भारतीयांमधले हृदयविकार : गोषवारा आणि प्रतिबंधक उपाय

संकीर्ण

भारतीयांमधले हृदयविकार : गोषवारा आणि प्रतिबंधक उपाय

लेखक - मिलिन्द पद्‌की

ह्या दिवाळी अंकाची संकल्पना आहे 'नातीगोती'. नात्यांचा हृदय आणि जनुकांशी असलेला संबंध कवी आणि लेखकांच्या तावडीतूनही सुटलेला नाही. पण ह्या लेखात हृदयाचं आरोग्य, त्यावर जनुकांचा आणि इतर गोष्टींचा होणारा परिणाम, अशा आपल्याशी संबंधित वैज्ञानिक तपशिलांचा आढावा घेतलेला आहे.

वाढलेले शहरीकरण, वाढते उत्पन्न, बैठं काम अशा अनेक कारणांमुळे सध्या द. आशियाई लोकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढते आहे. त्याचा आढावा आणि त्यावरील प्रतिबंधक उपायांचा गोषवारा या लेखात देत आहे.

हृदयविकार टाळण्याविषयी :
प्रथम हे नमूद करावंसे वाटते की मी एक वैज्ञानिक आहे, मेडिकल डॉक्टर नाही. स्वतःवर कोणताही 'प्रयोग' करण्यापूर्वी स्वतःच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्यावा. आता डॉक्टर्समध्येही साधारण वीस टक्के डॉक्टर नव्या गोष्टी आत्मसात करून वापरण्यात पुढे असतात, साठ टक्के नव्या गोष्टींचा इतरांना 'पुरेसा' अनुभव आल्यानंतर त्या वापरतात (आणि उरलेले वीस टक्के डॉक्टर्स बदलायला कधीच तयार नसतात.) आपले डॉक्टर कोणत्या प्रकारचे आहेत याचा अंदाज घ्यावा.

ही वेबसाईट आणि अशा इतर काही इतर वेबसाईट्स जनुक-समूहांतील रोगांशी निगडीत भागांचा रिपोर्ट पाठवतात. त्या कंपनीत काम करणाऱ्या एका भारतीय संगणक अभियंत्याने, सहजच ती टेस्ट करून पाहिली तेव्हा स्वतःचं MYBPC3 हे जनुक 'म्यूटेट' झाल्याचं (बदलल्याचं) त्याच्या लक्षात आलं. या बदलामुळे हृदयविकाराने मरण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते, पण या जनुकामधल्या बदलाचा शोध सर्वसाधारणपणे अमेरिकेत आणि भारतातही घेतला जात नाही. ह्याबद्दल त्या अभियंत्याने आपल्या आईबरोबर चर्चा केल्यावर त्याला समजलं की त्याच्या घराण्यात, दोन्ही बाजूंनी हृदयविकाराने गेलेल्या लोकांची संख्या भरपूर आहे. एखादा महत्त्वाचा शास्त्रीय शोध सर्वसामान्यापर्यंत पोचायला किती वेळ लागतो, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आता तो त्या दृष्टीने व्यायाम करणं, वजन आटोक्यात ठेवणं, ताणतणाव कमी करणं, तपासणी करत राहणं, असे अनेक उपाय करत आहे.

रक्तामधली स्निग्ध द्रव्यं (लिपिड्स) आणि कोलेस्टेरॉल या दोन गोष्टी, काही प्रथिनांना संलग्न होऊन रक्तप्रवाहात फिरत असतात. त्यांची एचडीएल (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स), एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स), आणि ट्रायग्लिसराईड्स अशी वर्गवारी करतात. प्रत्येक गटात असलेल्या कोलेस्टेरॉलची टक्केवारी वेगवेगळी असते आणि त्यानुसार त्यांची घनता बदलते. ज्या लिपोप्रोटीन्समध्ये कोलेस्टेरॉलची टक्केवारी जास्त असते त्यांची घनता कमी असते, यामुळे त्यांना एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स) असं म्हणतात. एचडीएलमध्ये (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स) कोलेस्टेरॉलचं प्रमाण त्या मानाने कमी असतं. शरीरातल्या सर्व पेशींना कोलेस्टेरॉल पुरवण्याची जबाबदारी एलडीएलकडे असते. याउलट एचडीएलमध्ये कोलेस्टेरॉलचा अंश कमी असल्यामुळे एचडीएल शरीरातल्या पेशींमधलं थोडं कोलेस्टेरॉल काढून घेऊन ते यकृताकडे घेऊन जातं. रक्तामधल्या लिपोप्रोटीन्सच्या एकंदर प्रमाणाला 'टोटल कोलेस्टेरॉल' म्हणतात. ट्रायग्लिसराईड्स या वेगळ्या प्रकारच्या चरबीचा मुख्य उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी होतो.

