अमेरिकेतील रोचक डोलांडफाईल्स पर्व आणि ममदानीच्या निमित्ताने
झोहरान ममदानी निवडून आल्यामुळे त्यामुळे इथल्या काही भांडवलशाहीप्रेमी लोकांना अतीव दुःख झालय. (त्यांना काय प्रॉब्लेम आहे कळत नाही. ममदानीने न्यूयॉर्क विकून टाकले तरी इकडे काय फरक पडणारे? इथे पुणे शहर विकून खाणे सुरु आहे त्याबद्दल निवांत आहेत लोक). पुण्यातले एक नवदेशभक्त फेसबुक विचारवंत आहेत त्यांनी तर ममदानीला जी रोमांचक विशेषणे बहाल केली आहेत ती वाचून कुतुहूल जागृत झाले की बुआ कोण आहे हा नरपुंगव ? ( मला एकदा एकाच वेळी 'कम्युनिष्ठ आणि इस्लामी जिहादीष्ठ' असे दोन्ही वगैरे असणारी लोकं बघायची आहेत)
खरडफळ्यावर मुद्दा मांडल्यावर न बा यांनी चांगला व दीर्घ प्रतिसाद दिला , त्यामुळे हा प्रश्न धाग्यात मांडला .( तिकडचा प्रतिसाद कुणीतरी इकडे चिकटवा रे )
त्याच बरोबर ख्रिस्तवासी एप्सटिन नावाच्या कुणा एका व्यक्तीच्या ट्रम्पतात्या फाईल्स उघड्या व्हायला कालपासून सुरुवात झाली आहे म्हणे. एकंदरीत अमेरिकेत रोचक पर्व सुरु आहे किंवा होणारे असं दिसतंय.
अमेरिकेतील कुणी भारतीय यावर जास्त माहिती इथे देतील काय ?
पहिलेपणाचा शाप
नेटफ्लिक्सवर 'मॅडम सेक्रेटरी' नावाची चीझी मालिका आहे. त्यातलं मुख्य पात्र सुरुवातीला अमेरिकेची सेक्रेटरी ऑफ स्टेट, परराष्ट्रमंत्री होते. मग पुढे ती राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडूनही येते. तेव्हा तिला बराच विरोध होतो, त्यानंतर तिला प्रश्न पडतो की, फक्त अमेरिकेची पहिली स्त्री राष्ट्राध्यक्ष एवढंच तिचं कर्तृत्व असेल का?
मालिका अमेरिकी असल्यामुळे तसं काही तिथे होत नाही.
ओबामाच्या निवडणुकीनंतर इलहान ओमर आणि अलेक्झांड्रिया ओकाझिओ कॉर्टेझ संसदेत निवडून आल्या. त्यांना किती काळ निवडणुका लढवता येतील यावर मर्यादा नाही. झोहरान ममदानीवरही अशी मर्यादा नाही.
न्यू यॉर्कच्या महापौराकडे तशीही फार सत्ता नसते. ममदानी काही कामही करेल, अशी मला आशा आहे. पण ते नाही जमलं तर किमान समाजमाध्यमं वापरून तरुण लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता तरी आहे. आणि त्याला सुरुवातीला होईल तो विरोध हळूहळू कमी होईल, अशी आशा करू.
ओबामांचा विषयच निघाला आहे तर…
ओबामांचा विषयच निघाला आहे तर...
Dreams from My Father (2004): A Story of Race and Inheritance.,
Obama, Barack (2008). The Audacity of Hope.
Obama, Barack (November 17, 2020). A Promised Land. New York:
ही ओबामांनीच लिहिलेली तिन्ही पुस्तके मी २०२० नोव्हेंबर डिसेंबरमध्ये वाचली होती. ( कोरोना निर्बंधात घरीच होतो आणि नेटवर काही शोधता शोधता सापडली होती.) त्यामुळे ओबामा विषयी बरेच काही कळले. नंतर त्यांच्या काही धोरणांवर आणि योजनांवर खूप टीकाही झाली आणि विरोध. त्यांच्याबद्दल दुसरे काय म्हणतात हे काही वाचले नाही.
इथे भारतात राहून अमेरिकेतील काय चाललं आहे हे समजण्याचा चांगला मार्ग म्हणजे तिकडचे पेपर्स किंवा पुस्तके वाचणे हा होय. ( आताच्या उपाध्यक्षाने लिहिलेले Hillibili Eligi सुद्धा वाचले.)
न्यूयॉर्कमध्ये नागरिक सुजाण आहेत आणि त्यांनी ममदानींच्या विचारांना लक्षात घेऊन आणि पूर्वग्रह न ठेवता निवडून दिले असेल तर चांगलीच गोष्ट आहे.
ऐसीवर चांगले चर्चा विषय लेख येत असतात.
सुलभीकरण
प्रतिसादाचा मुख्य मुद्दा लक्षात आला असला, आणि त्यात थोडेफार तथ्य असलं तरी हा दोष ओबामा(निवडून येण्या)चा आहे हे जरा (म्हणजे सहसा मराठी संस्थळावरील ममव काकालोक करतात इतकं वाईट नसलं तरीही) सुलभीकरण झालं.
नीट पाहीलं तर रिपब्लिकन पक्षाची ही भयानकतेकडील वाटचाल ओबामा अमेरिकन राजकारणाच्या मुख्यपटलावर येण्याच्या कित्येक वर्षं आधी सुरू झालेली आढळून येईल. रेगन व्हाईटहाऊन पासून डिक चेनी, रॉजर स्टोन, ली अॅटवॉटर, कार्ल रोव्ह, रॉजर एल्स वगैरे मंडळीनी व्यवस्थित बेत आखून या पक्षाला, आणि पक्षी देशाला, तिकडे ओढत नेलेलं आहे. (1, 2, 3 )
The Man Who Ran Washington- The Life and Times of James Baker या पुस्तकात रिपब्लिकन पक्षाची वाटचाल मध्यममार्गी नेत्यांपासून जहाल मतांच्या कार्यकत्या-नेत्यांकडे कशी सुरू झाली हे दिसून येतं.
