मसीहा...
आटपाट नगराचे ग्रह फिरले की काय कुणास ठाउक. नगर छोटं होतं, पण चांगलं होतं. लोक खाउन पिउन सुखी होते.
पण हाय रे दैवा. ज्यानं रक्षा करावी म्हणून तलवार दिली त्याचेच डोके फिरले की काय.
एकाएकी घोड्यावर बसून राजा बेभान होउन नगरातून हल्ली फेरी मारी. वाटेल त्याला राजाची तलवार कापून काढी.
मागून येणारे त्याचे हत्ती नि लवाजमा नगर उध्वस्त करी. तो दिसला की आता लोक सैरावैरा पळू लागत. करणार काय.
काही त्याच्याकडे ओरडून प्राणाची दूरूनच भीक मागत. पण हाय रे दैवा. त्याला ना कुणाचे काही ऐकू येइ ना कुणी त्याला रस्त्यात दिसे. त्याची तलवार मुक्त हस्ते आडवी तिडवी फिरे. झाडावरून फुले खुडावी तशा सहजतेने ती लोकांची मुंडकी उडवत सपासप चाले. बरे, पण तो हे सर्व काहीशा बेफिकिरीने करे. कधी निरागसतेने तलवार फिरवे.
त्या तलवारीच्या निरागस वाराने आजूबाजूच्या बाया-बापड्यांच्या कत्तली होत. बालकांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडत. राजाला त्याची खबरही नसे की फिकिरही नसे.
इतके क्रौर्य तो करुच कसा शकतो ह्याने आधीच भयभित जनता अचंबित होइ. त्याचा बाप रंगांधळा होता तसाच हा "जनांधळा" झाला की काय असे लोकांस वाटू लागले. आजूबाजूची कुठलीही जिवंत माणसे त्याला दिसतच नसत. तो रोगी झाला होता. त्याची यंत्रणा त्याच संसर्गजन्य रोगाने ग्रस्त होती. कुणी हत्ती घेउन धुमाकूळ घाली, कुणी तलवार चालवी.
निर्बल, दुर्बल असहाय जनता, नि:शस्त्र जनता त्राहीराम झाली. सुल्तानी संकट सोडवायला अस्मानी देवाचा धावा करु लागली. ह्यानेही काही होइलसे खरे तर कुणाला फारसे वाटत नव्हते. बरे. पळून जावे तर जाणार कुठे? आमची घरे दरे इथेच. आमचे पशुधन गाय बैल इथेच. शिवाय कितीही पळायचे म्हटले तर उलट नगराभोवती , नगराबाहेर उलट ह्याची सेना अशीच दिवसभर बेफाम उधळलेली. हाय रे दैवा. तूच वाचव रे रघूरामा असे हतबल तोंडे अशक्त , कुरपटलेले हात गडद ढगाळलेल्या आकाशाकडे पसरत आणि दीनवाण्या नजरेने पहात म्हणू लागली.
वेडसर, बेभान जनांधळ्या राजापासून मुक्ती हवी होती. दु:खाने ढ्गाळलेल्या वातावरणातून सुटायला मसीहा हवा होता.
त्यांची प्रार्थना सुरुच होती.
.
तिकडे अचानक नगराच्या दरवाजातून पुन्हा धुमाकूळ घालायला राजाची फौज घुसली.
आक्रोश जोरावर पोचला होता. अश्रूंच्या धारा लागल्या होत्या.
आणि अचानक आभाळाचे अश्रू कोसळू लागले. हस्ती नक्षत्राच्या धो धो पडणार्या धारा कोसळू लागल्या. एकच बोंबा,आरोळ्या, कण्हणे उमटले. हल्लकल्लोळ जाहला.
.
आणि एकाएकी नगरातीलच एक स्वतःस दुबळा समजणारा त्रस्त तरुण उभा राहिला. त्याच्या मुठी आवळल्या गेल्या. डोळे लाल झाले. अंगावर धावून येणार्या राजाच्या घोड्यास पाहून तो दचकला नाही. उलट घोडा जवळ यायची अजून वाट पहात उभा राहिला.कापाकापी करत राजा तरुणाच्या आसपास पोचताच थाडकन् घोडा पडला! एवढ्याशा निमिषार्धात त्यानं घोड्याला पाडायला झटपट काही दोरखंड शिताफीने रस्त्यात बांधल्याचे पाहून लोक चकित झाले.
