Skip to main content

साबर बोंडं - नवा मराठी सिनेमा

मराठी सिनेमाची सद्यःस्थिती अतिशय गंभीर आहे असं म्हटलं तर बरेच लोक त्याच्याशी सहमत होतील. मात्र ती वाईट असण्याचं कारण विचारलं तर प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असू शकतं. उदाहरणार्थ मराठी चित्रपट व्यवसायाशी संबंधित लोक तक्रार करतात की आम्ही खूप मेहनत करून सिनेमे बनवतो पण त्यांना निर्माता मिळत नाही, वितरक मिळत नाही, थेटर मिळत नाही, मग आम्ही जावं तरी कुठे! याउलट प्रेक्षकांना विचारलं तर ते म्हणतात की आम्हाला आवडेल अशी फिल्म काही येत नाही. किंवा, आली तरी ओटीटीवर येईपर्यंत आम्ही वाट बघतो, मग घरी आरामात बघतो. 

 

याउलट एखादी नवी फिल्म येणार असेल तर असंही दिसतं की त्याच्याशी संबंधित कलाकार, त्यांच्या ओळखीतले लोक आणि त्यांच्या मर्जीतले समीक्षक आणि सोशल मीडिया वापरणारे किती तरी लोक (जे स्वतःला चित्रपटाचे जाणकार वगैरे समजतात) अशी अनेक माणसं असं काही बोलू लागतात की जणू काही आता एक ऑस्कर दर्जाचा चित्रपटच येत आहे, आणि तो पाहिला नाहीत तर तुम्ही काहीतरी पाप करताय. याला भुललेले लोक जेव्हा प्रत्यक्षात चित्रपट पाहतात तेव्हा त्यांना कळतं की हा अगदीच भुक्कड आहे, आपले पैसे आणि वेळ वाया गेला, आणि मग लोक काय वाटेल ते बोलत सुटतात. 

 

अशा परिस्थितीत कोणत्याही मराठी चित्रपटाला जा असं सांगायची सोय उरलेली नाही. तरीही एका चित्रपटाबद्दल दोन चांगले शब्द बोलायचं धार्ष्ट्य करत आहे. 

Sabar Bonda still

‘साबर बोंडं’ या नावाचा हा चित्रपट रोहन कानवडे यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यांनी याआधी काही शॉर्ट फिल्म्स केल्या होत्या, पण पूर्ण लांबीचा हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. ‘साबर बोंडं’ला २०२५च्या सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्यूरी पुरस्कार मिळाला. एका मराठी चित्रपटाला एखाद्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात असा सन्मान मिळणं ही कौतुकास्पद गोष्ट आहे. त्यामुळे तेव्हा त्याविषयी आपल्या माध्यमांत त्याविषयी बातम्याही आल्या होत्या. आता १९ सप्टेंबरपासून हा भारतात प्रदर्शित होत आहे.

 

कथा तशी अगदी साधी आहे. आनंद नावाचा तरुण मुंबईत एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करत असतो. काही वर्षं आजारी असलेल्या त्याच्या वडिलांच्या मृत्यूपासून चित्रपट सुरू होतो. वडिलांचं पार्थिव घेऊन तो आईसह संगमनेरजवळच्या आपल्या गावी येतो. आता सुतकाचे सगळे दिवस करूनच परत जा असा गावाकडच्या लोकांचा आग्रह होतो आणि त्याला अनेक वर्षांनंतर पुन्हा आपल्या गावी येऊन राहायची वेळ येते. ह्या दिवसांची ही कथा. त्यात नाट्यमयता नाही, काळजाला हात घालणारे पल्लेदार संवाद नाहीत, गाणी नाहीत, किंवा मराठी सिनेमाला लागतो तसा बाकी कसलाही मसाला नाही. त्यातली मराठीही स्थानिक लहेजा असलेली आहे, म्हणजे पुण्या-मुंबईच्या मराठी प्रेक्षकांना कदाचित सबटायटल्स वाचायला लागतील. चित्रपटात लहानथोर सेलेब्रिटी कलाकारांची मांदियाळीही नाही, आणि त्यातले कलाकार दिसायला अजिबात चकचकीत चिकनेचोपडे नाहीत. थोडक्यात, हा काही १०० कोटींचा व्यवसाय करणारा सिनेमा नाही. 

 

मग तो का बघावा? कथा पुढे सरकते तसं लक्षात येतं की आनंद आणि गावी राहिलेला बाळ्या हा त्याचा लहानपणीपासूनचा सवंगडी ह्या दोन जिवांची ही एक साधीशी प्रेमकथा आहे. आनंद शिकून मुंबईला गेला आणि बाळ्या गावीच शेळ्या चरत वडिलोपार्जित शेती सांभाळत राहिला. अनेक वर्षं त्यांचा काही संपर्कही नाही. पण त्यांच्या मनात एकमेकांविषयी काही भावना अजून शिल्लक आहेत. घरच्यांचा लग्नाचा आग्रह दोघांनीही आपापल्या पद्धतीने बाजूला सारला आहे. आता वडिलांच्या मृत्यूच्या निमित्ताने गावी दोघांची पुन्हा भेट होते तेव्हा त्यांच्यात काय घडतं, एवढाच कथेचा जीव आहे. साबर बोंडं म्हणजे निवडुंगाच्या एका प्रजातीला येणारी काटेरी फळं. राठ केस आणि दाढी वाढलेले हे दोघं दिसायला तसेच आहेत. दुष्काळप्रवण गावातलं वास्तवही तसं नयनरम्य वगैरे नाही. निवडुंगाची ही फळं आतून एकदम रसरशीत गोड असतात. हे दोघं बाहेरून तसे वाटत तर नाहीत, पण आतून तसे आहेत का? आणि दोघांच्या परस्परांविषयीच्या भावनांना काही भविष्य आहे का? ह्याची उत्तरं कथेत शोधली आहेत. 

Sabar Bonda still

 

नागराज मंजुळे, विक्रमादित्य मोटवाने, जिम सर्भ, सई ताम्हणकर अशा चित्रपट व्यावसायिकांची ही सहनिर्मिती आहे. राणा दग्गुबातीच्या वितरण कंपनीने त्याच्या वितरणाची जबाबदारी घेतली आहे. नुकत्याच निधन पावलेल्या रॉबर्ट रेडफर्डने अ-व्यावसायिक चित्रपटांसाठी सनडान्स फिल्म फेस्टिव्हलची स्थापना केली होती. त्यात पुरस्कार मिळालेला आणि एनएफडीसीच्या मराठी सिनेनिर्मिती प्रकल्पातून तयार झालेला हा चित्रपट व्यावसायिक नाही हे स्पष्ट आहे. नेहमीपेक्षा वेगळा पण नेटका केलेला सकस मराठी सिनेमा पाहावासा वाटला तर तो जरूर पाहा. (ट्रेलर इथे पाहता येईल - SABAR BONDA (Cactus Pears) | Official Trailer | Suraaj S, Bhushan M, Jayshri J | Rohan Kanawade. रोहन कानवडे दिग्दर्शित एक शॉर्ट फिल्म इथे पाहता येईल. Khidkee | 2017 | Full Marathi Short Film by Rohan Parashuram Kanawade)

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 28/09/2025 - 02:29

गेल्या वर्षी 'ऑल वी इमॅजिन ॲज लाईट' इथे थिएटरांमध्ये लागला होता. अजून तरी साबर बोंडं दिसलेला नाही; पण आता कदाचित येईलही.