ओबामांना काही करून देणार नाही वगैरे विरोधी पक्षाच्या खेळ्याही नविन नव्हत्या. न्यूट गिंग्रीच यांनी क्लिंटन यांच्या काळात कॉंग्रेसमध्ये "एक्स्ट्रीम विरोधाची" चालवलेली पॉलिसी कुप्रसिद्ध आहे. यावर अनेक लेख, पुस्तकं लिहली गेलेली आहेत. (4,5)
1. https://en.wikipedia.org/wiki/Southern_strategy
2. Gravely Ill, Atwater Offers Apology : https://www.nytimes.com/1991/01/13/us/gravely-ill-atwater-offers-apolog…
3. https://archive.org/details/foxeffecthowroge0000broc
4. https://books.google.com/books?id=dLalDwAAQBAJ
5. https://en.wikipedia.org/wiki/Newt_Gingrich#Role_in_political_polarizat…
???
नीट पाहीलं तर रिपब्लिकन पक्षाची ही भयानकतेकडील वाटचाल ओबामा अमेरिकन राजकारणाच्या मुख्यपटलावर येण्याच्या कित्येक वर्षं आधी सुरू झालेली आढळून येईल.
हे मी नक्की कधी नाकारले?
माझे विधान नीट पाहा:
म्हणजे, तोवर, रिपब्लिकन पक्षात वर्णवर्चस्वाची, झालेच तर ख्रिस्ती मूलतत्त्ववादाची, लक्षणे आहेत, अशी अंधुक कल्पना येण्यासारखी परिस्थिती तशी खूप अगोदरपासून होती. मात्र, ओबामा निवडून आल्यापासून they dropped all pretenses, कमरेला गुंडाळलेले सोडून देऊन ते डोक्याला बांधले नाही, तर (पुन्हा कधीही नको, म्हणून) दूर फेकून दिले, आणि went on to a full-blown Nazi mode.
(पॅट बुकॅननसारखे राजकारणी रिपब्लिकन पक्षात पूर्वीपासून होते. भले ते निवडून येत नसतीलही, परंतु, पक्षातील त्यांचे अस्तित्व किमानपक्षी चालवून तर नक्कीच घेतले जायचे. आणि, क्लिंटनलासुद्धा या लोकांनी कमी छळले, अशातला भाग नाही. म्हणजे, तुम्ही उल्लेख केलेला न्यूट गिंग्रिचच्या अडवणुकीचा प्रकार हा तर एक भाग झालाच. परंतु, ते मॉनिका ल्यूइन्स्की प्रकरणसुद्धा केवळ एक निमित्त होते. (अन्यथा, पुढे त्या जस्टिस कॅव्हानॉच्या कन्फर्मेशनच्या खेपेस या रिपब्लिकन राधासुतांचा धर्म नक्की कोठे केळी खावयास गेला होता, हा प्रश्न गैरवाजवी ठरू नये. परंतु, ते असो.)
तेव्हा, रिपब्लिकन पक्ष हा खूप पूर्वीपासून अस्साच होता, हा मुद्दाच नव्हे. किंबहुना, त्याबाबत दुमत असण्यासारखे काहीच नाही. मुद्दा हा आहे, की हे सगळे (पूर्वापार चालत आलेले) प्रकार कोठलेही अंजीरपान पुढे न ठेवता उघडउघडपणे — अधिक blatantly — जे होऊ लागले, त्याला ट्रिगर ओबामा नावाचा एक काळा माणूस अध्यक्षपदी निवडून आला, आणि ते रिपब्लिकनांना सहन होऊ शकले नाही, हा ठरला.
(ओबामांच्या कारकीर्दीत ठिकठिकाणी ओबामांच्या नावाने झाडांना लटकवलेले गळफास आठवताहेत? झालेच तर, रिपब्लिकनांच्या मेळाव्यांत, नेमबाजीची निशाणे म्हणून उभारलेली ओबामांची चित्रे? त्यापूर्वी रिपब्लिकन पक्षात वंशद्वेष नव्हता, अशातला भाग नाही. मात्र, इतके टोकाचे प्रकार निदान इतक्या उघडउघडपणे तरी होत नसत, आणि बहुधा (निदान इतक्या उघडउघडपणे तरी) चालवून घेतले गेले नसते.)
(किंबहुना, ओबामांपूर्वीसुद्धा कधी कोणी काळ्या माणसाने अध्यक्षपदाकरिता उभे राहण्याचा half-hearted का होईना, परंतु प्रयत्न केलाच नव्हता, अशातलाही भाग नाही. अध्यक्षपदाकरिता रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीकरिता होतकरू म्हणून जनरल कॉलिन पॉवेल या (एरवी कर्तबगार) काळ्या माणसाचे नाव त्यापूर्वी एके काळी रिंगणात होतेच. त्याला पद्धतशीरपणे दबाव आणून खाली बसविण्यात आले. आणि, महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तो खाली बसला. त्यामुळे, त्यानंतर त्याचा अधिक छळ झाला नाही. किंबहुना, त्यानंतर धाकटा बुश अध्यक्ष झाल्यानंतर त्याला परराष्ट्रमंत्री (सेक्रेटरी ऑफ स्टेट) बनवून त्याचा पद्धतशीर उपयोग सद्दामच्या तथाकथित अस्त्रसाठ्याबद्दल खोटी विधाने करून युद्धाच्या बाजूने हवा बनविण्यासाठी करण्यात आला. (आणि, त्याने तो करू दिला.) चालायचेच. मुद्दा हा आहे, की, हा काळा माणूस वेळीच खाली बसल्याने नि नंतर compliant बनल्याने ओबामांबरोबर झाले, तसले टोकाचे प्रकार त्याच्याबरोबर तेव्हा घडले नाहीत, आणि त्यानंतर रिपब्लिकन पक्ष unhinge व्हायला तेव्हाच सुरुवात झाली नाही, इतकेच. अन्यथा, the Republican Party always had the capability to become unhinged, या तुमच्या म्हणण्यात तसे तथ्य आहेच. मात्र, पुरेश्या ट्रिगरची आवश्यकता होती (आणि, ओबामांच्या निवडून येण्याने तो ट्रिगर पुरविला), एवढेच म्हणायचे आहे. असो.)
यावरून आठवले (अवांतर)
मला एकदा एकाच वेळी 'कम्युनिष्ठ आणि इस्लामी जिहादीष्ठ' असे दोन्ही वगैरे असणारी लोकं बघायची आहेत
यावरून आठवले. ओबामांना (त्यांच्या कारकीर्दीत) एकसमयावच्छेदेकरून ‘कम्युनिस्ट’ आणि ‘फॅसिस्ट’ म्हणून संबोधणाऱ्या (पांढऱ्या) व्यक्ती एके काळी माझ्या पाहण्यात होत्या.
