खूप फिक्शन जीवनाला झेपेल काय? : नव्वदोत्तरी वास्तव आणि श्याम मनोहरांचा फिक्शन सिद्धांत

श्याम मनोहर संकल्पनाविषयक नव्वदोत्तरी

खूप फिक्शन जीवनाला झेपेल काय? : नव्वदोत्तरी वास्तव आणि श्याम मनोहरांचा फिक्शन सिद्धांत

लेखक - धनुष

"मन जितकं सैल तितकं जीवनाचं झिरपणं अधिक."

नव्वदोत्तरी ह्या संज्ञेचा एक अर्थ कालिक आहे : अर्थात १९९० नंतरचा काळ. नव्वदोत्तरीचा दुसरा अर्थ मात्र १९९० नंतरच्या काळात उद्भवलेल्या जटील आणि गुंतागुंतीच्या वास्तवाकडे निर्देश करतो. १९९० नंतरचं वास्तव त्यापूर्वीच्या काळापेक्षा आमूलाग्र निराळं आहे आणि त्याचं आकलन निराळ्या पद्धतीनं करायला हवं असा एक आग्रह ह्या नव्वदोत्तरी संकल्पनेत अभिप्रेत आहे.

हे वास्तव निराळं असल्याचे पुष्कळ दाखले ह्या संकल्पनेच्या वापरकर्त्यांनी दिलेले दिसतात : जागतिकीकरण, नवी, उदार अर्थव्यवस्था आणि त्यातून साकारलेलं बाजारकेन्द्रित सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैचारिक विश्व, माध्यमांची क्रांती आणि त्यातून उद्भवलेली, १४० शब्दांत जगातल्या कुठल्याही क्लिष्टतेचं लीलया उत्तर देण्याची, अगाध क्षमता अश्या अनेकच गोष्टी हे नव्वदोत्तरी विश्व साकारतात. जग जवळ येतंय, (किती भंपक वाक्यए हे!) यासारखी विधानं आपण ऐकलेली असतात, उदारीकरणाच्या अर्थव्यवस्थेचे परिणाम अनुभवलेले असतात, बाजाराचं बदललेलं स्वरूप, व्यक्तींचं वेगानं होत असलेलं वस्तूकरण, वाढती हिंसकता वगैरे गोष्टी कमी-जास्त प्रमाणात आजूबाजूला (आणि स्वतःतही) घडताना दिसत असतात.

ह्या वास्तवाच्या तात्त्विक किंवा सांस्कृतिक प्रारूपाचं नाव काही वेळा आधुनिकोत्तर किंवा उत्तर-आधुनिक असं सांगितलं जातं. आधुनिकतेच्या बंदिस्त आणि निश्चित अशा संकल्पना चौकटींना आव्हान देऊन, आधुनिकतेतून आलेली परात्मता, कला आणि नैतिकतेचा उच्चभ्रूपणा आणि सगळं वास्तव शास्त्रीय चौकटीतूनच (म्हणजे वस्तुनिष्ठ, सार्वकालिक आणि शास्त्रीय परिभाषेत सिद्ध करता येईल अशा पद्धतींतून) पाहण्याची सक्ती अशा गोष्टी नाकारत उत्तर-आधुनिकतेने बंडखोरीचे रणशिंग फुंकले. पाश्चिमात्य संदर्भात साठोत्तरी आणि भारतीय संदर्भात नव्वदोत्तरी काळ हा उत्तर-आधुनिक संवेदनशीलतेचा मानला जातो.

ल्योतार (Jean-François Lyotard) ह्यांनी उत्तर-आधुनिकतेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ते म्हणतात : उत्तर आधुनिकता म्हणजे आधुनिकतेतल्या महाकथ्यांना (grand narratives) दिलेला ठाम नकार. आधुनिकता त्यांच्या मते काही महाकथ्यांची निर्मिती करते, उदाहरणार्थ मानवी इतिहासाविषयी उत्क्रांतीवादी – म्हणजे इतिहासाला काही निश्चित अर्थ आहे आणि त्याचा प्रवास एका ठरलेल्या उद्दिष्टाकडे चाललाय अशी – भूमिका. किंवा शास्त्रीय ज्ञानाच्या सार्वभौमतेचं महाकथ्य. त्यांच्या मते निखळ सत्याचा शोध घेणारं ज्ञानशास्त्रही विज्ञानाची भूमिका विरळ झाली असून, ते शक्तिशाली अशा भांडवलशाहीच्या आणि राज्यसंस्थांच्या सेवेत निमग्न झालं आहे. पर्यायानं ह्या महाकथ्यांद्वारे मानवी अस्तित्वाविषयीची एक सर्वंकषतावादी भूमिका आधुनिकतेने विकसित केली. मार्क्सवाद किंवा विज्ञानाची सार्वभौमता ह्यांना ल्योतार्द अश्या महाकथ्यांची उदाहरणेच मानतात.

फ्रेंच तत्त्वज्ञ ल्योतार, बोद्रियार (Jean Baudrillard) हे उत्तर आधुनिकतेचे मुख्य शिलेदार. पण उत्तरआधुनिक तत्वज्ञानाच्या लिक्विड आशयाप्रमाणेच त्यात कुणाचा समावेश करायचा आणि कुणाचा नाही ह्या चौकटीसुद्धा अतिशय लवचीक आहेत. पर्यायानं अनेकदा फुको (Michel Foucault), देरीदा (Jacques Derrida), लाकां (Jacques Lacan) ह्यांच्यासारख्या अनेकांनाच उत्तर आधुनिक मानलं जातं. तर ते असो.

