Skip to main content

अलीकडे काय पाहिलंत? - ३१

आधीच्या धाग्यात १०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू केला आहे.
---

american history X पाहिला. एडवर्ड नॉर्टन काय भारी आहे राव!
विचारांना चालना देणारा सिनेमा. आपल्याकडे एवढं भारी, गुंतागुंतीचं काही बनावं असं वाटतं.

ॲमी Tue, 21/11/2017 - 08:05

एडवर्ड नॉर्टन काय भारी आहे राव! >> एकच चित्रपट पाहिला आहे त्याचा. Red Dragon. दोघे (एडवर्ड आणि चित्रपट) आवडले. आणि वोल्डीतर आपल्याला आधीपासूनच आवडतो :D

===
विकांताला Eyes wide shut पाहिला. आवडला. असे संथ चित्रपट आवडतात बहुतेक मला (कळतात कितपत माहित नाही ;)). Blow up देखील आवडला होता.

आता हि लिंक आणि त्यातले प्रतिसादपण वाचतेय. Spoilers आहेत https://vigilantcitizen.com/moviesandtv/the-hidden-and-not-so-hidden-me…

मारवा Sat, 20/01/2018 - 21:00

In reply to by ॲमी

Eyes wide shut
मी पाहीला मला ही आवडला.
विशेषत: orgy चा सीन जबरदस्त होता. तेव्हाचे दाखवलेले रीच्युअल आणि ते भयावह बॅकग्राउंड म्युझिक मनावर मोठा
परीणाम करणारे होते. नायक टॉम क्रुझ प्रत्यक्ष जीवनात एका अशाच कल्टचा सभासद आहे हे मला फार विशेष वाटते.
यांना अशा भुमिका करतांना इतकं तटस्थ कसे राहता येते ? हा प्रश्न नेहमीच पडतो.
Stanley Kubrick जबर डायरेक्टर आहे.

ॲमी Sat, 20/01/2018 - 21:53

In reply to by मारवा

हो ते धूप फिरवताना म्हणले जाणारे मंत्र आणि संगीत भयावह आहे.

नायक टॉम क्रुझ प्रत्यक्ष जीवनात एका अशाच कल्टचा सभासद आहे हे मला फार विशेष वाटते. >> सायंटॉलॉजी असला कल्ट आहे? ते इल्युमिनिटी वगैरे मला अफवा वाटतात...

यांना अशा भुमिका करतांना इतकं तटस्थ कसे राहता येते ? हा प्रश्न नेहमीच पडतो...>> तटस्थ राहता येत असेल का शंका आहे. भुगा होत असणार डोक्याचा...

मारवा Fri, 26/01/2018 - 16:38

In reply to by ॲमी

क्लॉकवर्क ऑरेंज ( जर अगोदर बघितलेला नसल्यास ) अवश्य बघावा.
डोक्याचा उत्तम भुगा होण्याची हमी माझी.

ॲमी Fri, 26/01/2018 - 16:56

In reply to by मारवा

बघितला नाहीय अजून पण http://m.imdb.com/chart/top या यादीत आहे म्हणजे बघेनच कधी ना कधी. पण आधी पुस्तक वाचून मग बघेन (म्हणजे सध्यातरी हा प्लॅन आहे पुस्तकांवर बेतलेल्या चित्रपटांसाठी).

धन्यवाद सुचवणीसाठी :)

राजेश घासकडवी Tue, 21/11/2017 - 19:04

सध्या मी नेटफ्लिक्सवर 'द राउंड प्लॅनेट' ही बीबीसीची सीरीज बघतो आहे. सिनेमॅटोग्राफी, निसर्ग, प्राणी वगैरे सगळं छानच आहे. पण त्या सगळ्याला खाऊन टाकते ती म्हणजे कॉमेंट्री. निसर्गपटांना अगदी ठाशीव कंटाळवाणी कॉमेंट्री असते. तोच तो संथ माहितीपूर्ण आवाज, तेच ते नवेनवे फॅक्ट्स, त्याच त्या भक्ष्य-भक्षकांच्या, आई-पोरांच्या गोष्टी, आणि मानव कसा निसर्गाचा नायनाट करतो आहे टाइप मल्लिनाथ्या (पूर्वी खूप अंगावर येतील अशा असायच्या, आजकाल ते थोडं कमी झालेलं आहे.)

राउंड प्लॅनेटला चक्क विनोदी कॉमेंट्री आहे. विनोदी म्हणजे सातमजली, खो खो हसू नाही. तर खास ब्रिटिश कोरडा आणि कधीकधी काळा होणारा विनोद. अत्यंत मनोरंजक. नेटफ्लिक्स असेल तर फक्त पाच मिनिटं पाहा, नाही तुम्हाला चटक लागली तर मिशी उतरवून देईन.

चिमणराव Wed, 22/11/2017 - 06:36

मिशी उतरवू नका. आमच्या dwtv च्या चित्रफिती आणि कॅामेंन्ट्रीज पाल्हाळीक नसतातच. सूचक विनोदी आणि उपहास असतो. छोटीछोटी वाक्ये आणि मध्ये अंतर.
इजिप्त,ट्युनिशिया आणि टुर्कस्तानच्या पर्यटनाविषयी
The impact of terrorism on tourism | DW Documentary
42:26
Link:https://youtube.com/watch?v=fyYo6quHZss
हीसुद्धा छान आहे.

तिरशिंगराव Sun, 26/11/2017 - 23:55

प्वायरो मस्तं आहे.
सहमत, पण त्याच्या मिशा, जुन्या पॉयरो सारख्या टोकदार नाहीत, त्यामुळे जरा चुकल्या-चुकल्यासारखे वाटले.

'न'वी बाजू Mon, 27/11/2017 - 02:34

In reply to by तिरशिंगराव

बादवे, पॉयरो नव्हे. (प्वायरोही नव्हे.) प्वारो.

(नशीब पॉयरॉट नाही म्हणालात.)

राजेश घासकडवी Mon, 27/11/2017 - 07:14

In reply to by तिरशिंगराव

मी ट्रेलर पाहिला, आणि त्यातला प्वारो त्याच्या मिशांमुळे, आकारामुळे आणि घनदाट केसांमुळे बेल्जियन डॆंडी न वाटता आर्मीमधला रिटायर्ड कॆप्टन वगैरे वाटतो. खरा जमलेला प्वारो एकच - 'अगाथा क्रिस्तीज प्वारो'मधला डेव्हिड सूशेने साकारलेला.

पुंबा Mon, 27/11/2017 - 12:18

कोको पाहिला. नितांतसुंदर चित्रपट. अतिशय गोळीबंद कथा, जबरदस्त ग्राफिक्स. म्युझिकल या प्रकारात मोडला जातो की नाही कल्पना नाही पण खुप सुंदर गाणी आहेत या चित्रपटात. मेक्सिकन लोकपरंपरा, श्रद्धा- अंधश्रद्धा, तिथली लोकगीतं यांचा कसला परिणामकारक वापर केलाय कथेत. आणि यातली कोको कसली गोड आहे! तिला आणि नायकाला आवाज देणाऱ्यांचे विशेष कौतुक. मी पाहिलेल्या ॲनिमेशन चित्रपटातला सर्वश्रेष्ठ आहे हा. विस्मरण- मरण,आपली परकी माणसं, त्यांच्या अपेक्षा, ध्येय आणि जबाबदाऱ्या यांतील द्वंद्व या सर्वांवर अतिशय गोड पद्धतीने भाष्य करणारा चित्रपट लहानग्यांना नक्की दाखवा. विशेषकरून त्यांच्या आजी- आजोबांबरोबर पाह्यला चित्रपट तर अधिक चांङले होईल.
रडगाणं: आपल्याकडे हे असले कधी होणार? नक्की काय कमी आहे आपल्याकडे? लोककथा नाहीत, संगीतकार नाहीत? पैसा नाही? तंत्र नाही? नक्की काय चुकतंय आपलं?

पुंबा Tue, 28/11/2017 - 12:10

In reply to by बिटकॉइनजी बाळा

नाही.
मध्यवर्ती कल्पना समान आहे का दोघांत? (A young boy named Kubo must locate a magical suit of armour worn by his late father in order to defeat a vengeful spirit from the past. ह्याच्यावरून वाटतेय तसे.)

