गूगल आपल्याला मठ्ठ तर करत नाही ना?

काही तुरळक अपवाद वगळता, आजच्या तरुण पिढीच्या मेंदूचा बराचसा भाग ईमेल्स, ट्वीटर्स, चॅट्स, स्टेटस् अपडेट्स इत्यादींनी व्यापलेला असल्यामुळे बहुतेक वेळा त्यांच्यात एकाग्रतेचा अभाव असतो व चित्त विचलित झालेले असते, असे काही अभ्यासकांचे निरीक्षण आहे. अमेरिकेतील कॉलेजमधील 80 टक्के विद्यार्थी मॅसेजेस, फेसबुक, न्यूजफीड व इतर गोष्टी ताशी एकदा तरी, 10 टक्के ताशी सहा वेळा तरी वापरत असतात. व इतरांच्या बाबतीत ताशी किती वेळा याचा हिशोबच ठेवता येत नाही.
निकोलस कार या पत्रकाराने गूगल आपल्याला मूर्ख तर बनवत नाही ना? या विषयी 2008 साली एक लेख लिहिला होता. गूगल सर्च इंजिनच्या सततच्या वापरामुळे सातत्याने आपले लक्ष बदलत असते. त्यामुळे आपल्या मेंदूचे रीवायरिंग होत असावे अशी त्याला दाट शंका होती. या रीवायरिंगमुळे आताची तरुण पिढी कुठल्याही गोष्टीचे जास्त खोलात जाऊन विचार करू शकत ऩाही. आपल्यातील उपजत शहाणपणाचा वापर आता उपयोजित गोष्टीसाठीच होत आहे. अनेक वेळा ताबडतोबीच्या समस्यांकडे लक्ष देत असल्यामुळे ध्यानपूर्वक, चहूबाजूने विचार करण्याची बुद्धीमत्ता हळू हळू कमी होत आहे. तुकड्या तुकड्याने माहिती गोळा करण्याच्या नादात खोलात जाऊन विचार करण्याची बुद्धीशक्ती हरवून जाईल की काय याची चिंता लेखकाला वाटत आहे.

परंतु गूगलचे समर्थक मात्र या गोष्टीशी सहमत नाहीत. त्यांच्या मते मेंदूत माहिती भरण्यात व तेथून माहिती काढून घेण्यात वेळ घालविण्यापेक्षा इतर महत्वाच्या गोष्टींसाठी मेंदूचा वापर करत राहणे इष्ट ठरेल. गूगलवर सहजपणे मिळणारी माहिती डोक्यात ठेऊन घेणे हे काही बुद्धीमत्तेचे लक्षण नाही. फार फार तर याला बुद्धीमत्तेची एक बाह्य बाजू म्हणता येईल. माहितीबद्दलची स्पष्ट कल्पना एकदा आल्यानंतर त्याच्या विश्लेषणातून समस्येला उत्तर शोधणे यासाठी बुद्धीमत्तेचा वापर करणे योग्य ठरेल. 14 -15 वर्षे वय असलेल्या एखाद्यानी तोंडपाठ केलेले पाय (π) या अपरिमेय संख्यातील शंभरेक आकडे अचूकपणे फाडफाड सांगणे कदाचित गंमतीदार असू शकेल. परंतु पायचे आकडे शोधण्यासाठी सॉफ्टवेअर लिहिणार्‍यापेक्षा तो सरस ठरत नाही. चाइल्ड प्रॉडिजी शकुंतलादेवीसारखे 40 - 50 आकड्यांचा गुणाकार वा भागाकार काही क्षणात करून दाखविण्यापेक्षा गणित विषयात काही नवीन भर घालणे ही खरी प्रतिभा असेल.

माहिती तंत्रज्ञानाचा विकास होण्यापूर्वीची पिढी जास्तीत जास्त 20 -25 गोष्टी लक्षात ठेवत असे. परंतु आताच्या दुसर्‍या सहस्रकाच्या पिढीत हजारो गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण त्यांच्यासाठी गूगल आता त्यांच्या मेंदूचाच एक भाग बनू पाहत आहे. एका चाचणीमध्ये कॉलेज विद्यार्थ्यांचा एका गटाला चाळीसेक पशु - पक्ष्यांची नावे लिहून काढण्यास सांगितले होते. त्यातील काही विद्यार्थ्यांना आपण लिहिलेली नावे संगणकाच्या हार्ड डिस्कवर सेव्ह करता येईल व इतर काही जणांना संगणकाच्या हार्ड डिस्कवरून डिलीट केले जाईल असे सांगण्यात आले. काही दिवसानंतर याच विद्यार्थ्यांची तीच चाचणी घेतल्यानंतर ज्यांना संगणकावर माहिती उपलब्ध होईल असे सांगितले होते त्या विद्यार्थ्यानी तुलनेने फारच कमी नावे लक्षात ठेवण्याचे कष्ट घेतले होते. कारण संगणकावर माहिती उपलब्ध असल्यामुळे लक्षात ठेवण्याचा त्रास त्यांनी घेतला नव्हता. झेरॉक्स कल्चरचा अनुभवही याहून वेगळा नाही.

गूगलची ही आक्रमकता आपल्या स्मृतीपटलावर काही परिणाम करत असावे.कारण मेंदूपेक्षा आपला जास्त भरवसा कीबोर्डवर आहे. काही तज्ञांच्या मते स्वत:च्या हस्ताक्षरातून उमटलेले शब्द (व आशय) कीइंग - इन् केलेल्या शब्दांपेक्षा व्यवस्थितपणे मेंदूपर्यंत पोचू शकतात. कीइंगमुळे काही महत्वाचे मुद्दे मेंदूत ध्वनित होत नाहीत. यासंबंधीची एक चाचणी घेण्यात आली. काही विद्यार्थ्यांना हस्ताक्षरात एक परिच्छेद कागदावर उतरवून घेण्यास सांगण्यात आले. व इतर काहींना टाइप करून प्रिंट घेण्यास सांगण्यात आले. काही दिवसांनी या विद्यार्थ्यांना परिच्छेदातील माहितीबद्दल काही जुजबी प्रश्न विचारल्यानंतर ज्यांनी (जुनाट पद्धतीप्रमाणे) हस्ताक्षरातून परिच्छेद उतरवून काढले होते त्यांना इतरांपेक्षा जास्त गोष्टी आठवत होत्या. कित्येक शतकापासून जोपासलेली ही आठवणीत साठवण्याची क्षमता हळू हळू कमी होत आहे. या नंतरची पिढी हस्ताक्षराची सवय पूर्णपणे विसरून कीइंग - इन् वरतीच भरवसा ठेवतील.

खरे पाहता स्मृती बद्दल येवढे हळवे व्हायची काही गरज नाही व काळजी करण्याचे कारण नाही. तरीसुद्धा कुठल्याही गोष्टीचा फार खोलात जाऊन, समस्येकडे लक्ष केंद्रित करून विचारपूर्वक निर्णय घेण्यापेक्षा वरवरच्या माहितीच्या आधारे उत्स्फूर्तेतेने निर्णयापर्यंत पोचण्याची सवय घातक ठरणार आहे, हे मात्र निश्चित. एका तज्ञाच्या मते हातानी लिहिण्याच्या वा हार्ड कॉपी वाचण्याच्या सवयीमुळे एका प्रकारचे बुद्धीमत्तेचा तरंग उमटत लेखकाच्या आशयाचे नीटपणे आकलन होऊ शकते. गूगल/ संगणक वरील त्रोटक माहितीमुळे मूळ आशय हरवून जाण्याची शक्यता आहे.