आधुनिकतेसंदर्भातले उत्तर-आधुनिक विचारवंतांचे अनेकच आक्षेप चिंतनीय आणि गंभीर आहेत; पण उत्तर-आधुनिकतेच्या आक्रमक ज्ञानशास्त्रातून काही नव्या समस्यांचा उद्भव झाला. उत्तर-आधुनिकतेचं एक महत्त्वाचं परीक्षण मार्क्सवादी (म्हणजे उत्तर-आधुनिकांच्या दृष्टीने आधुनिकतावादीच!) विचारवंत फ्रेडरिक जेमसन (Fredric Jameson) ह्यांनी केलंय :

जेमसन उत्तर आधुनिक परिस्थितीला भांडवलशाहीचं सांस्कृतिक तर्कशास्त्र असं म्हणतात, म्हणजे भांडवलशाहीतून विकसित झालेल्या सार्वत्रिक वस्तूकरणाच्या प्रक्रियेतून (कमोडीफिकेशन) हे आधुनिकतेचे नियम मोडणारं उत्तरआधुनिक सांस्कृतिक विश्व आकाराला येतं. ह्या उत्तर-आधुनिकतेची जी महत्त्वाची वैशिष्ट्ये जेमसन सांगतात त्यांपैकी कित्येक आपल्याला भारतीय संदर्भातही मूर्त स्वरूपात आढळतात : अभिजात आणि लोकप्रिय संस्कृतींमधलं ठळक विभाजन अनिश्चित आणि अस्पष्ट होत जाणं; वैचारिकतेची सगळ्या सामाजिक परीघातून झालेली हद्दपारी; आपल्या ऐतिहासिकतेशी असलेलं नातं तुटक होत जाणं आणि नव्या डिजिटल तंत्रज्ञानातून उमटणारा अर्धविकसित संवाद.

अर्थात पाश्चिमात्त्य जगापेक्षा निराळ्या वास्तवातल्या आधुनिकतेची (आणि पर्यायानं उत्तर-आधुनिकतेची) पूर्णपणे निराळी चिकित्सा शक्य आहे आणि भारतीय संदर्भात तर तिला वसाहतवादाचा पाया असल्याने ह्या आधुनिकतेचा भारतीय आशय आणि तिची रचना या दोन्ही अधिक गुंतागुंतीच्या होतात. भारतीय आधुनिकतेची एक वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती आणि तिच्या आर्थिक , सांस्कृतिक आणि वैचारिक प्रसाराचा कार्यकर्ता म्हणजे भारतीय मध्यमवर्ग. हा भारतीय मध्यमवर्ग वासाहतिक आधुनिकतेची निर्मितीही आहे, तिचा विरोधकही आहे आणि त्या वासाहतिक आधुनिकतेचा खंदा प्रचारकही आहे. त्यामुळे, ह्या मध्यमवर्गाचे आधुनिकतेला जे प्रतिसाद आहेत ते ह्या निरनिराळ्या प्रतिक्रियांची रोचक अशी कॉम्बिनेशन्स आहेत. वसाहत्तोतर काळात, विशेषतः १९९० नंतर, भारतातदेखील काही महाकथ्यांचं विघटन झालं तर काही नवी कथ्ये रचली गेली – उदाहरणार्थ समाजवादाचा विलय, हिंदुत्ववादाचा विकास; त्यातून ज्या नव्या आर्थिक रचना जन्माला आल्या त्यांनी मध्यमवर्गाचा सामाजिक-आर्थिक पाया विस्तारला आणि ह्या नवमध्यमवर्गाने नव्वदोत्तरी जाणिवांना तत्परतेने आत्मसात केलेलं आज दिसतंय. समकालीन मध्यमवर्गाची भोंगळ नैतिकता, कृतक भावनिकता, उथळ वैचारिकता आणि अतिसंकुचित विश्वभान ह्या नव्वदोत्तरी काळात त्यातल्या सगळ्या हिंसक शक्यतांसकट प्रकट होताना आढळते. तर सुरुवातीला मी म्हटलं तसं नव्वदोत्तरी साहित्य म्हणजे १९९० नंतरचं साहित्य आहेच . पण ह्या नव्वदोत्तरी काळातल्या अनेकानेक व्यामिश्रतांचं सजग आणि खोलवरचं भान राखून रचलेलं साहित्य असाही एक गर्भित अर्थ त्यात आहे. आशय आणि रचना ह्या दोन्ही पातळ्यांवर अभिनव, कल्पित आणि वास्तवाचं समकालीन कथनरूप, महाकथ्यांच्या अपुरेपणाची आणि त्यातल्या गर्भित हिंसेची तीव्र जाणीव अशी नव्वदोत्तरी साहित्याची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतात.

