दोन शब्द
दोन शब्द
'ऐसी अक्षरे'ला दोन वर्षे पूर्ण झाली. "अन् इसवीसन कवायतीचा कदम उचलुनि पुढे सरकला" ह्या उक्तीप्रमाणे तुमची-आमची-सर्वांची वाटचाल एका यत्तेने पुढे गेली. 'ऐसी'चा वाढदिवस साजरा करायच्या सुमारालाच दिवाळी येते. हा दुहेरी सोहळा साजरा करण्यासाठी हा दिवाळी अंक प्रकाशित करायला सुरुवात करताना आनंद होत आहे. दिवाळी अंकाच्या संदर्भात आलेला उदंड प्रतिसाद, त्याची गुणवत्ता ह्या सर्व बाबी लक्षात घेता दिवाळी अंकातील सर्वच्या सर्व मजकूर एकाच दिवशी प्रकाशित करणे हे त्याच्या दर्जावर काहीसा अन्याय करणारे आहे हे आमच्या लक्षात येत गेले. ह्या उत्तमोत्तम मजकुराचा आस्वाद वाचकांना यथोचित घेता यावा, म्हणून दिवाळी अंकाचे प्रकाशन ही एकच एक घटना न करता, तो क्रमाक्रमाने प्रकाशित करावा असा निर्णय आम्ही यंदा घेत आहोत. ऑनलाईन साहित्य, माहिती, रंजन, आस्वाद ह्या गोष्टींमधला कळीचा मुद्दा आहे 'देवाणघेवाणी'चा. उत्तम दर्जाच्या लिखाणावर वाचकांच्या प्रतिक्रिया, प्रश्नोत्तरे, संवाद ह्या गोष्टींमधला 'तत्काळ' अनुभव जर दिवाळी अंकाच्या मोठ्या प्रमाणातल्या मजकुरामुळे हरवत असेल; तर ह्या माध्यमातल्या प्रकाशनप्रक्रियेकडेही विचारपूर्वक पाहावे, तिच्यात योग्य ते बदल करावेत; जी प्रयोगशीलता ह्या माध्यमाची शक्ती आहे, तिचा वापर करावा असा विचार ह्यामागे आहे. आशा आहे की, आमच्या वाचकांना क्रमाक्रमाने अंक प्रकाशित करण्यामागचा हा विचार पटेल.
भारतीय चित्रपटाला १०० वर्षे पूर्ण झाली ह्या निमित्ताने चिंतातुर जंतू यांनी 'आपला कलाव्यवहार आणि आपण' अशी थीम अंकासाठी सुचवली. ज्या लेखकांनी फार कमी कालावधीत ह्या विषयासंदर्भात लिखाण केले, त्यांचे आभार. निरनिराळ्या वयोगटांतल्या, व्यवसायांच्या लोकांच्या लिखाणातून ह्या विषयाचा आढावा घेतला जाताना त्यातून वाचकांचे रंजनही होईल अशी आशा वाटते.
आमच्या ह्या वाटचालीमधे अर्ध्या रस्त्यातूनच अचानकपणे सोडून गेलेल्या काही सहप्रवाशांची आठवण होणे अपरिहार्य आहे. मराठी आंतरजालाच्या इतिहासातल्या पहिल्या पावलांपासून जे ह्या प्रवासात सामील होते, कुठल्याही नव्या प्रकल्पाप्रमाणे 'ऐसी अक्षरे'लासुद्धा ज्यांनी साथ दिली, आपल्या समृद्ध अनुभवाने आमचा मार्ग प्रकाशमान केला, ते श्रावण मोडक. गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकाची थीम जाहीर केल्यावर लगेचच पहिला लेख श्रावण मोडक ह्यांचा आला होता. त्यांच्याचबरोबर, खळखळत्या उत्साहाची आणि रुप्यासारखे चोख लिखाण करणारी अदिती. गेल्या वर्षी ती लेख लिहू शकली नव्हती ह्याबद्दल तिने खंत व्यक्त केली होती. आज तीच नसल्याची खंत आहे.
