी तरी काय करणार! 'तिच्या नशिबी असा नवरा आणि मुलगा असणं, हा तिचा कर्मभोग!', असं अप्पांचं एक आवडतं वाक्य आठवलं.

पण साला मला मरायचंय.

प्रसंग ४

या वेळी काहीही झाले तरी मी मरणार आहे.

ग्यास चालू केला. सगळ्या घरात वास भरला.
काडेपेटीतली काडी ओढू लागलो तर पेटेना. सादळली असावी.
लायटर सापडेना.

बाहेर कार्टी क्रिकेट खेळत होती, त्यांच्यापैकी कुणाला तरी सुगावा लागला. शेजारचे बापट आले. त्यांनी आधी बाहेरचं मीटर बंद केलं. ब्याटने खिडकीची काच फोडली. घरात घुसून ग्यास बंद केला... मला ओढत बाहेर आणलं.

यावेळीही भरपूर मुस्काटीत खाल्ल्या. आधी बापटांकडून, मग आईकडून.
सगळे बिल्डींगमधले आता म्हणायला लागलेत, की याला मेंटलमध्ये टाका. आईला काही कळत नाही काय करावं ते... एकटी बिचारी काय काय करेल. अप्पा आल्यावर टाकते म्हणाली.

पण मला नाही जायचं, कारण मला मरायचंय. तिथे गेलो तर मरणार कसा?

सालं, अप्पा यायच्या आत काही ना काही करायला पाहिजे. अप्पा म्हणजे अवलिया. कधी उगवतील ह्याचा त्यांनाही पत्ता नसतो.

प्रसंग ५

काहीही झालं तरी मी मरणार आज.

अंधार पडायचा सुमार... आमच्या गावात रस्त्यावरचे दिवे असले आहेत, की अजूनच अंधार-अंधार वाटतं.

आर्. जे. पुलाकडून आमच्या 'जुनी सह्याद्री'कडे वळणारं वळण डेंजर आहे.

तिथे पडून राहिलो... निवांत... म्हटलं ट्रक येईल, एक बस तरी येईल.
एक रिक्षा आली जोरदार भुर्र करत.

दुर्दैव पाठ सोडायला तयार नाही. रिक्षावाल्याने पाहिलं. ह्यांडल् गर्रकन फिरवलं.

रिक्षा जवळपास आडवी.
मी तसाच.

रिक्षावाल्याने उतरून आधी चार थोतरीत हाणल्या. नशीब, त्याला काही लागलं नाही !

चार लोकं जमलेच. त्यांनी त्याला समजावलं, की आपला स्क्रू कसा ढिल्ला आहे ते.
तर असे हे माझे मरायचे प्रयत्न.

आता तुम्ही विचाराल, की शेवटी काय झालं ? मेला का नाही ? कसा मेला ? कुठे मेला ? इतक्या वेळा फजिती होऊन जगला कसा ?

तर जनहो, आपण मेलो बरं का एकदाचे !
पण कसे ते सांगणार नाही.
ते सस्पेन्सच ठेवणार.

आपल्यालाही इथे तेवढीच करमणूक आहे राव! इथे लोचा झालाय हो फार. एकदा मेलं की परत मरता येत नाही नं. आता करावं काय ?
त्या साधूबाबांची कॉपी करायला गेलो आणि जगायचा (सॉरी मरायचा) लोचा केला.

आता पुढे काय ?

विशेषांक प्रकार

मन Tue, 29/10/2013 - 10:00

शेवट(शेवटच्या सहा ओळी) समजला नाही.
बाकी सर्व लिखाण बर्‍याचदा वाचणयत आलेलं आहे. नक्की कधी, कुठे ते आटह्वत नाही. ध़अलपत्रात, का अजून एखाद्या प्रसिद्ध आर्टिकलमध्ये वगैरे.
पण वचण्यात आलं आहे.( "माणूस जीव द्यायचा प्रयत्न करतो पण त्यात त्याची फजिती होते" ह्या थीम्वर काहीतरी)

'न'वी बाजू Tue, 29/10/2013 - 19:41

In reply to by ॲमी

पण कसे ते सांगणार नाही. ते सस्पेन्सच ठेवणार.

कोणाला घेणेदेणे आहे? एकदा(चे) मेल्याशी (ब्याद टळल्याशी) कारण! (म्हणजे पुन्हा असले काहीतरी रटाळपुराण ऐकावे लागणार नाही.)

