Skip to main content

गरज विवेकी धर्मजागराची

अंनिस ही विवेकजागराची चळवळ आहे. विवेक ही काही अंनिसची मक्तेदारी नाही. समाजात विवेकाचा विचार सांगणारे संतजन होतेच की. बर्‍याच लोकांना अंनिस ही डामरट वाटते. दाभोलकर म्हणजे अंनिस हे समीकरण रुजण्याच कारण त्यांनी चळवळ प्रसारमाध्यमातुन रुजवण्याचे प्रयत्न केले. खरतर अंनिसचा विचार हा नवीन नाही. बुवाबाजीचा भंडाफोड झाल्यावर लोक बुवा बदलतात पण मानसिकता बदलत नाहीत. विवेकाधिष्ठीत समाज निर्माण करण्यासाठी नरेंद्र दाभोलकरांनी केलेले हे आवाहन
गरज विवेकी धर्मजागराची [दैनिक सकाळ ३० आक्टोंबर २००७]
(नरेंद्र दाभोलकर)

धर्मविचाराचा बुद्धीने शोध घेण्याचा आस्थेने प्रयत्न जेथे झाला, त्या महाराष्ट्रातील आजचे चित्र उफराटे आहे. धर्माची कर्मकांडे व त्याद्वारे धर्माचा अभिमान, अस्मिता, अहंकार बलवान करण्याचा प्रयत्न सध्या सर्वच धर्मांत चालू आहे. धर्मभावनांचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण चालू आहे...
कथित धर्मरूढी, प्रथा, परंपरा, पूजा, व्रतवैकल्ये, सणवार, कर्मकांडे यांना समाजजीवनात जणू उधाण आल्याचे दिसते आहे. याचा एक अर्थ यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणारे जे आहेत त्यांना यश लाभते आहे. दुसरा अर्थ आपले कल्याण होईल, असे मानून भ्रमचित्त समाज चुकीच्या मार्गाने चालला आहे. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या वातावरणाला प्रशासकीय कठोरपणाचे उत्तर पुरे होईल, असे मानले जाते आहे. परिस्थितीच्या गांभीर्याची जाण येण्यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातच नव्हे, तर खेड्यातही लोकवर्गणीतून जमणारे पैसे कशासाठी खर्च झाले ते तपासून पाहा. धार्मिक उत्सव, हरिनाम सप्ताह, जुन्या देवळांचा जीर्णोद्धार, नव्या मंदिराची उभारणी यांसाठी उधळला जाणारा पैसा हा शिक्षण, आरोग्य, उद्योजकता विकास यापेक्षा कितीतरी अधिक आहे.

जीवनात धर्माला वैशिष्ट्यपूर्ण स्थान आणि दीर्घ इतिहास आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उदय आणि विकास ही त्यामानाने गेल्या अवघ्या चारशे वर्षांतील गोष्ट आहे. संघटित धर्माचा उदय त्याआधी कित्येक शतके झाला. विज्ञानाच्या उदयाआधीच त्याला विशालस्वरूप आणि विलक्षण सामर्थ्य प्राप्त झाले. जीवनाचे सर्व आयाम धर्मकल्पनेच्या प्रभुत्वाने व्यापले गेले. सर्व जीवनावर धर्माची अप्रतिहत सत्ता फार दीर्घकाळ चालली.

आपण लहानपणी भाषा शिकतो. धर्म जन्मतःच मिळतो. मायबोलीप्रमाणे व मायधर्म संस्काराने आपण स्वीकारतो. धर्मविचाराचा प्रश्‍नच उपस्थित केला जात नाही. व्यक्ती प्रौढ, विवेकी झाल्यावर तिने धर्मविचार करावा, अशी अपेक्षा असते. बहुतेकांच्या जीवनात हे घडत नाही. लोकहितवादी, महात्मा फुले, न्या. रानडे, पंडिता रमाबाई, डॉ. केतकर, गाडगेबाबा, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म या विषयावर मनन, चिंतन व कृती केली. धर्मविचाराचा बुद्धीने शोध घेण्याचा आस्थेने प्रयत्न केला. त्याच महाराष्ट्रातील आजचे चित्र उफराटे आहे. धर्माची कर्मकांडे व त्याद्वारे धर्माचा अभिमान, अस्मिता, अहंकार बलवान करण्याचा प्रयत्न सध्या सर्वच धर्मांत चालू आहे. धर्मविचार व धर्माभिमान या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. धर्माभिमानी माणूस धर्मविचार करू शकेल; पण करेलच असे नाही. धर्माभिमानाला जास्तीत जास्त तीव्रता व धर्मविचाराला ओहोटी असे महाराष्ट्रातले आजचे स्वरूप आहे. संतांची भक्ती व शिकवण वेगळ्या प्रकारची आहे. माणसाने आपले कर्तव्यकर्म करावे; पण ते ईश्‍वराची आज्ञा म्हणून ईश्‍वरार्पण बुद्धीने करावे, अंतःकरणाच्या शुद्धीला व ईश्‍वरविषयक तळमळीला प्राधान्य द्यावे. माणुसकीने व करुणेने वागावे, हे संतांनी सांगितले आणि आचरलेही, परंतु हा मार्ग मराठी मनाला व्यापून टाकू शकलेला दिसत नाही. कर्मकांडाचे आणि उत्सवी धर्माचे साम्राज्य अबाधित राहिलेच, पण ते वर्धिष्णूही बनते आहे.