सोडून गेलेल्यांची जागा नव्या दमाचे लोक घेतात. रहाटगाडगे चालू राहते. त्याच नियमाने गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी अधिक लोकांचा अंकाला हातभार लागला हे जरूर नोंदवावेसे वाटते. जयदीप चिपलकट्टी, अमुक ह्यांचा विशेष उल्लेख करता येईल.
'ऐसी अक्षरे'च्या समस्त वाचकांना ही दिवाळी आणि नववर्ष आनंदाचे जावो हीच शुभेच्छा.
विशेषांक प्रकार
अरे वा! आला का ऐसी अक्षरे
अरे वा! आला का ऐसी अक्षरे दिवाळी अंक २०१३!
स्वागत, अभिनंदन.
"दिवाळी अंकाचे प्रकाशन ही एकच एक घटना न करता, क्रमाक्रमाने तो प्रकाशित करावा असा निर्णय आम्ही यंदा घेत आहोत." >> निर्णय रोचक आहे. गेल्यावर्षी खूप सारे उत्तम लिखाण एकदम समोर आल्याने काय काय वाचु कुठे कुठे प्रतिसाद देउ झालेल. त्यामुळे बर्याच आवडलेल्या लेखांवर प्रतिसाद देण्याऐवजी फक्त रेटिँग दिलेलं. या नवीन निर्णयाने त्यात फरक पडेल. धन्यवाद!
वा! अभिनंदन आणि स्वागत.
वा! अभिनंदन आणि स्वागत. :)
क्रमाक्रमानं अंक प्रकाशित करायची कल्पना मस्तच आहे. अंक प्रकाशित होतात ते बहुतांशी दिवाळीच्या दिवशी. त्या दिवशी वाचायला इतकं काही उपलब्ध होतं, की हलवायाकडे गेलेल्या पोराची अवस्था होते नि धड कशालाच न्याय दिला जात नाही. मग वाचून प्रतिक्रिया देणं, काही संवाद होणं तर दूरच राहिलं. त्यावर तोडगा म्हणून या प्रयोगाचा उपयोग होईलसं वाटतं.
सलामीलाच तांब्यांसारख्या भारीपैकी लेखकाची मुलाखत नि कथा! पुढे काय असेल, अशी उत्सुकता आहे.
दिवाळीच्या शुभेच्छा आणि अंकासाठी घेतलेल्या कष्टांकरता अनेकानेक आभार. :)
काही गडबड आहे का ???
" गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकाची थीम जाहीर केल्यावर लगेचच श्रावण मोडक यांचा पहिला लेख आला होता. त्यांच्याचबरोबर, खळखळत्या उत्साहाची आणि रूप्यासारखं चोख लिखाण करणारी अदिती. गेल्या वर्षी लेख लिहू शकली नव्हती याची खंत तिने व्यक्त केली होती. आज तीच नसल्याची खंत आहे."
- काही गडबड आहे का ??? संपादक मंडळ कोणत्या अदिती बद्दल बोलत आहे ???????
टप्प्या-टप्प्यात प्रकाशन: चांगली कल्पना
नेटके प्रास्ताविक.
दिवाळी अंकाचा पहिला तुकडा दर्जेदार वाटला. मुलाखत उत्तम आहे. अंक एकत्र किंवा थोडा-थोडा दिल्याने वाचकाला फारसा फरक पडेल असे वाटत नाही. अख्खा अंक चाळण्याची मजा मिळणार नाही पण त्यात काय मोठे? लेखकांना मात्र या अनेककगठ्ठा प्रकाशनामुळे बरे वाटू शकेल. दर्जेदार लेखन असूनही एखाददुसरा प्रतिसाद पाहून नाउमेद होण्याची शक्यता सावकाशनामुळे कमी होईल. छापिल भाराभर टाळणे हा जालमाध्यमाचा योग्य वापर वाटतो.
अभिनव आणि स्वागतार्ह कल्पना....
