एका भारतीय नागरिकाचे मनोगत

एका भारतीय नागरिकाचे मनोगत...

मी एक भारतीय आहे. फक्त आणि फक्त भारतीय. आज मला फक्त भारतीय म्हणून व्यक्त व्हायचंय. सांप्रत काळात उगाचच आघात करणारे काही विचार/कुविचार आगंतुकपण आदळत आहेत. पुर्वी ज्यांच्यावर विश्वास होता तोही आता डळमळीत झालाय. खऱ्याखुऱ्या माहितीचा स्रोत नक्की कोणता हाच यक्षप्रश्न उभा ठाकलाय. कोण कीती खरं बोलतोय आणि कोणी किती पाण्यात आहे हे मला चांगलंच कळतंय. अनेक वर्षांपासून इंग्रजांनी आपल्याला गुलाम बनवून आपल्यावर राज्य केले आणि आपल्या देशाची समृद्धी संपवली. जाता जाता भारताची फाळणी केली. त्यानंतर लोकशाहीचा स्वीकारून संघराज्य पद्धत आस्तित्वात आणली. एवढा सोपा सहज समजणारा गेल्या दिड दोनशे वर्षांचा इतिहास मला ठाउक आहे. मी वर्तमानपत्र सोडून काहीही वाचत नाही. हल्ली ते व्हॉट्सऍप वरचं वाचायचा एक नाद लागलाय. पण त्यात पण राम नाही राहिला. मी अभ्यासक वगैरे तर मुळीच नाही. माझा अभ्यासाचा संबंध केवळ परिक्षेपुरताच शाळेमध्ये. कॉलेजात काय गेलो नाही. मँट्रिक होता होता हातभर फाटली होती. आर्ट, सायन्स कॉमर्स वगैरे स्कॉलर लोकांचे चोचले. मी चाळीस टक्क्यावाला आयटीआय करून लेबर कॉट्रँक्टरच्या हाताखाली काम करायला सुरुवात केली. एवढीच ती काय माझी सध्याची ओळख. सहा जणांच्या कुटुंबकबिला कसाबसा सांभाळतोय. लिहिण्यास कारण की फारच अपेक्षाभंग झालाय सरकारकडून आणि विरोधकांकडून पण! उगाचच जातपातधर्माचे प्रश्न प्रखर केले जातायत. भूतकाळात कोणी काय चुका केल्या हे सांगण्यात वर्तमानकाळ खर्च होतोय. सध्याच्या गदारोळात माझी भूमिका नेमकी काय? विचार काय? याचा उहापोह करण्यासाठी हे मनोगत.
देशात घडलेल्या चांगल्या, वाईट किंवा विकृत अशा कोणत्याही घटनांसंबंधी जो माणूस रँशनल पद्धतीने अभिव्यक्त होतो तोच खरा भारतीय. सार्वभौम भारतीय नागरिक कोणत्याही घटनेकडे माणूस म्हणून पाहतो. कोणत्याही धर्माच्या चष्म्यातून तो पाहत नाही.
खरा लोकशाही मानणारा नागरिक हा सुशिक्षित असतो आणि सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करणारा असतो. मग माझा व्यवस्थेवरचा राग कसा व्यक्त करु?
जर केला तर तो व्यवस्थेवर असेल की विद्यमान सरकार वा पुर्वाश्रमीच्या सरकारांवर का नेभळट विरोधकांवर? मुळात आताची सगळीच मंडळी कोणीतरी ठरवून दिल्याप्रमाणे बोलत आहेत. सव्वाशे कोटींच्या लोकसंख्येच्या देशाला सांभाळणे काही येरागबाळ्याचे काम नाय काय? सध्याच्या काळात काही ठिकाणी हत्या झाली की त्याचा जात, धर्म वगैरे पाहून निषेध करणारी गँग नव्याने उदयास आलेली आहे. याचा सर्वाधिक उपयोग सरकार समर्थक ध्रुवीकरण करण्यासाठी करतात. सोयीनुसार निषेध करणारे उघडे पडतात. सध्याच्या राजकारणात व्यक्तीस्तोमाचा जो बडजाव सुरु झालाय त्याला विरोधकांसोबत सरकार समर्थक जबाबदार आहेत. कोणावरही वाट्टेल ते आरोप करायचे यात व्यक्ती , संस्था सरसकट सगळेच आले. कोर्टात जाउन केस टाकली आणि निकाल जर आपल्या मनाप्रमाणे नाही