Skip to main content

अमेरिकन सरकारी कामकाज ठप्प

अमेरिकन सरकार मंगळवारपासून बंद.
ओबामाकेअरचा कायदा पास झाला. यातून सर्व नागरिकांना आरोग्यविमा मिळावा यासाठी - सर्व नागरिकांना विमा घेणं सक्तीचं, विमा कंपन्यांना कोणाला प्रीएक्झिस्टिंग कंडिशनसाठी नाकारण्यावर बंदी, कोणी आजारी पडल्यानंतर विमायोजनेतून बाहेर काढण्यास बंदी, गरीबांसाठी विम्यात सूट वगैरे सुधारणा त्यात आहेत. या कायद्याला रिपब्लिकनांचा विरोध आहे. सरकारने यासाठी पैसे देऊ नयेत हे त्यांचं मागणं आहे. तसा बदल करण्यासाठी त्यांनी बजेट अडवून धरलेलं आहे. गेले काही दिवस हे नाट्य चालू आहे. संपूर्ण बजेट पास होईपर्यंतदेखील सरकारचं कामकाज चालण्यासाठी कर्ज घेण्याचं सीलिंग वाढवून देण्यासाठी हा कायदा उशीरा अमलात आणावा आणि त्यासाठी मेडिकल डिव्हाइसेसवर लावलेला टॅक्स रद्द करावा अशी अट इथल्या खालच्या सदनाने घातली होती. वरच्या सदनाने (जिथे डेमोक्रॅट्स अधिक आहेत) आज ती धुडकावून लावली. त्यामुळे उद्यापासून अत्यंत महत्त्वाच्या सरकारी सेवांपलिकडे बाकीच्या सेवा बंद होणार.

संपादकः तपशीलवार चर्चेसाठी धागा वेगळा करत आहोत

'न'वी बाजू Tue, 01/10/2013 - 21:02

In reply to by ऋषिकेश

भारतातील (इंग्रजी पद्धतीच्या) पार्लमेंटरी सिस्टममध्ये संसदेत बहुमत असल्याशिवाय सरकार टिकू शकत नाही / संसदेत अविश्वासाचा ठराव पास होणे, बजेट मंजूर न होणे यामुळे सरकार गडगडते.

अमेरिकन प्रेसिडेन्शियल पद्धतीत काँग्रेस (बोले तो संसद, लेजिस्लेटिव विभाग) आणि सरकार (एक्झिक्यूटिव विभाग) एकमेकांपासून पूर्ण स्वतंत्र आहेत. त्यामुळे संसदेत विरोधी पक्षाचे बहुमत झाले तरी सरकारच्या टिकण्यावर त्याने काहीही फरक पडत नाही.

तूर्तास इतकेच.

ऋषिकेश Wed, 02/10/2013 - 09:32

In reply to by 'न'वी बाजू

सरकारी कामकाज चालत नाही मग सरकार टिकते म्हणजे काय होते? सरकार का टिकते?
अश्यावेळी सरकारचे काम काय? जबाबदारी काय? पैशाशिवाय आपली जबाबदारी सरकार कशी पेलणार?
का सरकार फक्त कागदावर असते त्यांना कोणताच अधिकार उरत नाही?

'न'वी बाजू Wed, 02/10/2013 - 16:58

In reply to by ऋषिकेश

सरकार बंद पडणे ही टोकाची परिस्थिती झाली. सामान्यतः असे होत नाही; काहीतरी तडजोड निघावी, अशी अपेक्षा असते.

अश्यावेळी सरकारचे काम काय? जबाबदारी काय? पैशाशिवाय आपली जबाबदारी सरकार कशी पेलणार?

काम नाही करू शकत, म्हणून तर "बंद पडते".

का सरकार फक्त कागदावर असते त्यांना कोणताच अधिकार उरत नाही?

प्रॅक्टिकली, होय. ('अधिकार उरत नाही' म्हणण्यापेक्षा, 'पैशाअभावी काहीही काम करू शकत नाही.' म्हणजे, सरकार अ‍ॅज़ इन प्रेसिडेंट आणि क्याबिनेटच नव्हे, अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश सरकारी ऑफिसांचेही - न्याशनल पार्कांपासून ते सरकारी संशोधनसंस्थांपर्यंत - कामकाज बंद पडते.)

(क्रमशः)

विसुनाना Tue, 01/10/2013 - 12:49

सर्वसामान्य / गरीब अमेरिकन नागरीकाला दिलासा देणारा हा कायदा दिसतो तरीही "या कायद्याला रिपब्लिकनांचा विरोध आहे" असे का बुवा?
हे आरोग्यसुविधा महाग करणार्‍या आणि त्यातून खच्चून पैसा मिळवणार्‍या आरोग्यविषयक संस्था आणि आरोग्यविमा कंपन्या यांचे राजकारण्यांशी साटेलोटे आहे काय? की अमेरिकेला खरोखरीच हा आर्थिक बोजा सहन होणार नाही? यावर राघा यांनी एखादा लेख लिहिला तर बरे होईल.

