विवेकी विचार करण्यास प्रवृत्त करणारे पुस्तक
अविचारी, अविवेकी व हिंसक प्रवृत्ती बळावत असलेल्या या काळात कुणीतरी विचार करण्याच आग्रह धरतात व त्याविषयी पदरमोड करून पुस्तकही लिहितात, हे आश्चर्यजनक गोष्ट ठरत आहे. कारण भोवतालचे वातावरण इतके कलुषित झालेले आहे की आपला समाज राजकीय, सामाजिक, धार्मिक, जातीय, प्रश्नाबद्दल सारासार विवेकी विचार करण्याची क्षमताच हरवून बसला आहे की काय अशी दाट शंका येते. सामाजिक उन्मादाच्या प्रसंगी सारासार विचार न करता वेळ मारून नेणे व आपली राजकीय आकांक्षांचे घोडे पुढे दामटणे हाच अजेंडा सत्ताधारी वा त्यांचे विरोधक राबवत आहेत असे अलीकडील घटनावरून स्पष्ट होते. धर्म व राजकारण यांचे बेमालूम मिश्रण होत असताना पुरोगामी हतबल होत आहेत, अशी स्थिती आता आहे. रूढी-परंपरांचे उदात्तीकरण करून मताचे ध्रृवीकरण होत आहे हे माहित असूनसुद्धा समाजाला योग्य मार्गावर आणणे दुरापास्त ठरत आहे. त्याचप्रमाणे आपल्या दैनंदिन व्यवहारातसुद्धा अनेक गोष्टी अशा आहेत की त्यांचाही विचार करणे अगत्याचे ठरत आहे. रूढी परंपरानाच (आपली महान) संस्कृती म्हणून कवटाळणारे अजूनही मध्ययुगात असल्यासारखे वावरत आहेत.
त्यामुळे “असाही विचार करायला काय हरकत आहे...” या पुस्तकाचे लेखक डॉ. नितिन शिंदे यांनी आपल्या रूढी परंपरेतील दोष दाखवत संस्कृतीच्या रक्षकांना व वाचकांना “सरसकट रूढी परंपरांना बळी पडू नका, वाचा आणि विचार करा” असा सल्ला देत आहेत. अधिक मासातील जावयाला देत असलेले अधिकवाण, राष्ट्रपातळीवर साजरा होत असलेले कुंभमेळ्यासारखे सण-उत्सव, पत्रिकेत मंगळ आहे म्हणून ज्योतिषांची होत असलेली चंगळ, खोट्या वास्तुशास्त्राला बळी पडलेल्यांची दुर्दशा, धार्मिक उपवासांचे उदात्तीकरण, कन्यागत महापर्वामागील अतार्किक विचार, कालसर्पयोगाची दहशत, विज्ञानालाच वेठीस धरणारे देवकण, इत्यादी अनेक गोष्टीवर भाष्य केलेले डॉ नितिन शिंदे यांचे हे पुस्तक वाचताना आपल्या मनातील जळमट दूर होऊ लागतात व स्वच्छ दृष्टीने आपल्या धार्मिक व्यवहाराकडे बघण्यास भाग पाडतात.
पुस्तकाच्या सुरुवातीला “मानवाने जिज्ञासा आणि कुतूहल यांच्या माध्यमातून चिकित्सेला सुरुवात केली. निसर्गाचे नियम समजाऊन घेतले आणि निसर्गाला कवेत आणण्याचा प्रयत्न केला. रानटी आणि अप्रगत अवस्थेतील मानवाने आजचे जे आधुनिक प्राप्त केले आहे, ते केवळ चिकित्सेच्या जोरावर असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मानवाने स्वःप्रयत्नाने प्राप्त केलेला अत्यंत उपयुक्त असा मानवी स्वभावाचा पैलू म्हणून चिकित्सेकडे पाहता येईल.” अशी आपली भूमिका लेखक मांडत आहेत. कदाचित याच कुतूहलापायी आपल्या तथाकथित संस्कृतीतील रूढी-प्रथाविषयी विचार करत असताना त्यातील फोलपणा, अतार्किक विचार, शोषणास वाव, विज्ञानविरोधी तर्क या गोष्टी त्यांना तीव्रतेने जाणवले असतील म्हणून लेख लिहिले गेले असतील. या पुस्तकातील एकूण एक लेख कर्मकांडांची, रूढी-परंपरांची, गैरसमजुतींची, सत्याचा विपर्यास करणाऱ्यांची चिकित्सा करत मिथके काय आहेत, नेमके तथ्य काय आहे, त्यामागील विज्ञान काय आहे, हे समजाऊन सांगत आहेत.
