Skip to main content

जलपर्णीच्या नशिबाचे साडेतीन फेरे - उपोद्घात

कथा

उपोद्घात | पहिला फेरा | दुसरा फेरा | तिसरा फेरा | साडेतिसरा फेरा

_________

जलपर्णीच्या नशिबाचे साडेतीन फेरे - उपोद्घात

- आदूबाळ

उपोद्घात

सम्प्रति काळ मोठा कठीण आला. कवणे एके काळी गुलकुंदा नगरीत आनन्दध्वज नामे जगमित्र सुखेनैव वसती करीतसे. मद्याच्या सुरयांत, मदनिकांच्या सहवासात, प्रेमताडितांना तडीस लावत आपुला प्याला काठोकाठ भरलेला राहील याची तजवीज करीतसे. त्या आनन्दध्वजाच्या लीळा पोथीबद्ध आहेतच.

उपोद्धात

मोठ्या प्रतिमेसाठी या प्रतिमेवर क्लिक करा.

परंतु हर हर! सरला तो काळ. उण्यापुर्‍या अर्धसहस्र वर्षांत त्या मूळ आनन्दध्वजाच्या कुलजांनी पोटाच्या प्रतिपाळासाठी गुलकुंदेचा त्याग करावा हे विधिलिखित ठरले. आस्ते आस्ते उत्तरेकडे स्थलांतर करीत सुमारे दीड शतकापूर्वी आनन्दध्वजाचे कुलज पुणक विषयात स्थायिक जाहले. काळाच्या बदलत्या गंधाप्रमाणे बदलत चालले. मद्यादिक विषयांना स्पर्शही करीना झाले. कुक्कुटशावकाला पाकशाळेत प्रवेश देईना झाले. पुणक विषयात उपरे होते, ते कडवे झाले. काळ मोठा कठीण हे वर आलेच आहे.

दैवलीळा बाकी अगाध. संपूर्ण चराचर कायम समकक्षेत असते. समकक्षेच्या या नियमानेच गतसहस्राब्दाच्या अखेरीस जन्म पावलेला कुलदीपक त्या पूर्वीच्या आनन्दध्वजाचे गुण घेऊन आला. तयासारिखाच जगमित्र. तयासारिखाच मदिराप्रेमी. तयासारिखाच परोपकारी. तयासारिखेच याही आनन्दध्वजाभोवती लावण्यखणी स्त्रियांचा वावर, आणि तयाप्रमाणेच हाही प्रस्निग्धचर्माप्रमाणे त्यांपासून अलिप्त.

नुसते गुणच नव्हे, तर येयाचे नावही 'आनन्दध्वज' होते. ऐसे म्हणतात की या नवानन्दध्वजाची वृत्तिलक्षणे खचित गतानन्दाध्वजासम होती; अगदी एकास गुप्त करोन दुजास प्रकट करावा ऐसे साधर्म्य.

गतानन्दध्वजाचे गुलकुंदा नगरीत बस्तान होते. दामद्रव्याची चिंता नव्हती. परन्तु नवानन्दध्वजास मात्र उदरभरणासाठी काही करणे प्राप्त होते. त्यासाध्ये जाङ्गलमहाराजपथानजीकस्थित 'सुदान चैनीज' नामे क्षुधाशांतिकुटिरात नवानन्दध्वज म्यानेजरपदे कार्यरत असे.

गतानन्दध्वजाप्रमाणे नवानन्दध्वजाचे प्रतापही कोठेतरी विनिस्मृत असावेत याकारणे प्रस्तुत खटाटोप मांडला असे. गृहिणी ज्याप्रमाणे सुपिष्टांस तिंबिते, अथवा वाहनयान्त्रिक ज्याप्रमाणे हैमरक आघातितो, त्याचसारिखे या कथेचे हे अध्युष्टवलय ठाकूनठोकून सिद्ध केले आहे. फटाक्!