यावरून, या दोन्हीं शिव्यांचा (अमेरिकन) इंग्रजी भाषेतील साधासुधा अर्थ ‘मला या व्यक्तीबद्दल पराकोटीचा तिटकारा आहे’ इतकाच होतो, हा बोध मी घेतलेला आहे. (एकदा मेरियम-वेब्स्टर तपासून पाहिली पाहिजे.)
असो चालायचेच.
बाकी…
…हिटलर आणि इस्राएल या दोन्हीं एंटिट्यांबद्दल एकसमयावच्छेदेकरून आदर, प्रेम वगैरे भावना बाळगणाऱ्या व्यक्तीच नव्हे, तर आख्ख्या संघटनाच्या संघटना जेथे असू शकतात, तेथे, एकसमयावच्छेदेकरून कम्युनिष्ठ आणि इस्लामी जिहादिष्ट असणाऱ्या मंडळींनीच तेवढे काय घोडे मारले आहे? त्यांनीच तेवढे का असू नये ब्वॉ? (त्यांच्याच अस्तित्वावर तेवढा का बरे घाला?)
(अवांतर- यहुदी लोकांनी…
(अवांतर- यहुदी लोकांनी वंशविद्वंसाला ( genocide)सहन केले , आता ते तेच करत आहेत/ होते ना हमासच्या हल्ल्याचा सूड म्हणून?)
ममदानी जर शहराच्या मुख्य प्रश्नांकडे लक्ष देऊन काम करेल अशी जी आशा वाटते आहे स्थानिक नागरिकांना तर उगाच इतरांना उगाच पोटदुखी का होते आहे?
फ्युच्युरामा
इथल्या कुणी 'फ्युच्युरामा' नावाची मालिका बघितली आहे का? त्यात निक्सनचा सढळ हस्ते हलकट व्हिलन असा वापर केला आहे. त्यातला झॅक ब्रॅनिगन अनेकदा वाईट वागतो, पण तो मूर्खही आहे. त्यामुळे त्याच्यावर व्हिलन असण्याचा आरोप करणं कठीण वाटतं. निक्सनच्या पात्राचं तसं नाही; ते शुद्ध हलकट आहे.
ते जे (आपले!) 'ते' आहेत, त्यांचं असं कधी होईल याची मी वाट बघत आहे.
आंधळ्या-पांगळ्याची गोष्ट
आज माझी मैत्रीण निना आणि मी भेटलो. तिनंच ममदानीचा विषय काढला. ती म्हणाली, ती मला निवडणुकचा निकाल लागल्यावर लगेच मेसेज करणार होती. पण नाही केला. Neither of us needs this kind of trouble, असं तिचं म्हणणं. ती ट्रान्स आहे. मी व्हिजावर.
मी तिला म्हणाले, पुढच्या वेळेस असा काहीसा मेजेस करता येईल. "मला खूप आनंद झालाय (किंवा दुःख झालंय). तुला विकेण्डला वेळ असेल तर भेटूच." मग प्रत्यक्ष भेटून काय ते बोलता येईल.
निना हौशीनं सिनेमे बघते. तिला 'मॉन्सून वेडिंग'ही बघायला सांगितला. दिवाळी अंकामुळे महमूद ममदानींच्या लेखनाशी किंचित परिचय झाला, हेही तिला सांगितलं. मग (अर्थातच) विषय झोहरान ममदानी हॉट आहे, याकडे वळला.
एपस्टीन फाईल्स रिलीज करण्यास अचानक
आजपर्यंत एपस्टीन फाईल्स रिलीज करण्यास विरोध होत होता. आता अचानक ट्रम्प यांनी स्वतः या फाईल्स रिलीज करण्याच्या बाजूने मतदान करण्यास सांगितले असे कळले.
ट्रम्प यांना पारदर्शकतेचे महत्व रात्रीतून कळले आहे का ?
महत्वाचे म्हणजे अमेरिकेत भ्रष्टाचाराचा स्तर कसा असतो म्हणे ? म्हणजे कोणते अडचणीचे तपशील झाकायचे याचा बंदोबस्त अगोदरच तर करून ठेवला नसेल ना आणि आता देखलो क्या देखना चाहते हो असे तर नाही ?
म्हणजे आपल्याकडे असे नक्की होऊ शकते याचा विश्वास आहे अमेरिकेत कसे असते कल्पना नाही तिथला जस्टिस डिपार्टमेंट पवित्र आहे का ?
…
तिथला जस्टिस डिपार्टमेंट पवित्र आहे का ?
(तुम्हाला बहुधा ‘न्यायव्यवस्था’ म्हणायचे असावे, असे गृहीत धरतो. म्हणजे, कोर्टे वगैरे. ‘जस्टिस डिपार्टमेंट’ (खरे तर अधिकृत नाव ‘डिपार्टमेंट ऑफ जस्टिस’ असे आहे.) या नामाभिधानाने ओळखला जाणारा प्रकार वेगळा आहे. त्यांचा न्यायव्यवस्थेशी संबंध येतो खरा, परंतु, ते म्हणजे न्यायव्यवस्था नव्हे. (डिपार्टमेंट ऑफ जस्टिस) हे अध्यक्षांच्या (तूर्तास ट्रंपच्या) हाताखालच्या कॅबिनेटमधील एक खाते आहे. (म्हणजे, परराष्ट्रखाते, संरक्षणखाते, ही जशी कॅबिनेटखाती असतात, तसे हे ‘न्यायखाते’.) त्याचा (अध्यक्षाने नेमलेला) प्रमुख म्हणजे ॲटर्नी जनरल. या खात्याचे प्रमुख काम म्हणजे केंद्रसरकारच्या वतीने लोकांवर खटले चालविणे. (थोडक्यात, केंद्रीय ‘सरकारी वकिलां’चे/‘प्रॉसेक्यूटरां’चे खाते म्हणा ना! परंतु, न्यायाधीश वगैरे यात येत नाहीत. किंबहुना, न्यायालये नि न्यायाधीश (थोडक्यात, ‘न्यायव्यवस्था’ अथवा judiciary) हे स्वतंत्र प्रकरण असून, ते अध्यक्षांच्या ‘हाताखाली’ वगैरे येत नसून, अध्यक्षांच्या ‘बरोबरीचे’ स्वतंत्र खाते आहे. Along with the legislative (Congress) and the executive (Presidency) branches, the judicial branch (the Supreme Court and the Federal Judiciary) is one of the three coequal branches of the US government.) (भारतातही माझ्या समजुतीप्रमाणे तत्त्वतः असाच काहीसा प्रकार आहे. (चूभूद्याघ्या.)) तर ते एक असो. सांगण्याचा मतलब, ‘जस्टिस डिपार्टमेंट’ वेगळे, आणि ‘न्यायव्यवस्था’ वेगळी.)
