सायकोसोशल
Jason, you're too fucking metal man
Too metal for your own good
You guys want some more don't ya
we're just getting warmed up now man
कुठल्याही समाजाचे आखणीबद्ध नियम, संकेत, परंपरा ह्यांचा दरवेळी बऱ्याच लोकांना त्रास होत असतो. संगीताचंही तसंच आहे. आत्तापर्यंतच्या सर्वमान्य असलेल्या संगीतातले बरेचसे नियम पायदळी तुडवून एक प्रकार निर्माण झालेला आहे. रॉक नवीन होतं तेव्हाही तेच. रॅप, हिप-हॉप, फंक आणि ब्लूजचंंही बरचसं तसंच. फरक इतकाच, की समजाची 'अमान्यता' ह्यांनी फाट्यावर मारली. 'आम्ही शोषित/वंचित म्हणून आमचं विचित्र संगीत खपवून घ्या', किंवा 'आम्ही तुमचं आवडून घेतलं, आता तुम्हाला आमचं संगीत आवडायला काय झालंय', 'आम्ही यंग, तुम्ही आऊटडेटेड' असा अभिनिवेश ह्यांच्यात कधीच नव्हता. हे संगीत आवडणं-न आवडणं हा सर्वस्वी व्यक्तिगत आवडींचा भाग आहे. एखादं गाणं तुम्ही ऐकलंच पाहिजे, आणि नाही ऐकलंत तर तुमचं हे करु अन् ते करु असलं काही सांगायला कोणी इथे बसलेलं नाही. हे वर्षानुवर्षे गाजलेलं आहे. एकाएकी यंत्रणेला जाग आणणारा निर्बुद्ध खेळ नाही, की आईवडलांपरोक्ष चालणारी बुवाबाजी संस्कृती नाही. इथे सगळ्यांना स्वत:चं स्ट्रगल वाढून ठेवलेलं आहे.
प्रसंग १:
काही लोकांना ह्यात्या ओळखी काढून/कोट्यातून चांगल्या ठिकाणी नोकरी/चांगल्या महाविद्यालयांत प्रवेश मिळतो. सीव्ही/गुण बरेच चांगले, भाषांवर चांगली पकड, बाकी बऱ्याच अचिव्हमेंट्स असतानाही तुम्हाला बऱ्याच चपला झिजवाव्या लागतात. क्षणोक्षणी तुम्हाला तुमच्या आणि 'त्यां'च्या आयुष्यातली तफावत दिसत राहते. तुम्हाला तुमच्या ह्या भाकड व्यथेचाही कंटाळा आलेला असतो. शिवाय तुमचं तोंड ह्याबाबतीत चांगलंच बंद केलं गेलेलं असतं.
I push my fingers into my eyes
It's the only thing that slowly stops the ache
प्रसंग २:
तुमच्या घराजवळ काहीतरी मिरवणूक असते. भयानक डॉल्बी सिस्टीम. तुमची उद्या परिक्षा आहे. तुमच्या खिडकीची तावदानं, दरवाजे भन्नाट थरथरत असतात. पोलिस ती मिरवणूक सुखरूप पार कशी पडेल ह्याच फंदात. परत एकदा तुमचं भविष्य, ह्या एखाद-दोन तासांवर दोलायमान.
Jesus, it never ends, it works its way inside
If the pain goes on...!
प्रसंग ३:
उगीच एक नातेवाईक, स्वत:चा फायदा नसताना फक्त मत्सरापायी तुमच्या कामात काड्या घालतो. तुम्ही त्याचं वय तुमच्या दुप्पट असल्याने काही फार करु शकत नाही. हे चालत नसेल तर एक आर्बिट्ररी प्रेमभंग वगैरेचा प्रसंग घालावा.
असेच आणखी काही प्रसंग. सभोवतालच्या गोंधळात, स्वत्व हरवल्याचा भास क्षणोक्षणी होत असतो. अगतिकता, नैराश्य, हतबलता वगैरे सगळं फालतू आहे, स्वत:वर विश्वास असला पाहिजे, तो कशातही डळमळीत झाला नाही पाहिजे इत्यादी बच्चन लहानपणापासून मिळत असतंच. किंबहुना, तुम्हीही ते कोणालातरी दिलेलंच असतं कधी ना कधी. पण. दरवेळी, सभोवतालचे हजारो लोक त्यांचं नैराश्य इथे तिथे काढत असताना पाहून तुम्ही पराकोटीचे शांत/संयमी; एकदम मर्यादापुरुषोत्तम (किंवा मर्यादास्त्र्यौत्तमा) बनायचा प्रयत्न करत असता. त्यामुळे, 'नकारात्मक भावना'वगैरे ज्या असतात त्यांचा निचरा फक्त रौद्र रुप धारण करतो. एक भयानक राग - तो अर्थ/समाज/राजकीय अशा कुठल्याही व्यवस्थेविरोधात, नातेसंबंधांत, अक्षरश: कुठेही; असू शकतो, जो साचत राहतो.
