लोकशाही राज्यपद्धतीचे फायदे व तोटे

लोकशाही राज्यपद्धतीचे फायदे व तोटे

लेखक - जयदीप चिपलकट्टी

सूर्याच्या लालभडक वर्तुळावर समुद्राने आखलेली जीवा जसजशी अधिकाधिक लांब होऊ लागली, तसतशी शीडकाठीभोवतालची खलाशांची दाटी वाढत चालली. एकोणीसचाचाने एव्हाना पूजा संपवत आणली होती. ताम्हन खाली ठेवून त्याने डावा हात गलबताबाहेर काढला, आणि समुद्रफेसाचे तीन पुंजके तळहाताच्या खळग्यात उचलून घेतले. उजव्या हाताच्या तर्जनीने ते एकत्र करून नारळाच्या खरखरीत पृष्ठभागावर त्याने अोली परीघरेषा काढली. बदामी लाकडातून बनवलेल्या सहा आऱ्यांच्या चक्राची बोथटलेली कड त्याने रेषेवर लावून धरली, आणि आता मागे उंचावलेला हात वेगाने खाली आदळताच बद्द आवाज होऊन एक रुंदट चीर नारळावर दिसू लागली. मूर्तीच्या पायाशी ठेवलेली साकळलेल्या रक्ताच्या रंगाची कापडी चंची त्याने नारळपाण्याने भिजवून काढली. भकले अर्धवट उघडी मांडून ठेवून त्याने हातांत दोन झांजा घेतल्या आणि स्वत:चा उंच किनरा आवाज इतरेजनांत मिसळून दिला.

सुखहर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची॥
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।
कंठी झळके माळ काट्या कवट्यांची॥

जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती।
दर्शनमात्रे मन कामना पुरती जयदेव जयदेव॥

आरत्या संपल्या आणि मंत्रपुष्पांजली म्हणून झाली. सराईत हातांमध्ये जडशीळ कोयता धरून एकोणीसचाचा खोबऱ्याचा पृष्ठभाग कोरू लागला. मूर्तीपासून पंधरावीस फुटांवर हातपाय बांधून बसवलेल्या आगंतुकाच्या अनुत्सुक तोंडात त्याने एक लहानसा तुकडा कोंबला. दोघाजणांनी पुढे होऊन त्याच्या अवयवांना जखडणारे दोरखंड सैल करून काढून टाकले. मनगटे चेहऱ्यासमोर आणून आगंतुकाने त्यांच्यावर फुंकर घातली ही गोष्ट जरी खरी असली, तरीदेखील त्यांच्या भगभगत्या लालसरपणाचा त्याला विशेष त्रास होतो आहे असा समज पाहणाऱ्याचा झाला नसता.

"सूर्यास्त होऊन गेलेला आहे," आठकाकू म्हणाली. "तासाभरात पानं मांडली जातील. ताज्या नारळाचे मोदक असतील. सगळ्यांबरोबर तूही जेव आणि शांत झोप घे. कोरडे कपडे, तीन दिवस पुरेल इतका शिधा, पखालभर पाणी आणि एक तराफा इतकं तुला उद्या सकाळी देण्यात येईल. आमच्याबद्दल कोणाहीकडे तू अवाक्षर काढणार नाहीस एवढं वचन आम्हाला दे, आणि तुझ्या वाटेने तू परत जा."

"तुम्ही लोक कोण आहात?" आगंतुकाने विचारलं.

"तुझी नाव आम्ही अडवली आणि पंचवीस हिरे असलेली तुझ्याकडची चंची हस्तगत केली ह्या घटनेकडे पाहून आम्ही चाचे आहोत असा संशय कोणालाही येईल," एकोणीसचाचा म्हणाला. "तो खरा आहे, पण आमची दहशत बाळगण्याचं तुला कारण नाही. तुझ्याकडून जे मिळण्यासारखं होतं ते आम्हाला मिळालेलं आहे. यापुढे तुला इजा करण्यात आम्हाला रस नाही."

"पण असा विश्वास मी कशाच्या आधारे बाळगू?" आगंतुकाने विचारलं.

"कारण डोळस स्वार्थ हा आमचा धर्म आहे," एकोणीसचाचा म्हणाला. "ऐहिक सुखाची प्राप्ती करून घेण्याकरता माणसाने आपली बुद्धी खर्ची घालावी असं आमचं जीवनविषयक तत्त्वज्ञान आहे, आणि ह्या उद्दिष्टासाठी जितकी गरजेची आहे तितकीच हिंसा आम्ही करतो. त्यापेक्षा जास्त नाही किंवा कमी नाही. आम्ही बुद्धिमत्तेचे आणि म्हणूनच गणपतीचे पूजक आहोत. पण आमच्या गणपतीच्या गळ्यात नररुंडांची माळ आहे हे तू पाहतोच आहेस. आमचा गणपती आम्हाला सबुद्ध निर्दयपणा शिकवतो. जर लोकायतपंथीय लोक गणपतीचे भक्त असते तर जसे असते तसे आम्ही आहोत. पण चौथ्यापाचव्या शतकात जेव्हा गणपती हा देव प्रसिद्ध झाला त्याच्या कित्येक शतके आधीच ते होऊन गेल्यामुळे त्यांना हे शक्य नव्हतं. जावा बेटाजवळच्या समुद्रात आमचं गलबत असताना एका पडक्या देवळातून ही मूर्ती आम्ही उचलून आणली."

"ठीक आहे, पण स्वसंरक्षण हा माझा धर्म मी पाळला याबद्दल तुम्ही मला दोष देऊ नये," आगंतुक म्हणाला. "माझ्याजवळ बंदुक होती, तिच्यातून एक प्रतीकात्मक गोळी हवेत झाडायची तेवढी मी झाडली. अर्थात तिचा उपयोग असा होणार नव्हताच, आणि तुमच्या हाती मी सापडायचा तो शेवटी सापडलो."

"असा दोष आम्ही तुला कधीही देणार नाही, कारण स्वसंरक्षणाचा हक्क आम्हा सर्वांना मान्य आहे," आठकाकू म्हणाली. "तेव्हा ती काळजी नको. तू आता आमचा पाहुणा आहेस. आज गणेशचतुर्थीनिमित्त खास जेवण तर आहेच पण त्यानंतर वाढदिवसाचा केकसुद्धा आहे, तेव्हा पोटात जागा ठेव."
"वाढदिवस?" आगंतुकाने विचारलं.
"हो, आज वाढदिवस आहे," आठकाकू म्हणाली.
"कुणाचा?"
"आमचा."
आगंतुकाला अर्थबोध झाला नव्हता.
"गणेशचतुर्थी हा आम्हा सर्वांचा तिथीप्रमाणे वाढदिवस असतो," एकोणीसचाचा म्हणाला. "तुला आमचा थोडा विस्ताराने परिचय करून देतो, म्हणजे तुझा गोंधळ मिटेल. आमच्यातला सर्वात धाकटा १-चाचा. आज तो १८ वर्षांचा होतो आहे, आणि त्याची बायको २-काकू १९ वर्षांची होते आहे. यानंतरचं जोडपं म्हणजे ३-चाचा आणि ४-काकू, ते अनुक्रमे २० आणि २१ वर्षांचे होताहेत. यानंतर ५-चाचा, ६-काकू, ७-चाचा, ८-काकू असं पुढे जात जात आमच्यातलं सर्वात म्हातारं माणूस म्हणजे ८२-काकू. ती आज ९९ वर्षांची होते आहे. माझं नाव १९-चाचा, याचा अर्थ मी आज एकोणीस अधिक सतरा मिळून छत्तीस वर्षांचा होतो आहे. दर गणेशचतुर्थीला, म्हणजेच आमच्या वाढदिवशी, आम्ही शिलंगणाला बाहेर पडतो. त्याप्रमाणे आमच्या तावडीत आज तू सापडलास, आणि तुझा पाडाव करून तुझ्याकडचे हिरे आम्ही काबीज केले. 'शिलंगणाचं सोनं' याचा अर्थ शब्दश: घ्यायचा नसतो."

