बौद्धिक संपदा
"लढवय्या शेतकरी" धाग्यावर एक मुद्दा चर्चेत आहे.
जेनेटिकली मॉडिफाइड बियाण्यातून जे पीक येते त्यातील धान्यबिया पुनरुत्पादन करू शकणार नाहीत असा जनुकीय बदल केलेला असतो. त्यामुळे दरवेळी शेतकर्याला कंपनीकडून (संशोधकाकडून) बियाणे घ्यावे लागते.
ही अनएथिकल / अनैतिक पद्धत आहे असे काहींचे मत आहे.
त्याच्या नैतिक अनैतिकतेविषयी चर्चा करायची आहे.
माझा दृष्टीकोण पुढील प्रमाणे...
एखाद्या संशोधनासाठी आलेला खर्च आणि त्या इनोव्हेशनचे रिवॉर्ड म्हणून संशोधकाला पेटंट दिले जाते. त्यामुळे त्या वस्तूचे उत्पादन करण्याचा एकाधिकार संशोधकाला मिळतो.
परंतु जर संशोधित वस्तू सजीव असेल तर ती स्वतःच पुनरुत्पादन करू शकेल. आणि पुनरुत्पादित झालेली वस्तू ग्राहक अधिक पुनरुत्पादनासाठी वापरू शकेल. मग संशोधकाला एकाधिकार कसा मिळू शकेल? किवा एकाधिकार एन्फोर्स करणे अवघड होईल.
"बियाणे" हे संशोधकाचे संशोधन आहे असे मानले तर बियाण्याचे उत्पादन करण्याचा ग्राहकाला (शेतकर्याला) हक्क नसेल. म्हणजे शेतकर्याने शेतात पिकलेल्या पिकाचे दाणे बियाणे म्हणून ठेवणे (पेटंट कल्पनेनुसार) बेकायदेशीर असेल.
परंतु असा वापर रोखणे अवघड आहे. (कायद्यात तरतुदी केल्या तरी) ग्राहक त्यावर मात करू शकेल.
असा परिस्थितीत संशोधकाच्या बौद्धिक संपदेचं रक्षण व्हावे म्हणून संशोधक पुनरुत्पादनास अक्षम असे प्रॉडक्ट बनवेल. कारण बौद्धिक संपदेचे रक्षण करण्याचा दुसरा मार्ग सुचला नाही.
जर बौद्धिक संपदा आणि पेटंट या कल्पना आपल्याला मान्य असतील तर बियाणे हे उत्पादन नेहमी संशोधकाकडूनच घ्यावे लागेल ही कल्पना आपल्याला का मान्य नाही?
टीप : चर्चा बौद्धिक संपदा या अंगानेच मर्यादित रहावी अशी अपेक्षा आहे. म्हणून त्या बियाण्याने मातीचा कस जातो, रोग होतात किंवा क्लेम केल्याप्रमाणे उत्पन्न मिळतच नाही हे मुद्दे चर्चेत आणू नयेत असे वाटते.
बौद्धिक संपदा आणि जिवंत
बौद्धिक संपदा आणि जिवंत राहण्यासाठी लागणारे अन्नधान्य यांच्यात तुलना करताना, या प्रकारच्या तुलनेमुळे जगभरातल्या अन्नोत्पादनावर मूठभर लोकांचा ताबा येऊन काही घोर अन्याय होऊ शकतील, याचं भान आपण बाळगावं. एखादी भाषिक / सांगितिक / दृश्य कलाकृती, 'मानवी श्रम कमी करणारं / सोय-सुख वाढवणारं' एखादं इनोव्हेशन... आणि जिवंत राहण्यासाठी लागणारं अन्न यांत काहीतरी मूलभूत फरक आपण करावा असं माझं मत.
या आणि वरील ऋ च्या
या आणि वरील ऋ च्या प्रतिसादावर असं म्हणावंसं वाटतं की सुधारित / संकरित / नैसर्गिकपेक्षा अधिक उत्पादन देणारी इत्यादि गुण संशोधनाने "वर्धित" केलेली नवीन जात ही जनरल "अन्न" या सदरात मोजली जाऊ नये. या पद्धतीने पाहिल्यास मधे संशोधकाने केलेल्या कष्टाचे आणि बुद्धीचे अस्तित्व अत्यंत सोयीस्करपणे नाकारले जाते. हीच गोष्ट जीवरक्षक औषधांबाबतही.
नैसर्गिक बाजरी किंवा गेल्या वर्षी शेतात पिकलेल्या सामान्य बाजरीतले यंदासाठी बियाणे म्हणून ठेवलेले दाणे यांवर तर कोणी बौद्धिक हक्क सांगत नाहीये ना? मग वर घेतलेल्या हरकतीला अर्थ राहात नाही.
नैसर्गिक कोंबडी उदा. दिवसाला एक अंडं देत असते आणि संकरित कोंबडीची जात दिवसाला दहा अंडी देत असेल तर अशा "वाढीव गुणांच्या कोंबडीचा वापर" उद्योगासाठीच होतो. शेतकरीही आता दिवसाला एका अंड्याऐवजी दहा विकून अधिक पैसा कमावतो आणि शेवटच्या एन्डला असलेल्या ग्राहकालाही अंड्याच्या अधिकच्या उत्पन्नाने कमी किमतीत ते अंडं मिळतं. अशा वेळी संकरित कोंबडीच्या निर्मात्याने हे सर्व केवळ लोकांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी करायला हवं हा विचार एकांगी वाटतो.
व्हॅल्यू अॅडिशन आहे तिथेच हा हक्क सांगितला जातोय असं मूळ धाग्यातल्या मांडणीवरुन दिसतं. त्यामुळे तशा प्रकारच्या नवनिर्मित बियाण्यांपासून तयार झालेले दाणे पुनर्निर्मिती करु शकणार नाहीत अशी रचना शक्य असेल तर तशी करणं हे नैतिक तर आहेच पण संशोधन आणि व्यवसायवृद्धीसाठी अत्यावश्यक आहे.
अन्नाविषयी असा हळवा कोपरा असणं समजण्यासारखं आहे पण अन्नधान्य हाच जगातल्या अवाढव्य पसरलेल्या उद्योगांतला आघाडीचा उद्योग आहे हा अर्थशास्त्रीय भाग भावनेपोटी दुर्लक्षून चालणार नाही. ("धार्मिकता नको" म्हणून "धार्मिकता नाहीच" असं स्वतःपुरतं समजण्याचा आणि मग "धर्माविषयी काहीही बोलणंच माझ्यापुरतं बंद" असा प्रकार काहीवेळा होतो तसा इथे होऊ नये..)
:)
एकतर बियाणांतील तथाकथित व्हॅल्यु अॅडिशनमुळे एकुणच इकोसिस्टिममध्ये होणारे बदल वगैरे लक्षात घेता याला 'अॅडिशन' म्हणावे का हाच प्रश्न आहे वगैरे बरेच लिहिता येईल, पण या अश्या मुद्द्यांवर किंवा अशा अंगाने चर्चा करण्यावर बुच असल्याने मी लिहिले होते की मी समर्थ नाही :)
बाकी, चालु द्या..
आता असं पहा की हंटर गॅदरर
आता असं पहा की हंटर गॅदरर पद्धत जेव्हा आपण सोडली आणि "शेती" करायला लागलो, जनावरं पाळायला लागलो, तेव्हाच हे "इकोसिस्टीम" आणि अन्य बाबींना आपण पेटती काडी लावली.
आता आपल्याला अन्न हवं आहे. आणखी आणखी जास्त अन्न हवं आहे. अशावेळी मधेच सिलेक्टिव्हली इकोसिस्टीमचं ऑडिट करण्यात अर्थ नाही. आता "वी डिड्ण्ट स्टार्ट द फायर.." असं म्हणूया का? :)
संशोधकाच्या कष्टाचा, बुद्धीचा
संशोधकाच्या कष्टाचा, बुद्धीचा मोबदला देण्यासाठी 'प्रताधिकार' इतकाच मार्ग अस्तित्वात आहे का? त्याच्या यशस्वी संशोधनाबद्दल जबरदस्त फी आकारली जाऊ शकतेच की. पण प्रताधिकाराच्या अंमलबजावणीमुळे (खाली अपरिमेयनं म्हटल्याप्रमाणे) एखाद्या शेतकर्याची काहीही चूक / इरादा नसतानाही त्याला संशोधकाच्या प्रताधिकाराचं मूल्य देणं भाग पडेल, जे अन्यायकारक आहे. (हे म्हणजे मी रस्त्याने जाताना माझ्या कानांवर गाणं पडलं, पण मी काही ते विकत घेतलेलं नाही, म्हणून माझ्यावर संगीतकाराने दावा लावण्यासारखं आहे.)
त्याच्या यशस्वी संशोधनाबद्दल
त्याच्या यशस्वी संशोधनाबद्दल जबरदस्त फी आकारली जाऊ शकतेच की.
कोण आकारणार आणि कोणाकडून? कुठल्या टप्प्यात?
आणि इथे मूळ बियाणं विकत मिळतंच आहे, फक्त प्रतिकृती करता येऊ नये असं तंत्र वापरलं आहे. त्या बियाण्याची किंमत अवाजवी असेल, त्या किंमतीइतका खर्च करुन यिल्ड नसेलच तर कोण मूर्ख शेतकरी ते विकत घेईल?