हाच आपला अतिप्रतिक्षित मसीहा ह्याची त्यांना खात्री झाली.
.
.
तिकडे घोड्यावरून पडताच अचानक राजाला जनता दिसली. तो चमकला. तो दचकला. त्याला चक्क प्रजाजन "दिसू" लागले होते. आपण इथे एकाएकी कसे आलो त्याला काहीच आठवेना. इतके सगळे लोक एकदम आले कुठून हे ही त्याला समजेना. ते आपल्याकडे असे क्रुद्ध होउन का पाहताहेत असा त्याला प्रश्न पडला.
त्याला भयभीत होण्यासही धड फुरसत मिळाली नाही. काही कळायच्या आतच मागून कुठून तरी एक कुर्हाड त्याच्या डोक्यात बसली. तो गतप्राण झाला. एकाएकी त्याची यंत्रणा वाहत्या पाण्याचा बर्फ होउन गोठावा तशी गोठली.
घोडे स्थिर. हत्ती स्थिर. त्यावरील माणसेही शून्यात गेलेली. निष्प्राण झालेले दगडी पुतळेच जणू.
त्यांच्यापासून पळणारे क्षणभर थांबले.परत फिरले. मंतरलेल्या क्षणांचे ते साक्षीदार होते.
.
राजाच्या प्रेताजवळ उभ्यांनी जल्लोष केला. "मसीहा" ला डोक्यावर घेतले. त्यांची सुटका त्याने केली होती. त्याच्या चेहर्यावर यशाचे समाधान होते. त्याच्या डोळ्यात प्रजेबद्दल प्रेम दिसले.
लोकांनी त्याला आनंदाने राजाच्या पडलेल्या घोड्याला उभे करुन त्यावर बसविले.
.
.
.
पण हाय रे दैवा. पूर्वीचा प्रकोप पुन्हा सुरु झाला. प्रकोप आता महाप्रलय बनला. एकाएकी दगड झालेली यंत्रणा पुन्हा सैतानी अत्याचार करत फिरु लागली. व्यवस्था जागी झाली होती. बेफाम त्यांचे वारू सुटले होते.
आणि आणि मसीहा......
घोड्यावर बसताच एकाएकी कापाकापी करत सुटला होता. आसपासचे कुणीही त्याला दिसत नव्हते.
घोड्यावर बसताक्षणी तोही "जनांधळा" झाला होता.
.
.
.
धाग्याला नेमकं शीर्षक काय द्यावं ह्यात भ्रमात आहे. सत्ताधीश, मसीहा, स्थित्यंतर , जनांधळा ह्यापैकी कुठलं ठीक राहील?
मसीहा वगैरे काही असतो, तो
मसीहा वगैरे काही असतो, तो अचानक कधीतरी दृष्यमान होतो यावर फार विश्वास बसत नाही. "कोणीतरी येईल, आपलं भलं करेल" यात मला दुहेरी गफलत वाटते. दुसरा कोणीही आपलं काहीही भलं करत नाही आणि दुसरं म्हणजे असं कोणी आकाशातून वगैरे पडत नाही.
मसीहा खरोखर स्वतःचा गृहपाठ करून आलेला असेलच, तरीही कथेच्या शेवटापेक्षा फार काही वेगळं होईल असं वाटत नाही.
मसीहा नसतो हे जितकं खरं आहे
मसीहा नसतो हे जितकं खरं आहे तितकंच बेसुमार कापाकापी करणारे क्रूर सैतानी राज्यकर्तेही आजकालच्या जगात तसे बेताचेच आहेत. रंगांधळ्याला रंग दिसत नाहीत. जग ब्लॅक ऍंड व्हाइट टीव्हीसारखं दिसतं. त्याहीपलिकडे दृष्टिकोनाचा कॉंट्रास्ट अतिरेकी वाढवला तर त्या टीव्हीच्या चित्रातल्या ग्रे स्केल्स निघून जातात आणि काळ्या-पांढऱ्यापलिकडे, दुष्ट-सुष्ट पलिकडे दिसत नाहीत. या कथेतल्या राज्यातल्या लोकांचीही अपेक्षा तशीच दिसते आहे.