आपल्या समाजातील अत्यंत आंधळेपणाने पाळत असलेल्या काही रूढी-परंपरांची चिकित्सा करत असताना लेखकाला त्यामागे एका प्रकारचा धार्मिक दहशतवाद दिसतो. अमुक अमुक विधी न केल्यास बरबाद होऊन जाऊ ही भीतीच मानगुटीवर बसलेली असल्यामुळे त्या भीतीपायी कुठलाही विचार न करता मुकाट्याने धार्मिक दलालांच्यापुढे मान तुकवली जात असावे. भारतीय समाजावर असलेला धार्मिकतेचा प्रचंड पगडा त्यांना आर्थिकदृष्ट्या कंगाल करत आहे एवढेच नव्हे तर या गोष्टींचा गर्वही केला जात आहे याची खंत लेखकाला वाटते. लेखकाच्या मते अधिकवाण हा प्रकार सर्व कुटुंबाला कर्जबाजारी बनवणारा आहे. ज्याला जावयाबद्दल अतीव प्रेम वाटतं त्यानी खुशाल सोनं द्यावं आणि ज्याला घ्यावसं वाटतं त्यानी ते अवश्य घ्यावं. परंतु धार्मिकतेच्या दहशतीखाली कंगाल होऊ नये. असे लेखकाला मनोमन वाटते.
कुंभमेळ्यासंबंधीची आख्यायिका वाचत असताना कल्पनेची भरारी कुठपर्यंत भरकटत जाऊ शकते, हे लक्षात येते. थोडेसे तर्क वापरल्यास अशा गोष्टीतील फोलपणा लक्षात येतो. परंतु उत्सवी वातावरणाची कैफ चढलेली असताना विचार करण्यासही वेळ नसतो; कृती करण्यासही वेळ नसतो. कदाचित विचार करण्याची कुवतच नाही असे विषादपूर्वक म्हणावे लागेल.
इस्रो या भारतीय संस्थेने मंगळ ग्रहावर पाठवलेल्या मंगळयानाचा लेखाजोखा पाहिल्यानंतर पत्रिकेतील मंगळाचा प्रभाव एव्हाना ओसरून जायला हवा होता. परंतु तसे काही झाले नाही याची प्रचीती गावागावातील लाखोंनी कमवत असलेल्या ज्योतिषांच्या धंद्यावरून येऊ शकते. बाबा-बुवा, मांत्रिक-तांत्रिक, नवसाला पावणारा (लालबागचा) राजा, दैववाद, कर्मकांड इत्यादीमध्ये सदैव गुंतलेल्या व तर्कविचार हरवलेल्या या समाजाला निदान आपल्या पुढच्या पिढीला तरी वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याची गरज आहे हेसुद्धा लक्षात येत नाही. धार्मिक व्यवहार हे आर्थिक फायदा करून घेण्यासाठी टपलेल्या समाजकंटकांचा कुटील डाव आहे, हे ध्यानीमनीही नसल्यासारखे समाजाची वर्तणूक असते. खरे पाहता याची चिकित्सा करण्यासाठी फार डोके लढवण्याचीसुद्धा गरज नाही. मंगळ हा ग्रह आहे, पृथ्वीसारखे येथेही सूर्याचा प्रकाश मिळतो, ती प्रकाश किरणं तिथून परावर्तित होऊन पृथ्वीवर येतात, इत्यादी गोष्टी अगदी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनासुद्धा माहित असते. परंतु बुद्धी गहाण ठेवलेली असल्यास लग्न जुळवताना मुलगा वा मुलीच्या पत्रिकेत मंगळ तर नाही ना याची विचारपूस केली जात असते. मंगळ असल्यास ग्रहदोष दूर करण्यासाठी भटजी/पुरोहित/ज्योतिषी यांना पाचारण केली जाते. काहीतरी कर्मकांड करवून घेऊन (व भरपूर बिदागी देऊन) मनाचे समाधान करून घेतली जाते. हा सर्व प्रकार म्हणजे डोके गहाण ठेवण्याचाच प्रकार!
तथाकथित वास्तूतज्ञांनी तर सर्वच्या सर्व दिशा कोणाच्या तरी मालकीच्या करून टाकलेल्या आहेत. त्या मालकीमुळे वा कुठल्या तरी अज्ञाताच्या प्रभावामुळे मानवी व्यवहारावर दुष्परिणाम होण्याच्या शक्यतेची भीती दाखवून चांगल्या स्थितीत असलेल्या घराची पाडापाडी, हलवाहलवी, वा भरपूर खर्चिक असे काही तरी पारंपरिक कर्मकांड करायला भाग पाडून ग्राहकांना गंडवले जाते. कारण यांच्याकडे जाणाऱ्यात सुज्ञपणाचा अभाव असतो असे लेखकाला वाटते. या वास्तुतज्ञांच्या मते शौचालय नेहमी पश्चिमेकडेच असावे लागते. हे असे का अशी विचारण्याची तेथे सोय नाही. तथाकथित शिकलेला वर्गही अशा भूलथापांना सहजपणे बळी पडतो. खरे पाहता आपल्या घराची भरभराट होणे हे स्वतःचे मेंदू, मन, मनगट, आणि परिस्थिती यांच्यावर अवलंबून असते; वास्तुशास्त्र वा फेंगशुईवर नाही. परंतु विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे हेच मुळात पटत नसल्यामुळे हा धंदा बरकतीला आला आहे.