"पण तुम्ही अनेकजण होता आणि मी एकटा होतो."

"मान्य, पण हा आमचा दोष नाही. धर्मयुद्धाचे जे नियम आम्हाला निर्बुद्ध वाटतात ते आम्ही पाळत नाही."

"पण आजच तुम्हा सर्वांचा वाढदिवस आहे हे कसं?"

"हा योगायोग नव्हे," ८-काकू म्हणाली. "तर त्यामागे निश्चित अशी योजना आहे. दर गीताजयंतीला, म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला, आम्ही गीतापठणाची स्पर्धा घेतो. इच्छुक तरुण जोडपी त्यात भाग घेतात. जे जोडपं पहिलं येईल त्याला बक्षीस म्हणून त्या रात्री संभोग करण्याची अनुमती मिळते. दुसऱ्या अध्यायातल्या सत्तेचाळीसाव्या श्लोकाप्रमाणे हा संभोग फलाची अपेक्षा न धरता करायचा असतो, पण आमचा अनुभव असा की त्याचं फळ नऊ महिन्यांनी म्हणजे गणेशचतुर्थीला हमखास मिळतंच. १२-काकू अोली बाळंतीण असल्यामुळे आज विश्रांती घेते आहे, नाहीतर ती स्वयंपाकात नेहमी पुढे असते."

"पण मग तुम्हा सर्वांची मुलं कुठे आहेत?"

"कोणताही धर्म स्वीकारायचा तर तो स्वेच्छेने स्वीकारायला हवा. ज्या वयात बुद्धी अजून परिपक्व झालेली नसते आणि स्वत:चीच इच्छा स्वत:ला नीट ठाऊक नसते असं वय त्याला योग्य नव्हे. आणि म्हणून अज्ञान मुलांना आम्ही शिलंगणात सहभागी करून घेत नाही," १९-चाचा म्हणाला. "आमच्यातली सर्वांत मोठी मुलगी पूज्या आज सतरा वर्षांची होते आहे. सगळ्या लहान मुलांसह एक होडी घेऊन ती सहलीला गेलेली आहे. उद्या पहाटे परतेल. पुढच्या गणेशचतुर्थीला जेव्हा ती सज्ञान होईल तेव्हा तिची इच्छा असल्यास ती आमच्याबरोबर येऊ शकते. त्यावेळी तिला १ क्रमांक मिळेल आणि बाकी सर्वांचे क्रमांक पुढे जातील."

"तुमच्या समाजाची घडी तुम्ही व्यवस्थित बसवलेली आहे," आगंतुक म्हणाला.

"हो," ८-काकू म्हणाली. "त्यामागे विचार आहे. आता तुझ्याबद्दल काही सांग, पण इथे तू आमच्या मर्जीने आलेला असल्यामुळे तुझा परिचय करून द्यायलाच हवास असा आग्रह आम्ही धरणार नाही."

"माझ्याबद्दल सांगण्यासारखं थोडं आहे. मी समुद्रावर भटकतो, थांबावंसं वाटेल तिथे थांबून पुढे जातो. माझी संपत्ती अनेक आडनिड्या ठिकाणी मी विखुरलेली आहे. मी स्थितप्रज्ञ नाही आणि मला तसं व्हायचंही नाही, पण स्थितप्रज्ञ ह्या अवस्थेला जरी नव्हे तरी तिच्या जवळपास आपण पोहोचावं अशी एक आकांक्षा माझ्यामध्ये आहे. हिरा आणि कोळसा हे मला सारखे वाटावेत, पण इतरांसाठी ते सारखे नसतात ही माझी जाणही पूर्ण नष्ट होऊ नये अशी मन:स्थिती मला गाठायची आहे. पण ते काही असो. हे पंचवीस हिरे आता तुमचे झाले. याची वाटणी तुम्ही कशी करणार आहात?"

"आमच्यातली बुजुर्ग मंडळी याचा निर्णय घेतात. आम्ही तो मान्य करतो," १९-चाचा म्हणाला. पण त्याच्या आवाजातली नाराजी आणि आजूबाजूच्यांशी त्याची झालेली नजरानजर आगंतुकाच्या लक्षात आल्यावाचून राहिली नाही.

आगंतुक सौम्य हसला. "तुम्ही स्वत:ला बुद्धिप्रामाण्यवादी म्हणवता आणि अशा शिळपट परंपरांना धरून राहता हे विसंगत आहे," तो म्हणाला. "तुम्ही बहुमताने निर्णय का नाही घेत?"

"म्हणजे कसा?"

"हिऱ्यांची वाटणी कशी करायची याबद्दल तुमच्यापैकी एकाने प्रस्ताव मांडावा. जर तो बहुमताने मंजूर झाला तर त्याप्रमाणे करा नाहीतर दुसऱ्या प्रस्तावाचा विचार करा."

सारे विचाराधीन झाले. "मला यात दोन अडचणी दिसतात," १९-चाचा म्हणाला. "एकतर बुजुर्ग मंडळींच्या शब्दाला मान देण्याची रीत इतक्या सहजी आम्हाला मोडता येणार नाही. आणि दुसरं असं की ह्या योजनेत सावळा गोंधळ फार आहे. आधी कुणी प्रस्ताव मांडायचा आणि नंतर कुणी, हे ठरवणं अवघड आहे. पुरेसा विचार न करता जर लोक एकामागून एक प्रस्ताव मांडत राहिले तर त्यात हकनाक वेळ जाईल."