आपल्या देशातील आजचे वातावरण धर्मनिरपेक्षतेचे नाही. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली धर्म शरणागतीचे आहे. लोकांच्या धार्मिक भावनांना पद्धतशीरपणे उधाण आणण्याचे काम धर्म, त्याचे पंथ, उपपंथ, त्याचे विविध धार्मिक सोहळे आपापल्या अनुयायांमार्फत करत आहेत. दुसरा धर्म, पंथ, जात, संघटित व आक्रमक होत आहे. यामुळे आपण त्यांच्यापेक्षा अधिक संघटित व आक्रमक व्हावयास हवे, असे समर्थन धर्माच्या सार्वजनिक वापरासाठी खुबीदारपणे दिले जाते. गोकुळाष्टमी, गणपती, नवरात्र, दिवाळी, दत्तजयंती, गणेशजयंती, महाशिवरात्र, गुढी पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती अशा सर्व बाबी सार्वजनिक व्हाव्यात आणि त्यात इथले जनमानस गुंतून (की गुंगीत) राहावे, यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न होत आहेत. त्याशिवाय या धार्मिक उत्सवांच्या वाट्याला एवढी भरभराट आलीच नसती. धर्मभावनांचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण चालू आहे. येथील माणसाची मानसिकता अंगभूतपणे धार्मिक आहे. ही धार्मिकता नैतिकतेकडे वळविण्याचा प्रयत्न संत व समाजसुधारकांनी केला. ती धार्मिकता धर्मांध बनवण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालू आहे. माणसाची धार्मिकता हा जणू कच्चा माल झाला आहे. अशा परिस्थितीत खरे प्रश्‍न, खरी मूल्ये याचे आत्मभान न हरवल्यासच नवल.

आत्मभाननिर्मितीचा दावा करणाऱ्या धर्माच्या नावाने हे घडावे हे भयचकित करणारे आहे. ही धार्मिकता विवेकही जागृत करत नाही आणि माणुसकीही जागवत नाही. ही प्रक्रिया याच तेजीने चालू राहिली तर धार्मिक राष्ट्रवादाचे रूप ती धारण करेल. राष्ट्राचे संविधान धर्मनिरपेक्ष व समाज धार्मिक राष्ट्रवादी अशा पेचात देश सापडेल. गुजरातमध्ये याची झलक आपण पाहिलीच आहे. याबरोबरच समाजातील अगतिकता, अस्थिरता, चंगळवाद, काळ्या पैशाचा प्रभाव, राजकीय सामाजिक मान्यतेसाठी धर्म सवंगपणे वापरणे हे सर्वही खरे आहे. या सर्वांतून अत्यंत चुकीच्या पद्धतीने धर्मभावना प्रभावित केली जात आहे.

न्यायालयाचे निर्णय व त्याची प्रशासकीय खंबीर अंमलबजावणी, यामुळे या परिस्थितीला फक्त मर्यादितच आळा बसू शकतो. धर्मनिरपेक्षतेचा संविधानातील आशय जनमानसात रुजविणे हा त्यावरचा अधिक मूलगामी उपाय आहे. त्यासाठी एका व्यापक कृतिशील जनसंवादाची व नागरी खंबीर कृतिशीलतेची गरज आहे. विचाराचे व आचाराचे पाथेय न्या. रानडे, म. फुले, म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उक्ती व कृतीत भरपूर उपलब्ध आहे. या सर्वांचे धर्मकारण म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून, विवेककारण होते. समाजविमुख धर्म त्यांनी समाजसन्मुख केला. विधायक धार्मिकतेचे हे चिंतन समाजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात संघटितपणे क्रियाशील होणे, हीच आजची गरज आहे.

- नरेंद्र दाभोलकर
(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष आहेत.)

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 21/08/2013 - 23:29

दुसरा धर्म, पंथ, जात, संघटित व आक्रमक होत आहे. यामुळे आपण त्यांच्यापेक्षा अधिक संघटित व आक्रमक व्हावयास हवे, असे समर्थन धर्माच्या सार्वजनिक वापरासाठी खुबीदारपणे दिले जाते. ... आत्मभाननिर्मितीचा दावा करणाऱ्या धर्माच्या नावाने हे घडावे हे भयचकित करणारे आहे. ही धार्मिकता विवेकही जागृत करत नाही आणि माणुसकीही जागवत नाही. ही प्रक्रिया याच तेजीने चालू राहिली तर धार्मिक राष्ट्रवादाचे रूप ती धारण करेल.

हिंसा, अतिरेक, वेडाचार यांचं समर्थन करण्यासाठी धर्माचा आधार घेणं किती निरर्थक आहे हे पुन्हा पुन्हा जाणवत रहातं.

हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांची यथार्थ मुलाखतः

सन्जोप राव Thu, 22/08/2013 - 06:10

दाभोलकरांनी ज्या तर्काधिष्ठित विवेकाचा आणि विज्ञाननिष्ठेचा कायम ध्यास घेतला होता तो विवेक अंगीकारणे हे काही रॉकेट सायन्स आहे का? स्वतःला सतत प्रश्न विचारत राहाणे आणि प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कानशीवर घासून घेऊन स्वीकारणे हे समाजाला इतके मोठे ओझे का वाटते ते कळत नाही. अशिक्षित, भाबड्या, अंधश्रद्ध समाजाचे जाऊ द्या (खरे तर तेही नको, पण तो वेगळा विषय आहे), पण तथाकथित उच्चशिक्षित, बुद्धिवादी, धनवान समाजाला आपण थोडा तरी विचार करावा असे का वाटत नाही हा कळीचा मुद्दा आहे. जे विचार करतात त्यांना कसोटीच्या क्षणी तर्ककठोर का होता येत नाही हा दुसरा मुद्दा आहे. कर्मकांडांतला फोलपणा ध्यानात येत असूनही लोकांचा, समाजाचा रोष नको किंवा 'कशाला उगाच विषाची परीक्षा?' या विचारसरणीने समाजाचे अतोनात नुकसान झाले आहे. 'वडीलांनी मरताना सांगितले म्हणून अनंताची पूजा चालू ठेवली आहे, थोरल्या काकांनी माझ्यानंतर घरात विटाळ नको असे म्हटले होते म्हणून अजून घरी शिवाशीव पाळतो, मला पटत नाही, पण आईची इच्छा म्हणून मुलांची मुंज केली' असली मिळमिळीत स्पष्टीकरणे ऐकली की ढवळून येते. 'आपण पांढरे नक्की नाही आहोत, आणि काळे बनण्यात लोकांचा रोष ओढवून घेण्याचा धोका आहे म्हणून आपण आपले 'कुंपणावरचे करडे' राहू यात..' हा बोटचेपेपणा संपूर्ण अडाणी, अंधश्रद्ध लोकांच्या कर्मकांडांपेक्षा भयानक वाटतो.
दाभोलकरांचा हे लेख ज्यांनी येथे दिला आहे त्या घाटपांडेंची स्वतःची भूमिका तर्काधारित चिकित्सकाची आहे. कसोटीच्या प्रसंगी तर्कसंगत निर्णय घेण्याचे धैर्य त्यांनी दाखवले आहे. मी स्वतः अत्यंत कर्मठ, आस्तिक आणि बुरसटलेल्या वातावरणात वाढलो आहे. माझे वडील आयुष्यभर पौर्णिमेला नरसोबाच्या वाडीला जात असत. श्रावणात सोवळ्याचा सैपाक असल्याने कित्येक वेळा मी उपाशी शाळेत गेलो आहे. माझ्या मुंजीत गावजेवण घातले होते. श्राद्धे, पक्ष्ये, सत्यनारायण, गणपती, पांडवपंचमी, होळी ... आता आठवले तरी अंगावर काटा येतो. पण या सगळ्याचा संपूर्ण त्याग करुन एक साधे, कर्मकांडविरहित नास्तिक आयुष्य स्वीकारणे माझ्यासारख्या सामान्य वकुबाच्या माणसाला अजिबात जड गेले नाही. हा बदल 'सीमलेस' म्हणावा असा झाला. फक्त नम्रपणे, पण अविचलपणे 'नाही' म्हणायला मी कचरलो नाही.
तात्पर्य असे की It is very simple to be happy, but it is very difficult to be simple.

ऋषिकेश Thu, 22/08/2013 - 09:28

In reply to by सन्जोप राव

(एरवी आमचे सगले घोडे विनमदी नसूनसुद्धा) या बाबतीत माझे आणि रावसाहेबांचे मत्त बराब्बर जुळतां! :)

पत्रिका बघुन लग्न न करणे, अपत्याची पत्रिकाच न काढणे, उपवर असताना वधुसंशोधनाच्या वेळी वय, जात, धर्म, भाषा यांवर आधारीत कोणतेही क्रायटेरिया न ठेवणे (लिंगाचा क्रायटेरिया ठेवणे भाग होते ;) ), नव्या घरात पुजा वगैरे न करणे, घर घेताना दिशा, वास्तु अजिबात न बघता बजेट, परिसर व सोयीचाच विचार करणे, कोणत्याही धार्मिक संस्थेला देणगी न देणे - देवळात/अगदी लोकांकडच्या पुजांनाही पैसे न टाकणे - मात्र फराळ करून येणे ;), मूल झाल्या झाल्या त्या तान्ह्या अर्भकाला उगाच देवदर्शनाला गावोगावी न नाचवणे वगैरे अनेक वेळा या मार्गाने जाऊन बघितले. घरचे वातावरण अजिबातच विवेकी नाही ;) तरी कोणताही त्रास अथवा अधिकची शक्ती असे करताना घालावी (घालवावी) लागलेली नाही आणि अगदी धार्मिक व्यक्तींबरोबरही कधी वितुष्ट आलेले नाही.

