नेमेचि येतो ऑस्कर सोहळा (भाग ३)

(मागील भाग इथे.)


The Boy and the Heron (2023)

हॉलिवूड स्वतःतच मग्न असतं असा आरोप अनेकदा केला जातो आणि त्यात निश्चित तथ्य आहे. जगभरात खूप वेगळे सिनेमे होत राहतात, पण हॉलिवूडला त्यांची दखल घ्यावीशी वाटत नाही. गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती थोडी बदलली आहे. उदा. कोरियन ‘पॅरासाइट’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं ऑस्कर मिळणं हा एक महत्त्वाचा टप्पा होता. या वर्षीही नामांकनांत आणि पुरस्कारांत अमेरिकेबाहेरच्या चित्रपटांची किंचित हजेरी होती. त्यांपैकी ‘२० डेज इन मारियूपोल’चा परिचय मागच्या भागात करून दिला होता. सर्वोत्कृष्ट ॲनिमेशनपटाचा पुरस्कार ‘द बॉय अँड द हेरॉन’ या जपानी चित्रपटाला मिळाला. याचा दिग्दर्शक हायाओ मियाझाकी गेली अनेक वर्षं डिस्नी-पिक्सारपेक्षा खूप वेगळं ॲनिमेशन आपल्या स्टुडिओ घिबलीतर्फे सादर करतो आहे. यापूर्वी त्याच्या ‘स्पिरिटेड अवे’लाही ऑस्कर मिळालं होतं. २०१३ साली त्यानं निवृत्ती जाहीर केली होती. २०१४ साली मियाझाकीला ऑनररी ऑस्करही मिळालं होतं. पण तो परत आला आणि त्यानं ‘द बॉय अँड द हेरॉन’ची निर्मिती केली. वयाच्या ८३व्या वर्षी ऑस्कर मिळवून तो हा पुरस्कार मिळवणारा सर्वात वयोवृद्ध दिग्दर्शक ठरला. ही काही त्याची सर्वोत्तम फिल्म ठरणार नसली तरीही हॉलिवूडच्या ॲनिमेशन फिल्म्सपेक्षा खूपच देखणी आहे आणि गोडमिट्ट नाही. दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांच्या बाँबहल्ल्यात झालेल्या आईच्या मृत्यूनंतरच्या वास्तवाला सामोरं जाणाऱ्या एका १२ वर्षांच्या मुलाबद्दलची ही फँटसी आहे. कथेचं सूत्र काहीसं आत्मचरित्रात्मक आहे. युद्धात होरपळणाऱ्या लहान मुलाची मातृवियोगाची वेदना हा विषय अर्थात गंभीर आहे. अमेरिकन प्रेक्षकांना आवडेल अशी सरळसोट, ठोकळेबाज सुस्पष्ट गोष्ट सांगण्यापेक्षा इथे संदिग्धता आहे. लवकरच हा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित व्हावा अशी अपेक्षा आहे. ट्रेलर इथे.

(जर मियाझाकीचं काहीच पाहिलं नसेल तर नेटफ्लिक्सवर ‘स्टुडिओ घिबली’च्या ‘स्पिरिटेड अवे,’ ‘माय नेबर टोटोरो,’ ‘हाउल्ज मूव्हिंग कासल,’ आणि इतर फिल्म्स तोवर पाहता येतील.)


Anatomy of a Fall (2023)

