तमिळनाडूची 'अम्मा' (आणि अम्माचा तमिळनाडू)

तमिळनाडूची 'अम्मा' (आणि अम्माचा तमिळनाडू)

तमिळनाडूची 'अम्मा' (आणि अम्माचा तमिळनाडू)

लेखक - प्रभाकर नानावटी

तमिळनाडूची अम्मा

८ मे २०१५ रोजी तमिळनाडूची सर्वेसर्वा, जयललिता 'अम्मा'च्या कोर्टकेसचा निकाल येणार होता. संपूर्ण तमिळनाडू निकालाची आतुरतेने वाट पहात होता. अम्माच्या अनुपस्थितीतील काळजीवाहू मंत्रिमंडळातील एकूण एक मंत्री (आणि त्यांचा लवाजमा) चेन्नई येथील पेरुमाळ मंदिरात जमा झाले होते. पांढरा शर्ट व पांढरी लुंगी या युनिफार्ममध्ये seniority अनुसार गर्भगृहापाशी उभे होते. "परमेश्वरा, आम्ही तुझ्याकडे न्यायाची भीक मागत आहोत. अंतिम विजय न्यायाचाच आहे", असे तमिळमध्ये तिथला अर्चक जोरजोराने ओरडत होता. "तमिळनाडू समृद्धीच्या उंबरठ्यावर उभा आहे. परंतु काही दुष्ट शक्ती तिला थोपवून धरत आहेत. अम्मा पुन्हा एकदा कामाला लागू दे. आमच्या राज्याची भरभराट होईल. तिची तुरुंगात रवानगी करणाऱ्या विरोधकांचा सत्यानाश होऊ दे. विरोधकांना शिक्षा होऊ दे. वाईट लोक जेलमध्ये सडू दे. नाही तर नरकात जाऊ दे... " अशा अर्थाचे काहीतरी पुजारी बडबडत होता. सगळे मंत्री भक्तिभावाने ऐकत होते व माना डोलावत होते. प्रत्येक नेत्याच्या अंगावर, दृश्यभागात कुठे ना कुठे तरी अम्माचे चित्र गोंदलेले होते. शिक्षणमंत्र्याच्या दंडावर अम्माचा गुबगुबीत चेहरा ठळकपणे उठून दिसत होता. त्याच्याच शेजारच्या एका सनदी अधिकाऱ्याने 'अम्मा चिरायू होवो' असे गोंदवून घेतलेले होते. त्याच्या चेहऱ्यावर भक्तिभाव ओसंडून वाहत होता.

अम्मा म्हणजे आई. ही आता जयललिताची उपाधी झाली आहे. संपूर्ण तमिळनाडू राज्य जयललिताला 'अम्मा' याच नावाने ओळखते. जयललिता जयराम ही 'ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम' (एआयएडिएमके) या पक्षाची अध्यक्ष आणि तमिळनाडूची मुख्यमंत्री. वैध उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती (disproportionate income) तिच्याकडे सापडल्यामुळे तिच्यावर खटला भरण्यात आला होता व कोर्टाने तिला चार वर्षांची शिक्षा सुनावली. तिला मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. तिच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा ६६ कोटी रुपये जास्त मिळाल्यामुळे भ्रष्टाचार झाला आहे हे कोर्टाने ग्राह्य मानून शिक्षा सुनावली होती. तिच्या राहत्या बंगल्यातील छाप्यात १०५०० महागड्या साड्या, ७५० चप्पल/बुटांचे जोड आणि ३ किलो सोन्याचे दागिने सापडल्याचा दावा करण्यात आला होता. छाप्याची बातमी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकली. खरे पाहता खाबूगिरी करून गडगंज संपत्ती कमावणाऱ्या उत्तर भारतीय सरकारी बाबूंच्या भ्रष्टाचाराच्या तुलनेत हा भ्रष्टाचार अगदीच क्षुल्लक म्हणता येईल.

शिक्षा झाली व तिला तुरुंगात ठेवण्यात आले. वरच्या कोर्टात तिने अपील केले. नेहमीप्रमाणे काही दिवसात ती जामिनावर सुटली होती. साक्षीदारांची फोडाफोड, धमकी, मारामारी, खून, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न इत्यादीमुळे तिच्यावरील खटला कर्नाटकात चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. सप्टेंबर २०१५च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वरच्या कोर्टाचा निकाल न लागल्यास पुढच्या निवडणुकीत तिला उभे राहता आले नसते. म्हणूनच लवकरात लवकर निकाल लागावा यासाठी ती (व तिचे भक्तगण) परमेश्वराला साकडे घालत होते.