अर्थात मी नास्तिक नाही. आस्तिकही नाही. फार तर "अ‍ॅग्नॉस्टिक" म्हणता यावे असा आहे. देव आहे किंवा नाही याने माझ्या आयुष्यात, निर्णयप्रक्रियेत कोणताही फरक पडणार नाही याची शक्य तितकी काळजी मी घेत असतो. (किंबहुना माझ्या अज्ञानाला मी माझा देव मानतो वगैरे वगैरे आता सार्‍यांना माहिती आहेच).

केतकी आकडे Thu, 22/08/2013 - 12:13

In reply to by ऋषिकेश

हे सगळं सोपं आहे असं वाटतं कधी कधी, पण आपल्या निर्णयावर खंबीर राहून, 'नाही' म्हणणं हे बर्‍याचदा सोपं नसतं असा माझा अनुभव आहे. मे बी माझ्या हातात त्या वेळी हे निर्णय नव्हते, आणि मी स्वत:च इतकी संभ्रमीत अवस्थेत होते की काय चुकीचं आणि काय बरोबर हे कळण्याची परिस्थिती नव्हती. पण त्यातून बाहेर आल्यावर सगळ्या कर्म कांड, मानसीक शांतता वगैरे सोडाच, पण मनाला अतिशय दु:ख देणार्‍या भयानक प्रथा, यातील फोलपणा आता जाणवतोय. जर हे सगळं कळलं नसतं तर कदाचित मी ही आन्धळेपणाने सगळं फॉलो केलं असतं. पण आता प्रत्येक अश्या प्रसंगाच्या वेळी "या मुळे नक्की काय होणार आहे?" हा अतिशय न टाळता येणारा प्रश्न स्वत: समोरच येऊन उभा ठाकतो, ज्याचं उत्तर स्वत:ला तरी द्यावं च लागतं. आणि त्या गोष्टीपेक्षा इतर दुसरे चांगले पर्याय, ज्यामुळे स्वत:ला समाधान मिळेल असे शोधावेच लागतएत.

देव आहे, की नाही या माझ्यासाठी प्रश्न राहिलेला नाही, ऋषिकेश यांनी वर सांगितल्या प्रमाणे, प्रयत्न हाच आहे की त्यामुळे कोणत्याही निर्णय प्रक्रियेत आणि एकूण आयुष्यात काही फरक पडू नये.

सन्जोप राव Fri, 23/08/2013 - 07:29

In reply to by केतकी आकडे

हे सगळं सोपं आहे असं वाटतं कधी कधी, पण आपल्या निर्णयावर खंबीर राहून, 'नाही' म्हणणं हे बर्‍याचदा सोपं नसतं असा माझा अनुभव आहे. मे बी माझ्या हातात त्या वेळी हे निर्णय नव्हते, आणि मी स्वत:च इतकी संभ्रमीत अवस्थेत होते की काय चुकीचं आणि काय बरोबर हे कळण्याची परिस्थिती नव्हती.
निर्णय आपल्या हातात नसतील तर प्रश्नच नाही, पण संभ्रमीत अवस्था टाळता येऊ शकेल असे वाटते. त्यासाठी वैचारिक बैठक पक्की हवी आणि ते विचार प्रत्यक्षात आणण्याची मानसिक ताकद हवी. ही ताकदही प्रयत्नाने कमावता येते असे मला वाटते.

अजो१२३ Thu, 22/08/2013 - 15:16

In reply to by सन्जोप राव

विवेक, तर्क , विज्ञान हे लावताना सामान्य विचार करावा हे प्रत्येकाकडून अपेक्षित आहे आणि आपण स्वतः ते कसे पाळले आहे हे आपण आपल्या प्रतिसादात लिहिले आहे.

दाभोळकरांच्या मुलाचे नाव हमीद पाहून एक सहज प्रश्न सुचला. खालील प्रश्न (१,२) आपले व्यक्तिगत प्रश्न आहेत, मला त्यांची उत्तरे नकोत. त्या अनुषंगाने त्याखाली एक प्रश्न विचारला आहे तो महत्त्वाचा आहे.

१. आपल्या पत्नीचे अधिकृत नाव लग्नापूर्वी होते तेच तश्यास तसे आहे का? आडनाव बदलले आहे का? तिच्या संपूर्ण नावात आपले नाव/आडनाव घातले आहे का?
२. आपल्या मुलाच्या/मूलीच्या (आपणांस अपत्य असल्यास) नावात त्याच्या/तिच्या आईचे नाव आहे का? आईचे मूळ आडनाव आहे का? फक्त आपलेच नाव आणि आडनाव आहे का?

पत्नीच्या नावाला स्पर्श न करणे आणि अपत्यांच्या नावांमधे दोन्ही पालकांचा समान उल्लेख असणे या फ्रंटवर आपला किती काँप्लयन्स आहे? 'आता ते आठवले तरी काटा येतो' असा उल्लेख आपण वर केला आहे. इतरांच्या नावात बदल करणे, आणि अपत्याच्या नावात त्याच्या खर्‍या निर्मात्याचा उल्लेखच न करणे म्हणजे असाच काटा आणणारी प्रथा आहे. कोणाची identity प्रथेपायी बदलणे, कोणाची identity अर्धवट, खोटी लिहिणे ही अंधश्रद्धा नाही का? एका परीने पाहिले तर तो गुन्हा ठरावा वा अनैतिकता ठरावी.