I've screamed until my veins collapsed
I've waited last, my time's elapsed
Now all I do with live with so much fate
तुमचा एक मित्र असतो. कमअस्सल अशाच प्रसंगांमधून जाणारा. पण त्याचं डोकं बरंच ताळ्यावर असतं. तो रांगांमध्येही शांत असतो बऱ्यापैकी. त्याचे हेडफोन/इअरफोन कानात कायम अडकवून तो जोरजोरात डोकं हलवत असताना तुम्ही त्याला कमीत कमी दररोज एकदातरी पाहता. मग त्याला विचारलं की तो तुम्हाला तो इअरफोनचा एक जॅक सोपवतो. त्याने आधी तीनदा तरी सांगितलेलं असतं की हे तुम्हाला आवडणार नाहीये म्हणून.
किंवा,
एखादा मारधाड चित्रपट पाहताना/गेम खेळताना/जिम मध्ये/बॉक्सिंग क्लास मध्ये कुठेही तुम्ही 'ते' ऐकता. छान वाटतं. ग्रिपींग. जोरकस. जबरी. जरा शोधाशोध करून तुम्हाला 'ते' काय आहे ते कळतं.
I wished for this, I bitched at that
I left behind this little fact
you cannot kill what you did not create
शब्द तुम्हाला प्रचंड आवडतात. संगीत तर भन्नाटच. एखादी चांगली फुगलेली जखम कापावी आणि भळाभळ रक्त वाहत असावं, आणि ते बरेच दिवस अंगावर वागवलेलं; कमी कमी होत गेल्यासारखं वाटावं. अगदी तुम्ही स्वत:च ते गाताय, ड्रम अगदी मनापासून झोडताय असं तुम्हाला वाटतं. एकाएकी तुमच्यातही पाशवी शक्ती आहे, आणि परिस्थिती अगदीच काही हाताबाहेर नाही गेलीये असं काहीसं वाटू लागतं.
तुम्ही अधिक कान देऊन ऐकता. काही बँड्जची तुम्हाला नावं कळतात. तुम्ही यूट्यूबवर जाऊन ती गाणी ऐकता. युट्यूब तयारच असतं अजून माल घेऊन. तुम्ही आता अधिकृतरित्या 'मेटलहेड' झालेले असता. ह्या कलाप्रकाराबद्दल (genre) तुम्ही भलभलतं काहीतरी नेहमीच ऐकलेलं असतं. हे सैतानाचं संगीत आहे, हे म्हणजे विकृत अत्याचारी माणसांचं संगीत आहे, सगळ्यात वर म्हणजे हे तर संगीतच नाहीए.. हेही ऐकलेलं/वाचलेलं असतं. नंतर इथेतिथे लोक अजून लिहीतात,
प्रचंड गोंगाट असलेले हे संगीत ऐकून एक तरुण मुलगा आत्महत्येला प्रवृत्त झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
हे कुठे काय, खरंच झालं का, नक्की ते संगीत ऐकल्यानेच झालं का वगैरे प्रश्न ह्या लोकांच्या मते वादातीत असतात. प्रचंड गोंगाट असतो. पण तो 'तुमचा' असतो. तुमच्यापुरता. आजूबाजूला चालू असलेले नसते गोंगाट, ते गोंगाट नाहीतच अशी धारणा असलेल्या, कधीही हे संगीत न ऐकलेल्या लोकांची आपल्या संगीत आवडी-निवडींवर भाष्य करायची क्षमता आहे का, हे प्रश्न तुम्हाला पडतात.
'Bout time I set this record straight
This needle nose punchin' is makin' me irate
मेटल हे संगीत नाही. किंबहुना, सर्वमान्य संगीताच्या निकषांवर अजिबात आधारित नसलेलं ते काहीतरी आहे, अशी आपली धारणा आहे. पण तेच त्याच्या यशाचं द्योतक आहे. कधीकधी त्या संगीतात ताल व्यवस्थित असतो. एसीडीसी, रॅमस्टिन, फाईव्ह फिंगर डेथ पंच. ह्याचे शब्द बरेचदा व्यवस्थेविरोधात असतात. ह्यांच्या गाण्यांत क्रांतीची नसली, तरी बंडाची, उठावाची भाषा असते. शांतपणे बसू न देण्याची भाषा असते. बाकी मृत्यूतर सोकावलेला आहेच की इथेतिथे घास घ्यायला, त्याचं इतकं स्तोम कशाला?
'क्रांतीकारक' वगैरे तर साधारण संगीतही कधीच नव्हतं, किंबहुना, असे जुनेच निकष लावून जर हे संगीत पहायचं असेल तर त्याच्याकडून क्रांती वगैरेच्या अपेक्षा कशाला?
मेटल संगीत(?) हे एक युद्ध आहे. व्यवस्थेविरोधातलं. हे अंगात भरपूर जोम, ॲड्रेनॅलिन असलेल्या तरुणांचं संगीत आहे. समाजातल्या मुळात असलेल्या-नसलेल्या सगळ्याच चौकटी उद्ध्वस्त करणारं हे संगीत आहे. मग त्या काहीही असोत- संधींचा अभाव, समाजातली असमानता ('असहिष्णुता' लिहीलं तर बोनस पॉइंट्स मिळतील का?) अपंग न्यायव्यवस्था, सुमारांची सद्दी ह्याविरोधातलं हे बंड आहे. ह्याबाबतीत एकवाक्यता आणायची असेल, तरुण मनं (शरीरं नाही, मनंच!) एकत्र आणायची असतील तर त्यांना भिडणारं, त्यांना भावणारं, उर्जादायक असं गीत लिहीलं जाणं अपरिहार्य आहे, आणि हेच प्रत्येक संगीतकाराचं अंतिम ध्येय असतं. त्यामुळे जर तरुण मनं तिथे ओढली जात असतील, तर तेच त्याचं यश आहे, आणि ते 'कालौघा'त बदलायला वेळ लागणार नाही.
