माझे घर नक्की कोणते?

संकल्पनाविषयक.

माझे घर नक्की कोणते?

लेखिका - रुबिना पटेल

चौकटीच्या बाहेर विचारही करू नये म्हणून पितृसत्ताक व्यवस्थेने आपल्याला अनुकूल असे नियम आणि कायदे बनविले आहेत. मुलीला लहानपणापासून नेहमी सांगितले जाते की तू परक्याचे धन आहेस. सासरी गेली तर तिला दुय्यमच स्थान दिले जाते. म्हणूनच माझे घर नक्की कोणते, हा प्रश्न तिला पडतो.

माझ्या संस्थेमध्ये माझ्यासोबत काम करणाऱ्या सहकारी शाहीना, शहेनाज, नगमा, समिना, फरहीन, गौसिया, निकहत, नसरीन, लीना, शबाना या सर्वानी मला सुचवलं की या वेळच्या लेखामध्ये स्त्रीचे नेमके घर कुठे आहे हा मुद्दा मांडावा. माझ्या मनात - सध्या देशभरामध्ये तलाकविषयी चर्चा सुरू आहे, वाहिन्यांवरील ताज्या चर्चेमध्ये मी काय बोलले, काय मुद्दे चर्चेतून आले हे होते. मला दोन्ही विषयांची सांगड घालावीशी वाटते.

लग्नापूर्वी प्रत्येक मुलीला "तू तो परायी है" सांगितले जाते. कडक शिस्तीमध्ये मुलीला वाढविले जाते. शाळेतून घरी परत यायला उशीर झाला की तिला मार खावा लागतो. दारातून बाहेर डोकावायला लागली किंवा मोबाइलवरून कोणाशी बोलताना दिसली की संशय घेतला जातो. मुलांशी मैत्री करू नये, पडदा करावा आणि मुकाट कुठलेही उलट उत्तर न देता जसे सांगितले गेले ते तसे करावे. मुलींनी आपल्या लग्नाविषयी स्वत: कुटुंबात चर्चा करू नये. तिला या घरात कुठलाच अधिकार नाही, जे करायचे असेल ते आपल्या सासरी करशील असेच वारंवार म्हटले जाते.

नोकरी करून पैसे मिळवणारी जरी असेल तरी हे घर तुझे नाही, हे घर मुलांचे राहील, ती फक्त लग्नानंतर माहेरी पाहुणी म्हणून येईल असेच संस्कार, प्रथा, परंपरा एका व्यवस्थेअंतर्गत दिसून येतात. परंतु तिने या प्रश्नाचा कधीच विचार केलेला नसतो की, खरेच हे घर माझे का नाही? कारण तिला वाटत असते की, लग्नानंतर सासर हे माझे घर असणार आहे. लग्नानंतरच्या परिस्थितीमध्ये आमच्या घरात असे चालणार नाही. आमच्या घरात ज्या चालीरीती, परंपरा आहेत त्या तुला मान्य कराव्या लागतील असे सुनेला नेहमी सांगितले जाते. इतकेच काय स्वयंपाकघरातदेखील सासू लुडबुड करून सुनेला तिच्या स्वेच्छेने काम करू न देता, तुझ्या सासऱ्याला किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींना हे पसंत नाही असे का सांगत असते? एक स्त्रीच स्त्रीची शत्रू कशी ठरते? बहुसंख्य स्त्रियांचे बालपण हरवले जाते आणि अगदी लहान वयात अनेक सदस्य असलेल्या मोठ्या कुटुंबात तिला जावे लागते. तिच्या जन्माची गाठ कोणाशी बांधली आहे? त्याचे वय किती? काय काम करतो? हे सांगण्याची तसदी माहेरी घेतली गेलेली नसते. तेव्हा अचानक जीवनात झालेला बदल स्वीकारणे, तो अंगवळणी पाडणे आणि एवढी मोठी संसाराची जबाबदारी पेलवणे तिला निश्चितच अवघड जात नसेल काय? गरोदर अवस्थेमध्ये असतानाही तिच्याकडून संपूर्ण कामाची अपेक्षा केली जाते. कमी वयात एकामागून एक बाळंतपणामुळे तिच्या आरोग्याचा एक गंभीर प्रश्न निर्माण होतो याचा विचार केला जातो का? नवरा जर बायकोला मदत करत असेल तर तो 'जोरू का गुलाम' का होतो? आपला मुलगा आपल्याला सोडून पत्नीबरोबर राहील व आमच्याकडे दुर्लक्ष करेल ही असुरक्षिततेची भावना सासूच्या मनामध्ये का निर्माण होते? तिने जी हिंसा आपल्या जीवनात भोगलेली असते तीच परिस्थिती ती सुनेवर का लादू इच्छिते? सुनेशी भांडण झाले की, "नीघ बाहेर आमच्या घरातून" असे का म्हटले जाते? पतीला राग आला की, तो पत्नीला घर सोडून जावयास आग्रह का करतो? तिला तलाक देऊन घराबाहेर काही क्षणात कसं काढतो? स्त्रीचे नेमके घर कुठे आहे, हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे.

तिसऱ्या प्रकारात एकट्या स्त्रीचे प्रश्न आपण समजून घेणे आवश्यक आहे. पहिल्या विवाहात अनेक अत्याचार व हालअपेष्टा सहन करून तलाकपीडित एकट्या पडलेल्या स्त्रिया, विधवा, परित्यक्ता आणि प्रौढ कुमारिका यांच्याकडे पुरुषांची बघण्याची दृष्टी फार विकृत असते. या स्त्रियांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नांचा कुणी विचारच करीत नाही. माहेरच्या मंडळींचाही तिला पाठिंबा मिळत नाही. प्रौढ कुमारिकांना ज्या वातावरणात वागविले जाते त्यामुळे तिला चार माणसांत साधे बोलताना भीती वाटते. अनेक प्रकारच्या बंधनांमुळे, हिंसेमुळे ती आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकत नाही. आपली थट्टा उडविली जाईल या भीतीने तिला नेहमी स्वत:मध्ये कमीपणा वाटत असतो. तिच्या लग्नाचा कुटुंबात कुणी विचारच केलेला नसतो आणि तिचे स्वत:चे आपल्या लग्नाविषयी, पुढच्या भविष्याच्या विषयावर कुठलेच मत विचारात घेतले जात नाही किंवा अशा मुलींना संपत्तीमध्ये वाटा देणारे फार कमी दिसून येतात.

अनेक वेळा विधवा, परित्यक्ता, तलाकपीडित स्त्रियांच्या पुनर्विवाहासाठी आग्रह केला जातो. ते स्थळ तिच्या योग्य असते का? तिच्यापेक्षा वयाने फार मोठ्या असलेल्या, मुले (मोठी)- नाती असणाऱ्या व्यक्तीला तिला स्वीकारणे तिच्यावर अन्याय करणारे नाही का? तिला पुनर्विवाह करायची इच्छा नसताना माहेरच्या घराचा तिला आसरा का मिळत नाही? ते घर तिचे नाही का? माझ्या पाहण्यात एक स्त्री लग्न न करता एका पुरुषाबरोबर नातेसंबंधामध्ये काही वर्षांपासून राहत आहे. तिलादेखील तिच्या पार्टनरकडून एका वेगळ्या प्रकारच्या केल्या जाणाऱ्या हिंसेचा सामना करावा लागत आहे. ज्या घरात ती राहते तो तिच्यासाठी एक पिंजरा आहे, असे ती सांगते. सगळ्या सुखसोयी तिच्याकरिता करण्यात आल्या आहेत, पण ती आपल्या इच्छेने घराच्या बाहेर जाऊ शकत नाही, नातेवाईकांबरोबर नातेसंबंध ठेवू शकत नाही. तिच्या प्रत्येक हालचालीवर तो नियंत्रण ठेवत असतो. तिने जर हे संबंध तोडायचा प्रयत्न केला तर तिला धमकी दिली जाते. एक प्रकारच्या दहशतीत तिला जीवन जगावे लागत आहे. तिच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, मी जरी या घरात राहत असले तरी हे घर मला माझे घर का वाटत नाही? मुळात हे सर्व स्त्रियांवरील भेदभाव व अन्याय एका व्यवस्थेअंतर्गत होत असते म्हणून हा प्रश्न कायम आहे की, स्त्रीचे नेमके घर कोणते? बालपणातल्या स्त्रीने 'तू परायी है' हे ऐकलेले असते. लग्नानंतर आमच्या घरात असं चालत नाही आणि मनात आलं तेव्हा तलाक दिला जातो. ‘नीघ बाहेर’ म्हटले जाते आणि एकट्या महिलांना आपल्या भावना व्यक्त करायला जागा नसते. लग्न न करता नातेसंबंधांमध्ये राहणाऱ्या स्त्रियांना दहशतीत जीवन जगावे लागते? या सर्वांना हक्काच्या घराविषयीचा भेडसावणारा प्रश्न सारखाच आहे.