अर्थात, सगळीच नव्वदोत्तरी सांस्कृतिक-साहित्यिक अभिव्यक्ती अशी अजिबातच नाहीए. म्हणजे श्याम मनोहरांची अतिशय नव्या संवेदनशीलतेची कादंबरी 'कळ' ज्या वर्षी प्रकाशित झाली, त्या वर्षी तमाम भारतवर्षातले लोक अल्ताफ राजाचं 'परदेसी परदेसी' गाणं ऐकत होते. नव्वदोत्तरी मराठी कविता अनेकानेक सक्षम आवाजांत नव्या काळाची जाणीव समूर्त करू लागली, तरीही मराठी भावकवितेचं दळण दळलं जातच होतं. नव्वदोत्तरी हिंदी सिनेमा हा तर भीषण आहे. विशेषत: कृतक भावुकता आणि प्रेक्षकशरणतेत जागतिक मोजमाप ठरेल इतका तो जबरी आहे (उदाहरणार्थ, पहा : विजयपथ). भारतीय टेलिव्हिजन मालिकांसाठी तर माझ्याकडे विशेषणच नाहीए. कमाल वाईट असलं की ते चांगलं असतं असं म्हणतात; त्याहून वाईट असलं तर काय म्हणावं, ह्याचं आकलन मला अजून झालेलं नाहीए. नव्वदच्या दशकात आणि त्यानंतर प्रकाशित झालेल्या कित्येक मराठी लोकप्रिय कादंबऱ्या, कविता (तेच ते - तुमचं आणि आमचं सेम वगैरे असतं, ते) आणि लघुकथा ह्यांचा नव्वदोत्तरी जाणिवेशी तर काही काडीचा संबंध नाहीए. (लोक इतके अनेकानेक काळांमध्ये उभे आहेत की आपल्याला समकालीन काळाचा अगदी आधुनिकता-पूर्व संवेदनशीलतेपासून ते उत्तर-उत्तरआधुनिक जाणिवांपर्यन्तचा प्रदीर्घ परीघ दिसू शकतो.)

म्हणजे काय होतंय, तर समकालीन वाचक बऱ्याचश्या सामान्य कथा, कादंबऱ्या, कविता आणि जवळपास सगळ्याच अतिसुमार मालिका पाहतोय; त्यांतून अजाणता का असेना, त्याची समकालीन वास्तवाची (आणि साहित्याची) समज घडतीए आणि कुठल्याही प्रकारच्या वैचारिकतेला ह्या सगळ्यातून पूर्णपणे हद्दपार केल्यामुळे ज्या साहित्यात ह्या समकालीनत्वाची गंभीर चिकित्सा आहे त्याला क्लिष्ट आणि दुर्बोध मानून दूर केलं जातंय.

एका बाजूला अनेकानेक नवे ज्ञानविषय निर्माण होताहेत, ज्ञानशाखा विस्तारताहेत; ज्ञानाचं लोकाभिमुख असणं वाढलंय. तर दुसरीकडे ज्ञानाबद्दलची आस्था, ज्ञानसाधना करण्याबद्दलची आस्था ढासळलीए. एकाच 'स्व'च्या गुंतागुंतीच्या ओळखी निर्माण होताना आणि त्यातली ज्ञानशास्त्रीय उतरंड पसरट होत जाताना वैयक्तिक आणि सामाजिक पातळ्यांवर नैतिक मूल्यांविषयीचा गोंधळ तर आहेच, पण एकाच वेळी अनेक 'स्व' जगण्यातून येणारा अभूतपूर्व तणावसुद्धा आहे. (मकरंद साठेंची 'अच्युत आठवले आणि आठवण' ही कादंबरी किंवा रंगनाथ पठारेंच्या 'नामुष्कीचे स्वगत' आणि 'चोषक फलोद्यान' ह्या कादंबऱ्या ह्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. साठ्यांचाच एक लहानसा सैद्धांतिक निबंध 'सांस्कृतिक अस्मिता आणि जागतिकीकरण' हासुद्धा ह्या संदर्भात पाहण्यासारखा आहे.)

गांधींची आधुनिकतेवरची टीका प्रसिद्ध आहे. ते म्हणत असत : लोक भांडत होते म्हणून सरकारने कोर्टं आणली असं नव्हे, तर कोर्टं आणली म्हणून लोक भांडू लागले. (म्हणजे जे भांडण सरकारदरबारी न जाता सामोपचाराने गावकीतच मिटत असे, त्याला एक व्यापक आणि बाजारी स्वरूप कोर्टांनी मिळवून दिलं. ह्या नव्या कायदेविषयक जाणिवांतून सामाजिक आणि कौटुंबिक संबंध रचले गेले.) त्या धर्तीवर बोलायचं तर नव्या सोशल मिडियामुळे लोकांना मतं प्राप्त झाली. (उदाहरणार्थ, समजा कुठल्याही सोशल मीडियावर प्रत्येकाला मतं मांडायला किमान १०००० शब्दांची अट घातली, तर किती लोकांना मतं असतील? ह्यावर तुमची प्रतिक्रिया लिहा. किमान आवश्यक शब्द: १००००) शिवाय मतं असण्यासाठी अभ्यासाची वगैरे गरज नसल्यामुळे मी सोशल मीडिया वापरतो, म्हणजे मला मत आहे असं नवं पोस्टमॉडर्न प्रिन्सिपल आलं. १४० शब्दांत माणूस विश्वभान प्रकट करू लागल्यावर सुमार ज्ञानाचा बेसुमार गलबला झालेला दिसतो.

अर्थात, मराठी संस्कृती हा उठवळ आणि उथळ दृष्टीकोन आधुनिक साहित्याच्या प्रत्येक टप्प्यावर पुरेशा नियमितपणाने व्यक्त करत आलीए. (पण हा विषय इथे किंचित अप्रस्तुत आहे. शिवाय जागेअभावी आणि वेळेअभावी ह्या मुद्याचं अधिक विवेचन शक्य नाही. पुढे मनोहरांच्या लिखाणासंदर्भात जरूर पडेल तिथे एखाद-दोन उदाहरणं देता येतील. नाहीतर ह्या विषयावर निराळा लेख लिहिता येईल. पाहू या.)