निकोलस कारचा हा लेख ट्वीटर्स, स्मार्ट फोन्स, सातत्याने टेक्स्टिंग वा चेकिंगच्या जमान्यापूर्वीचा होता. गेल्या 4 - 5 वर्षात हे सर्व माहितीचे स्रोत मोठ्या प्रमाणात विकसित झाले असून आपले जीवन व्यापून टाकत आहेत. पुढील काही वर्षात केवळ लॅपटॉपच नव्हे तर मोबाइल व टॅब्लेट्स प्रत्येक क्षणाला आपले चित्त विचलित करणार आहेत. तुम्ही कुठेही जा, त्या तुमचे पाठलाग करणार आहेत - कारमध्ये, रस्त्यावर, ऑफिसच्या ठिकाणी, महत्वाच्या मीटिंग्सच्या वेळी...... अगदी तुम्ही बाथरूममध्ये असतानासुद्धा! शांतपणे एखाद्या ठिकाणी विचार करण्याससुद्धा तुम्हाला यानंतर शक्य होणार नाही. कदाचित असली ठिकाणं काळाच्या उदरात नष्ट होऊन जातील. वॉटरप्रूफ आयपॉड वापरत शॉवर घेणार्‍या महाभागांची संख्या आताच कमी नाही!

कारच्या लेखाचा प्रतिवाद करणारा एक लेख जमाइस कास्किओ (Jamais Cascio)या संशोधकाने लिहिला आहे. त्याच्या मते गूगलमुळे आपण, ढ, मूढ वा मूर्ख असे काही होत नाही. उलट वेबच्या जंजाळातून नेमकी माहिती शोधून आपल्या फायद्याच्या गोष्टीसाठी वापर करण्याची कुशलता आपल्या मेंदूत येऊ घातलेली आहे. खरे तर आपण आता मागच्या पिढ्यांपेक्षा जास्त चाणाक्ष आहोत. एकपाठी, एकाग्रता, फोकस्ड, वा लक्ष केंद्रित करणे आता आपल्याला जमत नसले तरी आपली बुद्धीमत्ता जास्त तरल, तल्लख, सक्षम, हजरजबाबी होत आहे. गडबड - गोंधळातून मार्ग काढणे, गुंतागुंतींची उकल करणे, नवीन समस्यांना धडाडीने सामोरे जाणे, धोका पत्करणे इत्यादी गोष्टी या बुद्धीमत्तेची देणगी आहे.

अलिकडेच काही नसतज्ञ गूगलसॅव्हींच्या मेंदूतील बदलाकडे लक्षपूर्वक अभ्यास करत आहेत. fMRIची सुविधा वापरून गूगलसॅव्हींचा मेंदू कसा काम करतो याचा शोध ते घेत आहेत. त्यासाठी 55 ते 77 वयोगटातील 24 जणात 12 जण गूगल व तत्सम सुविधांचा गेली 10 वर्षे सातत्याने वापर करणार्‍यांची व इतर 12 जण कधीच गूगल न वापरलेल्यांची अभ्यासासाठी निवड केली. हे दोन्ही गट जेव्हा पुस्तक वाचत होते तेव्हाच्या त्यांच्या मेंदूंच्या एमआरआय स्कॅनमध्ये मेंदूतील temporal, parietal व occipital lobe हे भाग क्रियाशील झालेले आढळले. साधारणपणे भाषा, स्मृती वा काही तरी निरखून पाहताना हे भाग क्रियाशील होत असतात.

नंतरच्या चाचणीत या सर्वांना गूगलवर चॉकोलेट खाल्यामुळे आरोग्याला काय फायदा मिळतो? याचा शोध घेण्यास सांगितले. व त्यांच्या मेंदूंचे एमआरआय स्कॅनिंग करण्यात आले. गूगलवर सर्फिंग करणार्‍यांच्या काहींच्या बाबतीत वाचनाच्या वेळी क्रियाशील असलेल्या मेंदूच्या पृष्ठभागाव्यतिरिक्त आणखी काही पृष्ठभाग सर्फिंग प्रक्रियेत भाग घेत असलेले fMRI स्कॅनिंगमध्ये चित्रित होऊ लागले. हे अतिरिक्त पृष्ठभाग सामान्यपणे गुंतागुंतींच्या प्रश्नांचा विचार करताना, महत्वाचे निर्णय घेत असताना वा दृश्य संकलन करताना कार्यरत होत असतात. गूगलशी अपरिचित असलेल्यांचे मेंदू मात्र जुळवून घेण्याच्या मार्गावर होत्या व त्यांच्या मेंदूच्या fMRI मध्ये फार बदल आढळला नाही.

नसतज्ञांच्या मते गूगलवरील वेबचा शोध मेंदूतील काही सर्क्यूट्सना उत्तेजित करत असावे. व ही सर्क्यूटरीची प्रक्रिया हळू हळू विकसित होत गेली असावी. वृद्धाप्यकाळात जाणीवांचे आकुंचन होण्याच्या प्रक्रियेला थोपवू शकणारी ही क्षमता आहे, असा निष्कर्ष या अभ्यासातून काढला गेला. तरुण पिढीच्या मेंदूतही असेच काही तरी घडत असावे, असे त्यांना वाटू लागले.

अत्यंत प्राथमिक स्वरूपात ही चाचणी असली तरी गूगल आपल्याला ढ करू पाहते यास प्रतिवाद करण्यास पुरेसे आहे, असे तज्ञांना वाटते. नेटिझन्सच्या मेंदूत वेगळे बदल करण्याची क्षमता गूगलमध्ये आहे, असेही आपल्याला म्हणता येईल. आपल्या मेंदूत आमूलाग्र बदल करण्याची क्षमता कीबोर्ड व डोळ्यासमोरील स्क्रीन वर आहे, याबद्दल दुमत नसावे. फक्त हा बदल सुखावह की ....आणखी काही तरी...... हे पुढील काळच ठरवू शकेल!

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

गुगल (किंवा एकूणच आंतरजाल) आपल्याला ढ करत आहे हे सिद्ध होण्यासाठी हा विदा अपुरा वाटतो. आजमितीला आंतरजालाचे फायदे ध्यानात घेता आंतरजालाचे धोके- ठळक असले तरी- डोळ्यांआड करण्याला पर्याय दिसत नाही. वाहानांची वाढती संख्या भीतीदायक असूनही वाहने वापरण्याला आज तरी पर्याय दिसत नाही तसेच. अर्थात एव्हरीथिंग इन मॉडरेशन वगैरे वगैरे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

>>ज्यांना संगणकावर माहिती उपलब्ध होईल असे सांगितले होते त्या विद्यार्थ्यानी तुलनेने फारच कमी नावे लक्षात ठेवण्याचे कष्ट घेतले होते.

यात वाईट काय आहे? पंचवीस नावे लक्षात राहिली नाहीत याचा अर्थ "ढ" होणे हा नक्कीच नाही.