सहज Tue, 29/10/2013 - 10:58

नेमके काय म्हणायचे आहे लेखातून? हा आता लेखन हे काय नेहमी म्हणणे मांडण्यासाठी नसते त्यातील एक शब्दाची वीण / उठणारी आवर्तने बघायची, अनुभवायची असते, शब्दांच्या पलीकडे बघायचे असते. गोष्टीचा प्रवास पुढे आपल्या मनात सुरु करायचा असतो वगैरे युक्तीवाद असेल तर ठीक आहे आय एम व्हेरी सॉरी, आय आस्क्ड...

पण ती बाहुलीची एक कविता आहे ना, पोळी केली करपून गेली, भात केला कच्चा झाला, वरण केले पातळ झाले. त्याचेच एक व्हेरीएशन वाटले. तर शेवट मिस्टर नटवरलाल म्हणतात तसे खुदा की कसम मजा आ गया मुझे मारकर बेशरम खा गया....

त्याचे काय आहे. इतर वेळा लेख आला तर सोड्ता येते पण दिवाळी अंकातून आणला गेलाय म्हणजे त्या लेखात काहीतरी स्पेशल पाहीजे ना? का सणाच्या दिवशी पण उगाच पोळी, जाम, फ्रिज मधली कालची बटाटा भाजी खायची?

कोणी जाणकार खुलासा करेल काय?

शिवोऽहम् Wed, 30/10/2013 - 15:29

हे लिखाण वाचुन जरा बुचकळ्यात पडलो. दोन वेळा वाचुन काही वेगळे प्रोफाईल्स दिसतात का ते पाहिले. पण पाराच तो, हाती कसा मिळावा! 'आपला कलाव्यवहार आणि आपण' अशी जी या अंकाची थीम आहे, त्याच्याशी संगती लावणे मला काही जमले नाही.

दिवाळीच्या शुभेच्छा! मोती-स्नानाची वेळ झाली!

ऋषिकेश Wed, 30/10/2013 - 15:33

In reply to by शिवोऽहम्

सगळे लेखन 'थीम'वर आधारीत नाही. एकूण अंकातील काही भाग या थीमला वाहिलेला आहे.
या पानावर लेखनाचं वर्गीकरण मिळेल.

मन Wed, 30/10/2013 - 15:36

In reply to by ऋषिकेश

पण ललित म्हणूनही समजलेलं नाही. विशेषतः शेवट.
(आता लेखकाल किम्वा इतर कुणाला हे उलगडून सांगावे लागणे म्हणजे "अरसिकीषु कवित्व निवेदनम् शिरसि मा लिख मा लिख मा लिख" ह्या उक्तीप्रमाणेच थरेल. पण तरीही कुणीतरी शेवट नीट लोकांनी ते सांगावा असं मला वाटतं.)

शिवोऽहम् Wed, 30/10/2013 - 16:50

In reply to by मन

+१

धनंजय Wed, 30/10/2013 - 18:32

In reply to by मन

निवेदकाला शेवटी कळते की मरण्यापेक्षा प्रयत्नांतच आपली अधिक रुची आहे. परंतु तोवर एकदा कधीतरी मृत्यू आलेला असतो. मृत्यूनंतर प्रयत्न करणे आणि फसणे या चक्राची गंमत पुन्हा अनुभवता येत नाही.

मन Wed, 30/10/2013 - 20:21

In reply to by धनंजय

आयला असय होय हे.
मग विंटरेष्टिंग आहे.
"मंजि़ल से बेह़तर लगने लगे है यह रास्ते
आओ खो जाए हम| हो लापता "
असा भाव दर्शवायचा असेल, साध्यापेक्षा साधनाच्या मोहात गुंतून जाणं दर्शवायचं असेल तर पहिले काही परिच्छेद चाम्गले जमलेत.
स्वामी समर्थांनी* अशाच एका साधकाला जो अर्ध्यामार्गावर अडकला होता, साधनेच्या मोहात इंटर मिजिएट लेवलला अडकला होता त्याला
"रंडीया छोडी की नही अबतक" असे म्हटल्याची एक गोष्ट आठवली.

मी Thu, 31/10/2013 - 19:15

:) बिल मरेचा Groundhog Day पहा, ह्या लेखाने मला बिलच्या पात्राने सिनेमात मरायसाठी केलेल्या अनेक प्रयत्नांची आठवण करुन दिली.