आता ह्या सगळ्या चर्चेच्या संदर्भात श्याम मनोहरांच्या नव्वदोत्तरी लिखाणाचा थोडक्यात विचार करू या. (नव्वदोत्तरी म्हणून 'हे ईश्वरराव…हे पुरुषोत्तमराव' ही कादंबरी चर्चेतून वगळली आहे. अर्थात आमच्या मते, ही मनोहरांची - कदाचित सर्वोकृष्ट नसली तरी - अत्यंत उत्तम कादंबरी आहे. सर्वोत्तम अजूनही 'कळ'च. तिची आशयसूत्रांच्या अंगांनी, रचनेच्या आणि कथनाच्या अंगांनी हरिश्चंद्र थोरातांनी अतिशय चिकित्सक समीक्षा केलीये. हायली रेकमेंडेड!) ही काही अकॅडेमिक वगैरे चर्चा नसल्यामुळे प्रत्येक कादंबरीच्या प्रत्येक बाजूंवर काही आपण लिहिणार नाही, थोडक्यात रोचक वाटणाऱ्या मुद्द्यांवर बोलू काही. त्यातही मुख्य दोनच :
अ) कथनरूप अर्थात कादंबरीचा फॉर्म आणि आशय. नव्वदोत्तरी वगैरे.
आ) अमूर्त प्रश्नांचा शोध आणि फिक्शनविषयक सिद्धांतन

***

अ) कथनरूप अर्थात कादंबरीचा फॉर्म आणि आशय. नव्वदोत्तरी वगैरे.

आधी म्हटल्याप्रमाणे (म्हटलंय का? की विसरलोय? एनी वे, आधी नसेल लिहिलेलं तर आत्ता वाचा.) कादंबरी हा ललित लेखनाचा फॉर्म वसाहतवादी आधुनिकतेच्या काळात विकसित झाला. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर नवी शिक्षण व्यवस्था, मुद्रण आणि प्रकाशनाची सोय आणि मुख्यतः नव्यानं विकसित होत असलेला मध्यमवर्ग आणि त्याच्या नवसांस्कृतिक गरजा असे अनेक घटक एकसमयावच्छेदेकरून अवतरल्यामुळे कादंबरी प्रकटली. मराठी कादंबरी जरी १८५७ लाच विधवा विवाह आणि ख्रिस्ती धर्मांतर अशा सुधारकी विषयावर लिहिली गेली, तरी तिचे अधिक सजग, जोमदार आणि सकस अविष्कार यायला साठोत्तरी काळ यावा लागला. (असं म्हणतात की पहिली भारतीय कादंबरी मराठीतच लिहिली गेली. तीच ही बाबा पदमनजींची 'यमुना पर्यटन'.) ह्यातून दोन नवेच घटक कादंबरीच्या निर्मितिप्रक्रियेशी जोडले गेले: आपल्या खुर्चीत बसून मनातल्या मनात वाचन करणारा एकटा वाचक आणि नव्या इहवादी, व्यक्तिवादी तात्विक जाणीवा. ह्या दोन्ही घटकांनी कादंबरीचा आशय आणि फॉर्म दोन्ही घडवले.

ह्या नव्या कादंबरीच्या कथनात ('न्यारेटिव्ह'मध्ये) सामाजिक वास्तव, कल्पित आणि पारंपरिक आणि आधुनिक कथनशैलींचा समन्वय अशा अनेक घटकांचा समावेश होतो. (पुन्हा एकदा थोरात : मराठी कादंबरीचे रूप). मनोहरांच्या लेखनात ह्या कथनाची दोन महत्त्वाची वैशिष्ट्ये दिसून येतात : एक म्हणजे सामान्यतः मराठी कादंबरीतल्या कथनाचा भर सामान्य जीवन आणि विशेष घटना अशा द्वंद्वात्मक दृष्टीने वास्तवाला मांडून त्यातल्या विशेषाचं चित्रण करण्यावर असतो. इथे आता (आपलं आवडतं) ऐतिहासिक उदाहरण घ्यायला हरकत नाही : मराठीतले एक थोर (म्हणजे नेमाडे-भाषेतले) कादंबरीकार ना. सी. फडके ह्यांचे १९६६ सालचे हे उद्गार पहा :

"ज्यातून ज्यातून रसनिर्मिती करता येते, असे जीवनाचे सर्व प्रकार साहित्याचे वर्ण्यविषय होऊ शकतात, आणि झाले पाहिजेत, असे आपण नेहमी म्हणतो. राजे, राण्या, प्रधान, मंत्री, सेनापती, यांच्या प्रमाणेच रस्ता झाडणारा झाडूवाला, सफाई करणारा मेहेतर, ढोर, चांभार, मांग, महार यांची म्हणून काही सुखदु:खे आहेत आणि शुद्ध साहित्यिक दृष्टीला ती दिसली पाहिजेत असे आपण नेहमी म्हणतो. परंतु हे सर्व म्हटल्यावरदेखील असा प्रश्न विचारावासा वाटतो की, ढोर-चांभारांच्या जीवनातील घटक घेऊन त्यावर कादंबरीची रचना करता येईल काय? दलितांच्या सुखदु:खावर लहान कथा लिहिता येईल, परंतु मोठ्या विस्ताराची कादंबरी लिहिता येईल काय? लिहिता येईल, असे मला वाटत नाही. कादंबरीचा चित्रफलक फार मोठा असतो. ह्या विस्तीर्ण फलकावर भरघोस चित्र रंगवायचे झाले तर ज्या प्रकारच्या प्रसंगांची आणि घटनांची गरज असते, तसे प्रसंग आणि घटना दलितांच्या जीवनात आढळत नाहीत; कादंबरीची भव्य इमारत ज्यावर उभी राहील, असा भरघोस भक्कम पाया सापडत नाही."

