The Black Sheep - इतालो काल्व्हिनोच्या कथेचं स्वैर भाषांतर

The Black Sheep
- इतालो काल्व्हिनोच्या कथेचं स्वैर भाषांतर
एका देशात सगळेच चोर असतात. एकजात सगळे. दर रात्री, कंदील आणि पहार घेऊन सगळे घरातून बाहेर पडणार, आणि कुणाच्या ना कुणाच्या घरी दरोडा घालणार. लूट घेऊन पहाटे घरी परत आल्यावर त्यांचंही घर कुणीतरी फोडलेलं सापडणार.
अशा तऱ्हेनं सगळे गुण्यागोविंदानं, आनंदात राहत असतात. कुणाचंही फार वाईट चाललेलं नव्हतं. पहिला दुसऱ्याच्या घरी चोरी करणार, दुसरा तिसऱ्याच्या घरी, तिसरा चौथ्याच्या, आणि असं करत करत, शेवटचा पहिल्याच्या घरी. ह्या देशात, व्यवसाय म्हणजे घपला, खरेदी करायची असो वा विक्री. सरकार म्हणजे सुद्धा गुंडांची टोळी होती. त्यांचं काम होतं लोकांना लुटायचं. आणि लोकही सरकारला गंडवण्यात चिकार वेळ घालवत असत. एकंदरच सगळ्यांची आयुष्यं बिनघोर सुरू होती. देशातले सगळे लोक ना श्रीमंत होते, ना गरीब.
मग एके दिवशी, कुठून, कसा काय माहीत, एक प्रामाणिक माणूस आला. रात्री पहार-कंदील-थैली घेऊन लोकांच्या घरी चोरी करण्याजागी तो घरीच तंगड्या वर करून कादंबरी वाचत राहिला. जेव्हा चोर त्याच्या घरी आले, घरातला दिवा सुरू होता हे बघून चोरी न करताच मागे फिरले.
हे सौख्य फार काळ टिकलं नाही. प्रामाणिक माणसाला सांगण्यात आलं की त्याला चोरी करायची नसेल तर ठीक आहे, पण लोकांना त्यांच्या कामापासून दूर ठेवण्याचा त्याला काही हक्क नाही. तो घरी राहिला की एक कुटुंब उपाशी राहतं.
प्रामाणिक माणसाकडे स्वतःचा बचाव करण्यासाठी काही मुद्दाच नव्हता. म्हणून तोही रात्र पडली की घराबाहेर पडायचा आणि पहाटे परत यायचा. पण चोरी करणं काही त्याला जमेना. बाकीचे काही का असेनात, तो प्रामाणिक होता. नदीवरच्या पुलापर्यंत जायचं आणि वाहत्या पाण्याकडे बघत राहायचं एवढंच काम तो करायचा. पहाटे फटफटलं की तो घरी जायचा, तिथे दरोडा पडलेला असायचा.
आठवड्याच्या आत प्रामाणिक माणसाकडचा पैसा संपला. त्याच्या घरात काही खाण्यासारखंही उरलं नाही. त्याचं घर चोरांनी धुवून काढलं होतं. पण दोष त्याचाच होता. त्याचा प्रामाणिकपणा हीच पाचर होती. त्यामुळे सगळी व्यवस्था डळमळीत झाली होती. तो लोकांना त्याचं घर फोडू द्यायचा, पण तो कुणाचं घर साफ करायचा नाही. त्यामुळे नेहमी कुणाचं तरी घर भरलेलं राहायचं आणि ह्याचं घर फोडलं जायचं. ज्यांच्या घरी ह्यानं चोरी करणं अपेक्षित होतं तिथे चोरी होत नव्हती. मग ते लोक हळूहळू गब्बर व्हायला लागले. पुढेपुढे त्यांना कामच नको व्हायला लागलं. जे प्रामाणिक माणसाच्या घरी चोरीसाठी येत होते, ते गरीब व्हायला लागले.
मग जे लोक श्रीमंत व्हायला लागले होते त्यांनाही नदीकिनारी, ह्या प्रामाणिक माणसाबरोबर येण्याची सवय लागली. तेही पुलाखालून पाणी वाहताना बघायला लागले. जास्त लोकांनी चोरी थांबवल्यामुळे आणखी जास्त लोक श्रीमंत व्हायला लागले आणि जास्त लोक गरीबही व्हायला लागले.
आता श्रीमंत लोकांना लक्षात आलं की तेही नदीकिनारी पडून राहायला लागले तर ते परत गरीब होतील. मग त्यांच्या डोक्यात आलं, “लोकांना पैसे देऊन आपल्यासाठी चोरी करायला सांगितली तर कसं राहील?” त्याची कंत्राटं वगैरे बनवली, पगार, बोनस वगैरेंच्या चर्चा झाल्या. (त्यातही दोन्ही बाजूंनी घोटाळेबाजी झालीच. अर्थातच तो देश चोरांचा होता.) तरीही श्रीमंत लोक आणखी श्रीमंत झाले आणि गरिबांची गरिबी वाढली.
काही लोक तर एवढे श्रीमंत झाले की स्वतः चोरी करायची किंवा चोरण्यासाठी माणसं ठेवण्याची गरजही राहिली नाही. पण त्यांनी पूर्णपणे चोरी थांबवली तर ते पुन्हा गरीब होऊ शकतात, हे त्यांच्या लक्षात आलं. गरीब लोक नक्कीच त्यांची घरं फोडतील. म्हणून त्यांनी गरिबांतल्या गरीब लोकांना चौकीदार बनवलं. म्हणजे थोडे गरीब लोक त्यांची घरं फोडणार नाहीत. अशा तऱ्हेनं पोलिसदल तयार झालं आणि तुरुंग वगैरे निर्माण झाले.
तर हे असं झालं. प्रामाणिक माणूस आला काय, आणि काही वर्षांत कोणीच चोरी करत नव्हतं आणि चोऱ्या करण्याबद्दल बोलतही नव्हतं. कोण किती गरीब आहे, आणि श्रीमंत आहे ह्याबद्दलच लोक बोलायला लागले. तरी त्यांच्यात चिकार चोर होतेच.
तिथे फक्त एकच प्रामाणिक माणूस होता. तो उपाशीपोटी मेला.
---
इतालो काल्व्हिनोच्या कथेचं स्वैर भाषांतर. मूळ कथा इथे
आताही तसंच असावं.
गॉडफादरमधलं इटली आणि आताच इटली यात काही फरक नाही हे एक दोन महिन्यांपूर्वी कुठेतरी वाचलं होतं.
तिथे समांतर सत्ता चालवण्याची चळवळ अजूनही आहे म्हणतात.