पण प्रताधिकाराच्या अंमलबजावणीमुळे (खाली अपरिमेयनं म्हटल्याप्रमाणे) एखाद्या शेतकर्याची काहीही चूक / इरादा नसतानाही त्याला संशोधकाच्या प्रताधिकाराचं मूल्य देणं भाग पडेल, जे अन्यायकारक आहे. (हे म्हणजे मी रस्त्याने जाताना माझ्या कानांवर गाणं पडलं, पण मी काही ते विकत घेतलेलं नाही, म्हणून माझ्यावर संगीतकाराने दावा लावण्यासारखं आहे.)
नोप.. हे सुधारित बियाणं विकत न घेण्याचा हक्क प्रत्येक शेतकर्याला आहे आणि तो अबाधित आहे. दरहेक्टरी जे पीक मिळत होतं त्यात वाढही हवी आणि संशोधक कंपनीला वाढीव मूल्यही द्यायला नको यात काही अर्थ नाही. म्हणजे एकदाच खर्च करुन हे बियाणं घ्यायचं आणि त्यापासून पुढच्या वर्षी कायम मोफत त्याच दर्जाचं बियाणं घरीच पिकवायचं हा नैतिक व्यवहार आहे का? याला पायरसी म्हणतात ना?? गाणं कानावर पडण्याचं उदाहरण अगदीच मिसमॅच आहे. शेतकरी जोवर ते खास बियाणं खरेदी करत नाही तोसवर त्याला वाढीव खर्च नाहीये इथे. शेजार्याच्या परसात संकरित बी आणलेलं याने पाहिलं म्हणून यालाही भुर्दंड पडला असा प्रकार आहे का? ;)
ह्म्म..
जर मी ठरवले की स्वतःचे बियाणे
जर मी ठरवले की स्वतःचे बियाणे वापरायचे, विकत घ्यायचे नाही, पण माझ्या शेजारच्या शेतकर्याने जर बियाणे विकत घेतले आणी वापरले तर वार्याने ते थोड्या प्रमाणात माझ्या ईच्छेविरुद्ध माझ्या शेतात पसरेल. या परिस्थितीत कायदे बियाणे विकणार्या कंपनीच्या बाजूचे आहेत. ती कंपनी मला सहज कोर्टात खेचून दोषी ठरवू शकते. अशी बरीच उदाहरणे आहेत.
याकडे निर्देश होता.
ऋषिकेश वर म्हणतो आहे तद्वत मुळात ती अॅडिशन आहे का, हे ठरायचे आहे. पण असे करत करत आता आगीच्याही मागे जायचे आहे थोडेच, या तुमच्या मुद्द्यातही तथ्य आहे. त्यामुळे ती दर्जात भर आहे की पर्यावरणाचे नुकसान आहे, ते आपण 'तूर्तास' बाजूला ठेवू. (पुन्हा अवांतर: अन्नसंकलन सोडून अन्नोत्पादन करू लागतानाही तेव्हाच्या लोकांच्यात 'हे नैतिक नाही... आपण झाडांना आपल्या दावणीला बांधतो आहोत...' अशा चर्चा झाल्या असतील काय, असा रंजक मुद्दा नंदा खरे यांच्या 'कहाणी मानवप्राण्याची'मधे येतो. तो आठवला!) पण 'वनटाइम पेमेंट' घेणे अशक्य आहे का? समजा, (आकडे अगदीच अंदाजपंचे आहेत. माफी द्या, मी समजून घ्यायचा प्रयत्न करतेय!) दर हेक्टरी १० किलो उत्पादन देणार्या तांदुळात काही फेरफार करून मी तो दर हेक्टरी २० किलो देणारा केला, तर विकल्या जाणार्या दर किलोमागे पैसे न आकारता हे संशोधनच मी काही हजारपट पैसे आकारून सरकारला विकीन, असा पर्याय अगदीच अव्यवहारी / अन्यायकारक आहे का?
दर हेक्टरी १० किलो उत्पादन
दर हेक्टरी १० किलो उत्पादन देणार्या तांदुळात काही फेरफार करून मी तो दर हेक्टरी २० किलो देणारा केला, तर विकल्या जाणार्या दर किलोमागे पैसे न आकारता हे संशोधनच मी काही हजारपट पैसे आकारून सरकारला विकीन, असा पर्याय अगदीच अव्यवहारी / अन्यायकारक आहे का?
हो.. अगदी शक्य आणि उत्तम पर्याय आहे. पण सरकार हा भार कशाला घेईल? तो भार ते तरी कुठून पुरा करतील? पाठीमागून आपल्या (अ-शेतकर्यांच्याही) खिशात हात घालून कसलातरी अधिभार, कर लावूनच ना?
त्यापेक्षा थेट लाभधारक शेतकर्याकडून "जेवढ्यास तेवढे" अशा प्रमाणात डिस्ट्रिब्युटेड वसुली करण्याची पद्धत जास्त योग्य नव्हे का?
सबसिड्यांनी शेती या प्रकाराच्या व्यावसायिकतेची आणि पर्यायाने व्हायेबिलिटीची वाट लावली आहे.
लाभधारक काय फक्त शेतकरी थोडाच
लाभधारक काय फक्त शेतकरी थोडाच असणार आहे? अधिक धान्य उत्पादित होईल, (मान्य आहे, मी फार्रच आशावादी आहे, पण स्वप्नेच पाहायची तर...) त्याच्या किंमती सर्वसामान्य माणसाला परवडतील, जन्मलेल्या प्रत्येकाला अन्नाची हमी देणे सोपे जाईल (नाहीतरी अन्नसुरक्षा कायदा आला, तर त्यासाठी पैसे आपल्याच खिशातून जाणार आहेत ना? नि गेले तरी त्यात काही चूकही नाहीच. मी नशिबाने (आता यालाही आक्षेप येतीलच. पण माझ्या क्षमतांइतकाच माझ्या नशिबाचाही वाटा आहे, असे मी मानते. त्यावर वाद और कभी, और कहीं!) पैसे कमवते, म्हणून मी ओरपून खाणार. गरिबाने खड्ड्यात जावे, असे करायचे नसल्यास अन्नसुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीचा भार करधारकांनी पेलणे क्रमप्राप्त आहे.), यांमुळे गुन्हेगारी आणि असुरक्षितता काही अंशी तरी कमी होईल, पर्यायाने वातावरण माझ्यासाठीही सुरक्षित आणि खुशहाल होईल.
मग एकटा शेतकरी लाभधारक कसा?
पुनरुत्पादन न होण्याचा जनुकीय
पुनरुत्पादन न होण्याचा जनुकीय बदल अपरिवर्तनीय असतो.
वीस वर्षांनी हा जनुकीय बदल नसलेल्या बियाण्याची उपलब्धता शक्य आहे का? याविषयी बोलताहात का?
शास्त्रीय दृष्ट्या नाही पण तर्कशास्त्रीय दृष्ट्या एक शंका..
म्हणजे एक गृहीतक असं धरतो की:
पायरी १. अशी अधिकचे गुण असलेली जात आधी निर्माण केली गेली.
पायरी २. त्यातले पुनरुत्पादनाचे गुण (तेही एका पिढीनंतरचे) नष्ट करणारी जनुकीय गडबड त्यात घडवून फायनल बियाण्याचे उत्पादन केले.
अर्थातच यातली पायरी १ पुन्हा निर्माण करण्याजोगी असणार आणि तिचे आर्काईव्ह नक्कीच मूळ निर्मितीच्या प्रक्रियेसाठी सांभाळून ठेवलेलं असणार.
तेव्हा एकदा विकत घेतलेल्या बियाण्यांमधे पुनरुत्पादनाची पात्रता परत आणणं शक्य नाही असं तुम्ही म्हणत असाल तर ते बरोबर. पण तशी क्षमता असणारं बियाणं हे तंत्र शिकून वीस वर्षांनंतरही प्रताधिकारमुक्तपणे बनवता येणार नाही (कारण ही क्षमता आता कायमची नष्ट झाली आहे) हे तर्कदुरित.
भांडवलशाहीत टक्के
- भांडवलशाहीत टक्के दिसल्याशिवाय कोणी संशोधनासाठी प्रेरित होत नाही.
- सरकारने यासाठी बौद्धिक संपदेचे संरक्षण देऊन संशोधकांची आणि आपल्या जनतेची सोय पाहिलेली असते.
- बौद्धिक संपदा कायदे संशोधनप्राप्त बौद्धिक संपदेसाठी "उबवलेली एकाधिकारशाही" (induced monopoly) तयार करतात जेणेकरून संशोधनकर्त्याला काही मर्यादित काळापर्यंत कोणत्याही स्पर्धेला* सामोरं न जाता फायदा कमावता यावा.
- सरकारचा मूळ हेतू अर्थातच जनतेचे कल्याण हा असतो. म्हणून जनतेचे कल्याण करणार्या बौद्धिक संपदेला परवडेलशा किमतीत जनतेपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे कर्तव्य बनते.
- म्हणून लोकोपयोगी बौद्धिक संपदा तत्त्वत: एकाधिकारमुक्त असावी.
यामुळेच (माझ्या माहितीप्रमाणे) शस्त्रक्रियापद्धतींचे (surgical procedures) पेटंट घेता येत नाही.
ही सगळी थियरी येक लंबर असली तरी प्रत्यक्षात त्याला अनेक पैलू असतात. संशोधनकर्त्या कंपन्या लॉबीयिंग करून सरकारला नमायला लावतात. आंतरराष्ट्रीय दबावामुळे वायपो (World Intellectual Property Organisation) सारख्या संस्थांची (प्रसंगी प्रगत देशांचा पक्षपात करणारी) मार्गदर्शक तत्त्वं मान्य करावी लागतात. थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याची झापडदृष्टी असल्याने समाजवादी तत्त्वांना हरताळ फासला जातो. वगैरे.