आपला कदाचित १००% compliance असू शकतो. म्ह्णून मी माझे उदाहरण देतो. माझ्या बायकोचे नाव किंचितही न बदलणे या बाबीत मी पूर्ण तर्ककठोर, कृतीकठोर होतो. पण जेव्हा माझ्या मुलाचा प्रश्न आला तेव्हा ही कठोरता गळून पडली. माझे आडनाव ज, बायकोचे आडनाव थ, आणि मुलाचे पहिले नाव ई असले तर मुलाच्या संपूर्ण नावाची तीन ऑप्शन्स (ई थ, ई ज, ई ज थ, ई थ ज) बनतात. पैकी ई ज हेच नाव prevail झाले, मी केले. माझ्याच मुलाच्या नावात माझे नावही नसणे, आडनावही नसणे हा प्रकार मला भयंकर वाटला. आणि इथे 'आजोबाची मरतानाची इच्छा' वैगेरे प्रकार नव्हता. मी विरुद्ध मी अशी सोपी केस होती. नावात काय महत्त्वाचे? त्यातल्या अंधश्रद्धेचा असा काय परिणाम होणार आहे? हे प्रश्न गौण नाहीत. माझ्या मते नाव ओळखच नाही तर अस्मिता दाखवते. नाव शब्दाने आधारित वाक्प्रचार पाहिले तर नाव किती अस्मितादर्शक आहे याची कल्पना येईल. सुदूर भविष्यात,कदाचित, जेव्हा अपत्यास नाव देण्याची equitable पद्धत येईल तेव्हा मला हे जे 'भयंकर' वाटले ते तसे का वाटले याचा आपण म्हणता तसा काटा मला येणार आहे. त्यात काय भयंकर? किती मागास होतो आपण! असे वाटून मी वरमणार आहे.

जिथे स्वतःकडून तर्ककठोरता यशस्वीपणे राबवली गेली त्याच गोष्टीचे उदाहरण देऊन स्वत:ला तर्ककठोर ठरवणे आणि इतरांना तर्कदुर्बल ठरवणे हे अन्याय्य आहे, नाही का? या तर्काच्या कठोरतेचे गीगापास्कल्स जशी जशी आपण वाढवत जाऊ तशी तशी आत्मघोषित गतश्रद्ध माणसाची कितीतरी वर्तने पुन्हा परत अंधश्रद्धेच्या वलयात येतील. अगदी भारतासारख्या उष्ण कटीबंधातल्या कंपन्यांत काम करणार्‍या सी इ ओं ना जुन जुलै मधे टाय बांधणे अवघड होऊन जाईल. राज्यकर्ते आणि समाजधुरीण यांनी भयंकर तार्किक, इ इ असावं हे योग्य पण सामान्य, शिक्षित माणसाने तर्ककठोर असावे अशी अपेक्षा अवास्तव आहे. सामान्य माणसे फार तर्क कधी करणार नाहीत, आणि ते जो तर्क करून जसे वागतात त्यालाच अंधश्रद्धा म्हणतात. त्यापेक्षा त्यांना टीव्ही दाखवा, टीव्हीवर आमिर खान आतडे तोंडात आतडे येईल इतका तूटून सांगतो की लहान बाळाला चांगलं खायला द्या तेव्हा त्याचा खूप परिणाम होतो. एकटा आमिर खान मुलाला पहिले दुध न देण्याची कुप्रथा मोडीत काढू शकतो. त्याऐवजी एका होऊ घातलेल्या बापाला विचारलं तर तो काय डोंबलं सांगणार? त्याचा किती तो अभ्यास? आमिर खान नसेल तर ही प्रथा चालूच राहील.

सामान्य माणसाला कठोर तर्क करायला सांगणे म्हणजे पाल्याला distinction आणच म्हणून सांगणे आहे. आयुष्यात जे नाविन्य असतं ते हाताळता हाताळता खूप डोकं खपवावं लागतं, तेव्हा किमान जे नेहमीचं आहे, साधारण आहे त्यावर त्यावर साधारण तर्क उपलब्ध नको का? धर्म जवळजवळ मोडीत काढावा का याचं उत्तर द्यायला मी पात्र नाही. मला ज्ञान, वेळ, रस नाही. पण मी देव मानतो, पूजा करतो (स्वतः किंवा आईला इंप्रस करायला) म्हणून शंभर जणांनी मला टपल्या मारुन जाव्यात हे योग्य काय?

कुप्रथा वेगळ्या आणि अंधश्रद्धा वेगळ्या. कुप्रथा मोडीत काढाव्यात याबद्दल कोणाचेही दुमत नसावे. पण नरसिंगवाडीच्या चोराला पकडायला आलेल्या पोलिसांनी नरसिंगवाडीच्या सुताराला किंवा पैलवानाला का निष्कारण बडवावे? हा प्रश्न आज (नरेंद्रजींच्या हत्येने लोक विव्हल झाले असताना) विचारणे उचित का असेही मला क्षणभर वाटले. कठोरता माझा प्रांत नाही तरीही मी कठोर तर्क (कि मन?) करून हे विचारणे उचित आहे असे मानले आहे.