"मान्य," ८-काकू म्हणाली. "पण ह्या दोन्ही अडचणी एकाच वेळी दूर होतील असा तोडगा मला दिसतो. आपल्यातल्या सर्वांत ज्येष्ठ व्यक्तीने म्हणजे ८२-काकूने सुरवातीला प्रस्ताव मांडावा. तो जर बहुमताने मंजूर झाला तर त्याप्रमाणे हिऱ्यांची वाटणी होईल आणि प्रश्न सुटेल. नपेक्षा ८१-चाचाने त्याचा प्रस्ताव मांडावा. तो मंजूर झाला तर वाटणी त्याप्रमाणे होईल, नाहीतर ८०-काकू, ७९-चाचा, ७८-काकू अशी उतरंड चालू राहील, आणि कुणाचा तरी प्रस्ताव मंजूर होऊन एकदाची ही प्रक्रिया संपेल. ह्या योजनेमध्ये बुजुर्गांचा मान आपोआपच राखला जाईल, कारण प्रस्ताव मांडण्याची संधी त्यांना आधी मिळेल. पण नररुंडमाळ धारण करणाऱ्या गणपतीचे जर आपण खरे उपासक असू तर एक गोष्ट आपल्यावर बंधनकारक आहे. जर एखाद्या व्यक्तीचा प्रस्ताव नामंजूर झाला, तर समुदायाला आपल्याकडे वळवून घेण्यात तिची बुद्धी कमी पडली असा त्याचा अर्थ होतो. अशी निर्बुद्ध व्यक्ती आपल्यात नको. ह्या अपयशाचं प्रायश्चित म्हणून अशा व्यक्तीला मृत्युदंड द्यायला हवा. हातपाय बांधून आपण तिला समुद्रात टाकून देऊ. यामुळे बाकी राहिलेल्यांचा सरासरी बुद्ध्यंक आपोआपच उंचावेल, आणि समाजाचा फायदा होईल. अर्थात हिरे फक्त पंचवीसच असल्यामुळे बहुमत आपल्याकडे वळवून घेणं कदाचित वृद्धांना अवघड जाईल, पण त्याला इलाज नाही. नियम सर्वांसाठी सारखे आहेत."

तरुण मंडळी एकमेकांकडे पाहत राहिल्यामुळे यानंतर काही काळ शांतता होती. "ही सूचना तुम्ही मताला का नाही टाकत?" आगंतुक म्हणाला. "ठीक आहे," ८-काकू म्हणाली. यावर १-चाचा ते ४८-काकू यांनी हात वर केले. यांपैकी प्रत्येकाच्या मनातला हिशेब असा होता की प्रस्ताव मांडण्याची वेळ स्वत:वर जर आलीच, तर वाईटात वाईट म्हणजे पंचवीसातले चोवीस हिरे इतरांमध्ये वाटून बहुमत पदरात पाडून घेता येईल. "सूचना मंजूर झालेली आहे," ८-काकू म्हणाली.

"पण माझी एक सोपी शंका आहे," १०-काकू म्हणाली. समजा प्रस्ताव मांडण्याची पाळी माझ्यावर आली. तर त्यावेळी १-चाचा ते ९-चाचा आणि मी असे दहाजणच जिवंत असू. बरोबर?"

"बरोबर," १९-चाचा म्हणाला.

"मग माझा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी किती मतं पुरतील?"

"प्रस्तावाच्या विरुद्ध जितकी मतं पडतील, निदान तितकीच जर प्रस्तावाच्या बाजूने पडली तर तो मंजूर झाला असं आपण ठरवू. याचा अर्थ तुला पाच मतांची गरज आहे, किंवा तुझं स्वत:चं मत जमेस धरून इतर चौघांची."

"ठीक तर," १०-काकू म्हणाली. "समजा माझ्या प्रस्तावामध्ये मी डोळे मिटून कुणातरी चौघांना प्रत्येकी पाच हिरे देऊ केले आणि पाच स्वत:साठी ठेवले. यात आपपरभाव नाही. तर ते चौघे मला मत का देणार नाहीत?"

"कदाचित देतीलही, मला माहित नाही," १९-चाचा म्हणाला. पण तुझा मूळ प्रस्ताव सध्या गुलदस्तात ठेव, आणि एका पर्यायी प्रस्तावाचा विचार कर: समज तू कुणातरी चौघांना फक्त दोनदोनच हिरे देऊ केलेस आणि सतरा स्वत:साठी ठेवलेस, आणि समज हा पर्यायी प्रस्ताव मंजूर झाला. तर याचा अर्थ असा की तुझा मूळ प्रस्ताव अतिउदार होता आणि स्वत:चा लभ्यांश साधण्यात तू कमी पडलीस. प्रस्ताव मांडण्याची तुला एकच संधी आहे, आणि तीदेखील तुझ्याआधीचे सगळे प्रस्ताव नामंजूर झाले तरच. तो मांडताना इतरांना शक्य तितकं कमी देऊनही बहुमत मिळवून दाखवणं हा तुझा धर्म आहे.

"पण इतकंच नाही," ४-काकू १०-काकूला म्हणाली. कोवळ्या वयातच तिने बुद्धिशरणतेचा झटून पाठपुरावा सुरू केला होता. "तू कुठलाही प्रस्ताव मांडलास तरी माझ्यापुढचा प्रश्न हा असेल की त्यावर मी अनुकूल मत द्यावं की नाही? समज तुझा प्रस्ताव नामंजूर झाला आणि तुला मरावं लागलं, तर पुढचा प्रस्ताव ९-चाचा मांडेल. त्याच्या प्रस्तावात माझ्यासाठी किती आहे हे कळल्याखेरीज मी तुझ्या प्रस्तावाला हो-नाही कसं म्हणू? तू जर मला एक हिरा देऊ केलास आणि तो मला दोन देणार असेल, तर तुझ्या प्रस्तावाच्या बाजूने मी मत देणं हे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं नाही का?"

"पण समज मी तुला एक हिरा देऊ केला आणि ९-चाचाच्याही मनात तुला एकच देऊ करायचा असेल तर?" १०-काकूने विचारलं.

"अशावेळी मी तुला मत देणं हा ९-चाचावर अन्याय होईल," ४-काकू म्हणाली. त्याचा आणि तुझा प्रस्ताव हे माझ्यासाठी सारखेच असताना फक्त तुला त्याच्याआधी संधी मिळाली म्हणून मी तुझ्या बाजूने मत देणं योग्य नव्हे," ४-काकू म्हणाली.

"बरोबर आहे तुझं," १९-चाचा ४-काकूला म्हणाला. "तर आता धर्मनियम ठरतो तो असा : चालू प्रस्ताव नामंजूर झाल्यामुळे अमूकचा खात्रीने तोटा होणार असेल तरच अमूकने प्रस्तावाच्या बाजूने मत द्यावं, नाहीतर नाही. किंवा ह्याचा व्यत्यास म्हणजे, चालू प्रस्ताव जर अमूकसाठी नंतर येणाऱ्या कोणत्याही संभाव्य प्रस्तावापेक्षा जास्त किफायतशीर असेल, तरच अमूकने प्रस्तावाच्या बाजूने मत द्यावं, नाहीतर नाही.