कारण या सर्व परिस्थितीत पुरुषी मानसिकतेचा पगडा जेथे स्त्रियांना समानतेची वागणूक आणि तिचा अधिकार डावलला जातो. ज्यामुळे तिची घुसमट होते, कोंडी होते. स्त्रीला ही कोंडी फोडता येणार नाही. चौकटीच्या बाहेर विचारही करावयाचा नाही म्हणून या पितृसत्ताक व्यवस्थेने कुटुंब, विवाह, धर्म, प्रथा, परंपरा इ. संस्थेअंतर्गत नीती, नियम आणि कायदे बनविले आहेत. एका स्त्रीला स्त्रीच्या विरोधामध्ये तयार केले आहे; म्हणून 'आखिर मेरा घर है कहाँ', हा प्रश्न उरतो.

सनातनी, कट्टरपंथी धर्मगुरू व उलेमांनी मुस्लीम समाजामध्ये धर्माची पकड घट्ट केली असून त्याद्वारे त्यांच्यावर ‘एमपीएल’ कायद्याच्या स्वरूपात नियंत्रण केले जाते. शरियत ही अपरिवर्तनीय म्हणून तलाकच्या प्रथेला समर्थन करणाऱ्या ऑल इंडिया मुस्लीम पसर्नल लॉ बोर्ड व तत्सम धार्मिक संघटनांनी मुस्लीम स्त्रियाच तलाकचे समर्थन कसे करतील याविषयी व्यवस्थेअंतर्गत पूर्ण तरतूद केली व ती मानसिकता तयार केली आहे.
स्त्रियांविषयीचा भेदभाव, त्यांचा मागासलेपणा, अल्पसंख्याकांतील अल्पसंख्याक असणे, असुरक्षितता, आत्मनिर्भर नसणे; आणि धर्मातील बंधनांमुळे मुस्लीम स्त्री असहाय आहे; आणि म्हणून तलाकविषयी धार्मिक कायदा वापरून तिला वाऱ्यावर सोडून दिले जाते. याचा विरोध करण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात तोंडी तलाकला आव्हान देणारी जनहित याचिका शायरा बानोच्या याचिकेसोबत केलेली आहे. कोर्टात का जावे लागले? या वाहिनीवरील एका प्रश्नाच्या उत्तरावर मुस्लीम स्त्रियांची व्यक्तिगत (शरियत) कायद्यामुळे घुसमट होते, तिच्यावर अन्याय होतो आणि शरियत कायदा हा धार्मिक कायदा असून लिखित स्वरूपात नसल्याने त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, असे मी सांगितले. याकरिता शासन हस्तक्षेप करणार आहे. लॉ कमिशनने सोळा प्रश्नांवर वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून प्रतिक्रिया मागविल्या आहेत. ते प्रश्न व समान नागरी कायद्याविषयी भाजपची भूमिका काय आहे? मुस्लीम महिलांना सामाजिक न्याय व त्यांच्या हिताच्या दृष्टीने सरकार किती संवेदनशील आहे? मुस्लीम स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून खरेच कुठलेही राजकीय पक्ष गंभीर आहेत काय? की त्यांना परत मतांचे राजकारण करावयाचे आहे? शेवटी मुस्लीम स्त्रियांचे प्रश्न हे त्यांचेच प्रश्न नाहीत, तो एक सामाजिक मुद्दा आहे आणि तो सर्व स्त्री जातीचा प्रश्न म्हणून समजून घेतला जाणार आहे की नाही? की हा देशदेखील त्यांचा नाही? ती या देशाची नागरिक म्हणून पूर्ण सांविधानिक अधिकार व कर्तव्य तिला प्राप्त होतात. पण अशी परिस्थिती का निर्माण केली जाते की तिला आपल्याच देशात परकेपणा वाटतो? स्वत:च्या हक्काचे घर त्यांना नाही तेव्हा देश तरी त्यांचा आहे का, हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो आणि म्हणूनच माझ्या सहकाऱ्यांनी ‘आखिर मेरा घर है कहाँ?’ लिहायला सांगितले.

लेखिका मुस्लिम समाजातील सुधारणावादी कार्यकर्त्या आहेत.

लोकसत्तामध्ये पूर्वप्रकाशित. लेखाचा दुवा

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (4 votes)

प्रतिक्रिया

सर्वच धर्मांत,समाजात एकेक वेगळा दुटप्पीपणा भरलेला असतो.तो मान्य करणे हे पहिले पाऊल असते आणि तो उखडून काढण्यासाठी त्यांतीलच अन्याय झालेल्या आणि अन्याय करणाय्रा दोन्ही बिजूंनी प्रयत्न करावे लागतात.आताशी कुठे सुरुवात आहे.मागेही अशी बरीच प्रकरणं झाली आहेत पण ध्येय साध्य करायला तीनचारशे वर्षं लागतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वच धर्मांत,समाजात एकेक वेगळा दुटप्पीपणा भरलेला असतो.

आमलेट!

('तुम्हीं काहीं म्हणा, उस्मानशेठ, सर्व धर्म सारखेंच!' असे त्याअगोदरचे वाक्य आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महत्वाचा लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आमच्या घरात ज्या चालीरीती, परंपरा आहेत त्या तुला मान्य कराव्या लागतील असे सुनेला नेहमी सांगितले जाते. इतकेच काय स्वयंपाकघरातदेखील सासू लुडबुड करून सुनेला तिच्या स्वेच्छेने काम करू न देता, तुझ्या सासऱ्याला किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींना हे पसंत नाही असे का सांगत असते?

यात अनैसर्गिक अथवा क्रूर काही मला वाटत नाही. मुलगी दुसर्‍या घरी जातेय ना? मग तिने तिथे बदलाचे वारे आणायचे की परिस्थितीशी जुळवुन घ्यायचं? आणि तसंही तेव्हा जुळवुन घेतलं की नंतर मिरे वाटता येतात. जोकस अपार्ट मला म्हणायचय की पहील्यांदा रीतभात, घरची तर्हा नीट समजावुन घेतली की मग सुनेचं राज्य येतच की.
.

बहुसंख्य स्त्रियांचे बालपण हरवले जाते आणि अगदी लहान वयात अनेक सदस्य असलेल्या मोठ्या कुटुंबात तिला जावे लागते. तिच्या जन्माची गाठ कोणाशी बांधली आहे? त्याचे वय किती? काय काम करतो? हे सांगण्याची तसदी माहेरी घेतली गेलेली नसते.

गावात आहे का ही परिस्थिती? शहरात निदानपक्षी पुरोगामी कुटुंबात वेगळे चित्र दिसावे. अर्थात बहुसंख्य समाजाचा विचार हा केलाच पाहीजे पण मग ऐसीवरचा क्राऊड "बहुसंख्य आणि ऑप्रेस्ड" मध्ये मोडतो का - असा एक विचार मनात येऊन जातो. .....(पण अर्थात हे मान्य की ऐसीवरचा क्राऊड कसाही म्हणजे कितीही आधुनिक अथवा पुरोगामी, पुढारलेला असो, पण एकंदर प्रश्नांचा उहापोह होण्यात काहीच अडचण नाही.)
.
पण हा लेख बहुतांशी मुस्लिम स्त्रियांबद्दल दिसतो आहे. तसे असेल तर माझे आक्षेप मागे घेते कारण लेखात लिहीलेली परिस्थिती असूही शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख सामान्य मुस्लिम स्त्रियांबद्दलच आहे.

मुलगी दुसर्‍या घरी जातेय ना? मग तिने तिथे बदलाचे वारे आणायचे की परिस्थितीशी जुळवुन घ्यायचं?