शुद्ध-रक्त-वाहिन्यांत कोलेस्टेरॉलचा थर बसून, त्यांचा व्यास कमी होत जातो. त्यामुळे रक्त-प्रवाह-मार्ग संकुचित होत जाणं आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंती यांना 'अथेरोस्क्लेरॉसीस' असं नाव आहे. हा प्रकार सुमारे वयाच्या तिशी-पस्तिशीला सुरू होतो आणि आयुष्यभर चालू रहातो. रक्ताची गाठ अडकून रक्तप्रवाह पूर्ण बंद झाला तर त्या रोहिणीमार्फत रक्तपुरवठा होणार भाग मरतो. हे मेंदूत झालं तर त्याला आपण पक्षघाताचा झटका (paralysis), आणि हृदयात झालं तर हृदयविकाराचा झटका (किंवा 'myocardial infarction', MI) म्हणतो. हृदयाचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे, त्यांनी पुरेसं रक्त पंप न करू शकणं याला हार्ट फेल्युअर असं नाव आहे. दोन्ही अर्थातच अत्यंत गंभीर, जीवघेण्या व्याधी आहेत. हृदयाच्या स्नायूंचं लयबद्ध आकुंचन-प्रसरण ज्या विद्युतप्रणालीमुळे होतं, तिच्यासंबंधित आजाराचा इथे आढावा घेतलेला नाही.

या व्याधी होण्याची अनेक कारणं आहेत. दक्षिण आशियाई (भारतीय, पाकिस्तानी, बांग्लादेशी व श्रीलंकन) वंशात ही कारणं अधिक सापडतात. त्यांत परंपरा-मान्य आणि 'नवी' अशी दोन्ही प्रकारची कारणं आढळतात. जीवनपद्धतीमधून आलेली, सभोवतालच्या परिस्थितीतून उद्भवणारी आणि जनुक-निर्धारित असं आपण त्या कारणांचं वर्गीकरण करू शकतो. जनुकांमधून उद्भवणाऱ्या विकार-व्याधींचा तपास लागणं ही अतिशय आधुनिक (गेल्या काही वर्षांतली) गोष्ट आहे. त्यावर जनुकीय इलाज अजूनही शक्य नाही. पण आपल्याला ठरावीक विकार होण्याची शक्यता जास्त आहे, हे वेळेत समजल्यास त्यापासून लांब राहण्याची काळजी घेता येते. आपल्या जीवनपद्धती आणि सभोवतालची परिस्थिती आपण थोड्या-बहुत प्रमाणात बदलू शकतो.

हृदयविकाराची कारणं :
जनुकांशिवाय इतर काही कारणं आहेत ज्यांबद्दल आपण फार काही करू शकत नाही. ही कारणं वैद्यक-परंपरेला मान्य आहेत. त्यात पहिलं कारण वय. जसजसं वय वाढत जातं तसतशी हृदयविकाराची शक्यता वाढत जाते. स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेन या हॉर्मोनचं प्रमाण कमी होत जातं. पुनरुत्पादनाशी संबंधित कामं वगळता, ह्या हॉर्मोनचे इतरही उपयोग आहेत. त्यांतला एक म्हणजे हे हॉर्मोन हृदयाला सुरक्षित ठेवतं. म्हणून तरुण बायकांमध्ये हृदयविकार तरुण पुरुषांपेक्षा कमी प्रमाणात आढळतो. (हे कोणताही कवी किंवा तरुण पुरुष सहज मान्य करेल - जाऊ द्या, 'विषयांतर' नको). वयानुसार प्रोजेस्टेरॉनच्या प्रमाणात घट झाल्यानंतर बायकांमध्ये हृदयविकाराची शक्यता वाढत जाते. रजोनिवृत्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दहा-एक वर्षांनी हृदयविकाराचे प्रमाण खूपच वाढलेलं दिसतं.

अथेरोस्क्लेरॉसीसची, रक्तवाहिन्यांमध्ये गाळ साचून त्यांचा व्यास कमी होण्याची, सुरुवात अगदी तरुण वयात, तिशी-पस्तिशीला (किंवा त्याच्याही आधी) होते. कोलेस्टेरॉलचे थर शरीरातल्या रोहिण्यांच्या जाळ्यात अनेक जागी साचायला लागतात; विशेषतः जिथे रोहिणी मोठं वळण घेते तिथे, वरच्या बाजूला रक्ताचा कमी खळखळाट असलेल्या जागा निर्माण होतात, त्या जागी. पण असे 'पुरेसे' थर जमा होऊन, त्यातून रोहिणीचा व्यास कमी होऊन, त्याचे दृश्य परिणाम (हार्ट अटॅक वगैरे) दिसायला वयाची पन्नास-पंचावन्न वर्षं व्हावी लागतात. अशी 'हानी' होणं वीस-एक वर्षं चालू असतं; पण वैद्यकीय व्यवस्था त्याची दखल घ्यायला तयार नसते. (जाणून-बुजून? कारण मग पुढचे हृदय-रुग्णांचे मोठे घबाड कसे मिळणार?) अशा परिस्थितीत तिशी-पस्तीशीपासूनच दर वर्षी, दोन महिने, दररोज 'सिम्व्हास्टॅटिन'सारख्या स्टॅटिनचा अगदी छोटा डोस (१० मिलिग्रॅम) घेतला तर तुमच्या रोहिण्या स्वच्छ राहून पुढचे आजार टळू शकतात. तसंच, यासाठी लेखाच्या शेवटी दिलेले जीवनपद्धतीतले बदलही फायदेशीर ठरतात. पण ही विचारसरणी अजून वैद्यकाच्या 'मुख्य प्रवाहाने' अंगीकारलेली नाही.