कुलस्य Fri, 01/12/2017 - 12:24

बराच काळ पेंडिंग राहिलेला 'कोर्ट' हा चित्रपट netflix वर पाहिला आणि अतिशय आवडला. खरं तर या चित्रपटाबद्दल कंटाळवाणा, कॅमेरा अजिबात हलत नाही , ameature दिग्दर्शन असे अनेक आरोप ऐकले होते. खरं तर त्यामुळेच पाहिला नव्हता. पण पाहताना दिग्दर्शन खूप आवडलं. गोष्ट साधी आहे पण दिग्दर्शनामुळे अतिशय फरक पडतो. कॅमेरा स्थिर ठेवणे ही मुद्दाम केलेली गोष्ट आहे कारण त्यामुळे दृश्यात एक आवश्यक तटस्थता आली आहे. प्रत्येक सीन मुख्य घटनेच्या आधी चालू झाला आहे आणि घटना घडून गेल्यावर काही मिनिटे तसाच ठेवून मग बदलला आहे. यातूनही त्या त्या जागेची परिस्थिती अचूकपणे दिसते. हा कोर्टरूम ड्रामा नाही तर समाजावर केलेले भाष्य आहे जे उत्तम आहे . फक्त काही सीन मध्ये अतिरेक वाटतो. म्हणजे समजलं पुढे चला वगैरे. अनावश्यक रिपीटेशन खूप आहे. कोर्टात्ल्या लोकांना खाजगी आयुष्य असू नये का त्यांनी सतत केसचाच विचार करत राहावा का असं ही वाटतं. पण एकंदरीत चित्रपट आवडला.

बिटकॉइनजी बाळा Sat, 09/12/2017 - 15:07

आत्ताच घरी दोन मुस्लिम महिला बुरख्यात आल्या. हळदीकुंकू- करंडा घेऊन. उद्या त्यांच्या घरच्या लग्नाची जाति पूजा आहे त्याचं निमंत्रण दिलंय.

चिमणराव Sat, 09/12/2017 - 15:50

अगाथा नाही जमत. युट्यबवर आहे ओरिएंट. त्याकाळी त्या कादंबय्रा वाचल्या जात असाव्यात दूरच्या प्रवासात,थंडीत घरात वेळ घालवण्यासाठी. लाकडं तरी किती फोडणार?

गौराक्का Thu, 14/12/2017 - 20:54

द गुड वाईफ पाहून संपवली... शेवट चे काही एपिसोड फार पळवल्यासारखी वाटली.
मेंटालिस्ट पाहतेय.. सिझन १ एपिसोड ७...
आता, गुन्हेगार कोण याचा विचार प्लॉट उघडला की आधीच करायला सुरू होते... मज्जा येतीये

फारएण्ड Thu, 14/12/2017 - 21:44

याच सदरात रेको वाचून पाहू लागलो आणि टोटली खिळवून ठेवले आहे या मालिकेने. आता सहाव्या सीझन चे शेवटचे भाग बघत आहे. ते "सेव्हियर्स" बरोबर पहिल्यांदा झटापट होते तेव्हाचे.

१४टॅन Fri, 15/12/2017 - 10:10

In reply to by फारएण्ड

वॉकिंग डेड ऑटाफे आहे. ह्या सिरीअलने बिंज वॉचिंग मला खरंतर शिकवलं. म्हणून आठवा सीझन पूर्ण होईपर्यंत मी तो डाऊनलोड करायचं कटाक्षाने टाळतो आहे. जीओटीपेक्षा ह्या सिरीजने 'प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य' वगैरे का गाजवलं नाही हाही एक मूलभूत प्रश्न.

घाटावरचे भट Fri, 15/12/2017 - 15:35

लेयर केक नावाचा सिनेमा पाहिला. डॅनियल क्रेग आणि इतर सहकलाकारांनी मस्त काम केले आहे. कितीही आपटलीत तरी तुमची मारली जाणार असेल तर तुम्ही वाचू शकत नाही असा मौलिक संदेश हा सिनेमा देतो.

शिवाय 'कोलॅटरल ब्यूटी' नावाचा अत्यंत भिकार सिनेमा पाहिला. विल स्मिथ, एडवर्ड नॉर्टन, केट विन्स्लेट, कीअरा नाईटली, हेलन मिरेन इ. सर्वांना वाया घालवलंय. शेवटपर्यंत कळत नाही की लोकांचा नक्की प्रॉबलेम काय आहे.

चिमणराव Sun, 17/12/2017 - 05:15

कोणार्क सूर्य मंदिर ( कोनारक सूर मोन्दिरं) पाहिलं. मजेदार मिथुनशिल्पं आणि गाइड लोकांची या शिल्पांचं स्पष्टिकरण देण्याची व्यर्थ खटपट ऐकली. खजुराहोच्या शिल्पांशी तुलना केली तर तिथल्या युवकयुवतींचे चेहरे छापांतून काढल्यासारखे प्लास्टिक वाटतात ( तिथे गेलो नाही पण फोटोंतून वाटतय.) कोनार्कच्या शिल्पांत आनंदी भाव आहे. उरकणे नाही. जैनमुनिसुद्धा कोरले आहेत.

चिमणराव Tue, 19/12/2017 - 06:48

In reply to by अबापट

हैदराबाद ( फक्त गोलकोंडा) - वरंगळ ( काकतीय राज्यावशेष) - भुबनेश्वर ( जुनी मंदिरं ) - कोनार्क (सुर्यमंदिर ) - पुरी ( जगन्नाथदर्शन , हे एक सांगायला निमित्त.)
रेल्वेत भेटलेले बरेचजण हे तिकडून ( विजयवाडा, पुरी, खोरगपोर) महाराष्ट्रात शिरडीसाठी आलेले होते!

फारएण्ड Mon, 18/12/2017 - 03:03

हुलू वर बर्न नोटिस वाल्या जेफरी डोनोव्हन चा मुख्य रोल असलेली 'शट आय' नावाची सिरीयल आहे. काल पहिले २-३ भाग बघितले. एंगेजिंग वाटते.

आण्टुराज (Entourage) बघताना टोटल बदाम गॉगल लावून पाहिलेली त्यातली "स्लोन" यात आहे. आता तितकी छान नाही दिसत, पण आवडेबल दिसते. इमॅन्युएल चिरीकी का काहीतरी उच्चार असावा नावाचा.

बाकी आण्टुराज शब्द पुलंनी "फ्रेण्डीन्नीड इजे फ्रेण्डीण्डीड" बद्दल लिहीले होते ("वाक्य इंग्रजी आहे पण मराठीतून लिहील्याने कन्नड वाटते") तसे आहे थोडे - शब्द इंग्रजी आहे पण मराठीतून लिहील्याने तेलुगु चित्रपटाचे नाव वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 18/12/2017 - 23:46

'द गर्ल विथ अ ड्रॅगन टॅटू' हा वगळता त्या मालिकेतले इतर दोन सिनेमे बघितले, 'द गर्ल हू प्लेड विथ फायर' आणि 'द गर्ल हू किक्ड हॉर्नेट्स नेस्ट'. लवकरच पहिला चित्रपटही बघेन.

चित्रपटाची थीम अशी की लिस्बेथ सालांडर नावाच्या मुलीला आणि तिच्या आईला लहानपणी तिच्या बापानं फार छळलं आहे. व्यवस्थेनं तिच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं आहे. बारा वर्षांची असताना लिस्बेथनं बापाच्या तोंडावर पेट्रोल ओतून, काडी लावून दिली. तेव्हापासून तिची परवड आणखी वाढली.

तिचा बाप सोव्हिएत रशियातून पळून आलेला माजी हेर आहे. त्यामुळे यंत्रणा त्याला हात लावायला तयार नाही. तो यंत्रणेचा पुरेपूर गैरफायदा उठवतो आणि त्याला साथ देणारे स्विडीश अधिकारी आहेत. हे सगळे मिळून लिस्बेथच्या तक्रारींकडे लक्ष दिलं तर तिचा बाप आणि हे स्विडीश अधिकारी उघडे पडतील म्हणून तिला हरप्रकारे अडकवण्याचा प्रयत्न हे लोक करतात.

लिस्बेथ आणि तिला मदत करणारा पत्रकार मिकेल ब्लोमक्विस्ट ही चित्रपटांतली मुख्य पात्रं.