नंदन Tue, 01/10/2013 - 16:59

In reply to by विसुनाना

खरं तर, ओबामाकेअरमागची मूळ संकल्पना ही 'हेरिटेज' ह्या कन्झर्व्हेटिव्ह/रिपब्लिकन मंचाची. मॅसॅच्युसेट्समध्ये रॉमनीने राबवलेली पद्धतही बरीचशी सारखी आहे. पण कुठलाही पर्याय न देता केवळ विरोधासाठी विरोध करणे, हे ओबामा निवडून आल्यापासून सुरू आहे. अर्थात जर डेमोक्रॅट्स विरोधी पक्षात असते तर त्यांनी काही फार निराळी भूमिका घेतली असती अशातला भाग नाही. मात्र रिपब्लिकन पक्षाची समस्या टी-पार्टीमुळे अधिक जटील बनली आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अमेरिकन काँग्रेसची दोन सभासदगृहं आहेत - सिनेट आणि हाऊस. प्रत्येक राज्यातून - मग त्यांची लोकसंख्या सहा लाख असो (वायोमिंग) वा चार कोटी (कॅलिफोर्निया) - मोजून दोन सिनेटर्स सहा वर्षांकरता निवडले जातात. (५० राज्यं*२ = १०० सिनेटर्स). मात्र प्रत्येक राज्याला 'हाऊस'मध्ये किती जागा मिळतात, ते मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात अवलंबून आहे. परिणामी एकूण ४३५ जागांपैकी वायोमिंगला १ तर कॅलिफोर्नियाला ५३ जागा मिळतात. दर दहा वर्षांनी होणार्‍या जनगणनेनुसार या वाटणीत फरक पडतो; पण एकूण जागा ४३५ च राहतात.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो पक्ष जनगणनेवेळी राज्यात सत्तेत असतो, त्याला आपल्या राज्यातल्या हाऊसच्या जागांच्या सीमा ठरवण्याचे हक्क असतात. (अपवाद काही मोजकी राज्यं उदा. कॅलिफोर्निया, अ‍ॅरिझोना -- जिथे एक निष्पक्ष मंडळ हा निर्णय घेतं.) २०१० साली झालेल्या जनगणनेच्या वेळी बहुतांश राज्यात रिपब्लिकन पक्षाची सरकारं होती. [त्यामागची कारणं सांगायची तर एक स्वतंत्र लेख होईल - पण बड्या कंपन्यांना राजकीय देणग्यांत मोकळं रान देणारा सर्वोच्च न्यायालयाचा 'सिटीझन्स युनायटेड' केसमधला वादग्रस्त निर्णय + पहिल्या कृष्णवर्णीय अध्यक्षाविरुद्ध असंतोषाला छुप्या/उघड मार्गांनी घातलं गेलेलं खतपाणी + डेमोक्रॅट पक्षाची कोअर कॉन्स्टिट्यूअन्सी असणार्‍या शहरी मतदार/तरूण/स्त्रिया/अल्पसंख्याक यांची मिड-टर्म निवडणुकांत असणारी नित्याची गैरहजेरी + ओबामाला आपली धोरणं लोकांपर्यंत पोचवण्यात आलेलं अपयश + रिपब्लिकन पक्षाचा एकत्रित ओबामाविरोध - अशी सांगता येतील.]

२०१० च्या या निवडणुकीत अनेक कॉन्झर्व्हेटिव्ह डेमोक्रॅट्सना पराभव पत्करावा लागला. याचा दुहेरी परिणाम झाला. डेमोक्रॅट पक्षात लिबरल विचारधारेचं आणि रिपब्लिकन पक्षात कॉन्झर्व्हेटिव्ह विचारधारेचं पूर्वी कधी नव्हतं, इतकं वर्चस्व वाढलं. दक्षिणेतली अनेक राज्यं स्थानिक पातळीवर डेमोक्रॅट्सना तर राष्ट्रीय पातळीवर रिपब्लिकन्सना निवडून देत असत; ती आता पूर्णपणे रिपब्लिकन झाली. नॉर्थ कॅरोलायनातली दोन्ही सभागृह तब्बल ११२ वर्षांनी (१८९८ ते २०१०) रिपब्लिकन्सच्या ताब्यात आली.

नव्याने धर्मांतरित झालेली व्यक्ती अधिक कडवी असते, या न्यायाने नव्याने निवडून आलेल्या रिपब्लिकन्सनी धडाधड गर्भपातविरोधी कायदे पास केले, 'उत्क्रांती' सारखी वैज्ञानिक सत्यं शालेय अभ्यासक्रमातून हद्दपार करण्याचा चंग बांधला आणि आपली सत्तेवरील मांड मजबूत व्हावी म्हणून हाऊस डिस्ट्रिक्ट्सच्या सीमा आपल्याला सोयीच्या होतील; या प्रकारे आखून घेतल्या. या प्रकाराला जेरीमँडरिंग ही संज्ञा आहे.

ही संज्ञा स्पष्ट व्हावी म्हणून आपण एक काल्पनिक राज्य घेऊ. हाऊस डिस्ट्रिक्ट्स - ४; लोकसंख्या २६ लाख (१३ लाख डेमोक्रॅट्स, १३ लाख रिपब्लिकन्स). आता या परिस्थितीत जागांचं वाटप निम्मं-निम्मं व्हायला हवं. पण जर नकाशावर अशा काही रेघा मारल्या की -

हाऊस डिस्ट्रिक्ट क्र. १ - ४ लाख डेमोक्रॅट्स, १ लाख रिपब्लिकन्स
हाऊस डिस्ट्रिक्ट क्र. २ - ३ लाख डेमोक्रॅट्स, ४ लाख रिपब्लिकन्स
हाऊस डिस्ट्रिक्ट क्र. ३ - ३ लाख डेमोक्रॅट्स, ४ लाख रिपब्लिकन्स
हाऊस डिस्ट्रिक्ट क्र. ४ - ३ लाख डेमोक्रॅट्स, ४ लाख रिपब्लिकन्स

याचा परिणाम काय होईल? ५०% मतं पडूनही रिपब्लिकन्सना ७५% हाऊसच्या जागा मिळतील.

अर्थात ज्या राज्यांत डेमोक्रॅट्स सत्तेवर होते; तिथे त्यांनीही हे पालथे धंदे केलेच. मात्र वर लिहिल्याप्रमाणे, २०१० मध्ये रिपब्लिकन्स अधिक राज्यांत सत्तेवर असल्यामुळे त्यांना याचा अधिक फायदा मिळाला - ज्या सात राज्यांत रिपब्लिकन राज्य सरकारं होती तिथल्या एकूण १०७ हाऊस डिस्ट्रिक्ट्सकरता रिपब्लिकनांना एकूण १.६७ कोटी मतं पडली तर डेमोक्रॅट्सना १.६४ कोटी. फरक जवळजवळ पावणेदोन टक्क्यांचा - पण रिपब्लिकन पक्षाला जागा मिळाल्या त्या दुपटीहून अधिक (७३ वि. ३४). (स्रोत)

राष्ट्रीय स्तरावरही याचंच प्रतिबिंब पडलेलं दिसतं. २०१२ च्या निवडणुकीत जर सगळ्या ४३५ मतदारसंघांची बेरीज केली; तर डेमोक्रॅट्सना पडलेली मतं किंचित अधिक आहेत (१४ लाखांचा फरक) - पण रिपब्लिकन पक्षाकडे २३४ वि. २०१ असं बहुमत राहिलं.

सिनेटच्या निवडणुकीत मात्र नकाशात असले फेरफार करता येत नाहीत. संपूर्ण राज्य सहा वर्षांच्या कालावधीसाठी दोन सिनेटर्स निवडून देतं.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पक्षाचा उमेदवार कोण असणार, हे ठरवायला पक्षांतर्गत निवडणुका होतात. त्यात अर्थातच मतदानाची टक्केवारी कमी असते. जेमतेम १० ते २०%. परिणामी कट्टर, जहाल पण राजकीय प्रक्रियेबाबत जागरूक असणारा पक्षातील एखादा लहान वर्ग बहुमत नसूनही आपल्या माणसाला पक्षाची उमेदवारी मिळवून देऊ शकतो. २०१० आणि २०१२ च्या निवडणुकांत अशा अनेक टी पार्टीच्या सदस्यांनी 'एस्टॅब्लिशमेंट' रिपब्लिकन्सना येनकेनप्रकारेण हरवून रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी हाऊस आणि सिनेटकरता पटकावली.