विकसित देशांमध्ये साधारण सुखसोयी सहज मिळत असल्याने एखादी भावना तिच्या अत्युच्च, आदिम रुपात प्रगटणं जास्त शक्य आहे. म्हणून संपूर्ण संगीतप्राकाराला काही हिडीस घटनांमुळे रद्द ठरवणं हा रुचीहीनतेचा कळस आहे. खरंतर विकसनशील देशांना, त्यांतल्या तरुण, कर्तबगार पिढीला मात्र किंबहुना अशाच अस्वस्थ, आक्रमक संगीताची गरज आहे. तो त्यांचा आवाज आहे, आणि स्वघोषित संगीतज्ज्ञ हा कालौघ रोखू शकणार नाहीत.
राहता राहिला प्रश्न नैराश्याचा. मृत्यू, रडारड ही अनेकानेक 'क्लासिक' गाण्यांतून दिसलेली आहे. गज़ल हा जवळपास अख्खा प्रकार मृत्यू, दारु (अमली पदार्थ!) ह्यांवर आधारित आहे. अतिशय संथ आणि नैराश्यातून बंड न करता, ते नैराश्य चक्क साजरं करणारं, त्या नैराश्यातच दारू इत्यादींचं सेवन करत बसून रहा असं उपदेश करणारं हे संगीत अगदी दर्दींची आवड, 'अभिजात', सर्वमान्य, 'एलिट' म्हणून ओळखलं जातं.
हम ना करेंगे प्यार, तेरे बिना जिंदगी से शिकवा, हंगामा हैं क्यूं बरपा पासून
भरे नैना, तनहाई, जरुरी था ह्या गाण्यांत ते ठासून भरलेलं आहे. पण ही गाणी अप्रतिम म्हणून गणली जातात; आणि त्यांच्या जागी ती आहेतही.
I gotta say what I gotta say, then I swear I'll go away
But I can't promise you'll enjoy the noise
ह्या भाकड रडारडीला कंटाळून, जगाचे सगळेच नियम पायदळी तुडवून बनलेलं ते संगीत आहे. त्यात भाषा नैराश्याची असली, तरीही संगीत धगधगतं, त्या नैराश्यातून पेटून उठणाऱ्या माणसांचं, अशाच उष्ण रक्तांच्या माणसांसाठी आहे. स्लिपनॉट, अव्हेंज्ड सेव्हनफोल्ड, मेटॅलिका, स्लेअर ही त्यांच्यातली काही नावं. त्यांचं संगीत हे बंडखोर आहे. ते फक्त आणि फक्त, ह्याच माणसांसाठी बनवलेलं आहे.
सरसकट ते टीनएजर्सवर प्रभाव पाडण्यासाठी केलेलं आहे ह्या आरोपात काहीही तथ्य नाही. खरंतर त्याचा अपप्रचारच इतका होत असतो की हे संगीत आवडणं, ही एक चॉईस असते. परत सामान्य गाणी ऐकत असलेल्या कोणत्याही माणसाला ते चटकन आवडण्यासारखं नाहीच. एखाद्या संस्कृती किंवा नियमबद्ध खेळासारखं ह्यात अडकायचं बंधन नाही. तुमचा फोन, तुमचा म्युझिक प्लेअर. नाही आवडलं की करा डिलीट. इथे तुमचं आयुष्य बरबाद करायची धमकी नाही, की डिलीट बटण दाबायला तुमच्या बोटांना मनाई नाही.
जाता जाता इतकंच;
नैराश्यासाठी हे संगीत क्रांतिकारक न वाटता काहीतरी तालमात्राबद्ध विलापिका ऐकणाऱ्यांनी ह्याच्या वाटेला जाऊ नये. वाटेला गेलात, तर ते ऐकणाऱ्यांबद्दल काहीतरी अवाजवी टोकाचं मतप्रदर्शन करु नये. तुम्हाला जी गोष्ट आवडत असेल, तिच्याबद्दलही लोकांची इतकीच टोकाची मतं असू शकतात ह्याचं भान ठेवावं.
Can you read between the lines?
Or are you stuck in black and white?
Hope I'm on the list of people that you hate
It's time you met the monster that you have helped create
(उद्धृत ओळी ह्या मेटॅलिका, स्लिपनॉट आणि फाईव्ह फिंगर डेथ पंच ह्यांच्याच व्हिप्लॅश(!), ड्युॲलिटी, स्पिट इट आऊट आणि मीट द मॉन्स्टर ह्या गीतांतून साभार.
प्रस्तुत लेख हा ह्या लेखावरच्या मेटल म्युझिकबाबत भागाबद्दलची प्रतिक्रिया आहे. सरसकट एका चांगल्या कलाप्रकाराला उगीच काळिमा फासणे, त्याच्याबद्दल टोकाचा अपप्रचार करणे, आणि अनिष्ट प्रकारांशी त्याची तुलना करणे ह्याबाबत.)
++ बोर होते++
++ बोर होते++
तुमचा वैयक्तिक चॉईस म्हणून तुम्हाला ठीक आहे .
पण कुठलीही व्यथा असेल ( किंवा हर्ष सुद्धा चालेल ) असेल तर ती कलेतून व्यक्त होऊच नये काय ?