म्हटलं तर सिनेमे थ्रिलर प्रकारचे आहेत. पण नेहमीच्या जनूबांडी किंवा दोन-दोन फूट परीघाचे दंड बाळगणारे फॅटमॅन, कूगरमॅन किंवा गोलगोलाकार वंडरवुमन वगैरेंशी तुलना करता मोठा बदल म्हणजे लिस्बेथ सालांडर ही जेमतेम पाच फूट उंचीची, आणि अत्यंत काटकिळी आणि स्वीडन या देशात काळ्या केसांची पंचविशीतली मुलगी आहे. ती तशी व्यायाम-बियाम करते; पण तिचा आकार किती, ती मारामारी करणार किती! मात्र कंप्यूटर हॅकिंग या विषयात ती किडा आहे. परिस्थितीपोटी या सगळ्या गोष्टी ती स्वतःच शिकली असावी.

तिला मदत करणारा पत्रकार मिकेल हा मध्यमवयीन, पोट सुटलेला, गोलगोलगोलाकार इसम. सर्वसामान्य पुरुषांमध्ये आढळणाऱ्या माचोपणातून त्याचीही सुटका नाही. तो माचोपणा काय तर, धमक्या, घरावर होणारे हल्ले आणि जिवावर झालेला हल्ला यांमुळे तो जे पत्र चालवतो, त्याची संपादिका म्हणते, "लिस्बेथ सालांडरवर आपण जो विशेष इश्यू काढणार होतो, तो मी थांबवला आहे." मिकेल 'माचो'पणा करून तो इश्यू छापायला अनुमती देतो. आणि संपादिकेला म्हणतो, "मी नाही हे करू धजलो." अर्थ - लिस्बेथला आपल्या मदतीची गरज आहे, मी तिला वाऱ्यावर सोडू शकत नाही.

मिकेलच्या मदतीनं लिस्बेथ निर्दोष सुटणार आणि खलपुरुषांचा बीमोड होणार, हे तसं गृहितक आहेच. त्याशिवाय काय तीन-तीन सिनेमे निघणार. मात्र, लहानपणापासून वडील आणि व्यवस्था यांच्यामुळे नाडली गेलेली लिस्बेथ आनंद शोधू शकते का? तिला कशी माणसं भेटतात; मोकळा श्वास घेतल्यानंतर ती 'नॉर्मल' आयुष्य जगण्यासाठी सिद्ध होते का; असे प्रश्न सिनेमात सोडवलेले नाहीत. मात्र त्याकडे काही निर्देश जरूर आहे.

ॲमी Tue, 19/12/2017 - 08:17

गेल्या काही दिवसात बघितलेले चित्रपट:

• Terminator 1, 2, 3. चौथा बघायला चालू केलेला पण 10-15 मिनिटातच बोअर झाला. 4, 5 बहुदा कधीच बघणार नाही. मला वाटतं future is not set वगैरे करून त्यांनी घोळ घातला आहे. त्यापेक्षा cursed child, outlander सारखे तुम्ही कितीही प्रयत्न करा भूतकाळ बदलता येत नाही असे दाखवायला हवे होते. ie तिसरा चित्रपट असा हवा होता कि judgment day त्याच दिवशी आलाय; वेगळ्या मार्गाने.

• Spiderman 1, 2, 3 पाहिले. मस्त आहेत. तिसरा जास्त आवडला.

• Amazing spiderman 1, 2 पाहिले. बरे आहेत.

• Batman 1, 2, 3 पाहिले. दुसराच आवडला. बाकी दोन्ही ठीकच आहेत. तिसर्याचा शेवटतर अगदी बाहुबलीसारखा वाटत होता. Spiderman पेक्षा Batman जास्त लोकप्रिय का आहे कळलं नाही. मलातर Spiderman च आवडतो.

बिटकॉइनजी बाळा Wed, 20/12/2017 - 12:26

In reply to by ॲमी

बॅटमॅन हा नर्डी आहे. नव्या गाड्या, जवळपास डार्क स्वभाव, आणि सर्वात उत्त्तम म्हणजे समप्रभावी नेमेसिस. म्हणून तो लोकप्रिय असावा. खरं खोटं बॅटोबा जाणे.

राजन बापट Thu, 21/12/2017 - 10:25

२०१६ साली आलेला फ्रेंच भाषेतला सिनेमा "एल्".

गेल्या वर्षी ऑस्करच्या स्पर्धेत असलेल्या चित्रपटांपैकी ( नेहमीप्रमाणे )अनेक राहून गेले होते. आणि (नेहमीप्रमाणेच) जसे जमतील तसे पहाण्याच्या चक्रनेमिक्रमेण घडणार्‍या क्रमामधे एकदाचा या सिनेमाचा नंबर लागला.

"सायकॉलॉजिकल थ्रिलर" या प्रकारात येणारा हा सिनेमा म्हणता म्हणता वर्षाहून जुना झालेला. कान् महोत्सवात नावाजला गेलेला आणि एकंदर आतापर्यंत बराचसा लोकांना ठाऊक असलेला आहे. लैंगिक हिंसा, त्यामागचे सूडाचे, सुप्त लैंगिक फँटसीजचे, त्यानिमित्ताने माणसांच्या नातेसंबंधांचे धागेदोरे असं त्याचं एकंदर स्वरूप. अर्थात "सायकॉलॉजिकल थ्रिलर" म्हणल्यावर थोड्याफार फरकाने हे घटक येणं अपरिहार्य आहेच. नाहीतर सिनेमा कौटुंबिक/सामाजिक स्वरूपाचा नसता का झाला? :-)

सिनेमाची मध्यवर्ती व्यक्तीरेखा असलेली जी बाई बलात्काराचं लक्ष्य बनते त्या व्यक्तिरेखेची गुंतागुंतीची मानसिक स्थिती, तिचा स्वतःचा असा एक मॉरल कंपास, तिची स्वतःची अशी एक नैतिक व्यवस्था - यांभोवती सिनेमा फिरतो. तिचा या बलात्काराच्या घटनेबद्दलचा रिस्पॉन्स गुंतागुंतीचा आहे आणि हा गुंतागुंतीचा रिस्पॉन्स तिच्या एकंदर भावनिक , व्यावहारिक पातळीवरच्या गुंतागुंतीचा एक अविभाज्य असा भाग आहे.

सिनेमातली ही बलात्कारविषयक घटना वगळली तरी हा सिनेमा फ्रान्ससारख्या समाजातल्या आजच्या काळच्या विवाह, कुटुंब आणि इतर व्यावसायिक, सामाजिक व्यवहाराचं, सद्यकालीन स्थितीत माणसांच्या व्यवहाराला आलेल्या स्वरूपाचं अगदी आखीवरेखीव कोरलेलं चित्रण करतो. आणि बलात्काराची घटनादेखील या सर्वात बेमालूमपणे विरघळलेली आहे.

इसाबेल ह्युपर्ट या फ्रेंच अभिनेत्रीने यातली प्रमुख भूमिका केलेली आहे. इतकी विविध पदर असलेली, खोलवरची भूमिका अगदी सहजपणे कशी निभावावी याचा एक आदर्श वस्तुपाठ.

सिनेमा शेवटपर्यंत उत्कंठावर्धक आहे आणि तरीही आंतरराष्ट्रीय दर्जाचं कलात्मक यश त्याने मिळवलं अशी दुर्मिळ प्रकारची किमया इथे साधलेली आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 18/02/2018 - 22:03

In reply to by राजन बापट

तुझ्यामुळे हा सिनेमा (एकदाचा) बघितला.

सुरुवातीलाच तिच्यावर बलात्कार झाल्याचं लक्षात येतं; तरीही 'ती पोलिसांत का जात नाही', हा प्रश्न चित्रपटातली पात्रंही विचारतात. मला तेव्हा जरा निराळ्या गोष्टी आठवल्या. म्हणजे #MeTooवर फ्रेंच बायांनी दिलेला प्रतिसाद आणि त्या प्रतिसादाची न्यू यॉर्करमध्ये झालेली चिकीत्सा आणि टिंगल दोन्ही. अर्थातच 'एल' हा फ्रेंच चित्रपट आहे (हिंदी आणि अमेरिकी नाही) त्यामुळे त्यात दिसताना एक गोष्ट दिसत असली तरी सांगायचं बरंच काही असतं.

चित्रपटात एक धार्मिक पात्र आहे. ते बघून सुरुवातीला लुईस बुन्युएलनं त्याच्या चित्रपटांमध्ये केलेली कॅथलिकांची टिंगल आठवली. 'एल'मध्ये धार्मिक लोकांबद्दल सहृदय दृष्टिकोन आहे. कॅथलिक स्त्रीचं माणूसपण दाखवताना ती स्खलनशील असणं दाखवलेलं नाही, तर क्षमाशील असणं दाखवलेलं आहे. त्यात कॅथलिकांची 'आपण पापी असतो' ही भूमिका आहे का काय, असाही संशय येतो.

