बाबरी ते दादरी...
बाबरी ते दादरी...
लेखक - प्रकाश अकोलकर
अयोध्येत ते 'बाबरीकांड' घडलं, तो दिवस होता रविवार.
रविवार असला तरीही त्या दिवशी ऑफिसला म्हणजेच 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये जावंच लागणार, याची कल्पना होतीच. पण अयोध्येत बहुधा दुपारपर्यंत काही होणार नाही आणि त्यामुळे जेवण करून सावकाश निघू, असा विचार होता. अर्थात किमान रविवारची सकाळ तरी होता होईल तेवढी वसूल करावी, हा हेतू त्यामागे होताच! पण 'मटा'सारख्या अग्रगण्य वृत्तपत्रात चीफ रिपोर्टर म्हणून काम करत असल्यामुळे अयोध्येत काय काय होऊ शकतं आणि त्याचे परिणाम काय काय होऊ शकतात, याची कल्पना होतीच.
तारीख होती ६ डिसेंबर १९९२.
ही तारीख आवर्जून नमूद करण्याचं कारण एवढंच की तेव्हा दूरदर्शन या सरकारी टीव्ही वाहिनीचं एकमेव चॅनेल भारतातल्या बहुतांश घरांत उपलब्ध होतं. माझ्याही बोरिवलीच्या घरात तेवढं एकच चॅनेल होतं. लॅण्डलाईन टेलिफोन होता आणि तोही अर्थातच तेव्हा उपलब्ध असलेल्या एकमेव सरकारी दळणवळण यंत्रणेचा, म्हणजेच 'महानगर टेलिफोन निगम लिमिटेड’ या कंपनीचा म्हणजेच आजच्या भाषेत 'एमटीएनएल'चा! तोही पत्रकारितेचं कुंकू कपाळावर असल्यामुळे वशिला वगैरे लावून दोन-अडीच वर्षांनी मिळाला होता. दुपारी बाराच्या सुमारास त्या फोनची घंटी वाजली. सहसंपादक प्रकाश बाळ यांचा फोन होता. 'घरी काय करतोस?' या त्यांच्या प्रश्नावर 'निघतोय...' असं उत्तर तोंडातनं बाहेर यायच्या आत तेच म्हणाले : बाबरी मशीद पडली.
जबर धक्क्यातनं बाहेर यायच्या आत तेच म्हणाले : तुझ्या घरी केबल नाहीये? बीबीसी दाखवतेय…
---
अयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी एका उन्मादात जमीनदोस्त केल्याची बातमी 'मटा'च्या चीफ रिपोर्टरला कशी कळली, हे इतक्या तपशीलानं आज सांगण्याचं कारण एवढंच की अवघ्या २५ वर्षांपूर्वीची भारतातल्या 'कम्युनिकेशन' यंत्रणेची अवस्था आज कोणाला सांगायला गेलो, तर त्याचा विश्वासही बसणं अवघड आहे. पण इसवी सन १९९२पर्यंत खरं तर भारतात केबल टीव्ही येऊन दाखल झालाच होता, पण त्यामागे जगभरातल्या बातम्या 'ब्रेकिंग न्यूज' म्हणून लोकांपर्यंत पोचाव्यात किंवा पोचवाव्यात हा हेतू बिलकूलच नव्हता. त्या काळात कॅसेट रेकॉर्डरचं फॅड प्रचंड बोकाळलं होतं. साधारणपणे अब्रिज्ड ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीच्या आकाराच्या कॅसेट्सही तेव्हा सहज उपलब्ध असायच्या आणि पुस्तकांच्या लायब्ररीऐवजी अशा बॉलिवुड सिनेमांच्या कॅसेट्स भाड्यानं देणाऱ्या लायब्रऱ्या तेव्हा नाक्यानाक्यावर उभ्या राहिल्या होत्या. पण कॅसेट रॅकॉर्ड प्लेअरही सर्वांनाच विकत घेणं परवडत नसेच. त्यातूनच कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून ही केबल टीव्हीची आयडिया निघाली. प्लेअर एकच पण पंचक्रोशीतील दहा-वीस घरं त्यास जोडायची आणि रात्री पॉप्युलर हिंदी बॉलीवुड सिनेमा दाखवायचा, असा रिवाजच तेव्हा पडून गेला होता.