याच मुद्द्यावर काही मांडायचं होतं पण प्रसंग पाहून गप्प राहिलो.

बाकी आईबाबा या दोघांची आडनावं पोरांनी पुढे कॅरी करणं अशी प्रथा सुरु करण्याबाबत मला एक प्रश्न पडतो की एका पिढीपर्यंतच हे मॉडेल आन्सर (२१ अपेक्षित प्रश्नसंच फेम) चालेल. त्यापुढे?

विनोद कुलकर्णी-देशपांडे इथपर्यंत ठीक आहे.

-->आता "विनोद कुलकर्णी-देशपांडे"ने "विशाखा पंडित-देशमुख"शी लग्न केलं-->
--> त्यांना आर्यन नावाचा एक गोड पोरगा झाला.
--> आता तो झाला "आर्यन विनोद विशाखा कुलकर्णी देशपांडे-पंडित-देशमुख"
--> आता जर आर्यनने "सोनल सहस्रबुद्धे - भडकमकर" या मुलीशी लग्न केलं तर नावाच्या लांबीवरुन घरच्यांचा जबर विरोध व्हायचा.

ही भानगडच नको म्हणून सर्व आडनावे काढून फक्त फर्स्टनेम बेसिस ठेवावे तर फारच लहान आणि नॉन्-स्पेसिफिक होते. कार्यालयीन आणि अन्य बाबतीत नाव्-आडनाव (शक्यतो मधले नावही) उपयोगी येते.

सर्व आडनावे जोडायची म्हणजे कोणीच कनिष्ठ किंवा वरिष्ठ नाही.. पण मग अशी आगगाडी होणार. पुढच्या पिढीत एका आडनावाचा पत्ता कट करायचा तर मग तो कोणाच्या आडनावाचा (आईच्या की बाबांच्या??)

थोडक्यात, वी हॅव टू लेट समथिंग गो अँड वर्क विथ एक्झिस्टिंग कन्व्हेन्शन इन अ‍ॅट लीस्ट सम केसेस. फक्त आईचे नाव लावायचा कायदा आला तरी उत्तम, पण सगळीकडे बॅलन्स करायला जाऊन घोळ वाढवू नयेत.

नायतर मग इंटरनेटप्रमाणे युनिक यूजरआयडी (उपलब्धतेनुसार) जन्मावेळीच असाईन करवून घेऊन तीच वापरावी लागेल.. shine.star.789G5 वगैरे..

म्हणजे मग सगळं सोपं..

मी Thu, 22/08/2013 - 15:44

In reply to by गवि

>>नायतर मग इंटरनेटप्रमाणे युनिक यूजरआयडी (उपलब्धतेनुसार) जन्मावेळीच असाईन करवून घेऊन तीच वापरावी लागेल.. shine.star.789G5 वगैरे..

यूजराआयडी मधे जात निर्माण होणार नाही कशावरुन? आपण परिणाम/साधनं ह्यांच्याबद्दल बोलतो आहोत, मानसिकता विवेकी हवी.

गवि Thu, 22/08/2013 - 16:41

In reply to by मी

मानसिकता विवेकी हवी हेच तर मुख्य टारगेट आहे ना..

बाकी:

यूजराआयडी मधे जात निर्माण होणार नाही कशावरुन?

थांबा.. पुन्हा एकदा वरची प्रतिसादमालिका पाहतो.. मला वाटलं की सध्या कोणाचे नाव लावायचे यावरुन स्त्रीला दुय्यमता आदि वळणावर चर्चा होती. जातीचा विषय लेजिटिमेट आहे, पण तो वेगळा.

सध्यातरी या प्रतिसाद-उपमालिकेत आडनाव लावणे आणि अन्य प्रथांमधून कोणाचे नाव लावायचे आणि कोणाचे वगळायचे इतकीच चर्चा चालू होती अश्या समजुतीने हे लिहिलेलं होतं.

ऋषिकेश Thu, 22/08/2013 - 16:18

In reply to by अजो१२३

पत्नीच्या नावाला स्पर्श न करणे आणि अपत्यांच्या नावांमधे दोन्ही पालकांचा समान उल्लेख असणे या फ्रंटवर आपला किती काँप्लयन्स आहे?

माझ्यापुरते सांगतो. हा प्रश्न मी बायकोवर सोडला होता. नाव तिचे आहे तीने ठरवावे की ते बदलायचे आहे का नाही. इतरांनी कोणते नाव घ्यावे, ते कसे लिहावे, त्याचे स्पेलिंग कसे असावे वगैरे अत्यंत वैयक्तिक प्रश्न आहे.

आईवडील कायदेशीर गरज म्हणून एक नाव ठेवतात. पुढे अपत्याला ते बदलावेसे वाटल्यास अर्थातच तो/ती ते कधीही बदलु शकते.