मुलगी दुसऱ्या घरी जात असेल तर तिने जुळवून कशाला घ्यावं? किंबहुना, ती दुसऱ्या घरी जाते, स्वतःच्या घरात नाही, हेच लेखाचं शीर्षक आहे, आणि संपूर्ण लेख त्याबद्दलच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दुसर्‍याच्या आणि दुसर्‍या यात फरक आहे. असो.
___
माझा मुद्दा अगदी मर्यादित आहे. जेव्हा आपण नव्या ठिकाणी जातो तेव्हा आपणच जुळवुन घेणं भाग असतं.
____
अनेक गंभीर मुद्दे मांडलेले आहेत. लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलगी दुसऱ्या घरी जात असेल तर तिने जुळवून कशाला घ्यावं?

मुळात दुसर्‍याच्या घरात जावेच का हा माझा प्रश्न आहे. मी गेले नाही. अदिती तै पण गेली नसावी.
मस्त वेगळ्या स्वताच्या घरात जावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुझे मनापासून अभिनंदन पण हे सगळ्यांना जमत नाही.
____
अजुन एक तू तुझ्या घरात रहातेस म्हणजे एक तर तू तुझ्या आई-वडीलांकडे रहात असावीस किंवा तू तुझे घर घेऊन रहात असावीस. पैकी पहीला पर्याय हा अनेक मुलींना दिलाच जात नाही. मुलीला उजवुन "टाकायची" पालकांनाच जास्त घाईघाई दिसते. हे दु::खद वास्तव आहे आणि वर लेखात ते आलेले आहेच की "हे घर तुझे नाही" हे बिंबवले जाणे.
स्वतःचं घर विकत घेण्याइतका पैसा बरेचदा तरुण वयात नसतो. भाड्याने रहायचे म्हटले तर ते मात्र होऊ शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला तुमच्या कार्याबद्दल आणि पुढील वाटचालीबद्दल अनेक शुभेच्छा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

हे सर्व प्रॉब्लेम जर धर्मामुळे किंवा त्यातल्या कट्टरतेमुळे होत असतील तर आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र, स्वताच्या पायावर उभ्या असलेल्या मध्यम्/उच्च आर्थिक स्थितीतल्या तरुण मुली धर्म सोडुन देताना दिसतात का? प्रश्न लेखिकेला आणी ऐसीवरच्या तज्ञांना आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आर्थिक स्वातंत्र्य आणि वैचारीक्/भावनिक स्वातंत्र्य या संपूर्ण भिन्न गोष्टी आहेत. त्यांच्यात फारसा संबंध नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचि - दोन गोष्टी आहेत.

१. जर स्वताकडे वैचारिक्/भावनिक स्वातंत्र्य नसेल आणि जर आपण स्वताच दुसर्‍यावर भावनिक दॄष्ट्या अवलंबुन असु तर मग दुसरा जो म्हणेल ते ऐकण्यात त्रास काय आहे?

२. मी उल्लेख केला तसा स्वताच्या पायावर उभ्या असलेल्या आर्थिक दृष्ट्या चांगल्या मुलींपैकी ५-१० टक्के मुलींकडे पण वैचारिक/भावनिक स्वातंत्र्य नसावे? खरच? ५-१० टक्के उदाहरणे दिसली तर बाकीच्यांना बळ येइल.

ब्राह्मण स्त्रीयांनी जेंव्हा पहिल्यांदी रुढी तोडल्या तेंव्हा खुला/लपुनछपुन विरोध झालाच असेल. पण त्यामुळे बाकीच्या उरलेल्या स्त्रीयांना बळ मिळाले असेल आणि मुख्य म्हणजे पुरुषांना असुरक्षीततेपाई का होइना स्त्रीयांना बरोबरीने वागवावे लागले.
माझ्यासारखी जन्मानी हिंदु स्त्री कशी जाहिरपणे म्हणते की मी हिंदू नाही, अशी उदाहरणे मुसलमान स्त्रीयांमधे दिसतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्यासारखी जन्मानी हिंदु स्त्री कशी जाहिरपणे म्हणते की मी हिंदू नाही

आँ? कधी म्हणालात? मी तरी कधी ऐकले नाही ब्वॉ.

असो. या विधानाकरिता - केवळ या विधानाकरिता! - प्रस्तुत प्रतिसादास 'माहितीपूर्ण' अशी श्रेणी मीच दिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे सर्व प्रॉब्लेम जर धर्मामुळे किंवा त्यातल्या कट्टरतेमुळे होत असतील तर ...

अमेरिकेत राहणाऱ्या, उच्चवर्णीय, उच्चशिक्षित, हिंदू-नास्तिक किंवा हिंदू-काठावरच्या धार्मिक स्त्रियांनाही, लेखात उल्लेख केल्यापैकी काही अडचणी होत्या असं त्यांच्या बोलण्यात येतं. उदाहरणार्थ, स्वयंपाक करताना घरातल्या इतर स्त्रियांचा जाच, 'तू आमच्या प्रथा-परंपरा पाळल्या पाहिजेत' अशी सक्ती नसली तरी "प्रेमळ" आग्रह, इत्यादी. हे प्रेमळ आग्रह फोन, व्हॉट्सअॅपवरूनही होतात. ह्या स्त्रियांनी हिंदू धर्म सोडल्याचं दिसलं नाही; त्यांनी त्रासदायक गोष्टी सोडल्या. (मला बऱ्यापैकी खात्री आहे, मी इथे ऑनलाईन चकल्या पाडण्याची तयारी करत असताना ह्या स्त्रिया आपापल्या घरी चकल्या-चिवडे-लाडू बनवत असतील.)

हे प्रॉब्लेम्स धर्मामुळे किंवा धर्मातल्या कट्टरतेमुळे नाहीत, पुरुषप्रधानतेमुळे आहेत. माणसांच्या कट्टर पुरुषप्रधानतेमुळे आहेत.

एके काळी धार्मिक हिंदू स्त्रिया जिवंत जाळल्या जात होत्या, त्यांचं केशवपन होत होतं किंवा त्यांना आयुष्यभर आलवणात राहायला लागत होतं तेव्हाही त्या धर्म सोडून जात नव्हत्या, हे विसरलात का? एके काळी जेव्हा काही लोकांना तूप खाल्लं म्हणून किंवा लग्नात घोड्यावरून वरात काढली म्हणून मारहाण होत असे (संदर्भ), तेव्हाही त्या लोकांना धर्मबदल करण्यासाठी एका नेत्याची गरज पडली, याची निराळी आठवण का करून द्यावी लागते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पहिल्या परिच्छेदात लिहिलेले प्रॉब्लेम्स आणि लेखातले प्रॉब्लेम्स ह्यात जमीन-आसमानाचा फरक आहे. त्यामुळे दोघांना एकाच तराजूत तोलणे योग्य नाही. उलट तुम्ही लिहिलेल्या गोष्टींमध्ये पुरोगामी विचार असल्यामुळे सक्ती होत नाही. केवळ खवचट टोमन्यांवर किंवा थोडीफार शाब्दिक बाचाबाची होऊन वैगेरे विषय थांबतो. त्या परिस्थितीत सासवा किंवा इतर मंडळी कुणीही धर्माचा वापर करून “धर्मात लिहिलंय म्हणून हे असं आम्ही सांगतो असं करायलाच पाहिजे नाहीतर घरातून निघा” असं म्हणत नाहीत. ह्या परिस्थितीला पुरुषप्रधान अजिबात म्हणता येणार नाही. ह्याला जर पुरुषप्रधान म्हंटलं तर उद्या सलमान खानला नटसम्राट म्हणाल, राखी सावंतला मिस युनिवर्स म्हणाल, तुमच्या आवडत्या ट्रंपला...(जाऊदे एकूण काय म्हणायचंय ते कळलं असं मी समजतो).