>>यासंबंधीची एक चाचणी घेण्यात आली. काही विद्यार्थ्यांना हस्ताक्षरात एक परिच्छेद कागदावर उतरवून घेण्यास सांगण्यात आले. व इतर काहींना टाइप करून प्रिंट घेण्यास सांगण्यात आले. काही दिवसांनी या विद्यार्थ्यांना परिच्छेदातील माहितीबद्दल काही जुजबी प्रश्न विचारल्यानंतर ज्यांनी (जुनाट पद्धतीप्रमाणे) हस्ताक्षरातून परिच्छेद उतरवून काढले होते त्यांना इतरांपेक्षा जास्त गोष्टी आठवत होत्या.

हे पटले नाही. मी आज जे काम करतो ते कॉलेजात शिकलेलो नव्हतो. त्याचे शिक्षण मी पूर्णपणे संगणकाद्वाराच घेतले. त्यातली कुठलीही गोष्ट कधीही हाताने लिहिली नाही. तरीही त्या लक्षात राहिल्याच आणि समजल्या देखील.
------
आंतरजालावरील माहितीचा तोटा हाच की त्यातली कुठली माहिती (सध्या) ऑथेंटिक मानली जाते ते कळण्याचा फारसा मार्ग नसतो. जालावरची माहिती खरीच असते असे समजले जाण्याचा धोका संभवतो. अर्थात असा धोका पूर्वी मिळत असलेल्या "श्री" साप्ताहिकाचा किंवा "विचित्र विश्व" मासिकाचाही होता (रीडर्स डायजेस्टचा सुद्धा). अर्थात त्यांचा रीच खूप कमी असल्याने तोटाही तितकाच कमी होता.
------
पाढे- पावकी - निमकी पाठ करण्याऐवजी कॅलक्युलेटर वापरल्याने ढ होण्याचा आरोपही झाला होता. [लॉग टेबल आणि स्लाईड रूल चा वापर मर्यादित असल्याने त्यांच्यावर असा आरोप झाला नसावा].

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शाळेत शिक्षा म्हणून कधीमधी धडे उतरवून काढायला लावत. एकीकडे टीव्ही पहात असल्या शिक्षा पूर्ण करताना काहीही त्रास झाला नाही. उलट ते (रद्दड) चित्रपट अजूनही थोड्या फार प्रमाणात आठवतात, पण उतरवलेले धडे आठवत नाहीत. त्यातून पाढे वगैरे पाठ करून काय फायदा होतो हे ही नीटसं लक्षात येत नाही. (तसे मला २५ पर्यंतचे पाढे अजूनही प्रयत्न केल्यास आठवतील.) गुणाकार, भागाकारच्या संकल्पना समजल्यानंतर पाढे न आठवून काय फरक पडतो? न्यूटनचे नियम शब्दशः पाठ करून मार्क मिळतात, पण ते समजणं अधिक महत्त्वाचं.

लेखात दोन्ही बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरीही लेख एकांगी वाटला. गूगलमुळे किंवा इंटरनेटमुळे बुद्धी वापरण्याची पद्धत बदलते आहे हे ही फारसं पटत नाही. छपाईचं तंत्र सगळ्यांना आणि स्वस्तात उपलब्ध झाल्यानंतर रट्टा मारण्याची आवश्यकता कमी होत गेली; इंटरनेट-गूगल या त्याच्याच पुढच्या पायर्‍या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(तसे मला २५ पर्यंतचे पाढे अजूनही प्रयत्न केल्यास आठवतील.)
>>
बापरे १७ आणि १९ चे पाढे देखील आठवत असतील तर दंडवत _/\_
बाकी लेख आणि प्रतिसाद रोचक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाढे काय्,पावकी निमकी काय, समजून पाठ करणे महत्वाचे.पाढे समजून पाठ केले तर काय हरकत आहे? कार्ल गाउझ्,ऑयलर ह्या प्रतिभावंत गणिती,भौतिकी लोकांचे पाठांतरही विलक्षण होते. अनेक गोष्टी,संख्या ते लक्षात ठेवत असे वाचले होते. १३ गुणिले ७ च्या उत्तराला ' थांब गूगलून सांगते,तो पर्यंत धीर धर.' असे सांगितले तर?
अंकगणित काय, व्याकरण काय्,श्लोक काय ह्या fundamental का काय म्हणतात त्या गोष्टी आहेत्.त्या समजून घेऊन लक्षात ठेवल्या तर नक्कीच फायदा होतो.बळेच गूगल,संगणक मध्ये आणले तर नव्या पिढीचा तोटा नक्की होईल असे ह्यांचेही मत आहे.
न्यु जर्सीत उत्तम सामोसे कुठे मिळतील ह्यासाठी खुशाल गूगल्,बिंग वापरा.पण वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र तोंडावर हवेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(तसे मला २५ पर्यंतचे पाढे अजूनही प्रयत्न केल्यास आठवतील.)

एवढा कॉन्फिडन्स. प्रयोग म्हणुन करुन पहा. सध्या मी करतो आहे. रामरक्षा भीमरुपी वर मी हा प्रयोग केला. सुरवातीला लुप मधे जात असे. काही काळानंतर तो बॅरियर दूर झाला. सुरवातील म्हणण्याचा स्पीड कमी केला तरी अडखळायचो. स्पीड जास्त ठेवला तरच कंटीन्युएशन व्हायच. पाढे म्हणताना देखील एकदम 'सत्रा नव' असे म्हटले की येत नाही. सुरवातीपासून पाढा म्हणायला लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

पाढे म्हणताना देखील एकदम 'सत्रा नव' असे म्हटले की येत नाही. सुरवातीपासून पाढा म्हणायला लागतो.

म्हणून तर पाढे आठवतील असं लिहीलं. प्रयोग केला, खरंच गाडी रडतरखडत सतरा नव्वेला जाते. यापेक्षा कॅलक्यूलेटर बरा म्हणता येईल.

अलिकडेच नवा मोबाईल घेतला. त्यात गूगलकाकाला बोलून "What is 2+2" असं विचारलं की फार कमी तापदायक आवाजात गूगलकाका/मावशी "Two plus two is four" असं तोंडी बोलून आणि लिहूनही दाखवतात. हव्येत कशाला पाढे पाठ? (भारताचे पंतप्रधान कोण, हे पण गूगल बोलून दाखवतं. शब्दांचे अर्थ विचारले तर ते ही वाचले जातात. "इथून टेक्ससच्या कॅपिटॉलला कसं जायचं?" असं विचारल्यावर गूगल-नकाशावर रस्ता रंगीत करून दाखवला जातो. काही वर्षांनी टायपिंगही बाद होऊन जाईल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नेणिवेमधे(subconscious mind) गेलेल्या गोष्टी ऑलमोस्ट ऑटोमॅटीक होतात, त्यासाठी दरवेळेस गणित वापरावे लागत नाही, अर्थात त्यासाठी फार परिश्रम करावे लागत असल्यास ते व्यर्थ आहे. गाडी चालविण्यास शिकल्यावर चालवताना प्रत्येक क्रिया जाणिवपूर्वक करता येणे अवघड असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाढे- पावकी - निमकी पाठ करण्याऐवजी कॅलक्युलेटर वापरल्याने ढ होण्याचा आरोपही झाला होता.