--
*याला अपवाद अर्थातच "घातक स्पर्धाविरोधी कायद्यां"चा (Anti trust laws). पण तो वेगळा विषय.
माझ्या मते पुनरुत्पादन करु न
माझ्या मते पुनरुत्पादन करु न शकणार्या धान्यबिया बनवणे यात अनैतिक नाही. संशोधकाला एकाधिकार मिळाला नाही तर नवीन संशोधनाचा वेग मंदावेल.
एखाद्या संशोधनासाठी आलेला खर्च आणि त्या इनोव्हेशनचे रिवॉर्ड म्हणून संशोधकाला पेटंट दिले जाते. त्यामुळे त्या वस्तूचे उत्पादन करण्याचा एकाधिकार संशोधकाला मिळतो.
परंतु जर संशोधित वस्तू सजीव असेल तर ती स्वतःच पुनरुत्पादन करू शकेल. आणि पुनरुत्पादित झालेली वस्तू ग्राहक अधिक पुनरुत्पादनासाठी वापरू शकेल. मग संशोधकाला एकाधिकार कसा मिळू शकेल? किवा एकाधिकार एन्फोर्स करणे अवघड होईल.
"बियाणे" हे संशोधकाचे संशोधन आहे असे मानले तर बियाण्याचे उत्पादन करण्याचा ग्राहकाला (शेतकर्याला) हक्क नसेल. म्हणजे शेतकर्याने शेतात पिकलेल्या पिकाचे दाणे बियाणे म्हणून ठेवणे (पेटंट कल्पनेनुसार) बेकायदेशीर असेल.परंतु असा वापर रोखणे अवघड आहे. (कायद्यात तरतुदी केल्या तरी) ग्राहक त्यावर मात करू शकेल.
असा परिस्थितीत संशोधकाच्या बौद्धिक संपदेचं रक्षण व्हावे म्हणून संशोधक पुनरुत्पादनास अक्षम असे प्रॉडक्ट बनवेल. कारण बौद्धिक संपदेचे रक्षण करण्याचा दुसरा मार्ग सुचला नाही.
वरील दृष्टिकोनाशी सहमत.
माझे तर असे मत आहे की खूप मोठा जनुकीय बदल केलेले बियाणे पुनरुत्पादन न करता येइल अशाच प्रकारे बनवावे (गरज पडल्यास कायदा बनवून). खालीत दोन शक्यता उद्भवतात.
शक्यता एक : बियाणे चांगले आहे, प्रचंड उत्पादनवाढ.
या परिस्थितीत हे बियाणे वापरणे शेतकर्यांसाठी फायद्याचे ठरेल. स्वतःचे बियाणे वापरण्याची opportunity cost असते, जर शेतकरी स्वतःचे बियाणे वापरणार नसेल तर तो ते धान्य बाजारात विकू शकतो. त्यामुळे दरवर्षी बियाणे विकत घेणे इतकेही वाईट नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पेटंटचा कालावधी मर्यादीत असतो, तो संपल्यावर इतर कंपन्याही तेच बियाणे बनवू शकतील. जरी शेतकर्याला बियाणे विकतच घ्यावे लागले तरी स्पर्धेमुळे ते स्वस्त होइल, जेनेरीक औषधांसारखे. कदाचित ज्या जनुकांमुळे उत्पादनवाढ होते आहे ते तसेच ठेवून फक्त पुनरुत्पादन न होण्यासाठी कारणीभूत असणारे जनुक बदलून मूळ बियाणाचे सर्व फायदे असणारे आणी पुनरुत्पादनही करू शकणारे बियाणे बाजारात येइल. थोडक्यात, पेटंटचा कालावधी संपला की long term मध्ये फायदेच होतील.
शक्यता दोन : बियाण्याचे काही दुष्परिणाम आहेत, पर्यावरासाठी घातक.
मूळ चर्चेत काही उदाहरणे आली होती, गहू आणी तण यांच्यात संकर होवून नष्ट करण्यास कठिण असे तण निर्माण झाले इत्यादी. जर वापर सुरु केल्यानंतर काही वर्षांनी असे लक्षात आले की केलेले जनुकीय बदल हे निसर्गासाठी/माणसांसाठी वाईट आहेत तर पुनरुत्पादन करू शकणार्या बियाण्याच्या बाबतीत आपण काहीच करु शकत नाही. जरी नवीन लागवड करण्याचे थांबवले तरी ते वार्याने किंवा इतर मार्गे सगळीकडे पसरलेले असेल. त्या बदललेल्या जनुकांनी धान्याच्या इतर चांगल्या जातीत प्रवेश केला असेल. जर बियाणे पुनरुत्पादन करू शकणारे नसेल तर मात्र गरज पडली तर आपण ते बियाणे (आणी कृत्रिमरित्या बदललेली जनुके) १००% नष्ट करु शकू. पुनरुत्पादन करू न शकणार्या बियाण्याचा मला हा प्रचंड फायदा दिसतो.
मूळ चर्चाप्रस्तावाशी थोडे अवांतरः
माझ्यामते कायदे ज्याप्रकारे बनवले आहेत आणी ज्याप्रकारे राबवले जातात त्यामुळे एकंदरीत मोठ्या कंपन्यांना जास्त विरोध होतो. जर आपण एखाद्या गाण्याचे उदाहरण घेतले तर माझ्या ईच्छेशिवाय मी ते माझ्या संगणकावर प्रताधिकार भंग करून उतरवून घेऊ शकत नाही. जर पेटंट ने सुरक्षीत असलेले एखादे औषध असेल तर मी स्वतः ठरवल्याशिवाय मी ते बेकायदेशीररीत्या बनवू शकत नाही. थोड्क्यात जर मी प्रताधिकार किंवा पेटंट चा भंग केला असेल तर तो माझ्या ईच्छेशिवाय होऊच शकत नाही. बियाण्यांच्या बाबतीत मात्र असे नसते. जर मी ठरवले की स्वतःचे बियाणे वापरायचे, विकत घ्यायचे नाही, पण माझ्या शेजारच्या शेतकर्याने जर बियाणे विकत घेतले आणी वापरले तर वार्याने ते थोड्या प्रमाणात माझ्या ईच्छेविरुद्ध माझ्या शेतात पसरेल. या परिस्थितीत कायदे बियाणे विकणार्या कंपनीच्या बाजूचे आहेत. ती कंपनी मला सहज कोर्टात खेचून दोषी ठरवू शकते. अशी बरीच उदाहरणे आहेत. जर संशयाचा फायदा याठिकाणी शेतकर्याला दिला आणी कायदे बदलून जर या केसेस मध्ये प्रामाणिक शेतकर्यांना त्रास होणार नाही असे बघितले तर कदाचीत हा प्रश्न आज आहे तेव्हडा गंभीर रहाणार नाही.
माझे तर असे मत आहे की खूप
माझे तर असे मत आहे की खूप मोठा जनुकीय बदल केलेले बियाणे पुनरुत्पादन न करता येइल अशाच प्रकारे बनवावे (गरज पडल्यास कायदा बनवून).
हे मत आणि मुद्दा क्र. २ हे अत्यंत मार्मिक, रोचक आणि आवश्यक आहेत. कोणतीही जेनेटिकली मॉडिफाईड जीवजात ही वन टाईम प्रॉडक्शनच असली पाहिजे, मग ते धान्य असो वा सूक्ष्मजीव.. चेन रिअॅक्शनची शक्यता नकोच..
हे कसं घडवून आणतात याची कल्पना नाही. खरं तर आश्चर्यच वाटतं आहे. पण हे असं शक्य आहे हे धाग्यामधल्या मजकुरावरुन गृहीत धरुन बाकीचं मतप्रदर्शन केलं आहे.
संरक्षण
>>एखाद्या संशोधनासाठी आलेला खर्च आणि त्या इनोव्हेशनचे रिवॉर्ड म्हणून संशोधकाला पेटंट दिले जाते. त्यामुळे त्या वस्तूचे उत्पादन करण्याचा एकाधिकार संशोधकाला मिळतो.
ह्या संदर्भात एक रोचक संशोधन.
व इतर काही मुद्दे-
१.बौद्धिक संपदा कायदा संशोधकाला सुरक्षितता प्रदान करतो हे योग्यच आहे, पण त्या सुरक्षिततेपायी भविष्यात निर्माण होणार्या मार्केट मोनॉपलीपासून ग्राहकाचे हित-संरक्षण करणारा कायदा नसणे हे गैर आहे. तशी तरतूद कायद्यात केल्यास मोन्सॅन्टोचा दावा स्विकारण्यास काही समस्या जाणवत नाही. इथे लेखाविरुद्ध मांडलेल्या अनेक प्रतिसादांचा गाभा बहूदा हाच असावा की भविष्यात होणार्या जाचापासून सुटका होईल अशी सोय कायद्यात असल्यास बियाणांसाठी हवी तितकी किंमत मोजायला हरकत नाही.
२.एकंदर पुनरुत्पादन-क्षमता असणार्या सजीव गोष्टींबाबत हा मुद्दा तपासणे गरजेचे आहे, धाग्यात उल्लेख केलेले मत बियाणांपासून ते माणसाच्या जनूकांपर्यत सगळीकडेच लागू होईल काय? त्यावर काही संदर्भ.