'केबल टीव्ही'च्या माध्यमातून बातम्या दाखवल्या जाऊ शकतात, हे भारतीयांच्या डोक्यात घुसण्यासाठी इराक युद्ध व्हावं लागलं! प्रथमदर्शनी हे वाक्य क्रूर विनोदाचा नमुना वाटलं तरी त्यामागे दडलेलं वास्तव, हे आजही डोळ्यापुढून जाऊ शकत नाही. १९९०मध्ये सद्दाम हुसेननं कुवैतवर आक्रमण केलं होतं. तेलउत्पादक देशांमधील कुरघोडीचं राजकारण तर या आक्रमणामागे होतंच; पण त्याशिवाय या दोन देशांमध्ये सरहद्दीसंबंधात बऱ्याच काळापासून कुरबुरी सुरू होत्या. युनोच्या सुरक्षापरिषदेनं या आक्रमणाचा अर्थातच निषेध केला आणि अमेरिकेनं तातडीनं दुसऱ्या महायुद्धानंतर पुन्हा एकदा दोस्त राष्ट्रे एकत्र आणून इराकवर बॉम्बहल्ले सुरू केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर बातम्या विकणाऱ्या कंपन्यांना मग ही आपले उखळ पांढरे करून घेण्याची संधी वाटली, यात नवल नव्हतं. अमेरिकेतील 'सीएनएन' -केबल न्यूज नेटवर्क- ही कंपनी आपली सारी आयुधं घेऊन भारतात अवतरली. मुंबईत नरिमन पॉईंटवर असलेल्या ओबेरॉय, म्हणजेच आजचं ट्रायडंट, या पंचतारांकित हॉटेलात या कंपनीनं भले मोठे स्क्रीन्स लावले आणि अमेरिकेचे भीषण बॉम्बहल्ले, तसेच त्यात जळून खाक होणारे इराकचे इलाखे 'लाइव्ह' दाखवू लागले. भले भले पत्रकार तसेच उद्योगपती आणि मीडिया मोगल्स हा तमाशा चवीनं बघत होते.
भारतात केबल टीव्हीवरून न्यूज त्यानंतर वर्ष-दोन वर्षांतच दिसू लागली. रूपर्ट मरडॉक आपला 'स्टार टीव्ही' घेऊन भारतात अवतरला आणि सुभाषचंद्र या दिल्लीजवळच्या हापूर गावात कोणे एके काळी गहू विकणारा इसमही 'झी' नावाचं एक नवं नेटवर्क घेऊन या बातमी विकण्याच्या स्पर्धेत उतरला. ते साल होतं १९९२! त्यानंतरच्या अवघ्या तीनच वर्षांत सारं जग हादरवून टाकणाऱ्या अनेक घटना घडल्या आणि सारं जग केवळ हादरूनच गेलं असं नाही, तर आरपार बदलून गेलं. जगाचा जगाकडेच बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. सगळ्यांच्याच चष्म्याचे नंबरच बदलले असं म्हणा ना!
---
सन १९८० आणि ९० या दोन दशकांत भारतात धार्मिक पुनरुज्जीवनाची लाट भलत्याच वेगानं अंगावर चाल करून अंगावर येत असतानाच, दुसरीकडे आधुनिक तंत्रज्ञान भारताला कवेत घेऊ पाहत होतं. १९९२मध्ये अयोध्येत बाबरीकांड घडलं, त्यास भली मोठी राजकीय पार्श्वभूमी कारणीभूत होती. इंदिरा गांधी यांची १९८४मध्ये हत्या झाल्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले आणि त्यांनी लगोलग घेतलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचं दारुण पानिपत झालं होतं. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसनं चारशेहून अधिक जागा जिंकलेल्या असताना भाजपचे अवघे दोन खासदार लोकसभेत प्रवेश करू शकले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून लालकृष्ण अडवाणी यांच्यापर्यंत भाजपचे सारे मोहरे पराभूत झाले होते. