घाबरगुंडी
समोरून नेता आला
तावातावात बोलू लागला
हा आपला तो तुपला
ऐकलं नाहीस तर तू धुपला
तुमची भाषा धोक्यात आहे
तुमचा धर्म धोक्यात आहे
माझी उडाली घाबरगुंडी
मी मग तडक गेलो
त्यांना मत देऊन आलो
उगाच कशाला? माझा धर्म, माझी भाषा संपली तर!
समोरून दुसरा आला
तावातावात बोलू लागला
अमुक पॅटर्न तमुक फॉर्मॅट
आमचंच आतून सारं ग्याटमॅट
आमच्याविना आहे काय?
करियर धोक्यात आलं हाय
माझी उडाली घाबरगुंडी
मी मग तडक गेलो
त्या क्लासमध्ये दाखल झालो
उगाच कशाला? माझं करियर, माझे मार्क हरवले तर!
समोरून 'प.पू.' आले
तावातावात बोलू लागले
अमुक विद्या, तमुक मंत्र
वक्री ग्रह, चक्री तंत्र
मला आहे शक्ती फार
क्षणात तुजला बसेल मार
माझी उडाली घाबरगुंडी
मी मग तडक गेलो
मठात पाकीट टेकवून आलो
उगाच कशाला? त्यांच्या शापाने शांतता हरवली तर!
समोरून बुवा आले
तावातावात बोलू लागले
बाबा-भोंदू थापा फार
प.पू. नुसता फुसका बार
देवात आहे ताकद खरी
त्याच्याशी सलगी बरी
माझी उडाली घाबरगुंडी
मी मग तडक गेलो
देवळात पावती फाडून आलो
उगाच कशाला? देवाचा कोप झाला तर!
समोरून तज्ज्ञ आले
तावातावात बोलू लागले
आली मंदी बुडेल धंदा
अर्थव्यवस्थेचा वांदा
येईल साठी जवळ जेव्हा
वणवण करत राहशील तेव्हा
माझी उडाली घाबरगुंडी
मी मग तडक गेलो
'स्कीम'चा चेक फाडून आलो
उगाच कशाला? म्हातारपणी पैसे संपले तर!
समोर निवांत मित्र आला
मला मग ताव चढला
धर्म भाषा शिक्षण पैसा
सारे काही धोक्यात आहे
हे कर ते कर सारे काही
नाहीतर काही खरे नाही
त्याची उडाली घाबरगुंडी
तो मग तडक गेला
मनात भिती भरून बसला
मग मी शांत झालो.. मोकळं कोकरू कळपात आलं!
साले सगळे घाबरतात! साले सगळे घाबरवतात!
छान!
वाचायला, कळायला सोपी आणि एक मोठ्ठा मुद्दा मांडणारी कविता.
अगदी सहमत.
चौकटीबाहेर गेल्यास काहीतरी वाईट होईल या भीतीवर जगणारी माणसं आपण. भीती कशी जाणीवपूर्वक जोपासली जाते आणि माणसाला प्रचलित व्यवस्थेवर अवलंबून राहण्याशिवाय अन्य जीवनच नाही हे ठसवले जाते त्याचे चांगले दर्शन होते कवितेतून.
सेफैनाए ?
धाग्यातल्या कवितेच्या सूत्राशी निगडीत एक भन्नाट मार्मिक कविता 'शब्दवेध'मध्ये ८-९ वर्षांपूर्वी वाचली होती.
कवी : नितीन कुळकर्णी 'निवी'
केसांच्या अंतरावर कटिंगवाला
पावलाच्या अंतरावर चप्पलवाला
पिशवीच्या अंतरावर भाजीवाला
अंडीलोणीदूधगिर्णी अगदी लागुनलागुन
शाळाकॉलेजंऑफिसंफिफीस अगदी लागुनलागुन
फोनए फॅक्सए कमरेकमरेला पेजरए
कमर्याकमर्यात कॉम्पुटरए
स्वतःची वाहनं चौकात रिक्षा बस दाराशी स्टॉपए
दोन किलोमीटरवर डेक्कनए
इंटरनेट मॉस्किटोनेट
व्होल्टगार्ड अॅक्वागार्ड बिल्डिंगगार्डए
मेनडोअरला लोखंडी दार, दर खिडकीला ग्रिलए
चौकात एक चौकीए
चौकीमध्ये पोलीसए ह्याचीसुद्धा खात्रीए
म्हंजे आता, सगळं कसं अगदी, सेफैनाए ?
पूर्व- घराचा प्रवेश, आग्नेय - जळता दिवा
नैऋत्य - शयनगृह, ईशान्य - देवघर
उत्तरेकडे उतमांग करून कधीच झोपत नाए
उघड्या दारातून उभी चूल कधीच दिसत नाए
दक्षिणभिंतीवरती एक छिद्रसुद्धा ठेवलेलं नाए
म्हंजे आता, सगळं कसं अगदी, सेफैनाए ?
हाकेच्या अंतरावर अँब्युलन्स
बोंबलायच्या अंतरावर फायरब्रिगेड
शेजारी डोळ्यांचा डॉक्टर, खाली डेंटल
त्याच्याखाली मेंटल
मागे हार्ट समोर ओर्थो पलिकडे न्यूरो.
कालच सगळा चेकप सगळे रिपोर्ट ओक्के.
पाठए गॅस-सिलिंडरसारखी कातडी ताडपत्रीसारखी
बर्गड्या रेल्वेरुळांसारख्या कवटी स्पीडब्रेकरसारखी
लघ्वी थुंकी तर एकदमच मिनरलए
म्हणजे आता, सगळं कसं अगदी, सेफैनाए ?
लै भारी
वाचायला, कळायला सोपी आणि एक मोठ्ठा मुद्दा मांडणारी कविता.
मानवी दैन्य आणि दैन्यांचे प्रकार पाहता 'मानवाला बुद्धी आहे' हा केवळ एक technical अस्पेक्ट आहे असे वाटू लागते. कालनिरपेक्ष विचार आणि कृती करण्याचे सामर्थ्य असा बुद्धीचा अर्थ काढला, बुद्धी शब्दामागे एक सायलेंट 'सत्' असतो तो आहे का हे चेक करून बघायचे म्हटले तर 'बौद्धिक एकटेपणा' सगळ्यांना घाबरवतो असे निदर्शनास येईल.