वर स्पष्ट केल्याप्रमाणे, या उमेदवारांना फेरबदल केलेल्या 'हाऊस'च्या सुरक्षित मतदारसंघांतून निवडून येणे अतिशय सोपे गेले - पण जिथे संपूर्ण राज्याचं मतदान होतं, तिथे मात्र त्यांना आपल्या जहार, कट्टर भूमिकांमुळे डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांकडून पराभव पत्करावा लागला. २०१० आणि २०१२ च्या निवडणुकांत रिपब्लिकन पक्षाला सिनेटमध्ये बहुमत मिळवण्याची संधी याच कट्टर टी-पार्टीमुळे गमवावी लागली.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रिपब्लिकन पक्षाच्या मूळ परंपरेत (आर्थिकदृष्ट्या कन्झर्व्हेटिव्ह, सामाजिकदृष्ट्या टी-पार्टीहून बरेच कमी कट्टर) वाढलेल्या अनेक "एस्टॅब्लिशमेंट" सिनेट आणि हाऊस सदस्यांची या अल्पसंख्य, पण आपलं उपद्रवमूल्य वेळोवेळी दाखवून देणार्‍या टी-पार्टीवाल्यांमुळे कुचंबणा होते आहे. (न्यू इंग्लंडमधल्या एखाद्या रिपब्लिकन मतदाराची सँटोरमचं भाषण ऐकून व्हावी तशी :)). टी-पार्टी ला न जुमानता तडजोडीला हात पुढे केला तर पुढच्या प्रायमरीच्या वेळी पक्षाची उमेदवारी न मिळण्याची भीती आणि त्यांच्यामागून जावं तर पक्षाची उमेदवारी भले मिळेल, पण जनरल निवडणुकीत मात्र पराभवाला तोंड द्यावं लागेलं.

मात्र याच वेळी जेरीमँडरिंगच्या 'भिंद्रनवाले'मुळे जे टी-पार्टीचे सदस्य निवडून आले आहेत, त्यांच्या दृष्टीने अजेंडा फार सोपा आहे. मुळातच कट्टर असलेले त्यांचे मतदारसंघ अधिक कट्टर झाले आहेत.

As with Meadows, the other suicide-caucus members live in places where the national election results seem like an anomaly. Obama defeated Romney by four points nationally. But in the eighty suicide-caucus districts, Obama lost to Romney by an average of twenty-three points. The Republican members themselves did even better. In these eighty districts, the average margin of victory for the Republican candidate was thirty-four points.

In short, these eighty members represent an America where the population is getting whiter, where there are few major cities, where Obama lost the last election in a landslide, and where the Republican Party is becoming more dominant and more popular. Meanwhile, in national politics, each of these trends is actually reversed.

In one sense, these eighty members are acting rationally. They seem to be pushing policies that are representative of what their constituents back home want. But even within the broader Republican Party, they represent a minority view, at least at the level of tactics (almost all Republicans want to defund Obamacare, even if they disagree about using the issue to threaten a government shutdown).

(स्रोत)

ओबामा केनियन/मुसलमान/एथिइस्ट/अँटी-ख्राईस्ट आहे आणि त्याला हरप्रकारे विरोध करणं हे आपलं परमकर्तव्य आहे; असं मानणारे मतदार जर बहुसंख्य असतील तर त्यांचा लोकप्रतिनिधीही तितकाच कट्टर असेल यात काय आश्चर्य? एका अर्थी ही लढाई ओबामाकेअरइतकीच रिपब्लिकन पक्षावर कुठल्या विचारधारेचं (or lack of it thereof) वर्चस्व असेल याचीही आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/10/2013 - 20:01

In reply to by मिहिर

थोडक्यात टी-पार्टी म्हणजे रिपब्लिकन/उजव्यांमधले कट्टर, कडवे लोक. पण त्यांच्यातही कडवेपणावर फार एकमत असेलच असं नाही. (नंदनएवढा अभ्यास नसल्यामुळे फक्त विकिपीडीया लिंक देऊ शकते.)

विसुनाना Thu, 03/10/2013 - 13:26

In reply to by नंदन

इतका सखोल प्रतिसाद दिल्याबद्दल नंदन यांना अनेक धन्यवाद.
थोडक्यात, रिपब्लिकन्स हे अतिशय कट्टर उजवे लोक आहेत आणि त्यांना केवळ बराक ओबामा त्याच्या वर्णामुळे/विचारसरणीमुळे आवडत नाही म्हणून त्यांनी पूर्ण अमेरिकेला वेठीला धरले आहे.
आणखी काही शंका -
१. अमेरिकन उद्योगपती/आर्थिक संस्था/(ज्यू) यांचा कुणाला पाठिंबा आहे?
२. ओबामा ऐवजी हिलरी जर राष्ट्राध्यक्ष झाली असती तर रिपब्लिकन विरोध राहिला असता का?
३. या सगळ्या प्रकारात अमेरिकेत वांशिक मतभेद तीव्र होऊन त्यातून कायमची उघड वांशिक-हिंस्त्र दरी निर्माण होण्याचा धोका आहे का?
४. या भांडणात तिथल्या भारतीय वंशाच्या लोकांची काय भूमिका आहे? (भारतात असताना जे कट्टर उजव्या गटाचे प्रतिनिधित्व करतात ते अमेरिकेत जाऊन डावे/उदारमतवादी डेमोक्रॅट बनतात का? हा विरोधाभास त्यांना जाणवतो का?)
उत्तरे मिळाल्यास आभारी राहीन.

ऋषिकेश Thu, 03/10/2013 - 13:29

In reply to by विसुनाना

मार्मिक व रोचक प्रश्न आहेत. माझा अजून एक उपप्रश्न आहे:
भारतात बहुसंख्य म्हणून वावरताना जे कट्टर उजव्या गटाचे प्रतिनिधित्व करतात ते अमेरिकेत जाऊन अल्पसंख्य झाल्यामूळे डावे/उदारमतवादी डेमोक्रॅट बनतात का? अल्पसंख्य गटात मोडल्यानंतर/मुळे विचारधारेत काही फरक जाणवला आहे का?