‘ॲनाटॉमी ऑफ अ फॉल’ ही एक फ्रेंच फिल्म आहे. तिच्या केंद्रस्थानी एक मृत्यू आहे. पती-पत्नी आणि त्यांचा मुलगा (आणि एक कुत्रा) फ्रेंच आल्प्समधल्या एका गावात राहात असताना घराच्या वरच्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू होतो. काही कारणांनी पोलीस तपासात संशयाची सुई पत्नीकडे वळते. मग एक उत्कंठावर्धक कोर्टरूम ड्रामा उभा राहतो. गुन्ह्याची तपासकथा किंवा कोर्टरूम ड्रामा ह्या चौकटीत वरवर पाहता बसणारे पण त्या चौकटीबाहेरचे काही सिनेमे हल्ली फ्रेंचमध्ये होतायत (उदा. सेंट ओमर, नाईट ऑफ द ट्वेल्फ्थ, गोल्डमन केस). हाही तसा आहे. पत्नी एक यशस्वी लेखिका आहे, तर पती अयशस्वी. ती जर्मन आहे, तर पती फ्रेंच. ती गुन्हेकथा लिहिते, त्यामुळे परफेक्ट मर्डर कसा करावा ह्याचे धडे गिरवतच जणू ती यशस्वी झाली आहे. पती-पत्नीच्या नात्यात काही तणाव आहे. कोर्टात त्याविषयी जे पुरावे सादर केले जातात त्यातून त्या नात्याची उलटतपासणी होते. पत्नीनं पतीचा खून केला असावा असा संशय घ्यायला खचितच वाव आहे, पण विवाहात दोन जोडीदारांमध्ये नक्की काय काय होत होतं हे ठरवणं तिऱ्हाइताला कठीणच जाणार ह्याचा प्रत्यय इथे येतो. दिग्दर्शिका ज्यूस्तीन त्रिए आणि तिचा खऱ्या आयुष्यातला जोडीदार आर्थर हरारी यांनी मिळून पटकथा लिहिली आहे. कदाचित त्यामुळे त्यातल्या पती-पत्नीमधला तणाव एकच बाजू जोरकसपणे न मांडता अधिक दमदारपणे चित्रित झाला आहे. कान चित्रपट महोत्सवातला सर्वोच्च पुरस्कार ‘ॲनाटॉमी...’ला होता. सँड्रा ह्यूलर ह्या जर्मन अभिनेत्रीनं पत्नीची भूमिका कमालीच्या ताकदीनं वठवली आहे. ऑस्करच्या स्पर्धेत जरी एमा स्टोननं बाजी मारली असली तरी सँड्रा ह्यूलरचा अभिनय किती तरी पट अधिक सरस आहे. चित्रपटाला पाच महत्त्वाची नामांकनं होती (सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, संकलन, अभिनय, पटकथा), पण केवळ पटकथेच्या एकमेव ऑस्करवर त्याची बोळवण झाली. भारतात हा प्रदर्शित होऊन गेला. ट्रेलर इथे.


Zone of Interest (2023)

‘झोन ऑफ इंटरेस्ट’ ब्रिटिश-पोलिश सहनिर्मिती आहे. प्रख्यात ब्रिटिश लेखक मार्टिन एमिसच्या कादंबरीवर ती आधारित आहे. ती दुसऱ्या महायुद्धादरम्यान आऊशविट्झच्या कॉन्संट्रेशन कँपमध्ये घडते. किंबहुना, खरं तर कँपशेजारी. आऊशविट्झमधला एक जर्मन अधिकारी कँपशेजारी आपल्या बायको-मुलांसह राहात असतो. (पत्नीची भूमिका पुन्हा सँड्रा ह्यूलरनं वठवली आहे.) यातली गंमत अशी की गोष्ट ह्या कुटुंबाची आहे, त्यामुळे आपल्याला आऊशविट्झच्या आत काय चाललंय ते प्रत्यक्ष दिसत नाही, पण घर कँपशेजारीच असल्यामुळे तिथले आवाज, वास आणि इतर गोष्टी इथे पोचत राहतात. फिल्मचं ध्वनिसंयोजन त्यासाठीच घडवलेलं आहे. (त्यासाठी चित्रपटाला ऑस्कर मिळालं.) गोळ्या झाडल्याचे आवाज, ओरडा, इतकंच काय, प्रेतं जाळणाऱ्या भट्ट्यांचे आवाजही ह्या शेजारच्या आवारात पोचत आहेत. भट्टीच्या ज्वाळा आणि धूर आपल्याला दिसतात. कधी कधी इतरही गोष्टी पोचतात. उदा. एकदा तो अधिकारी आपल्या मुलांसोबत जवळच्या नदीत/ओढ्यात डुंबत असताना तिथे पाण्यात त्याला मानवी राख सापडते. मग काय, मुलांना लागलीच घरी नेऊन चोळचोळून ‘साफ’ केलं जातं. या सर्वातून हळूहळू हे स्पष्ट होऊ लागतं की ही गोष्ट त्या कुटुंबाच्या दैनंदिन आयुष्याची आहे. शेजारी गॅस चेंबरमध्ये माणसं मारली जातायत, त्यांची प्रेतं जाळली जातायत आणि इथे एक आदर्श जर्मन कुटुंब एक सुखी, ‘नॉर्मल’ आयुष्य व्यतीत करतं आहे – त्यांच्या बागेत गुलाब फुलतायत; त्यांची मुलं त्या आवारात खेळतायत. हाना आरेंडनं ज्याला ‘बनालिटी ऑफ ईव्हिल’ म्हटलं होतं ते इथे समोर दिसत राहतं. त्यामुळे चित्रपट आणखी अंगावर येतो. आपल्याला छळछावणीतले कैदी दिसत नाहीत, तर ते जर्मन कुटुंब दिसत राहतं, म्हणजे नकळत आपण त्यांच्यात गुंततो. ते कुटुंब तसं पाहता एक साधं मध्यमवर्गीय कुटुंब आहे. शेजारच्या आवारात घडणाऱ्या गोष्टींबद्दल ते फारसा विचार करत नाहीयेत. नवऱ्याला बढतीत रस आहे, पण बढतीमुळे त्याची बदली होणार असते तेव्हा आपण इतकं छान ठेवलेलं घर आणि बाग वगैरे आता सोडून जावं लागेल का, ह्याची काळजी बायकोला पडते. स्वतः दिग्दर्शक जोनादन ग्लेझर ज्यू आहे (चित्रपटाचे निर्मातेही ज्यू असावेत). चित्रपटाला जेव्हा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचं ऑस्कर मिळालं तेव्हा ग्लेझरनं आपल्या भाषणात इस्राएलवर टीका केली आणि चित्रपटाचं समकालीनत्व अधोरेखित केलं :