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छायाछत्राखालील तमाम हिंदुत्ववादी संघटनांनी 'मंदिर वहीं बनायेंगे' असा नारा दिला होता. त्याचीच निर्घृण परिणती चारशे वर्षांची पुरातन बाबरी मशीद जमीनदोस्त होण्यात झाली होती. या एकाच घटनेचे भारतीय समाजजीवनावर फार खोल असे परिणाम झाले. या बाबरीकांडानंतर लगेचच मुंबईत एका महिन्याच्या अंतराने दोन अत्यंत हिंसक अशा दंगली होऊन शेकड्यानं निरपराधांचे शिरकाण तर झालंच. पण जानेवारी १९९३मध्ये ही दुसरी दंगल कशीबशी आटोक्यात आल्यानंतर पुढच्या दोनच महिन्यांत १२ मार्च १९९३ रोजी मुंबापुरीत ते भीषण बॉम्बस्फोट झाले. हे दहशतवादानं भारतात टाकलेलं पहिलं पाऊल होतं आणि आज त्या घटनेस दोन दशकं उलटून गेल्यावरही दहशतवादाचं सावट कायमच आहे. एकीकडे भारतात दहशतवाद आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान हातात हात घालून प्रवेश करत असतानाच तिकडे सोविएत रशियाचं विघटन होऊ पाहत होतं. डिसेंबर १९९१मध्ये म्हणजेच बाबरीकांडाच्या बरोबर एक वर्ष आधी रशियन संघराज्याचे तुकडे होऊन १५ नवीन देश जन्माला आले होते. नव्या जगाच्या नव्या पुनर्रचनेची ही सुरुवात होती आणि भारतात अवतरलेल्या नव्या तंत्रज्ञानामुळे जगभरात कुठेही जरा काही खुट्ट झालं, की क्षणार्धात त्याची ब्रेकिंग न्यूज घराघरांत घुसू पाहत असलेल्या न्यूज चॅनेल्समुळे कानावर येऊन आदळत होती. सारं जीवनच त्यामुळे पुढे बधिर होत जाणार आहे, याची तेव्हा कोणाला कल्पनाही येणं अशक्य होतं.
एकीकडे टीव्हीची ही चॅनेल्स मनोरंजनाचा खजिनाही सोबत घेऊन आली होती आणि त्यामुळे तुमच्या दिवाणखान्याचं रूपांतरच एकतर सिनेमा थिएटरमध्ये वा क्रिकेटच्या स्टेडियममध्ये होऊन गेलं होतं, तर दुसरीकडे अंगावर एखाद्या जबरदस्त धबधब्यासारख्या बातम्या येऊन कोसळत होत्या.
वास्तवाच्या दाहकतेपासून दूर पळून जाण्यासाठी आणखी काय हवं होतं आपल्याला?
---
पण एवढ्यानं भागणार नव्हतं!
या टीव्ही चॅनेलच्या पाठोपाठ आणखी एक मायाजाल आपल्या आयुष्यात शिरणार आहे, याची तेव्हा कोणाला कल्पनाही असणं शक्य नव्हतं. पण तसं घडलं खरं! हे मायाजाल तुमच्या-आमच्या साऱ्यांच्याच आयुष्यात एक मोठा विस्फोट घडवणारं ठरलं. या मायाजालाला तुमच्या-आमच्या रोजच्या भाषेत 'इंटरनेट' या नावानं ओळखलं जातं! बाबरीकांड, नंतरच्या दंगली आणि पाठोपाठचे बॉम्बस्फोट यानंतरच्या दोनच वर्षांत हे मायाजाल भारतीयांच्या अंगावर येऊन कोसळलं आणि माहितीबरोबरच विकृतीचं एक नवं जगही आम आदमीसाठी खुलं झालं. हे नवं जग एकीकडे कमालीचं कुतूहल निर्माण करणारं होतं आणि त्याचबरोबर एक आश्वासक असं माहितीपर्वही ते सोबत घेऊन आलं होतं. सारं जग या माहितीची आणि त्याचबरोबर संदेशांची देवाणघेवाणही अत्यंत सुलभ आणि वेगवान पद्धतीनं करत होतं. त्यामुळे त्याचे फायदे तर स्पष्ट दिसतच होते. पण हे मायाजाल तुमची वर्षानुवर्षं चालत आलेली जीवनपद्धतीच आरपार बदलून टाकणारंही ठरलं.