"निष्कर्ष असा निघतो," ४-काकू १०-काकूला उद्देशून पुढे म्हणाली, "की तुझा प्रस्ताव जर मंजूर व्हायचा तर तुला स्वत:चं सोडून आणखी चार मतं लागतील, पण ती तुला द्यायची की नाही हे ठरवण्यासाठी सर्वांना ९-चाचाच्या संभाव्य प्रस्तावाचा विचार करावा लागेल. तेव्हा ९-चाचाने त्याचा प्रस्ताव ठरवल्याखेरीज तू तुझा ठरवण्यात अर्थ नाही."

"आणि मला जी मतं हवी आहेत," ९-चाचा म्हणाला, "ती इतरांनी मला द्यायची की नाही हे ठरवण्यासाठी त्यांना ८-काकूच्या संभाव्य प्रस्तावाचा विचार करावा लागेल. तेव्हा ८-काकूने तिचा प्रस्ताव ठरवल्याखेरीज मी माझा ठरवण्यात अर्थ नाही."

"आणि ७-चाचाने त्याचा ठरवल्याखेरीज मी माझा ठरवण्यात अर्थ नाही," ८-काकू म्हणाली. "आणि ६-काकूने ठरवल्याखेरीज ७-चाचा तरी काय कपाळ ठरवणार?"

"गंमत आहे. ज्याचा प्रस्ताव नंतर येणार त्याचा विचार आधी करायचा. आणि आधीचा प्रस्ताव जर मंजूर झाला तर नंतरचा मांडलाच जाणार नाही." १०-काकू म्हणाली.

"गंमत आहे पण विसंगती नाही," १९-चाचा म्हणाला. "चुकीचा पर्याय निवडला तर परिणाम काय होतील यावर विचार केल्याखेरीज योग्य पर्याय कधी निवडता येत नाही. आणि योग्य पर्याय एकदा निवडल्यानंतर चुकीच्या पर्यायांचे परिणाम कधीच दिसणारे नसतात. पण बुद्धिमान माणसाच्या डोक्यात ते असतातच."

"सर्वांत धाकटा असल्यामुळे मी अजून तितकासा बुद्धिमान नाही," १-चाचा म्हणाला. "पण काही निर्णय बुद्धी न वापरता घेतले तरी चालतात. आता माझंच पाहा. प्रस्ताव मांडण्याची पाळी माझ्यावर आलीच तर तेव्हा मी या प्रचंड गलबतावर एकटा उरलेलो असेन. माझा प्रस्ताव मी मनात उच्चारीन, मत देण्याकरिता उजवा हात मनातच वर करीन आणि डाव्या हाताने सरसकट सगळे पंचवीस हिरे माझ्या बाराबंदीच्या खिशात टाकून देईन."

"असं वागल्याबद्दल मी तुला दोष देणार नाही, कारण तेव्हा मी जिवंत नसेन," २-काकू म्हणाली. "बुद्धी वापरण्याची गरज मला तुझ्यापेक्षा जास्त आहे, पण थोडीच जास्त आहे. माझा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी मला फक्त माझ्या स्वत:च्या मताची गरज आहे. तेव्हा तो असा असेल की १-चाचाला ० हिरे आणि मला २५. गलबताची एक शेवाळलेली पायफळी रापीने घासून स्वच्छ करून तिने त्यावर तक्ता आखला :

प्रस्तावक वाटणी
१-चाचा २-काकू
१-चाचा २५
२-काकू २५

"मला एकूण दोन मतांची गरज आहे, म्हणजे माझ्याव्यतिरिक्त आणखी एकाची," ३-चाचा म्हणाला. हे एकुलतं मत शक्य तितक्या स्वस्तात मिळायला हवं. मी जर मेलो तर २-काकूला सगळं घबाड लाटता येईल, तेव्हा ती मला कधीच मत द्यायची नाही. याउलट १-चाचाला एक हिरा देऊ करून त्याचं मत विकत घेता येईल, कारण मी मेलो तर २-काकूच्या प्रस्तावात त्याच्यासाठी काही नाही. असं म्हणून ३-चाचाने तक्ता मोठा केला :

प्रस्तावक वाटणी
१-चाचा २-काकू ३-चाचा
१-चाचा २५
२-काकू २५
३-चाचा २४

"मला नीट विचार केला पाहिजे," ४-काकू म्हणाली. "स्वत:व्यतिरिक्त मला एका मताची गरज आहे, तेव्हा कुणालातरी एक हिरा देऊ करावा. तो ३-चाचाला देऊ करण्यात अर्थ नाही, कारण माझ्या मरणानंतर त्याला २४ हिरे मिळणार असल्यामुळे तो मला कधीच मत देणार नाही. तो १-चाचालाही देण्यात अर्थ नाही, कारण मग ३-चाचाचा आणि माझा प्रस्ताव त्याच्या दृष्टीने सारखेच पडतील आणि त्यापायी तो मला मत द्यायचा नाही. माझा प्रस्ताव ३-चाचापेक्षा त्याला जास्त फायद्याचा ठरणार असता तरच त्याने मला मत दिलं असतं. तेव्हा हा हिरा २-काकूला द्यावा हे उत्तम. मी मेले तर ३-चाचाच्या प्रस्तावात तिच्या हाती काहीच येणार नसल्यामुळे ती मला मत नक्की देईल. इतकं म्हणून तिने तक्ता मोठा केला :

प्रस्तावक वाटणी
१-चाचा २-काकू ३-चाचा ४-काकू
१-चाचा २५
२-काकू २५
३-चाचा २४
४-काकू २४

"माझ्यापुढचा प्रश्न इतका सोपा नाही," ५-चाचा म्हणाला. प्रस्ताव मंजूर होण्यासाठी मला तीन मतं हवीत, म्हणजे माझ्या साथीला दोघे हवेत. २-काकू माझ्याबरोबर यायला हवी असेल तर तिला किमान दोन हिरे द्यावे लागतील. पण तिच्या जोडीला एकजण लागेलच आणि त्यासाठी किमान आणखी एक हिरा खर्ची घालावा लागेल, म्हणजे निदान तीन जातील. पण दुसरा एक उपाय ह्यापेक्षा बरा आहे: २-काकूचा नाद सोडून देऊन १-चाचा आणि ३-चाचा यांना एकेक हिरा देऊ करावा. ४-काकूच्या प्रस्तावात त्यांना काही मिळणार नसल्यामुळे प्रत्येकी एका हिऱ्यात त्यांचं मत विकत घेता येईल. इतकं म्हणून त्याने तक्ता मोठा केला :

प्रस्तावक वाटणी
१-चाचा २-काकू ३-चाचा ४-काकू ५-चाचा
१-चाचा २५
२-काकू २५
३-चाचा २४
४-काकू २४
५-चाचा २३

"माझ्या नवऱ्यापेक्षा मी बुद्धिमान असल्यामुळे विचार करायला मला कमी वेळ लागेल," ६-काकू म्हणाली. मला फक्त आणखी दोघांची मतं हवीत, तेव्हा माझा मार्ग सरळ आहे: २-काकू आणि ४-काकू यांना ५-चाचाने काहीच देऊ केलेलं नाही, तेव्हा त्यांना प्रत्येकी एका हिऱ्याचं आमिष दाखवून फितवून घेते म्हणजे झालं. तिने आणखी एक अोळ मांडली.