३.TRIPs कौन्सिलला सादर केलेल्या चर्चेमधील एक विधान- “Patenting of life forms may have at least two dimensions. Firstly, there is the ethical question of the extent of private ownership that could be extended to life forms. The second dimension relates to the use of IPRs’ [intellectual property rights] concept as understood in the industrialized world and its appropriateness in the face of the larger dimension of rights on knowledge, their ownership, use, transfer and dissemination.”
---The Monsanto Amendment - वंदना शिवा
>>त्याच्या नैतिक अनैतिकतेविषयी चर्चा करायची आहे.
हे शक्य आहे काय? पण बहूदा तुम्हाला अपेक्षित नैतिकता असे ते असावे, त्यामुळे त्याबद्दल फारसे मत व्यक्त करत नाही.
Firstly, there is the ethical
Firstly, there is the ethical question of the extent of private ownership that could be extended to life forms.
हाच मुद्दा ताबडतोब मनात आला. त्या बीयाण्यातून निर्माण होणार्या वांझ/पुनरुत्पादन क्षमता नसलेल्या वनस्पतीचे काय? बरेचसे "बॉन्साय" सारखेच वाटते. सजीवाचे काही पैलू खुरटवून फायदा उचलायचा.
अर्थात हा प्रश्न मग "गिनीपिग्ज वर संशोधन करणे योग्य आहे का" या वळणाने जातो.
________
बाकी चर्चाप्रस्ताव तर आवडलाच पण त्याचा मर्यादित करुन दिलेला स्कोपही "चर्चाप्रस्ताव कसा मांडावा" याचे उत्तम उदाहरण वाटले
धन्यवाद
>>बाकी चर्चाप्रस्ताव तर आवडलाच पण त्याचा मर्यादित करुन दिलेला स्कोपही "चर्चाप्रस्ताव कसा मांडावा" याचे उत्तम उदाहरण वाटले
कॉम्प्लिमेंटबद्दल धन्यवाद. स्कोप मर्यादित करण्याचे कारण, "जनुकांतरीत पिके धोकादायक असू शकतात म्हणून बंदी घालावी, भांडवलशाहीत कंपन्या *डुगिरी करून मार्केट मॅनिप्युलेट करतात" इत्यादि मुद्द्यांवर वाद घालायचा नव्हता. या मुद्द्यांवर बहुधा मीसुद्धा सहमतच आहे.
म्हणून बौद्धिक संपदेचे संरक्षण आणि ते करणे कठीण म्हणून पुनरुत्पादन होणार नाही अशी पिके बनवणेच नैतिक नाही की कसे यावरच चर्चा करायची होती.
जेनेटिकली मॉडिफाइड
जेनेटिकली मॉडिफाइड बियाण्यातून जे पीक येते त्यातील धान्यबिया पुनरुत्पादन करू शकणार नाहीत असा जनुकीय बदल केलेला असतो. त्यामुळे दरवेळी शेतकर्याला कंपनीकडून (संशोधकाकडून) बियाणे घ्यावे लागते.
असा एक प्रतिसाद मूळ लेखावर आहे.
तो प्रतिसाद आणि वरचे वाक्य वाचले की मला "ज्युरासिक पार्क" आठवतो. डायनॉसोर ची पुनरूत्पादनाची क्षमता काढून टाकून मनोरंजनासाठी "ज्युरासिक पार्क" बनवले आणि मग पुढे काय झाले.... इत्यादी..इत्यादी....
टर्मिनेटर सीड
टर्मिनेटर सीड किंवा सुईसाईड सीड हा शब्द वरील चर्चेत कसा आला नाही? मला वाटते चर्चा याच विषयावर सुरु आहे...
एक चौकशी
सध्या बाजारात (पारंपरिक/हायब्रीड) बियाणी मिळतात. त्या बियाण्यात असे काय असते की ती शेतकर्यांना विकत घ्यावी लागतात? गेल्या वर्षी घेतलेल्या पिकामधून पेरणी करता येत नाही का? की तशा बियांमधून पीक नीटसे येत नाही? (जर्मिनेशन परसेंटेज कमी मिळते वगैरे?)
चौकशी अशा साठी की आजही बियाणे विकतच घ्यायला लागत असेल तर नंतरची काय भीती?
ब्राउनबॅगिंग
>>गेल्या वर्षी घेतलेल्या पिकामधून पेरणी करता येत नाही का? की तशा बियांमधून पीक नीटसे येत नाही? (जर्मिनेशन परसेंटेज कमी मिळते वगैरे?)
पुढच्या हंगामासाठीचं बियाणं आजच्या हंगामातून काढून ठेवणं ही पारंपरिक पद्धत आहे. त्याला ब्राउनबॅगिंग म्हणतात. विशेषतः दुष्काळ, पूर अशा परिस्थितीमुळे पीक नष्ट झालं तर दुबार पेरणीसाठीही हे ठेवणीतलं बियाणं वापरलं जातं. अर्थात, दुबार पेरणी करायला लागल्यामुळे पुढच्या वर्षी बियाणं विकत घेणं भाग पडू शकतं.
संकरित बियाणी
कलमी आंब्याच्या फळाच्या बाठ्यापासून नवीन रोप तर तयार होऊ शकतेच, पण त्याला येणारी फळे ही जनक झाडाच्या फळासारखी तंतोतंत तशीच नसतात. तंतोतंत मूळच्या गुणधर्माचे फळ मिळण्यासाठी पुन्हा मूळ झाडाचे किंवा तत्सम गुणधर्माच्या झाडाचे कलमच करावे लागते तसाच हा प्रकार असावा. संकरित बियाण्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रजातींमधून मिळवलेला जीन समुच्चय असतो. पुढच्या पिढीतल्या रोपात ह्यातल्या जीन्सची विभागणी होऊन काही रोपात काही जीन्स आणि गुण दृग्गोचर होतात. तंतोतंत मूळ बियाण्यासारखे दाणे उपजत नाहीत. एकाच प्रजातीतले उत्तमोत्तम बियाणे दर पिढीमागे पिढ्यान पिढ्या संकलित करून वर्धित केल्यास मात्र अशी गुणविभागणी न होता जनक बीजाच्या गुणधर्माचेच फळ मिळते. (अर्थातच चू.भू.दे.घे. तज्ज्ञ लोक तांत्रिक आणि बरोबर माहिती देतीलच.)
बौद्धिक संपदा आणि पेटंट या
बौद्धिक संपदा आणि पेटंट या कल्पना आपल्याला मान्य असतील तर बियाणे हे उत्पादन नेहमी संशोधकाकडूनच घ्यावे लागेल ही कल्पना आपल्याला का मान्य नाही? हा प्रश्न 'आपल्याला मान्य आहे का आणि कशामुळे?' असा असायला हवा होता. असो.
१. प्रथम आपण संशोधनाचे स्वरुप कसे आहे ते पाहू: संशोधक बाजारातून पहिल्यांदा साधारण बियाणी घेतो. ती जेनेटीकली अशी बदलतो कि उत्पादन वाढावे (समजा १० पट). मग त्यातील काही टक्के (समजा ९०%) पुढे अशी बदलतो कि त्यांची पुढची पिढी खुंटावी. (असे केल्याने मला मोड आलेली उसळ खायला मिळते कि नाही हा गंभीर पण तांत्रिक प्रश्न उभा राहतो, पण असो.) त्याच्याकडे शेत असेल तर तो उरलेल्या १०% पासून पुढच्या वर्षीची मागणी पूर्ण करतो. उत्पादनातील वाढ हे संशोधन असून पिढी खुंटवणे हे नाही असे मानू. सर्वच बियाणी एकच कंपनी जेनेटिकली बदलते का? याचे उत्तर नाही असलेले बरे आणि बहुतेक तसेच आहे. एकाच बियाण्यात पण (जसे तूर) अनेक कंपन्यांचे थोड्या फार फरकाने तेच पेटंट आहे , म्हणजे तूरीचेच बियाणे ८-१० कंपन्याकडून विकत घेता येते असे मानू. शेतकर्याला खत, इ प्रमाणे प्रत्येक मोसमाला बियाणेही नव्याने विकत घ्यायला हरकत नसावी.
२. आता बाजारात काय होईल ते पाहू: जेव्हा हे उत्पादन जास्त असेल, तेव्हा सर्व शेतकरी या नव्या बियाण्यांवर उड्या मारतील आणि बियाण्यांचे भाव इतके वाढतील कि शेतकर्यांना होणारा अधिकचा नफा फार कमी होऊन जाईल. या धान्याची बाजारातली किंमत पुरवठा वाढल्याने कमी होईल, पण तरीही अशी कि नवा पुरवठा * नवी किंमत > जुना पुरवठा * जुनी किंमत.
३. संशोधक कंपन्यांचे काय होईल? मागणी पूर्ण करण्यासाठी त्या बियाण्याची शेती करतील? साधे बियाणे जेनेटिकली बदलण्यासाठी पैसा आणि विशेषतः वेळ लागत असणार. आणि बियाण्याची मागणी दहा पटीने वाढली तरी शेती (जागा, इ) फक्त एक पटीने वाढवावी लागेल.
४. शेतकर्यांचे काय होणार? जर जास्त फायदा देणारी प्रजाती उपलब्ध असतील तर कोणीही साधी बियाणी लावणार नाही. अश्या प्रकारे हळूहळू सर्व साधी बियाणी नष्ट होतील.