आता बाकीच्या परिस्थितीबद्दल (स्त्रिया जाळणे वैगेरे). हो हे खरे लज्जास्पद आणि भेडसावणारे “प्रॉब्लेम्स” आहेत. तुमचा एकूण मुद्दा कि अशे प्रॉब्लेम्स असले तरी स्त्रिया धर्म सोडत नाहीत. काही प्रमाणात पटतो, पण हे काळं-पांढरं असं बघता येणार नाही. खरी परिस्थिती जास्त चिघळलेली आणि बिकट आहे. म्हणजे हे प्रॉब्लेम्स धर्मामुळे होतात का? नसेल. पण हे प्रॉब्लेम्स घडवून आणणारे धर्माचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा शिक्षा टाळण्यासाठी सर्रास वापर करतात. मग ते हिंदू असो वा मुस्लीम (बाकीच्या धर्माबद्दल जास्त माहित नाही). मूळ धर्मातल्या गोष्टी कितपत बरोबर आहेत का चूक हा मुद्दा गौण आहे. मुळात धर्म ही गोष्ट शोषित आणि शोषक या दोघांमध्ये भिनलेली आहे रक्तासारखी. आणि ह्याच गोष्टीचा पुरेपूर वापर केला जातो. त्यामुळे प्रॉब्लेम्स धर्मामुळे होत नसले तरी अपराध्यांचा बचाव करण्यात धर्म बऱ्यापैकी मदत करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

लेखातला एक परिच्छेद -

लग्नापूर्वी प्रत्येक मुलीला "तू तो परायी है" सांगितले जाते. कडक शिस्तीमध्ये मुलीला वाढविले जाते. शाळेतून घरी परत यायला उशीर झाला की तिला मार खावा लागतो. दारातून बाहेर डोकावायला लागली किंवा मोबाइलवरून कोणाशी बोलताना दिसली की संशय घेतला जातो. मुलांशी मैत्री करू नये, पडदा करावा आणि मुकाट कुठलेही उलट उत्तर न देता जसे सांगितले गेले ते तसे करावे. मुलींनी आपल्या लग्नाविषयी स्वत: कुटुंबात चर्चा करू नये. तिला या घरात कुठलाच अधिकार नाही, जे करायचे असेल ते आपल्या सासरी करशील असेच वारंवार म्हटले जाते.

ह्यांतला पडदा वगळा आणि ओढणी दोन्ही खांद्यांवर घेण्याचा आग्रह म्हणा तर हे हिंदू घरांमध्ये होतच नाही असं वाटतं का? किंवा काही काळापूर्वी साडी नेसणं, पदर दोन्ही खांद्यांवरून किंवा डोक्यावरून घेणं, ह्या गोष्टी हिंदू लोकांमध्ये नव्हत्या का? "आमच्या घरी चिवडा असाच करतात", छापाच्या बडबडीचा हिंदू स्त्रियांना उपद्रव होतच नाही, असा तुमचा दावा आहे का? लेखात लिहिलेली परिस्थिती आणि मी वर्णन करत्ये ती परिस्थिती ह्यांत तीव्रतेचा फरक ही जाणीव मलाही आहे.

दुसऱ्या बाजूने, मी नास्तिक आहे; माझ्यावर परंपरेची प्रेमळ किंवा कशाही प्रकारे सक्ती करणाऱ्या लोकांना मी कधीच टाकलं आहे; तरीही मी इथे दिवाळी अंकाच्या चकल्या घालत्ये. दिवाळी अंक ही सगळ्या हिंदूंची परंपरा नसेलही, पण दिवाळी आणि दिवाळीच्या निमित्ताने विशिष्ट गोष्ट करणं ही हिंदूंचीच आहे.

दोन्ही गोष्टी सांगण्यामागचा मुद्दा असा की कितीही गचाळ असला तरीही धर्म टाकून देणं सहजशक्य नाही; त्यातल्या नको त्या गोष्टी टाकून दिल्या जातात.

आणि दुसरं, हा त्रास स्त्रियांनाच मोठ्या प्रमाणावर होतो. 'तू तो पराया है' असले डायलॉग पुरुषांना क-धी-ही ऐकवले जात नाहीत; ना पडदा-ओढणीचा आग्रह! सर्वधर्मसमभाव फक्त घटनेत आहे असं नाही, स्त्रियांना कमी प्रतीच्या मानव लेखण्यामध्येही आहे.

१. फेसबुक, मराठी इंटरनेट स्त्रियांचे अनेक समूह आहेत. ह्या समूहांमध्ये काय गप्पा चालतात, ह्यावरून ह्या कटकटीचा तरुण स्त्रियांना आजही त्रास होतो हे स्पष्ट दिसतं.
२. होय, असले अनेक नातेवाईक समोर आले तरीही मी त्यांच्याशी एक शब्दही बोलत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विषय इस्लाम व मुसलमानांचा असताना प्रख्यात लिबरल सवयीप्रमाणे हिंदू धर्मावर आणल्याबद्दल अभिनंदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुरुषप्रधान संस्कृतीवर केलेली टीका धर्मावर घसरवण्याबद्दल मला काहीही आश्चर्य वाटत नाही. त्यामुळे अभिनंदन करणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुरुषप्रधान संस्कृतीवर केलेली टीका धर्मावर घसरवण्याबद्दल

आमच्याकडे पुरुषप्रधान संस्कृती नाही. ह्याचाच अर्थ काही लोकांनी स्वताहुन पुरुषप्रधान संस्कृती सोडली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरुषप्रधान संस्कृतीवर केलेली टीका धर्मावर घसरवण्याबद्दल मला काहीही आश्चर्य वाटत नाही

एका खोलीत मोठठा काळा हत्ती आहे हे दिसत असुन सुद्धा असा हत्ती नाहीच आहे हे समजणे आश्चर्य वाटण्यासारखे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरीही मी इथे दिवाळी अंकाच्या चकल्या घालत्ये. दिवाळी अंक ही सगळ्या हिंदूंची परंपरा नसेलही, पण दिवाळी आणि दिवाळीच्या निमित्ताने विशिष्ट गोष्ट करणं ही हिंदूंचीच

अदिती तै - ह्या अश्या परंपरा तू कधीतरी करत असतील तर त्याचे कारण म्हणजे तुला त्या जाचक वाटत नाहीत.
दिवाळी साजरी करणे आणि बुरखा घालणे ह्या दोन परंपरा एकाच तराजुत मोजणे म्हणजे कैच्या कै आहे.

समजा उद्या हिंदु धर्मात बुरख्याची परंपरा चालू झाली तर तू हिंदु धर्म सोडशील की नाही?

त्यातल्या नको त्या गोष्टी टाकून दिल्या जातात.

इट डीपेंड्स. सर्व घरच नको त्या गोष्टीने भरली असेल तर ते घर बदलणे हा पर्याय योग्य आहे.
घरात बारीकसारीक कचरा असेल तर घराची स्वच्छता करुन त्यात रहाणे हा पर्याय आहे.
मुसलमान स्त्रीला आपले घर कुठल्या कॅटेगरीत बसते ते स्वताच ठरवावे लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उदाहरणार्थ, स्वयंपाक करताना घरातल्या इतर स्त्रियांचा जाच, 'तू आमच्या प्रथा-परंपरा पाळल्या पाहिजेत' अशी सक्ती नसली तरी "प्रेमळ" आग्रह, इत्यादी. हे प्रेमळ आग्रह फोन, व्हॉट्सअॅपवरूनही होतात. ह्या स्त्रियांनी हिंदू धर्म सोडल्याचं दिसलं नाही;

असा किंवा कसलाही आग्रह करणार्‍यांना मोठ्ठया आवाजात "हाड" म्हणुन ओरडायचे. पुन्हा हिम्मत करणार नाहीत प्रेमळ किंवा कसलाच आग्रह करण्याचा.
हिंदू धर्म सोडला नाही असे कसे, सोडला की. तू सोडलास, मी सोडला. अजुन कीतीतरी लाख स्त्रीयांनी सोडला असणार नक्की. आता धर्म सोडला हे गॅझेट मधे रजिस्टर करायला काही आपण जाणार नाही.
पण आपल्या दृष्टीने आपण धर्म सोडला की नाही?
असे कोणी शिक्षीत, स्वताच्या पायावर उभ्या मुस्लिम मुली करतील तेंव्हा त्यांना लेखात लिहीलेले प्रॉब्लेम जाणवणार नाहीत.
आपल्या मागास विचारांमुळे आपल्या स्त्रीया आपल्याला प्राप्य रहात नाहीत असे दिसले की पुरुषांना पण जाग येइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एके काळी धार्मिक हिंदू स्त्रिया जिवंत जाळल्या जात होत्या, त्यांचं केशवपन होत होतं किंवा त्यांना आयुष्यभर आलवणात राहायला लागत होतं तेव्हाही त्या धर्म सोडून जात नव्हत्या, हे विसरलात का?

ह्या वाक्याला काही अर्थच नाहीये. कारण मी माझ्या पहिल्या प्रतिसादापासुन शिक्षीत आणि स्वताच्या पायावर उभ्या असलेल्या मुलींबद्दलच बोलत होते. केशवपन केल्या गेलेल्या बायका स्वताच्या पायावर उभ्या नक्कीच नव्हत्या.

