Skip to main content

ऋणनिर्देश

ऋणनिर्देश.

ऋणनिर्देश

नमस्कार,

'ऐसी अक्षरे' दिवाळी अंकाची ही चौथी आवृत्ती. पहिल्या तीन अंकांप्रमाणेच, हाही अंक आमच्या वाचकांच्या हाती सुपुर्द करताना मनात आनंदाची भावना आहे. मागील तीन अंकांनंतर दिवाळी अंकाबद्दलच्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या, त्यांची जबाबदारी ओळखून आम्ही यंदाही त्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. वाचकांना आमच्या प्रयत्नांमागचा प्रामाणिकपणा जाणवेल अशी अपेक्षा आहे.

गेल्या तीन वर्षांत अंकाची व्याप्ती जसजशी क्रमाक्रमाने वाढत गेली, तसतशी नव्या लोकांनी या प्रकल्पात सामील होण्याची गरज अधिकाधिक जाणवत गेली. सुदैवाने आम्हांला यंदाच्या वेळी संपादनाकरता राजेश घासकडवी, ३_१४ विक्षिप्त अदिती, चिंतातुर जंतू, ऋषिकेश यांच्याबरोबरच मेघना भुस्कुटे, अमुक, जयदीप चिपलकट्टी यांच्यासारख्या बहुश्रुत, विविध विषयांमध्ये गती असणार्‍या लोकांची साथ मिळाली. गेल्या तीन वर्षांप्रमाणे यंदाही ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी संपूर्ण अंकाची तांत्रिक बाजू समर्थपणे पार पाडली. त्यांच्याशिवाय हा अंक योग्य वेळी आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य त्या स्वरूपात प्रकाशित करणे प्रायः अशक्य होते. संदीप देशपांडे या आमच्या गुणी मित्राकडून आमच्या यंदाच्या अंकाला साजेसे मुखपृष्ठ आणि अन्य व्हिज्युअल्स मिळाली याचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. व्याकरण आणि प्रमाणलेखन यांबाबत अंक बिनचूक व्हावा म्हणून केलेल्या कामात राजेश घासकडवी, ३_१४ विक्षिप्त अदिती, मेघना भुस्कुटे, अमुक, जयदीप चिपलकट्टी व नंदन यांनी केलेल्या मुद्रितशोधनाचा मोठा हात आहे. त्यांचे याबाबत विशेष आभार.

यंदाची मध्यवर्ती कल्पना ‘नव्वदोत्तरी घडामोडी' अशी होती. निखिल देशपांडे हा या कल्पनेचा जनक. विषय ठरल्यानंतर, अगदी थोडक्या कालावधीत या विषयासंदर्भात यथोचित लिखाण करणार्‍या लेखकांचे आभार. प्रस्तुत अंकातून या विषयाचा आढावा घेतला जाताना त्यातून वाचकांचे रंजनही होईल अशी आशा वाटते. त्याचबरोबर या मध्यवर्ती संकल्पनेपलिकडचे लिखाण - विनोदी, ललित, संकीर्ण - वाचकांच्या पसंतीस उतरावे अशीही इच्छा आहे.

संपूर्ण दिवाळी अंक एकाच वेळी प्रकाशित न करता क्रमाक्रमाने प्रकाशित करत जाण्याच्या आमच्या निर्णयाचे गेली दोन वर्षे एकंदरीत चांगले स्वागत झाले होते. तीच प्रक्रिया आम्ही यंदाही अनुसरत आहोत. या निर्णयामागची कारणमीमांसा नव्या वाचकांनाही पटेल असे आम्हांला वाटते.

विशेषांक प्रकार

अॅरागॉर्न Thu, 05/11/2015 - 09:48

छापील दिवाळी अंक वाचणं कधीच सोडून दिले आहे कारण बहुतेक वेळा त्यातील अनुक्रमणिका पाहूनच अंकात काय असेल त्याची कल्पना येते. ऑनलाईन अंक वाचायला सोपे जातातच, शिवाय अंक टप्प्याटप्प्याने प्रकाशित करणे ही अभिनव कल्पना फारच चांगली आहे. अंक मांडणी, कंटेंट इ. मध्ये सुरेख झाला आहे. सविस्तर प्रतिसाद सवडीने.

राही Tue, 10/11/2015 - 11:56

अंक छानच जमलाय. अजून पूर्ण वाचून झालेला नाही.
सकौतुक धन्यवाद.

मारवा Tue, 10/11/2015 - 13:53

संपादकांनी एक चांगली वैचारीक मेजवानी दिली त्यासाठी त्यांच्या कठोर परीश्रमांसाठी अनेक अनेक धन्यवाद.
काही ठीकाणी मात्र लेख निवडतांना पुरेसा क्वालिटी कंट्रोल राहीला नाही हे देखील आवर्जुन नमुद करतो.
किंवा व्यक्तिगत आवड निवडीवर भारी पडली असावी असे वाटले.
बाकी अंक जबरदस्त सुंदर !
काही लेख तर कमालीची आश्चर्यजनक उंची गाठलेले.
या अंकाच्या मागे असलेल्या सर्व टीमला अनेक अनेक धन्यवाद.

अतिशहाणा Tue, 10/11/2015 - 20:38

In reply to by मारवा

काही मोजक्या सुमार लेखांनी अपेक्षाभंग केला. (उदा. मन्या जोशीच्या कविता किंवा अंकाच्या जाहिरातीचा लेख).
मात्र तरीही अंक अत्यंत सुंदर झाला आहे. विशेषतः फुलबाज्या, पणत्या, फटाके, फराळाचे पदार्थ वगैरे टीपिकल दिवाळी बटबटीतपणा वगळल्याने एक वेगळा अंक वाचत असल्याची भावना झाली आहे. काही लेख तर अतिशय दर्जेदार वाटले. संबंधितांना अनेक धन्यवाद व दिवाळी शुभेच्छा

आदूबाळ Wed, 11/11/2015 - 00:15

In reply to by अतिशहाणा

मन्या जोशीच्या कवितांबद्दल सहमत आहे. नक्की काय खाऊन या कविता लिहिल्या आहेत याविषयी एक कविता लिहिण्याचं बोच्यात डोक्यात आलं आहे.