तर, (तुम्हाला ‘न्यायव्यवस्था’ म्हणायचे असावे, असे गृहीत धरून), तुमच्या (‘तिथली न्यायव्यवस्था पवित्र आहे का?’ या) प्रश्नास (प्रतिप्रश्नाने) उत्तर देण्याचा प्रयत्न: (निर्ढावलेल्या) रांडा व्हर्जिन असतात का?
महत्वाचे म्हणजे अमेरिकेत भ्रष्टाचाराचा स्तर कसा असतो म्हणे ?
कोणत्या पातळीबद्दल बोलताय, यावर अवलंबून आहे.
उच्च पातळीबद्दल (अध्यक्ष, संसद, झालेच तर राज्यांचे गव्हर्नर, वगैरे) जर बोलत असाल, तर, अमेरिकेत त्या पातळीवरील भ्रष्टाचार हा नेहमीच प्रचंड राहिला आहे, याबद्दल निदान अमेरिकेत तरी फारसे दुमत नसावे. (भारताशी तुलना करणे फारसे उचित ठरणार नाही. भारतीय राजकारणात मुळात तुलनेने तितका पैसा नसावा. म्हणजे, भ्रष्टाचाराचा इरादा भारतात तुलनेने कमी असतो, असा दावा करण्याचा मुळीच इरादा नाही — कोठेही जा, माणूस इकडूनतिकडून सारखाच! — परंतु, वाव? खायला मुळात पैसा असायला हवा ना?)
निम्न पातळीबद्दल (कोपऱ्यावरचा पोलीसमामा, वगैरे) म्हणत असाल, तर, त्या पातळीवर भ्रष्टाचार (असलाच, तर) नगण्य आहे, असे समजण्याची पूर्वापार प्रथा (भारतात तर सोडाच, परंतु, खुद्द अमेरिकेतसुद्धा) आहे. मात्र, गेल्या एकदीड दशकापासून त्याही समजुतीला हळूहळू तडा जाऊ लागला आहे.
But I must qualify my statement. उदाहरणादाखल, भारतात समजा तुम्ही जर लाल सिग्नल तोडलात, किंवा अंमळ जास्त वेगाने गाडी चालवलीत, नि मामाने जर तुम्हाला धरले. कायद्याप्रमाणे त्याने तुमच्या नावाने चलान फाडले पाहिजे, नि नंतर मग दिलेल्या तारखेला कोर्टात जाऊन तुम्ही तुमचे निर्दोषत्व तरी सिद्ध केले पाहिजेत, अन्यथा (त्या तारखेस किंवा तारखेअगोदर) कोर्टात रीतसर दंड भरला पाहिजेत. हे झाले कायद्यानुसार. ‘रीतिरिवाजा’नुसार/‘व्यवहारा’त अनेकदा काय घडते, की मामा तुम्हाला बाजूस नेतो, मग ‘वाटाघाटी’ वगैरे होतात, नि मग त्यात जे काही ठरते, त्याप्रमाणे (किंवा ‘चालू दरा’प्रमाणे) योग्य रंगाच्या नोटांचे हस्तांतरण वगैरे होते, नि मग चलान, कोर्ट वगैरे रीतसर विसरले जाते, नि तुम्ही जायला मोकळे होता.
अमेरिकेत या प्रकारचा भ्रष्टाचार होत नाही. अगदी आजमितीससुद्धा. याबाबत शंका घेण्यास आजही वाव नाही.
मात्र,
- मामाने कोणत्यातरी कारणास्तव (किंवा अगदी ‘रूटीन स्टॉप’साठीसुद्धा) तुम्हाला अडविले, नि त्याला तुमचा चेहरा किंवा कातडीचा रंग (किंवा तुमची तथाकथित ‘ॲटिट्यूड’) यांपैकी काही आवडले नाही, गोळ्या घालून झाला मोकळा, नि नंतर कोर्टात (म्हणजे, चौकशी झालीच, तर) तुम्हीच त्याच्यावर शस्त्र उगारलेत, असा (खोटानाटा) दावा करून सहीसलामत सुटला. (बरे, अमेरिकेत कोणाकडे कधी शस्त्र निघेल, याचा भरवसा नसल्याकारणाने, न्यायव्यवस्थेत अशा प्रकरणांत संशयाचा फायदा बाय डिफॉल्ट पोलिसास मिळण्याचा प्रघात आहे.)
- मामाने तुम्हाला अडविले, प्रथेनुसार आयडी (शक्य तोवर लायसन्स) मागितला, तो दाखविण्याकरिता पाकीट बाहेर काढण्यासाठी तुम्ही खिशात हात घातला, (त्याच्या अंतर्गत बायसमुळे) त्याला वाटले की तुम्ही बंदूक काढीत आहात, नि तात्काळ तुम्हाला गोळ्या घालून मोकळा झाला. (तुमच्या कातडीचा रंग पांढरा असेल, तर त्याचा अर्थ असा बायस तुमच्याप्रति लागू होणार नाही, असे मुळीच नाही. परंतु, तुमचा रंग इतर (आणि विशेषेकरून काळा) असल्यास तशी शक्यता खूपच अधिक. बाकी, ‘कोर्टात संशयाच्या फायद्या’च्या संदर्भात याअगोदरचा मुद्दा पाहावा.)
- वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेली घटना: कृष्णवर्णीय मनुष्य पेट्रोल भरण्यासाठी पंपावर थांबलेला आहे. पोलीस येतो, लायसन्स पाहावयास मागतो. मनुष्य गाडीत ठेवलेले पाकीट आणण्यासाठी गाडीचे फक्त दार उघडतो. पोलीस तात्काळ त्यावर गोळ्यांचा वर्षाव करू लागतो. याचे व्हिडियो रेकॉर्डिंग वगैरे प्रसिद्ध होते. (त्या पोलिसावर पुढे काही कारवाई होते की नाही, ते आठवत नाही; मात्र, कारवाईची भीती पोलिसांना वाटत नाही, ही बॉटमलाइन.)
- कोठल्यातरी घरात ड्रग डीलर्स वगैरे आहेत, याचा पोलिसांना सुगावा लागतो. पोलीस रीतसर न्यायालयाकडून अटकवॉरंट वगैरे मिळवितात, नि मग चुकीच्या पत्त्यावर जाऊन दार ठोठावतात, नि दार उघडणाऱ्या (अर्थात कृष्णवर्णीय, अजून कोण?) म्हाताऱ्या आजीस गोळ्या घालून मारून टाकतात. पेपरांतून थोडीफार बोंबाबोंब वगैरे होते, परंतु पुढे फारसे काही होत नाही.