हृदयविकाराचं अजून एक कारण म्हणजे शारीरिक 'वारसा'. याचा संबंध जनुकांशी लावला जात आहे. उदाहरणार्थ, वर उल्लेख आलेल्या, MYBPC3 या जनुकात २५ बेस-पेअरची कमतरता ५-८ टक्के दक्षिण आशियाई लोकांत सापडते, त्यामुळे हृदय कमकुवत होण्याची शक्यता सात पटींनी वाढते. अशा लोकांमध्ये ४५ ‌वर्षं वयानंतर हार्ट फेल्युअरची शक्यता ८० टक्क्यांहून जास्त असते.

स्वेच्छेने बदल करता येण्याजोगी, जीवनपद्धतीमधल्या त्रुटींमुळे निर्माण होणारी कारणं पुढीलप्रमाणे :
उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉलमधल्या त्रुटी, सुटलेलं पोट आणि धूम्रपान.

भारतीय वंशाच्या एक तृतीयांश पुरुषांत आणि एक शष्ठांश स्त्रियांमध्ये 'मेटाबोलिक सिंड्रोम' हा लक्षण-समूह सापडतो; (ज्याला स्थूलमानाने 'स्थूलता' म्हणता येईल). त्याची लक्षणं अशी :
- उच्च रक्तदाब
- रक्तात वाढलेलं साखरेचे प्रमाण
- कमरेभोवती चरबी
- हानीकारक कोलेस्टेरॉल पातळी, ज्यामुळे हृदय विकार, पक्षाघात (stroke) आणि मधुमेह वाढतो.

भारतीय वंशाच्या लोकांमध्ये विशेष करून आढळणारी, आणि स्वेच्छेने बदल न करतायेण्याजोगी कारणं म्हणजे जन्माच्या वेळी अपुरं वजन असणं, गर्भाच्या वाढीतल्या त्रुटी, एलडीएल (कमी घनतेचं - घातक - कोलेस्टेरॉल) आणि एचडीएल (अधिक घनतेचं - उपकारक - कोलेस्टेरॉल), या दोन्ही प्रकारांत लहान व्यासाचे कण अधिक आढळणं. लहान व्यासाच्या एलडीएल कणांचं ऑक्सिडेशन सहजपणे होतं, आणि त्यातून कोलेस्टेरॉलचा थर जमा होण्यास सुरुवात होते. लहान एचडीएल कणांनीही हृदयविकाराची शक्यता वाढते असं दिसतं, पण हा भाग अजून विवाद्य आहे.

भारतीय वंशाच्या लोकांमध्ये विशेष करून आढळणारी, स्वेच्छेने बदल करता येण्याजोगी कारणं पुढीलप्रमाणे :
इंशुलिन-अवरोध : रक्तातल्या तैलाम्लांमुळे (fatty acids) स्नायूपेशींची इन्शुलिन शोषून घेण्याची क्षमता कमी होणं, आणि त्यामुळे शरीर जरी अधिकाधिक इन्शुलिन स्रवत असलं तरीही त्याचे परिणाम न दिसणं हा इन्शुलिन-अवरोध. इन्शुलिन-अवरोध ही मधुमेहाची पूर्वस्थिती असते. सध्या कोट्यवधी लोकांना आपण ह्या स्थितीत आहोत, हे माहीतही नसतं. साखरेचं प्रमाण जास्त असणारी शीतपेयं पिऊन लाखो अमेरिकन मुलांची अशी स्थिती झाली आहे, आणि त्यामुळे शाळेत शीतपेयं उपलब्धच करून नयेत, असा सध्याचा विचार आहे. न्यूयॉर्कच्या महापौरानेही शीतपेयांच्या मोठ्या आकाराच्या पेल्यांवर बंदी घातली होती, पण त्याविरुद्ध 'यात सरकारने पडू नये, आमचे आम्हाला कळत नाही का?' याप्रकारच्या राजकीय तत्त्वज्ञानातून ओरड झाली होती. घटनात्मकदृष्ट्या महापौराला तो अधिकार नाही असं म्हणत न्यायालयाने ती बंदी रद्द केली.