"ऐसी अक्षरे" दिवाळी अंकाचे स्वागत करीत असतानाच संपादक मंडळाचे टप्प्याटप्प्याने दिवाळी लेखन प्रकाशित करण्याच्या अभिनव कल्पनेचे स्वागतही करीत आहे. गेली काही वर्षे जालीय अंकांनी सर्वत्रच चांगलेच बाळसे धरल्याचे दिसून येत आहेच शिवाय लेखनाचा दर्जाही उच्च पातळीवर पोचत चालल्याचे वाचनात येत होते. मात्र अशाच धारेखाली काही चांगले लेखही अकारण बाजूलाही गेल्याचे दिसले होते...त्याला कारण एका अंकातील सारेच लिखाण एकाच दिवशी एकाच चुटकीच्या स्पर्शाने समोर येत गेले की मग नकळत का होईना वाचक त्यात डावेउजवे करतोच करतो. एका लेखात, कथेत, कविता समीक्षणात, आत्मचरित्रपर लेखात, इतिहास, राजकीय, क्रिडा अशा प्रकारच्या लिखाणात गुंतून गेला की मग काही लेख दुर्लक्षित होतात, आणि ही बाब ज्यानी दिवाळी अंकासाठी रात्रीचा दिवस करून अभ्यासपूर्ण लिखाण केलेले असते त्यांच्यावर नकळत का होईना पण अन्याय होतोच.
नेमकी हीच बाब "ऐसी अक्षरे" संपादकीय मंडळ सदस्यांच्या लक्षात आल्याचे प्रकर्षाने जाणवते आणि त्यातूनच ही क्रमाक्रमाची कल्पना समोर आल्याचे दिसते....स्वागत करीत आहे या दिवाळी अंकाचे.
मुखपृष्ठाबाबतही हार्दिक अभिनंदन....चित्रसंगती सुंदरच !!
पुष्पगुच्छ आणि तोरण
सदस्य मिलिंद यांनी सुटी फुले आणि पुष्पगुच्छाची उपमा सुचवली आहे. त्याऐवजी फुलांचे तोरण आणि पुष्पगुच्छ या जोडीची उपमा सुचवतो. तोरणातील पाने-फुले सुटीही नसतात, एका ठिकाणीही नसतात. एका क्रमात ओवल्यामुळे तोरणाची शोभा लांबच लांब जाते.
मुक्ता कांपलीकरांनी बनवलेले मुखपृष्ठ सुंदरच आहे.
ऐसी अक्षरेच्या दिवाळी समारंभाकरिता अभिनंदन आणि शुभेच्छा.
अत्यंत चुकीचा प्रतिसाद, बेसिकमध्येच घोळ.
मुळात अरब हा शब्दच अरव म्हणजे जिथे रव नाही अशा त्या वाळवंटासाठी आलेला आहे. नीरव म्हटले असते पण त्यात नीर म्हणजे पाणी असल्याने तो पर्याय बाद झाला. तस्मात अरब हा शब्दच मुळात संस्कृतजन्य आहे. बाकी मक्काप्रांतीच्या शैवधर्माबद्दल वेगळे काय सांगावे?
त्यात परत रैद रमीद हेही नाव संस्कृतजन्यच आहे. रैद हा रैत म्हणजे रेतीचा पुत्र म्हणजेच वाळवंटाचा रहिवासी अशा अर्थी आलेला आहे. रैतेय-कौंतेय प्रमाणे. त्याचे पुढे त चे द झाले, उदा. मर्त्य-मर्द प्रमाणे.
रमीद बद्दल वेगळे काय सांगावे- रमीद म्हणजे जे रमीत म्हणजे रमतात ते. त चा द वरीलप्रमाणेच. रमणारा रेतीपुत्र हा रैद रमीद.
-बॅ.टॅ. ओक.
(बॅटमॅनची संस्कृतजन्य व्युत्पत्ती माहिती असेल अशी आशा आहे.)