नंदन Thu, 03/10/2013 - 15:18

In reply to by विसुनाना

माझ्या माहिती, मती आणि मतांप्रमाणे उत्तरे देतो :)

थोडक्यात, रिपब्लिकन्स हे अतिशय कट्टर उजवे लोक आहेत आणि त्यांना केवळ बराक ओबामा त्याच्या वर्णामुळे/विचारसरणीमुळे आवडत नाही म्हणून त्यांनी पूर्ण अमेरिकेला वेठीला धरले आहे.

हो, खरं तर रिपब्लिकन पक्षातल्या कट्टर उजव्या गटाने मुख्य धारेतल्या रिपब्लिकन्सना आणि पर्यायाने ओबामाला वेठीस धरले आहे; असं म्हणता येईल. केवळ दोनच प्रमुख पक्ष असल्यामुळे, दोन्ही पक्षांत सार्‍या विचारसरणीचे लोक आढळतात. गेल्या काही वर्षांत मात्र ध्रुवीकरणाला अधिक वेग आला आहे.

१. अमेरिकन उद्योगपती/आर्थिक संस्था/(ज्यू) यांचा कुणाला पाठिंबा आहे?

--- रिपब्लिकन पक्षाची धोरणं - विशेषतः करांत सवलत, निर्बंधांना (पर्यावरणविषयक, देखरेखीबद्दलचे, विषम वागणुकीबद्दलचे) विरोध - ही विशेषकरून पारंपरिक स्वरूपाच्या उद्योगधंद्यांच्या दृष्टीने आकर्षक गोष्ट आहे. त्यामुळे कोक ब्रदर्ससारखे उद्योग (पेट्रोलियम, पॉलिमर, पेपर) हे रिपब्लिकन समर्थक आहेत. (सवड असेल, तर डेव्हिड कोकने टी पार्टीच्या वाढीला कसा हातभार लावला, हे विस्ताराने स्पष्ट करणारा न्यू यॉर्करमधला हा लेख वाचण्याची शिफारस करेन). चेम्बर ऑफ कॉमर्ससारख्या संस्थांचाही रिपब्लिकन पक्षाला सध्या अधिक पाठिंबा आहे. मात्र केवळ सध्याचा गदारोळ विचारात घेतला, तर हे प्रकरण त्यांच्याही कह्याबाहेर गेल्याचं उघड आहे. Corporate America sees little return from bet on GOP हे या लेखाचं शीर्षकच पुरेसं बोलकं आहे.

नवीन तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांचे मालक (आणि त्यांचे बहुतांश कर्मचारी) हे अधिक लिबरल, डेमोक्रॅटिक पक्षाच्या धोरणांशी सुसंगत धोरणं असणारे आहेत. बिल गेट्स आणि वॉरन बफेट (ओबामाने सुचवलेला मिलियनेर टॅक्स हा बफेट रूल वरच आधारित आहे) - हे दोन सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि त्यांची लिबरल धोरणं तर परिचित आहेतच; पण अ‍ॅमेझॉनचा जेफ बेझोस (वॉशिंग्टन स्टेटमधल्या अनेक लिबरल कामांसाठी दिलेला पाठिंबा), जॉर्ज सोरोस, टेड टर्नर हे बिलियनेअर उद्योगपतीही यात आले. सोयीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे निवडणूक लढवलेल्या ब्लूमबर्गचीही (न्यू यॉर्कचा महापौर) यात गणना करता येईल. सॅन फ्रान्सिस्को-बे एरिया, मॅनहॅटन, कनेक्टिकटची 'वॉल स्ट्रीट' उपनगरे, हॉलिवूड, सिअ‍ॅटल, बॉस्टन, उत्तर व्हर्जिनिया, नॉर्थ कॅरोलायनातला रिसर्च ट्रँगल - हे सारे नवीन तंत्रज्ञानांच्या कंपन्या आणि कर्मचारी एकवटलेले विभाग हे डेमोक्रॅटिक पक्षाचे बालेकिल्ले म्हणता येतील.

तुलनेने उच्चशिक्षित, शहरी असणारा ज्यू समाज हा एकंदरीत लिबरल आहे (कट्टर, ऑर्थॉडॉक्स ज्यू वगळता). एका सर्वेक्षणानुसार ओबामाला जवळपास ७०-७५% ज्यूंची मतं मिळाली. रॉमनीने (आणि इस्त्रायलच्या अध्यक्षांनीही) ओबामा हा मुस्लिम, इराणधार्जिणा आणि इस्त्रायलच्या विरोधात असल्याचा अथक प्रचार करूनही. (निव्वळ ज्यू उद्योगपतींचा विचार केला तर, त्यातले किती टक्के रिपब्लिकन/डेमोक्रॅट आहेत; याची काही कल्पना नाही).

२. ओबामा ऐवजी हिलरी जर राष्ट्राध्यक्ष झाली असती तर रिपब्लिकन विरोध राहिला असता का?

--- एका शब्दात उत्तर द्यायचं तर हो. १९६८ ते १९९२ या २४ वर्षांत कार्टरची ४ वर्षं वगळली (तीही निक्सनच्या नामुष्कीनंतर मिळालेली), तर अध्यक्षपदावर रिपब्लिकन पक्षाची मजबूत पकड होती. डेमोक्रॅटिक हाऊस + रिपब्लिकन अध्यक्ष हे समीकरण या काळात रूढ झालं होतं. याला पहिला हादरा बसला तो दक्षिणेतल्या 'न्यू डेमोक्रॅट' बिल क्लिंटनकडून. क्लिंटनच्या कारकीर्दीतली पहिली मिड-टर्म हाऊस निवडणूक (१९९४) आणि ओबामाची पहिली मिड-टर्म (२०१०) यात बरंच साम्य आहे. दीर्घ काळ असलेली सत्ता गमावल्यामुळे अस्वस्थ झालेल्या रिपब्लिकन पक्षाने सारे उपाय वापरून -- यात शिस्तबद्ध प्रचारही आला आणि खोट्या, वैयक्तिक आरोपांची राळही आली आणि आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, मिड-टर्म निवडणुकांत डेमोक्रॅटिक पक्षाच्या हमखास मतदारांची असणारी अनुपस्थितीही आली -- १९९४ साली, चाळीस वर्षांत प्रथमच हाऊसमध्ये बहुमत मिळवले. २०१० सालाप्रमाणे त्या निवडणुकीतही बरेचसे कन्झर्व्हेटिव्ह डेमोक्रॅट्स (ब्ल्यू डॉग्ज) पराभूत झाले. २०१० सालाप्रमाणेच तेव्हाही रिपब्लिकन हाऊसने सरकार बंद पाडले.