आता खालील प्रश्न उभे राहतात-
१. या कंपन्यांनी कार्टेल करू नये म्हणून सरकार काळजी घेईल का? तसा कायदा करेल का?
२. एखादी कंपनी फेल झाली तर? (अन्न)पुरवठा तुटला तर? कारण साध्या बियाण्यांचे हजारो स्रोत आहेत तसे नव्यांचे नाहीत.
३. केवळ उत्पन्न/व्हॉल्युम हाच बियाण्याच्या अस्तित्वाचा आधार आहे का? संशोधकाला रिवॉर्ड देण्यासाठी अनेक प्रजातींना नामशेष करणे वाजवी आहे का? किंवा प्रत्येक प्रजातीचे उत्पन्न जेनेटिकली वाढवता येते का? ज्याने मात्रा आणि दर्जा/वेगळेपणा दोन्ही राहतील?
४. बाजाराचे संतुलन नक्की कुठे स्थिरावेल? अधिक येणार्या उत्पन्नाचा नक्की कुणाला किती फायदा होईल? शेतकरी/ ग्राहक/ संशोधक?
५. समजा उद्या तूरिच्या कंपन्यांच्या व्यवस्थापनांना वाटले कि यात कमी फायदा, इ. आहे. आपण हे उत्पादन यावर्षीपासून बंद करू (कल्पना करा कायमचेच). मग आहे तितकी तूर संपल्यावर ...थोडक्यात कोणते धान्य/वनस्पती राहणार आणि संपणार हे प्रायवेट इंटरेस्ट ठरवणार? येथे कायद्याचा हस्तक्षेप होइल का?
६. शेतकरी जेव्हा सृजनशील बियाणे विकत घेतो तेव्हा आयडियली तो बियाण्यांची अनंतकालीन किंमत एकदाच देतो. दोन बियाण्यांची तुलना करून त्याला, नक्की किती फायदा होतो हे सांगण्यासाठी दोहोंचा सीड्/यिल्ड रेशो तसेच दोहोंच्या यिल्डचा रशो माहित असणे आवश्यक आहे. ते माहित नसल्याने ढोबळ फायदा मी सांगू शकणार नाही.
जेनेटिक बदलाचे इतर तोटे नगण्य मानून (ही पूर्व अट आहे, असं आहे की नाही माहित नाही), बाजारामध्ये/निसर्गामधे अनंत ढवळाढवळ करून, बौद्धिक संपत्ती अंतर्गत संरक्षणाने संशोधकांचाच सर्वाधिक फायदा होणार असेल तर अमान्य. अन्यथा मान्य.
>>समजा उद्या तूरिच्या
>>समजा उद्या तूरिच्या कंपन्यांच्या व्यवस्थापनांना वाटले कि यात कमी फायदा, इ. आहे. आपण हे उत्पादन यावर्षीपासून बंद करू (कल्पना करा कायमचेच). मग आहे तितकी तूर संपल्यावर ...थोडक्यात कोणते धान्य/वनस्पती राहणार आणि संपणार हे प्रायवेट इंटरेस्ट ठरवणार? येथे कायद्याचा हस्तक्षेप होइल का?
हे फक्त कंपन्याच नाही तर शेतकरी स्वतःही करू शकतात. म्हणजे कापूस उत्पादक (वैयक्तिकपणे) ठरवू शकतात की कापसातून काही फायदा होत नाही म्हणून आता आपण कापूस नको पिकवायला.
तुरीचे उत्पादन बंद झाले तर तुरीचे भाव वाढतील आणि कंपन्यांना पुन्हा तुरीचे (बियाण्याचे) उत्पादन करायला इन्सेंटिव्ह मिळेल. तसेही प्रत्यक्षात सर्व कंपन्या एकदम बंद करणार नाहीत. आधी कोणीतरी बंद करतील. उरलेल्यांना तुरीच्या बियाण्याचा व्यापार फायदेशीर ठरून हे उरलेले लोक तुरीचे बियाणे चालूच ठेवतील.
बौद्धिक संपदा, कॉपीराइट आणि पेटंट या आजला तरी मान्य असलेल्या कल्पना आहेत म्हणून त्या मान्य असतील तर .... असा प्रश्न विचारला आहे.
बाजारपेठेचे नियम लावायचे
बाजारपेठेचे नियम लावायचे झाल्यास कोणीही म्हणजे कंपन्या किंवा शेतकरी यांनी अमुक एक पीक घ्यायचे नाही असे ठरवल्यास त्या पीकाच्या बियाण्याच्या उपलब्धतेला व उपयुक्ततेला अतोनात महत्त्व येते (इतर घटक समान मानून).
दोन परिस्थितींची उदाहरणे घेऊ.
१. तुम्ही म्हणता ती परिस्थिती. नॉन-जीएमओ तूर. तूर लावायचीच नाही असे शेतकर्यांनी ठरवले. तुरीच्या मागणीत बदल झालेला नाही. अशा परिस्थितीत तुरीचे भाव वाढून तूर लावण्यात प्रचंड नफ्याची संधी निर्माण होते आणि ही संधी साधायचा प्रयत्न कोणाला करायचा झाल्यास तुरीचे बियाणे उपलब्ध असणे आणि ते उत्पादन देऊ शकेल इतके उपयुक्त असणे अतिशय महत्त्वाचे ठरते आणि ज्या शेतकर्यांकडे असे बियाणे आहे ते स्वतःचा फायदा करून घेतात.
२. आता जीएमओ तूर. जीएमओ बियाणांचं उत्पादन बंद करण्याचे कंपन्या ठरवतात. तुरीच्या मागणीत बदल झालेला नाही. अशा परिस्थितीत तुरीचे भाव वाढून तूर लावण्यात प्रचंड नफ्याची संधी निर्माण होते आणि ही संधी साधायचा प्रयत्न कोणाला करायचा झाल्यास तुरीचे बियाणे उपलब्ध असणे आणि ते उत्पादन देऊ शकेल इतके उपयुक्त असणे अतिशय महत्त्वाचे ठरते. अशा वेळी आधीच्या कीडनाशक बियाणाला/ कीटकनाशकाला रेझिस्टन्स निर्माण झालेला असल्याने जुन्या बियाणांची उपयुक्तता ढासळली असेल किंवा जुनी बियाणे टर्मिनेटर असतील आणि कंपन्या नविन वर्शन द्यायला तयार नसतील, तर ती नफ्याची साधता न येणारी संधी जीएमओ कंपन्यांविरुद्ध असंतोष निर्माण करणार, पण तोवर खूप उशीर झालेला असणार.
पहिल्या उदाहरणातला प्रसंग घ्डायला बहुसंख्य शेतकर्यांनी तूर लावायची नाही हे एकाचवेळी ठरवले पाहिजे आणि त्याची शक्यता कमी आहे.
दुसर्या उदाहरणातला प्रसंग घ्डायला कंपन्यांनी ठरवायची गरज नाही, संशोधन वेळेत पूर्ण न झाल्याने वा असफल झाल्याने नवीन बियाणे उपलब्ध नसणे एवढे कारणही पुरेसे आहे.
फायदा आहे म्हणून कंपन्या बियाणांचं उत्पादन बंद करणार नाहीत हे बरोबर, पण पेटंटच्या रॉयल्टीपोटी शेतकर्याच्या फायद्यातला मोठा लचका तोडणार (ते पिकवून बाजारात विकण्यापर्यंतची जोखीम मात्र सगळी शेतकर्याची). दुसरा काहीच उपाय नसल्यास आणि कंपन्यांचे भाव परवडत नसल्यास तूर लावणारे छोटे शेतकरी नाद सोडून देणार, म्हणजे तुरीचे भाव थोडे चढेच राहणार, म्हणजेच मार्केटवर या कंपन्यांचे अप्रत्यक्ष नियंत्रण येणार.
आपण बाजाराचे केलेले वर्णन
आपण बाजाराचे केलेले वर्णन उचितच आहे. मला काय म्हणायचं होतं ते सांगतो. ४०००० शेतकरी मिळून एकच निर्णय घेण्याची शक्यता कमी आहे आणि ४ कंपन्यानी तोच निर्णय एकदाच घेण्याची शक्यता जास्त आहे. कंपन्या प्रचार (जाहिराती)करून, किमती खेळवून, इ. ने, मागणीच नष्ट करू शकतात ही एक पार्श्वभूमी असू शकते. तुरीपेक्षा उडिद कंपन्यांना अधिक नफादार/सोपे असेल तर बीजच पुरवणार्या कंपन्यांना तुरीचे उच्चाटन करणे सोपे पडेल असे वाटते. मुलांना कोणत्या मिडिअमच्या शाळेत घालायचे ते पालकांवर सोडणे आणि चार संस्थांनी ठरवणे यात फरक नक्कीच आहे. व्यापारी पिके कदाचित मॅनिप्युलेट करता येतील, खाद्यान्ने नष्ट करणे कंपन्यांना फार अवघड जाईल, जैसे थे परिस्थितीत.
वाक्यरचनेवरून मला मान्य हा शब्द 'बियाणे विकत घ्यावे लागणे' ला आहे असे वाटले. बौद्धिक संपदेच्या मान्यतेचे बंधन घातल्याने चर्चा मुद्देसूद होऊ शकली आहे. त्याकरता वेगळा धागा करता येईल.