इन्सुलिन-अवरोधाचं निदान कसं करतात : इन्सुलिनचं रक्तातलं प्रमाण मोजणं अवघड आणि खर्चिक असतं, पण रक्तातल्या ग्लुकोजवरून ती व्यक्ती मधुमेह-पूर्व, म्हणजेच इन्शुलिन-अवरोध स्थितीत आहे का, हे कळू शकतं. या टेस्ट्स तीन प्रकारच्या असतात :
१. रात्रभर काही न खाता सकाळी काढलेलं ग्लुकोजचं प्रमाण : हे १०० ते १२५ मिलिग्रॅम प्रति डेसिलीटर असल्यास मधुमेह-पूर्व किंवा इन्शुलिन-अवरोध स्थिती आहे असे मानले जाते.
२. HbAIC (AIC) हा आकडा मागच्या तीन महिन्यातली रक्तातल्या ग्लुकोजची पातळी दाखवितो. तो जर ५.७ ते ६.५ मध्ये असला तर मधुमेह-पूर्व किंवा इन्शुलिन-अवरोध स्थिती आहे असे मानले जाते.
३. ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट : रात्रभर न खाता सकाळी ग्लुकोजचं द्रावण प्यायला दिलं जातं, आणि दोन तासांनी रक्तातल्या ग्लुकोजचे प्रमाण ठरवलं जातं; हे जर १४० ते १९९ मिग्रॅ प्रति डेली असेल तर मधुमेह-पूर्व, इन्शुलिन-अवरोध स्थिती आहे.
(या आकड्यांहून वरचा आकडा असल्यास त्या व्यक्तीला मधुमेह आहे असं मानलं जातं.)

पोटावरची चरबी : पोटाचा घेर, पुरुषांमध्ये ४० इंच आणि स्त्रियांमध्ये ३५ इंच यापेक्षा अधिक असू नये. पोटावरच्या चरबीने इन्शुलिन विरोधतर निर्माण होतोच, पण ती चरबी स्वतःच इतरही अनेक घातक घटक स्रवते असं दिसून आलं आहे. यातील अनेक घटकांमुळे, अनेक काळ चालणारी मंद अंतर्ज्वलनाची (chronic low-grade inflammation) स्थिती निर्माण होते, जी पुढे मधुमेह, कर्करोग आणि वार्धक्याला कारणीभूत ठरते.

पुरेशी शारीरिक हालचाल, व्यायाम नसणं : दमछाक करवणाऱ्या - एरोबिक - व्यायामामुळे हृदय आणि रक्तवाहिन्या अधिक लवचीक बनून निरोगी राहतात, आणि वजन कमी ठेवायलाही या व्यायामाचा उपयोग होतो. साधारण चाळिशीनंतर मानवी शरीर हळूहळू स्नायूंचं रूपांतर चरबीत करू लागतं. स्नायू वाढवणाऱ्या-टिकवून धरणाऱ्या टेस्टोस्टेरॉन या हॉर्मोनचं प्रमाण वयानुसार कमी होत गेल्याने मुख्यतः हे घडतं. ही प्रक्रिया जर व्यायामाने (आणि गरज असल्यास बाहेरून टेस्टोस्टेरॉन देऊन) थांबविली नाही तर चरबीचं प्रमाण वाढत जाऊन आधी इन्शुलिन अवरोध, त्यातून पुढे त्यातून मधुमेह होतो. हा हृदयाला अतिशय हानिकारक असतो. यासाठी वजनं उचलणं, सूर्यनमस्कार, जोर-बैठका या प्रकारचे, स्नायूंना बळकटी देणारे व्यायाम (resistance exercises) उपयोगी असतात.

तूप, लोणी आणि हायड्रोजनेटेड तेल भारतीय आहारात अधिक असतं, जे हृदयाला घातक ठरतं. भारतीयांच्या शाकाहारी आहारात अनेकदा पुरेशी प्रथिनं मिळत नाहीत; प्रथिनं स्नायूंच्या वाढीसाठी व झीज भरून येण्यासाठी आवश्यक असतात. नारळ, ऑलिव्ह, आव्होकाडो अशा अनसॅच्युरेटेड फॅट्सचा हृदयावर चांगला परिणाम होतो.