हिलरी जर राष्ट्राध्यक्ष झाली असती तर अर्थातच जो छुपा/उघड वर्णद्वेष ओबामाच्या विरोधात दिसून येतो, तो या विरोधात दिसला नसता. अ‍ॅपलाचियन भागातल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या अनेक पारंपरिक ब्ल्यू कॉलर श्वेतवर्णीय मतदारांनीही ओबामाच्या विरोधात मतदान केलं; त्यामागे बव्हंशी वर्ण हे कारण होतं. एकेकाळी डेमोक्रॅटिक पक्षाचा आधारस्तंभ असणारे ब्ल्यू कॉलर श्वेतवर्णीय रिपब्लिकन पक्षाकडे वळण्याची प्रक्रिया सत्तरच्या दशकापासूनच सुरू झाली होती. (पहा रेगन डेमोक्रॅट्स). ओबामाच्या निवडणुकीनंतर ती केंटकी, टेनेसी, वेस्ट वर्जिनिया, पश्चिम पेनसिल्व्हानिया या भागातही दृढमूल झालेली दिसते आहे. दक्षिणेतील राज्यांबरोबरच नवीन कडवे हाऊस रिपब्लिकन सदस्य आहेत ते याच भागातले. बिल क्लिंटनने १९९२ आणि १९९६ मध्ये यातली काही राज्यं जिंकली होती; २०१६ मध्ये जरी हिलरी क्लिंटन जरी उमेदवार असली तरी ही राज्यं पुन्हा जिंकणं तिलाही अवघड आहे.

३. या सगळ्या प्रकारात अमेरिकेत वांशिक मतभेद तीव्र होऊन त्यातून कायमची उघड वांशिक-हिंस्त्र दरी निर्माण होण्याचा धोका आहे का?

--- तसं वाटत नाही. आर्थिक आणि ऐतिहासिक कारणांमुळे कृष्णवर्णीय समाज हा डेमोक्रॅटिक पक्षाला पाठिंबा देतच आला आहे. उजवीकडून होणारा विरोध हा उघडउघड वर्णद्वेष न राहता 'कोडेड रेसिझम' बनला आहे - आर्थिक धोरणांचे शर्करावगुंठन आणि विशिष्ट सूचक शब्दांची पेरणी केलेला. रेगनचे 'राज्यांच्या हक्कांविषयीचे भाषण' असो वा त्याचा सल्लागार ली अ‍ॅटवॉटर याची धोरणं (हा दुवा नक्की वाचा) -- आपला संदेश योग्य त्या गटापर्यंत नक्की पोचेल, पण वर्णभेदाचा आळही येणार नाही - असं हे दुहेरी हत्यार आहे.

अजूनही रिपब्लिकन असलेल्या, कॉलिन पॉवेलने याबद्दल केलेलं अधिक विवेचन पहा -

मात्र रिपब्लिकन पक्षाला केवळ श्वेतवर्णीयांच्या ५५ ते ६०% मतांवर आगामी निवडणुका जिंकणे अधिकाधिक कठीण होत जाणार आहे. मतांच्या स्पर्धेत तगून राहण्यासाठी दोन्ही पक्षांनी आपली धोरणं वेळोवेळी बदलली आहेत. परिणामी काही तेढ कायम राहिली तरी तिला सत्तरच्या दशकाप्रमाणे उघड दंगलींचे स्वरूप येईल, असं वाटत नाही.

४. या भांडणात तिथल्या भारतीय वंशाच्या लोकांची काय भूमिका आहे? (भारतात असताना जे कट्टर उजव्या गटाचे प्रतिनिधित्व करतात ते अमेरिकेत जाऊन डावे/उदारमतवादी डेमोक्रॅट बनतात का? हा विरोधाभास त्यांना जाणवतो का?)

--- माझ्या परिचयातले बहुतांश भारतीय डेमोक्रॅटिक पक्षाला पाठिंबा देणारे आहेत. जे मोजके रिपब्लिकन आहेत, त्यांचीही सामाजिक/धार्मिक/वैज्ञानिक बाबींबद्दलची मतं ही कट्टर रिपब्लिकन्सपेक्षा मुख्य प्रवाहाशी सुसंगत अशी आहेत. दुसर्‍या उपप्रश्नाच्या संचात बसणारे असे माहितीतले दोन-तीन जणच आहेत (स्थानिक मंडळाच्या कार्यक्रमात भेटलेले!). ज्ञानेश्वरीत हिग्ज-बोसॉन कणाची संकल्पना मांडलेली आहे हे ठासून सांगतानाच काही मिनिटांपूर्वी आपण बुशचं स्टेम सेल रिसर्चविरोधी धोरण कसं मूर्खपणाचं होतं, हेही सांगत होतो - हे त्यांच्या गावी असल्याचं आढळलं नाही ;). ऋषिकेश म्हणतो तसं, आपण समाजात अल्पसंख्य/बाहेरचे वा बहुसंख्य/आतले आहोत - यावरूनही त्यांची भूमिका ठरते - हे उघड आहे. मात्र किती लोकांनी हे निदान स्वतःशी तरी तपासून पाहिलं असेल, हे सांगता येणार नाही.

Nile Sat, 05/10/2013 - 07:37

In reply to by नंदन

या भांडणात तिथल्या भारतीय वंशाच्या लोकांची काय भूमिका आहे? (भारतात असताना जे कट्टर उजव्या गटाचे प्रतिनिधित्व करतात ते अमेरिकेत जाऊन डावे/उदारमतवादी डेमोक्रॅट बनतात का? हा विरोधाभास त्यांना जाणवतो का?)

काही अनिवाश्यांच्या निवाशी बाप/सासरे लोकांचे (काय करणार, संकट कधी आणि कसं ओढवेल सांगता येतं का?) रिपब्लिकन पक्षाप्रती असलेले निस्सिम प्रेम जेव्हा मला कळले, तेव्हा एकवेळ रेडनेक रिपब्लिकनशी वाद घालीन पण या सासरेबुवांना कोणीतरी आवरा रे अशी माझी अवस्था झाली होती.

'न'वी बाजू Sat, 05/10/2013 - 07:51

In reply to by Nile

अनिवाश्यांच्या निवाशी बाप/सासरे लोकांचे रिपब्लिकन पक्षाप्रती असलेले निस्सिम प्रेम

??????