या न्यायाने काय वाचावे ? फक्त वर्तमानपत्र ( पण सालं , तेही अजेंडा घेऊन असतात )
अवांतर : हे तुम्ही अगदी उच्चभ्रू व्हायला लागल्याची लक्षणे आहेत हो !! जपून
पण कुठलीही व्यथा असेल ( किंवा
पण कुठलीही व्यथा असेल ( किंवा हर्ष सुद्धा चालेल ) असेल तर ती कलेतून व्यक्त होऊच नये काय ?
कलेतुन व्यक्त होणे वेगळे आणि त्या अजेंडा साठिच कुठला तरी कलाप्रकार असणे वेगळे. उदा फिल्म्स डिव्हिजन च्या डॉक्युमेंटरी, सामाजिक विषय घेउन केलेली पथनाट्य..
मला स्वताला मेटल्स मधे विद्रोहा बरोबर बाकी सर्व मानवी भावभावनांना स्थान असावे असे वाटते.
---------
मी मेटल्स वर कॉमेंट केली नाही तर मी लेखातल्या त्या वाक्यावर कॉमेंट केली. त्या कॉमेंटचा मेटल्स शी काही संबंध नाही,
+++कलेतुन व्यक्त होणे वेगळे
+++कलेतुन व्यक्त होणे वेगळे आणि त्या अजेंडा साठिच कुठला तरी कलाप्रकार+++
यात अजेंडा साठी लिहिलं गेलं आहे आणि कलेतून व्यक्त होण्याकरता नाही हा शोध तुम्हाला कुठून लागला ?
ब्लूज ( संगीत व लिरिक्स ) मध्ये गुलामांच्या अशिक्षित /भणंग वंशजांकडून व्यथा व्यक्त होतात , तिथेही तुम्ही असेच म्हणणार का ?
अवांतर व भडकाऊ : आयुष्य फार नशीबवान चौकीनी सुखात गेल्यावर यातील व्यथा भिडणं अशक्य असतं /असावं . तशी तर काही अडचण नाही ना ?
राग मनू नये . हळू घ्यावे .
मी नाही काही लिहिले. लेखकानीच
मी नाही काही लिहिले. लेखकानीच खालील वाक्य लिहिले
मेटल संगीत(?) हे एक युद्ध आहे. व्यवस्थेविरोधातलं.
अवांतर : ( पुन्हा ह्याचा मेटल्स शी संबंध लाउ नये )
दुसरे म्हणजे, व्यथा सर्वांनाच असतात. प्रत्येकाला आपल्या व्यथा मोठ्या वाटतात. कोणाला कसल्या तर कोणाला कसल्या. व्यथा फक्त वाईट आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीतल्या लोकांनाच असतात असे नाही तर उत्तम सामाजिक आणि आर्थिक परिस्तितीतिल लोकांना पण असतात. त्या तितक्याच ग्रेव्ह असतात ( त्यांच्या साठी ).
हम्म्म्म...
उत्तम सामाजिक आणि आर्थिक परिस्तितीतिल लोकांना पण असतात
अगदी खरंय.
पण वर्क फ्रॉम होम करत असताना पावसामुळे वायफाय किरकिरत असण्याची चिंता करणं, आणि आज दोन मैल चालत जाऊन पाणी आणलं, पण उद्याचं काय ह्याची चिंता असणं ह्यात बर्राच फरक आहे.
आणि मेटल दोघांसाठीही आहे.
पण वर्क फ्रॉम होम करत असताना
पण वर्क फ्रॉम होम करत असताना पावसामुळे वायफाय किरकिरत असण्याची चिंता करणं, आणि आज दोन मैल चालत जाऊन पाणी आणलं, पण उद्याचं काय ह्याची चिंता असणं ह्यात बर्राच फरक आहे.
असे तुम्हाला वाटते. ज्याच्या व्यथा त्याच्या पाशी. कोणा एकाच्याच व्यथा "ग्लोरीफाय" करायची गरज नाही.
तिकडचं उचलून इकडे टाकलय.
तिकडचं उचलून इकडे टाकलय.
आपल्या हातात काय आहे ते करावं. चार टाळक्यांशी चर्चा करू नये.
१) मुलांना महागड्या क्लासला का पाठवता? ९२% मिळाले तरी पाचसहा लाख ओतायचे आहेत,६५% मिळाले तरीसुद्धा. मग क्लासची अडीच तीन लाख का खर्च करावी?
२) सणांचे टाइमटेबल पाहून अभ्यास करावा.
३) मोठ्या व्यक्तिंना फुकटचा भाव देऊ नये. सामायिक इस्टेटींमुळे बांधले गेले असल्यास वेळीच तोंड उघडावे.
४) पैसे खर्च करून कोणी त्याचा छंद करतोय तर मला काय त्रास?
५) समाज घडवायचा मक्ता शिक्षकांना दिला आहे असा काहींचा गैरसमज होता. आता इतरांनीही कशाला गळे काढावे?
६) दुसय्राच्या घराच्या किचिनमधून जळणारा पापड दिसला तर चुकचुकायच्या अगोदर आपल्या घरात कुठे इस्त्री बंद करायची राहून गेली आहे का पाहावे. आग लागू शकते.
७) समाजात श्रद्धेचाही रोग पसरत आहे असे दिसल्यास फोटोफ्रेमचे/ पुजासाहित्यभांडार काढावे.