यात अविवेक कुठे आला?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 22/08/2013 - 17:40

In reply to by अजो१२३

१. आपल्या पत्नीचे अधिकृत नाव लग्नापूर्वी होते तेच तश्यास तसे आहे का? आडनाव बदलले आहे का? तिच्या संपूर्ण नावात आपले नाव/आडनाव घातले आहे का?

मी लग्न केलं आहे, पण मला पत्नी नाही. जगात, भारतात आणि मराठी भाषिकांमधे साधारण ५०% लोक असे आहेत जे लग्न करतात पण त्यांना पत्नी नसते. नाव या व्यक्तींचं, पण त्याबद्दल प्रश्नोत्तरं कोणाशी, त्यांच्या नवर्‍यांशी! (हाच तो, हेतूतः न केलेला, पण रूढींमुळे चालत आलेला स्त्रीद्वेष.)

अवांतरः
१. मेरी क्यूरीचा जावई, इरेनचा नवरा, फ्रेडरीक त्यांच्या लग्नानंतर बायकोसारखंच, जोलिअत-क्यूरी असं जोडआडनाव लावत असे.
पण क्यूरी हे आडनाव हे आडनाव पियारकडून आलं. मेरीचं आडनाव स्क्लोडोवस्का. ती त्या कुटुंबातली सर्वाधिक कर्तबगार, प्रसिद्ध, इ. इ. व्यक्ती. पण 'तिचं' आडनाव म्हणजे तिच्या वडलांचं आडनाव. तिच्या आईचं आडनावही माहित नाही.

२. मुंबई विद्यापीठाच्या कॉन्व्होकेशनवर विद्यार्थ्याची आई आणि वडील या दोघांचंही नाव असतं.

अजो१२३ Thu, 22/08/2013 - 18:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी स्वतः अत्यंत कर्मठ, आस्तिक आणि बुरसटलेल्या वातावरणात वाढलो आहे.

सन्जोपरावांच्या या वाक्याने आणि त्यांच्या ऐसीवरील बर्‍याच प्रतिसांदाच्या अनुषंगाने दोन विवाहित पुरुष एकमेकांशी जी भाषा करतील तीच मी त्यांना प्रतिसाद देताना वापरली आहे. तर्ककठोरपणे आयुष्यातल्या सर्व ठिकाणी चिकित्सा करून ते वागले आहेत का हे जाणण्यासाठी तो प्रतिसाद लिहिला आहे. त्यात कुठेच कळत , न कळत कोणताच द्वेष प्रकट होत नाही.

बाकी स्त्रीया कर्तबगार असल्या तरी त्यांना मागच्या काळात (मेघालय, चीनचे काही प्रांत वजा जाता) जगात पुरुषांच्या नावाने ओळखले जायचे हे वाइट. पण याचा या धाग्याशी काही संबंध नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 22/08/2013 - 20:29

In reply to by अजो१२३

सन्जोपराव आणि तुमची दोघांचीच चर्चा सुरू आहे* हे मानलं तरीही, नाव कोणाचं आणि त्याबद्दल उत्तर कोणाकडे मागितली जात आहेत, हा एक आक्षेप. दुसरा असा की, जाहीर चर्चांमधे शक्यतोवर व्यक्तिगत प्रश्न, एखाद्याच माणसाला/आयडीला विचारणं ठीक वाटत नाही. ठराविक प्रश्न, ठराविक गटाला विचारणं योग्य वाटतं. (हे माझे, व्यक्तिगत विचार). त्यामुळे हे प्रश्न फक्त सन्जोप राव यांनाच विचारले आहेत असं मला वाटलं नाही.

*हे मला फार मान्य नाही; व्यासपीठ जाहीर आहे. स्पष्ट उल्लेख नाही तोपर्यंत चर्चा जेनरिक ठरते.

अजो१२३ Thu, 22/08/2013 - 21:44

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कृपया आपण माझा त्यांना मूळ प्रतिसाद नीट वाचा. मी कोणताही व्यक्तिगत प्रश्न कोणालाही विचारला नाही. 'तर्ककठोर विवेक' आपण लावला आहे काय असा संक्षिप्त प्रश्न विचारला आहे. त्याच्याही उत्तराची अपेक्षा न धरता माझा मुद्दा माझ्या उदाहरणाने स्पष्ट केला आहे आणि माझी मर्यादा सांगीतली. तर्ककठोरतेची/स्वतःच्या विवेकवादाची अपेक्षा सामान्य माणसाकडून करणे कसे अवास्तव आहे हे मांडायचा प्रयत्न आहे.

नावच हा मुद्दा मला कसा सुचला हे ही लिहिले आहे. पत्नीचे/मुलाचे नाव बदलणे, विशिष्ट प्रकारे ठेवणे इ, इ ही कुप्रथा आहे, त्यावर त्यांनी काय उपाय काढला असावा हे मला कुतुहलाचे वाटले. मी त्यांची व्यक्तिगत माहिती मागीतली आहे, नाही असे नाही, पण ती फार अल्प आहे आणि ते ती कधीही नाकारू शकतात. त्यांनी जो जो तर्क कठोर पणा लावला तो आपल्या व्यक्तिगत जीवनातच लावला असणार. त्यांची किंचितही माहिती न घेता, आणि त्यात इतरांची (पत्नीची, इ) न गुंतवता त्यांची तर्क कठोरता तपासण्याचा मला दुसरा प्रश्न सुचला तर मी तो विचारेन. प्रश्नविशिष्टात मला काही रस नाही.