#MeTooवर आलेला फ्रेंच बायांचा प्रतिसाद अजूनही हास्यास्पद वाटत असला तरीही, हा चित्रपट बघून त्या बायका कोणत्या जगात राहतात याची कल्पना आली. त्यावरून अमेरिका आणि अमेरिकी संस्कृती कशी मागास याबद्दल निराळी रँट लिहिता येईल. ते स्वतंत्रच ठेवलेलं बरं.

तरीही, राहवत नाही म्हणून एक सांगोवांगी -

बुधवारी, १४ फेब्रुवारीला अमेरिकेच्या फ्लोरीडा या राज्यात, एका शाळेत एका टीनेजरानं १७ लोकांना मारलं. मास शूटींग. योगायोगानं, या घटनेच्या काही तास आधी माझ्या नवमैत्रिणीबरोबर जेवायला गेले होते. तिच्याकडे एक रिव्हॉल्व्हर आहे. "मी एकटी राहते, मला असुरक्षित वाटतं. अमेरिकेत खूप गँग्ज आहेत. खूप गुन्हेगारी आहे. त्यामुळे माझ्यावर कोणी बलात्कार वगैरे करायला आलं तर बंदूक असलेली बरी", असं तिला वाटतं. सरकार आपल्याविरोधात भीषण काही करेल, म्हणूनही आपल्याकडे बंदूक असलेली बरं असं तिला वाटतं.

समाजाच्या असुरक्षितता, कोणत्या गोष्टींची समाजाला भीती वाटते, यावरून तो समाज कसा जगतो हे दिसतं. 'रिव्हर' मालिकेत डिटेक्टिव्ह रिव्हर म्हणतो, "समाज आपल्यातल्या मानसिक विकारांना बळी पडलेल्यांना कसं वागवतो, यावरून त्याची नैतिकता ठरते", तसंच काहीसं हे ही. अशा सगळ्या गोष्टी एका मागोमाग एक आठवत गेल्या.

व्यक्तिगत संवादात, जंतूनं 'एल'च्या संदर्भात आणखी एका चित्रपटाची शिफारस केली होती. त्याचं नाव विसरले. (शहराच्या ग्रंथालयात तो चित्रपट नाही. त्याला गोल्डन ग्लोब वगैरे मिळालेले नसणार.)

चिंतातुर जंतू Mon, 19/02/2018 - 00:03

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जंतूनं 'एल'च्या संदर्भात आणखी एका चित्रपटाची शिफारस केली होती. त्याचं नाव विसरले. (शहराच्या ग्रंथालयात तो चित्रपट नाही. त्याला गोल्डन ग्लोब वगैरे मिळालेले नसणार.)

हा तो चित्रपट.
स्खलनशील स्त्रिया दोन्हीत आहेत. फक्त, मला 'एल' अमेरिकन पुरुषी दृष्टीतून फ्रेंच स्त्रीचं एक्झॉटिकीकरण करून तिच्याकडे पाहणारा वाटला, तर हा एका फ्रेंच स्त्रीकडून (दिग्दर्शिका मिया हॅन्सन लव्ह) फ्रेंच स्त्रीकडे पाहण्याचा प्रयत्न आहे.

ॲमी Tue, 26/12/2017 - 10:20

विकांताला पाहिलेले चित्रपट:

Its wonderful life: बरा आहे.

Sound of music: अगदीच फालतू. याला ऑस्कर कसे काय मिळाले? गाणी चांगली आहेत ऐकायला.

North by northwest: हिचकॉक नेहमीच आवडतो. यातली हिरोईन अजिबातच नाही आवडली.

Blow up: आधी पाहिला होता तेव्हा आवडलेला. आतापण आवडला!

चिमणराव Tue, 26/12/2017 - 11:08

Sound of music: लहान मुलांसाठी आहे ना!
ग्रेट डिक्टेटरमध्ये चाप्लिन न्हाव्याच्या भुमिकेत हजामत करतो तेव्हाचे संगीत आवडले होते ते म्हणजे बिथोवनची सिंफनी होती हे कोणी सांगितलं होतं. दृष्याला पारश्वसंगीत नसून संगीताला दृश्य मजेदार.

एका बौद्धपद्धतीच्या लग्नाला जाण्याचा योग आला. पाऊण तासात आटोपलं. सुटसटीत आणि छान!

ॲमी Tue, 26/12/2017 - 11:46

In reply to by चिमणराव

Sound of music: लहान मुलांसाठी आहे ना!
>> नाय नाय मोठ्यांसाठीच आहे. सिंड्रेला, जेन एयर syndromवाला सिनेमा. गरीब, अनाथ नायिका.... श्रीमंत, राजबिंडा नायक....

अबापट Tue, 26/12/2017 - 16:23

In reply to by ॲमी

सिनेमा अगदी बाळबोध आहे . ( जसा बहुधा त्यावरून घेतलेला परिचय ) , पण गाणी लै भारी आहेत . ( पुन्हा एकदा ... यातील डो अ डिअर वरून जसेच्या तसे म्हणजे प्रसंग ते शब्द कॉपी मारलेले परिचय मधील सारे के सारे गामा को लेकर .. बघून थोर वगैरे गुलझार ची कणव येते )

बॅटमॅन Tue, 26/12/2017 - 13:02

स्टार वॉर्स द लास्ट जेडाय पाहिला. मस्त आवडला. एकूणच नवीन सेरीज उत्तम घेतलेली आहे. आता लास्ट एपिसोड ९ मध्ये ल्यूक नाही, फक्त च्यूबाका आणि लेआ हे दोनच ओल्डटायमर्स आहेत. पण लेआचे काम करणारी ॲक्ट्रेस काय नाव तिचे, ती तर मरण पावलेली असल्याने पुढच्या पिच्चरात ती नसेलच. मेन लढत ही कायलो रेन आणि ती हिरवीण ऑफ जक्कू यांमध्ये होईल. भारी प्रकार आहे एकूण. कायलो रेन डोक्यानं लैच कमी वाटतोय. नुस्ती बघावी तेव्हा डार्थ व्हेडरची नक्कल करतो.

चिमणराव Tue, 26/12/2017 - 15:11

लहान मुलांसाठी म्हणजे गाणं शिकणाय्रा मुलांसाठी. ७० साली*१ पाहिलाय. आता एक रशिअन का कुठल्या भाषेतला आहे युट्युबवर.
-
*१ असे जुने आमच्यालहानपणी वगैरे ~~

पुंबा Tue, 26/12/2017 - 16:46

बरेली की बर्फी पाहिला आवडला.
राजकुमार राव काय जबरदस्त आहे राव!! अफलातून! कसली जीव ओतून ॲक्टिंग करतो हा माणूस. त्याची आणि आयुष्यमान खुराणाची जुगलबंदी जोरदार. अल्लारखांचा तबला आणि पंडित रविशंकरांची सितार यांची जुगलबंदी आहे तसे वाटते पाहताना.
क्रिती सनोनने सुद्धा मस्त अभिनय केलाय यात.
बिट्टीचे आई- बाबा, विद्रोहीची आई, चिरागचा मित्र यांनीसुद्धा उत्तम अभिनय केलाय. दिग्दर्शिका आणि संवादलेखक यांचे विशेष अभिनंदन.

अनु राव Wed, 27/12/2017 - 10:01

शेरलॉक चा सिझन ४ चा पहिला भाग बघितला.
मला तरी अगदी बोगस वाटला. सर्वच चमत्कारिक वाटले. आंतरराष्टीय गुप्तहेरी वगैरे आणुन ह्या लोकांनी मुळ शेरलॉक चा आत्माच बदलला आहे.

अजिबात "इंग्लिश" दर्जाची सिरियल वाटत नाही. उथळ हाम्रिकी दर्जाची मालीका बनवली आहे. आधीचे ३ सिझन बघितले तरी होते, चौथा सिझन पूर्ण बघिन असे वाटत नाही.

फारएण्ड Mon, 08/01/2018 - 08:43

एचबीओ वर ही नवीन सिरीयल सुरू झाली आहे. "द वायर" वाल्या डेव्हिड सायमन चीच. तसेच डीटेलिंग, "स्ट्रीट" वातावरण वगैरे सगळे आहे. ही ७० च्या दशकाच्या सुरूवातीला न्यू यॉर्क मधल्या 42nd street चा एक पॅच (ज्याला बहुधा "ड्यूस" म्हणत/म्हणतात). तेथील वेश्याव्यवसाय व नंतर पॉर्न इण्डस्ट्री यावर आहे. द वायर मधले एक दोन कलाकार यातही आहेत - तो ड्रग्ज विकणारा डी'अँजेलो व दुसऱ्या सीझन मधला हार्बर वरचा फ्रॅन्क सोबोत्का, आणि इतरही एक दोघे आहेत.