पुरुषप्रधान संस्कृतीतून आलेला कर्मकांड म्हणजे ऊठसूट महिलांना उपवास करण्यास भाग पाडणे असे लेखकाला वाटते. महिन्यातील दहा-बारा दिवसाच्या उपवासामुळे भारतातील ऐंशी टक्के महिला रक्तपांढरीने आजारी आहेत, असा लेखकाचा दावा आहे. महात्मा गांधी, बाबा आमटे, मेघा पाटकर, बाबा आढाव सारखे नेते व सामाजिक कार्यकर्ते उपोषणाच्या माध्यमातून उपवास करत असले तरी या उपोषणामागे समाजहिताची कळवळ होती. सत्तेत असलेल्यांना अनुकूल निर्णय घेण्यास भाग पाडण्याचा उद्देश त्यामागे होता. त्यातून समाजाचे भले झाले व उपवास सार्थकी झाले. परंतु कर्मकांड म्हणून केलेल्या उपवासामुळे ना समाजाचे भले होणार वा ना व्यक्तीचे, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
कन्यागत महापर्व हे अजून एक असेच मिथकावर आधारलेले व शोषणास भरपूर वाव असलेले कर्मकांड. या पर्वणीच्या काळात कृष्णा व गंगा या दोन नद्या एकत्र आल्यामुळे त्या काळी कृष्णेत स्नान केल्यास मोक्ष प्राप्ती होऊ शकते, गेल्या सात जन्मातील पापं धुवून निघतात, या आख्यायिकेवर धार्मिकांची नितांत श्रद्धा असते. त्यामुळे दर बारा वर्षानी येणाऱ्या या पर्वणीच्या एक वर्षाच्या कालखंडात कृष्णाकाठच्या सर्वच्या सर्व गावात भक्तगण स्नानादी कर्मकांड करण्यास गर्दी करतात. व गावकरी मोठ्या प्रमाणात पैसे कमावतात. हे एक फार मोठे रॅकेट असून यात शासनही आजकाल सहभागी होत आहे. भौगोलिक दृष्ट्या हजारेक किलोमीटर्स दूर असलेल्या नद्यांचे संगम कसा काय होऊ शकेल या अत्यंत प्राथमिक स्वरूपाच्या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नसते. त्यामुळे वस्तुस्थितीपासून कोसो मैल दूर असलेल्या या श्रद्धेची उचित चिकित्सा करणे गरजेचे आहे असे कुठल्याही भाविकाला वाटत नाही. मुळात धर्म आणि विज्ञान (व काही अंशी कॉमन सेन्स) यांचा नेहमीच संघर्ष होत आलेला आहे. विज्ञान व विवेक ही सत्य आणि वस्तुस्थितीवर आधारित असलेली विचार प्रणाली असते. परंतु स्वार्थीवृत्तीच्या काही प्रवृत्ती विज्ञानाचा बेमालूम उपयोग करून समाजाला धार्मिक क्षेत्रात गुंतवण्यात मग्न असतात. त्यामुळे सारासार विचार करणे, चिकित्सकपणे विचार करणे, विवेकाची कास धरणे इष्ट ठरत आहे.
कालसर्पयोग ही अशीच एक भन्नाट कल्पना कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून निघून आपल्या समाजाची प्रगती कुंठित करत आहे. अडचणीच्या वेळी धसका घ्यायला लावणाऱ्या या योगाला बहुतेकजण बळी पडतात. काही धर्मस्थळातील पुरोहित, व्यापारी व वाहनव्यावसायिक यांनी संगनमत करून आपल्या स्वार्थहितासाठी हा बागुलबुवा उभा केला आहे. या (वाईट) योगाच्या निवारणार्थ सांगितलेल्या नागबळीच्या विधिसाठी हजारो रुपये खर्च केला जात आहे. गंमत म्हणजे या विधीत सहभागी होण्यासाठी अडचणीत सापडलेली व्यक्ती प्रत्यक्ष हवीच असे काही नाही. त्याच्याकडील एखाद्या कापडासारखी निर्जीव वस्तु वा कुटुंबातील एखादी दुसरी व्यक्तीसुद्धा चालू शकते. एखाद्या पेशंटला डॉक्टरकडे घेऊन न जाता त्याचे फक्त कपडे घेऊन रोगनिदान व उपचार करण्यास सांगितल्यासारखे हा प्रकार वाटतो. आम्ही मानसिक आधार देतो म्हणून या प्रकाराचे समर्थन करणारे नक्कीच बेरकी आहेत. आयुष्यातील दुःख दूर करणारी ही यंत्रणा उभी करून दिनदहाडे लूटमार करणाऱ्यांना गजाआड करण्याइतकी बुद्धी वा धैर्य आपल्या समाजात नाही याचे सखेदाश्चर्य वाटते.