प्रस्तावक वाटणी
१-चाचा २-काकू ३-चाचा ४-काकू ५-चाचा ६-काकू
१-चाचा २५
२-काकू २५
३-चाचा २४
४-काकू २४
५-चाचा २३
६-काकू २३

"चित्र असं दिसतं की बायका फक्त बायकांना हिरे देऊ करताहेत आणि पुरुष फक्त पुरुषांना," आत्तापर्यंत काही न बोलणारा २३-चाचा म्हणाला. "चाळिशी गाठल्यामुळे जी प्रगल्भता आज माझ्यात आलेली आहे तिचा परिपाक म्हणून अशा गोष्टी माझ्या लवकर लक्षात येऊ लागल्या आहेत. हा क्रम आता असाच चालू राहणार, तेव्हा यापुढे तक्ता वाढवत नेण्याची गरज नाही."

"कशावरून? मला सिद्धता हवी," ४-काकू म्हणाली. सबळ पुराव्याखेरीज कुठलंही विधान स्वीकारायला ती नाखूष असे.

"देतो," २३-चाचा म्हणाला. "पण प्रगती करायची तर नवी परिभाषा हवी. आत्तापर्यंत दिसतं ते असं: जर एखाद्याने प्रस्ताव मांडला तर तो काहींना शून्य तर काहींना एक हिरा देऊ करतो, आणि उरलेले स्वत:कडे ठेवतो. ज्यांना शून्य मिळतात त्यांना खट्टू म्हणू, आणि ज्यांना एक मिळतो त्यांना खूष म्हणू. तर माझी निरीक्षणं अशी आहेत :

(१) स्वत: प्रस्तावक आणि सारे खूष हे प्रस्तावाच्या बाजूने मत देतात, आणि खट्टू विरुद्ध मत देतात.
(२) जर काकूचा प्रस्ताव असेल तर सगळे खट्टू हे चाचा आहेत, आणि सगळ्या खूष ह्या काकू आहेत.
(३) जर चाचाचा प्रस्ताव असेल तर सगळ्या खट्टू ह्या काकू आहेत, आणि सगळे खूष हे चाचा आहेत.
(४) जर काकूचा प्रस्ताव असेल तर खूषांची संख्या खट्टूंपेक्षा एकाने कमी आहे.
(५) जर चाचाचा प्रस्ताव असेल तर खट्टू आणि खूष यांची संख्या समसमान आहे.

निदान ६-काकूपर्यंत तरी ही निरीक्षणं लागू पडतात. एका कुठल्यातरी प्रस्तावकापर्यंत ती खरी आहेत असं समजून पुढे जाऊ.

आता नव्या प्रस्तावकासमोर प्रश्न आहे तो बहुमत मिळवण्याचा. प्रस्ताव नामंजूर झाला तर सध्या जे खूष आहेत त्यांना एक हिरा मिळणार आहे, तेव्हा त्यांच्यापैकी कुणाचंही मत एका हिऱ्यात विकत घेता येणार नाही. याउलट सध्या जे खट्टू आहेत त्यांना एक हिरा देऊन फितवून घेता येईल. स्वत:चा जास्तीतजास्त स्वार्थ साधला जावा असा प्रस्तावकाचा हेतू असल्यामुळे जर खट्टूंच्या मतांवर भागत असेल तर तो खूषांना विचारायला जाणार नाही.

समजा नवा प्रस्तावक हा चाचा आहे. त्याने जर आधीच्या खट्टूना खूष केलं आणि आधीचे खूष अधिक पूर्वीची प्रस्ताविकाकाकू यांना खट्टू केलं तर नवे खूष आणि नवे खट्टू यांची संख्या समसमान होईल. प्रस्तावकचाचाचं स्वत:चं मत आहेच, त्यामुळे प्रस्ताव मंजूर होईल. याचा अर्थ (१), (३) आणि (५) ही विधानं नव्या चाचासाठी खरी आहेत.

समजा नवी प्रस्ताविका ही काकू आहे. तिने जर आधीच्या खट्टूना खूष केलं आणि आधीचे खूष अधिक पूर्वीचा प्रस्ताविकचाचा यांना खट्टू केलं तर नव्या खूषांची संख्या नव्या खट्टूंपेक्षा एकाने कमी आहे. पण प्रस्ताविकाकाकूचं स्वत:चं मत पारड्यात असल्यामुळे प्रस्ताव मंजूर होईल. याचा अर्थ (१), (२) आणि (४) ही विधानं नव्या काकूसाठीही खरी आहेत.

निष्कर्ष हा की जर कुणा एका प्रस्तावकाला आपली निरीक्षणं लागू पडत असतील तर त्याच्या पुढच्यालाही ती लागू पडतात. त्यामुळे आता हे असंच चालू राहणार. ज्ञान हे कणाकणानेच मिळवल्यामुळे त्याची किंमत टिकते असं नाही. खोऱ्याने अोढलं तरी ती राहतेच."

"माझी चाळिशी अजून यायची आहे, तेव्हा मला समजतं का बघू," २०-काकू म्हणाली. समजा माझ्यावर प्रस्ताव मांडायची वेळ आली तर मी २-काकू पासून १८-काकूपर्यंत नऊ बायकांना एकेक हिरा देऊ करीन, पुरुषांना काही देणार नाही, आणि स्वत:साठी सोळा हिरे ठेवीन. बरोबर?"

"बरोबर," २१-चाचा म्हणाला. पण तुझ्यावर तशी वेळ यायची नाही. कारण माझ्या प्रस्तावात मी १-चाचा ते १९-चाचा अशा दहाजणांना एकेक हिरा देऊ करून सगळ्या बायकांना खट्टू करीन, आणि स्वत:साठी पंधरा ठेवीन."

"२३-चाचाची तर्क करण्याची पद्धत मला आवडली," ४-काकू म्हणाली. "कापडावर सुईने धावदोरा घालत जाण्यासारखी ती मला वाटली. आपल्याला त्याने एकच टाका घालून दाखवला, पण निरखून पाहणाऱ्याला तेवढा पुरेल. ही पद्धत वापरून खूप काही करता येईल असा माझा विश्वास आहे, पण तशी मी अजून लहान आहे. अर्थात मला एवढं समजतं की केव्हा ना केव्हा तरी दोरा संपणारच. २३-चाचा, तू म्हणालास की खट्टूंच्या तोंडाला प्रस्तावक पानं पुसतो, खूषांना प्रत्येकी एक हिरा देऊ करतो, आणि उरलेले स्वत:साठी ठेवतो. पण हिरे कमी पडले तर?"