इथे फडके सामान्य जीवन कादंबरीची विषयवस्तू असू शकते हेच नाकारतात, शिवाय कादंबरीच्या कथनात त्यांना केवळ भव्य घटना महत्त्वाच्या वाटतात. (फडक्यांनी आपल्या आत्मचरित्राला नाव दिलं होतं - 'माझं जीवन : एक कादंबरी'. फडक्यांचं स्वतःचं जीवन ह्या नावाला किती समर्थनीय ठरवतं हा तपशील तूर्तास सोडून देऊ.) शिवाय फडक्यांच्या साहित्यिक दृष्टीला ब्राह्मण किंवा तत्सम उच्चवर्णीय कारकुनी करणार्‍या किंवा चाळीत राहणार्‍या मनुष्याचं आयुष्य कादंबरीचा भव्य पट भरून काढताना कसं काय दिसू शकतं कुणास ठाऊक! (फडक्यांचा विषय निघालाच म्हणून सांगतो : त्यांची एक 'उद्धार' म्हणून कादंबरी आहे, त्यात नायिकेवर तिच्या स्वप्नात बलात्कार होतो (मनी वसे ते स्वप्नी दिसे? की वाचकाच्या आकांक्षांची पूर्तता?) आणि झोपेतून उठल्यावर तिला असं वाटू लागतं की तिला गर्भ राहिला आहे (फ्रॉईडची फ्रॉड फोडणी). आता ह्यातून मग नायक तिला वास्तवाची जाणीव करून देऊन तिचा (बरोब्बर) उद्धार कसा करतो ह्याचं मनोज्ञ (म्हणजे काय? आणखी एक जुना समीक्षकी आणि दुर्बोध शब्द) चित्रण फडके कादंबरीच्या 'विशाल चित्रफलकावर' करतात. तर असो. प्रत्येक पिढीत निरनिराळा 'गुंडा' निघत असणारच!

मनोहरांच्या कथनात मात्र विशेष आणि सामान्य असं विभाजनच नाकारलं जातं. म्हणजे मनोहरांनी जणू त्यांची पात्रं दैनंदिन आयुष्यातल्या सामान्य गोष्टी करताना त्यांच्या मनातले छोटे बारके बिनमहत्त्वाचे असे विचारक्षण पकडावेत असं केलंय. ज्याला अद्भुत किंवा गेला बाजार असामान्य म्हणावं अशा घटना अतिशय तुरळक आणि त्याही पात्रांच्या बारीक विचारांवर तपशिलांत होणाऱ्या परिणामांसंदर्भातच महत्त्वाच्या आहेत. समाजशास्त्रीय सिद्धांतात (विशेषत: फिनोमेनोलोजीमध्ये) व्यक्तीचा विचार एक स्थिर बिंदू किंवा निश्चित तत्त्व म्हणून न करता, सतत बदलाच्या प्रक्रियेत असणारा (becoming) असा केला जातो. श्याम मनोहरांची कथनशैली पॉझीटीव्हीझमला नाकारणारी आणि व्यक्तीचा एक चैत्यन्य (आधिभौतिक अर्थानं हा शब्द वापरला जात नाहीए ह्याची कृपया नोंद घ्यावी.) म्हणून विचार करणारी आहे. ह्या भाषिक अवकाशात लोक कपडे वाळत घालताना किंवा संडासला बसताना मृत्यूचा (किंवा जीवनाचा) विचार करतात (आणखी हा विचार काही तात्त्विक पद्धतीनं होत नाही; तो सामान्य अंकगणिती पद्धतीनी होतो.) किंवा क्षुल्लक गोष्टींची यादी करत बसतात (आसपासच्या आवाजांची, किंवा कुणाला कुठल्या गोष्टीनी राग येतो असल्या गोष्टींची). मनोहरांच्या लिखाणातले ह्या प्रकारचे घटक मध्यमवर्गीय दृष्टीतून वास्तव किती स्थिर दिसतं किंवा ते मोजून त्याचं वर्गीकरण करून वास्तवाला पकडता येतं अशा प्रकारच्या (आधुनिकतावादी) आभासाला मस्त पकडतात. मध्यमवर्गाच्या कोंडीचं एक अतिशय महत्त्वाचं कारण मनोहरांच्या लिखाणातून समोर येतं : एका बाजूला आधुनिकतेच्या निश्चिततेतून मिळणारी सुरक्षितता निसटतीए आणि उत्तरआधुनिक एन्क्झायटी वाढतीए, पण आधुनिकतेला सोडवत नाहीए आणि नव्या मूल्यांविषयी संभ्रम आहे –

'कळ'मध्ये एक मुलगा रस्त्यानं जाताना एका भिकारीण मुलीला पाहून तिच्याकडे आकर्षित होतो. मग त्याला स्वतःबद्दल शिसारी येते की मला एका भिकारणीबद्दल वासना व्हावी नं! मग त्याचं तंद्रीत तो पुढे चालत असताना त्याला वाटू लागतं की भिकारणीबद्दल आकर्षण वाटलं ह्याची मला लाज वाटतीए, म्हणजे मी तिला माझ्यापेक्षा कमी लेखतो. छे! छे!

मनोहरांचा आशय कमालीच्या औपरोधिक आणि असंगतीपूर्ण विधानांचा आहे. मनोहरांच्या विश्लेषणाचा फोकस मराठी मध्यमवर्गाच्या जगण्यावर आणि त्यातल्या विसंगतींवर आहे आणि त्यांचा अतिशय सूक्ष्म उपरोध ह्या आशयाला एक निराळी धार आणतो. गोष्ट म्हटली तर काहीच नाही, म्हटली तर एकूण असण्यातली विसंगती आणि त्रेधातिरपीट ('कळ' च्या एका गोष्टीतल्या दोन पात्रांची नावं) वगैरे. आशयाची मात्र आणखी एक गंमतच आहे. मनोहरांच्या 'कळ'नंतरच्या सगळ्या कादंबऱ्या ही एकूण मिळून एकच कादंबरी आहे काय? म्हणजे आशयाची आणि निश्चित विधानांची काहीएक पुनरावृत्ती मनोहरांच्या नव्वदोत्तरी लिखाणात आढळते. कदाचित त्यांचा आशय काही समान अमूर्ततत्त्वांचा शोध घेण्यात गुंतला असल्यामुळे आणि त्यांच्या विधानांचा रोख नवमध्यमवर्गाच्या जीवनाकडे असल्यामूळे तशी काही थीम्सची पुनरावृत्ती आपल्याला आढळत असेल.