आला तर न्यायव्यवस्था विकली गेल्याच्या बोंबा मारायच्या आणि मनासारखा निकाल आला रे आला त्याच न्यायव्यवस्थेचे गोडवे गायचे असा सगळा माहौल तयार केला आहे जाणूनबुजून. धर्माचा वापर सरकारने जेवढा केला नसेल त्यापेक्षा विरोधकांनी करून येनकेनप्रकारेण सरकारला ध्रुवीकरणासाठी मदतच केलीय. लोकांच्या रोजच्या जगण्याचे प्रश्न वाऱ्यावर सोडून सगळा देश भरकटला आहे. मध्यमवर्गीय माणूस जास्तीत जास्त रोजच्या गरजा भागवण्यासाठी मरमर करतो , दारिद्रयरेषेखालील लोकांना काय तर गेली कित्येक वर्षे तसेच राहून दिले मतपेढी तयार करण्यासाठी. श्रीमंत वर्गातील लोक नेहमीप्रमाणे जगत असतात सरकार कोणाचेपण येवो त्यांच्या दैनंदिन उलाढाली राजरोसपणे चालूच असतात. व्हॉटअबाउटिझम नावाचा ट्रेंड सध्या धमाल चालूय सगळ्यांकडूनच. कायमस्वरूपी बंदोबस्त करता येउ शकेल अशा गरजा म्हणजे वीज, रस्ते, पाणी आणि शेतीविषयक योजना याविषयीचे ज्वलंत प्रश्न वर्षानुवर्षे भिजत ठेउन कित्येकांची पिढीजात दुकानदारी चालूच आहे. टक्केवारी, ठेकेदार, कंत्राटे आणि जाहिर निधी यावर एक समांतर कर्मदरिद्री साखळी सदैव कार्यरत आहे जे सरकार आणि विरोधकांना वेळोवेळी योग्य तो अर्थपुरवठा करत असतो. सध्याची माध्यमं आणि कुंटणखाना हा एक सारखेच आहे. ज्याचा भाव चांगला तो आपला. असा सगळा विचारकृत गोंधळ चालूय. काही नवोदित पक्ष, राजकारणी, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर विश्वास ठेवला होता ही मंडळी काहीतरी करतीलच म्हणून ती तर सरसकट बोली लावून विकली गेलीएत. त्यामुळे आता कोणावर विश्वास ठेवावा तेच कळेनासे झालेय. दारुण, भीषण, दयनीय आणि वेदनादायक आहे हे सगळं. कलुषित झालंय. संविधानावर देश चालतो तो कोणत्या धर्मग्रंथानुसार नाही चालत हे एवढंपण लोकांना कळत नाही. मात्र देशात काही घटकांना आपापल्या धर्माची काळजी. देश गेला बाराच्या भावात अशी मानसिकता सरसकट धर्मवेड्या लोकांची आहे. या विश्वातील चराचर सत्य आहे जो धर्मग्रंथाला कवटाळून बसतो तो दुसऱ्याच्या भल्यासाठी कधीच विचार करू शकत नाही. इथे प्रत्येकाला स्वतःच्या सोयीनुसार देश चालवायला पाहिजे. सरकारच्या कोणत्याही निर्णयामुळे माझी दुकानदारीबंद झाली तर सरकार वाईट. माझं मस्त चालूय तोपर्यंत सरकार चांगलं अशी सगळ्यांचीच मानसिकता आहे. कोणी हुकुमशाही येईल म्हणून भीती दाखवतोय तर कोणी आपला धर्म संकटात आहे म्हणून भीती दाखवतोय. कृषीप्रधान देश म्हणून जगात मिरवायचं आणि कमकुवत शेतकऱ्यांच्या जमीनी लाटून स्वतःचे उद्योग, संस्था, कारखाने उभे करायचे असा एक धूर्त राजकारणी लोकांचा कुटुंबकल्लोळ या देशात दिवसाढवळ्या चालूय. सरकार कोणाचेही येउदेत फक्त दोनवेळची जेवणं देशातील जनतेला सुरक्षितपणे मिळावीत हीच माफक अपेक्षा आहे.
-----------------
भूषण वर्धेकर
हडपसर
२१ मे २०१९
-----------------

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

धोधो धबधबा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0