असाच काहीसा प्रकार बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी आद्याक्षराची विचारपूस करण्यासाठी पंचागं व पंचागाचा अर्थ सांगणारे गुरूजी याकडे निर्देश करता येईल. नावरस नावाचं आद्याक्षर सांगण्यासाठी आणि फुकटचंबू खानदानाच्या सोईसाठी कुठल्याही पंचागात अवकहडाचक्र नावाचे कोष्टक असून त्यावरून बाळाचे नाव ठेवणे शक्य होऊ शकते. परंतु प्रत्येक गोष्टीचे इव्हेंट करण्याच्या दुष्ट प्रवृत्तीमुळे असल्या साद्या उपायांवर भरवसा कोण ठेवणार?
अशा प्रकारचे अनेक कर्मकांडांची चिकित्सा करत असतानाच लेखक तुळसीच्या मिथकामागील सांस्कृतिक संदर्भ, हिग्स बोसानच्या कणांना देवकण असे नामकरण करून परमेश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्याचा आटापिटा, जगबुडीची अफवा उठवून माध्यमांनी घातलेला घोळ इत्यादी बद्दलही लेखक चिकित्सक विचार मांडत आहेत. या गोष्टी मुळातूनच वाचायला हवीत.
परंपरा आणि संस्कृती यांचे गौरवीकरण आणि उदात्तीकरण होत असलेल्या या काळात बुद्धीमत्तेच्या निकषावर चिकित्सा करणे जरूरीचे ठरेल. विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची वाढ कशी होत राहील याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक ठरेल. आयत्या उत्पन्नाच्या भन्नाट कल्पना निर्मिती करून तथाकथित उच्चशिक्षित आणि अशिक्षितांना कंगाल करण्यापेक्षा निकोप समाजाची निर्मिती कशी करता येईल याकडे लक्ष वेधण्यासाठी “असाही विचार करायला काय हरकत आहे...” हे पुस्तक नक्कीच आपल्याला मदत करू शकेल!
असाही विचार करायला काय हरकत आहे...
लेः डॉ. नितिन शिंदे,
नाग-नालंदा प्रकाशन, इस्लामपुर
मूल्य 110 रु, पृ.सं. 128
समीक्षेचा विषय निवडा
हवा तिथे
'हवा तेवढा' म्हणण्यापेक्षा 'हवा तिथे' असे म्हणणे योग्य होईल. हे विचार तळागाळात, वाड्यावस्त्यांवर पोचले पाहिजेत. त्यांचेच शोषण अधिक होत असते. साध्या साध्या समस्यांसाठी भगताकडे अथवा मांत्रिकाकडे जाणे किंवा जावे लागणे, गावकी, जातपंचायत, यात हे लोक गळ्यापर्यंत बुडालेले असतात. दोनशे पाचशे रुपयेही नसणारे हे लोक तोडगे,मंत्रतंत्र यासाठी हजार दोन हजाराची कर्जे भरमसाट व्याजाने काढतात आणि वर्षानुवर्षे फेडत राहातात. कुपोषण, गरीबी, अशिक्षितपणा यामुळे वारंवार संकटे कोसळतात, रोगराई येते, आणि भगतमांत्रिकाकडचे फेरे चालू राहातात. सुशिक्षित आणि सुखवस्तू लोकही या मार्गाकडे वळलेले दिसतात, पण ते लोक हे सगळे स्वखुशीने करत असतात. त्यांच्यापर्यंत हे विचार अनेकदा पोचलेले असतात. पुरोहित त्यांचे शोषण करीत नाहीत. हेच लोक त्यांच्याकडे जाऊन पैशाच्या राशी ओततात. यांचे प्रबोधन करण्यासाठी वेळ आणि श्रम खर्च करण्यात अर्थ नाही.
converting the converted अशीच
converting the converted अशीच स्थिती दिसते.
तसं नाही उज्ज्वला. तुम्ही म्हणता तितके निराशाजनक नाही. मी विचार करते. असे लेख वाचून वाचून स्वत:ला प्रश्नविचारते. माझ्यासारखे अनेक लोक असतील. मंगळ/ज्योतिष यांचा खरच कंटाळा आलेला आहे. कालसर्प तर भंपकच आहे. जेवढी मानसिक गरज आहे, कमीत कमी तितकीच श्रद्धा ठेउन, अन्य फाफटपसारा कमी करणारे, हे लेख आवडणारे माझ्यासारखे अनेक जण असतील.
