एक कविता

एक कविता
लेखक - Ninad Pawar
संध्याकाळ आता स्थिरावतेय,
नि बऱ्याच सावल्या राहिल्यात मागे,
ढगाची मंदावत चाललीये हालचाल,
नि सिगरेटचा धूर रुळतोय खोलीत निवांत.
रस्त्यांवरची वर्दळ होतेय बंद,
तितक्याच हळू झाडातला अंधार पक्षी उधळतायत आकाशात,
आपण आपली घरं आपल्याच बाजूने बंद केली,
जुन्या कानांवर घड्याळाचे काटे ऐकले आपण
प्रियेच्या शब्दांपूर्वीच्या उब जशी.
आपल्यासमोरून रोज गेली रेल्वे,
खुश होऊन लांब,
नि साचले चौकाचौकात नजरचुकीचे ढीग,
संध्याकाळ होत गेली नि जास्वंद घुमत गेला ओलसर हवेच्या वाटांत,
फक्त सावल्या नाहीत उरल्या नि लाल पाकळ्या दिसेनाश्या झाल्या,
वळून मागे गेलेल्यांच्या,
कोणी थकून झप-झप पाय न टाकणाऱ्याच्या.
नगराने पुढे केलेल्या पुलावरून झालो पार,
वस्ती वस्तीतले फरक टिपत राहिलो,
नि गुडघाभर पाण्यातून पहिले पक्षी पावसाची वाट पाहताना
तेव्हा आपण गेलो होतो एकमेकांसमोरून,
त्या वाटेवरून पुन्हा निघालो काही न बोलता.
विशेषांक प्रकार
कवितेचं व्याकरण
ही कविता कवीने वाचून दाखवली असती तर बरं असं वाटतंय. कारण कवितेत वाक्यांचा अन्वयार्थ लावताना अनेक ठिकाणी माझा गोंधळ होतो आहे. उदा.
१.
जुन्या कानांवर घड्याळाचे काटे ऐकले आपण
प्रियेच्या शब्दांपूर्वीच्या उब जशी.
इथे 'शब्दांपूर्वीच्या' आणि 'उब' या दोन शब्दांत काही लिहायचं राहून गेलं आहे की शब्दांपूर्वीची उब अपेक्षित आहे ?
२.
आपल्यासमोरून रोज गेली रेल्वे,
खुश होऊन लांब,
'रेल्वे' या शब्दानंतर स्वल्पविराम खरंच हवा आहे का? जवळपास प्रत्येक ओळीशेवटी स्वल्पविराम आहे. तेदेखील खरंच हवे होते का?
३.
फक्त सावल्या नाहीत उरल्या नि लाल पाकळ्या दिसेनाश्या झाल्या,
वळून मागे गेलेल्यांच्या,
कोणी थकून झप-झप पाय न टाकणाऱ्याच्या.
वळून मागे गेलेले नि पाय न टाकणारे या दोन्ही कर्त्यांच्या पाकळ्या नि सावल्या या दोन्ही गायब झाल्या का ?
सावल्या कोणाच्या, पाकळ्या कोणाच्या ?
४.
नि गुडघाभर पाण्यातून पहिले पक्षी पावसाची वाट पाहताना
तेव्हा आपण गेलो होतो एकमेकांसमोरून,
तेव्हा या शब्दामुळे मला संगती लावता आली नाही. 'पाहताना' यात काल दर्शवला आहे. मग 'तेव्हा'ची गरज काय ? ते 'जेव्हा' असावे असा कयास आहे कारण त्यामुळे त्यापुढील ओळीला अर्थ मिळतो.
सांगण्यासारखं काही असूनही नि प्रतिमा चांगल्या जमवूनही भाषेच्या वापरात त्या कुचकामी ठरल्या असं वाटलं. थोडं अधिक गंभीरपणे भाषेचं माध्यम वापरावं अशी विनंती.
Superb!
तितक्याच हळू झाडातला अंधार पक्षी उधळतायत आकाशात: Superb!
संध्याकाळ होत गेली नि जास्वंद घुमत गेला ओलसर हवेच्या वाटांत,
फक्त सावल्या नाहीत उरल्या नि लाल पाकळ्या दिसेनाश्या झाल्या, : Great imagery!
Excellent overall! Kudos!