त्याचं बीज हे अर्थातच हिंदुत्ववादी शक्ती आणि सेक्युलर विचारधारा यांच्यात, याच १९९०च्या दशकात सुरू झालेल्या टोकाच्या संघर्षात होतं. हा संघर्ष, या देशाच्या हजारो वर्षांच्या बहुभाषिक-बहुधार्मिक अशा संस्कृतीला नख लावू पाहणाऱ्या शक्तींच्या विरोधातही होता. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या चार दशकांत या देशानं विविधतावादी (प्लुरॅलिस्ट) संस्कृती जपतानाच आधुनिक विचारधारांचाही आदर केला होता. अर्थविषयक धोरणं असोत की सामाजिक भूमिका असो, आपल्या देशानं कधीच संकुचिततेला थारा दिला नव्हता. संघपरिवारानं डिसेंबर १९९२मध्ये केवळ बाबरी मशीदच जमीनदोस्त केली होती, असे नव्हे तर त्याच वेळी सांस्कृतिक विविधतेच्या भक्कम पायावर उभ्या असलेल्या या भारतवर्षाच्या सामाजिक आधारस्तंभांनाच हादरा दिला होता. हाती आलेल्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून हा विघटनवादी, एक चालक-एक धर्म यांचा प्रसार करणारा विचार पुढे नेण्याचे काम, त्यानंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे २०१०नंतर विशेषत्वानं सुरू झालं.
पण त्या आधीच प्रसारमाध्यमांमध्ये दुहीचं वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न संघटितपणे सुरू झाले होते. त्याची पायाभरणी ही १९९५मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार सत्तारूढ झाल्यानंतर झाली. त्यापूर्वी महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत समाजवादी, संघवादी, मार्क्सवादी अशा विविध विचारसरणींवर निष्ठा असलेले पत्रकार होते. त्यांचे तसे गटही होते आणि त्या गटांमध्ये आपापसात जसे वादविवाद झडत, त्याचबरोबर भिन्न विचारांच्या गटांमध्येही तुंबळ रणकंदन होत असे. पण हे फक्त वैचारिक पातळीवर असे. आज, म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर जी असहिष्णुतेची भावना निर्माण झाली आहे; तिचा त्या काळात, १९९५च्या आधी लवलेशही नसे. पण हे शिवसेना-भाजप युतीचं सरकार स्थापन होताच, त्यांनी पत्रकारांची तसंच विचारवंतांचीही थेट विभागणीच करून टाकली. युती सरकारला पाठिंबा देणारे पत्रकार आणि विरोध करणारे, अशा दोन गटांत ही विभागणी झाल्यामुळे पत्रकारितेत दुहीची बीजं माजू लागली. पुढे ते सरकार १९९९च्या निवडणुकीत सत्ता टिकवू शकलं नाही; पण ही दुराव्याची दरी मात्र कायमच राहिली असं नव्हे, तर ती वाढतच गेली. फेब्रुवारी २००२मध्ये गोध्राकांडानंतर अहमदाबाद आणि परिसरात भीषण दंगली झाल्या. त्यानंतर ही दरी अधिकच वाढत गेली. तेव्हा त्या दंगलींचं चित्रण करणारे राजदीप सरदेसाई तसंच बरखा दत्त यांची त्या काळात कशी हालत मोदी समर्थकांनी केली होती, त्या कहाण्या सर्वश्रुत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राजदीपने लिहिलेल्या '२०१४ : इलेक्शन्स दॅट चेंज्ड इंडिया' या पुस्तकात अशा अनेक प्रसंगांचं वर्णन आहे. याचा अर्थ स्पष्ट होता. समाजातील एका बहुसंख्याक गटाला नवं तंत्रज्ञान हे आपल्याला हवं तसंच वाकवावंसं वाटत होतं. आपल्याला हवं तेच त्या तंत्रज्ञानातून लोकांपर्यंत पोचवायचं, असं त्यांनी ठरवूनच टाकलं होतं.