हे लेख म्हणजे पालथ्या घड्यावरचे पाणी नाही.
राही, शुचि, खरं आहे तुमचं.
राही, शुचि, खरं आहे तुमचं.
आणि या पुस्तकाचं शीर्षक हे लेखकाच्या तळमळीतून आलेलं चांगलं आवाहन आहे. विवेकानंद म्हणाले होते तसं धर्माचं बोट धरून लोकांना विवेकवादाकडे वळवणं हे महा कठीण काम आहे.
अंधश्रद्ध नसतील, पण माझ्या सर्व नातेवाईकांतसुद्धा कर्मकांडवाद प्रचंड आहे. मी एकटीच निरीश्वरवादी आहे आणि धर्म हा विषय चर्चेला येऊच शकत नाही. ते आहेत तसा त्यांचा स्वीकार आणि आपल्यावर काही लादून न घेणं एवढंच उरतं.
सत्य आहे. उदाहरणच द्यायचे
सत्य आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर, मला स्वत:ला पितृपक्ष हा प्रकार आवडत नाही.
त्यातही अविधवा नवमी अज्जिबात नाही कारण त्यामध्ये स्त्रीच्या सवाष्णेपणाला अति महत्व दिले गेलेले आहे. अविधुर नवमी का नसावी? असोच.
______
पण कोणी तसे करत असेल तर मी विरोध करायला जात नाही.
___________
हळदीकुंकू, अविधवा नवमी हे प्रकार समाजातून बाद व्हायला पाहीजेत.
माझ्या मते दृश्य स्वरूप
माझ्या मते दृश्य स्वरूप वाढलेलं आहे. एकंदरीत धर्म, मंदिरं, बाबा, बुवा, मांत्रिक, जादूटोणा यांवर खर्च होणारा जीडीपीच्या टक्का घसरलेला आहे. हा अर्थातच माझा अंदाज आहे. आकडेवारी नाही.
देवी, पोलियो, कुष्ठरोग, मलेरिया, फ्लू आणि इतर साथीचे रोग आपल्या अपत्याला झाले की सगळे आईबाप इतर उपाय थकले म्हणून झक मारत मूल वाचावं किंवा बरं व्हावं म्हणून कोट्यवधी लोक आपल्या तुटपुंज्या उत्पन्नातला मोठा हिस्सा असल्या लोकांकडे स्वाधीन करायचे. आता ते फारच कमी झालेलं आहे. हे एक उदाहरण झालं. धर्मसंस्थेचे अधिकार महाप्रचंड होते एकेकाळी. तिला खुश ठेवण्यासाठी जे डायरेक्ट/इनडायरेक्ट खर्च व्हायचे त्याची यादीही मोठी असावी.
माझ्या मते दृश्य स्वरूप
माझ्या मते दृश्य स्वरूप वाढलेलं आहे. एकंदरीत धर्म, मंदिरं, बाबा, बुवा, मांत्रिक, जादूटोणा यांवर खर्च होणारा जीडीपीच्या टक्का घसरलेला आहे. हा अर्थातच माझा अंदाज आहे. आकडेवारी नाही.
आपला अंदाज चुकीचा आहे.
या सर्व गोष्टींना खतपाणी घालून पद्धतशिरपणे वाढवले जात आहे, धार्मिक उत्सवांमार्फत उन्माद पसरविला जात आहे. याला पद्धतशिरपणे फायनान्सही केले जात आहे. हे फक्त "हिंदू"स्तानात नव्हे तर तुमच्या आम्रविकेतही होत आहे. परवाचीच बातमी होती, मुसलमानासारखा दिसतो म्हणून कुण्या गोव्यातल्या इंजिनियरला गर्बा खेळू दिला नाही, अमेरिकेत.
अंदाज बरोबर की चुकीचा हे
अंदाज बरोबर की चुकीचा हे सिद्ध करण्यासाठी काहीच आकडेवारी नाही. अनेकवेळा अनेकडोटल एव्हिडन्स हा खोटा ठरतो. उदाहरण द्यायचं झालं तर पाकिस्तानवर मिल्ट्रीचा प्रचंड कब्जा आहे असं अनेकांना वाटतं. पण गेल्या पन्नासेक वर्षांत मिलिट्रीवरच्या खर्चाचा टक्का खूपच कमी झालेला आहे.
?
उदाहरण द्यायचं झालं तर पाकिस्तानवर मिल्ट्रीचा प्रचंड कब्जा आहे असं अनेकांना वाटतं. पण गेल्या पन्नासेक वर्षांत मिलिट्रीवरच्या खर्चाचा टक्का खूपच कमी झालेला आहे.