आणखी एक म्हणजे, मनोहरांच्या कादंबरीतला निवेदक आणि पात्रांची अतिशय लवचीक चौकट. पात्रांच्या पुनर्निर्मितीचा विचार निवेदक करत राहतो. विशेषतः 'खूप लोक आहेत'मध्येही ही पद्धत परत परत अवलंबिली जाते. ह्यातून दोन गोष्टी अधोरेखित होतात : १) मनोहरांच्या विश्वात व्यक्ती एक तयार स्थिर बिंदू नसून सतत बदलणारी आहे आणि २) निवेदकाच्या दृष्टीनं पात्र एका व्यापक अशा शोधाचा भाग आहेत, फिक्शन (कथन) ही पद्धत वापरून मायक्रोविश्वं धुंडाळण्याचा प्रयत्न लेखक करतोय.

***

आ) अमूर्त प्रश्नांचा शोध आणि फिक्शनविषयक सिद्धांतन

मनोहरांचे प्रश्न मात्र अमूर्त स्वरूपाचे असतात आणि त्यातून काही एका नव्या आंतरिक विश्वाचा शोध ते घेण्याचा प्रयत्न करतात. काही संकल्पना ते टोकदार होईपर्यंत तासतात – सेक्स, अध्यात्म, (तरुणपणी सेक्स करायचा, तसं म्हातारपणी अध्यात्म करायचं) धर्म, कुटुंब, वगैरे.

...."कुटुंबात विचारच होत नाहीत."
"कशाला हवेत विचार? कुटुंब म्हणजे सुरक्षितता, कुटुंब म्हणजे सुख..."
...."कुटुंबात माणूसच समजत नाही."
"कशाला माणूस समजायला हवा? कुटुंब म्हणजे प्रेम करायचं, प्रेम घ्यायचं.."

हे पहा. ह्या प्रकारची कुटुंबाची चिकित्सा नवीन नाहीच. उलट ती तशी सौम्यच आहे, पण मनोहरांचा उद्देश इथे कुटुंबसंस्थेवर सामाजिक टीका लिहिण्याचा नसून समाज अधिक शोधक कसा होऊ शकेल अशा प्रकारच्या अमूर्त प्रश्नांचा विचार करण्याचा आहे. त्याची चिकित्सा ते कुटुंबासारख्या मायक्रोविश्वाचं एकक घेऊन करतात. (बेबी युनिव्हर्सच महत्त्वाची!)

ही जी बेबी युनिव्हर्स मनोहर रेखाटतात, त्यात मात्र काहीसा एकसुरीपणा येतो, पण मनोहरांची कादंबरी समाजशास्त्रीय तपशील रेखाटण्यापेक्षा मानवी आंतरसंबंध ह्या स्तरावर कथनाला पाहते. म्हणजे ती मध्यमवर्गीय आर्क ओलांडत नाही हे खरं असलं आणि व्यक्तीव्यक्तींच्या जगण्याचे मायक्रोतपशील त्यांच्या दैनंदिन, काहीशा कंटाळवाण्या वाटणाऱ्या रूपात जरी चितारत असली, तरी ती निश्चितपणे समाजलक्ष्यी कादंबरी आहे. ती वास्तववादी आहेच आहे, पण समाजशास्त्रीय नाही. दुसऱ्या बाजूने तिच्यातून जुन्या 'सत्यकथा'संप्रदायातल्या मानसशास्त्रीय अतिवास्तववादाची रोम्यांटिक टिकटिकही ऐकू येत नाही. तिला वेगळ्या प्रकारची अतिवास्तववादी कदाचित म्हणता येऊ शकेल - मानवी भावभावनांच्या, विचारविकारांच्या बारीकबारीक तपशीलातून वर्षानुवर्षे तीच (आर्थिक सुरक्षिततेची) स्वप्नं पाहणाऱ्या समाजाच्या बिनरोम्यांटिक सामूहिक अस्तित्वाचं डीसेक्शन मनोहर करताना दिसतात.

त्यातून ह्या संकल्पनांचा रूढ सामाजिक सांकेतिक आशय पातळ होतो आणि नव्या दृष्टीनं आपण त्यांच्याकडे पाहू लागतो. ते एक स्थिर बिंदू आणि एक चलत बिंदू अश्या दोन कॉर्डीनेटसवर व्यक्तीला पकडतात; स्थिरता आणि चलतता यांची एकमेकांशी चालणारी समीकरणं पाहतात. (मागचा मुद्दा : व्यक्तीला स्थिर म्हणून न पाहता चलत स्वरूपात म्हणजे 'बीकमिंग' असं पाहणं.) सामाजिक संकेतानुसार निर्माण होणारे गट न पाहता, शोधक माणूस आणि सामाजिक माणूस किंवा हिंसकता कमी किंवा जास्त असलेले लोक अशा नव्या कोटी पाडतात. 'शोधक माणसाचे मन कसे असते', किंवा 'एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला खेकसत आय लव यू म्हटले तर ते करुण होईल की विनोदी?' ह्या प्रकारच्या असंगत प्रश्नांतून मनोहर आजच्या काळाचं भान देतात. विचारसरण्यांचं बाजारसरणीत रूपांतर होताना, आणि तमाम विश्वाचं वस्तूकरण होताना, लहान लहान मायक्रोजगांचं काय होतंय अशा प्रकारचा मनोहरांचा शोध आहे. लोकप्रियतेची अभिजाततेवरची कुरघोडी, वैचारिकतेला दिलेला नकार ह्या गोष्टींची ते खिल्ली उडवतात. 'कळ'मधली लहानशी मर्डरस्टोरी किंवा विठ्ठलरावांचा खून करून खिंकाळणारी लहान मुलं आणि आम्ही काहीही बोलू आणि बोलू तसं वागणार नाही अशा बेमुर्वतखोरपणाची व्यंगचित्रं नंतरच्या कादंबर्‍यांमध्ये अधिक सूक्ष्म आणि थोडी करुणही होत जातात.