तुमच्या चक्राकार मार्गाला माझे विचार स्पर्शून दूर जात असतील तर सोडून द्या , न्युटनच्या नियमाने ते असेच अंतराळात भरकटत राहातील.
;)
मुलांना महागड्या क्लासला का
मुलांना महागड्या क्लासला का पाठवता?
कारण कॉलेजमध्ये शिकवत नाहीत. पालक उच्चशिक्षित असले तरी कामही करणं आणि अभ्यासही घेणं शक्य नसतं. 'स्वस्त' असे क्लास नसतातच, किंवा जे असतात त्यातले शिक्षक सुमार असतात.
सणांचे टाइमटेबल पाहून अभ्यास करावा.
म्हणजे, समजा नेमकी गणपतीच्या लगेच नंतर परीक्षा असेल तर परीक्षेच्या २-३ आठवडे आधी अभ्यास करावा, परीक्षेच्या आदल्या दिवशी बिंधास्त नाचावे.
मोठ्या व्यक्तिंना फुकटचा भाव देऊ नये.
मी कोणालाच फुकटचा भाव देत नाही. ह्यात वयाचं बंधन नाही. मोठ्या व्यक्तींचे जे दुसऱ्या मोठ्या व्यक्तींशी संपर्क असतात त्यातून ते बरीच गोची करू शकतात. करतात.
पैसे खर्च करून कोणी त्याचा छंद करतोय
अवांतर/आकलनात चूक. हेडफोन वाला प्रसंग ही लेखाची खरी सुरुवात आहे. आधीच्या प्रसंगांपैकी तो नाही.
समाज घडवायचा मक्ता शिक्षकांना दिला आहे
काय संबंध?
दुसय्राच्या घराच्या किचिनमधून जळणारा पापड दिसला
आम्ही दुसऱ्याच्या किचनमध्ये पाहू शकत नाही. जस्ट मुंबई थिंग्ज.
समाजात श्रद्धेचाही रोग पसरत आहे
तर वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावेत. मान्य. इथे काय संबंध?
तुम्ही जुन्या जमान्यातले आहात
तुम्ही जुन्या जमान्यातले आहात हे अगदी स्पष्ट होतं आहे.
१) मुलांना महागड्या क्लासला का पाठवता? ९२% मिळाले तरी पाचसहा लाख ओतायचे आहेत,६५% मिळाले तरीसुद्धा. मग क्लासची अडीच तीन लाख का खर्च करावी? -> ९२% मिळाले तर चांगल्या कॉलेजात पाच सहा लाख ओतावे लागतात , ६५% मिळाले तर फलाणे ढिकाणे कॉलेजात.
बाकीचे मुद्दे कळ काढायला आणि अस्सल पुणेरी (सोडून द्या हे वर) असल्यामुळे दुर्ल्क्षित..
मस्त
छानच लिहिलंय. मेटल ऐकण्याची मजा काही वेगळीच आहे. मराठी माध्यमात शिकल्याने अगदी सुरुवातीला ऐकत होतो (११वी-१२वी) तेव्हा शब्द/उच्चार काहीच समजायचे नाहीत. तेव्हा फक्त त्याच्या वेगळ्या साऊंडसाठी ऐकायचो. तेव्हा रामस्टाईन आणि मेटॅलिका आवडत. जुन्या हार्ड ड्राईव्हवर अजूनही हे सगळे ब्यांड्स असतील. गंमत म्हणून शोधले पाहिजेत. नंतर येनकेन प्रकारेण 'इंग्लिश गाण्यांशी' असलेला संबंध तुटला.
नैराश्यासाठी हे संगीत
नैराश्यासाठी हे संगीत क्रांतिकारक न वाटता काहीतरी तालमात्राबद्ध विलापिका ऐकणाऱ्यांनी ह्याच्या वाटेला जाऊ नये. वाटेला गेलात, तर ते ऐकणाऱ्यांबद्दल काहीतरी अवाजवी टोकाचं मतप्रदर्शन करु नये. तुम्हाला जी गोष्ट आवडत असेल, तिच्याबद्दलही लोकांची इतकीच टोकाची मतं असू शकतात ह्याचं भान ठेवावं.
ह्याच्याशी सहमत.
संगीताचा एक प्रकार म्हणून रॉक किंवा मेटल ऐकणं आणि बंड म्हणून किंवा निषेध (तत्सम गोष्टिंकरिता) म्हणून ऐकणं या वेगळ्या गोष्टी आहेत.
नुसत संगीत म्हणून ऐकणं मलातरी ते असह्य आहे.
जिद्दिने त्वेषाने ड्र्म बडवणारे, घसा फाडून ओरडणारे लोक संगीत म्हणून मी नाही ऐकू शकत.
नैराश्य चिड, राग मत्सर व्यक्त करण्याच्या पद्धती वेगळ्या, सभा , वादविवाद , मोर्चे, बंडाळी, संगीत काहीही असू शकतं.
त्याची इन्टेन्सिटी महत्वाची वाटते मला. मेटल हे मला टोकाचा राग व्यक्त करत असल्याची भावना देतं.
इतकं जर मनात साचत असेल तर कुठेतरी मोकळं व्ह्यायची गरज आहे.
नाही.
माझं म्हणणं हे आहे की हेही संगीतच आहे, काही खास प्रकारच्या माणसांनी, काही खास प्रकारच्या माणसांसाठी बनवलेलं.