We stand here as men who refute their Jewishness and the Holocaust being hijacked by an occupation which has led to conflict for so many innocent people, whether the victims of 7 October in Israel or the ongoing attack on Gaza.

चित्रपट आपल्याकडे प्रदर्शित होऊन गेला. ट्रेलर इथे.


All of us Strangers (2023)

दर वर्षी काही चित्रपटांना नामांकन मिळेल अशी जोरदार अटकळ असूनही ते काही मिळत नाही. अशांतला ह्या वर्षीचा एक प्रमुख चित्रपट म्हणजे ‘ऑल ऑफ अस स्ट्रेंजर्स’. ही एक ब्रिटिश फिल्म आहे. लंडनमध्ये राहणारा ॲडम लेखक आहे. त्याच्या बाराव्या वर्षी एका कार अपघातात त्याचे आईवडील मेले आहेत. त्यांच्याविषयी कादंबरी लिहिण्याचा तो प्रयत्न करतोय. त्यासाठी मदत व्हावी म्हणून तो आपल्या लहानपणीच्या घराला भेट देतो. तिथे त्याला त्याचे आईवडील (गेले त्याच वयातले) भेटतात आणि तो त्यांच्याशी संवाद साधू लागतो. ॲडम समलैंगिक आहे आणि त्याच्याच इमारतीत राहणाऱ्या हॅरीला त्याच्यात रस आहे. ॲडम एकाकी आहे आणि हॅरीही. हळूहळू त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित होतात आणि जवळीकही. पण मग काही तरी भलतंच होऊ लागतं... ॲडमच्या भूमिकेसाठी ॲन्ड्र्यू स्कॉटचं खूप कौतुक झालं. ‘पास्ट लाईव्ह्ज’प्रमाणे ही फिल्मदेखील तरल अनुभव देते. त्यातला मध्यमवयीन पुरुषाचा एकाकीपणा आणि बालपणच्या आघाताला सामोरं जाण्याचा प्रयत्न परिणामकारक आहे. चित्रपटाला अनेक नामांकनं आणि पुरस्कार मिळाले. ‘पुअर थिंग्ज’प्रमाणे सर्चलाईट पिक्चर्सची ह्यावरही भिस्त होती, पण चित्रपट एकही ऑस्कर नामांकन मिळवू शकला नाही. भारतात हा प्रदर्शित होऊन गेला. आता डिस्नीनं त्याचे हक्क घेतले आहेत असं समजतं, त्यामुळे हॉटस्टारवर तो लवकरच उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा. ट्रेलर इथे.