एकवेळ रेडनेक रिपब्लिकनशी वाद घालीन पण या सासरेबुवांना कोणीतरी आवरा रे अशी माझी अवस्था झाली होती.

आय डोंट ब्लेम यू.

अवांतर:

(काय करणार, संकट कधी आणि कसं ओढवेल सांगता येतं का?)

सहसा सांगूनच ओढवते, पण त्याबद्दल शष्प काही करता येत नाही.

Nile Sat, 05/10/2013 - 08:10

In reply to by 'न'वी बाजू

अनिवाश्यांच्या निवाशी बाप/सासरे लोकांचे रिपब्लिकन पक्षाप्रती असलेले निस्सिम प्रेम

??????

?????????

सहसा सांगूनच ओढवते, पण त्याबद्दल शष्प काही करता येत नाही.

तुमचं आमचं सेम असतंच असं नाही! ;-)

सुनील Sat, 05/10/2013 - 07:51

In reply to by नंदन

उत्तम आणि माहितीपूर्ण प्रतिसाद.

माझ्या परिचयातले बहुतांश भारतीय डेमोक्रॅटिक पक्षाला पाठिंबा देणारे आहेत

बरोबर. हे सामान्य नागरीकांबाबत.

परंतु, भारतीय वंशाचे प्रसिद्ध अमेरिकी राजकारणी मात्र रिपब्लिकन पक्षाला जवळ करतात! बॉबी जिंदाल आणि निक्की हॅली ही अगदी सहज आठवणारी नावे.

(आपले (?) कुमार बर्वे आणि स्वाती दांडेकर मात्र डेमोक्रॅट बरं का! ;))

१ ह्या दोघांनीही ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. अर्थात, पाण्यात राहायचे म्हणजे माशांशी वैर कसे करणार? ;)
२. आता बर्वे आणि दांडेकर म्हणजे "आपलेच" नै का? ;)

उपाशी बोका Sun, 06/10/2013 - 22:08

In reply to by सुनील

आता बर्वे आणि दांडेकर म्हणजे "आपलेच" नै का?

अर्थात. ख्रिस्ती धर्म स्वीकारला असला तरी नीता साने बाईपण आपल्याच आहेत की. राजकारण मे ऐसी छोटी मोटी बाते होती ही रहती है|

'न'वी बाजू Tue, 01/10/2013 - 22:14

In reply to by विसुनाना

सर्वसामान्य / गरीब अमेरिकन नागरीकाला दिलासा देणारा हा कायदा दिसतो तरीही "या कायद्याला रिपब्लिकनांचा विरोध आहे" असे का बुवा?

वर नंदनने अतिशय सुरेख विवेचन केलेले आहे. तितक्या खोलात जाऊन (आणि तितक्या सुसंगतीने) लिहायला मला व्यक्तिशः पेशन्स नाही (आणि तेवढ्या सखोल अभ्यासाचाही दावा नाही), त्यामुळे अतिशय थोडक्यात आपल्या प्रश्नाचे उत्तर देऊ इच्छितो:

"द रिपब्लिकन पार्टी इज़ द बेस्ट पार्टी द्याट मनी क्यान बाय."

(साधारणपणे १९९५-९६पासून या पक्षाचे निरीक्षण करीत आलेलो आहे. तेव्हापासून ते आजवर दिवसेंदिवस या पक्षाची चाललेली 'प्रगती' पाहता या पक्षातून काहीही चांगले बाहेर येण्याची अपेक्षा (मुळातही नव्हती, पण) केव्हाच सोडून दिलेली आहे. आणि ओबामा अध्यक्ष झाल्यापासून तर यांना ऊत आलेला आहे. तूर्तास इतकेच.)

तिरशिंगराव Wed, 02/10/2013 - 16:47

नंदन यांचा प्रतिसाद वाचून ज्ञानात भर पडली. आपल्याकडे अमेरिकन सिस्टिम आणा असे म्हणणार्‍यांनी हे जरुर वाचले पाहिजे.

सगळी नॅशनल पार्क्स बंद झाली आहेत. व्हिसाची कामे बंद झाली आहेत. त्यामुळे टुरिस्ट लोकांना मोठा प्रॉब्लेम आहे.

अरविंद कोल्हटकर Wed, 02/10/2013 - 19:50

सर्वसाधारणपणे पाहिले तर राजसत्तेला आह्वान देऊन जनसत्ता स्थापन करण्याच्या विचारसरणीस Republicanism असे म्हणतात. अमेरिकेतील राजसत्ता गेल्याला आता दोनशेहून अधिक वर्षे झाली. अमेरिकेतील रिपब्लिकनांनी तदनंतर लिंकनच्या नेतृत्वाखाली गुलामगिरीची प्रथा मोडून काढण्यासाठी लढाहि दिला. तदनंतर मात्र परिस्थिति बदलत गेले. ज्यांना एकेकाळचे डावे म्हणता येईल असे रिपब्लिकन अधिकाधिक उजवे होऊ लागले. गुलामगिरीविरुद्ध लढा आणि नंतरचा उजवेपणा ह्या दोन परस्परविरोधी गोष्टींचे मूळ रिपब्लिकनांच्या गोरे असण्यामध्ये आणि बायबलवरच्या विश्वासामुळे आहे. गोरे म्हणून उजवे आणि बायबलवर विश्वास ठेवणारे म्हणून मानवतावादी आणि डावे असे त्याचे सोपे स्पष्टीकरण देता येईल.

हा त्यांचा मूलभूत उजवेपणा आता एक प्रकारच्या टोकाच्या 'अमेरिकावादा'मध्ये परावर्तित होऊ लागला आहे. हा अमेरिकावाद व्यक्तिस्वातन्त्र्याचे अतोनात प्रेम आणि त्याच प्रमाणात शासकीय ढवळाढवळीचा दुस्वास अशा स्वरूपात आता दिसून येतो.

ओबामाकेअरला विरोध कशासाठी तर त्यामध्ये सर्वांच्यावर वैद्यकीय सुरक्षितता घेण्याची सक्ती केली जात आहे. शासनाने अशी काही सक्ती करणे अमेरिकावादात बसत नाही, मग ती गरीब अमेरिकनाच्या हिताची का असेना. अमेरिकेतील महागडी वैद्यकीय व्यवस्था न परवडल्यामुळे एखादा दरिद्री अमेरिकन टाचा घासत मेला तरी हरकत नाही पण शासनाची ढवळाढवळ नको!