लाऊड थिंकिंग
छान लेखन.. वाचून बरेच विचार तरंग उमटले.. थोडं लाऊड थिंकिंग करतो:
स्वतःपेक्षा वेगळा आणि शक्तीमान असा मसिहा, देव, राजा, सरकार असं काहीही हवं असणं हा दुबळेपणा झाला - जो समाजात ठासून भरला आहे. जो पर्यंत आजुबाजुच्या परिस्थितीची जबाबदारी'कोणातरी तिर्हाईत शक्तीस्थानाची' आहे तोपर्यंत असे 'मसिहा' येतच रहाणार.. त्याला अंत नाही :(
अर्थात हजारो वर्षे राजेशाहीत आणि नंतर दिडशे वर्षे सर्वशक्तीमान इंग्रजांच्या सोयीच्या प्रशासनात जगलेल्या भारतीय समाजात 'लोकशाही' भिनणं इतक्या लवकर होईल ही अपेक्षा करण धाडसाचं वाटतं. अजूनही 'सरकार काही करत नाही' असं म्हणत 'सरकार' बदलत बसणार्या समाला आम्हीच एकत्रितपणे सरकार आहोत - मसिहा आहोत ही जाणीव यायला काही काळ जावा लागेल
आभार....
सर्व प्रतिसादकांचे आणि वाचनमात्रांचे मनापासून आभार.
@अशोक अंकल :- यस्स. नियती.... नक्कीच शोभेल.
@chaudhari manisha :- जनान्धळा मलाही आतापर्यंत सार्थ वाटलेले नाव.
@विक्षिप्त बै :- सदर मसीहा आभाळातून पडलेला नाही.असामान्य शक्ती वगैरे म्हणाव्यात त्याही त्याजकडे नाइतकच्.त्यांच्यापैकीच तो एक पेटून उठलाय इतकच.
असे पेटणारेही अनेक challengers असतील, पण नेमका ह्याचा विरोध यशस्वी होतो. मग त्याला लोक त्याला मसीहा "मानू" लागतात.
@राजेशः- बेसुमार कापाकापी करणारे क्रूर सैतानी राज्यकर्तेही
फारसे नाहीत. ठीक. पण "पण बेसुमार कापाकापी करणार्या क्रूर सैतानी व्यवस्था" किंवा "इतरांहून वरचढ असणारे unfair वाटणारे, जागतिक ठिकाणापासून ते गल्लीपर्यंत" असे असले तर.....
.
@ऋ :- दोन्ही कथांची दखल घेणारे प्रतिसाद दिल्याबद्दल " विशेष आभार" नावाची श्रेणी देण्यात येत आहे.
.
वि सू :- कुठल्याही एका विशिष्ट घटनेबद्दल किंवा देशाबद्दल वगैरे हे नाही. दोन पाच वर्षापूर्वी(२००८ च्या आसपास) काही कथा लिहित सुटलो होतो. त्यातलं हे कथाबीज मागे राहून गेलं होतं. बाकीचं तेव्हाच बहुतांशाने प्रकाशित केलं होतं. इथे संबंध वाटत असलेल्या घटना तेव्हा दूरवरच्या क्षितिजावरही नव्हत्या.
ह्याची sister story http://www.aisiakshare.com/node/1109 इथे सापडेल.
नियती
राळेगणसिद्धीस्थित आणि होऊ घातलेल्या 'मसीहा' चे भविष्य लख्खकन तर दिसलेच पण 'मन' यानी जनतेच्या हालांना अंत कधीच असणार नाही, अशी जी प्रॉबॅबिलिटी व्यक्त केली आहे, ती खरोखरी भयावह अशीच आहे.
[मसीहा बनण्यास उत्सुक असलेल्या 'त्या'चे जे रूप माझ्यासमोर आहे, त्याच्या अनुषंगाने मी ह्या लेखाकडे पाहिले आहे. इतरांना वेगळे काहीतरी जरूर सुचेल.]
धाग्याला 'नियती' असेही शीर्षक शोभून दिसेल.
अशोक पाटील