त्या लेखात लिहीलंय तसं ते 'सैतानी', 'स्पेशली/सेडिस्टिकली इन्फ्ल्यूएंशिअल' असं नाहीये.
ज्यांना बंड करता येत नाही/किंवा करुन फायदा नसतो त्यांच्यासाठी आहे ते. ते ऐकून मनातलं साचलेलं फार निघून वगैरे जातं असं काही नाही.
पण लोक जेव्हा बाकीची गाणी ऐकतात, ती एका भावनेसाठी. उदा. समजा तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना जुन्या आठवणीं/सहलींबद्दल सांगायचं असेल तर तुम्ही ते जाऊन सांगितलं पाहिजे. त्यासाठी 'दिल चाहता है' फक्त ऐकत बसून काही होणार नाही.
तशी मेटलची भावना आहे राग. राग हा कुठेतरी काढला पाहिजे,
वेगळ्या, सभा , वादविवाद , मोर्चे, बंडाळी, संगीत
ह्यांतून. पण म्हणून ते व्यक्त करणारं संगीत हे खरं संगीत नाही, सैतानाचं आहे इ. म्हणजे भंपकपणा आहे.
+++पण बेसुर किंचाळणे म्हणजे
+++पण बेसुर किंचाळणे म्हणजे कठीणच.+++
हे सर्व सापेक्ष आहे .
जुनेच उदाहरण देतो . भीमसेन जोशींची एखादी तुमच्या मते जबरदस्त तान हि पेरू देशातील भा शा संगीताबद्दल काहीही माहित नसलेल्या इसमाला ऐकवली तर तो "यांना काय झालंय , पोटात वगैरे दुखतंय का ? "वगैरे प्रेमळ चौकशी करेल अशी शक्यता नाकारता येत नाही .
अर्थात आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी न ऐकण्याचा हक्क तुम्हाला आहेच . त्याने ते बेसूर किंवा किंचाळणे ठरायला पाहिज़ेच्च असे काही नाही .
--
तुमच्या न आवडण्याच्या हक्काबद्दल आदर ..
( भीमसेन जोशी चाहत्यांनी राग मानू नये . हे फक्त एक काल्पनिक उदाहरण होते .)
गाणं म्हणायलाही आणि त्यातही
गाणं म्हणायलाही आणि त्यातही भीमसेन जोशींसारख्या ताना घ्यायला प्रचंड एनर्जी लागते. जसं मार्शल आर्टचा प्रयोग करताना तोंडाने आवाज केला असता तुमच्या पंच/किकला चांगल्या प्रकारे फोकस येतो असं म्हणतात त्याचप्रमाणे हातवारे केल्याने बऱ्याचे वेळेला लयीशी, तालाशी तुमचं गाणं सिंक्रोनाईझ होण्यास मदत होते आणि तानांमध्ये आणि आलापांमध्ये वजन जास्त चांगलं येतं. अर्थात भीमसेन जोशी ही कॉर्नर केस आहे हे नक्कीच. एवढे हातवारे आणि मुख्यत: वेडीवाकडी तोंडं करायची गरज पडत नाही.
आमच्या जुन्या कंपनीत आमचा
आमच्या जुन्या कंपनीत आमचा ब्रिटीश कोलॅबोरेटर आला होता. त्या काळी नुकताच ब्रेकफास्ट टीव्ही सुरू झाला होता. दूरदर्शन असल्याने सकाळी काहीतरी चांगले संगीत ऐकणे भाग असे.
तर हा इसम बिस्मिल्ला खान यांची सनई ऐकून आला होता. त्या सनई वाजून जे त्याला ऐकू आले त्याविषयीचे त्याचे इंटरप्रिटेशन "मांजराला बगलेत पकडून त्याची शेपटी ओढल्यास मांजर जसा आवाज करेल" असे होते. :)
कॅालेजात शिकवत नाहीत? कमाल
कॅालेजात शिकवत नाहीत? कमाल आहे. तिथे टवाळक्या करायच्या. नंतर पाच तास स्वत: घास म्हणायचं.
खालसा कॅालेजचा अनुभव आहे. सिनियर पोरंच सांगायची प्रायवेट कोचिंगला जाण्याची गरज नाही. प्रोफेसरांनी पहिल्याच दिवशी सांगितलं " मला पगार मिळतो, पूर्ण ४५ मिनिटे शिकवणार. ज्यांना टाइमपास करायचाय त्यांनी इतरांचा वेळ वाया घालवू नका." सर्वच दिपार्टमेंटस सिरिअस. थोडक्यात सवय पाडली टारगट पोरांनी.
कसले घंट्याचे नैराश्य? समाजकार्य आहे, कितीतरी कामं आहेत करायचीच तर. त्यानंतर मार उडी ब्लुव्हेल पकडायला म्हणावं
आजकाल अकरावी बारावी च्या
आजकाल अकरावी बारावी च्या कॉलेजात कुणीही काहीही शिकवत नाहीत. डे वगैरे प्रकार सोडून कुणी कॉलेज मध्ये फिरकत ही नाही.
इंटीग्रेटेड कॉलेजेस नावाचा जो प्रकार बोकाळला आहे त्याच्याशी तुम्ही अनभिज्ञ आहात असे दिसते.