जेंव्हा स्वताच्या पायावर उभ्या असलेल्या मुली धर्म सोडतील, तेंव्हा २ गोष्टी घडतील
१. बाकीच्या स्त्रीयांना बळ मिळेल.
२. पुरुषांना त्यांचा धर्म आपल्याला स्त्री मिळण्याच्या मधे येतोय असे दिसेल तेंव्हा ते बदल घडवतील स्वतात थोडातरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र, स्वताच्या पायावर उभ्या असलेल्या मध्यम्/उच्च आर्थिक स्थितीतल्या तरुण मुली धर्म सोडुन देताना दिसतात का?

ते थोडंसं अकबर-बिरबलाच्या 'पोपट मेला' गोष्टीसारखं आहे. पोपट स्थिर पडून आहे, पंख पसरलेले आहेत, डोळे उघडे आहेत, नजर शून्यात आहे... वगैरे सगळं खरं असतं. पण पोपट मेला असं म्हणायचं नाही. तसंच स्वयंपाकघरात राहाण्याऐवजी नोकरी करतात, नास्तिक आहेत, धर्माची रिच्युअल्स काही करत नाहीत, शिकल्यासवरलेल्या आहेत, लग्न करण्याऐवजी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असतात, बापा-भावावर अवलंबण्याऐवजी स्वतःचं पोट स्वतः भरतात... हे सगळं खरं आहे. पण धर्म सोडला म्हणायचं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धर्माचा त्याग करण्यापेक्षा धर्मातच राहून हळूहळू तो बदलण्याचा प्रयत्न करणे हे स्वतःसाठी त्रासदायक असले तरी त्या धर्मासाठी, भविष्यकाळातील त्याच्या अनुयायांसाठी हितकारक ठरते. शिवाय मुस्लिम धर्मीयांनी धर्म बदलणे हे सामाजिक दृष्ट्या तितकेसे सुखकारक नाही. (भारतात) महिलांना सुयोग्य, समंजस हिंदू नवरा मिळाला तर निभावून जाते पण बरेच वेळा सामाजिक तणावाचा सामना करावा लागतो. कौटुंबिक आणि शिवाय सामाजिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समंजस हिंदू नवरा मिळाला तर...>>

हिंदुच का बरे?
इतर नवरे Wink समंजस नसतात का?

मी मूळात सासर माहेर दोन्हींकडून हिंदु नाही. आणि दोन्हीकडचे धर्म मूलतः स्त्रियांवर अन्याय करणारे नाहीत तर उलट स्त्रियांच्या सामाजिक उत्थानाला महत्त्व देणारे आहेत.
तरीही धर्मच नको या आग्रहामुळे मी सध्या निधर्मी आहे आणि असे सगळ्यांना बिनधास्त सांगते देखिल!

तरी आमच्या सासरी माहेरी दोन्हींकडे प्रचंड पुरुषप्रधानता आहे.
मला पुरुष प्रधानता पटत नाही पण स्त्री- पुरुष समानतेचा अतिरेकही पटत नाही.
आम्ही समता वाले आहोत.
Wink

दुसरं असं की चिवडा अस्साच हवा असा आग्रह फक्त सासरचेच करतात असे नाही कधीकधी सूनही सासरच्या चवी न आवडल्याने फराळाचे/इतर काही खात नाही असा स्वानुभव आहे.

आता मुख्य विषयाकडे.

कुठले घर म्हणू माझे?
मला माहेरचे घर माझे म्हणवत नाही आणि सासरचेही.
आमचे दोघांचे घर लग्न झाल्या दिवसापासून वेगळे आहे आणि ते आमचे/माझे आहे.

मुलींना असा प्रश्न पडू नये म्हणून त्यांना किंवा सगळ्यांनाच हे घर 'आपले' आहे असेच शिकवले आहे.
'एक दिन तुम्हे ये घर छोड के जाना है' 'बेटी घर बाबुलके दुसरोंकी अमानत है' अशी रडकी वाक्ये मुळीच मुलींसमोर उच्चारत नाही.
मुलाला आणि मुलींनाही तुम्हाला वेळ पडल्यास आम्हाला आर्थिक मदत/इतर मदत करावी लागेल हे समजावलेले आहे. (यात दत्तक मुलगीही आलीच)
लहान लहान गोष्टींतही त्यांना तिघांनाही कन्सल्ट करते.
आता नविन घर बांधायला घेतलंय त्यात तिघांनाही हवे तसे बांधकाम करणार आहे.
सो त्यांना कधीच 'कुठले घर म्हणू माझे' हा प्रश्न येणार नाही.

तरिही तुम्ही स्वतःचे आकाश स्वतःच विस्तारा आणि हवे असल्यास स्वतःचे घरटे स्वतःच एकट्याने किंवा जोडीदारासह बांधा असा विश्वासही त्यांना तिघांनाही योग्य त्या वयात देईनच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१)'हिंदू नवरा' लिहिताना अडखळायला झाले होते खरे. पण अन्य धर्मीय नवरा शोधताना भारतातल्या हिंदूबहुसंख्येनुसार तो हिंदू असण्याची शक्यता फारच अधिक अशा तर्काने इतके स्थूल लिहिले गेले. बिगरमुस्लिम असे स्पेसिफिक लिहायला हवे होते.
२)आपण मुलांना अगदी आणि योग्य पद्धतीने वाढवता आहात. त्यामुळे आपल्या पाल्यांना 'कुठले घर म्हणू माझे' हा प्रश्न पडणार नाही.
३)(हे आपल्यासाठी नाही,) पण मुस्लिम धर्म हा मुळातच/अजूनही पुरुषसत्ताक आहे. ही पुरुषाची स्वामित्वभावना धर्माशी घट्टपणे निगडित आहे. आणि समाजात धर्मसत्ता अतिशय प्रबळ आहे. स्त्री-पुरुषसमानतेची आधुनिक मूल्ये मुळी धर्मसत्तेला मान्यच नाहीत. त्यामुळे स्त्री-पुरुषसमानता आणायची तर धर्मसत्तेचा प्रभाव कमी होणे आवश्यक आहे. म्हणून लढा धर्मसुधारणेसाठी आहे. त्यात पुरुषशाहीविरुद्धचा लढा पुढे आपोआपच अंतर्भूत होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धर्माचा त्याग करण्यापेक्षा धर्मातच राहून हळूहळू तो बदलण्याचा प्रयत्न करणे हे स्वतःसाठी त्रासदायक असले तरी त्या धर्मासाठी, भविष्यकाळातील त्याच्या अनुयायांसाठी हितकारक ठरते.

राहीताई, ज्यांना समाज सुधारक बनायचे असेल त्यांच्यासाठी हा मार्ग ठीक आहे.
माझा प्रश्न अश्या स्त्रीयांसाठी होता की ज्यांना कमीतकमी स्वताची तरी त्रासातुन मुक्तता करुन घ्यायची आहे आणि आर्थिक आणि शैक्षणीक कारणासाठी शक्य पण आहे.
कोणी अशी मुलगी इंफी मधुन हाम्रीकेत गेली, तर तिथेच क्रीश्चन होऊन टाकायचे. हाकानाका.

------
फार पूर्वी माझ्या प्रोजेक्ट मधे एक लखनऊ ची मुलगी होती. बुरखा/हीजाब वगैरे वापरायची नाही. १ वर्ष इंग्लंडात पण राहीली होती.
पण परत भारतात आली आणि एका सौदीत काम करणार्‍या भारतीयाशी लग्न केले. नोकरी सोडली. आता भारतातच असते, अधुनमधुन बुरखा घालते असे तिच्याकडुन च कळले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणी अशी मुलगी इंफी मधुन हाम्रीकेत गेली, तर तिथेच क्रीश्चन होऊन टाकायचे. हाकानाका.

पहिले म्हणजे, (फॉर व्हॉटेवर रीझन) ख्रिश्चनच जर व्हायचे असेल, तर त्याकरिता हाम्रीकेतच जायची काय गरज अाहे?