हे असले प्रकार सर्रास जरी चालत नसले, तरी nowadays, they appear to happen too often for comfort. (हे पूर्वी होत नसेलच, असे नाही, परंतु, अलिकडे जरा अधिक उजेडात येऊ लागलेले आहे. त्याचबरोबर, त्यावर वृत्तांकन करणाऱ्या माध्यमांना ‘वोक मीडिया’ असे लेबल चिकटविण्याची प्रथाही बोकाळू लागली आहे.) बरे, पोलिसांनी सदैव bodycams वगैरे घालावेत, अशा प्रकारचे निर्बंध अशाच कारणांमुळे हल्ली प्रचलित होऊ लागलेले असले, तरी, हे bodycams बिघडलेले किंवा स्विचऑफ केलेले असण्याचे प्रकारही अनेकदा घडतात, नाही असे नाही.
भारतातल्या पोलिसी भ्रष्टाचारामुळे तुमचे नुकसान काही नोटा (चहापाण्यापुरत्या) गमावण्याइतपत होऊ शकते, याबद्दल कल्पना आहे. (अमेरिकेत तो धोका अजिबात नाही. अगदी आजसुद्धा.) मात्र, पोलिसी भ्रष्टाचारामुळे जीव गमावावा लागण्याची भीती भारतीय नागरिकांना सर्रास वाटते, किंवा कसे, याबद्दल काही भाष्य करण्यास मी असमर्थ असल्याकारणाने, तुलना करण्यास अपात्र आहे.
असो चालायचेच.
सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद
अशा सहज रीतीने कृष्णवर्णीय माणसे मारणे आणि कारवाई आवश्यक तेवढी कठोर न होणे असे होत असेल तर ही किती भयावह बाब आहे. माणसाच्या जिवाची किंमत इतकी कमी होऊ नये. फार अवघड आहे एकंदरीत परीस्थिती.
अमेरिकेत भ्रष्टाचार high places मध्ये केवळ असतो निन्म स्तरावर साधू संतांचा वावर असतो अशी बतावणी भारतात नेहमी केली जात असते हे खरे आहे.
सध्या भारतात तुमच्या माहितीसाठी गडकरी यांनी आधुनिकता आणलेली आहे. भारतातल्या अगदी छोटया शहरांमध्ये सुद्धा आता पोलिस मामा कडे special कॅमेरे दिलेले आहेत ज्याने ते डबल सीट नियम मोडला आदी चे फोटो काढतात गाडी नंबर चा सुद्धा. मग तो गुन्हा पुरावा फोटो तुम्हास सरकारच्या वेबसाइट वर दिसतो मेसेज वगैरे येतो आणि तुम्ही ऑनलाईन सुद्धा दंड भरू शकतात नाही भरला तर रक्कम वाढत जाते वगैरे पुढील कारवाया होतात. तसेच छोट्या शहरातही सिग्नल वर कॅमेरे बसविले आहेत जे सिग्नल तोडला वगैरे ची फोटो घेऊन कारवाई करतात. तसेच एक या कॅमेरा ला फोटो घेण्यास सोपे जावे आणि इतर कारणासाठी एक विशेष नंबर प्लेट लावणे कायद्याने कम्पल्सरी केलेले आहे. त्याची कंत्राटी दिलेले आहेत त्या सेंटर वर जाऊन तुमची नवीन नंबर प्लेट बदलवून घेणे बंधनकारक आहे नसल्यास मोठा दंड शिवाय नवीन नंबर प्लेट साठी पाच सहाशे खर्च आहे. नवीन शोरुम गाडी असेल तर ती डायरेक्ट नवीन नियमाप्रमाणे नंबर प्लेट लावुन बाहेर येते हे जुन्या ज्यांच्या आहे त्यांना लागू आहे. शिवाय fastag आदी आधुनिकीकरण आहेच
पूर्वीचा पोलिस मामा चिरीमिरीचा व्यवहार कमी झालेला आहे
चिरीमिरी
दंडाच्या रकमेत मोठी वाढ झालेली असल्यामुळे आता चिरीमिरी ऐवजी बरेच पैसे मोजावे लागतात. पुण्यात फक्त ३०% वाहनधारकांनी नवीन नंबर प्लेटस बसवुन घेतल्यात. सीसीटीव्ही वा कॅमेरे वा पोलिस फारच कमी चौकात असतात त्यामुळे, पादचार्याला रस्ता क्रॉस करताना कायम ३६० डिग्रीमध्ये मान फिरवत क्रॉस करावे लागते. थोडक्यांत, फारसा काही बदल जाणवत नाही.
…
दंडाच्या रकमेत मोठी वाढ झालेली असल्यामुळे आता चिरीमिरी ऐवजी बरेच पैसे मोजावे लागतात.
एक शंका: जेथे चिरीमिरी संस्कृती मुळातच बोकाळलेली आहे, अशा एखाद्या ठिकाणी, दंडाची रक्कम जितकी मोठी, तितकेच ते चिरीमिरीला अधिक मोठे incentive ठरू नये काय? त्याचबरोबर चिरीमिरीला प्रतिबंध करण्यासाठी तितकीच मजबूत अशी दुसरी काही यंत्रणा असल्याखेरीज? (अशी काही यंत्रणा आहे काय?)
की हे केवळ जनतेला बतावणी करण्यापुरते दिखाऊ measure आहे? टिपिकल उजव्या प्रशासनांत असते, तसले? (‘आम्ही गुन्हेगारीला/नियम तोडणाऱ्यांना अज्जिब्बात थारा देत नाही/कड्डक्क कारवाई करतो (नाहीतर ते काँग्रेसचे/न्हेरूंचे/लिब्रलांचे राज्य!)’ अशी उच्चरवात बतावणी करणे नि करत राहणे (आणि, ते जनतेला दाखविण्याकरिता मागचापुढचा काहीही विचार न करता तडकाफडकी काहीनाकाही/कैच्याकैच योजना राबवणे नि राबवीत राहणे) हे (जगातल्या सगळ्याच) उजव्यांमध्ये एक अतिशय लोकप्रिय असे तंत्र असते. जनतेतला/मतदारांमधला एक विशिष्ट वर्ग त्याला हमखास (आणि कायम) भुलतो. अशा योजनांचे दूरगामी परिणाम काय होतात (किंवा मुळात काही परिणाम होतात का), हे पाहायचे नसते. केवळ सदैव उदोउदो करणारी एखादी प्रचारयंत्रणा (आणि एखादा स्थायी भक्तगण) हाताशी असल्यास काम भागते. चालायचेच.)