जबरदस्त सिरीज आहे. अजून ८ एपिसोड्स च आले आहेत. जेम्स फ्रँको चे काम मस्त आहे. डबल रोल आहे, जुळे भाउ म्हणून. कोणताही सीन गंभीर किंवा वादावादीचा होत असताना दर २-३ संवादांनंतर मिश्किल पणे काहीतरी बोलून तो हसतो आणि आपल्यालाही हसवतो. मॅगी गाय्लेनहॉल (उच्चार माहीत नाही) ला ही बराच मोठा रोल आहे.

गब्बर सिंग Tue, 16/01/2018 - 01:16

टायगर जिंदा है बघितला. यथातथाच आहे. पण त्यातला एक छोटा सीन आवडला ज्यात आयएनएस मैसूर व आयएनएस तर्कश या दोन भारतीय युद्धनौकांना आखाताकडे रेस्क्यू करण्यासाठी जाणाचे आदेश दिले जातात असं टीव्ही वर सांगितलं जातं. तो सीन. ( क्लेरिकल मिष्टेक आहे त्यात. पण That Indian Govt. dispatches 2 warships to participate in the rescue mission (and to project power), is something. ). हिंदी चित्रपटांमधे हे असं फार कमी वेळा दाखवलं जातं.

ॲमी Tue, 16/01/2018 - 08:15

In reply to by गब्बर सिंग

टायगर जिंदा है मीपण पाहिला नववर्षसंध्येच्या पहाटेचा ८.३० चा शो. (साडेसात वर्षांनी थिएटर मध्ये गेलेले. काईट्स चित्रपट पहिला दिवस दुसरा शो पाहण्याच्या धक्यातून सावरायला एवढा काळ लागला मला :D. छान झालेत थिएटर आजकाल. चित्रपटाआधी डॉल्बीमुळे वेगवेगळ्या आवाजाचे अनुभव कसे येतात ते ऐकवल ते छान वाटलं. खुर्च्या हलक्याशा रिक्लाइन करता येत होत्या. तिकीटपण मोबाईलवरच स्कॅन होत. कोणत्यातरी ऑफरमुळे मिळालेल्या ८०₹च्या तिकीटमधे एवढं सगळं म्हणजे लय भारी. बरीच चिल्लिपिल्ली आलेली सकाळीसकाळी शिणमा पहायला.)

जिंदा टायगर आवडला मला बऱ्यापैकी. ऍक्शन सिन वगैरे छान आहेत. पण सलमान अगदी पूर्ण स्टीफ झालाय, अजिबात हलता येत नाहीय त्याला. कतरिनाचेपन आता वय दिसू लागले आहे (त्याच दिवशी संध्याकाळी एक था टायगर पाहिला. त्यामुळेतर हे अधिकच जाणवले. एथाटामधे फारच गोडुली दिसलीय ती. बाकी तो चित्रपट भंगार आहे). तो एकच जो ऍक्शन सिन दिलाय तिला; तो छान केलाय तिने. बाकी ते पोरगं आणि कोल्हा वगैरे नसते तर चाललं असत. ते एक वर्षश्राद्धाच गाणंपन काढून टाकायला हवं होत.
आणि नेहमीप्रमाणेच मला हिरोसोडून व्हिलनच आवडला. कसला चिकणा आहे तो आणि त्याचा आवाज, उच्चार! एकदम डोळ्यात बदाम वगैरे :-P. अंगद बेदीपन छान हँडसम आहे.
तो गिरीश कर्नाडसोबत नेहमी असतो त्या रॉ अधिकाऱ्याला एवढं फुटेज का दिलं होतं काय माहित....

गब्बर सिंग Tue, 16/01/2018 - 08:41

In reply to by ॲमी

तो गिरीश कर्नाडसोबत नेहमी असतो त्या रॉ अधिकाऱ्याला एवढं फुटेज का दिलं होतं काय माहित....

व तो सुद्धा नेहमीप्रमाणे अतिसुमार दाखवलेला आहे. म्हंजे हिरो-हिरॉईन् शिवाय दुसऱ्याकडे कोणतेही हुनर नसतंच. हीरो शिवाय दुसऱ्यांकडे फक्त देशभक्ती चा जजबा असतो. खरंच ??

(१) पिक्चर मधे नेहमी प्रमाणे "हेतूंची विशुद्धता असली की सगळं व्यवस्थित घडतं" चा फालतूपणा आहे. रॉ व आयएसाअय एकत्र ?? रियली ? आय एस आय चे एजंट डबलक्रॉस करतील याचा विचार नाही ? अरे किती चाटाल त्या किळसवाण्या पाकिस्तानची ??

(२) म्हणे - ये हमे इन्सानियत के लिये करना है ??? खरंच ? अशा मिशन मधे त्या नर्सेस ना सोडवून आणण्यावर फोकस असणं महत्वाचं की दुसऱ्या देशात जाऊन तिसऱ्या देशाच्या दहशतवाद्याने चौथ्या देशातल्या फिदायीन बालदहशतवाद्याला जे सेटप केलेले असते त्यातून त्या बालदहशतवाद्याला वाचवणे महत्वाचे ??

(३) प्रधानमंत्र्यांनी त्या दोन युद्धनौकांना आखाताकडे जाण्याचे आदेश दिले ?? प्रधानमंत्र्यांनी ?? रियली ??

(४) कसलीही स्ट्रॅटेजी नाही. नुसतं औषधं बदलण्याचा चलाखपणा करून सगळं होतं ?

(५) त्या दोन युद्धनौकांचा पुढे काय रोल असतो ?? शून्य. कणेकर म्हणतात तसं नाटकाच्या पहिल्या भागात भिंतीवर बंदूक टांगलेली दिसली तर शेवटच्या भागात तिचा बार उडलाच पायजे. नैतर बंदूक दाखवण्याचं प्रयोजन काय ?

गब्बर सिंग Wed, 17/01/2018 - 08:55

In reply to by ॲमी

असला आणि एवढा विचार करत नाही मी चित्रपट बघताना.

चित्रपट बघताना नव्हे.
चित्रपट बघून झाल्यावर.

The main difference between truth and fiction is that fiction has to make sense. असं म्हंटलेलं आहे. म्हणून विश्लेषण करतोय.

साधा विचार आहे - पाकी आय एस आय एजंटाला भारताच्या रॉ च्या मिशन मधे सहभागी होऊन रॉ ला डबल क्रॉस करून २५ भारतीय नर्सेस मारता आल्या तर त्या मारणे हे १५ पाकी नर्सेस ना वाचवण्यापेक्षा त्याच्या दृष्टिने जास्त महत्वाचे नाही का ? त्याला हे श्रेय मिळणार नाही का ? - त्याच्या बॉसेस च्या नजरेत तो अचानक गो-गेटर, टफ, यशस्वी फील्ड् ऑपरेटिव्ह होणार नाही का ??
.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 17/01/2018 - 06:17

In reply to by गब्बर सिंग

(१) पिक्चर मधे नेहमी प्रमाणे "हेतूंची विशुद्धता असली की सगळं व्यवस्थित घडतं" चा फालतूपणा आहे. रॉ व आयएसाअय एकत्र ?? रियली ? आय एस आय चे एजंट डबलक्रॉस करतील याचा विचार नाही ? अरे किती चाटाल त्या किळसवाण्या पाकिस्तानची ??
(२) म्हणे - ये हमे इन्सानियत के लिये करना है ??? खरंच ? अशा मिशन मधे त्या नर्सेस ना सोडवून आणण्यावर फोकस असणं महत्वाचं की दुसऱ्या देशात जाऊन तिसऱ्या देशाच्या दहशतवाद्याने चौथ्या देशातल्या फिदायीन बालदहशतवाद्याला जे सेटप केलेले असते त्यातून त्या बालदहशतवाद्याला वाचवणे महत्वाचे ??

५५० कोटींच्या वर धंदा केला सिनेमानं. तुम्हाला नको असेल पाकिस्तानची आणि इन्सानियत चाटलेली! पण पब्लिकला ते आवडतं. हे वाचा आणि अ-फडतूस लोकांच्या भावनांचा विचार करा.