दुसरे, (जगातल्या एकंदरीतच, पण खास करून) हाम्रीकेतल्या 'ख्रिश्चन' म्हणवणाऱ्या समाजात या बाबतीत (खास करून स्त्रियांच्या स्थानाच्या, स्वातंत्र्याच्या, अधिकारांच्या बाबतीत) सर्वच आलबेल आहे, अशी तुमची खरोखरच प्रामाणिक समजूत आहे काय? (बुरसटलेपणाच्या बाबतीत हाम्रीकेतील स्वत:स आवर्जून 'ख्रिश्चन' म्हणवून घेणारी जी जमात आहे, तीस त्रिभुवनात तोड नाही असे नाही, परंतु त्रिभुवनातील बुरसटलेल्यांच्या मांदियाळीच्या खांद्यास खांदा देऊन उभी राहण्यास ती पुरेपूर समर्थ आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इस्लामचा त्याग करून अन्य धर्मात स्थिर आयुष्य लाभणे ही भारतात विरळा सापडणारी गोष्ट आहे. आधीच हिंदू (शिवाय घटस्फोटित) मुलींना अनुरूप हिंदू मुलगे नवरा म्हणून मिळणे कठिण. आईबाबा ठरवतील त्या मुलाशी मुकाट लग्न करावे लागते अजूनही बहुसंख्य विवाहांत. (नवर्‍यावरसुद्धा हा पालकप्रेशर असतोच, पण त्याला थोडेबहुत तरी निवडस्वातंत्र्य असते.) त्यात परधर्मी मुलीला सहजासहजी कोण स्वीकारणार?
अलीकडे हिंदूंमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे पण त्या प्रमाणात पुनर्विवाहाचेही वाढले आहे की काय याचा विदा शोधला पाहिजे. त्यातही घटस्फोटित मुलींच्या पुनर्विवाहांचे प्रमाण पाहिले पाहिजे.
हे सर्व पुन्हा हिंदूसापेक्ष झाले. ख्रिश्चन, शीख आणि बौद्धांमध्ये कदाचित प्रश्न इतका तीव्र नसेल. आणि लिंगायतांमध्येही. पारशांना मात्र परधर्मात विवाह मान्यच नाही. पण ते इतके अल्पसंख्य आहेत की त्यांच्यातल्या आकडेवारीमुळे निष्कर्षात काही फरक पडणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(भारतात) महिलांना सुयोग्य, समंजस हिंदू नवरा मिळाला तर निभावून जाते पण बरेच वेळा सामाजिक तणावाचा सामना करावा लागतो. कौटुंबिक आणि शिवाय सामाजिक.

समजा हिंदू नवरा समंजस (व्हॉटेवर द्याट मे मीन) मिळाला, असे धरून चालू. परंतु अशा वेळेस अशा मुस्लिम स्त्रीस (तिच्या माहेरून होणारा विरोध तूर्तास सोडा, पण) घरात सून/नातसून/व्हॉटेवर म्हणून स्वीकारण्याअगोदर तिची 'शुद्धी' करून घेण्याचा अट्टाहास मुलाची आई/आजी/एखादी दूरची आत्या वगैरे करत नाही? आणि अशा वेळी मुलाकडच्या अशा ज्येष्ठांचा (परंपरेने/सोयिस्कररीत्या/सवडशास्त्राने) 'आदर' वगैरे करायचा नसतो?

'समंजस' हिंदू नवऱ्यांचे सोडा. मुसलमान सून स्वीकारू शकणाऱ्या किती 'समंजस' हिंदू वरमाया आहेत? त्यातही 'आहे तशी' (बोले तो, शुद्धीबिद्धीची अट न घालता) स्वीकारू शकणाऱ्या?

मुळात, 'समंजस' हिंदू नवरे फुटपाथवर घाऊक भावात उपलब्ध आहेत काय? भारतात मुसलमानांची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास १३% आहे. त्यापैकी निम्म्या स्त्रिया आहेत असे धरून चालू. (भारतीय मुसलमान समाजांत स्त्रीपुरुषगुणोत्तर १:१ आहे हे यामागील गृहीतक आहे. कदाचित चुकीचेही असेल. म्हणजे कदाचित याहूनही अधिक स्त्रिया असू शकतील.) पैकी, (ऱ्याण्डमली) १५% विवाहयोग्य वयाच्या आहेत आणि (पुन्हा ऱ्याण्डमली) त्यातल्या निम्म्या अविवाहित आहेत असे मानू. आता, भारताची लोकसंख्या आजमितीस किती, याची मला कल्पना नाही, आणि ती कळली, तरी पुढची आकडेमोड करायचा मला कंटाळा आहे; तेवढीच हौस असल्यास राघा वगैरे मंडळी ती करतीलच, तेव्हा तो उद्योग त्यांच्यावर सोडून देऊ. पण तरीही विवाहयोग्य वयातील अविवाहित भारतीय मुसलमान तरुणींची संख्या बरीच मोठी असावी. पैकी सगळ्या 'समंजस' हिंदू नवरा मिळायचीच गाठ, की त्याच्याशी विवाह करायला उत्सुक असून वरमाला हातात धरून उभ्याच आहेत, हे गृहीतक मला का कोण जाणे, पण भयंकर डूबियस वाटते, परंतु वादाच्या सोयीसाठी तेही जरी गृहीत धरले (गृहीत काय, वाटेल ते धरावे!), तरी तितकी डिमांड मीट करायला तुमच्या 'समंजस' हिंदू नवऱ्यांच्या सप्लायमध्ये तितकी स्पेअर कप्याशिट्टी आहे काय?

(स्पेअर कप्याशिट्टी मरू द्या. केवळ हिंदू समाजांतर्गतची डिमांड ('डोमेष्टिक डिमांड' हा शब्दप्रयोग गैरसमज होऊ नयेत म्हणून मुद्दामच टाळला आहे.) मीट करण्याइतकी तरी कप्याशिट्टी आहे काय? बोले तो, 'समंजस' नवऱ्यांची म्हणतोय हं मी!)

उगाच आपल्या लष्करच्या भाकऱ्या कशासाठी भाजायच्या त्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑप्रेसिव्ह धर्म आणि पुरुषप्रधानता - आधी अंड का आधी कोंबडी? मला वाटतं दोन्ही अंगे तितकीच अन्यायकारक आहेत. अदिती म्हणतेय की ब्लेम इट ऑन "पुरुषप्रधानता" तर अनु धर्मावरती खापर फोडते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनु धर्मावरती खापर फोडते आहे.

नाही ग शुचि, मी धर्मावर खापर नाही फोडत. मुळ लेखाच्या लेखिकेनेच ते खापर फोडले आहे.
मी फक्त इतकेच विचारले की एखादा धर्म जर स्त्रीयांच्या त्रासाला कारणीभूत असेल तर त्यातल्या १ टक्का स्त्रीया तरी तो धर्म सोडत का नाहीत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी फक्त इतकेच विचारले की एखादा धर्म जर स्त्रीयांच्या त्रासाला कारणीभूत असेल तर त्यातल्या १ टक्का स्त्रीया तरी तो धर्म सोडत का नाहीत?

कित्ती बाळबोद प्रश्नै नै?

नवर्‍याच्या हातची विनाकारण खणखणीत कानफट्ट्यात खाऊनही नवरा न सोडणार्‍या किती स्त्रिया तुम्हाला ठाऊक आहेत? उत्तर शून्य असेल, तर तुम्ही महान आहात, अन आम्ही अंध आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

नवर्‍याच्या हातची विनाकारण खणखणीत कानफट्ट्यात खाऊनही नवरा न सोडणार्‍या किती स्त्रिया तुम्हाला ठाऊक आहेत? उत्तर शून्य असेल, तर तुम्ही महान आहात, अन आम्ही अंध आहोत.

एक स्त्री आहे तिने नवर्‍याच्या हातची विनाकारण खणखणीत कानफट्ट्यात खाल्ली. तिथे किमान ३ माणसं उपस्थित आहेत. मी, ती स्त्री, तिचा नवरा. मी तिथे साक्षीला आहे. आता अशा परिस्थितीत नेमके काय घडायला हवे व/वा घडवून आणायला हवे, आडकित्ता ? आमच्या तिघांपैकी प्रत्येकाने काय करायला हवे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिथे तुम्ही काय करावे हा तुमचा चॉईस आहे. तुमचा चॉईस आनंदाने टाळ्या वाजवण्याचा असला तरी ते irrelevant आहे.

पण ती नवरा सोडत नसेल, तर त्याच लॉजिकने धर्म सुटत नाही, असा माझा मुद्दा आहे.

