घोड्याची गोष्ट....
फार फार पूर्वीची गोष्ट
फार फार पूर्वी... अगदि माणूसही तिथे कधी गेला नसेल अशा निबिड,किर्र अरण्यातली गोष्ट आहे. ही आम्हा घोड्यांची गोष्ट आआहे.शाकाहारी चतुष्पादांची गोष्ट आहे.
घनदाट जंगल होतं. दिवसाही धड सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचू शकत नसे इतकी दाट वनराई. सगळं कसं हिरवंगार.
त्यावर जगणारे आम्ही खूप सारे घोडे, झेब्रे नि तत्सम कळप. आम्ही घोडे फारच सुखाने जगू असं काही नाही, त्यांचीही आपसात भांडणे होत. पण एकूणात खूप काही खायला मिळे. एकदम जंगलातलं वातावरण पालटलं. एकाएकी पिवळ्या रंगाचा कुणी, अंगावर काळे पट्टे असणारे एक मोठ्ठे मांजर की बोका जोरदार गर्जना करत आले. त्याच्या नुसत्या आवाजानेच दहशत पसरली.एकदम त्याने चरणार्यांवर हल्ला केला नि बाकीचे पळून जाताना, मागे राहिलेल्या दुबळ्या, अशक्त नि म्हातार्या घोड्याचा बळीही घेतला. दुरूनच आम्ही पाहिलं. आम्ही घोडे हिरवळीवर चरायचो तसं हा चक्क आमच्या खाली पडलेल्या घोड्याला चरु लागला. "त्याला वाघ म्हणतात" एक आमच्यातला मोठा घोडा वदला. तो वाघ घोड्याला खात होता. तिथे आसपास भसाभसा लालच लाल रंग पसरला. तो मस्त त्या म्हातार्या घोड्यावर चरत, उंडरत होता. आम्ही भीतीने गाळण उडाल्याने दूर धूम ठोकली. पण हे आता रोजचेच झाले. दिवसा पाणी प्यायला तळ्याकाठी जावे तर धोका.कधीही गर्जनेने घाबरायला होइ. अचानक कधी रात्री आम्ही बेसावध असता कुठूनतरी हल्ला होउन सकाळी कुणीतरी आमच्यापैकी एकाला फाडून त्याच्यावर चरून गेलेला दिसे.
काही कळेनासे झाले. कसे बसे आम्ही दिवस कंठू. आमच्यापैकी कुणी वैतागाने त्याच्याशी झुंज घेतली; त्याच्यावर धावून गेलो, तरी त्याला कायमचे कुणीच संपवू शकले नाही. आता काय करावे? अशातच आम्हाला पिले होत होती. त्यांचीही चिंता होतीच. आमची संख्या घटल्यानं आम्ही वेगवेगळे घोडे, झेब्रे, रानगवे एक्त्रच रहात होतो. सुटका व्हावी म्हणून प्रार्थनाही करत होतो.
एकदिवस कोण आश्चर्य! एका रानगव्याचे पिलू वेगळेच निघाले. त्याचे पाय घोड्यासारखे होते. उर्वरित शरीर गव्यासारखे. त्याची भावंडेही तशीच निपजली. ती काही वेगळीच होती. त्यांना तीक्ष्ण दतही होते. खूरांची टोकेही भयंकर होती.
दिवस सरत गेले.पिले मोठी होते गेली. कसे बसे वाघापासून आम्ही त्यांचे रक्षण करत होतो.
पण हाय रे दैवा. एक दिवस घात झाला. आम्ही काहीसे दूर आहोत हे पाहून त्या वाघोबाने हल्ला केला ह्या इवल्या इवल्या जीवांवर. तळ्याच्या ह्या बाजूला आम्ही असताना "कसे होणार ह्यांचे" असे म्हणत आम्ही चिंता करीत असताना अचानक वेगळेच दृश्य दूरवर दिसले. वाघोबा पिलांपाशी गेले, पण पिलेच चहूबाजूने एकत्रित होउन त्याच्यावर तुटून पडली!
आमच्यातली ही नवीन प्रजाती वाघाचे लचके तोडत होती! हळू हळू करत आख्खा वाघ त्यांनी जायबंदी केला, मग फाडला. मग मस्त ते त्याला चरु लागले. तो आम्हाला चरायचा तसेच ते त्याला चरु लागले!
आम्ही खुश झालो. आम्ही सुटलो. जंगलातले वाघ एक एक करत संपुष्टात आले. ह्यांनी त्या सर्वांना खाउन टाकले.
जंगल त्यांना कमी पडू लागले.
पण... पण आता, ह्यांच्या भुकेचे काय.... ह्यांनी आम्हाला वाघापासून वाचवले. पण ह्यांच्यापासून आम्हाला कोण वाचवणार.
आमची पुन्हा भीतीने गाळण उडाली.
आमच्यात अजून एखादी सशक्त, हिंस्त्र प्रजाती जन्माला येउ देत म्हणत आम्ही पुनश्च प्रार्थना करु लागलो.....
--मनोबा
आभार....
सर्व प्रतिसादकांचे आणि वाचनमात्रांचे मनापासून आभार.
@ऋ :- दोन्ही कथांची दखल घेणारे प्रतिसाद दिल्याबद्दल " विशेष आभार" नावाची श्रेणी देण्यात येत आहे. ;)
.
वि सू :- कुठल्याही एका विशिष्ट घटानेबद्दल किंवा देशाबद्दल वगैरे हे नाही. दोन पाच वर्षापूर्वी(२००८ च्या आसपास) काही कथा लिहित सुटलो होतो. त्यातलं हे कथाबीज मागे राहून गेलं होतं. बाकीचं तेव्हाच बहुतांशाने प्रकाशित केलं होतं. इथे संबंध वाटत असलेल्या घटाना तेव्हा दूरवरच्या क्षितिजावरही नव्हत्या.
ह्याची sister story http://www.aisiakshare.com/node/1110 इथे सापडेल.
अशक्ताची अहिंसा आणि सशक्ताची
:)
अशक्ताची अहिंसा आणि सशक्ताची हिंसा दोन्ही फसव्या आणि घातक!
बाकी लाऊड थिंकिंग अन्य लेखात केले आहेच