अजूनही पूर्ण अंक वाचून झाला
अजूनही पूर्ण अंक वाचून झाला नाही. काही लेखांकडे पुन्हा पुन्हा परतावं लागेल. काही लेख एकाग्रपणे वाचायचे म्हणून मुद्दाम मागे ठेवले आहेत, काही राहिले आहेत. पण मत देण्याइतपत वाचून झालं आहे. आत्ताच छापील दिवाळी अंकही हाताशी आहेत. ते वाचले नाहीत, पण चाळले आहेत. त्या तुलनेत 'ऐसी'चा अंक कसा आहे?
तोडीस तोड आहे. भरगच्च, फोकस्ड आणि पुरेसा (चांगल्या अर्थानं!) जड आहे.
ही अंकातली खोड नव्हे, फक्त निरीक्षणः
अंक ललित साहित्यापेक्षा वैचारिक - समीक्षकी लिखाणाकडे झुकलेला आहे. असं ठरवून केलेलं आहे की आपोआप झालेलं आणि यंदाच्या अंकापुरतं आहे? (हे आपलं कुतूहल! आपली काही तक्रार नाही. (तक्रार असली, तरी विचारतो कोण बोंबलायला, हे अलाहिदा!))
थोडं तांत्रिक बाजूनं अंकातल्या प्रमाणलेखनाबद्दलः
मराठीत प्रमाणलेखनाचे काही नियम आहेत. ते पुरेसे नाहीत. न्याय्य नाहीत. सोपे तर त्याहून नाहीत. पण ते अजून आहेत. (पुरेशा लोकाग्रहाच्या रेट्यानिशी ते बदलले जात नाहीत तोवर) जाहीर आणि नियोजित लेखनात तरी ते पाळले जावेत, असं वाटतं. ते पाळायचे नाहीत, त्याकडे जाणूनबुजून विरोध वा दुर्लक्ष करायचं, अनुल्लेखानं आणि दुर्लक्षानं त्यांना मारायचं, अशी काही भूमिका असेल तरीही ठीकच. पण तशी काही भूमिका जाहीर केली नसेल, तर ते पाळायसाठी प्रयत्न केले जावेत असं वाटतं. माझ्या स्वत:च्या अनुभवावरून असं वाटतं की, हे नियम पाळून, संपादनाचे संस्कार केलेलं लिखाण प्रथमदर्शनी आपोआपच गांभीर्यानं घेतलं जातं. (मग पुढे ते आवडो, नावडो, पटो वा न पटो.) छापील माध्यमांच्या तुलनेत नेटवरच्या लिखाणाला हौशी म्हणून निकालात काढलं जातं त्यामागे अशा संपादकीय कामाच्या अभावाचा मोठा वाटा असावा. अर्थातच या कामात उपलब्ध वेळेचा मोठाच अडथळा असतो हे मला मान्य आहे. त्यावर यंदा 'ऐसी'नं वापरला तो तोडगा वापरता येण्यासारखा आहे. अंक मिळेल तसतसा छापायला सुरुवात करायची. दिवाळीच्या आदल्या आठवड्यात अंक क्रमानं छापून मोकळं व्हायचं. नंतरही बदल करता येण्याची तंत्रज्ञानानं दिलेली सोय वापरून लेखन परिष्कृत करत राहायचं. उशीर करणारे ना*** लेखक, लष्करच्या भाकर्या थापून दमणारे संपादक आणि वाचक या सगळ्यांच्या दृष्टीनं हे सोईचंच आहे.
कुतूहलः
मला नडतात, तितक्या नडत नाहीत का लोकांना प्रमाणलेखनातल्या चुका?
मला नडतात, तितक्या नडत नाहीत
मला नडतात, तितक्या नडत नाहीत का लोकांना प्रमाणलेखनातल्या चुका?
नडतात. संवादेतर प्रमाण लेखनात अकारान्त शब्द अनुस्वारयुक्त न लिहिता एकारान्त लिहावे असाही एक (अन्याय्य वगैरे) नियम आहे. तो पाळला जात नाही हेही नडते. :P ह. घ्या. ही विनंती.
परतावं परतावे, अर्थानं अर्थाने, असं असे, केलेलं केलेले इत्यादी.
Muphry's Law strikes again.
मान्य!
> थोडं तांत्रिक बाजूनं अंकातल्या प्रमाणलेखनाबद्दल…
... गांभीर्याने घेतलं जातं.