आता शेवटचा एक मुद्दा : श्याम मनोहरांच्या सगळ्या कथनात एका पद्धतीचा शोध दिसतो, तो त्यांच्या अकॅडेमिक ट्रेनिंगशी आणि वैचारिकतेच्या काळजीशी सुसंगतच आहे. पद्धत शोधून काढली पाहिजे असं त्यांच्या पात्रांना वाटत असतं. कशाची पद्धत आहे ही? जीवनाचा शोध घेण्याची! (गटणेची आठवण का होतीए सारखी?) अशा दोन पद्धतींचा उल्लेख ते करतात : विज्ञान आणि अध्यात्म. 'कळ'मधली शास्त्रज्ञांची चरित्रं किंवा विवेकवादाच्या, सिस्टीमच्या अभावाचं चित्रण ह्यांतून मनोहरांचा शास्त्रीयतेचा आग्रह दिसतो. मात्र पुढच्या कादंबर्‍यांमध्ये ते फिक्शन ह्या मेथडकडे वळलेले दिसतात. हे फिक्शन काये?

'खूप लोक आहेत'मधल्या एका लहानशा टिपणात, स्थिती आणि परिस्थितीच्या समीकरणातून मनोहर माणसाला लोकेट करतात (जसं नेमाडे देश आणि जाती ह्या दोन समाजशास्त्रीय बिंदूंवर व्यक्ती पकडतात) :

"ह्या स्थिती आणि परिस्थितीच्या चलनवलनातून अस्तित्व उभं राहतं. ह्यातल्या खाजगीपणाचा निरास करून मग अध्यात्म जीवनाचा शोध घेतं, म्हणून खाजगीपणा म्हणजे 'स्व'ला पकडून ठेवून जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न ललित साहित्य करतं".

"माणूसजात फिक्शन ह्या स्थितीत चालली आहे. सेक्सी स्त्रियांची नावं पेपरात येतात, धार्मिक लोक सत्तास्पर्धेत उतरतात, सुख भोगून ज्ञान मिळवायचं. जीवनात खूप दुक्ख आहे तर वैराग्य नको सुखांचे प्रकार वाढवायचे. ही फिक्शन स्थिती. फिक्शन युगात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निर्मिती. अनेकानेक परस्परविरोधी कॅटेगरीज एकमेकांत मिसळताहेत आणि नीट विभाजन अशक्य होतंय..."

हरिश्चंद्र थोरातांनी श्याम मनोहरांच्या लिखाणातल्या एका महत्त्वाच्या धाग्याकडे निर्देश केलाय : जे. कृष्णमूर्तीचं तत्वज्ञान. कृष्णमूर्तींच्या मते, जगाचं आणि अस्तित्वाचं भान माणसाला ज्याद्वारे होतं, ते मानवी मन निरनिराळ्या संस्कारांच्या (कंडीशनिंग) प्रभावातून रचलेलं असतं. आपण राहत असलेल्या जगातल्या वस्तू, निसर्ग, माणसे, त्यांचे परस्पर संबंध ह्या सगळ्याचा अर्थ आपल्याला दिलेला असतो (गिव्हन); ह्या संकेतशास्त्रानुसार माणसं वागत असतात. त्यामूळे मानवी वर्तन हे प्रत्यक्षात घडण्याआधीच नियमित (कंट्रोल्ड) झालेलं असतं. केवळ वर्तमानच भूतकाळाने नियमित होतो असं नव्हे, तर सगळ्या भविष्याचं नियमनसुद्धा आधीच झालेलं असतं. (उद्या सकाळी मी अमुक वाजता अमुक कृती करेन असं भविष्याचं आलेखन आपण करत असतो.) खरं तर काळ नावाच्या एका आभासी संकल्पनेमुळे ह्या प्रकारची गफलत माणूस करत असतो. केवळ वर्तमानात राहून वर्तमानाला संपूर्ण स्वछ आणि निखळपणे पाहणे हे कृष्णामूर्तींना अभिप्रेत आहे. शिवाय कृष्णमूर्ती 'स्व' च्या संकल्पनेला अनेक नात्यांच्या संदर्भात पाहतात; त्यामुळे, असणं म्हणजे नात्यांत उभं असणं अशी व्याख्या ते करतात.