एकोणीसशे नव्वदच्या दशकानं नवं तंत्रज्ञान भारतात आणून, आपल्या जनतेला जगाच्या खिडक्या उघडून दिल्या होत्या खऱ्या; पण त्याच दशकानं आपली मनोवृत्ती अधिकाधिक संकुचित करण्याचा विडा उचलला. हाती आलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर, हा मागास संकल्पनांना पुनरुज्जीवन देण्यासाठी करण्याचे भारतीयांनी ठरवले. त्यासाठी नव्या सहस्रकात घराघरांत घुसलेल्या शेकडो चॅनेल्सचा जसा वापर केला गेला, त्याचबरोबर इंटरनेटचाही वापर बहुतांशी अशाच बाबींसाठी झाला. पण त्यापेक्षाही वेगळं उदाहरण द्यायचं झालं, तर ते गर्भजलचिकित्सेचं देता येईल. आईच्या पोटातील बाळाविषयी बरंच काही जाणून घेण्याची सुविधा या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झाली. पण आपण त्याचा वापर केला, तो आईच्या पोटातील बाळ हे मुलगी आहे असं समजताच तिची हत्या करण्यासाठी. आधुनिक तंत्रज्ञानाचा असा पराभव अन्यत्र अपवादानेच झाला असेल.
भारतात इंटरनेटचा खऱ्या अर्थानं प्रसार सुरू झाला तो १९९५मध्ये!
भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्ट १९९५ रोजी 'विदेश संचार निगम’ या सरकारी अखत्यारीतील कंपनीनं औपचारिकरीत्या इंटरनेटचं जाळं ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलं आणि खऱ्या अर्थानं एक नवं युग सुरू झालं. आठवा ते दिवस! डायल इन पद्धतीनं तास-तास वाट बघितल्यावर जेव्हा इंटरनेट सुरू होत असे, तेव्हा तो एक चमत्कारच वाटत असे. भल्यामोठ्या डेस्कटॉप कम्प्युटरसमोर बसून, नेट कधी सुरू होतंय आणि कनेक्टिव्हिटी कधी मिळतेय याची वाट बघत बसण्यात आयुष्यातील नेमके किती तास फुकट गेले असतील; ते एक बिल गेट्सच जाणे! पण एकदा का ते नेट सुरू झालं की थेट 'तिळा दार उघड!' म्हटल्यावर गुहेचं दार उघडलं आणि अलिबाबाला एकदम क्षितीच झाली; त्याच अवस्थेत जायला व्हायचं…
---
पण या साऱ्या क्रांतिकारी घटना घडण्याआधीच भारतात आणखी एक चमत्कार घडला होता! तो होता अर्थातच आर्थिक सुधारणांचा. राजीव गांधी यांच्या भीषण हत्येनंतर १९९१मध्ये नरसिंह राव पंतप्रधान झाले आणि अर्थखात्याची धुरा त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या हाती सोपवली. त्यांनी आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पातून जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण या संकल्पना साकार केल्या आणि जगभरातील मार्केट थेट आपल्या मुठीत आलं. त्या आधी दहा वर्षे घडलेला एक किस्सा इथं अगदी जस्साच्या तस्सा नमूद करण्याजोगा आहे. त्या काळात सोनी, पॅनॅसोनिक अशा विदेशी ब्रँडबद्दल तरुणांच्या नव्हे तर ज्येष्ठांच्याही मनात कमालीचं आकर्षण असायचं. बोरीबंदरला, क्रॉफर्ड मार्केटला लागूनच 'मनीष मार्केट’ नावाची एक जादुई नगरी तेव्हा वसलेली होती. तिथं या असल्या विदेशी ब्रँड्सच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, म्हणजेच विशेषत: ट्रान्झिस्टर आणि कॅसेट रेकॉर्डर्स सहज उपलब्ध असायचे. तिथं जाऊन एके दिवशी नॅशनल पॅनॅसोनिक या कंपनीचा टू-इन-वन ट्रान्झिस्टर कम कॅसेट प्लेअर खरेदी केला. पैसे दिले आणि निघालो, तो त्या इसमानं सांगितलं : "जपून हं! समोर काय आहे माहीत आहे ना?” समोरच मुंबईचं ते प्रख्यात पोलिस मुख्यालय दिसत होतं. मी अडाणी पद्धतीनं विचारलं : "मग?” तेव्हा तो विक्रेता अगदी शांतपणे म्हणाला, "अहो, हा स्मगल्ड पीस आहे. पोलिसांनी पकडलं, तर मी जबाबदार नाही!” छातीत खरोखर धडधडायला लागलं. विक्रेताही चतुर असल्यानं त्यानं बॉक्स वगैरे काही न देता, तो टू-इन-वन वर्तमानपत्रात बांधून दिला होता. धडधडतच मार्केटमधून बाहेर पडलो. समोर दिसली ती टॅक्सी पकडली आणि चर्चगेट गाठलं. तेथून थेट बोरिवली. बोरिवलीला घरी जाऊन तो ट्रॅन्झिस्टर सुरू केला, तरी छातीतली धडधड थांबली नव्हती.