पुण्यात फक्त ३०% वाहनधारकांनी नवीन नंबर प्लेटस बसवुन घेतल्यात.
हम्म्म्म्… पुण्यासारख्या शहरात ७०% वाहनधारकांवर कारवाई करणे हे साधारणतः रश अवरला मुंबईच्या लोकलमध्ये विनातिकीट प्रवासी पकडण्याइतकेच कठीण असणार, नाही?
(खरे तर, असू नये. कारवाई ही भर वाहतुकीतच केली पाहिजे, असा काही नियम नसावा. (भर वाहतुकीत केल्यास त्याची ऑप्टिक्स अधिक प्रभावी ठरतात/अधिक लोकांना ते दिसते, हा भाग वेगळा.) म्हणजे, पुण्यातल्या तमाम वाहनधारकांची नोंद आरटीओकडे (किंवा वाहनांचे रजिष्ट्रेशन करणारी जी कोठली यंत्रणा असेल, तिच्याकडे) असावीच. झालेच तर, नवीन नंबरप्लेट घेतल्याची नोंदही यंत्रणेत कोठेतरी होत असावीच. या दोन नोंदींची सांगड घालून, कोणी अद्याप नवीन नंबरप्लेट घेतलेली नाही, याचा पत्ता लावणे हे एखाद्या सरकारी बाबूला (अथवा बाबूगणाला) आपल्या खुर्चीवर (अथवा संगणकावर) बसल्याबसल्या अशक्य नसावे. अशा उल्लंघकांची यादी बनवून, त्यांना नोटिसा पाठविणे/दंड आकारणे/वाहननोंदणी रद्द करणे वगैरे कारवाया या निव्वळ टपालाने करणे हे तत्त्वतः अशक्य नसावे.
परंतु, भर वाहतुकीत कारवाई ही कितीही अकार्यक्षम जरी असली, तरीही, वर म्हटल्याप्रमाणे, त्यात ऑप्टिक्सचा फायदा मिळतो, गवगवा होतो. शिवाय, (आमचा एक कृष्णवर्णीय सहकर्मी नेहमी म्हणतो, त्याप्रमाणे) the cruelty is the point. असो.)
सीसीटीव्ही वा कॅमेरे वा पोलिस फारच कमी चौकात असतात
अं… सीसीटीव्ही वा कॅमेरे (वा पोलीस) हे प्रत्येक चौकात असण्याची अपेक्षा करणे म्हणजे, ‘अपघाताच्या ठिकाणी पोलीस का नसावा?’मधला प्रकार झाला नाही काय?
कॅमेऱ्यांना/सीसीटीव्हीला पैसे पडतात, म्हटले!
खुद्द आमच्या अमेरिकेत वाहतुकीकरिता इतक्या प्रमाणात सीसीटीव्ही/कॅमेरे नसतील! (आमच्या मेट्रो अटलांटात हे प्रमाण हजार चौकांपैकी (चुकून) एखाद्या चौकात इतके किंवा कदाचित त्याहूनही कित्येक पटींनी कमी जरी निघाले, तरी मला त्याबद्दल अजिबात आश्चर्य वाटणार नाही. अटलांटातील माझ्या आजवरच्या जवळजवळ तीस वर्षांच्या वास्तव्यात मला आख्ख्या मेट्रो अटलांटातल्या केवळ एका चौकातला वाहतूक कॅमेरा व्यक्तिशः ठाऊक आहे. असो.)
(शिवाय, जिकडेतिकडे सीसीटीव्ही/कॅमेऱ्यांचा सुळसुळाट जर होऊ लागला, तर police state/vigilante state/1984/टॅक्सपेयरच्या पैशांचा अपव्यय म्हणून तुम्हीच लोक बोंब मारणार नाही काय?)
थोडक्यांत, फारसा काही बदल जाणवत नाही.
मुळात, यातून काही बदल होईल (किंवा, त्याहीपेक्षा, यातून काही बदल होणे अपेक्षित आहे), असे तुम्ही समजलात, ही चूक तुमची नव्हे काय?
असो चालायचेच.
(अवांतर)
(‘आम्ही गुन्हेगारीला/नियम तोडणाऱ्यांना अज्जिब्बात थारा देत नाही/कड्डक्क कारवाई करतो (नाहीतर ते काँग्रेसचे/न्हेरूंचे/लिब्रलांचे राज्य!)’ अशी उच्चरवात बतावणी करणे नि करत राहणे
तरी बरे, भारतात अद्याप ‘खाजगी/नफ्याकरिता चालविलेले (फॉर प्रॉफिट) तुरुंग’ ही संकल्पना आलेली नाही. (निदान, तशी ती आल्याबद्दल मी ऐकलेले तरी नाही. (चूभूद्याघ्या.)) ती एकदा का आली, नि त्यांची कंत्राटे एकदा का अंबानींना नाहीतर अदानींना देऊन टाकली, की मग कोठे भारत अमेरिकेसारख्या ‘प्रगत’ राष्ट्रांच्या मांदियाळीत जाऊन बसेल. (तोवर नाही.)
(लक्षात ठेवा: The cruelty is the point. आणि, त्या crueltyवर कोणाला — शक्यतो, आपल्याच यारदोस्तांना — नफासुद्धा जर कमावता आला, तर मग सोन्याहूनही पिवळे. उजवेशाही भांडवलवाद झिंदाबाद.)
रेल्वे टिकिट चेकरांची…
रेल्वे टिकिट चेकरांची चिरिमिरी रेल्वेने बंद पाडली. त्यांना टार्गेट दिलेले असते आणि incentive /comission रेल्वेच देते. शिवाय आरक्षित डब्यात विना आरक्षण प्रवास २४ ऑगस्टपासून बंद पाडलाय .( ९५-९८%बंद. काही रेल्वेंत चालवून घेतात. उदाहरणार्थ मुंबई - पुणे गाड्यांत विद्यार्थी बरेच असतात तिकडे दुर्लक्ष करतात.)
ट्रंप किंवा ओबामा हे जर…
ट्रंप किंवा ओबामा हे जर बऱ्याच लोकांना येऊ नयेत असं वाटत असताना निवडून आले तर ममदानीचं काय एवढं मनावर घेऊन बसलेत.