थोरातांनी नोंदवलेला मनोहरांच्या कादंबरीवरचा जे. कृष्णामूर्तींचा प्रभाव दिसतोच, पण त्यातून उद्भवणारी (उद्भवू शकणारी) मुक्तीची आंच मात्र मनोहरांच्या लिखाणात नाही (ही मुक्ती आध्यात्मिक नाही; जर सगळं अस्तित्वच सामाजिक संकेतांनी आणि संस्कारांनी बद्ध झालंय आणि आपण आपल्या काळाच्या खोट्या संकल्पनांनी नियमित झालेलो असू, तर त्यातून मुक्त कसं व्हायचं?) ह्याउलट मला मनोहरांवर उत्तरआधुनिक तत्वज्ञानाचा प्रभाव अधिक वाटतो. (ज्यात व्यक्तीला बीकमिंग रूपात पाहणं, आधुनिकतेच्या निश्चिततेचा अंत, नैतिक आणि सांस्कृतिक गोंधळ अशा ज्ञानशास्त्रीय (एपिस्टेमॉलॉजीकल) तत्त्वांचा समावेश होऊ शकेल.) उदाहरणार्थ, ह्या वरच्या उद्धृतांमध्ये दिसतंय तसे श्याम मनोहर इथे निश्चित अशा आधुनिकोत्तर भूमिकेत शिरतात. निरनिराळी पात्रं निर्माण करून त्यांच्याद्वारे स्वतःला त्रयस्थपणे पाहण्याचा (आध्यात्मिक वाटावा असा – साक्षीभाव, विचारांचा निरास वगैरे) उद्योग श्याम मनोहर फिक्शनच्या वाटे करताहेत.

गुपचूप होणारे विचार आणि केला जाणारा विचार… दोन्ही एकत्र बघायचेय.

उत्सुकतेने मी झोपलो.

श्याम मनोहरांचा फिक्शनचा सिद्धांत अशा प्रकारे आधुनिक निश्चिततेला नकार देत, उत्तरआधुनिक असंगतीला कवटाळत, व्यक्तित्वाच्या असंख्य तुकड्यांतून एक तटस्थ साक्षीभावाचा शोध घेतोय.

आपण उत्सुक आहोतच. जागेही आहोत.

field_vote: 
4.6
Your rating: None Average: 4.6 (5 votes)

प्रतिक्रिया

लेख सुंदरच आहे. खूप उत्कटतेने व खूप अभ्यास करुन लिहीलेला आहे. अतिशय आवडला.
____

'कळ'मध्ये एक मुलगा रस्त्यानं जाताना एका भिकारीण मुलीला पाहून तिच्याकडे आकर्षित होतो. मग त्याला स्वतःबद्दल शिसारी येते की मला एका भिकारणीबद्दल वासना व्हावी नं! मग त्याचं तंद्रीत तो पुढे चालत असताना त्याला वाटू लागतं की भिकारणीबद्दल आकर्षण वाटलं ह्याची मला लाज वाटतीए, म्हणजे मी तिला माझ्यापेक्षा कमी लेखतो. छे! छे!

आजच भर पावसात एक अवाढव्य पिक-अप झूम झूम करत अतिवेगाने समोरुन गेली. मी मनात म्हटलं "अरे मूर्खा माझ्या मुली आणि नवर्‍यासमोर जाऊ नकोस. बाकी काहीही कर"
मग मनात आलं ती शेजारची मैत्रिण तिचं काय?
मग एक मन म्हणालं "हां तिच्यापाशी ही जाऊ नको. मला राईड मिळणार नाही"
अन मग इतकं कमालीचं गुन्हेगार वाटलं Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी श्याम मनोहरांच्याच शैलीत भारतीय उत्तरआधुनिक प्रक्रियेवर भाष्य करण्यासाठी एका मराठी लेखकाचं मायक्रोविश्व एकक घेऊन लिहिलेला चिंतनस्वरूप लेख आवडला.

कुटुंबाची चिकित्सा नवीन नाहीच. उलट ती तशी सौम्यच आहे, पण मनोहरांचा उद्देश इथे कुटुंबसंस्थेवर सामाजिक टीका लिहिण्याचा नसून समाज अधिक शोधक कसा होऊ शकेल अशा प्रकारच्या अमूर्त प्रश्नांचा विचार करण्याचा आहे. त्याची चिकित्सा ते कुटुंबासारख्या मायक्रोविश्वाचं एकक घेऊन करतात.

यात बरंच काही आलं आहे. लेखात अनेक संकल्पनांचा उल्लेख आला आहे आणि भाषाही अचूक पण म्हणून बरीच जड आहे तरीही त्यात प्रत्यक्ष बोलण्यात जाणवते तशी सहजता असल्याने कुठेकुठे बोलण्याच्या अनुषंगात आलेल्या टिप्पण्यांमधेही विस्तारित भाष्याच्या आणि प्रदीर्घ लेखाच्या शक्यता आहेत असेही जाणवले.
मनोहरांच्या लेखनाबाबत मला असं जाणवतं की त्यात वरवर वाटणारा तुच्छतावाद हा खरंतर कठोर आत्मपरिक्षण आहे, त्यातला उपहास आपल्यातल्याच विसंगती तपासणारा आहे आणि त्यामुळे त्यांचा दृष्टीकोन एलिटिस्ट वाटत नाही आणि प्रचारकीही वाटत नाही. उपहास करतानाच, खोलवर जाऊन कारणमिमांसा तपासणारी, किंचित खट्याळ पण तरी गंभीर शैली अतिशय आवडते. एका आवडत्या लेखकाबद्दल नव्वदोत्तरी दृष्टीकोनातून लिहिलेल्या मार्मिक लेखनाबद्दल अनेक आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फिक्शन फारसं वाचायला आवडत नाही. डॉ. हरिश्चद्र थोरातांचं नाव या दिवाळी अंकात दोन ठिकाणी वाचलं. जालावर शोधल्यावर त्यांचं 'साहित्याचे संदर्भ' हे पुस्तक वाचावसं वाटतयं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0