पण बोरीबंदरला थेट पोलिस मुख्यालयाच्या साक्षीनं स्मगल्ड गुड्स नियमितपणे कशी विकत मिळतात, हे कोडं मात्र पत्रकार असूनही कधी पडलं नव्हतं; याचंच आज नवल वाटतं!
पण मनमोहन सिंग यांनी जगाचे दरवाजेच सताड उघडले आणि पुढे नव्या सहस्त्रकाच्या पूर्वसंध्येलाच म्हणजे ३१ डिसेंबर १९९९च्या रात्री घरातला टीव्ही बंद पडला, तेव्हा थेट दुकानातूनच रीतसर रिसीट, गॅरंटी कार्ड वगैरे घेऊन सोनीचा टीव्ही खरेदी केला होता; हेही आज स्पष्ट आठवतं. ते श्रेय अर्थातच नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांचंच होतं!
---
१९९०च्या दशकानं असे अनेक चमत्कार आपल्याला दाखवले आणि पुढच्या दोन दशकांतच हातात आलेल्या स्मार्ट फोननं त्यात मोठीच भर घातली. नेट घरोघरी पोचलं. गुगल हातात आलं आणि जग जिंकल्याचाच आनंद झाला. 'ऑर्कूट'नं तुमच्या-आमच्या आयुष्याचा एक मोठा लचका तोडला. हातातल्या नोकियाच्या सेलफोनवर तेव्हा आम्ही एसएमएस-एसएमएस असा खेळ खेळत होतो. ऑर्कूटनं तोडलेला आयुष्याचा तो लचका कमीच होता म्हणून की काय पुढे फेसबुक आणि त्या पाठोपाठ वॉट्सअॅप असे आणखी काही दांडगे राक्षस चाल करून आले आणि आपली जीवनपद्धतीच आमूलाग्र बदलून गेली.
परवा ट्रेनमध्ये दोघे जण दोन-दोन स्मार्टफोन्स घेऊन शेजारीच बसले होते. कमालीचा उकाडा होता आणि ट्रेनमधला फॅन अर्थातच बंद होता. पण त्या दोघांना त्याचं काहीच नव्हतं. ते आपले काही तरी डाऊनलोड करत होते आणि त्यांचं सारं संभाषणही त्या डाऊनलोड-संबंधातच सुरू होतं. त्यांना सभोवतालच्या दाहक वास्तवाशी, काही म्हणता काही घेणं-देणं नव्हतं. ते आपले नेट कनेक्टिव्हिटी आणि डाऊनलोड हेच जागतिक महत्त्वाचे प्रश्न असल्यासारखे चर्चेत दंग होते!
याच नेट कनेक्टिव्हिटीमुळे हाताच्या मुठीत येऊन पोचलेल्या सोशल मीडियाचा पुरेपूर फायदा नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या निवडणुकीत कसा उठवला, तो आता इतिहास झाला आहे. पण याच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा तेव्हापासूनच खोट्या बातम्या, आक्रस्ताळी मतप्रदर्शन आणि असभ्य, अश्लील विनोद यांच्याच प्रसारासाठी सुरू झाला आणि सारं जगच एका 'मेक बिलिव्ह'च्या दुनियेत जाऊन पोचलं. पूर्वी जास्त दगदग झाली की अस्वस्थ वाटायचं, आता नेट कनेक्टिव्हिटी गेली की अगदी धडधडच सुरू होते.
'टाइम्स हॅव चेंज्ड' हे तर खरंच! पण या साऱ्याची सुरुवात अयोध्येतील बाबरीकांडापासून झाली आणि त्या दुर्घटनेस २५ वर्षे पूर्ण होत असतानाच राजधानी दिल्लीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दादरी गावात एका इसमाला, त्यानं गोमांस बाळगल्याच्या केवळ संशयावरून जमावानं दगडांनी ठेचून ठार मारलं. हा जमाव अर्थातच जमा झाला होता, तो 'वॉट्सअॅप'वरून पाठवण्यात आलेल्या मेसेजेसमुळेच…
थोडक्यात काय? तर हा 'बाबरी ते दादरी व्हाया इंटरनेट आणि स्मार्ट फोन’ असा हा प्रवास आहे. आपल्या साऱ्या जीवननिष्ठा आणि मूल्यसंकल्पनांना हादरे देणारा!