चिंतातुर जंतू Wed, 24/01/2018 - 14:18

In reply to by गब्बर सिंग

>>त्या दोन युद्धनौकांचा पुढे काय रोल असतो ?? शून्य. कणेकर म्हणतात तसं नाटकाच्या पहिल्या भागात भिंतीवर बंदूक टांगलेली दिसली तर शेवटच्या भागात तिचा बार उडलाच पायजे. नैतर बंदूक दाखवण्याचं प्रयोजन काय ?<<

हे कणेकर म्हणाले असतील / नसतील, पण चेकॉव्ह नक्कीच आणि कणेकरांच्या आधीच म्हणाला आहे.

पाहा - Chekhov's gun

चिमणराव Thu, 25/01/2018 - 12:00

In reply to by चिंतातुर जंतू

जेम्स बांडपटात हे पाळतात. खोट्या चावीने दार उघडून खोलीत घुसतो, टेबलावर द्राक्षे, बाहेर पडताना आठवून परत दोन द्राक्षे खाऊन जातो.

ॲमी Mon, 22/01/2018 - 10:17

१९८१ : ४४४ दिवसांच्या ओलीसनाट्यानंतर इराणने ५२ अमेरिकी नागरिकांना सोडले. >> आता काही दिवसांपूर्वीच Argo पाहिला. छान आहे.

===
काल परत एकदा Ugly पाहिला. लय भारी आहे! कश्यपचा मला सगळ्यात जास्त आवडलेला चित्रपट...

आणि It happened one night पाहिला. दिल है के मानता नही आधी पाहिला असल्याने सगळं माहित होत पण तरी छान वाटला. आजकाल Clark Gable सारखे पुरुष बनत नाहीत वाटतं....कुठे गेली ती उत्क्रांती :-(

आदूबाळ Mon, 22/01/2018 - 14:49

In reply to by ॲमी

काल परत एकदा Ugly पाहिला. लय भारी आहे! कश्यपचा मला सगळ्यात जास्त आवडलेला चित्रपट...

अग्ली भारीच आहे, पण कश्यपचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडला हा अवघड प्रश्न आहे. मला 'वासेपूर' त्याच्या भव्य कॅन्व्हाससाठी आवडतो, आणि शेवटचा अर्धा तास** सोडून उरलेला 'पाँच' करकरीत रॉनेससाठी.

**शेवटच्या अर्ध्या तासाने मेजर माती खाल्ली आहे.

अनुप ढेरे Mon, 22/01/2018 - 14:52

In reply to by आदूबाळ

ब्लॅक फ्रायडे आणि वसेपूर हे इतर सिनेमांच्या हेड अँड शोल्डर वर आहेत. बाकीचे सर्व या दोन नंतर बऱ्याच गॅपने.

आदूबाळ Mon, 22/01/2018 - 14:58

In reply to by अनुप ढेरे

सहमत आहे. मध्येच मूड लागला की 'इम्तियाझ घवाटे'चा प्रसंग परत परत पाहतो. लय भारी आहे.

अनुरागने मुंबई दंगलींवर सिनेमा काढला तर भारी होईल. अर्थात तोही पाँचसारखाच अडकून बसेल याची खात्री आहे.

अनुप ढेरे Mon, 22/01/2018 - 15:23

In reply to by आदूबाळ

इम्तियाज गवातेचा पाठलाग सीन स्लम्डॉग च्या पहिल्या सीनची प्रेरणा आहे म्हणे... माझाही फेवरीट सीन आहे.
तोच सीन नंतर असाच बघताना काही रोचक गोष्टी ध्यानात येतात. पाठलागात बाजुच्या झोपड्यांमध्ये टीव्ही चालू असतात आणि एकदा अमिताभचा 'अमर, अकबर अँथनी'मधला "लाईफ मे एकईच बार ऐसा भागा ऐसा भागा..." हा डायलॉग ऐकू येतो. दुसऱ्या एका घरापाशी फिरोझ खानच्या आवाजात "हँड्स अप, हिलना भी मत, वरना गोली मार दुंगा" असा डायलॉग ऐकू येतो जो सिनेमातल्या स्थितीच्या अगदी विरोधाभासी आहे.

आदूबाळ Mon, 22/01/2018 - 15:58

In reply to by अनुप ढेरे

हो! कॉर्नर केलेल्या माणसाची तडफड, दमलेले पोलीस, या प्रकाराकडे विस्मयाने पाहणारे (पण कोणतीही बाजू न घेणारे) वस्तीतले लोक. सिरीयसनेस आणि स्लॅपस्टिक कॉमेडीच्या बॉर्डरवर घोटाळणारं चित्रण. भारी आहे. दिग्दर्शकाबरोबरच एडिटरचा (आरती बजाज) हात जाणवतो.

'पोलिसातिल माणुस तुम्ही जाणुन घ्याहो जरा' वगैरे टपराट समूहगीतं बसवण्याऐवजी हा सीन दाखवायला पाहिजे.

अनुप ढेरे Mon, 22/01/2018 - 16:12

In reply to by आदूबाळ

डोक्याचा भुगा न करता इतकं प्रभावी नॉन लिनिअर नॅरेशन हिंदी सिनेमामध्ये क्वचितच असेल. हॉलिवूडच्या "सली"मध्येपण असंच छान नॉन लिनिअर नॅरेशन आहे. मेमेंटोसारखं डोक्याचा भुगा करणारं नाही. डंकर्कमध्येही सुरुवातीला समजत नाही काही भाग काय चाललय ते.

ॲमी Mon, 22/01/2018 - 15:15

In reply to by ॲमी

माझं रँकिंग:
अग्ली
गुलाल
दॅट गर्ल इन यलो बुट्स
देव डी
लास्ट ट्रेन टू महाकाली
ब्लॅक फ्रायडे
बॉम्बे टॉकीज

गँग्स ऑफ वासेपूर, मुक्काबाझ, नो स्मोकिंग, पाँच, रमण राघव, रिटर्न ऑफ हनुमान अजून पाहिलेच नाहीत :-P

===
परत एकदा प्रश्न: कोणाकडे कश्यप, भारद्वाज, रजत कपूर झालंच तर श्याम बेनेगल वगैरेंच्या चित्रपटांचं कलेक्शन आहे का? कॉपी करून घ्यायला शोधतेय. इंग्रजी चित्रपट मिळतात पण हिंदी मिळत नाहीत :-|

अबापट Mon, 22/01/2018 - 16:31

अमेझॉन प्राईम घेतल्याने फुकट आलेल्या TV शोज मध्ये जुनीच मेंटॅलिस्ट बघायला सुरुवात केलीय परत .
अत्यंत टपराट अशी बोस्टन लीगल कुठे मिळते बघायला ?

ॲमी Mon, 29/01/2018 - 08:52

विकांताला पाहिलेले चित्रपट:

• फोबिया - सुरुवात जबरदस्त आहे. अगदी पॉज करून १०-१५ मिनिटं ब्रेक घेऊन मग परत चालू करावा लागला. अभिनय अत्युत्तम आहे सगळ्याचा. प्लँचेट सिननन्तरमात्र चित्रपट गंडला आहे असे वाटले. शेवट मलातरी नीट कळला नाही ((स्पॉइलर तिला सगळे prenotions होत असतात का? कशामुळे? बालपणी डोक्यावर पडलेली असते म्हणून? शेवटी ती बरी होते का? /स्पॉइलर))

• WALL.E - तेचते विनाश झालेली पृथ्वी, प्रेम, मनुष्य विरुद्ध मशीन. फारसा आवडला नाही.

• गांधी - फारसे बोलायची गरज नसावी. पण हाफ चड्डी गॅंगला (कोपरापासून?) नमस्कार करत गांधीजींनी केलेली विनंतीमात्र लक्षात राहिली. आणि आंबेडकर हवे होते चित्रपटात.

'न'वी बाजू Tue, 06/02/2018 - 09:19

In reply to by ॲमी

• गांधी - फारसे बोलायची गरज नसावी. पण हाफ चड्डी गॅंगला (कोपरापासून?) नमस्कार करत गांधीजींनी केलेली विनंतीमात्र लक्षात राहिली.

य वर्षे झाली तो पिच्चर बघून. (य ~= ३०) हा नेमका कोणता प्रसंग म्हणे? जरा तपशीलवार आठवण करून देता का?

आणि आंबेडकर हवे होते चित्रपटात.

राहिले खरे.