"बहुमताला पुरेसे होतील इतके खूष गोळा करण्याएवढे हिरे जर उरले नाहीत तर प्रस्तावकाला मरावं लागेल. हिरे फक्त पंचवीस आहेत, त्यामुळे प्रस्तावकाचं वय वाढत जाईल तशी केव्हा ना केव्हा तरी ही वेळ येणार. पण त्याला इलाज नाही. नियम सर्वांसाठी सारखे आहेत," २३-चाचा म्हणाला. हा सबुद्ध कठोरपणा ४-काकूला पसंत पडला. "२३-चाचा, आपण दोघे जाऊन इतरांना घेऊन येऊ," ती म्हणाली. "म्हणजे एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाकता येईल."

"थांबा," ४२-काकू म्हणाली. बुद्धी नाठी व्हायला तिला अजून एक वर्ष अवकाश होता.

"एका ठराविक वयानंतरच्या प्रस्तावकांना मरावं लागणार याचं मला तुझ्याइतकंच वाईट वाटतं आहे," ४२-काकू २३-चाचाला म्हणाली. "पण शेवटचा जगणारा कोण आहे याची मला शहानिशा करायची आहे. कारण त्याचा जो प्रस्ताव असेल त्याप्रमाणे हिऱ्यांची विल्हेवाट लागेल. अर्थात शेवटचा म्हणजे पहिला, कारण त्याच्यापेक्षा वयाने जे लहान ते सगळे जगणार आहेत."

"तू म्हणतेस त्यात खूपच तथ्य आहे," २३-चाचा म्हणाला. "गाडी कड्यावरून नेमकी कधी आणि कशी घसरते ते निरखून पाहायला हवं. ५०-काकूपासून सुरुवात करूया. तिचा प्रस्ताव असा असेल की आधीच्या चोवीस काकूंना एकेक हिरा देऊन खूष करायचं, स्वत:ला एक ठेवायचा आणि सगळ्या चाचांना खट्टू करायचं. आता प्रश्न असा की ५१-चाचाने काय करावं? समज तो म्हणाला की मी प्रत्येक काकूला खट्टू करीन आणि १-चाचा ते ४९-चाचा अशा पंचवीस जणांना एकेक हिरा देऊन खूष करीन. माझ्यासाठी काही नको. तर स्वत:चं एक आणि बाकीची पंचवीस मिळून त्याला हवी तशी सव्वीस मतं मिळतील. हिरा न का मिळेना, त्याचा जीव तरी वाचेल."

"मान्य," ४२-काकू म्हणाली. "आता यापुढे समजा ५२-काकू म्हणाली की मी १-चाचा ते ५१-चाचा अशा सव्वीस जणांना खट्टू करीन आणि २-काकू ते ५०-काकू अशा पंचवीस जणींना एकेक हिरा देऊन खूष करीन. माझ्यासाठी काही नको. तर स्वत:चं एक आणि बाकीची पंचवीस मिळून तिला हवी तशी सव्वीस मतं मिळतील. हिरा न का मिळेना, तिचा जीव तरी वाचेल."

"तिला आणखी एक पर्याय आहे," ४-काकू म्हणाली. "सगळ्या काकवांना एकेक हिरा देण्याऐवजी तिच्यातला कुणातरी एकीला टांग मारून तो हिरा ५१-चाचाला दिला तरी हाच परिणाम साधेल. स्वत:च्या प्रस्तावामध्ये ५१-चाचाला काहीच मिळणार नसल्यामुळे एका हिऱ्यासाठी तो ५२-काकूच्या पदरात मत टाकायला तयार होईल."

"बरोबर आहे," २३-चाचा म्हणाला. "आता प्रश्न असा की ५३-चाचाने काय करावं. पंचवीस हिरे त्याने इतर बावन्न जणांत कसेही जरी वाटले, तरी ज्यांना काहीच मिळणार नाही असे किमान सत्तावीस जण राहतील. ५३-चाचाच्या प्रस्तावाला मत देण्याचं त्यांच्यापैकी कुणालाही काही कारण नाही, कारण तो मेल्यामुळे त्यांचा कसलाच तोटा होणार नाही. याचा अर्थ ५३-चाचाने काहीही प्रस्ताव मांडला तरी तो नामंजूर होईल."

"याचा अर्थ ५३-चाचानंतरचे सगळे मरणार, पण ५२-काकू जगणार आणि तिच्या प्रस्तावाप्रमाणे वाटणी होणार," ४२-काकू चेहरा निर्विकार ठेवून म्हणाली. पण ५२-काकूच्या प्रस्तावामध्ये आपल्याला एक हिरा मिळण्याची पुष्कळ शक्यता आहे याची आठवण ताजी असल्यामुळे तिचं मन निर्विकार नव्हतं. ती उठली आणि इतरांना आणण्यासाठी आत जाऊ लागली.

"थांब," ४-काकू म्हणाली. "काहीतरी भानगड आहे. ५४-काकूला बहुमत मिळवणं शक्य नाही याची मला खात्री वाटत नाही. पुन्हा नीट बघूया. तिला सत्तावीस मतं हवीत, म्हणजे स्वत:चं सोडून सव्वीस हवीत. असं पाहा की ५४-काकूचा प्रस्ताव जर नामंजूर झाला तर ५३-चाचा एवीतेवी मरणारच असल्यामुळे ५२-काकूचा प्रस्ताव मंजूर होईल. आता ५२-काकूच्या प्रस्तावामध्ये १-चाचा ते ४९-चाचा अधिक खुद्द ५२-काकू हे सारे हिऱ्याशिवाय असतील. याचाच अर्थ असा की ह्या सव्वीसांपैकी कुणाही पंचवीसांना प्रत्येकी एक हिरा मिळाला तर ते ५४-काकूला मत द्यायला तयार होतील. इतकी मतं अपुरी वाटतात पण अपुरी नाहीत. याचं कारण असं की ५३-चाचाला मरायचं नसल्यामुळे ५४-काकूने काय वाटेल तो प्रस्ताव मांडला तरी तो तिच्या बाजूने मत देईल. तिने जात्यावरची अोवी म्हटली तरी तो मत देईल. त्याला हिरा नको तर जीवदान हवं आहे. तेव्हा निष्कर्ष असा की ५४-काकू मरणार नाही."

"गाडी दरीत कोसळल्यानंतर पुन्हा रस्त्यावर येणार नाही अशी आपल्यापैकी काहींची समजूत होती," ४-काकू सावधपणे म्हणाली. "पण हे इतकं सरळ दिसत नाही, कारण ५१, ५२, ५४ तगणार पण मधला ५३ मरणार."

"इतकंच नव्हे तर दोन नवे घोटाळे उद्भवले आहेत," ४२-काकू म्हणाली. "पूर्वी प्रत्येकासाठी एकच एक प्रस्ताव शक्य होता. आता तसं राहिलेलं नाही. उदाहरणार्थ, ५४-काकूपुढे सव्वीस आशाळभूत उमेदवार उभे आहेत, त्यातल्या कुणाही पंचवीसांना हिरा दिला तरी तिला व्यक्तिश: फरक पडणार नाही. म्हणजे प्रस्ताव मांडणाऱ्यासमोर 'हेही करता येईल किंवा तेही करता येईल' असे अनेक पर्याय आहेत. सन्मार्ग चिंचोळा असतो ह्या बायबलमधल्या वाक्याला छेद देणारी ही बाब आहे.