मिलिटरीवरील खर्चाचा टक्का आणि देश मिलिटरीच्या ताब्यात असणेनसणे यांचा परस्परसंबंध नक्की काय?
मिलिटरीची राजकीय स्ट्राँगता तथा लुडबूडक्षमता आणि सिव्हिलीय राज्यकर्त्यांचे तौलनिक वैक्य यांचे फल आहे हे, खरे तर. पण यात मिलिटरीवरच्या खर्चाचा संबंध येतो कोठे? राज्यकारभारात लुडबूड करणाऱ्या मिलिटरीने लाडात येऊन बराच खर्च आपल्याकडे ओढून घेणे हे शक्य आहे आणि आश्चर्यकारक मुळीच नाही, परंतु तितकेच ते अनिवार्यसुद्धा नाही.
शिवाय, (अशा माहौलात) मिलिटरीचे(/मिलिटरीवाल्यांचे) पैसा बनविण्याचे अनेक मार्ग असू शकतात. (वेगवेगळे उद्योग वगैरे.) सरकारी खर्च हाच एक मार्ग असेल, असेही नाही.
बरोबर. पण महिना चाळीस रुपये
बरोबर. पण महिना चाळीस रुपये उत्पन्न असलेल्या कारकून सदृश व्यक्तीला 'अमुक विधी करा म्हणजे तमुक देवाचं सुरक्षा कवच मिळेल.' यासाठी शंभर रुपये मोजण्याची गरज वाटायची, कारण तापाने फणफणलेलं पोर. अशा वेळा प्रत्येकाच्या आयुष्यात अनेकदा येत. तेवढा जीडीपीचा अनुत्पादक दोनचार टक्का वाचला हे चांगलंच. ढोलताशे, डाल्बी भिंती, लायटिंगं, झगमगाट वाढला हे खरंच आहे.
आजच्या अंधश्रद्धा कोणत्या?
हे थोडं पुरोगामीपणाच्या सनातन व्याख्येसारखं वाटतं. 'ते काही सतीचा पुरस्कार करत नाहीत, म्हणजे ते पुरोगामीच' असं काही म्हटल्यासारखं.
एके काळी देवी, पटकी वगैरे रोगांसाठी कोंबडं-बकरं कापलं जात असे. सुरक्षा कवच, अनिरुद्ध बापू वगैरे मंडळी गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकांतली. आता जमाना 'आव्वाज वाढव डीजे', किंवा 'हिंदू लोकांनी फेसबुकवर श्रद्धांजली वाहताना RIP लिहू नये', अशा गोष्टींचा आहे. दिवेकरबाई लोकांचं वजन कमी करण्याच्या नावाखाली मिथ्या-विज्ञानाच्या नावानं देशीवाद पसरवते.
आजच्या काळातल्या अंधश्रद्धा निराळ्या आहेत. गतकाळातल्या अंधश्रद्धांवर खर्च कमी झाला आहे म्हणून एकूणच अंधश्रद्धांवर होणारा खर्च कमी झाला आहे, हे विधान धार्ष्ट्याचं वाटतं.
तुमचंही बरोबरच. विदा नाही,
तुमचंही बरोबरच. विदा नाही, तेव्हा तसं म्हटलं तर सगळ्यांचंच बरोबर. माझा मुद्दा असा - खर्च वाढलेला असला, तरी टक्का कमी झालेला आहे. म्हणजेच प्राण वाचवण्यासाठी अंधश्रद्धा विकत घेणं थांबलेलं आहे. समाजात जगण्यासाठी, वाळीत न पडण्यासाठी अंधश्रद्धांना आपल्या जीवनाचा हिस्सा देणं थाबलेलं आहे (जवळपास). आताच्या अंधश्रद्धा फर्स्ट वर्ल्ड आहेत.
तसं म्हटलं तर अन्नावर खर्चाचा टक्काही कमी झालेला आहे. संरक्षणावरचा टक्का घसरला आहे. शिक्षणावर, प्रवासावर, मौजमजेवर, आणि वैद्यकीय गरजांवर होणार्या खर्चाचा टक्का वाढलेला आहे. म्हणजे माणसाचं आयुष्य - जे एकेकाळी पोटोबा आणि विठोबात आटपायचं त्याला कलाव्यवहार, आनंद, प्रवास, उपभोग हे पैलू प्राप्त झालेले आहेत. हे सम्यक चित्र महत्त्वाचं आहे. त्यावरून माणसाची धार्मिकता वाढत चालली अाहे आणि वाढणारच आहे असं कोणाला मानायचं तर मानो. कारण सगळेच बरोबर, काहीच विदा नाही...
विदा नाही हे ठीकच...
... मात्र विदा जमा करताना मर्यादित विदा जमा करू नये.