आजच्या क्याश-रजिष्टरच्या जमान्यात, गिर्‍हाइकाचे बील सतरा डॉलर नि ब्याऐशी सेंट झाले असता गिर्‍हाइकाने वीस डॉलरची नोट पुढे केल्यावर त्यास सुटे पैसे किती परत करावयाचे, हे क्याश रजिष्टर स्वतःच सांगत असल्याकारणाने, ती वजाबाकी तोंडी करता येण्याची गरज (उरलेली) नाही, हे समजण्यासारखे आहे.

मात्र, सतरा डॉलर नि ब्याऐशी सेंट बील झाले असता, गिर्‍हाइकाने केवळ वीस डॉलरची नोटच नव्हे, तर त्याबरोबर वरची ब्याऐशी सेंटची चिल्लरही (बहुधा आणखी चिल्लर परत मिळून बाळगायला लागू नये, या उद्देशाने) देऊ केली असता,

(१) गिर्‍हाइकाकडे 'हे काय केले?' म्हणून भंजाळलेल्या नजरेने पाहणे,
(२) त्यास ती वरची ब्याऐशी सेंटची चिल्लर 'हिची गरज नाही' म्हणून परत करणे,
(३) वीस डॉलरच्या रकमेची क्याश रजिष्टरमध्ये नोंद करून, क्याश रजिष्टरने सुचवलेली चिल्लर (जी टाळण्याचा गिर्‍हाइकाचा मुळात प्रयत्न होता) गिर्‍हाइकास नम्रपणे परत करणे, आणि
(४) गिर्‍हाइकाकडे 'बघ मी काम सोपे नि साधेसरळ केले की नाही? नाहीतर तू!' अशा विजयी आविर्भावात पाहणे,

यास काय म्हणता येईल?
===============================================================================================
याला उपाय एकच. नाहीतरी 'पैसा हे सर्व पापांचे मूळ आहे' असे थोरामोठ्यांनी म्हटलेले आहेच. तेव्हा इकॉनॉमीमधून क्याशचे उच्चाटन करून सर्वांस क्रेडिट कार्ड वापरण्याची सक्ती केल्यास ही सुट्या पैशां(च्या हिशेबा)ची समस्या कायमची - नि मुळापासून - दूर व्हावी.

(प्रेरणा: "'डोके असणे' हे डोकेदुखीचे मूळ आहे. सबब, शिरच्छेद केल्यास डोकेदुखीची समस्या कायमची - नि मुळापासून - दूर व्हावी. शिवाय, आयुष्यात उद्भवणार्‍या इतरही समस्यांचे त्याबरोबर आपोआपच उच्चाटन व्हावे, हा बोनस." हे तत्त्व.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो, आम्ही आधीच सुमार होतो. (येथे "आम्ही" आदरार्थी (!) बहुवचन आहे.) गूगल अजून काय बनवणारे ! डुबोया मुझको होनेने, ना गूगल होता तो मैं क्या होता !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आधीच डेरा असलेल्याला माठ कसं बनवणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख वाचला, प्रतिसाद वाचतो आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्याच गोष्टींचे फायदे आणि तोटे असतात. आपल्याला काय फायदेशीर ते उचलावे आणि बाकीचे तोटे सोडून द्यावे. Smile

- (ढ) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्याच्या समांतर नावाच्या "Is Google Making Us Stupid?" पुस्तकातले लेखकाचे निरीक्षण फारच रोचक आहे, ते असे -

[It]* helped create the belief in an independent world of mathematically measurable sequences.” However, he says that this, along with plenty of other instances in technology, created a powerful dichotomy. “In deciding when to eat, to work, to sleep, to rise, we stopped listening to our senses, and started obeying the clock.
*mechanical clock

तसेच माहितीच्या विपुलतेच्या संदर्भात इथे दिलेले वाक्य रोचक आहे. -

Abundance of books makes men less studious.
— Hieronimo Squarciafico, a 15th century Venetian editor, bemoaning the printing press.

टीप - वरील सर्व गुगलच्या माध्यमातून चेपलेले आहे, फक्त काय चेपायचे हे मी ठरवलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुदलात ढ असलेल्यांना, इच्छा असली तरी मुळात असलेल्या अफाट माहीतीच्या आधारे अजुन जास्त ढ बनवू शकत नाही. ते असो.

गुगल फिल्टर बबल जास्त रोचक प्रकरण आहे. दोघांनी एकाच वेळी घेतलेल्या शोध शब्दाला दोघांना वेगळी माहीती दाखवते.

जर वेगळी माहीती वेगळ्या समुदायाला देउन मतभेद वाढणार असतील तर? फेसबुक क्रांत्या, अस्थिर वातावरण ठेवून अन्य कोणाचे हित साधणार असेल तर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गूगलमुळे किंवा एकंदर आंतरजालामुळे पुष्कळ विकीपंडित निर्माण झाले असतीलही; पण पूर्वीच्या पढतमूर्खांपेक्षा ते वेगळे कसे? अनेक विषयांवरची विश्वासार्ह माहिती आणि संदर्भसुद्धा या तंत्रज्ञानामुळे सहज उपलब्ध झाले हेदेखील खरंच आहे. त्याचा फायदा ज्यांना जितका उठवणं शक्य आहे (यात बौद्धिक क्षमता आणि पोच दोन्ही आले) त्यांनी तो उठवावा. हस्तलिखित ग्रंथांच्या संस्कृतीमध्ये जेव्हा छापखान्यात छापलेली पुस्तकं उपलब्ध होऊ लागली तेव्हा असेच आक्षेप घेतले गेले होते (वरचं पंधराव्या शतकातलं उद्धृत पाहा). ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू लागताच प्रस्थापितांना असुरक्षित वाटू लागतं. खरे ज्ञानपिपासू मात्र असल्या प्रकारांमुळे असुरक्षित होत नाहीत; उलट मिळेल त्या प्रकारे ते स्वत:ला समृद्ध करत जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>> ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू लागताच प्रस्थापितांना असुरक्षित वाटू लागतं. खरे ज्ञानपिपासू मात्र असल्या प्रकारांमुळे असुरक्षित होत नाहीत; उलट मिळेल त्या प्रकारे ते स्वत:ला समृद्ध करत जातात.
आहा. काय वाक्ये आहेत, वाह! एका नामवंत लेखकांची आठवण झाली. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका नामवंत लेखकांची आठवण झाली.

तुम्हाला प्रस्थापित म्हणायचं आहे का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

समाज बिघडत चालला आहे यावर विश्वास ठेवण्याकडे कसा लोकांचा कल असतो हे या लेखावरून दिसून आलं. एका बाजूला सामान्याला कळेल अशा भाषेत गीतेवरचं भाष्य लिहिल्याबद्दल ज्ञानेश्वरांची महती सांगायची, आणि दुसऱ्या बाजूला सध्याचं अद्ययावत ज्ञान जगात प्रचंड वेगाने पसरवल्याबद्दल आंतरजालाबाबत चिंता व्यक्त करायची हे दुटप्पी वाटतं. कधीकधी आपण सगळेच एक समाज म्हणून अत्यंत भेदरट आहोत असं वाटतं. नवीन कितीही चांगली गोष्ट दिसली तरी त्यातून आपल्यासमोर 'पण यातून हेहे वाईट होईल बरं का...' असेच विचार समोर येताना दिसतात.