"पण दुसरं म्हणजे ५२-काकू ५१-चाचाला हिरा देण्याची थोडीफार शक्यता आहे, आणि ५४-काकू तर कितीतरी चाचांसमोर हिरे वाटणार आहे. बायकांनी पुरुषांना काही द्यायचं नाही हा पायंडा आता मोडलेला आहे. सूर्य रोज पूर्वेला उगवतो म्हणून उद्याही तो पूर्वेलाच उगवणार अशी भाबडी समजूत जे करून घेतात त्यांना विचार करायला लावणारी ही बाब आहे."

"असं बोलू नकोस," ४-काकू म्हणाली. "आपण गलबतावर आहोत. दिशा हरवल्या तर आपणही हरवू."

"मला थोडं थोडं कळायला लागलं आहे," २३-चाचा म्हणाला. "पण प्रगती करायची तर नवी परिभाषा हवी इतकंच नव्हे तर प्रसंगी जुनी परिभाषा मोडायला हवी. लिंगभेद आता भ्रामक आणि अमंगळ ठरलेला आहे. त्यामुळे ५० हा आकडा अोलांडल्यानंतर ५१-चाचा, ५२-काकू, ५३-चाचा असं म्हणण्याऐवजी १-नाना, २-नाना, ३-नाना असं म्हणायला सुरुवात करूया. 'नाना' हा शब्द ग्रीकमध्ये स्त्रीलिंगी आहे आणि हिंदीत पुल्लिंगी आहे. यांपैकी एकही भाषा आपल्या कुणाला येत नसल्यामुळे दोन्ही लिंगांसाठी आपण तो चालवून घेऊ. प्रस्तावाच्या विरुद्ध मत देणाऱ्यांना आपण नाराज म्हणू आणि बाजूने मत देणाऱ्यांना (मग प्रस्तावक स्वत: त्यात आलाच) कबूल म्हणू. कबूलांची संख्या जर नाराजांपेक्षा कमी नसेल तर प्रस्ताव मंजूर होईल.

आता असं गृहीत धरा की (२क्ष)-नानाने, म्हणजेच (५०+२क्ष)-काकूने, जर प्रस्ताव मांडला, तर

जितके लोक कबूल तितकेच नाराज असतील, आणि परिणामी तिचा प्रस्ताव मंजूर होईल.

हे अर्थात गृहीतक आहे, पण निदान ४-नानाच्या, म्हणजे ५४-काकूच्या बाबतीत खरं आहे. जे कबूल असतील ते दोनपैकी एका कुठल्यातरी कारणासाठी कबूल असतील: प्रस्तावाप्रमाणे त्यांना हिरा तरी मिळणार असेल, किंवा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे स्वत:ला प्रस्ताव न मांडावा लागून त्यांचा जीव तरी वाचेल.

तर असं असताना (२क्ष+१)-नानाने काय करावं? त्याच्या प्रस्तावात ज्यांना हिरा मिळेल ते कबूल होतील, पण (२क्ष+१)-नानाचा प्रस्ताव नामंजूर झाला तर ज्यांचा जीव जाईल असे कोणीच नाहीत. तेव्हा स्वत: धरून त्याला फारतर २६ कबूल मिळवता येतील, म्हणजेच किमान २५+२क्ष इतके लोक नाराज होतील. याचा अर्थ प्रस्ताव नामंजूर होणार आणि (२क्ष+१)-नाना मरणार.

(२क्ष+२)-नानाची गत निराळी नाही. पंचवीस हिरे देऊन त्याला पंचवीस कबूल मिळवता येतील, शिवाय जीव वाचेल या कारणाखातर (२क्ष+१)-नानाही कबूल होईल. प्रस्तावक स्वत: धरून एकूण २७ कबूल आणि २५+२क्ष नाराज असतील.

असं करत करत (२क्ष+य)-नानाच्या प्रस्तावाला २५+य लोक कबूल आणि २५+२क्ष लोक नाराज असतील. य ची किंमत जेव्हा वाढत वाढत २क्ष पर्यंत पोहोचेल, तेव्हा मात्र कबूल आणि नाराज या दोहोंचीही संख्या २५+२क्ष इतकी होईल आणि प्रस्ताव मंजूर होईल. याचाच अर्थ आपलं गृहीतक ४क्ष-नानासाठी खरं ठरून ती जगेल. मधले मात्र मरतील."

"पुन्हा एकदा २३-चाचाची धावदोरा पद्धत कामी आली!" ४-काकू बालिश उत्साहाने म्हणाली. "४-नाना जगली म्हणजे ८-नाना जगणार, ८-नाना जगली म्हणजे १६-नाना जगणार, आणि १६-नाना जगली म्हणजे ३२-नाना जगणार."

सर्वांना अचानक ८२-काकूची आठवण झाली, कारण सर्व काही आता तिच्या प्रस्तावाप्रमाणे घडणार होतं. खालच्या डेकवरची एक अंधारी खोली बाजलं टाकून तिला विश्रांतीसाठी दिलेली होती, तिकडे सारेजण धावले.

८२-काकूची साडी रक्ताने चिंब भिजली होती. बंदुकीची गोळी खिडकीची काच फोडून भिंतीला आदळून काकूच्या पोटात घुसली होती. "अजून धुगधुगी आहे," आगंतुक म्हणाला. "पण असाच रक्तस्राव होत राहिला तर ही नक्की मरेल. निर्मनुष्य बेटांवर एकटा राहून मला अौषधोपचारांची माहिती झालेली आहे. हिची शुश्रूषा मी करू शकतो, पण याक्षणी मी तुमच्या आधीन असल्यामुळे तुम्हा सर्वांच्या अनुमतीखेरीज काही करणार नाही." ही अनुमती साऱ्यांनी एकमुखाने ताबडतोब दिली असं मात्र झालं नाही. सर्वजण विचारात गढले होते, आणि गेरू, लाकूड तासायचे चाकू, चुना असं जे काही हाती लागेल ते घेऊन गलबतात जागोजागी आकडेमोड करत होते. अनुमती द्यावी की नाही ह्या मुद्द्यावरची मतभिन्नता हळूहळू उघड होऊ लागली.

१-चाचा ते ४९-चाचा, २-नाना, आणि ५-नाना ते ८-नाना गलबताच्या उत्तरेकडे गोळा झाले. जर ८२-काकू जगली, तर तिच्या प्रस्तावामध्ये यापैकी कुणालाही काही मिळण्याची शक्यता नव्हती.

२-काकू ते ५०-काकू, १-नाना, ३-नाना, ४-नाना आणि ९-नाना ते १६-नाना गलबताच्या पूर्वेकडे गोळा झाले. ८२-काकू जगली तर यापैकी कुणातरी पंचवीस जणांना एकेक हिरा मिळणार होता. १७-नाना ते ३१-नाना ही वृद्ध मंडळी त्यांना सामिल झाली. ८२-काकू जगली तरच हे सारे जगणार होते.