सन्जोप राव Fri, 23/08/2013 - 07:33

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सन्जोपराव आणि तुमची दोघांचीच चर्चा सुरू आहे* हे मानलं तरीही
हे कोणत्या गृहितकावर मानले हे कळायला मार्ग नाही. माझ्या मता/ती प्रमाणे असे नाही.

ॲमी Thu, 22/08/2013 - 15:05

संजोपराव आणि ऋषिकेश यांचे प्रतिसाद आवडले.
पण हे एवढंच पुरेसं आहे का?
ज्याप्रमाणात बाबा बुवा अम्मांचे भक्तगण वाढतायत, त्यांचं मार्केटीँग, प्रमोशन वगैरे होतय, तिथे शांत अथेइस्ट, अग्नोस्टिक कसे टिकणार?
कदाचीत नेहमीचीच वाटतील पण तरी माझ्या पाहण्यातली काही उदाहरणं सांगते
* ५ वर्षाच्या मुलीने १ वर्षाच्या मुलग्याला राखी बांधताना हे कशाला करायच विचारल्यास तिची आजच्या काळातली, शिकलेली, अमेरीकेत नोकरी करणारी आई 'कारण तो तुझं संरक्षण करेल' असं उत्तर देते.
* यावर्षी दुष्काळ पडलाय त्यामुळे पाणी वाया घालवणारा होळी सण नको असे सुचवल्यावर, आपली महान संस्कृती पुढील पिढीला शिकवणं किती महत्वाचं आहे, जास्तीजास्त एक टँकरच पाणी वाया जाईल वगैरे वगैरे बाता करणारे शिकलेली लोकं.
* नुकतीच बायपास झालेल्या आईला, ती नको म्हणत असताना, २ ३ बस बदलुन कोकणात आडगावी नेलं. का तर गणेशोत्सव फार महत्वाचा. १० दिवस सगळे रितीरीवाज, जेवणावळी, मोठ्या कुटुंबाची उत्सावर करुन परत येताना घराबाहेर काही पावलांवर ती कोसळली. आणि यांची रिएक्शन 'देवाचं सगळं करुन मग गेली आई'
पाळीच्या वेळेस स्वयंपाकघरात न जाणार्या, वटपौर्णिमेची पुजा करायला अर्धा दिवस सुट्टी टाकणार्या आयटीतदेखील कित्येक पाहील्यात.
यासगळ्या केसमधे आपण शांतच बसायचं का? 'तुम्ही मुर्ख आहात' हे सांगायच की नाही? मी आतापर्यँत शांतच बसायचे पण गेले दोन दिवस हे शांत बसणं चुकीच वाटतय.

केतकी आकडे Thu, 22/08/2013 - 15:14

In reply to by ॲमी

शांत बसायचं नाहीच. पण हा बदल एका रात्रीत घडणारा नाहीए. आपल्याला आपल्या पुढच्या पिढीकडे काय सोपवायचंय हा निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. फक्त ती प्रथा तशीच्या तशी पुढे जायला नकोय किंवा बंद व्हायला नकोय, तर ते तसा का करायचं किंवा करायचं नाही या मागचा दृष्टीकोण पुढे पोहोचला गेला पाहीजे.

तसं पाहिलं तर ५० वर्षांपूर्वीचा काळ आणि आत्ता चा काळ यात फरक आहेच की. पुन्हा तेच म्हणेन की हा हळू हळू होणारा बदल आहे.

नितिन थत्ते Thu, 22/08/2013 - 15:44

अपत्यांच्या नावापुढे लावण्याच्या आडनावाविषयी जो जागर चालू आहे तो फारसा विवेकी नाही असे वाटले.

मुळात वडिलांच्या किंवा आईच्या नावावरून मूल ओळखले जावे हे काही योग्य नाही. अपत्याने स्वकर्तृत्वावर स्वतःचेच नाव कमवावे.

राहता राहिला प्रश्न आडनाव लावायचेच असेल तर कुठले लावावे? त्याचे उत्तर - ज्या कुळाच्या इष्टेटीत ते मूल समादायाद (Coparcener) आहे त्या कुळाचे नाव लावावे हा विवेकी विचार आहे. [या दृष्टीने यापुढे महिलांनी विवाहानंतर दोन्ही नावे लावावीत हे उत्तम. जून १९९४ ते अलिकडेपर्यंत महाराष्ट्रात माहेरचे आडनाव लावायला हवे होते. जून १९९४ पूर्वी कोणतेच आडनाव लावायला नको होते ;) ].

प्रकाश घाटपांडे Fri, 23/08/2013 - 09:58

म्हणुन म्हणतो सदासर्वदा विवेकी राहणे अत्यंत अवघड आहे. जमेल तेवढे विवेकी राहण्याचा प्रयत्न करणे हे इष्ट. शेवटी विवेक सुद्धा व्यक्तिसापेक्षच असतो.