धर्माचा जाच अप्रत्यक्ष तर नवऱ्याचा अधिक डायरेक्ट व severe असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ओके. ठीक. समजला मुद्दा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ती नवरा सोडत नसेल, तर त्याच लॉजिकने धर्म सुटत नाही,

आधी ज्या मुसलमान स्त्रीयांना पैकी शक्य आहे त्यांनी नवरेच करु नये, म्हणजे त्यांचे तरी ९९ टक्के प्रॉब्लेम सुटतील.
दुसरे म्हणजे स्वता काहीच हालचाल करायची नसेल तर प्रॉब्लेम सुटतील तरी कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"दुसरे म्हणजे स्वता काहीच हालचाल करायची नसेल तर प्रॉब्लेम सुटतील तरी कसे?"
इतके बेधडक विधान? मग रुबिनाताई आणि त्यांच्या अनेक समविचारी मुस्लिम कार्यकर्त्या काय करीत असाव्यात?
मुस्लिम महिलांत सुधारणेचा विचार हळूहळू पण नक्कीच रुजतो आहे हे मुस्लिम महिला जगताचा थोडासा कानोसा घेतल्यास आणि भारतातली वर्तमानपत्रे वाचत असल्यास कुणालाही सहज समजून येण्यासारखे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतके बेधडक विधान? मग रुबिनाताई आणि त्यांच्या अनेक समविचारी मुस्लिम कार्यकर्त्या काय करीत असाव्यात? मुस्लिम महिलांत सुधारणेचा विचार हळूहळू पण नक्कीच रुजतो आहे ....

आता माझा मुद्दा मांडतो.

हे हळूहळूच का व्हायला हवे ? दीडशे वर्षे होऊन गेली स्त्रियांच्या शाळा सुरु झाल्या त्याला. मुस्लिम स्त्रिया धडाकेबाज निर्णय का घेत नाहीत ? धर्म सोडून देणे हा एकच पर्याय आहे का ? घरातल्यांना सोडून देणे हा पर्याय नाही ? मोहल्ल्यातून बाहेर पडणे हा पर्याय नाही ?

उदयभाना सारखा वापसी चा दोर कापून टाकून लडेंगे या मरेंगे अशी भूमिका का नाही घेत ? दर वेळी सुधारणेचे दळण दळत का बसतात ? मी समजू शकतो की बहुतेक स्त्रिया करू शकत नाहीत. पण काही स्त्रिया का करत नाहीत ? ( का दर वेळी ... ते पुस्तकात होतं ... वास्तव जीवनात होत नाही... मनोर्‍यातून खाली या .... वगैरे ...म्हणून इतिश्री ? )

------
.
.
एखाद्या नवीन संकल्पनेचे अ‍ॅडॉप्शन कसे होते ... त्याचा एक मस्त आलेख. Geoffrey A. Moore यांच्या संकल्पनेचे विडंबन.
.
.
.
badal

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उदयभाना सारखा वापसी चा दोर कापून टाकून लडेंगे या मरेंगे अशी भूमिका का नाही घेत ?

वापसीचा दोर उदयभान कशाला कापून टाकेल? त्याला बरेच ना, त्याच्यावर (नि गडावर) हल्ला करायला आलेले मावळे पळून गेले तर?

(आ बैल?)

आणि, समजा उदयभानाने दोर कापला, तर तोही 'लड़ेंगे या मरेंगे' म्हणत कापेल? भारीच खाज बुवा लढण्याची तुमच्या उदयभानात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्लेरिकल मिष्टेक झाली वाटतं माझ्याकडून.

इतिहासाच्या तासाला लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे हळूहळूच का व्हायला हवे ? दीडशे वर्षे होऊन गेली स्त्रियांच्या शाळा सुरु झाल्या त्याला.

सुरुवात कधी झाली याला काही विशेष अर्थ नसतो. तसं म्हटलं तर लोकांनी पंडित, विद्वान व्हायला हजारो वर्षांपूर्वी सुरुवात झाली. मग आज सगळेच का पीएचडी नाहीत? गेल्या पन्नास-साठ वर्षांतच भारतातल्या स्त्रियांची लिटरसी लेव्हल जवळपास शून्यापासून ते सत्तर-ऐशी टक्क्यांवर आलेली आहे. त्याहीआधी डॉक्टर आनंदीबाई जोशी होत्याच ना, असं म्हणून फारसा उपयोग नसतो. हे बदल सार्वत्रिक व्हायला खरोखरच वेळ लागतो. पुढच्या पिढीत उच्चशिक्षण घेणाऱ्या ३५-४० टक्के स्त्रिया असतील. पण मागच्या पिढीत ती संधी जेमतेम ५-१० टक्क्यांनाच मिळाली.

थोडक्यात, २०५० साली चित्र वेगळं असेल, आणि त्यावेळी मुस्लीम स्त्रियाही तुम्ही म्हणता तसं करतीलच. पण आत्ताच्या परिस्थितीत एवढंच शक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता अशा परिस्थितीत नेमके काय घडायला हवे व/वा घडवून आणायला हवे, आडकित्ता ? आमच्या तिघांपैकी प्रत्येकाने काय करायला हवे ?

अडकित्तांचे म्हणणे काहीच दिसत नाहीये. जर स्त्री मुस्लीम असेल तर तिने धर्म बदलावा असे अनुच म्हणतेय. ते तुमच्या मते आहे का बरोबर? हा प्रश्न अनुला पाहीजे होता जो तुम्ही अडकित्तांना विचारलायत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरिल चर्चेवरून मुख्यत्त्वे जाणवलं तर काय की पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमुळे 'कुठले घर म्हणू माझे' असा प्रश्न पडतो.
मुलगी कुठल्याही धर्मातली असू दे.

त्या त्या धर्मातील सुधारक विचारांचे लोक माहेरी सासरी असतील तर हा प्रश्न तितका तीव्र होत नाही.
मुलगी स्वाभिमानी, धीट आणि कमावती असेल तरीही असा प्रश्न येत नाही.

मुस्लिमांच्यात एकंदरच शिक्षण, स्त्रीशिक्षण यांचा अभा असल्याने मग पुढे हे असले प्रश्न जास्त तीव्र होत असतील.

मुस्लिम बहुल अश्या हैद्राबादजवळच्या एका गावात मी रहाते.
इथे एकत्र कुटूंब पद्धती मुस्लिमांत असली तरी मुलगा कमावता आहे आणि स्वतःच्या नविन कुटूंबाची जबाबदारी स्वतः एकटा पेलू शकतो असे दाखविल्याशिवाय (चक्क स्वधर्मिय समाजाच्या सभेपुढे) लग्नाचा विचारच पुढे जाऊ देत नाहीत.
कित्येक मुस्लिम स्त्रिया अशिक्षित असूनही आणि कमावत्या नसूनही घर आपल्या मुठीत ठेवतात.
Wink
एकाहून अधिक पत्नी करायचे प्रमाण अगदी कमी आहे.
त्यामुळे कदाचित घर 'आपले' करून ठेवण्याकरिता शिक्षण, लग्न, धर्म, स्वाभिमान या पलीकडेही काहीतरी 'एक्स' फॅक्टर असावा असेही मानण्यास जागा आहे.
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यामुळे कदाचित घर 'आपले' करून ठेवण्याकरिता शिक्षण, लग्न, धर्म, स्वाभिमान या पलीकडेही काहीतरी 'एक्स' फॅक्टर असावा असेही मानण्यास जागा आहे.

टाळ्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखाच्या अनुषंगाने पूर्वी कुठेतरी टंकलेला माझाच एक प्रतिसाद आठवतो. शब्दशः नाही, पण सार असे:

"हुंडाबळी" किंवा तत्सम कारणांनी सासरी छळ सहन करणार्‍या मुलींच्या त्रासाला/जीव जाण्याबद्दल, तिच्या माहेरच्यांना जबाबदार धरले जावे, असे आमच्या बंधूंचे मत होते. कारणे अशी:

९९% वेळा मुलीने तिकडे होणारा छळ घरी(माहेरी) सांगितलेला असतो,

९९% वेळी तिला, तु़झ्या धाकट्या बहिणी/भाऊ उजवायचे बाकी आहेत. तू नांदली नाहीस तर कसे होईल? वगैरे कारणे देऊन तिकडे सोडून/हाकलून दिलेले असते. तुला परणून दिली त्या दिवशी तू आम्हाला मेलीस इतपत बोलणी झालेली असतात.

९०% मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल इतपत शिक्षण दिले गेलेले नसते. भाऊ इंग्रजी माध्यमात अन बहिण "मराठी शाळेत" (म्युन्सिपाल्टी) अशी कुटुंबे मी पाहिली आहेत. शिक्षण, नोकरी असेल तरीही आमच्याकडे सुनांनी नोकरी केलेली चालत नाही म्हणून म्हणा, किंवा लग्नानंतर गाव बदलावे लागले म्हणून म्हणा हातातली नोकरी गेलेली असते.