सरळ पात्यांच्या तलवारी, कमानदार जंबिये, पिस्तुलं, दुनळी बंदुका, देवमासे मारायचे भाले यांचा साठा बाहेर पडला. पूर्वपक्षाकडे जरी एक्कावन्नजण असले तरी त्यात स्त्रियांचा आणि वृद्धांचा भरणा पुष्कळ होता. उत्तरपक्षाकडे जरी फक्त तीसजण असले तरी त्यांत पुरुष मोठ्या संख्येने होते. दोन्ही पक्ष तुल्यबळ होते हे नंतरच्या घडामोडींवरून स्पष्ट झालं.

दोन परीघांच्या मधोमध अडकलेल्या अशक्त चंद्रकोरीवर समुद्राने आखलेली जीवा जसजशी अधिकाधिक लांब होऊ लागली, तसतसा आगंतुकाचा शोध संपत चालला. कुणीही जिवंत उरलेलं नव्हतं. पावलांना घोट्यांपर्यंत लपेटणारा किळसकाळा द्रवस्पर्श सहन करीत तो मूर्तीपर्यंत पोहोचला. गणपतीच्या गळ्यातल्या कवटीच्या माळेला त्याने अंगुलीस्पर्श केला. जिचा रंग ताज्या रक्तासारखा असण्यामागचं कारण उघड आहे अशी ती चंची त्याने उचलली, तिच्यातले चार हिरे ताम्हनात काढून ठेवले, आणि बंद आवळून ती खिशात खोलवर घुसवली. तो ८२-काकूच्या बिछान्यापाशी आला. "तू आता जगायची नाहीस," तो म्हणाला. "काही करायचं तर त्याला उशीर झाला. उद्या पहाटे जेव्हा पूज्यागौरी आणि सतरा बुटके परत येतील, तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणावर साफसफाई करावी लागेल. त्यांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे असं एकूण घटनाक्रम पाहता कुणीसुद्धा म्हणणार नाही, पण निदान काही काळ तरी त्यांचे फाके पडू नयेत म्हणून मी चार हिरे ठेवलेले आहेत. गणपतीचा प्रसाद म्हणून बाकीचे एकवीस मी घेऊन जातो आहे. जीवेत शरद: शतम्!" तो मिश्किल डोळ्यांनी म्हणाला, आणि धोतराचा काचा मारून त्याने समुद्रात उडी घेतली.

❊ ❊

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

प्रोफेसर,
तुम्ही Game Theory आणि लेखन शैली याची अशी काही जबरदस्त सांगड घालता कि अवाक् होऊन फक्त टाळ्या वाजवाव्या. मी हे pirates चे कोडे आधी वाचले होते पण त्याचे रुपांतर अश्या गमतीशीर आणि मजेदार गोष्टीत पाहून वाचताना खूप मज्जा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

भारी !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्र णा म!
स ला म!!
शि सा न!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मस्तं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

http://www.aisiakshare.com/node/4148

हे कोडे पूर्वीही झेपले नव्हते व आत्ताही झेपत नाहीये.
पण जचिंची मांडणी फारच रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अप्रतिम!! मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्या प्रकारे ८२-काकू मेल्याने फरक पडतो, त्याच प्रमाळे हातघाईच्या युद्धात. प्रत्येक मरणानंतर पुन्हा गणिते व्हावीत.

सर्व जण मरण्याआधी हातघाई थांबू शकेलसे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आगंतुकाचे नाव जॉन नॅश होते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनःपूतम समाचरेत्|

इथे एक कोडे आहे 'पायरेट'नावाचे. लेखकाने ते सोडवले आहे असे मानण्यास हरकत नाही. ही तशी कठीण गणितीय कोडी आहेत.

काहीतरी टाय-ब्रेकर रूल हवा आहे. उदाहरणार्थ विरुद्ध मतदान न केल्याने जीवितहानी किंवा कमी हिरे मिळणे असा तोटा होत नाही तोवर प्रत्येकजण ठरावाच्या विरोधातच मतदान करेल. वरील उदाहरणात ५१ चाचावर वेळ आल्यावर तो १ ते ४९ अशा चाचांना एक एक हिरा देईल. आणि सगळ्या काकू त्याच्या विरोधात जातील तर चाचे समर्थनात.

मूळ कारण काय आहे?
१ चाचा आणि १ काकू मध्ये कायम १ काकू २५ हिरे घेणार आहे.
१ आणि ३ चाचा आणि २ काकू मध्ये ३ चाचा २४ हिरे आणि १ चाचा १ हिरा घेणार आहे.
......
असंच पुढे जात समजा १५ चाचावर वेळ आली कि तो काय सुचवेल: १८ हिरे मला आणि उरलेले ७ उरलेल्या चाचांना. ह्याला एकही चाचा विरोध करणार नाही. चाचा १ विरोध करणार नाही कारण त्याला विरोध करून सरतेशेवटी काय मिळेल: ०! चाचा ३ म्हणेल कि माझ्या आधी ४ काकूवर वेळ येईल, पण ती २४ स्वतःला घेईल, १ हिरा काकू २ ला देईल आणि हीच वाटणी होईल. मग मी आत्ता विरोध करून काय वेगळं मिळेल. मी हो म्हणतो, ० से भला १.

त्यामुळे एकदम लोकशाही प्रक्रिया आणि जी.ए. हे सगळं भारी असलं तरी कोडं सुटेल असं वाटतं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्याच प्रतिसादात टिकलू यांनी म्हटल्यासारखंच, गेम थिअरी आणि कथा अशी एकत्र सांगड घालणं गमतीशीर आहे. गेम थिअरीसारखा विषय सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोफेश्वरांनी घेतलेले कष्ट वाया जात नाहीत. ही गणिती गंमत वाचायला मजा आलीच.

पण, त्यापुढे लोकशाहीवर केलेली टिप्पणीही सध्याच्या काळात मला रोचक वाटते. गणिताबद्दल लिहून, लिहिणारी व्यक्ती व्यासंगी आणि विचारी आहे हे दिसत आहे. अशासारख्या लोकांना विचारवंत म्हणून हिणवणं सध्या फॅशनेबल झालेलं आहे; निराळ्या भाषांमध्ये शब्द निराळे असतील, पण भावना हीच. ह्या कथेमध्ये निराळी गोष्टही आहे; बहुमत, लोकशाही अशा गोष्टींचं टोक गाठलं की समाजाचा नाश व्हायला वेळ लागत नाही. काहीशी डेव्हिड आणि गोलायथची आठवण येण्यासारखीही ही गोष्ट.

एकीकडे लोकांना गेम थिअरी सोपी करून सांगण्याचा लोकानुनय; आणि दुसऱ्या बाजूला लोकानुनयाचं टोक गाठलं तर सर्वनाश होईल अशी लेखनाची मांडणी.

कथा म्हणावं का लेख, असाही मला संभ्रम पडला; म्हणून सर्वसमावेशक लेखन असा शब्द वापरला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.