धार्मिक उन्मादातून माणसांचे प्राण घेणं, अल्पसंख्यांना असुरक्षित वाटणं, जातीपातींमधले संघर्ष वाढणं, त्यांतून चारचौघांत खूनखराबा, अशा बटबटीत गोष्टी; त्यापुढे दुस्वास, तिरस्कार वगैरे गोष्टी सर्रास घडताना दिसत आहेत. त्यामुळे माणसांचे जीव थेट गेले नाही तरीही अर्थव्यवस्थेला त्याची किंमत चुकवावी लागते. एकेकाळी व्यक्तिगत पातळीवर असलेली अंधश्रद्धा सामाजिक पातळीवर परिवर्तित होत आहे.
याबद्दल माहीत नाही , पण
याबद्दल माहीत नाही , पण धार्मिक टुरिझम वर या पेक्षा अतोनात जास्त पैसा घालवतात लोकं. शिर्डी, बालाजी स्पेशल केसेस वगैरे म्हणून बाजूला ठेवले तरी गजानन महाराज शेगाव ( काय सुंदर मेंटेन केलंय रेल्वे स्टेशन/भक्तनिवास/प्रसाद) ते नरेंद्र महाराज गुरू पोर्णिमा या अतिशय खर्चिक टूर्स फेमस आहेत. आणि टुरिझम हा तर फक्त स्टार्टर आहे , मेन कोर्स नंतर येतो...
बापट आक्षेप नक्की कशावर आहे?
बापट आक्षेप नक्की कशावर आहे? अंधश्रद्धांवर आहे की पैसे खर्चावर आहे? पोट भरल्यावर करु द्याना टुर्स फार फार तर पैशाचे समाजातील चलनवलन/ फ्री फ्लो वाढेल. ज्यांना निसर्गसौंदर्य विपुल आहे ब्वॉ, झगमगाटाचा कंटाळा आलाय अशा श्रीमंति दु:खांवर जर धार्मिक पर्यटन हा उपाय सेल तर तो अंधश्रद्धा कसा?
वस्तूंचं काय?
दुधाचे अभिषेक, देवीला सोन्याची साडी, गजानन महाराजांना सोन्याचं सिंहासन, आणि काय-काय महाग वस्तू मूर्तींच्या पायांवर ओतणं, यात जो पैसा आणि स्रोत फुकट जातात, ते खर्च पर्यटनापलीकडचे आहेत. त्यातून काही सुंदर वास्तू, कला निर्माण होत असती; आणखी एखादं वेरूळचं कैलास मंदिर उभं राहत असतं तर गोष्ट निराळी.
पंढरपुरात लाखो लोकांची तीन-चार दिवसांपुरती सोय करणं सध्या शक्य नाही. पण लाखो लोक वारीसाठी येतात. त्यातून रोगराई, प्रदूषण वगैरे गोष्टी माजतात. इतर देवस्थळांच्या बाबतीतही या गोष्टी होत असतील. अधूनमधून धार्मिक स्थळी चेंगराचेंगरी होण्याच्या बातम्या अधूनमधून येत राहतात. सध्या शबरीमाला प्रकरण पेटलेलं आहे. त्यात मारझोडीच्या बातम्या येत आहेत. या अंधश्रद्धा नाहीत का?
दुधाचे अभिषेक, देवीला
दुधाचे अभिषेक, देवीला सोन्याची साडी, गजानन महाराजांना सोन्याचं सिंहासन, आणि काय-काय महाग वस्तू मूर्तींच्या पायांवर ओतणं
होय या अंधश्रद्धा आहेत.
ते खर्च पर्यटनापलीकडचे आहेत. त्यातून काही सुंदर वास्तू, कला निर्माण होत असती; आणखी एखादं वेरूळचं कैलास मंदिर उभं राहत असतं तर गोष्ट निराळी.
हे एक मत झालं. काही कजणांना वेरुळची लेणी उभारायला पैसे द्यायचे नाहीत. त्यांचे पैसे, त्यांची मर्जी.
पंढरपुरात लाखो लोकांची तीन-चार दिवसांपुरती सोय करणं सध्या शक्य नाही. पण लाखो लोक वारीसाठी येतात. त्यातून रोगराई, प्रदूषण वगैरे गोष्टी माजतात.
प्लॅनिंग लिमिटेशन आहे. याच पर्यटनाचा रोजगाराकरता उपयोग का नाही करुन घेत?
अधूनमधून धार्मिक स्थळी चेंगराचेंगरी होण्याच्या बातम्या अधूनमधून येत राहतात.
होय तो एक ड्रॉबॅक आहे.
सध्या शबरीमाला प्रकरण पेटलेलं आहे. त्यात मारझोडीच्या बातम्या येत आहेत. या अंधश्रद्धा नाहीत का?
ती १००% अंधश्रद्धा आहे.