मद्यपानामुळे रक्तात ट्राय-ग्लिसेराईड ही चरबी वाढते, रक्तदाबही वाढतो. अतिरिक्त मद्यसेवनामुळे पक्षाघात आणि हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होऊ शकतो. रेड वाईनमध्ये 'रेसव्हेराट्रॉल' हे द्रव्य असतं, त्याचा हृदयावर चांगला परिणाम होतो. रेड वाईन हृदयाला चांगली, अशा प्रकारच्या बातम्या अधूनमधून वृत्तपत्रांमध्ये येत असतात; कधी बरोबर उलट प्रकारच्या बातम्या येतात. मुळात संशोधनाला पैसे कोणी पुरवले आहेत हा मुद्दाही महत्त्वाचा. रेड वाईनमध्ये रेसव्हेराट्रॉलचं प्रमाण अत्यल्प असतं, त्यामुळे गरज असल्यास त्याच्या गोळ्या घेणंच बरं. एकूणच तुम्ही जर सध्या पीत नसाल तर ते चालू करू नका, आणि पीत असाल तर मर्यादेत प्या, (पुरुषसांठी : दर दिवशी दोन ड्रिंक्स, स्त्रियांसाठी : दर दिवशी एक ड्रिंक इतपत मात्रा ठीक;) असा सल्ला अमेरिकन हार्ट असोसिएशनने दिला आहे.

हृदयाला होणारा रक्तपुरवठा मानसिक तणावामुळे कमी होतो, हृदयाची लय बिघडते आणि रक्तप्रवाहात गुठळ्या होण्याची शक्यता वाढते.

आता प्रकाशित झालेला प्रत्येक शोधनिबंध (यापुढे 'निबंध') वर दिलेलं प्रत्येक कारण तपासत असेल असं नाही; अनेक कारणांमुळे ते शक्य नसतं. जोशी आणि कंपनी यांनी २००७ साली जवळजवळ तीस हजार लोकांचा अभ्यास करून निबंध प्रकाशित केला. त्यात त्यांनी वय, तंबाखूचा वापर, मद्यपान, शारीरिक हालचाल/व्यायाम, आहार, हृदय-आरोग्यविषयक इतिहास, उच्च रक्तदाब, तणाव आणि खिन्नता, उंची, वजन, कंबर आणि नितंब यांच्या मापांचं गुणोत्तर, आणि मधुमेह यांचा अभ्यास केला. त्यांचे महत्त्वाचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे :
१. इतर वंशापेक्षा द. आशियाई देशांत हृदयविकाराने मृत्यू अधिक तरुण वयात, साधारण दहा वर्षं आधी घडतो.
२. हृदयविकाराच्या वेळचं सरासरी वय निरनिराळ्या द. आशियाई देशात निरनिराळं आढळतं. भारतात ते सरासरी ५७ वर्षं आहे. पण वाढत्या तणावांच्या जीवनशैलीमुळे ते कमी कमी होत चाललं आहे.
३. भारतीयांमध्ये मधुमेहाचं प्रमाण सर्वाधिक आढळतं, जो हृदयाला अतिशय हानिकारक ठरू शकतो.

इतर अनेक निबंध (इथे यादी देणं कंटाळवाणं आणि अप्रस्तुत ठरेल) तपासल्यास पुढील निष्कर्षांपर्यंत आपण पोचू शकतो :
१. भारतातही निरनिराळ्या जाती आणि प्रदेशांत संस्कृती, जीवन-पद्धती, आणि धर्माप्रमाणे हृदयविकाराचे प्रमाण बदलत राहातं.
२. गोऱ्यांच्या तुलनेत भारतीयांचं वजन, उंची-वजन गुणोत्तर, आणि कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी असतं; कोलेस्टेरॉलमधल्या निरनिराळ्या त्रुटी गोऱ्यांपेक्षा अधिक असतात.
३. भारतीयांमध्ये इन्शुलिन अवरोध आणि मानसिक (ताण, खिन्नता) त्रुटी अधिक असतात.

प्रकाशित संशोधनांत, भारतात राहणाऱ्या भारतीयांपेक्षा परदेशस्थित भारतीयांवरचे अभ्यास अधिक आढळतात. पण भारतात राहणाऱ्यांविषयीच्या निबंधांत स्थानिक हवा-प्रदूषण, पाण्यातलं आर्सेनिकचं वाढलेलं प्रमाण आणि घराच्या आतलं हवा-प्रदूषण यांनी हृदयविकार वाढल्याचं दिसतं. आर्सेनिकमुळे रक्तवाहिन्याना आलेली सूज, कोलेस्टेरॉलचे वाढते थर, आणि चरबीच्या 'ज्वलना'ची संयुगं या कारणांमुळे गंगा आणि यमुनेच्या खोऱ्यांतील ४-६ कोटी लोकांमध्ये हृदयविकार वाढलेला दिसतो. ग्रामीण बांगलादेशातली सर्व आणि भारतातली ७५% घरं स्वयंपाकासाठी लाकूड किंवा कोळसा वापरतात; ह्या प्रदूषणाचा परिणाम बहुतांशी स्त्रियांवर होतो. तो परिणाम सहज टाळता येण्यासारखा आहे. भविष्याचा विचार करता तो टाळायला हवा; कारण ह्या प्रदूषणामुळे अपुऱ्या वजनाची बालकं जन्माला येणं आणि त्यातून पर्यायाने हृदयविकार होऊ शकतो.