'आत्मा विक, कर किंमत...माझ्या मना बन दगड'
पाच दशकांपूर्वी विंदा करंदीकरांनी या भावना व्यक्त केल्या होत्या. कवीची प्रतिभा किती उंच झेप घेऊ शकते, याची प्रचीती आणून देणाऱ्या या कवितेत एक ओळ आहे : 'चहू बाजूंनी येतील स्वार…’
असेच स्वार चहू बाजूंनी नव्हे, तर दाही दिशांमधून गेल्या २५ वर्षांत आपल्यावर स्वारी करून आले आणि वास्तवाच्या दुनियेतून आपल्याला 'मेक बिलिव्ह!'च्या दुनियेत कायमच्या वास्तव्याला घेऊन गेले!
विशेषांक प्रकार
त्यापूर्वी महाराष्ट्रात आणि
त्यापूर्वी महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत समाजवादी, संघवादी, मार्क्सवादी अशा विविध विचारसरणींवर निष्ठा असलेले पत्रकार होते. त्यांचे तसे गटही होते आणि त्या गटांमध्ये आपापसात जसे वादविवाद झडत, त्याचबरोबर भिन्न विचारांच्या गटांमध्येही तुंबळ रणकंदन होत असे. पण हे फक्त वैचारिक पातळीवर असे. .... याचा अर्थ स्पष्ट होता. समाजातील एका बहुसंख्याक गटाला नवं तंत्रज्ञान हे आपल्याला हवं तसंच वाकवावंसं वाटत होतं. आपल्याला हवं तेच त्या तंत्रज्ञानातून लोकांपर्यंत पोचवायचं, असं त्यांनी ठरवूनच टाकलं होतं.
काहीही. म्हणजे "नवतंत्रज्ञान येण्याआधी सगळे सज्जनतेचे पुतळे होते. मग केबलरूपी कली आणि इंटरनेटरूपी भस्मासुर आला आणि सगळं वातावरण बिघडलं. नैतर हौ ग्रीन वॉज माय व्हॅली.." हा सूर का आहे हे समजलं नाही.
आधीचं तंत्रज्ञान सुलभपणे वाकवता येण्यासारखं नव्हतं, म्हणून तुंबळ रणकंदनं वैचारिक पातळीवर खेळून ती खाज भागवण्याशिवाय पर्याय नव्हता. आता वाकवता येण्यासारखं तंत्रज्ञान आलंय त्यामुळे या गोष्टी घडवणं सुलभ झालं आहे.
मानवी स्खलनशीलतेसाठी तंत्रज्ञान दोषी कसं हे काही समजलं नाही.
----------
आणि दादरीचं काय? दादरी घटनेत असलेला तंत्रज्ञानाचा सहभाग तीस शब्दांत उरकला आहे.
----------
माफ करा, पण लेख वरवरचा वाटला. जास्त अपेक्षा होत्या.
अत्यंत एकांगी व
अत्यंत एकांगी व पूर्वग्रहदूषित लेख आहे. फक्त स्वतःच्या विचारांशी सोयिस्कर ठरतील अशाच घटनांचा उल्लेख करणे व त्याची तंत्रज्ञानाशी जोड घालणे हा पक्षपात स्पष्ट दिसतो. अर्थात "प्रकाश अकोलकर" या व्यक्तीकडून यापेक्षा वेगळे विचार अपेक्षितच नव्हते.
खालील वाक्य इतिहासाविषयी संपूर्ण अज्ञान दर्शविते. हे अज्ञान म्हणावे का पूर्वग्रह!
पण जानेवारी १९९३मध्ये ही दुसरी दंगल कशीबशी आटोक्यात आल्यानंतर पुढच्या दोनच महिन्यांत १२ मार्च १९९३ रोजी मुंबापुरीत ते भीषण बॉम्बस्फोट झाले. हे दहशतवादानं भारतात टाकलेलं पहिलं पाऊल होतं
निदान एका पत्रकाराकडून तरी असे अज्ञान अपेक्षित नव्हते.