आयक्यू अभ्यासावरून दिसलेल्या 'गेल्या शतकात सर्वसाधारण बुद्धिमत्ता वाढलेली आहे' या निष्कर्षाबाबतही (फ्लिन इफेक्ट) असाच अविश्वास दाखवला जाताना पाहिला आहे.

या सर्वामुळे 'ढ होणं' हा शीर्षकातला भाग रुचला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कधीकधी आपण सगळेच एक समाज म्हणून अत्यंत भेदरट आहोत असं वाटतं. नवीन कितीही चांगली गोष्ट दिसली तरी त्यातून आपल्यासमोर 'पण यातून हेहे वाईट होईल बरं का...' असेच विचार समोर येताना दिसतात.

सहमत आहे. जुनं ते सगळंच चांगलं आणि नवं ते सगळंच धोकादायक याला काही अर्थ नाही. मुळात गुगलने मेंदूचे रिवायरिंग होते असे समजले तरी मेंदू रिवायरेबल आहे हेच त्यातून सिद्ध होते आणि उद्या गूगल नसेल तर पुन्हा गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी मेंदू रिवायर करता येईल. त्यामुळे गूगलमुळे आपण 'ढ' होतोय असे मला वाटत नाही.
आरोग्य ही बाजारात विकायची गोष्ट झाल्यानंतर समाज भेदरट होणे (किंवा केला जाणे) ओघाने आलेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गूगल आणि तादृश अन्य सुविधांनी वापरणार्‍याचा लाभच होतो ह्यात शंका नाही. त्याचा वापर कसा करावयाचा आणि त्याची शक्तिस्थळे आणि मर्यादा काय आहेत हे जाणून घेणे वापरणार्‍याचे काम आहे.

वरील प्रतिसादांमधून जुन्या काळातल्या पाढे, परवचा वगैरे गोष्टींबाबतहि 'काय त्याची कॅलक्युलेटर/कम्प्यूटरच्या काळात गरज असा एक सूर ऐकू येतो ते मात्र पटत नाही. कितीहि वेगवान वाहने उपलब्ध असली तरीहि चालणॅ/धावणे ह्या शारीरिक क्षमता प्रत्येकात असायलाच हव्यात ह्याबाबत एकमत आहे. किंबहुना चालता वा धावता येणे हे शरीराच्या योग्य वाढीसाठी आवश्यक मानले जाते. अंकगणिताचे मूलभूत ज्ञान मेंदूमध्ये hard-wired असणे ह्याबाबतहि तेच म्हणता येईल. ह्यामुळे अंक आणि त्यांवरच्या चार मूलभूत कृति ह्यांची जी नैसर्गिक जाणीव मेंदूमध्ये जाऊन बसते ती बुद्धीच्या योग्य वाढीसाठी आवश्यक आहे असे वाटते.

अधिक प्रायोगिक पातळीवरहि ह्या गोष्टी मेंदूत बसलेल्या असणे उपयुक्त ठरू शकते. आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की ज्यांमध्ये क्षणार्धात निर्णय घेता येण्यावर लहान वा मोठे यश वा अपयश अवलंबून असते. अशा वेळी जर चटकन आकडेमोड करायची आवश्यकता पडली तर खिशातून कॅलक्युलेटर काढून कळा दाबण्यापेक्षा 'सतरा पाचे पंच्याऐंशी' हे घोकलेले ज्ञान तोंडातून फटकन बाहेर पडून जास्ती वेगाने कामास येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>वरील प्रतिसादांमधून जुन्या काळातल्या पाढे, परवचा वगैरे गोष्टींबाबतहि 'काय त्याची कॅलक्युलेटर/कम्प्यूटरच्या काळात गरज असा एक सूर ऐकू येतो ते मात्र पटत नाही. कितीहि वेगवान वाहने उपलब्ध असली तरीहि चालणॅ/धावणे ह्या शारीरिक क्षमता प्रत्येकात असायलाच हव्यात ह्याबाबत एकमत आहे. किंबहुना चालता वा धावता येणे हे शरीराच्या योग्य वाढीसाठी आवश्यक मानले जाते. अंकगणिताचे मूलभूत ज्ञान मेंदूमध्ये hard-wired असणे ह्याबाबतहि तेच म्हणता येईल. ह्यामुळे अंक आणि त्यांवरच्या चार मूलभूत कृति ह्यांची जी नैसर्गिक जाणीव मेंदूमध्ये जाऊन बसते ती बुद्धीच्या योग्य वाढीसाठी आवश्यक आहे असे वाटते.

हे ठीक आहे परंतु सत्तावीस औटं (२७ * ३.५) हे पाठ असायची काही गरज नाही. सतरा पाचे पंचाऐशी या पाठांतराचा उपयोग फक्त झटकन उत्तर काढण्यात होतो.

>>आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की ज्यांमध्ये क्षणार्धात निर्णय घेता येण्यावर लहान वा मोठे यश वा अपयश अवलंबून असते.

(दूरगामी परिणाम करणारे किंवा मोठा आर्थिक स्टेक असणारे) निर्णय "क्षणार्धात" घेण्याचे प्रसंग आयुष्यात क्वचितच येतात. त्या क्वचित येणार्‍या प्रसंगी बालपणी पाठ केलेले पाढे कामास येण्याची शक्यता फारच कमी. सहसा अशा निर्णयात जजमेंट पुरेसे असते. आणि अशा निगोशिएशनला जाण्यापूर्वी भरपूर गृहपाठ करून (विविध शक्याशक्यतांचा विचार, विविध आकड्यांचे गणित) जाता येते. आणि कितीच्या ऑफरच्या खाली निश्चित नाही म्हणायचे आणि कितीच्या ऑफर वरती हो म्हणायचे हे ठरवून ठेवता येते. (धीरूभाई वगैरे लोक पाढे, पावक्या निमक्या पाठ करायचे का आणि रोज परवचा म्हणायचे का हे जाणणे रोचक ठरेल?). माझ्या आयुष्यात मला पाढे पाठ असण्याचा विशेष फायदा झाला नाही. (निगोशिएशनला बसल्यावर कॅलक्युलेटर काढून गणित करून पहायला कोणी आक्षेप घेत नाही.

अवांतर: गणिताचा पेपर जर संकल्पना माहिती असून सुद्धा (दहाच्या पुढचे) पाढे पाठ नसल्यामुळे सोडवून पूर्ण होणार नसेल तर तो पेपर काढण्यात चूक झालेली आहे असे म्हणण्यास काहीच प्रत्यवाय नसावा. मी दहावीत अभ्यास करताना मला कोणीतरी जुन्या अकरावीचा गणिताचा पेपर सोडवायला दिला होता. त्यात चारचार आकडी संख्या असलेली समीकरणे होती. हा तद्दन मूर्खपणा आहे (असे माझे मत आहे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

धीरूभाई वगैरे लोक पाढे, पावक्या निमक्या पाठ करायचे का आणि रोज परवचा म्हणायचे का हे जाणणे रोचक ठरेल?).