'स्टॅटिन' जातीची औषधं रक्तातलं कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करून त्यायोगे हृदयविकारापासून रक्षण करतात. भारतीय कंपन्यांनी स्टॅटिन गोळ्यांची किंमत इतकी कमी करून दाखविली आहे, की उपचारांची साधक-बाधक चर्चा करताना किंमत हा घटक जवळजवळ नामशेष झाला आहे. (अमेरिकेतही भारतामुळे आज महिना ४ डॉलर इतक्या नगण्य किमतीत स्टॅटिन्स मिळतात!)

स्टॅटिन्सचे दोन महत्त्वाचे साईड-इफेक्ट्स असतात : पहिला म्हणजे मधुमेह होण्याची सूक्ष्मशी (सुमारे एक टक्का लोक) वाढलेली शक्यता. दुसरा साईड-इफेक्ट म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी रोहिणीच्या भिंतीत कॅल्शिअम जमून ती कडक होत जाणे; ही शक्यता सुमारे २ टक्क्यांहून कमी मानली जाते.

मेडिकल लॅबमधून दरवर्षी कोलेस्टेरॉल, इत्यादी चाचण्या करून त्याप्रमाणे औषध किंवा त्याचा डोस बदलत राहाणं आणि जीवनपद्धतीत योग्य बदल करणं हा अर्थातच सर्वांत तर्कशुद्ध मार्ग झाला. आता मध्यमवर्ग त्याच मार्गाने जात आहे, असं मानू. पण भारतासारख्या गरीब देशात आर्थिकदृष्ट्या 'खालच्या' सत्तर टक्क्यांचं काय? त्यांना हे सततचे डॉक्टर, मेडिकल लॅब वगैरे परवडणारं आहे, असं वाटत नाही. त्यासाठी काही वर्षांपूर्वी काही ब्रिटिश हृदयविकार-तज्ज्ञांनी 'पॉलिपिल' ही संकल्पना मांडली आहे. पॉलिपिल या प्रकारच्या गोळीमध्ये ही औषधं असतात :
अॅस्पिरिन ७५ मिलिग्रॅम : रक्तातल्या गुठळ्या टाळण्यासाठी,
सिम्व्हास्टॅटिन ४० मिलिग्रॅम : कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी ठेवण्यासाठी, आणि
लिसिनोप्रिल १० मिलिग्रॅम + हायड्रोक्लोरोथायाझाईड १२.५ मिलिग्रॅम : रक्तदाब कमी ठेवण्यासाठी.

ही औषधं, हृदयविकार असो किंवा नसो, ५५ वर्षं वयाच्या पुढच्या सर्व पुरुषांनी आणि ६०च्या पुढच्या सर्व स्त्रियांनी, रोज एकेक मात्रा घ्यावी, असं त्यांनी मांडलं आहे. ही औषधं सुरू करण्यासाठी कोणतीही लॅब टेस्ट करण्याची गरज नाही, असं ते म्हणतात. या गोळीच्या वापरामुळे हृदयविकाराचं प्रमाण सुमारे ८० टक्क्यांनी आणि पक्षाघाताच्या झटक्याचं प्रमाण सुमारे ७० टक्क्यांनी कमी होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. अनेक मोठ्या वैद्यकीय चाचण्यांत ते सिद्धही झालं आहे. भारतात याचा खर्च व्यक्तिमागे, महिन्याला शंभर-दीडशे रुपयांच्या घरात येईल. घरातल्या ज्येष्ठांचा जीव वाचविण्यासाठी ही किंमत द्यावी किंवा कसं यावर अजूनही वाद चालू आहे.

हृदयविकार टाळण्यासाठी करावयाचे सर्वमान्य उपाय :
१. वजन -उंची यातून येणारं 'बी एम आय' हे गुणोत्तर १८-२३ एवढं ठेवणं (इतर वंशीयांसाठी हे १८-२५ असलं तरी भारतीयांमध्ये वाढलेल्या जोखमीमुळे २३ हेच योग्य मानावं, असा नवा विचार आहे). हे गुणोत्तर काढण्यासाठी आंतरजालावर तयार कॅल्क्युलेटर्स आहेत.