लेख दिवाळीअंकाच्या प्रकृतीने
लेख दिवाळीअंकाच्या प्रकृतीने लिहिल्यामुळे जे सांगायचंय त्या सगळ्याला पूर्ण न्याय मिळाला नाहीये असं वाटत राहिलं वाचताना. या विषयावर अधिक जास्त तपशीलात लिहिता यावं अकोलकरांना.
.
.
"एकोणीसशे नव्वदच्या दशकानं नवं तंत्रज्ञान भारतात आणून, आपल्या जनतेला जगाच्या खिडक्या उघडून दिल्या होत्या खऱ्या; पण त्याच दशकानं आपली मनोवृत्ती अधिकाधिक संकुचित करण्याचा विडा उचलला. हाती आलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर, हा मागास संकल्पनांना पुनरुज्जीवन देण्यासाठी करण्याचे भारतीयांनी ठरवले. त्यासाठी नव्या सहस्रकात घराघरांत घुसलेल्या शेकडो चॅनेल्सचा जसा वापर केला गेला, त्याचबरोबर इंटरनेटचाही वापर बहुतांशी अशाच बाबींसाठी झाला. पण त्यापेक्षाही वेगळं उदाहरण द्यायचं झालं, तर ते गर्भजलचिकित्सेचं देता येईल. आईच्या पोटातील बाळाविषयी बरंच काही जाणून घेण्याची सुविधा या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झाली. पण आपण त्याचा वापर केला, तो आईच्या पोटातील बाळ हे मुलगी आहे असं समजताच तिची हत्या करण्यासाठी. आधुनिक तंत्रज्ञानाचा असा पराभव अन्यत्र अपवादानेच झाला असेल."
हा परिच्छेद वाचला आणि ’ब्लॅक मिरर’ आठवलं एकदम.
रद्दड लेख
अत्यंत सुमार आणि रद्दड लेख आहे हा.
हे दहशतवादानं भारतात टाकलेलं पहिलं पाऊल होतं आणि आज त्या घटनेस दोन दशकं उलटून गेल्यावरही दहशतवादाचं सावट कायमच आहे.
म्हणजे काश्मीरमधून हिंदूंना नेसत्या वस्तानिशी हाकलले ती काय लपाछपी होती का? ४७ साली रेल्वेगाड्यांमध्ये मॅसॅकर्स चालू होती ते काय होते? ८० च्या दशकात पंजाबात काय चालू होते? कसे असते की बाबरी मोडली म्हणून दहशतवाद आला असे म्हटले की फुरोगाम्यांमध्ये लगेच आपले स्थान बळकट होते.
भारतात दहशतवाद कित्येक शतकांपासून आहे. औरंगजेबाने हिंदूंवर जिझिया कर लावला ते काय होते? तेगबहाद्दूरांना धर्मांतर करत नाही म्हणून ठार मारले ते काय होते?बकवास बंद करा.
... ... ... ... माझी श्रेणी
...
...
...
...
माझी श्रेणी द्यायचे प्रिव्हिलीज गेले याचे अजिबात वाईट वाटत नाही. ऐसीचे सदस्यपद गेले तरी काही वाईट वाटणार नाही. शेवटी ऐसीसारख्या ढोंगीपणाला उघडे पाडणे हाच माझा मराठी आंतरजालावरील वास्तव्याचा हेतू आहे. मी तर म्हणतो की ऐसी रसातळाला जाईपर्यंत, ऐसीचे तुकडेतुकडे होईपर्यंत, ती साईट कायमची बंद होईपर्यंत मला समाधान लाभणार नाही.
जगात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ढोल वाजविणार्या ऐसीकरांनो, आहे हिंमत माझे खाते बॅन करायची?
केवढा एकांगी, पुर्वग्रहदुषीत
केवढा एकांगी, पुर्वग्रहदुषीत आणि संघ-भाजप-मोदी ह्यांना लक्ष्य साधून लिहिलेला लेख. "आपल्याला हवं तेच त्या तंत्रज्ञानातून लोकांपर्यंत पोचवायचं" असा आरोप दुसर्यांवर करताना पत्रकार महोदय स्वतःही ह्या लेखातून तेच करत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही का?
असे लेख वाचले की तटस्थ भुमिकेतून तरी तेवढेच विचार प्रवर्तक लेख लिहिणार्या श्रामोंची आठवण सहाजिकपणे होते!