याबद्दल could not agree more असं म्हणतो. यावेळेला मीही एक संपादक होतो. माझी अशी एक भाबडी कल्पना होती की दिवाळी अंकासाठी लेख द्या असं आवाहन जर दोनतीन महिने आधी केलं तर लोक लिहायला सुरुवात आधी करतील आणि संपादकीय संस्कारांसाठी किंवा प्रमाणलेखनाच्या नियमांनुसार त्यातली कोळिष्टकं साफ करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. तसं फारसं झालं नाही.
माझ्या मते लेख आधी छापून टाकून परिष्करण सावकाशीने करण्यातला धोका असा, की नंतर विशेष कुणी तो वाचणार नाही. एकदा धागा खाली गेला की कुणीतरी प्रतिसाद देऊन मुद्दाम पृष्ठभागावर आणल्याखेरीज तो दिसेनासा होतो, आणि मग कमीकमीच वाचला जातो. त्यातही 'शिळ्या' झालेल्या धाग्यावर प्रतिसाद द्यायला सहजगत्याच लोक निरुत्साही असतात. या सगळ्यामुळे 'उगवत्या सूर्याला नमस्कार' ही प्रवृत्ती आपोआपच होत जाते.
याला एक उपाय दिसतो तो असा, की दिवाळी अंक काढणार आहोत अशी हूल उठवून प्रत्यक्षात संक्रांत विशेषांक काढणे.
> कुतुहलः मला नडतात, तितक्या नडत नाहीत का लोकांना प्रमाणलेखनातल्या चुका?
मला बऱ्यापैकी नडतात. (आता तुम्ही 'कुतूहल' न लिहिता 'कुतुहल' लिहिणं हे मला थोडं तरी नडलंच की नाही?! - हलकेच घ्या…) पण माझ्यापेक्षाही ज्यांना जास्त नडतात असे काही आहेतच. अशा गोष्टींना कमाल मर्यादा नसते.
ऐला, कुतूहल तत्सम आहे!
ऐला, कुतूहल तत्सम आहे! थ्यांकू हां! निस्तरली मी चूक लगेच. :प (परतफेड करू का? करतेच! 'यावेळेला' एकत्र का बरं लिहिलाय?)
संक्रांत विशेषांकाची आयड्या आवडलीय. उशिरा लेखन देण्यात माझाही वाटा आहे, त्यामुळे मला फारसा नैतिक हक्क नाही यावर बोंबाबोंब करण्याचा, हेही सपशेल मान्य.
पण तरी - हे कुणीतरी म्हणायला हवंच होतं.
मेघना भुस्कुटेंनी मांडलेली
मेघना भुस्कुटेंनी मांडलेली तक्रार रास्त आहे. आम्ही नवखे आहोत, हौशी आहोत, आम्हाला नोकरीधंदे-घरकामं सांभाळून हे बाळंतपण करावं लागतं वगैरे सबबी देणं मला योग्य वाटत नाही. जर एखादं काम करावं तर ते चांगल्या दर्जाचं करावं. एवढा मोठा दिवाळी अंक झेपत नसेल तर काढू नये. क्वांटिटी आणि क्वालिटी या दोहोंमध्ये तडजोड करण्याची वेळ येऊ नये. दोन्हीही विशिष्ट पातळीच्या वर असावी.
याला एक उपाय दिसतो तो असा, की दिवाळी अंक काढणार आहोत अशी हूल उठवून प्रत्यक्षात संक्रांत विशेषांक काढणे.