( महाराष्ट्रात मुख्यमंत्री अंतुले झाले तेव्हा कित्येकांना सदमा का काय बसलेला होता. ...काॅन्ग्रेसचं भलं झालंच पण कित्येक लोकांचं त्यांनी भलं केलं होतं. वैयक्तिक लाभ. दिल्लीत जायचंय आणि राहाण्याचा प्रश्न? करा फोन साहेबांना. आखाती देशात नोकरी? साहेब आहेतच. नाटकं उभी करायचीत? साहेब आहेतच. असं इतरही मुख्यमंत्र्यांबाबत म्हणता आले तरी अंतुले जरा अधिकच पावरबाज होते.)
अं…
(ममदानीने तात्यांना) ‘खिशात टाकले’ वगैरेबद्दल ठाऊक नाही, परंतु, I can probably only say that he (as in, Mamdani) tried to make the best of a bad situation. (I mean, how else was he supposed to have behaved under the circumstances?)
(Analogy फारशी चांगली नाही, हे आगाऊ मान्य आहे, परंतु, शिवाजीमहाराजांनी आग्र्याला औरंगजेबास ‘खिशात टाकला’ वगैरे म्हणाल काय? (म्हणणारे म्हणतीलही, म्हणा, परंतु, प्रामाणिकपणे? (मी तरी नाही म्हणणार!)) All I can say is that Mamdani was probably luckier. (बोले तो, महाराजांच्या तुलनेत. Trump, on the other hand, was just being his usual, unpredictable, self.))
(बाकी, लोकांचे काय, लोगों का काम है कहना, त्यामुळे… चालायचेच.)
ममदानी वेष बदलून न्यूयॉर्कात…
ममदानी वेष बदलून न्यूयॉर्कात रात्री फिरतो का बातम्या काढायला?
( "शहरात रात्री वेष बदलून फिरणारा राजा कोण?" हे मी perplexity ला विचारलं तर नाव नाही सांगितलं पण अशा कथा असतात आणि त्यातून बोध मिळतो हे सांगितलं. चांगला राजा प्रजा काय म्हणते हे ऐकण्याचा प्रयत्न करतो.)
.
( "शहरात रात्री वेष बदलून फिरणारा राजा कोण?" हे मी perplexity ला विचारलं तर नाव नाही सांगितलं पण अशा कथा असतात आणि त्यातून बोध मिळतो हे सांगितलं. चांगला राजा प्रजा काय म्हणते हे ऐकण्याचा प्रयत्न करतो.)
हारून अल-रशीद.
(झालेच तर, तुम्ही नुकताच ज़िक्र केलेल्या श्री. अ. र. अंतुले या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनीसुद्धा असा स्टंट एकदा केल्याचे आठवते. म्हणजे झाले कसे, की अंतुलेसाहेब मुख्यमंत्री असतानाच्या काळात एका रात्री ते मुंबईच्या रेड लाइट एरियात (वेषांतर करून) गेले. तेथे नेमके एका पत्रकाराने त्यांना पाहिले नि ओळखले. (पत्रकार तेथे नक्की कशासाठी उलथला होता, असे प्रश्न विचारायचे नसतात.) लगेच मग ‘तेथील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तेथे मी वेषांतर करून गेलो होतो; तेथे जे काही पाहायला मिळाले, त्याने मला धक्का बसला’ अशी उच्चरवात बतावणी केलीनीत्. दुसऱ्या दिवशी सकाळीसकाळी पेपरांतून मोठ्या आकाराच्या ठळक टाइपातल्या हेडलाइनी होत्या, असे आठवते.)
बरोबर. पण ते हारून अल-रशीद…
बरोबर. पण ते हारून अल-रशीद नाव perplexity शोधून देतो का आणि त्याला मराठी समजते का हे तपासण्याचा प्रयत्न होता. अंतुले यांच्यानंतर आणखी एका मंत्र्याने असा फेरफटका मारण्याचा प्रयत्न केला होता ऐकून आहे.
( अवांतर : perplexity ने हल्लीच गूगलला ऑफर दिली होती की 'तुमचा क्रोम ब्राऊझर विकत घेऊ'-बातमी. त्यामुळे उत्सुकता वाढली होती.)
Mixed feelings
ममदानी जिंकल्याबद्दल मला mixed feelings आहेत.
म्हणजे, एकीकडे ते जिंकल्याचा आनंद तर निश्चित आहे. (माणूस भला दिसतो. प्रामाणिक वाटतो. ताज्या दमाचा आहे. कल्पना चांगल्या आहेत. वगैरे वगैरे.) परंतु, अमेरिकेत गेल्या सोळासतरा वर्षांपासून जो राजकीय माहौल चालू आहे, तो पाहता, त्यांचा ओबामा केला जाईल — आणि, he may have already been set up for failure (or worse) — अशी दुसरीकडे भीती वाटते.
ओबामा निवडून आले, तेव्हासुद्धा अशीच आशा वाटली होती. (ओबामा हादेखील असाच भला, प्रामाणिक, (तेव्हा) ताज्या दमाचा, चांगल्या कल्पना असलेला वगैरे माणूस.) But, for no fault of his, he turned out to be an utter failure. कारण, एक काळा माणूस व्हाइट हाउसमध्ये (आमच्या व्हाइट हाउसमध्ये) जाण्याची जुर्रत करू शकतो, या कल्पनेने रिपब्लिकन इतके बिथरले, इतके पिसाळले, की ‘ओबामांना आम्ही one-term President करू’ अशी जाहीर प्रतिज्ञा करून बसले. म्हणजे, तोवर, रिपब्लिकन पक्षात वर्णवर्चस्वाची, झालेच तर ख्रिस्ती मूलतत्त्ववादाची, लक्षणे आहेत, अशी अंधुक कल्पना येण्यासारखी परिस्थिती तशी खूप अगोदरपासून होती. मात्र, ओबामा निवडून आल्यापासून they dropped all pretenses, कमरेला गुंडाळलेले सोडून देऊन ते डोक्याला बांधले नाही, तर (पुन्हा कधीही नको, म्हणून) दूर फेकून दिले, आणि went on to a full-blown Nazi mode. (तेव्हापासूनच्या रिपब्लिकन राजकारण्यांच्या एकाहून एक पिसाळलेल्या वक्तव्यांकडे पाहिले असता हे सहज लक्षात येईल. आणि, don’t get me wrong… पिसाळलेल्या राजकारण्यांना रिपब्लिकन पक्षात नेहमीच जागा होती. परंतु, they used to be kept well under wraps. ओबामांच्या निवडणुकीनंतर they simply started crawling out of the (rotten) woodwork.)