पण असे बघा - गांधी पिच्चरच्या न्यारेटिवच्या संदर्भात आंबेडकरांचा रोल कितीसा आहे? (स्वतंत्रपणे, आंबेडकर हे व्यक्तिमत्त्व म्हणून किंवा आंबेडकर हा स्वतंत्र विषय म्हणून नाही म्हणत मी. त्यांचे कर्तृत्व वादातीत आहे; तो प्रश्न नाही. परंतु हा पिच्चर गांधींबद्दल आहे, आंबेडकरांबद्दल नाही. आणि त्या दृष्टीने पाहता, आंबेडकरांची गांधींबरोबर जी सम टोटल इंटरअॅक्शन आहे, ती कथानकाच्या दृष्टीने कितीशी महत्त्वाची आहे? किंवा, ती (कथानकाच्या दृष्टीने) महत्त्वाची नाही, असे ठरवून तिला पूर्णपणे चाट देण्याचे प्रेरॉगेटिव दिग्दर्शकास नसावे काय?)

आंबेडकरांचे सोडा. गांधींच्याच आयुष्यातले काही प्रसंग घ्या. 'केट्ल'च्या स्पेलिंगचा प्रसंग, गांधींनी लहानपणी मित्राच्या नादी लागून चोरीच्या पैशाने मांसभक्षण केले नि नंतर पश्चात्तापाने वडिलांना कबुली दिली तो प्रसंग, झालेच तर गांधींचे वडील एकीकडे एका खोलीत मरत असताना शेजारच्या खोलीत गांधी पत्नीबरोबर रत होते तो प्रसंग. आता, हे गांधींच्या आयुष्यातले काही ठळक प्रसंग आहेत, याबद्दल वाद नसावा. शिवाय, ते वेल-डॉक्युमेंटेडसुद्धा आहेत - थेट त्यांच्या आत्मचरित्रात आहेत. (चूभूद्याघ्या. तो केट्लच्या स्पेलिंगचा प्रसंग 'सत्याच्या प्रयोगां'त होता की नाही, नक्की आठवत नाही. बहुधा असावा. बाकीचे दोन निश्चित आहेत.) पण म्हणून ते या चित्रपटात यायलाच हवे होते, या म्हणण्याला कितपत अर्थ आहे? दिग्दर्शकाला चित्रपटातून जे गांधी उभे करायचे आहेत, त्याकरिता ते अजिबात महत्त्वाचे नसले, तरीही?

तसेच आहे हे थोडेसे.

ॲमी Tue, 06/02/2018 - 16:51

In reply to by 'न'वी बाजू

हा नेमका कोणता प्रसंग म्हणे? जरा तपशीलवार आठवण करून देता का? >> 2:37:00 च्या आसपास आहे तो प्रसंग. माउंटबॅटन भारतात आले आहेत. नेहरू, पटेल, आझाद, जिना आणि गांधी यांच्यासोबत प्रायमरी चर्चा झाली आहे आणि पाकिस्तान बनणार हे नक्की ठरले आहे. त्यानंतर गांधीच्या आश्रमाबाहेर RSS चे लोक (ज्यात सावरकर आणि नथुराम आहेत) काळे झेंडे घेऊन निदर्शन करत आहेत 'Death to Jinah' घोषणा देत. गांधी आणि इतर जिनाशी शेवटची चर्चा करायला निघतात तेव्हा सावरकर पुढे येऊन म्हणतात "Bapu, please don't do it." गांधी उत्तरतात "What you want me not to do? Not to meet with Mr. Jinnah? I am a muslim... and a hindu... and a christian... and a jew... and so all of you... when you wave those flags and shout you send fear into the hearts of your brothers... that is not the india i want... stop it! For god's sake, stop it!"

===
गांधींच्या बालपणीच काहीच नाहीय यात. साउथ आफ्रिका रेल्वेप्रवास पासूनच सुरुवात आहे.

===
आंबेडकरांची गांधींबरोबर जी सम टोटल इंटरअॅक्शन आहे, ती कथानकाच्या दृष्टीने कितीशी महत्त्वाची आहे? किंवा, ती (कथानकाच्या दृष्टीने) महत्त्वाची नाही, असे ठरवून तिला पूर्णपणे चाट देण्याचे प्रेरॉगेटिव दिग्दर्शकास नसावे काय?) >> तुमचं बरोबर आहे. पण वेगळा पाकिस्तान झाल्याने जो काही फरक पडला आणि वेगळे दलित मतदारसंघ न झाल्याने जो काही फरक पडला त्या दिशेने मी विचार करत होते....

===
पूर्ण अवांतर: गेले काही दिवस ऐसी जाम गंडल आहे... मोबाईलवर अजिबात लोड होत नाही...

बिटकॉइनजी बाळा Mon, 29/01/2018 - 12:09

निवांत वेळ आणि मूड प्रसन्न असल्याने नेटफ्लिक्सावर "क्रेझी एक्स गर्ल्फ्रेण्ड" आणि "अनब्रेकेबल किमी" या दोन मालिका बिंजवल्या.
क्रेझी एक्स गर्ल्फ्रेण्ड साधारणत: म्युझिकल आहे आणि सर्व गाणी भन्नाट विनोदी आहेत. नाव अगदीच गुळमुळीत असलं तरी मालिका मात्र मस्त फ्रेश आहे. रोटन वर दोन्ही मालिकांना दणदणीत लालभडक टमाटे आहेत, त्यामुळे रोटनवरती पुनर्विश्वास बसला. आता "बेटर थिंग्ज" रडारवर आहे.
बाकी पद्मावत पाहायचा चान्स होता पण वरील मालिकांनी दिवस अगदी मस्त गेले.

उसंत सखू Mon, 05/02/2018 - 22:30

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवणार असलेला अर्जेंटिनाचा "झामा" हा चित्रपट मला आवडला पण तुला बघायचा कि नाही ते तू ठरव असे सिनेगुरुजींनी सांगितले. त्यामुळे तो बघायचा नक्कीच झालं.कुठलाही रिव्ह्यू आणि सारांश न वाचता काय समजतं ते बघायचं अशी वर्ल्ड सिनेमा बघतानाची सवय आहे. सिनेमा सुरु झाला. मध्यमवयीन देखणा नायक झामा समुद्रकिनारी उभा असतो अशी सुरेख चित्रमय चौकट दिसली. सिनेमा सुरु होऊन संवाद सुरु झाले तरी सबटायटल्स दिसेनात. ती मोठ्ठाले आकार धारण करून रसातळाला गेली होती. आम्ही बोंबाबोंब केल्यावर ती लघुरूपात अवतरली.पंधरा मिनिटं काही कळत नव्हतंच पण सबटायटल्स सुरु झाली तरीही नक्की काय सुरु आहे कळेना. पिरियड ड्रॅमा सिनेमातले ते गाव ,तिथली लोकं ,त्यांचं वागणं सगळंच इतकं हास्यास्पद वाटू लागलं कि आम्ही मैत्रिणी अगदी खुर्चीवरून कोसळून पडेपर्यंत हसून हसून मॅड झालो. फिल्म बघायला पंधरा लोकं विखरून बसल्याने कोणाला आमच्या आवाज दाबून हसण्याचा त्रास झाला नाही.
सिनेमात गिचिडमीचिड घरं ,अंधार ,कृष्णवर्णीय दास दासी आणि प्राणी यांची रेलचेल आहे.समजा तीन दासी दाखवल्या असतील तर फ्रेममध्ये एकीचे स्तन उघडे असणे अनिवार्य आहे. तिचेच का बरं उघडे ,बाकीच्यांनी काय गुन्हा केला म्हणून त्यांना झाकपाक करावी लागली काही कळेना. दासाने उपरार्धाचं लज्जारक्षण केलं असेल तर त्याचं लंगोटीवालं बूड हेलकावत जातं. अनेक चित्रमय चौकटी दिसल्या ज्यात एखादा स्तन, नग्न अवयव नसेल किंवा एखादा प्राणी असल्याशिवाय सिनेमा पुढं सरकत नव्हता.केंव्हाही कुठेही अंघोळी चालल्या होत्या.ऑफिसर्स लहर लागली तर पांढरे विग घालून कामकाज करत होते. नम्र सेवक अगदी मालकाला चिकटूनच काम करायचे .त्यामुळे मालकाला केंव्हाही त्याला उगीचच फाडकन मुस्काडून काढायला सोयीचं जाई.एकदा एक लामा (उंटासारखा प्राणी) आता बदलीसाठी व्याकुळ झालेल्या नायकाच्या मानेचा मुका घेतो कि काय असही वाटलं.