महिन्यातून एकदा कोठेतरी कोण्या माथेफिरूने अंदाधुंद गोळीबार करून डझन दोन डझन सर्वसामान्यांना मारून टाकले तरी हरकत नाही पण दुसर्‍या घटनादुरुस्तीने बहाल केलेल्या 'right to bear arms' ह्याला हात लावू देणार नाही हेहि ह्याच अमेरिकावादाचे एक टोक. ज्या काळात ही घटनादुरुस्ती झाली त्या काळातील शस्त्रे म्हणजे एकावेळी एकच गोळी झाडू शकणारी साधीसुधी होती. आजच्या सारखी मिनिटाला शंभरदोनशे गोळ्या सोडणारी आणि लढाईतच सैनिकांनी वापरावी अशा प्रकारची नव्हती. त्या जुन्या काळात अमेरिका देशहि अजून अपरिपक्व होता. देशाच्या पुष्कळ नव्या भागांमध्ये शासनाचे अस्तित्व फार दिसत नसे आणि स्वतःच्या वा स्वतःच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी स्वतःलाच उभे राहावे लागे. आज ही सर्व स्थिति पूर्ण बदलली आहे पण तिच्याकडे दुर्लक्ष करून नॅशनल रायफल असोसिएशन ह्या बलाढ्य गन-लॉबीचे दुसर्‍या घटनादुरुस्तीचे तुणतुणे वाजतच आहे.

ओबामाकेअरचा कायदा लोकशाही मार्गाने मंजूर झाला, नंतर त्याला सुप्रीम कोर्टाचाहि शिक्का मिळाला पण never say die वाले hardcore Republicans अजूनहि तो कायदा रद्द करण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यांचा सध्याचा आडमुठेपणा हे त्याचेच एक उदाहरण आहे.

राजेश घासकडवी Thu, 03/10/2013 - 06:27

In reply to by अरविंद कोल्हटकर

उजवे लाल (रिपब्लिकन), डावे निळे (डेमोक्रॅट) या विभागणीचीही गंमत आहे. एकोणिसाव्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या अर्धात चित्र बरोब्बर उलटं होतं. म्हणजे रिपब्लिकन हे सध्याची डावी विचारसरणी धरणारे होतं. गुलामगिरी बंद व्हावी यासाठी रिपब्लिकन नॉर्थने डेमोक्रॅट साउथशी युद्ध केलं. विसाव्या शतकाच्या मध्ये कसं माहित नाही, पण चित्र एकदम उलटं झालं. म्हणजे मतप्रवाह तेच पण पक्षांची अदलाबदल झाली. लोक तिथेच राहिले पण दक्षिणेतल्या व मध्य अमेरिकेले राज्यांतले गोरे-बायबलप्रेमी-कंझर्व्हेटिव्ह-उजव्यांचे मतप्रवाह रिपब्लिकन पक्षाने आपले म्हणून स्वीकारले. आणि उत्तरपूर्व आणि पश्चिमेतल्या पुरोगामी-उदारमतवादी-लिबरल-डाव्यांचे मतप्रवाह डेमॉक्रॅट्सनी घेतले.

वैमानिक हत्ती Mon, 07/10/2013 - 10:11

In reply to by अरविंद कोल्हटकर

अमेरिकेतील राजसत्ता गेल्याला आता दोनशेहून अधिक वर्षे झाली.

बाकी प्रतिसाद आवडला.पण हे कळले नाही. अमेरिकेत राजसत्ता कधी होती?माझ्या माहितीप्रमाणे अमेरिकेवर पूर्वी इंग्लंडचे राज्य होते आणि अमेरिकन स्वातंत्र्ययुध्दानंतर जॉर्ज वॉशिंग्टन पहिले अध्यक्ष झाले.तेव्हा पारतंत्र्य आणि नंतर अध्यक्षीय पध्दत अशी परिस्थिती होती.अमेरिकेचा राजा वगैरे असे काही होते का?

अरविंद कोल्हटकर Mon, 07/10/2013 - 17:53

In reply to by वैमानिक हत्ती

अमेरिकेमध्ये ब्रिटनची राजसत्ता पूर्वी होती असे सुचविले आहे. अमेरिका स्वतन्त्र होणे सर्वांनाच मान्य होते असे नाही. १७७६ च्या घटनांच्या वेळी ज्यांना Empire Loyalists असे म्हणत असत अशा लोकांनीच उत्तरेकडे सरकून ब्रिटिश साम्राज्याचा भाग असलेल्या कॅनडाचा पाया घातला. त्यांनी वसवलेल्या भागास Upper Canada असे म्हणत असत. हे शब्द अजूनहि Upper Canada College ह्या Eton मॉडेलवर उभारलेल्या पब्लिक स्कूलच्या नावात अजून टिकून आहेत.

धनंजय Mon, 07/10/2013 - 20:42

In reply to by वैमानिक हत्ती

वाक्य १
> सर्वसाधारणपणे पाहिले तर राजसत्तेला आह्वान देऊन जनसत्ता स्थापन
> करण्याच्या विचारसरणीस Republicanism असे म्हणतात.
आणि वाक्य २
> अमेरिकेतील राजसत्ता गेल्याला आता दोनशेहून अधिक वर्षे झाली. अमेरिकेतील
> रिपब्लिकनांनी तदनंतर...

अमेरिकेतील रिपब्लिकनांचा ब्रिटनच्याच्या राजेशाही-विरोधी Republicanismशी काही संबंध असल्याचे ध्वनित होते ("तदनंतर" शब्दामुळे). यू. एस.ने ब्रिटनपासून स्वातंत्र्य १७७६मधे मिळवले. जेफरसनने १७९१मध्ये स्थापन केलेला जुना रिपब्लिकन (पूर्ण नाव "डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन" पक्ष) १८२५ मध्ये विलीन झाला. या पक्षाचा आधार राजेशाही आणि सरंजामशाहीचा विरोध होता, खरा.
सध्याच्या रिपब्लिकन पक्षाची स्थापना १८५४ साली झाली, तेव्हा यू.एस.वर राजेशाही स्थापन होण्याची कुठलीच शक्यता नव्हती. त्यांनी "रिपब्लिकन" नाव जेफरसनला प्रणाम म्हणून, वगैरे, स्वीकारले.
The idea for the name came from an editorial by the party's leading publicist Horace Greeley, who called for, "some simple name like 'Republican' [that] would more fitly designate those who had united to restore the Union to its true mission of champion and promulgator of Liberty rather than propagandist of slavery. (विकिपीडिया)

अजो१२३ Thu, 03/10/2013 - 17:07

इथल्या सगळ्या प्रतिक्रिया / माहित्या पाहून अमेरिका जातीयवाद मागे ठेऊन विकसित झाली आहे ही भावना बरीच डळमळली. अल जजिराच्या बातम्या ऐकून तर हादरलोच. The repitition of the phrase 'they do not consider him the legitimate president of USA' is eyeopening. वर्णभेद चार लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे असे वाटले होते, पण बातम्या ही प्रजाती खूप मोठी आहे असे वाटायला लागले आहे. 'ओबामा अध्यक्ष झाले यात कौतुक ते काय?' पासून 'हे दिव्य त्यांनी कसे केले असेल बाबा?' पर्यंत माझे मत बदलले आहेत.