Killers of the Flower Moon (2023)

दर वर्षी काही चित्रपटांना नामांकन मिळतं आणि काही पुरस्कार मिळतील अशी अटकळ असते, पण त्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात. त्यांपैकी ह्या वर्षीचा सर्वात महत्त्वाचा चित्रपट म्हणजे मार्टिन स्कॉरसीसीचा ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’. जमिनीत सापडलेल्या तेलामुळे श्रीमंत झालेल्या मूलनिवासी अमेरिकनांच्या पैशासाठी गोऱ्यांनी हत्या केल्या. अखेर एफबीआयला हस्तक्षेप करावा लागला. सत्यघटनेवर आधारित या कथानकाच्या पायावर एक भयावह प्रेमकहाणी रचून स्कॉरसीसी फिल्मला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. हिचकॉक आणि चॅप्लिनसारख्या काही लोकांवर ऑस्करनं नेहमीच अन्याय केला. स्कॉरसीसीची परिस्थिती त्याहून बरी म्हणायची, पण किंचितच. ऑस्कर नामांकन मिळालं, पण पुरस्कार काही मिळाला नाही, हे त्याच्या आयुष्यात अनेकदा घडलं. अमेरिकेतलाच नव्हे, तर जागतिक सिनेमातल्या सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्कॉरसीसीला आयुष्यात एकदाच ऑस्कर मिळालं, आणि तेदेखील त्याच्या कारकिर्दीत खूप उशिरा. या वर्षी त्यानं एक दणकट महाकाव्य निर्माण केलं. विशेषतः लिओनार्डो डिकाप्रिओ आणि लिली ग्लॅडस्टोनला त्यातल्या अभिनयासाठी पुरस्कार मिळतील अशी अनेकांची अटकळ होती, पण डिकाप्रिओला नामांकनही मिळालं नाही, तर ग्लॅडस्टोनला पुरस्कार लाभला नाही. संगीत, छायांकन, संकलन अशा सर्व बाजूंनी दमदार असलेला हा चित्रपट आवर्जून पाहण्यासारखा आहे. तो आपल्याकडे थिएटरमध्येही प्रदर्शित झाला, आणि आता ॲपल टीव्हीवर उपलब्ध आहे. ट्रेलर इथे.

तसे दर वर्षी अनेक चांगले चित्रपट होत असतात, पण २०२३ गेल्या काही वर्षांत सिनेमासाठी खूपच चांगलं वर्ष गेलं. युनिव्हर्सल (ओपनहायमरचे निर्माते), किंवा सर्चलाईट ह्यांच्या लॉबिंगला यश मिळालं, तर वॉर्नर ब्रदर्सची ‘बार्बी’ अपयशी ठरली. नेटफ्लिक्स, ॲपल वगैरेंना अजूनही या खेळातल्या जुन्या मुरलेल्या खेळाडूंइतकं यश मिळताना दिसत नाही. ॲकॅडमीच्या सदस्यांना कदाचित स्ट्रीमिंगविषयी थोडा आकसही असावा की काय, अशी शंका त्यामुळे येत राहते. अर्थात, ऑस्कर मिळणं न मिळणं हा काही दर्जाचा अखेरचा किंवा एकमेव निकष होऊ शकत नाही, त्यामुळे तुलनेनं कमी चर्चेत राहिलेले पण आवर्जून पाहावेत अशा काही चित्रपटांची ही थोडक्यात ओळख. जमतील तसे पाहा आणि आवडले तर इतरांनाही शिफारस करा.

(समाप्त)

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अँड्र्यू स्कॉट अभिनेता म्हणून आवडतोच.

'ॲनाटोमी ऑफ फॉल' आता अमेरिकेत 'हुलू'वर आला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

‘ॲनाटॉमी ऑफ अ फॉल’ आता प्राईम व्हिडिओवर उपलब्ध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चित्रपट आवडला. त्याचे पार्श्वसंगीत अप्रतिम आहे. कथानक पण बांधून ठेवणारे आहे. बर्फातले शॅले (लाकडाचे घर) पारंपारिक असावे. फ्रेंच कोर्टरूम्स यापूर्वी पाहिली नव्हती. वकिली पेहराव, वातावरण यांचा थोडाफार अंदाज आला. पण न्यायाधिशाच्यापाठी कसले चित्र आहे ते कळले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0