२. कोलेस्टेरॉल पुढीलप्रमाणे ठेवणं : (सर्व आकडे मिलिग्रॅम प्रति १०० मिलिलिटर रक्तात)
अ. टोटल कोलेस्टेरॉल : २०० किंवा कमी (साधारण २२०च्या वर डॉक्टर उपचार सुरु करतात)
ब. एलडीएल : (अर्थात 'वाईट' कोलेस्टेरॉल) : १६० किंवा त्याखाली
क. एचडीएल : (अर्थात 'चांगले' कोलेस्टेरॉल) : ४० किंवा अधिक : हे मुख्यतः व्यायामाने वाढवता येतं!)
ड. ट्रायग्लिसेराईड : २०० किंवा खाली

हे सर्व आटोक्यात आणण्यासाठी औषधांव्यतिरिक्त करायच्या गोष्टी पुढीलप्रमाणे :
व्यायाम : ३०-६० मिनिटे, सौम्य कार्डियो
आहारात चोथा (फायबर) सेवन : दिवसाला ३० ग्रॅम किंवा अधिक
आहारातलं कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करणं : चीज, दूध, चरबीयुक्त मांस कमी करा, शक्यतोवर टाळा. यात एक लक्षात घेणं जरुरीचं आहे, की शरीरातील फक्त २० टक्के कोलेस्टेरॉल 'बाहेरून' (रोजच्या आहारातून) येतं, आणि त्यामुळे आहार बदलातून ते तेवढ्याच प्रमाणातच कमी होऊ शकतं. उरलेलं ८०% कोलेस्टेरॉल शरीर स्वतःच बनवतं. ही मात्रा कमी करण्यासाठी स्टॅटिन औषधांचा चांगला उपयोग होतो.
धूम्रपान : पूर्णपणे टाळा.

३. उच्च रक्तदाब : रक्तदाबाची योग्य पातळी ही १२०/८० ही मानली जाते. पण वरचा नंबर १४०च्या वर जाईपर्यंत डॉक्टर उपचार सुरू करत नाहीत. ११५ ते १४० या रेंजमध्येही मूत्रपिंडांची हानी चालूच राहत असल्यामुळे, त्याचा पुनर्विचार होणं आवश्यक वाटतं. उच्च रक्तदाब कमी करण्याससाठी रोजचा सौम्य व्यायाम आणि योग व प्राणायाम यांचा चांगला उपयोग होतो, तसंच अनेक उत्तम नवीन आणि जुनी औषधं उपलब्ध आहेत.

४. मानसिक तणाव कमी करणं. त्यासाठी काही उपाय :
अ. ध्यानधारणा
आ. दीर्घ श्वसन
इ. संथ होऊन स्वतःच्या स्थितीकडे एकाग्रपणे लक्ष देणं.
ई. मित्र-मैत्रिणी, आप्तेष्ट यांच्याबरोबर मजेत वेळ घालविणं. (ह्यांत 'ऐसी अक्षरे’चा समावेश होतो का नाही, हे ठरवा.)
उ. भरपूर हसणं.
ऊ. शांत/सौम्य संगीत ऐकणं
ओ. शारीरिक हालचाल आणि व्यायाम करणं.
औ. आपल्याला मिळालेल्या अनेक 'वरदानां’साठी कृतज्ञतेची भावना ठेवणं.
यापलीकडे जाऊन डॉक्टर तुम्हाला तणाव कमी करणारी शामक (tranquilizer) औषधेही देऊ शकतात.

वाढलेलं शहरीकरण, वाढतं उत्पन्न, वाढते ताण-तणाव, बैठं काम, खाण्यातलं तेल-तूप-साखरेचं वाढतं प्रमाण, शारीरिक हालचाल नसणं, वाढता मधुमेह, सुटलेलं पोट आणि जनुक-वारसा यामुळे सध्या द. आशियाई लोकांमध्ये हृदयविकाराची 'साथ' आल्यासारखं दिसत आहे. हृदयविकाराला बळी पडणाऱ्या लोकांची टक्केवारी १९९० साली भारतात सर्व मृत्यूंच्या २०% होती, ती २०१३ साली २९% पर्यंत पोचली आहे. तरुण वयात मृत्युचं प्रमाण वाढत आहेत. याबद्दल तातडीने जागृती आणि कृतीची आवश्यकता आहे.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

मुळात भारतियांत अंगमेहनत ( जिममधले सेट्स नव्हे )टाळण्याची वृत्ती वाढत आहे. खाल्लेलं जिरलं पाहिजे,न पचवलेलं शरिराबाहेर टाकलं गेलं पाहिजे ते होत नाही.देनंदिन कामं जी पुर्वी कष्टाने केली जात असत त्यासाठी यंत्र आहेत.चांगलंचुंगलं काय याअगोदर खाल्लं जात नव्हतं? जनुकं अन वारसा यांचा गणितीय अभ्यास करून पिएचडी घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम-माहितीपूर्ण लेख.