सक्तीचा प्रश्नच नाही.
हे एक मत झालं. काही कजणांना वेरुळची लेणी उभारायला पैसे द्यायचे नाहीत. त्यांचे पैसे, त्यांची मर्जी.
त्यात मर्जीविरोधात पैसे द्या अशी सक्ती नाहीच.
मुद्दा असा की 'अव्यवहारी' खर्च करून त्यातून कला निर्माण होत असेल तर ती अंधश्रद्धा म्हणू नये. वेरूळची लेणी धर्मापोटी बनवली असतीलही, पण त्यातून अतिशय सुंदर वास्तू उभारली गेली. देवाला सोन्याची साडी चढवण्याजागी समकालीन संस्कृतीचा अभ्यास करून दागिने चढवले तर ती कदाचित कला म्हणता येईल.
प्लॅनिंग लिमिटेशन आहे. याच पर्यटनाचा रोजगाराकरता उपयोग का नाही करुन घेत?
एवढ्या बारक्या गावात वर्षातल्या आठ-दहा दिवसांसाठी लाखो लोकांची सोय करणं बहुतेक घाट्याचा सौदा ठरेल. ठरावीक दिवशी पंढरपुरात गेलंच पाहिजे, ही (अंध)श्रद्धा नसेल आणि वर्षातून कधी तरी, सुट्टीच्या दिवशी पंढरपुरात जाऊ, असं म्हणणारा समाज असेल तर त्याची गरजही पडणार नाही. आहेत त्या सुविधा सुधारून पुरेल.
आधीचा प्रतिसाद आणि हा
आधीचा प्रतिसाद आणि हा प्रतिसाद या दोहोंना मिळून एक उत्तर.
हे खर्च आहेतच. मात्र जीडीपीच्या प्रमाणात हे खर्च वाढले आहेत का याबद्दल काहीच विदा नाही. 1857 सालच्या गोडशांच्या 'माझा प्रवास'मध्ये हिदुस्तानातल्या एका संस्थानची राणी 8 लक्ष रुपये खर्च करून धार्मिक उत्सव साजरा करणार असल्याचा उल्लेख आहे. हा खर्च त्या काळी इतका मोठा होता की महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी तिथे जाऊन दक्षिणा घेतली तरी सौदा फायद्यात पडणार होता. असे अनेक रमणे त्याकाळी घडत. सरकारने आपल्या खजिन्यातून इतकी मोठी गंगाजळी केवळ ब्राह्मणांना, आणि पर्यायाने धर्माच्या स्वघोषित प्रतिनिधींना दान करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत. आता सरकारी पातळीवर निव्वळ एखाद्या धर्माची देवळं, मशिदी, चर्चं, गुरुद्वारा आणि तिथले पुजारी, पाद्रे, मौला वगैरेंवर खर्च किती होतो? एकंदरीत सरकारी तिजोरीतल्या धनाच्या मानाने जवळपास शून्य.
उत्साहाकडुन उन्मादाकडे
मला आकडेवारीची कल्पना नाही की भारतात काय होते त्याची कल्पना नाही. वाढलाही असेल. पण तो 'फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम झालेला आहे' हे गुरुजिंचं या वर्षातील महामार्मिक वाक्य आहे आणि त्याशी मी सहमत आहे.
________________
उत्सवाचे रुपांतर उन्मादात होते हे मानसशास्त्रातीलच सत्य आहे. किंबहुना अवसाद/खिन्नता-प्रसन्नपणा-उत्साह-उन्माद ही तर रेंज आहे. विशिष्ठ वेळी/स्थळी/काळी प्रत्येकजण कुठेतरी या रेंजवर असतोच. समाजाचेही तसे असते की काय?
स्वत:वरुन एक हायपॉथेसिस
स्वत:वरुन एक हायपॉथेसिस मांडते -
अमेरिकेत स्थाईक झाल्यानंतर काही वर्षातच आपलया प्रियजनांइतकीच आपल्या संस्कृतीची, देशात रोवल्या गेलेल्या आपल्या मूळांची, आठवण येऊ लागली. धार्मिकतेला कवटाळल्याने ती बोच थोडी शमते, गणपती, देवी, स्तोत्रे आदिंच्या उच्चारणातुन परत मायभेट झाल्यासारखे वाटते असे लक्षात आले.
माझ्यासारखे काही एन आर आय असूही शकतात.
गेल्या काही वर्षात एकंदर एन आर आय ची वाढलेली संख्या पाहता, धार्मिक फॅनॅटिझमचे हे एकमेव नव्हे तर अनेक कारणांपैकी एक कारण असू शकते.
या विचारांचा हवा तेवढा प्रसार
या विचारांचा हवा तेवढा प्रसार होत नाही आणि converting the converted अशीच स्थिती दिसते.