क्रमशः

____
Equilibrium
Oil skin
तयाची माऊली प्रेमभारे त्यासी 'बाबण' ऐसे पुकारी, आणि जवळचे मित्र 'चड्डी' ऐसे म्हणत हा अवान्तर तपशील.
काळ मोठा कठीण... इत्यादी.
या कुटिरात जठराच्या क्षुधेव्यतिरिक्त अन्यक्षुधांचाही संतोष होई. ती हकीगत येतेच आहे पुढे.
Recorded
हातोडा
साडेतीन भागांत सांगितलेली गोष्ट

____

चित्रस्रोत : 'आनंदध्वजाच्या कथा' पुस्तकाचे मुखपृष्ठ व आतील निवडक चित्रे

चित्रसौजन्य : मॅजेस्टिक प्रकाशन

चित्रकार : वसंत सरवटे

चित्रसंस्करण व नवरचना : अमुक, ईप्सित

____

विशेषांक प्रकार

.शुचि. Sun, 29/05/2016 - 11:00

त्यासाध्ये जाङ्गलमहाराजपथानजीकस्थित 'सुदान चैनीज' नामे क्षुधाशांतिकुटिरात (या कुटिरात जठराच्या क्षुधेव्यतिरिक्त अन्यक्षुधांचाही संतोष होई. ती हकीगत येतेच आहे पुढे.) नवानन्दध्वज म्यानेजरपदे कार्यरत असे.५

सॉलिड!!! आम्ही वाट पहातो आहे.

रुची Sun, 29/05/2016 - 20:58

आबा, पुढल्या भागाची आतुरतेने वाट पहातो आहोत. आनंदध्वजावर फॅनफिक लिहिण्याची कल्पना भन्नाट आहे.

बॅटमॅन Sun, 29/05/2016 - 22:29

जाङ्गलमहाराजपथानजीकस्थित 'सुदान चैनीज' नामे क्षुधाशांतिकुटिरात नवानन्दध्वज म्यानेजरपदे कार्यरत असे.

जुनानन्दध्वजानभिज्ञ असूनही नवानन्दध्वजाच्या पुणकविषयस्थ (खरेतर भांबुर्डविषयस्थ- जाङ्गलमहाराजपथ आणिक पाताळेश्वर भांबुर्डविषयात आहेत) लावण्यखनिललनायुक्ताप्यलिप्त अशा अनेकविधलीलाखेलवृत्तान्ताचे क्रमक्रमे पठनावलोकनरवंथादिविधिपालनोत्सुक.

तदुपरि- फ्याटकांग नामक चैनीजक्षुधाशान्तिकुटीरही त्याच पथीं असोन तेथे अस्सलभटखिचडीही अत्युत्तम मिळावयाची, त्याजवर कवणाची गदा आली ठावें नाही.

'न'वी बाजू Mon, 30/05/2016 - 00:35

In reply to by बॅटमॅन

जुनानन्दध्वजानभिज्ञच काय, परंतु नवानन्दध्वजसुद्धानभिज्ञ असल्याकारणाने कथा शिरस्योपरीच काय, परंतु गगनभेद करित्साती गेली. असो चालायचेच.

(बाकी, ही 'सुदान चैनीज' नामक चीज नेमकी काय, कोठे नि कितपत आहे..? तिजमागे नेमका काय इतिहास आहे?)

आदूबाळ Mon, 30/05/2016 - 00:48

In reply to by 'न'वी बाजू

नबा, कथा अजून यायची आहे हो. हा बॉलरने घेतलेला स्टार्ट आहे.

आवर्जून प्रतिसाद द्यायचं कारण ऋणनिर्देश. तुमच्याकडून प्रेरणा घेऊन न लाजता तळटिपा घातल्या आहेत.

मुग्धा कर्णिक Mon, 30/05/2016 - 12:22

आनंद साधलेंच्या या चावटी आनंदध्वजकथांचं १९९०वगैरेमध्ये कधीतरी मी लोकसत्ताच परीक्षण लिहिलेलं.
त्यानंतर कथांमध्ये इतकं छानदार शृंगारिक आता आदूबाळ देणार!
मनआनंदआनंदछायो...