कोलेस्टेरॉल हे हृदयविकाराशी संबंधित नाही असा कायसा निष्कर्ष WHO ने काढून कोलेस्टेरॉलला निगेटिव्ह लिस्ट मधून हद्दपार केल्याचे मध्यंतरी वाचले होते. त्यावर प्रकाश टाकावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एच डी एल वाढविले आणि एल डी एल कमी केले तर त्या लोकसंख्येमधला हृदयविकार प्रचंड कमी होतो हे अनेकदा दाखविले गेले आहे. कोलेस्टेरॉल 'प्लाक ', व तिथे रक्ताची गुठळी अडकून रोहिणी बंद होणे हा साधा आणि सरळ कार्य-कारणभाव यात दिसतो.
आता काही लोकांमध्ये कोलेस्टेरॉल "नॉर्मल" असूनही त्यांना हृदयविकाराचा झटका येतो हे सत्य आहे . त्यातून अशा व्यक्तींमध्ये हृदय किंवा रोहिणीमध्ये 'अंतर्ज्वलन " (Inflammation) चालू असल्यामुळे हे होते असा एक मतप्रवाह आहे. ही मंडळी स्टॅटिन-विरोधी असतात . या विषयात अजून संशोधन चालू आहे. (जेनेरी-करणामुळे फायझर ला अटोर्वास्टॅटिन पासून मिळणार प्रचंड फायदा बंद झाल्यावर आता फायझरने खरा धोका ट्रायग्लिसेराईड पासून आहे असा नवा शोध लावला आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

अतिशय उत्तम लेख. फक्त ( नेहमीप्रमाणे) धुम्रपानाचा हृदय रोगाशी संबंध नीट कळला नाही .जास्त लिहाल काय या विषयावर ? तसेच inflamation ला causal पेक्षा जास्त symptomatic प्रतिशब्द काय असू शकेल ? (सगळे प्रतिशब्द थोडे अपुरे वाटतात )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

1. रक्तातील न्युट्रोफिल नावाच्या पांढऱ्या पेशी रक्तवाहिनीच्या आतल्या थराला चिकटणे ही प्लाक-निर्मितीची पहिली पायरी असते, जी स्मोकिंग ने वाढते. बाकीही अनेक वाईट परिणाम घडतातच , माझ्या दृष्टीने हा एक महत्वाचा दुष्परिणाम . अधिकसाठी पहा: https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/26141392 (यात संबंध पेपरही मिळू शकेल ).

2. "Inflammation" मधील "ज्वलन हे तसे लाक्षणिक अर्थाने आहे. अनेक रसायने तिथे सोडली जाणे, अनेक प्रकारच्या पेशी जमणे, तापमान थोडे वाढणे अशा स्वरूपाची ही प्रक्रिया असते. मी अंतर्ज्वलन असा शब्द काढला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

आता उशीर झालेला आहे, हरिद्यावर बायपास हाईवे इत्यादी बांधून झाले आहे. तरीही रोज सकाळी खाण्यापिण्यावर बंधन घालण्याचे निश्चय करतो.... चालायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्टॅटिनचे दुष्परिणाम....

The most important adverse side effects are muscle problems, an increased risk of diabetes, and increased liver enzymes in the blood due to liver damage. Over 5 years of treatment statins result in 75 cases of diabetes, 7.5 cases of bleeding stroke, and 5 cases of muscle damage per 10,000 people treated.[46] This could be because as statins inhibit the enzyme (HMG-CoA reductase) that makes cholesterol, statins also inhibit the other processes of this enzyme, such as CoQ10 production, and CoQ10 production is important for muscle cells and in blood sugar regulation.

https://en.wikipedia.org/wiki/Statin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Agreed.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

माहितीपूर्ण लेख ! लहानपणी आई बाबांकडे माझा साक्षात्कारी हृदयरोग नावाचं पुस्तक होत , त्यातही डॉ. अभय बंग ह्यांनी हीच माहिती सविस्तर दिली आहे . त्यात डॉ. अर्निश ह्यांच्या पुस्तकांचा संदर्भ आहे .

तुमचा अभ्यास आहे म्हणून विचारते, टॅकी-ब्रॅडी कार्डिया अनुवांशिक असू शकतो का? हा पण एकप्रकारचा हृदयविकारच आहे ना ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

हृदयाच्या खालच्या , मोठ्या कप्प्यांच्या (ventricles) लयीमधील बिघाड (नको तितका जास्त वेग: tachycardia ) हा मृत्यूकडे नेणारा ठरू शकतो (sudden cardiac death). अशा मृत्युंमधले 30 % मृत्यू जनुकीय कारणांमुळे झालेले आढळतात. अधिकसाठी पहा: https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/27761159
लय नको तितकी कमी होणे , ज्याला आपण ब्रॅडीकार्डिया म्हणतो, तिच्यातही काही प्रमाणात अनुवंशिकता आढळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

मी हेच डॅा बंग यांच्या लेखाचा उल्लेख करणार होतो. आता जे पुस्तक म्हणताय ते पंधरा वीस वर्षांपुर्वी कालनिर्णय दिवाळी अंकात होतं.नंतर त्याचं पुस्तक आलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0