सर्वसाधारण पेटंटबद्दल एक
सर्वसाधारण पेटंटबद्दल एक प्रश्न आहे. वीस वर्षांनी पेटंटचा आर्थिक फायदा होत नाही; तो व्हावा म्हणून कंपन्या मूळ रचनेत किंचित बदल करतात आणि मग नवीन पेटंट दाखल करतात. पण यातून नक्की त्यांचा कसा फायदा होतो? अन्य कंपन्यांना मागचं संशोधन फुकटात उपलब्ध असतंच.
अवांतरः हंटर-गॅदरर याला शिकार-सावड असा प्रतिशब्द नंदा खरेंनी 'कहाणी मानवप्राण्याची'मधे वापरला आहे.
अजून एक थोडा वेगळा मुद्दा
अजून एक थोडा वेगळा मुद्दा मांडतो. ह्याचा विचार मी पहिला प्रतिसाद लिहिताना केला नव्हता.
बियाणे पेरल्यावर रोप उगवते, यथावकाश वारा, कीटक इत्यादींमुळे परागीभवन होउन कणसाला दाणे येतात. पुनरुत्पादनास अक्षम अश्या बियाणांमध्ये या कणसांमधील दाणे पुन्हा जमिनीत रुजू शकत नाहीत. एकाच धान्याच्या दोन जातींमध्ये असे परागीभवन होउ शकते, आणी ते नैसर्गिकरित्या होतच असते.
समजा मी माझ्या शेतात गेल्या वर्षी साठवलेले बियाणे (नैसर्गिक, पुनरुत्पादन होणारे) पेरले पण माझ्या चारही बाजूच्या शेतकर्यांनी पुनरुत्पादनास अक्षम असे बियाणे पेरले. वारा, कीटक यांना तर या दोन प्रकारच्या जातींमधला फरक समजत नाही. त्यामुळे माझ्या शेतात जी कणसे येतील ती पुनरुत्पादनास सक्षम (माझ्याच रोपांनी परागीभवन झाले तर) किंवा पुनरुत्पादनास अक्षम (शेजारच्या रोपांनी परागीभवन झाले तर), दोघांपैकी कशीही असू शकतात. मी जर हे धान्य बियाणे म्हणून साठवून ठेवले आणी पुढील वर्षी पेरले तर कदाचीत अर्धे बियाणे उगवणारच नाही. मला जर शेती हा व्यवसाय म्हणून करायचा असेल तर मला नाइलाजाने बियाणे विकत घ्यावे लागेल. ही साखळी प्रक्रिया सुरु होइल आणी दरवर्षी अधिकाधीक शेतकरी बियाणे विकणार्या कंपन्यांवर अवलंबून राहतील.
सुधारीत बियाणे हे एक संशोधन असून त्या बौद्धिक संपदेचे रक्षण झालेच पाहिजे असे माझे मत आहे. पण जर या बौद्धिक संपदेचे रक्षण करण्यासाठी वापरण्यात आलेले मार्ग हे ईतरांच्या नैसर्गिक हक्कांचा अधिक्षेप करत असतील तर ते मार्ग बेकायदेशीर ठरावेत. मुक्त अर्थव्यवस्थेत ग्राहकाला निवडीचा अधिकार असतो. या परिस्थितीत शेतकर्यांना त्यांच्या ईच्छेविरुद्ध बियाणे विकत घ्यावे लागते आणी त्यांचा निवडीचा अधिकार हिरावून घेतला जातो. नैतीक्/अनैतीक किंवा इतर सगळ्या बाबी बाजूला ठेवल्या तरी केवळ कायदेशीर दृष्टीकोनातून हे चूक ठरावे.
या युक्तीवादावर कोणी अजून भाष्य करू शकेल का? जर हा युक्तीवाद योग्य असेल तर मी माझा पुनरुत्पादन न करता येइल अशा बियाणांचा पाठिंबा* मागे घेइन.
* माझ्या पाठिंबा देण्याने किंवा विरोध करण्याने जे हा निर्णय घेतात त्यांना फरक पडत नाही याची मला कल्पना आहे.
हा मुद्दा माझ्या मनात आला
हा मुद्दा माझ्या मनात आला होता पण बौद्धिक संपदा आणी पेटंट यात थोडा अस्थानी वाटला म्हणून लिहायचे टाळले. माझ्या मते खालीलप्रमाणे (मी या विषयातला तज्ञ नाही)
जर मी शुद्ध आंबेमोहोर लावला आणी माझ्या शेजारच्याने शुद्ध कोलम लावला तर बहुतेक १५-२० वर्षांत आमच्या दोघांच्याही शेतात जवळपास सारख्या प्रतीचा, शुद्ध आंबेमोहोर आणी शुद्ध कोलम यांपासून जैविकदृष्ट्या सारखाच लांब असलेला नवीनच तांदूळ येइल. प्रत्यक्षात खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या तांदळाच्या जाती उपलब्ध आहेत म्हणजे हे मोठ्या प्रमाणात सहजपणे होत नसावे. माझ्या मते भौगोलिकदॄष्ट्या सलग असलेल्या भागात एकाच प्रकारच्या तांदळाची लागवड होत असावी, म्हणजे महाराष्ट्राच्या एका मोठ्या पट्यात एका जातीचे तांदूळ, केरळच्या एका मोठ्या पट्यात दुसर्या जातीचे तांदूळ इत्यादी. एकाच गावात सलग लागून २५-३० शेते असतील तर त्यात २५-३० वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ लावले जात नसावेत. त्या मातीत, हवामानात जगणारा एकच तांदूळ लावला जात असावा.
पण जर मी हट्टाने बाकी सगळे आंबेमोहोर लावत असताना कोलम लावला तर मात्र मी माझ्या शेजार्यांचे आंबेमोहोराचे बियाणे दूषित करीन. यात माझ्या शेजार्याला कायद्याने काही संरक्षण मिळेल असे वाटत नाही.
माझे वरचे सगळे अंदाज आहेत, कदाचीत शेती करणारे किंवा शेतीची माहिती असणारे याची जास्त माहिती देऊ शकतील.
+१
>>माझे वरचे सगळे अंदाज आहेत, कदाचीत शेती करणारे किंवा शेतीची माहिती असणारे याची जास्त माहिती देऊ शकतील.
इथे लिहिणार्या बहुतेक सर्वांची हीच स्थिती आहे.
नुकताच दापोली येथे गेलो असता नातेवाइकांबरोबर भात बियाणे खरेदीला गेलो. त्या दुकानात १५-२० प्रकारची बियाणी उपलब्ध होती. यात वेगवेगळ्या जातींबरोबरच ९० दिवसात पिकणारे. ११० दिवसात पिकणारे अशाही व्हरायटीज होत्या. त्या अर्थी जवळपासच्या शेतात समान पीक घेतले जाते असे नसावे. शिवाय क्रॉस परागीभवन होण्याचा प्रश्नही फार सिरिअस नसावा.
हेच (क्रॉस परागीभवन सहजपणे न होणे)जनुकांतरित पिकांनाही लागू असावे.
पण जर बियाणे खरेदीच करायचे
पण जर बियाणे खरेदीच करायचे असेल तर काय फरक पडतो? जरी cross pollination झाले तरी दुसर्या वर्षी मी ते cross pollination झालेले धान्य बियाणे म्हणून वापरणारच नाहिये, मी नविन बियाणे विकत घेणार आहे. जर मला मीच साठवलेले धान्य वापरायचे असेल तर मात्र cross pollination होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. जर विकतचे बियाणे वापरायचे असेल तर ती काळजी बियाणे विकणारी कंपनी घेइल.
दुसरी एक गोष्ट म्हणजे किती अंतरापर्यंत cross pollination होऊ शकते? भारतात शेतांचे आकार छोटे असतात पण अमेरिकेसारख्या देशात जेथे शेकडो एकर्स पसरलेले एकच शेत असते तिथे कदाचीत शेतातल्या मधल्या भागातले बियाणे पुढील वर्षासाठी राखून ठेवणे शक्य असावे कारण ते cross pollinate होण्याची शक्यता कमी आहे.
ऐकीव माहिती
आजोळी एकेकाळी भातशेती होती त्यातली ऐकीव माहिती अशी की ठराविक प्रकारची जमीन, पाण्याची उपलब्धता, तापमान आणि (अर्थातच स्थानिक जनतेची आर्थिक स्थिती आणि जिभेची आवडनिवड) यामुळे एकाच जातीचा तांदूळ तिथे पिकवला जातो. यातही ९० दिवसात पिकणारा, ११० दिवसात होणारा असे प्रकार असतात; ते ही बहुदा पावसाळ्यात. पण शक्यतोवर आजूबाजूचे सगळे शेतकरी एकच जात निवडतात, जसं कोलम, किंवा आंबेमोहोर असं.
आणि शेतात औषधं फवारण्याचीही वेळ एकत्र ठरवली जाते. एकाच शेतकर्याने फवारणी केली आणि आजूबाजूच्यांनी केली नाही तर फवारणी करणार्या शेतकर्यालाही फार फायदा होत नाही. सगळे शेतकरी ठराविक २-४ दिवसांच्या कालावधीत औषधं फवारतात.
तिथली रब्बी शेती ही एका पावर हाऊसच्या पाण्यावर चालते. भात तयार झाल्यावर पाणी आलं तर उभं पीक खराब होऊ शकतं. त्यामुळे त्या हंगामात पेरणी, आवणी, कापणी कधी करायची यामधेही परस्परसहमती असते. एखाद्याने ९० दिवसात पिकणारं भात लावलं आणि बाकीच्यांनी ११० दिवसांचं, तर त्या ९० दिवसवाल्याचं नुकसान होण्याची शक्यता जास्त.