हा उपाय भारी आहे. पण त्याहीपेक्षा चांगला उपाय म्हणजे सिंहासन मध्ये जसा मुख्यमंत्री त्याच्यावर टीका करणाऱ्या डीकास्टाला कामगारमंत्री (किंवा तत्सम) पद देऊन सरकारातच घेऊ पहातो, त्याप्रमाणे मेघना भुस्कुटेंना संपादक करून टाकायचं. ;)
मात्र काही गोष्टी पुढच्या वर्षी बदलायच्या असं ठरवलेलं आहे. आमचा बराच वेळ मुलाखतींमध्ये गेला. मुलाखत घेणं, ती शब्दांकित करणं, ते शब्दांकन योग्य आहे की नाही हे ज्यांची मुलाखत घेतो आहोत त्यांच्याकडून तपासून घेणं इत्यादी. लेखांचं योग्य फॉर्मॅटमध्ये रूपांतर करण्यासाठीही अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. म्हणजे टेक्स्ट मॅटर युनिकोडात आणणं, त्यातली चित्रं योग्य जागी ठेवून दुवे तयार करणं, इत्यादी. एक मोठा लेख केवळ पीडीएफमध्ये होता, आणि तो आम्हाला पानं वाटून घेऊन हाताने पुन्हा टंकावा लागला. काही लेख लेखकांनी वर्ड डॉक्युमेंटमध्ये चित्रं चिकटवून पाठवले होते.
यावर उपाय म्हणजे अर्थातच १. मुलाखती बऱ्याच आधी घेणं, आणि २. लेखकांना जवळपास अंतिम युनिकोडित फॉर्मॅटमध्ये लेख देणं सोपं जावं यासाठी प्रयत्न करणं. लेखकांनीच प्राथमिक मांडणी करणं सर्वांच्याच दृष्टीने फायदेशीर आहे. कारण कुठचे फोटो कुठे जावेत याची त्यांना अधिक जाण असते. ३. शुद्धिचिकित्सक वापरणं.
कुतुहल/कुतूहल
कुतूहल (मोल्सवर्थ्)
(p. 172) [ kutūhala ] n S Sport, play, pastime, fun, diversion.
कुतूहल (खापरे.ऑर्ग्)
नवल ; कौतुक ; क्रीडा . कर्मणुक . ( सं .)
------
कुतुहल (खापरे.ऑर्ग्)
उत्सुकता , जाणण्याची इच्छा , जिज्ञासा ;
कौतुक , नवल ;
करमणूक , क्रीडा.
-------
जिज्ञासा (मोल्सवर्थ्)
(p. 316) [ jijñāsā ] f S Desire of knowledge, inquisitiveness, curiosity.
जिज्ञासा (खापरे.ऑर्ग्)
आतुरता , उत्कंठा , उत्सुकता , औत्सुक्य , कुतूहल , चौकसपणा , जाणून घेण्याची इच्छा .
ज्ञानाची इच्छा ; कुतूहल ; शोधक बुध्दि . [ सं . ]
पीडीएफ स्वरूपात दिवाळी अंक
पीडीएफ स्वरूपात दिवाळी अंक आता उपलब्ध आहे.
दिवाळी अंकाचे स्वागत
ऐसी अक्षरे दिवाळी अंक २०१३चे स्वागत, व अंकसमितीचे अभिनंदन.
"दिवाळी अंकाचे प्रकाशन ही एकच एक घटना न करता, क्रमाक्रमाने तो प्रकाशित करावा असा निर्णय आम्ही यंदा घेत आहोत."
- हा बदल मात्र तितकासा रुचला नाही. अर्थात, ह्या न रुचण्यामागे संपूर्ण अंक एकाच वेळी हाती येण्याच्या जुन्या सवयीचा, व बदल पटकन पचनी न पडण्याचा भाग आहेच. परंतु हेही खरे की संपूर्ण अंक मिळाला, तो उलट-सुलट चाळला, मग त्यातील हवे ते, हवे तेव्हा वाचले, वाचता वाचता एक लिखाण जरा वेळ बाजूस ठेवून दुसरे काहीतरी वाचले, ह्या सार्यातली मजा टप्प्या-टप्प्यातील प्रकाशनाने येणार नाही. तुम्ही जो मार्ग निवडला आहे त्याने दैनिक वाचल्यासारखे किंवा संस्थळावर येऊन 'आज काय बरे नवीन आहे' हे पाहिल्यासारखे वाटते. सुटी सुटी फुले सुंदर असली तरी सुघटित पुष्पगुच्छाचे सौंदर्य काही औरच असते.