त्यानंतर मग या रिपब्लिकनांनी ओबामांना छळ-छळ-छळले. पदोपदी त्यांच्या मार्गात धोंडे आणून घातले. ‘ओबामांचा जन्म आफ्रिकेतला आहे, म्हणजे ते natural-born American नाहीत, आणि म्हणून घटनेनुसार अध्यक्षपदास पात्र नाहीत’ असे (खोटेनाटे) आरोपच काय केले, त्यावर ओबामांनी आपला अधिकृत जन्मदाखला जाहीर करून (ज्यायोगे त्यांचा जन्म हवाई बेटांत — म्हणजे अमेरिकन भूमीत — झालेला आहे, हे सिद्ध होत होते) त्याचे खंडन केले असता, त्या दाखल्याच्या खरेपणावर शंकाच काय घेतल्या, झालेच तर, त्या जन्मदाखल्याच्या अधिकृतपणाबद्दल ‘तपास करण्यासाठी’ म्हणून हवाईला पथकेच काय पाठवली, एकंदर, येनकेन प्रकारेण distractions निर्माण केली, अडथळे निर्माण केले. झालेच तर, जस्टिस स्कलिया गचकल्यानंतर सुप्रीम कोर्टावर जे रिक्तपद निर्माण झाले, ते भरून काढण्यासाठी ओबामांनी रीतसर आपला उमेदवार पुढे केला असता, “अध्यक्षपदाच्या शेवटच्या वर्षात अध्यक्षाने सुप्रीम कोर्टावर नेमणुका करू नयेत; तो अधिकार पुढील अध्यक्षपदीय निवडणुकीत नव्याने लोकनिर्वाचित होणाऱ्या अध्यक्षाचा असावा”, असे (कोठेही अस्तित्वात नसलेले) “नीतितत्त्व” अक्षरशः ढुंगणातून उपसून काढून पुढे केले, आणि ओबामा अध्यक्ष असेपर्यंत त्या उमेदवाराच्या साध्या सुनावणीससुद्धा नकार दिला. (पुढे ट्रंप अध्यक्ष असताना जस्टिस जिन्सबर्ग वारल्यानंतर मात्र, “नीतितत्त्व” रीतसर फिरवून, ट्रंपची कारकीर्द संपण्यास जेमतेम काही महिने उरलेले असताना, किंबहुना, पुढील अध्यक्षपदीय निवडणूक होऊन तिची मतमोजणी सुरू अस्तानासुद्धा, ट्रंपने पुढे केलेल्या उमेदवाराची झटपट सुनावणी घेऊन तिला कायमसुद्धा करण्यात आले. चालायचेच.)
एकंदरीत, ओबामा निवडून आले खरे — किंबहुना, रिपब्लिकनांच्या नाकावर टिच्चून पुढे दुसऱ्यांदासुद्धा निवडून आले — परंतु, आपल्या आठ वर्षांच्या कारकीर्दीत, फारसे काही काम करू शकले नाहीत. त्यांना काम करू दिले गेले नाही. त्यांच्या मार्गात पदोपदी नाही नाही ते अडथळे आणले गेले.
Obama contested — and was elected — on a campaign promise of Change. Well, he brought Change, all right — an unwelcome, undesirable change in the Republican Party.
अमेरिकन राजकारण गढूळ होण्यास ट्रंप आल्यापासून सुरुवात झाली, असा एक सार्वत्रिक समज आहे. तो चुकीचा आहे. अमेरिकेचे राजकारण पराकोटीचे गढूळ होण्यास सुरुवात जी झाली, ती ओबामा सर्वप्रथम जेव्हा निवडून आले, तेव्हापासून. ट्रंपची राजकारणात सरशी ही केवळ त्या गढूळ झालेल्या राजकारणाची अंतिम परिणती होती — यह तो होना ही था। As I always like to say: Trump is not the disease, but merely a symptom of the disease.
आणि, या सगळ्यात ओबामांचे पाप इतकेच होते, की, ते (१) कृष्णवर्णीय होते, आणि (२) (कृष्णवर्णीय असूनसुद्धा) (अध्यक्षपदाच्या) निवडणुकीसाठी उभे राहिले, आणि (३) (कृष्णवर्णीय असूनसुद्धा) (अध्यक्ष म्हणून) निवडून आले.
बाकी, मूळ विषयावर येता, ममदानींच्या पापांची गणती मी ती काय करावी? ते:
(१) मुस्सलमान आहेत (चेक),
(२) ब्राउन कातडीचे आहेत (चेक),
(३) इमिग्रंट आहेत (पक्षी: त्यांचा जन्म अमेरिकेत झालेला नाही; झालेच तर, ते (तथा त्यांचे आईवडील) हे “बाहेरून” आलेले आहेत (भले आजमितीस अनेक वर्षांपासून ते अमेरिकन नागरिक असले, तरीही)) (चेक),
(४) ‘इस्राएल’ नामक एका विशेष परराष्ट्राचा त्यांनी उदोउदो केलेला नाही (भले ते केवळ न्यूयॉर्कच्या महापौरपदासाठी उभे राहिलेले असोत — येरुशलेममधील अमेरिकन वकील अथवा अमेरिकन परराष्ट्रमंत्री या पदासाठी नव्हे (ही दोन्ही पदे अध्यक्षनियुक्त असून, त्या पदांवर नेमल्या जाणाऱ्या व्यक्ती या लोकनियुक्त प्रतिनिधी नसतात — किंबहुना, त्या लोकनियुक्त प्रतिनिधी असणे हे घटनेनुसार निषिद्ध आहे — ही बाब अलाहिदा) — आणि, त्या दृष्टीने, या गोष्टीमुळे वन वे ऑर द अदर काहीही फरक पडत नसो) (चेक),
(५) (एवढे सगळे असूनसुद्धा) त्यांनी न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीस उभे राहण्याचे धाडस केलेले आहे (चेक), आणि
(६) (इतकेच नव्हे, तर, एवढे सगळे असूनसुद्धा) ते न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवडून आलेले आहेत (चेक).
बास काय राव, इतकी पापे पुरे नाहीत झाली का?
त्यामुळे, I sincerely hope that he is successful, but am afraid that that is not to be. ममदानींचा ओबामा केला जाईल, ही भीती वाटते.
असो चालायचेच. पाहू यात काय काय होत जाते ते.