क्लास मध्ये जायचं फक्त, प्रात्यक्षिक , उपस्थिती, सगळं क्लासवाले मॅनेज करतात. अर्थात अश्या क्लासेस ना पसंती जास्त असते.
पूर्वीची म्हणजे तुमच्या वेळेसच्या कॉलेजची प्रत तीच राहीलेली नाही.
ए१
१४टॅन, जियो.
आवर्जून सांगतो- लिहीत रहा. एक म्हणजे तुम्ही इथे नवीन काहीतरी (हाच तो ललित लेखनातला व्हेरिअन्स!) लिहीताय. आणि दुसरं म्हणजे माझ्यासारख्या अडाण्यांना ह्यातून काहीतरी नवीन गवसेल - की अरे हे संगीतसुद्धा बरं/चांगलं/छान आहे.
तेव्हा तुम्हाला जरी वाटलं की मेटल मधलं काही फार बेसिक आहे, कुणालाही माहिती असेल, तरी लिवाच. मराठी आंजावर फार फार बरं वाटतं असं वाचून.
छान!
छान लिहिलंय.
यावरून एक आठवलं. तुम्ही 'स्कूल ऑफ रॉक' हा रिचर्ड लिन्कलेटरचा चित्रपट पाहिला आहेत का? नसल्यास अवश्य पाहा. जॅक ब्लॅकने त्यात कमाल केली आहे.
रॉक संगीत म्हणजे काय हे शाळेतल्या मुलांना समजावून देताना व्यवस्थेविरोधात आवाज उठवणारे गाणे कसे आपसुखाने बनते याबाबतचा त्यातला एक प्रसंग मला भारी आवडतो. पुढील चित्रफीतीत ५२:४० ते ५७:१८ चालणारा प्रसंग पाहा. दुर्दैवाने चांगली फीत मिळाली नाही.
१:२६:२५ ते १:२९:४१ हाही एक प्रसंग पाहण्याजोगा आहे.
या अनुषंगाने एक प्रश्न : रॉक आणि मेटलमध्ये काय फरक आहे?
रा रा अमुक राव यांनी प्रश्न
रा रा अमुक राव यांनी प्रश्न विचारल्यामुळे ढोबळ उत्तर देत नाही . मेटल शब्दाचा उगम(म्हणे) स्टेपेनवोल्फ च्या born to be wild मुळे झाला असा प्रवाद आहे . गंमत म्हणजे हे गाणे अजिबात मेटल नाही . शुद्ध अर्ली रॉक आहे (१९६७-६८) च असावं . मस्त आहे . गेल्याच वर्षी भारतात कुठल्याशा गाडीच्या जाहिरातीकर्ता वापरलं गेलं.हे गाणे ' इझी रायडर' या चित्रपटात घेतले आहे . पीटर फोंडावर चित्रित आहे . सखोल उत्तरकर्ता चौदाव्यां कडे माईक देत आहे .
इतका काही माझा इतिहासाचा
इतका काही माझा इतिहासाचा अभ्यास नाही.
रॉक म्हणजे बऱ्यापैकी तालात बसवलेलं, मेलडियस असं जॉन्र आहे. फक्त त्यात कर्कश्श किंवा घोगऱ्या आवाजात व्होकल्स, किंचाळणे/ओरडणे, ड्रम आणि इलेक्ट्रिक गिटार सारखी फार बाकी कुठे वापरली न जाणारी वाद्यं ह्यांपैकी एक ऐकायला मिळतं. इतकं असूनही रॉक बरंच श्रवणीय असतं.
मेटलला हे मान्य नाही. काही बँड्ज ताल वगैरे ठेवतात, पण बरेचसे नाही ठेवत. बेस किंवा इलेक्ट्रिक गिटार जोरजोरात वाजवणं, ड्रम बडवणं (स्लिपनॉटचा शॉन 'क्लाऊन' क्रॅहान बीअर केग्ज वाजवतो!) आणि भेसूर आवाज (स्लिपनॉट, आयर्न मेडन, स्लेयर) किंवा कधीकधी मेलडिअस आवाज (हेलस्टॉर्म, लाकुना कॉईल, डिस्टर्ब्ड, ब्रेकींग बेंजामिन) ह्यांचं मिश्रण असतं. मुख्य म्हणजे गाण्याच्या शब्दांतली आक्रमकता, यमक नसणे वगैरे मेटल मध्ये असतं. रॉकमध्ये गाणी बरीच सोबर, साधारण, यमकात जनरली बसणारी असतात. (बीटल्स, निर्वाना, रेड हॉट चिली पेपर्स, गन्स अँड रोजेस इ.)
सरासरी मेटलमधलं इंग्लिश सरासरी रॉक इंग्लिशपेक्षा बरंच उच्चप्रतीचं असतं, आयर्न मेडन च्या अनेक कविता फार थोर आहेत.
हाहाहाहाहाहाहाहा
मेटलगाणं नुसतं ऐकून शब्द कळतात का?
कध्धीच नाही!
लेखाचं शीर्षक असलेल्या गाण्यात, "Packaging subversion- Pseudo-sacrosanct perversion" हे शब्द आहेत. 5fdp चे काही शब्द- "You imitate the ostracized, keep your head beneath the sand" असले शब्द ते ओरडत असतात. काहीही कळत नाही.