धीरूभाई दहावी पुढे शिकले नाहीत म्हणून आजच्या पिढीने कॉलेजांत जायचे नाही की काय नितिन?धंद्याचे गणित वेगळे आणि हे वेगळे हो.समजून पाठांतर केले तर फायदा होतो असे ह्यांनाही वाटते.व्याकरणाचा-अव्यय्,समास्,अलंकार ह्यांचा पैसे मिळवायला फायदा होणार नाही पण एक तर्क्,भाषा कशी बनते हे समजणे महत्वाचे.
खाली लिहिल्याप्रमाणे मोठे शास्त्रज्ञ्,गणिती,अभियंते पहा. अनेकांचे पाठांतर चांगले असल्याचे दिसून येईल.
(जुनाट विचारांची)रमाबाई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जयंत नारळीकरांनी "मला आकडेमोड (त्या आकडेमोडीवरील पुस्तकं लिहणार्‍या कोण दाक्षिणात्य बाई आहेत त्यांचे नाव घेऊन) त्यांच्या सारखी कधीच जमली नाही, आणि ते जमायची गरजही वाटली नाही" असे पाढे पाठांतर इ. बद्दल मत व्यक्त करताना मी सौत्ताच्या कानांनी ऐकले आहे.

बाकी चालूद्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

वरच्या प्रतिसादातील दाक्षिणात्य बाई ह्या शकुन्तलादेवी असाव्यात कारण मीहि 'सौत्ता पाहिल्याप्रमाणे' प्रचंड संख्यांचे गुणाकार, भागाकार,वर्ग, घन, वर्गमूळ, घनमूळ इत्यादि, तारखेवरून वार आणि वारावरून तारीख असले हिशेब त्या लीलया केवळ डोक्यात क्षणार्धात करीत असत. ह्यामागे काही नैसर्गिक देणगी आहे आणि शकुंतलादेवींकडून लहानपणी पाढे चांगले घोटवून घेतल्यामुळे त्या हे करू शकत असत असे कोणीही मानत नाही. (अशा नैसर्गिक देणग्या असतात. 60 Minutes मध्ये काही वर्षांपूर्वी एक अमेरिकन बाई आल्या होत्या. त्यांना अशी देणगी होती की त्यांना कोठलीहि पूर्वीची तारीख दिली की त्या दिवशी वर्तमानपत्रात काय महत्वाच्या बातम्या आल्या होत्या, त्या दिवशी हवामान कसे होते अशा गोष्टी त्या बाई केवळ स्मृतीतून काढून अचूक सांगत.) शकुंतलादेवींच्या ह्या कौशल्याचे रहस्य त्यांच्या पाढे चांगले लक्षात राहण्याशी निगडित आहे असे नारळीकरांनी सुचविल्यासारखे मलातरी दिसत नाही. त्यांना एव्हढेच सुचवायचे असावे की ही देणगी मजपाशी नाही आणि ती मिळविण्यासाठी धडपडण्यात मला स्वारस्य नाही.

नारळीकरांच्या वक्तव्यावरून 'पाढे पाठ करण्याची मुळीच आवश्यकता नाही, कॅलक्युलेटर आहे ना!' हा संदेश कसा बाहेर निघतो हे कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शकुन्तलादेवीच.

नारळीकरांच्या वक्तव्यावरून 'पाढे पाठ करण्याची मुळीच आवश्यकता नाही, कॅलक्युलेटर आहे ना!' हा संदेश कसा बाहेर निघतो हे कळत नाही.

त्यांच्या वक्तव्यावरून (आठवणीतून) त्यांचे मत पाठांतरापेक्षा गोष्टी समजावून घेण्याकडे लक्ष द्या असे होते असे मला वाटते. (मलाही 'विशेष' आकडेमोड (अशी आकडेमोड करण्याकरता चार पाच अंकी संख्याचे पाढे पाठ असावे लागतात) करता येत नाही असे मत त्यांचे आहे असे मला म्हणायचे होते.)

प्रचंड संख्यांचे गुणाकार, भागाकार,वर्ग, घन, वर्गमूळ, घनमूळ इत्यादि,

असेच "कौशल्य" असलेला अजून एक.

http://www.ted.com/talks/arthur_benjamin_does_mathemagic.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

नारळीकरांचे वर्गबंधू आणि मित्र, सौर विज्ञानातले संशोधक, प्रा. शशीकुमार चित्रे आम्हाला एक वर्ष शिकवायचे. त्यांचा विषय तार्‍यांची रचना, तार्‍यांचं भौतिकशास्त्र इ.

एकदा त्यांनी वर्गात गणित घातलं. सोडवायला कॅलक्यूलेटर वापरायची सूट होती, पण सगळ्यांना आळस असल्यामुळे कोणीच ते वापरत नव्हतं. ३.१४/३ = १ अशी सुटसुटीत गणितं-उत्तरं मान्य असतात; त्यामुळे अशी काही कॅलक्यूलेटरची गरजही नव्हती. २७ चा पाढा येत नसेल तर तीसाचा, पर्यायाने तीनाचा येऊन पुरतं.
तर ते गणित मी सोडवलं पण जे उत्तर अपेक्षित होतं त्याची एककं आठवेना. (एकक म्हणजे तापमानाचं एकक सेल्सियस, केल्व्हीन असं. एककांशिवाय भौतिकशास्त्रात आकडे निरर्थक असतात.) तेव्हा दुसरं एक समीकरण घेऊन त्यातून उत्तर कोणत्या एककात असेल याचंही 'गणित' केलं. वर्गात चारच विद्यार्थी असल्यामुळे कागदांवर काय लिहीलं जात होतं तेही चित्रेंना दिसत होतं. मी काढलेलं उत्तर पाचाच्या जागी चार वगैरे असं होतं, जे उत्तर परीक्षेत आणि प्रत्यक्षातही योग्य मानलं जातं. खगोलीय आकड्यांचा विचार केला तर चार अब्ज आणि पाच अब्ज वर्ष किंवा प्रकाशवर्ष यात तसाही फार फरक नाहीच. आणि एककांचं गणितही मी योग्य तर्‍हेने सोडवलं होतं. ते पाहून चित्रेंनी त्या तासाचा उरलेला वेळ संकल्पना समजून घ्या, मग रट्टा मारण्याची आवश्यकता रहात नाही याबद्दल चर्चा करण्यात घालवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बेशिक म्याथ लागतच थोडं फार, पण इतकं नै.
काही गणितं सोडवायला कॉम्प्युटर पण पाच तास ते काही दिवस इतका पण वेळ घेतो.. ते पारंपारिक पद्धतीने करायचे म्हणलं तर महिने लागायचे ... अन् त्या प्रचंड आकडेमोडीमध्ये एखादे ठिकाणी चूक झाली तर ती शोधणे म्हणजे गवताच्या गंजीतून सुई शोधण्यासारखे, मग परत पहिल्या पासून सोडवा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या निवडीच्या वेळी (इंटरव्ह्यूमध्ये) मला एक अत्यंत सोपे असे सूत्र विचारले गेले. मला ते पाठ नव्हते, किंवा माझ्या स्मरणशक्तीवर माझा विश्वास नव्हता. मी ते सूत्र (फॉर्म्यूला) तिथल्या तिथे डिराइव्ह करून दाखवण्यासाठी परवानगी मागितली आणि मला ती दिली गेली, माझी निवड झाली आणि वेळोवेळी वरच्या जागाही मिळत गेल्या. एखादे सूत्र किंवा अंक लक्षात राहिला नाही या कारणासाठी आयुष्यात कोणीही मला 'ढ' म्हंटले नाही.
प्रत्यक्ष काम करतांना या गोष्टी सहजपणे उपलब्ध असतातच, नसल्या तर त्या कशा मिळवायच्या हे ठाऊक असते. गूगलसारख्या साधनांनी ते अधिक सोपे केले आहे. कुठलेही काम सोपे केल्यामुळे माणूस मठ्ठ किंवा आळशी होतो असे असेल तर मग कसलाही विकास, कसलीही प्रगती करायलाच नको. पण तसे नाही. रानोमाळ फिरून अन्न शोधण्यापेक्षा ते पिकवणे सोपे आहे या विचाराने माणूस शेतकरी झाला. हाताने काम करण्यापेक्षा यंत्राने ते करणे सोपे आहे म्हणून तो कारखानदार झाला. यामुळे कुठलीही गोष्ट सोपी करणे याचा अर्थ ती गोष्ट करण्यामध्ये वाचलेला वेळ आपण सत्कारणी लावून आणखी काही करू शकतो, यामधूनच प्रगती होते.
एकादे स्तोत्र किंवा पाढा सुरुवातीपासून (आणि ठराविक वेगाने) म्हंटला तरच आपल्याला पाहिजे त्या जागेपर्यंत आपण पोचतो असे काही वेळा होते, पण याचा अर्थ आपण लहानपणी त्या गोष्टी समजून न घेता पाठ केल्या असल्यामुळे असे होत असावे असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजा ते गणित करून काहीतरी कार्य साध्य करायचे असेल. हे कार्य आयुष्यात अनेक वेळा करायचे असेल समजा - "अवसरसंख्या". तर त्या कार्याकरिता खर्च केलेला काळ किती?