अशा निर्णयांमधे 'बाहेरचा' हस्तक्षेप फार होताना दिसत नसे. गावातले लोक फवारणी कधी करायची हे ठरवत, जवळपासच्या गावातले लोक मिळून किती दिवसात होणारं भात लावायचं हे ठरवत असं आठवतं. बहुदा त्यातही ज्याची मोठी जमीन तो अधिक वर्चस्व दाखवत असेल पण एकाची शेती १००-१२५ एकर आणि बाकीच्यांची १-२ एकर इतपत असमतोलही नव्हता.
गव्हाचे दाणे नको जमिनीत गाडुन
गव्हाचे दाणे नको जमिनीत गाडुन टाकल्याची बातमी मला सापडली नाही. या पानावर खालील उल्लेख आहे.
The U.S. Department of Agriculture is investigating how the wheat showed up eight years after the company ended field tests. It was found growing on about 1 percent of the farmer’s 125-acre (51-hectare) field, and he submitted it to Oregon State for testing after an application of Monsanto’s Roundup herbicide didn’t kill it.
यावरून मला असं वाटतय की मोन्सेन्टोने ने एक गव्हाची नवी जात तयार केली, त्याच्या field trials घेतल्या, त्या अयशस्वी झाल्या म्हणून ती गव्हाची जात बाजारात आणली नाही, तरीपण ती बाहेर आढळून आली. पण ती गव्हाची जात नष्ट करण्यासाठी ती पुरली असा उल्लेख कुठे मिळाला नाही. असे करणे म्हणजे माश्याला पाण्यात बूडवून मारण्याचा प्रयत्न करण्यासारखे वाटले म्हणून मूळ बातमी वाचण्याची उत्सुकता आहे. तुम्ही योग्य बातमीचा दुवा देउ शकाल का?
वेगळी उदाहरणं
बियाणांऐवजी आपण वेगळी सजीव उदाहरणं घेऊ.
कुत्रा. पाळीव कुत्रे ब्रीड करणारे आणि विकणारे ब्री़डर्स विकण्याआधी सर्रास खच्ची करून विकतात. याचं कारण उघड आहे. त्यांनी वेगवेगळ्या उत्तमोत्तम नमुन्यांकडून (उच्च पेडिग्री असलेल्या) कुत्र्यांचा स्टॉक गोळा करून नवीन कुत्री तयार केलेली असतात. सर्वसाधारण पूडल ज्या किमतीला विकलं जातं त्याच्या चौपट ते पाचपट किंमत ते लावतात. याचं कारण म्हणजे ज्यांना स्पर्धेत आपल्या कुत्र्याने बक्षिसं वगैरे मिळवावी असं वाटतं त्यासाठी त्या कुत्र्यांचा आकार, केस, आणि पेडिग्री या सर्वच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. मात्र ज्यांनी तो कुत्रा विकत घेतला आहे त्यांना त्या कुत्र्यापासून नवीन पिल्लं उपजवण्याचा हक्क त्यांनी विकलेला नसतो. यात नैतिकता कुठे आली? यात तुम्हाला नक्की काय प्रॉडक्ट हवं आहे याची व्याख्या वेगळी आहे. फक्त कुत्रा घ्यायचा की कुत्रा + पुनरुत्पादनाचे अधिकार विकत घ्यायचे हे तुम्हाला ठरवता येतं, तसंच यातलं नक्की काय विकायचं हे विक्रेत्याला ठरवता येतं.
खेचर. हे पुनरुत्पादन करू शकत नाही, केवळ तुमच्यासाठी त्याच्या आयुष्यभर काम करू शकतं. एका अर्थाने तो घोडा आणि गाढव यांच्या मधला प्राणी आहे - पण त्या दोन्हीपैकी कुठल्याच प्राण्याची पुनरुत्पादन क्षमता त्यात नाही. खेचरं विकत घेताना हे प्रॉडक्ट नक्की काय आहे याची सर्वांना पूर्ण कल्पना असते. हे खेचर मेलं की त्याजागी दुसरं घ्यावं लागणार हेही माहीत असतं. पण खेचरं वापरणाऱ्या कोणी याबाबत तक्रार केलेली दिसत नाही.
फुलं. ही तर झाडांच्या प्रजोत्पादनाची यंत्रणा. बाजारात तुम्हाला कुंडीसकट फुलं मिळतात, किंवा नुसतीच फुलंही मिळतात. तुम्हाला स्वतःला ते झाड जगवण्याचे कष्ट करून अनेक फुलं मिळवण्याची सोय असते. किंवा ती सोय सोडून (किंवा जबाबदारी टाळून) तुम्ही एक फूलही काहीशा चढ्या किमतीला घेऊ शकता. मुद्दा असा आहे की बाजारात सर्व ऑप्शन उपलब्ध असतात.
तसंच पुनरुत्पादन न करणारं बियाणं घ्यायचं की कमी उत्पादन देणारं, पण पुनरुत्पादन करता येण्याजोगं बियाणं घ्यायचं हे तुम्हाला ठरवता येतं. जर पुनरुत्पादनक्षमता तुम्हाला इतकी महत्त्वाची असेल की वाढलेलं उत्पन्न पुरेसं नाही असं वाटतं तर घ्या की IR72 भाताचं बियाणं. त्यावर काहीच आयपी नाही. वेगवेगळ्या सरकारांकडे या बियाणांचा भरपूर साठा आहे.
बियाणांची सामान्य बाजारात
बियाणांची सामान्य बाजारात विक्री व्हावी हे मान्य केल्यावर हा फरक तत्त्वतः रहात नाही. तरीही अन्न महत्त्वाचं, कुत्रे पाळणं फारसं महत्त्वाचं नाही हे लक्षात घेऊनच संकरित बियाणं शोधण्यासाठी विविध देशांतली सरकारं रीसर्च इन्स्टिट्यूट्स चालवतात. जगभराची अन्नधान्याची आणिबाणी संपल्यानंतर पुढचं काम बाजाराच्या माध्यमातून व्हायला काहीच हरकत आता नसावी.
फक्त मुलगा/मुलगी पहिजे की
फक्त मुलगा/मुलगी पहिजे की मुलगा/मुलगी + त्यांच्या पुनरुत्पादनाचे अधिकार विकत अधिकार विकत घ्यायचे हे तुम्हाला ठरवता येतं अस वाचलं अन... ठसका लागला.
म्हणूनच 'ज्या गोष्टींची बाजारात विक्री होणं सर्वसामान्यपणे मान्य आहे' अशा उत्पादनांविषयीच बोलतो आहे हे नंतर स्पष्ट केलं आहे.
आणि अवांतराचंही थोडं अवांतर करायचं झालं तर एके काळी पुनरुत्पादनाचे निर्णय हे त्या त्या व्यक्तीच्या हाती फारसे नसत. बहुतांश वेळेला आईबापच हे निर्णय घेत. पुनरुत्पादन न करणाऱ्या 'मालाला' (स्त्रीला) कमी किंमत देणं, मुलं असलेलीला मान देणं हे समाज सर्रास करायचा. घरोघरीही व्हायचं. पुनरुत्पादन करू न शकणाऱ्या पुरुषांनाही बोल लावले जात, अजूनही जातात.
+१
तसेच भारत हा कृषीप्रधान देश आहे व जाणता राजा कृषीमंत्री आहे. १९६० च्या दशकापासुन विविध शेतकी, बियाणे, अन्य संबधी संस्था सरकारी तसेच खाजगी ज्या देशाच्या अन्नपुरवठा स्वयंपूर्णतेबाबत प्रतिबद्ध की कटिबद्ध काय म्हणतात ते आहेत हे आठवून, इथे चर्चेत "ये क्या हो रहा है दुर्योधन" हेच आठवले ;-)
नैसर्गिक परागीभवन आणि फलन
मला वाटते, फुलातील स्त्रीकेसरावर दुसर्या कोणत्याही जातीचे पराग किंवा अन्य काहीही (धूलिकण वगैरे) येउन पडले तरी म्हणजे परागीभवन झाले तरी फर्टिलायझेशन आणि जर्मिनेशनची प्रक्रिया सुरू होत नाही. नैसर्गिक फलनासाठी एकाच जातीच्या परागकणांची आणि बीजांडाची आवश्यकता असते. (हे अर्थात शाळेत शिकलेले ज्ञान आहे. कोणीतरी अधिक माहिती द्यावी.) म्हणजे गहू आणि भात यामध्ये फलन होऊ शकणार नाही. पण कोलमभात आणि बासमतीभात यांचा संकर आपोआप, नैसर्गिकरीत्या होऊ शकेल काय या श्री थत्ते यांच्या प्रश्नाचे उत्तर 'हो' असे असावे. वर अपरिमेय यांनी उत्तर दिलेलेच आहे म्हणा.
म्हणजे गहू आणि भात यामध्ये
म्हणजे गहू आणि भात यामध्ये फलन होऊ शकणार नाही. पण कोलमभात आणि बासमतीभात यांचा संकर आपोआप, नैसर्गिकरीत्या होऊ शकेल काय या श्री थत्ते यांच्या प्रश्नाचे उत्तर 'हो' असे असावे.