शेवटी ती पोरगी विहीर किंवा रॉकेलची बाटली डोक्यावर ओतणे पसंत करते..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

९९% वेळी तिला, तु़झ्या धाकट्या बहिणी/भाऊ उजवायचे बाकी आहेत. तू नांदली नाहीस तर कसे होईल? वगैरे कारणे देऊन तिकडे सोडून/हाकलून दिलेले असते. तुला परणून दिली त्या दिवशी तू आम्हाला मेलीस इतपत बोलणी झालेली असतात.

९०% मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल इतपत शिक्षण दिले गेलेले नसते. भाऊ इंग्रजी माध्यमात अन बहिण "मराठी शाळेत" (म्युन्सिपाल्टी) अशी कुटुंबे मी पाहिली आहेत.

हे १००% खरे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लग्नानंतरची आत्महत्या माहेरच्यांनाही भोवणार?
http://www.loksatta.com/nagpur-news/women-suicide-attempt-in-nagpur-1328...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

इस्लाम सोडणं तितकं सोपं नाही. इस्लाम सोडणं हा खूप मोठा गुन्हा मानला जातो. काही देशांत हा मृत्युदंड-पात्र गुन्हा आहे. इथे कायद्याने तसं नसलं तरी माथेफिरू लोक काय करतील सांगता येत नाही. स्वातंत्र्य मिळण्याऐवजी जीव जायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बर्याच गोष्टी आहेत:

मुळात हे जे काही होतंय ते वाईट होतंय , अन्यायकारक आहे किंवा बरोबर नाही हे समजण्याइतका विचार बऱ्याच सुशिक्षित मुलीसुद्धा करत नाहीत. लग्नानंतर घाईघाईने नाव बदलणे किंवा आगगाडीचे डबे जोडल्यासारखं माहेरच्या आडनावामागे सासरचं आडनाव जोडणे , आमच्याकडे ना अस्संच लागतं असं सांगणे हे सगळं त्यांना भारी वाटतं !!

माझी सख्खी मैत्रीण जेव्हा लग्नानंतर फुल्ल टाईम घरी बसते, फेसबुकवर मोठ्ठया कौतुकाने होममेकर असं लिहिते, घरी कायम साडी नेसतात पण क्वचित कधीतरी पंजाबी ड्रेस घातला तरी चालेल असं सासरचे म्हणालेत, वर्षभरानंतर तिने घरचा बिझनेस जॉईन करन्याबद्दल नवरा सासर्यांना विचारेल असं काय काय सांगत असते तेव्हा तिला धरून गदागदा हलवावं वाटतं.

मुस्लिम समाजाबद्दल फारशी माहिती नसल्याने माझा पास.
अनुरावांचे बरेचसे मुद्दे पटत असले तरी धर्म सोडणं गरजेचं वाटत नाही ... कदाचित माझा जन्म तीव्र , टोकाच्या धर्मात /धार्मिक कुटुंबात न झाल्यामुळे असेल.
प्रथा परंपरा हव्या त्या घ्याव्या , नको त्या सोडाव्या आपलं व्यक्तिस्वातंत्र्य , स्वाभिमान जपण्याचं भान आपणच ठेवलं पाहिजे. मला माझ्या सासूने लग्नांनंतर सांगितलं कि आपल्या घरातल्या सुनांनी संकष्टी , वटपौर्णिमा आणि श्रावणी शुक्रवार करायचा नसतो - आता ह्यात मला काहीच प्रॉब्लेम नव्हता - आधीही मी कधी हे काही केलेलं नव्हतं . मग ह्या अशा प्रथा सांभाळण्यात हरकत ती काय ?

पण हेही माहिती आहे कि इच्छा नसूनही बऱ्याच परंपरा , रूढी , कुळधर्माच्या नावाखाली , एकत्र कुटुंबाच्या नावाखाली बऱ्याच मुलींना पाळाव्या लागतात , व्यवस्थेचा दोष आहेच पण हे असे बदल एका रात्री होणारही नाहीत .

रुबिनाताईना आणि सहकार्यांना शुभेच्छा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

अनुरावांचे बरेचसे मुद्दे पटत असले तरी धर्म सोडणं गरजेचं वाटत नाही ... कदाचित माझा जन्म तीव्र , टोकाच्या धर्मात /

पण समजा, तुम्ही टोकाचे विचार असलेल्या धर्मात जन्मला असता तर काय केले असते? सर्वांना शक्य नाहीच, पण ज्यांना शक्य आहे त्यांच्या पैकी ५ टक्के लोकांनी पण करु नये हे आश्चर्यकारक आहे.

तसेही, माझी सर्व व्यवहारीक तत्वज्ञान हे "स्वता"मधे बदल करण्याचे असते. दुसर्‍यांना ( मग ती व्यक्ती असो की धर्म) बदलण्याच्या फंदात वेळ व उर्जा घालवू नये. आपला मार्ग चोखाळावा. दुसर्‍यांना बदल करावाचा वाटला तर ते करतील, नाही करावासा वाटला तर मला फरक पडुन द्यायचा नाही.

घराच्या शेजारी झोपडपट्टी तयार झाली आणि त्यातले लोक रात्री-बेरात्री दारू पिऊन दंगा करायला लागले तर, मी तरी त्यांना सुधारण्याच्या फंदात न पडता दुसर्‍या ठीकाणी फ्लॅट घेइन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>घराच्या शेजारी झोपडपट्टी तयार झाली आणि त्यातले लोक रात्री-बेरात्री दारू पिऊन दंगा करायला लागले तर, मी तरी त्यांना सुधारण्याच्या फंदात न पडता दुसर्‍या ठीकाणी फ्लॅट घेइन.<<

टिपिकल अरेरावी अनुरावी प्रतिसाद. एखाद्या सर्वसामान्य मुंबईकराला असं म्हणून बघा, म्हणजे कळेल हे किती अवास्तव आहे ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सुंदर लेख आणि रोचक चर्चा ! मुस्लिम असो किंवा हिंदु ,स्त्री स्वावलंबी झाल्याशिवाय हे प्रश्न सुटणं कठीण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख थोडा सरधोपट आणि एकसूरी वाटला, आणि त्यामुळे चर्चा देखील तशीच अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पातळीवर चालू आहे. लेखात नोंदवलेल्या समस्या अमान्य नाहीत, पण त्या फक्त मुस्लिम स्त्रियांना लागू नाहीत. बुरखा, तलाक चे ठराविक प्रश्न सोडले तर "पराया धन", "सातच्या आत घरात", लग्नाची घाई, आर्थिक परावलंबन, मारहाण आणि मानसिक शोषण, वगैरे, भारतात बिगरमुस्लिम स्त्रियांना, आणि कमीजास्त प्रमाणात अनेक वर्गातील स्त्रियांना देखील लागू आहेत. त्याच वेळी ठराविक जात, धर्म, प्रदेश, वर्गानुसार मुख्य प्रश्न व त्यांचे दैनंदिन अनुभव निराळेही आहेत. सर्व मुद्द्यांनाच घर, परिवार व नात्यांची पार्श्वभूमी आहे, पण एकाच धर्माच्या स्त्रियांचे वेगवेगळ्या प्रदेशात (उदा. बंगाल / उत्तर प्रदेशातील मुस्लिम स्त्रियांचे) त्याच धार्मिक नियमांचे अनुभव सारखे नाहीत; शहरी-ग्रामीण परिस्थितीतही फरक आहेच. मुस्लिम पंथांमध्ये देखील स्त्रियांसमोर महत्त्वाच्या समस्या अनेकविध आहेते. बोहरा समाजात जेनिटल कटिंग (फीमेल जेनिटल म्यूटिलेशन) चा प्रश्न महत्त्वाचा आहे, तर बाङ्ला मुस्लिम स्त्रियांना मालमत्तेच्या अधिकाराचा.

असे असता, "मुस्लिम स्त्रियां"बद्दल नेमके कसे, व कोणी बोलावे? सरसकटीकरणामुळे काही ठळक मुद्दे समोर येतात, पण फारसे नवीन काही हाती लागत नाही - "अबला नारी"चेच चित्र पुन्हा गिरवले जाते. त्यापेक्षा लेखिकेच्या कार्याबद्दल, ठराविक स्त्रियांच्या अनुभवांबद्दल, व ठिकठिकाणी घडत असलेल्या चांगल्या-वाईट बदलांबद्दल जवळून जाणून घ्यायला आवडले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चा आवडली. काही नवीन लिहिण्यासारखे नसल्याने पास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0