कार्यकाल = (पाठांतर काल)/(अवसरसंख्या) + (माहितीशोधकाल)

पाठांतर करायला काळ खर्च होतो (ऊर्जेचे गणित केलेले नाही, वाटल्यास करता येईल), तो खर्च प्रत्येक वापरामध्ये भागून घ्यायचा असतो. परंतु वेळीच माहितीशोध करायचा काल ~० होतो.

परंतु जर
माहितीशोधकाल < (पाठांतर काल)/(अवसरसंख्या)
तर पाठांतरावर वेळ वाया न-घालवणेच बरे.

सध्या तरी (०-९)*(०-९) हे पाढे पाठ करून कार्यक्षमता वाढेल, असे मला वाटते. पुढे कधीतरी फक्त ० आणि १ चे पाढे आले तर पुरे राहील. पाढे म्हणजे पाढे नव्हे, नियम आत्मसात हवे :
म्हणजे कुठलीही संख्या * ० = ०
आणि
कुठलीही संख्या * १ = तीच संख्या

----

संक्रमणाच्या काळात, म्हणजे "(पाठांतर काल)/(अवसरसंख्या) ~ (माहितीशोधकाल)" या काळात अन्य गोष्टी हिशोबात घ्याव्या लागतील. म्हणजे माहितीशोध करायचे यंत्र आयत्या वेळी हाताशी नसण्याची संभवनीयता, त्यामुळे होणारे तोटे, वगैरे.

---
जर पाढे पाठ न-केल्यामुळे वाचलेल्या वेळाचा दुसरा काही आनंददायी उपयोग होणार असेल, तर पाठांतराच्या खर्चात याचा हिशोब करायला हवा - काळजीपूर्वक.
जर कसलेतरी पाठांतर करून बुद्धीला उपयुक्त व्यायाम मिळत असेल, आणि पाढ्यांऐवजी दुसरे काही पाठ केले जात नसेल, तर काय? पाढे पाठ न केल्यामुळे ही उपयुक्तता सांडेल, आणि हा खर्च "पाठांतर नको" पर्यायाच्या खर्चात जोडायला पाहिजे.
वगैरे. गरज असल्यास गणित अधिक-अधिक क्लिष्ट करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाठांतराचा खरा उपयोग "विशिष्ट पद्धतीने उभारलेल्या परीक्षाव्यवस्थेत" यशस्वी होण्यापुरताच होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

1. माझ्या मते पाढे पाठ करणे ही त्या काळातील शिक्षितांची गरज होती. कारण आर्थिक/पैशाच्या व्यवहारात जास्तीत जास्त लवकर हिशोब करून पटकन व्यवहार संपविणे महत्वाचे ठरत होते. कॅल्क्युलेटर/कॅश रिजिस्टरच्या सुविधा नसलेल्या काळात तोंडी हिशोबावर पूर्ण भिस्त होती. त्यामुळे पाढे तोंडपाठ असणे अनिवार्य ठरले असावे.

2. पावकी-औटकीचा वापरसुद्धा याच कारणासाठी होत असावा. कारण ब्रिटिश मोजमापात 4,12,16,64,192 यांचा वापर असलेले गुंजी, मासे, तोळा, शेर, रत्तल, मण, इंच, फूट, यार्ड, फर्लांग, मैल, गुंठे, एकर... अशा गोष्टी व यासाठी पै, आणे, चवली, पावली, अधेली,रुपये यांच्यातून आर्थिक व्यवहार असल्यामुळे अशा प्रकारच्या पाढ्यांची गरज भासली असावी.

3. त्या काळी संस्कृत भाषेच्या वा एकंदर भाषासौंदर्याच्या रसग्रहणासाठी श्लोक, ओव्या कविता, तोंडपाठ असणे सुसंकृतपणाचे लक्षण समजले जात असावे. त्यामुळे जुन्याकाळचा शिक्षित वर्ग आपल्या विद्यार्थीदशेत श्लोक, ओव्या, कविता गीतेतील अध्याय, शंकराचार्यरचित चर्पटपंजरी व इतर कृती, रामदास - ज्ञानेश्वर - तुकाराम यांच्या ओव्या (अर्थ कळो वा न कळो) मुखोद्गत करण्यात धन्यता मानत होता. वेळप्रसंगी चारचौघात त्या म्हटल्यामुळे सर्वसामान्यांकडून वाहवा मिळत असे. परमेश्वरावरील भक्ती दृढ करण्यासाठीसुद्धा अशा प्रकारचे श्लोक पुटपुटले जात असावेत व त्यातून मानसिक समाधान मिळत असावे. भीमरूपी महारुद्रा.... म्हणत मारुती वा शनीला प्रदक्षिणा घालणार्‍यांची संख्या अजूनही कमी नसावी.

यावरून तोंडपाठ करून काही गोष्टी मेंदूच्या कप्प्यात कायमचे ठेवण्याची खरोखरच गरज आहे का हा प्रश्न उभा राहतो. केवळ मेंदूला व्यायाम वा स्मरणशक्ती तल्लख ठेवणे यासाठी कदाचित तोडपाठ उपयोगी ठरू शकेल. अन्यथा या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. म्हणूनच गूगल बाबा वा वूल्फ्रॅम अल्फा अंकलला शरण गेल्याशिवाय आपल्या समोरच्या समस्यांना उत्तरं सापडणार नाहीत.