साधेही शब्द एकदम घशातून म्हटल्यामुळेही काही कळत नाही. गुगल प्ले लिरिक्स वर सायकोसोशलचं लिरिक्स अत्यंत वाईट दिलंय. एझेडलिरीक्स ही साईट पहावी.
बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते
बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते .पण येथील चर्चा तशी जनरल आहे . हार्ड रॉक , हेवी मेटल , मेटल याना येथील चर्चेत ढोबळ मानाने समानार्थी शब्द म्हणून वापरले जात आहे (!) . आणि खरं तर हेवी मेटल थंडर हे शब्द सुद्धा त्यांच्या यंत्र (पक्षी : फटफटी) संदर्भात आहेत , संगीत संदर्भात नाहीत ....वगैरे .( आपण पण ऐकता का यातलं काही म्हणजे जॅझ, स्विंग, ब्लुज, रॉक न रोल , रॉक , मेटल वगैरे .. इथे फार कमी आहेत ,म्हणून आपली प्रेमाणे चौकशी वगैरे ...)
सुद्धा त्यांच्या यंत्र (पक्षी
सुद्धा त्यांच्या यंत्र (पक्षी : फटफटी) संदर्भात आहेत , संगीत संदर्भात नाहीत
मला तरी तसं वाटत नाही. (तुम्ही सिनेमा पाहिला असेलच) सिनेमा हा 60 च्या दशकातील हिपी मुव्हमेंटची अनेक अंगं दाखवतो. ड्रग्र्ज, कम्युन्स वगैरे. त्यावेळी पॉप्युलर होत असलेलं संगीतही त्यात येतं. 70 च्या दशकांत पॉप्युलर झालेल्य अनेक संगीतकार-बॅंड्स वगैरेंनी हिपी कल्चरमधून अनेक गोष्टी उचलेल्या आहेत.
गाण्यातल्या ओळी अशा
"I like smoke and lightning
Heavy metal thunder
Racin' with the wind
And the feelin' that I'm under"
आपण पण ऐकता का यातलं काही....
हो आणि नाही. :-) (एक ना धड वगैरे..)
तत्वतः तुम्ही म्हणताय हे खरे
तत्वतः तुम्ही म्हणताय हे खरे असले ( म्हणजे हिप्पी/ ड्रग्स/ कम्युन वगैरे बाबतीत ) तरीही या संदर्भात खरे नाही . कारण हे गाणे 1967 किंवा 68 चे असावे , जेव्हा हेवी मेटल सोडा , रॉक सुद्धा तसे नवीन नवीन होते . हेवी मेटल / हार्ड रॉक वगैरे हे गाणे आल्यानंतरच्या 5 ते 25 वर्षात बहरले .म्हणून म्हणतो .अर्थात मतांतर असल्यास वाचायला आवडेल .
सिनेमा मी पाहिला नाहीये
मेटल
बॉर्न टु बी वाईल्ड हे हेवी मेटल आहे असे मी म्हणत नाहीए. हेवी मेटल-च्या उद्गात्यांमध्ये काही लोक स्टेपनवूल्फना पकडतात (काही पकडत नाहीत.) माझा मुद्दा इतकाच आहे की त्यामागे त्या गाण्यातील ते शब्द हे एक कारण आहे.
1968 मध्ये त्यांच्या स्टेफनवूल्फ हा अल्बम आला, त्यात हे गाणे होते. त्या अल्बमला काही लोक हार्ड रॉक, काही लोक हेवी मेटलमध्ये टाकतात. ते आहे का नाही हा फार जुना वादाचा मुद्दा आहे.
67 साली सान फ्रान्सिस्कोमध्ये (हिपी लोकांची कर्मभुमी) Vincebus Eruptum अल्बम रिलीझ झाला ज्याला लोक हेवी मेटलचा पहिला अल्बम असं मानतात. काही मानत नाहीत. असो. एकंदरीतच संगीतात उगम आणि कालांतराने निर्माण झालेला प्रकार यात नेहमीच फरक जाणवतो असं मला वाटतं.
मेटल म्युझिक (आणि इतर
मेटल म्युझिक (आणि इतर काहीबाही) वर एक लेख वाचला. एकदम ब्लु व्हेल शी तुलना केलेली आहे!
http://www.loksatta.com/coverstory-news/metal-music-blue-wheal-1535699/
चौदावे , भारी लिहिलं आहात !!
चौदावे , भारी लिहिलं आहात !!! झकास म्हणतो मी .
एकाच वेळी मार्मिक , माहितीपूर्ण आणि रोचक असे तिन्ही द्यायची सोय नाही म्हणून , नाही तर दिले असते .
बाकी मेटल ज्याचे अपत्य ते रॉक पण हेच म्हणते
आता त्या पूर्वीच्या रॉक न रोल मधील बंड आणि ब्लूज मधील आर्त दुःख या बद्दलही लिहा असा प्रेमळ आग्रह .
( आता तुम्ही लय पश्चिमा ला पातळ का म्हणाला होतात ते लक्षात आले . मी त्याला ठीकठाक म्हणत होतो , कारण त्यात बरेच जॉन्र मराठी वाचकांना निदान इंट्रोड्यूस तरी करून दिले होते . . पण हे जास्त चांगले व सखोल आहे )
लिवा हो अजून !!!
( त्या आर्टिकल च फार मनावर घेऊ नका , उथळ व अज्ञानी आहे ते !!)
अवांतर : मला आपला गाववाला भेटल्याचा अपार आणंद झाला आहे