नायक एकदा एका मान्यवर स्त्रीला भेटायला जातो तेंव्हाही दास, दासी चिकटूनच असतात.दास दोरीने कुईकुई आवाज करत पंखा फिरवून हवा खेळवत यांच्याकडे अनिमिष बघत असतो. दासी तर नायकासमोरच मालकिणीच्या वस्त्रांचे बंद, उघड बंद करते. तिचेही अनावृत्त अवयव दिसणार कि काय म्हणून नायकाला हुरूप वाटताच पुढे काही घडत नाही.तुझ्या कामासाठी तुला चुंबन दिले पाहिजे पण आत्ता नव्हे म्हणून ती निघून जाते.केवढे हे क्रौर्य !!

एका गावकऱ्याला बहुदा स्थानिक जीवनशैलीचाच भाग असलेल्या मंद हालचाली करणाऱ्या ,तीन सुंदर मुली असतात. तो नायकाला म्हणतो मला मुली असल्याने एका गुंड ,बलात्काऱ्याची भीति वाटते.नंतर एकदा त्या तीन मुली ,नायकाला एक लोटा पर अवर या वेगाने अंघोळ का घालत असतात ते नकळून हसून कोमात जायची पाळी आली होती.त्यातली रिटा बलात्कार झाल्याचे सांगते. काहीतरी विचारायचं म्हणून नायक विचारतो तुला फार जखमी केलं का ग त्यानं ? आं ssss !!!
ऑफिसातला एक क्लार्क कार्यालयीन वेळात पुस्तक लिहितो.ते त्याने का लिहिले याचा वृत्तांत लिहून काढेपर्यंत नायकाच्या त्या गावाहून बदलीसाठीचा अर्ज स्पेनच्या राजाकडे पाठवल्या जाणार नसतो.अशा अनेक अनाकलनीय विनोदी घटना घडत राहतात. अनेक वर्षे वाट पाहूनही नायकाची बदली होत नाही आणि तो एका गुंडाला पकडायला त्या गावातून निघून जातो. त्यानंतर एका आदिवासी टोळीतच अनावृत्त स्त्रिया दिसतात.मग काही स्कोप नसल्याने गुंडांशी चमत्कारिक मारामाऱ्या होऊन शेवटी नायक जखमी होतो आणि सिनेमा संपतो.
हुश्श्श !! विनोदी सिनेमेसुद्धा इतके विनोदी नसतात गडे !

फारएण्ड Wed, 07/02/2018 - 07:09

ही मूळची स्पॅनिश सिरीज नेटफ्लिक्स वर आली आहे. मस्त आहे. नेटफ्लिक्स ने इंग्रजीतून ऑडिओ सेटिंग करून दिल्याने सबटायल्स वर अवलंबून राहावे लागत नाही.

स्पेन च्या टांकसाळीतूनच पैसे चोरायचा मोठा प्लॅन आणि प्रत्यक्शात ती "हाइस्ट" अनेक दिवस चालू राहते, ती तशी चालू राहिल्याचा फायदा चोरांनाच मिळतो आणि पोलिसांच्या अनेक स्टेप्स्च्या एक स्टेप पुढे ते असतात हे सगळे एकदम खिळवून टाकणारे आहे.

टोटल बिंजवर्दी.

पुंबा Wed, 07/02/2018 - 12:59

'संगीत देवबाभळी' या नाटकाबद्दल फार उत्कट प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. कोणी पाहिलं आहे का? कसं आहे?

बिटकॉइनजी बाळा Wed, 07/02/2018 - 13:34

In reply to by पुंबा

आजकाल यु ट्यूब सारखी (फुकट) साधनं उपलब्ध आहेत हे या नाटकवाल्यांच्या गावीही नसते. नाटकाचा एखादा ट्रेलर, उत्सुकता तयार होईल असं काहीही करायला हे लोक इतके आळशी का असतात हेच कळत नाही. सगळेच लोक मटाच्या पुरवण्यांतल्या जाहिराती वाचतात आणि नाटकांना येतात असं यांना का वाटत असतं कुणास ठाऊक. नुसतं गुगल केलं तरी नाटककारांनी काही स्वत:हून केलंय असं काहीही नाही. "अमर फोटो स्टुडिओ" सारखं नाटक, नवं पाहायला आसुसलेले लोक डोक्यावर घेतात त्याला नाटकवाल्यांनी जाणीवपूर्वक केलेली उत्तम सोशल मिडिया प्रसिद्धी जबाबदार आहे.

ॲमी Tue, 13/02/2018 - 18:41

Liane Moriarty च्या Big Little Lies या पुस्तकावर बेतलेली HBO सिरीज बघितली. ५० मिनिटांचे ७ भाग आहेत.

पुस्तकातल्या ऑस्ट्रेलियाऐवजी कथानक कॅलिफोर्नियात घडताना दाखवलंय. टायटल ट्रॅक मस्त आहे. आपापल्या ६ वर्षांच्या मुलांना शाळेत सोडायला चाललेल्या आया. पहिल्या दिवशीच Madeline, Celeste आणि Jane यांची गट्टी जमते. Madie आणि Celeste त्याच शहरातील असल्याने आधीपासूनच एकमेकांना ओळखत असतात. Jane नुकतीच तिथे शिफ्ट झालेली single mom आहे. एकेकाळी स्वतःदेखील single mom असल्याने Madie लगेच Jane ला आपल्या पंखाखाली घेते. पहिल्याच दिवशी अशी काहीतरी घटना घडते की नोकरी न करणारी, अर्धवेळ नोकरी करणारी, अतिशय यशस्वी करिअर असणारी असे 'आई'चे वेगवेगळे गट बनतात आणि त्यांच्यात शीतयुद्ध चालू होतं. पुढेपुढे ते वाढत जातं. प्रत्येकजण आपापल्या भूत/वर्तमान काळातले baggage घेऊन वावरत, react होत आहे. पुढेपुढे ते तर हे इतकं वाढत कि एक खूनच होतो.

अभिनय अतिशय उत्तम झाला आहे सगळ्यांचाच. पण खासकरून Nicole, Alexander आणि Laura यांचा उल्लेख करावाच लागेल.

Gone Girl आणि Big Little Lies या दोन निर्मितीनंतर Reese च्या निर्णयक्षमतेबद्दल फारच आदर वाटू लागला आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 13/02/2018 - 22:26

In reply to by ॲमी

हे दोन्ही बघितलेले नाहीत; यथावकाश शोधून बघेनच.

रीज विदरस्पूनचा पदार्पदाचा चित्रपट The Man In the Moon याची शिफारस करेन. नुकत्याच वयात येणाऱ्या मुलीचं पहिलं प्रेम, हा चित्रपटाचा विषय. तलम, नितळ, हळूवार असे शब्द वापरण्याची भीती वाटते, पण या चित्रपटासाठी तेवढा धोका पत्करायला हरकत नाही.

चिंतातुर जंतू Sat, 17/02/2018 - 14:50

तुम्हाला मोठ्या पडद्यावर फूड पाॅर्न पाहायला आवडतं? - मग गुलाबजाम नक्की पाहा.
सिद्धार्थ चांदेकर म्हणजे अगदी खवा आहे असं तुम्हाला वाटतं? - मग गुलाबजाम नक्की पाहा.
तुम्हाला सोनाली कुलकर्णी चांगली अभिनेत्री वाटते?- मग गुलाबजाम नक्की पाहा.
तुम्हाला ममवचे फर्स्ट वर्ल्ड प्राॅब्लेम्स फील-गुड गोडीत सुटलेले पाहायला आवडतात? - मग गुलाबजाम नक्की पाहा.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 18/02/2018 - 21:50

In reply to by चिंतातुर जंतू

वरच्या चारही गोष्टींचं उत्तर 'नाही' असं आहे. गुलाबजाम वगैरे तर बघूनच जिभेची चव जाते. कुठेही मिळतात ते गुलाबजाम किती गोड असतात! असो. ती निराळीच रँट आहे.

मराठी अस्मिता का नाही आणलीत वरच्या प्रतिसादात? त्याबद्दल तुमचे (दहापैकी) दोन गुण कापण्यात येत आहेत.

उज्ज्वला Thu, 17/05/2018 - 20:23

In reply to by चिंतातुर जंतू

तुम्हाला सोनाली कुलकर्णी चांगली अभिनेत्री वाटते?- मग गुलाबजाम नक्की पाहा.
- हे विधान तिरकस की सरळ ?