4. लेखातील गूगल 2084 हे चित्र नजरेखालून घातल्यास गूगल आपल्या दैनंदिन जीवनव्यवहारावर किती मोठ्या प्रमाणात परिणाम करू शकेल याची क्ल्पना येईल. गूगलची तुमच्या जीवनातील अत्यंत बारिक सारीक व्यवहारावरसुद्धा कडक नजर असेल. घरदार, मिळकत, कुटुंब, कुटुंबातील सदस्यांच्या व तुमच्या आवडी-निवडी, मित्रमंडळी, शत्रुगण, सगेसंबंधी, तुमच्या भानगडी, तुमच्यातील चावटपणा, तुमचे आर्थिक व्यवहार, देणी-घेणी, तुमचा भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ .... या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती (तुम्हाला कळू न देता) गूगलच्या संग्रहात असणार. ही माहिती तुम्हालाच नव्हे तर योग्य किंमत आल्यास इतरांनासुद्धा उपलब्ध होणार. कदाचित नको ती माहिती इतरांच्या हातात पडल्यास तुमच्या अडचणीत भर पडणार. तुम्ही केलेल्या प्रत्येक क्लिकगणिक गूगलच्या संग्रहात भर पडत असणार.

तुम्हाला आवडो न आवडो, तंत्रज्ञानात प्रगती होत राहणार. नवीन नवीन गोष्टी, सोई-सुविधा व अ‍ॅप्स बाजारात येत राहणार. फक्त तारतम्य बाळगून तंत्रज्ञानाच्या आहारी कितपत जावे हे प्रत्येकाऩी ठरवायचे आहे. व कदाचित आपापल्या प्रकृतीनुसार हे ठरत जाणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाढ्यांच्या बाबतीत सहमत आहे. जे काही रोजच्या व्यवहारातील गणित आवश्यक आहे तेवढे पाठांतर लोक करत असतील पण म्हणून तेव्हाची मंडळी हूशार होती (लेखातील अर्थानूसार 'मठ्ठ' नव्हती) हे पटत नाही. उदाहरणार्थ, वर केलेल्या प्रयोगात निवडलेल्या अमेरीकेतल्या कॉलेज विद्यार्थ्यांप्रमाणे कोणी त्याकाळी निवडला आणि त्याला विचारले;

सदू कडे २७ गुंठे जमिन आहे, त्यामध्ये खरीप हंगामात तो १५ गुंठ्यांवर भुईमूग काढतो आणी उरलेल्या जमिनीवर ज्वारी आणी बाजरी समसमान काढतो. रब्बी हंगामात गहू आणि हरभरा समसमान काढतो. एकरी १० मण पिक निघतं. ज्वारी, बाजरी, गहू, भूईमून आणी हरभरा यावर शेराला २, २, ३, ४, १ आणे इतका फायदा सदूला होतो. तर त्याचं वार्षिक उत्त्पनं किती?

तर किती पाढे पाठ असलेल्यांना हे सांगता येईल? आणि तो नंबर वरती आलेल्या विद्यर्थ्यांच्या प्रयोगापेक्षा, तुलनात्मक दृष्ट्या, वेगळा असेल असे वाटत नाही.

तीच गोष्ट भाषा सौंदर्यासाठी संस्कृत वगैरे किंवा चिंतातूर जंतू दाखला देतात त्या सध्याच्या सभेत टाळ्या मिळवण्याकरता लक्षात ठेवलेली उद्धृतं यांची. किती टक्के लोक असं करायचे/करतात? पुर्वी ही सुसंस्कृतपणाची 'लक्झरी' थोडक्या लोकांनाच 'उपलब्ध' होती, हे तर सर्वांना माहित आहेच. आजही बहुसंख्य लोक हे सभेत टाळ्या वाजवणारे असतात. त्यामुळे अशा प्रयोगात तेव्हाही आणि आजही निष्कर्ष काही फारसा वेगळा येईल असता असे वाटत नाही.

आता आमचेच (सवंगडी हो, नाहीतर लगेच कोणीतरी मला निलयनराजे खोकले वगैरे म्हणायचा), आमच्या गल्लीत एक खाष्ट आज्जी बाई होत्या. फार धार्मिक पोहोचलेल्या असा त्यांच्या गवगवा होता, प्रवचनं वगैरे द्यायच्या. अगदी लहानपणापासून मला त्या भोंदूच वाटायच्या, पण गल्लीत त्यांचा दरारा होता. एका ठराविक वयानंतर गल्लीतली सगळी चिल्लीपिल्ली त्यांच्याकडे गीता वगैरे पाठांतराला जात असतं, घरच्यांच्या दबावाला तेव्हा बळी पडावं लागायचं हो (आजची पोरं नशिबवान!). आमच्यतल्या कित्येकांच्या तोंडी आख्खी गीता पाठ होती, पण म्हणून काही पुढे संस्कृत अभ्यासक्रमात आल्यावर आम्हाला हे कुठले एतद् चे रुप रे वगैरे सांगता आलं नाही ते नाहीच! (आता तर 'देव'ही विसरलो, पण ते सोडा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

>>त्या काळी संस्कृत भाषेच्या वा एकंदर भाषासौंदर्याच्या रसग्रहणासाठी श्लोक, ओव्या कविता, तोंडपाठ असणे सुसंकृतपणाचे लक्षण समजले जात असावे. त्यामुळे जुन्याकाळचा शिक्षित वर्ग आपल्या विद्यार्थीदशेत श्लोक, ओव्या, कविता गीतेतील अध्याय, शंकराचार्यरचित चर्पटपंजरी व इतर कृती, रामदास - ज्ञानेश्वर - तुकाराम यांच्या ओव्या (अर्थ कळो वा न कळो) मुखोद्गत करण्यात धन्यता मानत होता. वेळप्रसंगी चारचौघात त्या म्हटल्यामुळे सर्वसामान्यांकडून वाहवा मिळत असे.<<

माझ्या मते काही प्रमाणात आणि थोड्या वेगळ्या स्वरूपात आजही हे लागू होतं. वेगळं स्वरूप म्हणजे -
- संस्कृतशिवाय मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू आदि भाषाही यात समाविष्ट
- निव्वळ पद्य नाही, तर गद्यालाही प्रतिष्ठा
- निव्वळ पठण नाही, तर संभाषणात योग्य ठिकाणी चपखल उद्धृतं वापरता येण्याची क्षमता

आणि या बाबतीत असंही म्हणता येईल की ह्यासाठी गूगल आज तरी पुरं पडू शकत नाही. म्हणजे विशिष्ट वर्तुळात चाललेल्या संभाषणाच्या अनुषंगानं ग्रेस किंवा अरुण कोलटकर यांच्या एखाद्या कवितेचा किंवा आॅस्कर वाइल्डच्या एखाद्या हजरजबाबी उद्धृताचा चपखल संदर्भ तुम्हाला माहीत असेल आणि तुम्ही तो लगेच देऊ शकलात तर तुम्हाला वाहवा मिळेल. आयत्या वेळी गूगलवर सर्च करून ही वाहवा मिळणार नाही. (ग्रेस/कोलटकर हे इथे फक्त उदाहरणादाखल; वेगळ्या वर्तुळात विंदांची/कुसुमाग्रजांची कविता किंवा पु.लं.च्या लिखाणातला संदर्भ हे अशी वाहवा मिळवून देऊ शकतील).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0