असे असल्यास दोनेक शंका:
१. हे सर्वच फळांबाबत व्हायला हवं. इन दॅट केस, कोंकणात हापूस, रायवळ, पायरी आणि शेपू आदि अनेक आंब्याच्या जाती पिकत असताना आजपर्यंत कधीही हापूसला शेपूचा वास किंवा पायरीला रायवळचा आकार आलेला दिसला नाही. कोंकणातल्या आमच्या घरी शंभर वर्षे जुनी हापूसची नैसर्गिक झाडं (कलम न केलेली) आहेत. आसपास इतर जातींचीही झाडं आहेतच. तरी इतक्या वर्षात चव बदलल्याचं कोणी नोंदवलेलं नाही.
तस्मात, परागीभवनात पोटजातही महत्वाची असावी असा अंदाज आहे.. आंब्यांच्या उपजातींत रोटीबाठी व्यवहार होत नसावेत.
२. कृत्रिम कलमे ही बागेत खोडाच्या छेदाला दुसरे खोड जोडून आदि प्रकारे केला जातो, जर नुसत्या दोन भिन्न जाती जवळ जवळ ठेवून परागीभवनाने त्यांचे गुणधर्म एकमेकांना प्राप्त होत असते तर दोन झाडांच्या गुणधर्मांच्या बेरजेसाठी असं खास खोड-छाट-जोड प्रोसेसिंग करावं लागलं नसतं. शेवटी कलम म्हणजे योग्य त्या गुणधर्मांच्या दोन जातींची बेरीज करण्याचाच प्रयत्न असतो (हापूसचा स्वाद उत्तम, पण हापूसची आडवर्षीच पीक देण्याची खोड जावी म्हणून त्यावर अन्य कोणाचंतरी खोड जोडायचं इ इ). अशा वेळी हापूस आणि तो दुसरा आंबा शेजारी शेजारी लावायचे की झालं.. :)
सापडले..
तांदूळ हा सेल्फ पॉलिनेटिंग असतो. त्याच्या फुलात मेल फीमेल दोन्ही भाग एकत्र असतात, त्यामुळे त्याला अन्य फुलांची आणि कीटकांची गरज नसते. (किंबहुना, कोणतेही कीटक त्याच्या फुलांवर बसून पॉलिनेट करायला जात नाहीत)
शिवाय तांदळाचा परागकण बाह्य जगात फक्त १५ मिनिटे जगतो. त्यामुळे क्रॉस पॉलिनेशन नगण्य असते..
हे पहा:
दुवा: http://irri.org/index.php?option=com_k2&view=item&id=11384&lang=en
त्यातील मजकुराचा काही भागः
Rice is a self-pollinating plant. Each rice flower contains both male and female parts, which allow each flower to pollinate itself without the need for other flowers, or other rice plants. Self-pollination is a natural and normal process. Farmers can save seed from their crop of inbred rice and replant it again knowing it will have the same properties as the parent crop it came from, provided cross-pollination with other varieties is avoided.
Cross pollination of rice in a farmer’s field can occur, but usually at relatively low rates depending on the layout of the field and the local environment. Rice pollen is short-lived (15 minutes) and there are no known insect pollinators – which reduces the means by which cross-pollination can naturally occur.
उपयुक्त माहिती, थोडी शोधाशोध
उपयुक्त माहिती, थोडी शोधाशोध केल्यावर गव्हाबद्दल पण अशीच माहिती मिळाली.
http://www.senseaboutscience.org/pages/cross-pollination.html
यात असे म्हटले आहे की
Wheat is not insect-pollinated. Wheat flowers fertilise themselves before they open. Excess pollen, which is heavy and lives for only a few hours, then falls to the ground around the plant.
मक्याची गोष्ट मात्र वेगळी आहे. तो cross pollinate होतो.
http://www.uwex.edu/ces/crops/Pollination.htm
यावर म्हटल्याप्रमाणे
Pollen is light and can be carried considerable distances (up to 600 feet) by the wind.
बारावीत बॉटनीमध्ये contrivances for cross pollination आणी contrivances for self pollination शिकलो होतो त्याची आठवण झाली.
कोलमच्या फुलांवर पटणीचे
कोलमच्या फुलांवर पटणीचे परागकण येऊन बसले तर फलन होइल, पण तांदळाचे परागकण असे असतात (गविंच्या प्रतिसादातील लिंक वरून) की हे असे नैसर्गिकरित्या होण्याची शक्यता खूपच कमी आहे, म्हणजे अगदी दाटीवाटीने दोन्ही रोपे एकाच शेतात लावली तरच कोलमच्या फुलांवर पटणीचे परागकण येऊन बसतील. जर दोन तांदळांच्या जातींपासून एक नवीन मिश्र जात बनवायची असेल तर मात्र हे कृत्रिमरित्या करावे लागते. येथे त्याची सचित्र माहिती उपलब्ध आहे.
पण जर जनरल बघितले की एका फुलाचे परागकण दुसर्या फलन न होऊ शकणार्या फुलावर गेले (गव्हाचे भातावर किंवा जास्वंदीचे झेंडूवर) तर काय होईल, तर ते नुकसान करणार नाहीत, नुसतेच पडून राहतील, जेव्हा केव्हा योग्य परागकण फुलावर पडतील तेव्हा फलन होईल.
चुकीचा आक्षेप
वरच्या काही प्रतिसादातून "जगभरातल्या अन्नोत्पादनावर मूठभर लोकांचा ताबा" असा सूर दिसतो आहे. त्याविषयी स्पष्टीकरण.
अन्नोत्पादनावर मूठभरांचा ताबा येणार नाहीये तर फक्त (विशिष्ट-स्वतः विकसित केलेल्या) बियाण्यांच्या उत्पादनावर त्यांचा हक्क येणार आहे. अन्नधान्याचे उत्पादन सर्वांना करता येणार आहे.
अन्नधान्याचे उत्पादन सर्वांना करता येणार आहे.
अगदी अगदी.
कसे? ते सांगण्याचे करावे.
पारंपारिक जातींची धान्येच आजकाल दिसत नाहीत. बियाणे म्हणून वापरणे दूर ठेवा. बीटी मधे टर्मिनेटर जीन्स, हायब्रिड असेहि स्प्लिटप होते म्हणून बियाणे म्हणून ब्राऊनबॅगिंग करता येत नाही. बाजारात विक्रीकरताची इतर ग्रेन्स गॅमा किरणे वापरून जास्त काळ टिकविण्याच्या नावाखाली स्टराईल करून ठेवलेली, हे पुढे नेलेत, तर, किंवा आजही भारतातली परिस्थिती पाहिलीत तर, बियाणे विकणारे किरकोळ विक्रेते गडगंज श्रीमंत का आहेत? शेतकर्यांच्य कर्जात दरवर्षी भर बियाणी खरेदीतूनच कशी पडते? नकली बियाण्याच्या बातम्या दिसतात, त्यात 'नकली' काय असते? इ.प्रश्न पडणार नाहीत.
अन्न धान्याचे उत्पादन सगळ्यांनाच करता येणारे? चला, एक प्रयोग म्हणून आपण आपल्या घरी एक गिलक्याचा(घोसाळे) वेल वा चिकूचे झाड लावू या. किंवा आपल्या आवडीचे कोणतेही खाद्यपदार्थ(दाणे/फळे इ.) देणारे झाड. त्याचे बियाणे काय भाव मिळते बाजारात? (ग्रॅम्स मधे किंमत असते. किलोग्रॅम मधे नाही), घरी आणलेल्या चिकूची बी, वा जून घोसाळ्यातली बी काढून वेल/झाड उगवतो का? उगवल्यास येणार्या फळाचा दर्जा काय असतो? ते देखिल अनुभव घेऊन इथे लिहावे ही विनंती.
जी काय धान्ये (जीएम सोडून)
जी काय धान्ये (जीएम सोडून) दिसतात त्यांचेही बियाणे बाजारातूनच विकत घ्यावे लागते तर जीएम धान्याचे बियाणे दरवेळी बाजारातून घ्यावे लागणार असा मुद्दाम वेगळा उल्लेख कशासाठी करायचा?
धान्योत्पादन सर्वांना करता येणार याचा अर्थ धान्योत्पादन काही या कंपन्या करणार नाहीत असा आहे. आणि ते वाक्य "अन्नधान्याचे उत्पादन मूठभरांच्या ताब्यात" याला उद्देशून होते.
थत्तेजी,
इतर बियाण्यांवर स्वतः प्रयोग करून उत्पादन घेण्याचे, वा इन्फेरियर क्वालिटी का होईना, सेकंड जनरेशन पिकासाठी सध्याच्या पिकातून थोडे दाणे सांभाळून ठेवायचे स्वातंत्र्य शेतकर्यास असते.
जेनेटिक मॉडिफिकेशन नंतर हे स्वातंत्र्य उरत नाही. बियाणे या बेसिक नैसर्गिक स्त्रोतावर कंपनीची संपूर्ण मक्तेदारी कालांतराने निर्माण होते. (होईल) याशिवाय "जीएम बियाणी स्पेसिफिक औषधांना बळी पडत नाहीत पण इतर सर्व वनस्पती त्या औषधाने मरतात" या संशोधनातील धोका तुम्हाला जाणवत नाहिये का?
चर्चेत भाग घेण्यास असमर्थ
मुळात मूलभूत गरज असणार्या + सजीव असणार्या अन्नाकडे इतर संशोधनांप्रमाणे केवळ आणखी एक संशोधन, किंवा एखाद्याची बौद्धिक क्षमता म्हणून बघणे मला शक्य नाही, त्यामुळे (टिपेत म्हटले आहे त्यानुसार) या चर्चेत भाग घेण्यास असमर्थ आहे.