चिंतातुर जंतू Fri, 04/10/2013 - 12:10

ज्या प्रकारचे लोक अमेरिकेनं निवडून दिले आहेत ते घडलं त्याला कारणीभूत आहेत असं सांगणारं जळजळीत लिखाण इथे वाचायला मिळेल. त्यात अनेक मौक्तिकं आहेत. उदा. अल्ट्रासाउंड किंवा सोनोग्रॅममध्ये गर्भातली पुल्लिंगी अर्भकं हस्तमैथुन करताना दिसतात!

ऋता Sun, 06/10/2013 - 00:18

इथे अनेक सदस्य अमेरिकेत रहाणारे आहेत त्यांना अमेरिका बंद हे काय आहे ते अनुभवायला मिळत असेलच....पण आज तिथले टेलिस्कोप बंद झालेत ही गोष्ट इमेलने कळल्यावर एकदम बंद अमेरिकेशी जोडले गेल्यासारखं वाटलं. अव्याहतपणे आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या दुर्बिणीं बंद असल्याचा फायदा घेऊन एलियन सैन्य/एखादा अ‍ॅस्टेरॉइड अमेरिकेबर हल्लाबोल करतो आहे अशी कल्पना केली.

'न'वी बाजू Sun, 06/10/2013 - 05:09

In reply to by ऋता

तमाम उर्वरित दुनिया सोडून एलियनांनी/अ‍ॅस्टेरॉइडांनी अमेरिकेवरच हल्लाबोल करणे पसंत करावे, हा अमेरिकन (स्वघोषित) एक्सेप्शनॅलिझ्मचा भाग समजावा काय?

राजेश घासकडवी Sun, 06/10/2013 - 05:40

In reply to by 'न'वी बाजू

अर्थात. तमाम उर्वरित सेकंड वर्ल्ड आणि थर्ड वर्ल्ड कंट्र्यांनी भरलेली दुनिया सोडून अमेरिकन लोकांचे श्रीमंती प्रश्न सोडवायला सुपरमॅन अमेरिकेतच वावरतो, तसंच हे.

पण हेही आहे की तमाम उर्वरित दुनिया सोडून एलियनांनी/अ‍ॅस्टेरॉइडांनी अमेरिकेवरच हल्लाबोल केला तर तमाम उर्वरिते दुनियेलाही प्रचंड पसंत पडेल याची खात्री आहे.

'न'वी बाजू Sun, 06/10/2013 - 07:01

In reply to by राजेश घासकडवी

पण हेही आहे की तमाम उर्वरित दुनिया सोडून एलियनांनी/अ‍ॅस्टेरॉइडांनी अमेरिकेवरच हल्लाबोल केला तर तमाम उर्वरिते दुनियेलाही प्रचंड पसंत पडेल याची खात्री आहे.

शक्य आहे. परंतु तसेही, तमाम उर्वरिते दुनियेला काय पसंत पडते नि काय नाही, हा प्रश्न कधी होता, की आताच पडू लागावा? उर्वरित दुनिया हा हल्लाबोल परतवून लावण्याच्या प्रयत्नांत स्वपसंतीने सामील होणार आहे काय?
--------------------------------------------
अरे बघता काय? सामील व्हा!

अजो१२३ Sun, 06/10/2013 - 13:25

In reply to by 'न'वी बाजू

उर्वरित दुनिया हा हल्लाबोल परतवून लावण्याच्या प्रयत्नांत स्वपसंतीने सामील होणार आहे काय१?

हॉलिवूडच्या मते हल्ला परतावण्याच्या प्रयत्नात उर्वरित दुनिया अशी सामिल वैगेरे होत नाही. फक्त एकदा अमेरिकन लोकांनी त्यांना पिटाळले कि आनंद साजरा करतात. Independence Day मधे ताजमहालासमोर धोतरे नि मळकट साड्या घातलेले भारतीय उंच उड्या मारून, हात वर करून आनंद साजरा करतात अशी एक छोटीशी क्लिप आहे.

'न'वी बाजू Sun, 06/10/2013 - 18:16

In reply to by अजो१२३

हा ट्रिकल-डाऊन थियरीसदृश प्रकार समजावा काय? (म्हणजे, अमेरिकेवरचे संकट निवारल्याने उर्वरित जगही अप्रत्यक्षपणे सुरक्षित राहून त्याचा - बोले तो, उर्वरित जगाचा - उद्धार होतो, असे काहीतरी?)

राजेश घासकडवी Sun, 06/10/2013 - 20:47

In reply to by फारएण्ड

आजकाल जरा या सुपरहीरोंना इतर जगही आहे याचा अंदाज यायला लागलेला आहे. सुपरमॅन रिटर्न्समध्ये तो जर्मनी, जपान वगैरे देशांतही काही कर्तृत्व करून येतो अशा क्षणिक बातम्या दाखवलेल्या आहेत. मात्र वॉचमेन नावाच्या सिनेमात चक्क सर्वशक्तिमान डॉ. मॅनहॅटन व्हिएटनाम युद्धात अमेरिकेला मदत करतो असं दाखवलेलं आहे.

राजेश घासकडवी Tue, 15/10/2013 - 09:12

कर्जाच्या कमाल मर्यादेबाबत २०११ मध्येही चर्चा झाली होती. त्यावेळी ओबामा आणि बेहनर यांच्यात झालेल्या वाटाघाटींचा आढावा घेणारा अतिशय सुंदर लेख. काहीसा लांबलचक आहे, पण राजकीय पत्रकारितेचा उत्कृष्ट नमुना आहे.

सुनील Tue, 15/10/2013 - 11:41

In reply to by नितिन थत्ते

इंदिरा गांधींच्या काळात अशीच चर्चा (बहुधा अंतुले यांनी) सुरू केली होती.

तेव्हा विरोधी पक्षांकडे कोणी एक अशी प्रभावशाली व्यक्ती नव्ह्ती. आज परिस्थिती थोडी तशीच (पण उलट बाजूने) आहे!