तमिळनाडूची अम्मा

शिक्षा सुनावल्याच्या दिवसापासून 'अम्मा'च्या पक्षकार्यकर्त्यांचा उद्रेक ओसंडून वाहत होता. बसेसवर दगडफेक, ठिकठिकाणी जाळपोळ यांना ऊत आला होता. चेन्नईच्या जवळपास कार्यकर्ते हायवेवर आडवे झोपून, बस ड्रायव्हरला 'बस आमच्या अंगावर घाला' म्हणून ओरडत होते. 'अम्मा जेलमध्ये असताना आम्ही जिवंत राहून काय उपयोग?' अण्णा-डीएमके पक्षाच्या निवेदनानुसार अम्मावरील प्रेमामुळे स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या करून घेणाऱ्यांची संख्या शेकड्यांत भरेल.अशा प्रकारचा, आमच्या अंगावरून 'बस जाऊ दे' असा आणखी लोकोद्रेक कुठेही बघायला मिळणार नाही. शेजारच्या केरळात कधीच नाही. यामागचे कारण कदाचित चित्रपट-उन्माद (movie mania) असण्याची शक्यता आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी अम्मा तिच्या तरुणपणात त्या काळची लोकप्रिय नायिका होती. शंभरेक चित्रपटात तिने काम केले आहे. मरुधुर गोपालन् रामचंद्रन – एमजीआर – जयललिताचा गुरू व चित्रपटात तिच्याबरोबरचा हीरो होता. १९८७मध्ये त्याचा मृत्यू झाला. तोपर्यंत त्याने तमिळनाडूवर अधिराज्य केले, सत्ता गाजवली. आताच्या राजकीय पटलावरील शत्रू असलेला ९२ वर्षाचा करुणानिधी, हा एकेकाळी एमजीआरचा जीवश्चकंठश्च मित्र होता. त्याने एमजीआरच्या चित्रपटासाठी कथा-संवाद लिहिले. त्याच्या संवादांना व एमजीआर ज्या प्रकारे संवादफेक करत होता, त्याला सर्वसामान्य प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत होता. एमजीआरच्या मृत्यूनंतर तमिळनाडूत आलटून पालटून अम्मा व करुणानिधी सत्तेवर असतात. अण्णादुराई यांनी स्थापन केलेल्या मूळ डीएमके पक्षाची दोन शकले झाली आणि एआयएडीएमके पक्षाची सर्वेसर्वा अम्मा झाली. डीएमके व एआयएडीएमके, या दोन्ही पक्षांच्या ध्येयधोरणांत किंचितही फरक नाही. तरीसुद्धा त्या राज्यात एखादा तिसरा पक्ष या दोन्ही पक्षांपुढे तग धरू शकत नाही, हेही तितकेच खरे!

भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शिक्षा सुनावल्यानंतर जयललिताचे वकील वरच्या कोर्टात अपील करण्याच्या तयारीत होते. त्या दोन–तीन दिवसांत तिचे 'भक्त' मंदिर, मशीद, चर्चमध्ये प्रार्थना करत होते. २०१६च्या राज्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत पात्र व्हायचे असल्यास अम्माला कुठल्याही प्रकारची शिक्षा होणे धोक्याचे ठरले असते. शिक्षा झाल्यास पुढील दहा वर्षे ती निवडणूक लढवू शकली नसती.

मदुराईच्या मीनाक्षी मंदिरात पक्ष कार्यकर्त्यांनी १००८ नारळ फोडून देवीला वेठीस धरले होते. कोईमतूर येथे २००८ महिला डोक्यावर दुधाचे हंडे घेऊन देवीच्या दर्शनाला गेल्या व 'अम्मा'ला शिक्षा होऊ नये म्हणून नवस बोलल्या. चेल्लपिल्लाईच्या रायर देवळात ५०८ स्त्रियांनी दिवा लावून परमेश्वराची मनोभावे पूजा केली. संपूर्ण देऊळ अगरबत्ती व दिव्याच्या धुराने भरले होते. त्यात भर म्हणून देवळातल्या घंटांचा आवाज घुमत होता. जयललिताच्याबरोबर काढलेल्या स्थानिक राजकीय नेत्यांचे फोटो फ्लेक्सच्या होर्डिंग्समधून शहरभर दिसत होते.

न्यायालयात तिच्यावरील सर्व आरोप खोटे ठरले व तिची बाइज्जत सुटका झाली. एकच जल्लोष झाला. पक्षकार्यकर्त्यांच्या या नवस-प्रार्थनेमागे दोन उद्देश स्पष्टपणे दिसत होते; परमेश्वराच्या कृपेने जयललिताची सुटका व जयललिताची त्यांच्यावर कृपादृष्टी. जयललिताचे लक्ष वेधण्यासाठी असे काही तरी दाखवून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. तमिळनाडूच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलात तरी 'अम्मा'चा गुबगुबीत चेहरा तुम्हाला पाहावयास मिळेल. दोन हनुवटी असलेल्या मोनालिसासारखी दिसणारी छबी आपला पाठलाग करत राहते. शहराच्या ठिकाणी तर प्रत्येक छोटे-मोठे कार्यकर्ते 'अम्मा'बरोबर काढलेल्या फोटोंचे फ्लेक्सबोर्ड लावत असतात. शहराचे विद्रूपीकरण होत आहे याच्याशी त्यांना कर्तव्य नसते. आम्ही अम्माला कसे मानतो, तिच्याबद्दल आम्हाला किती आदर आहे, तिच्या किती जवळचे आहोत; हेच त्यांना पटवायचे असते. तिच्याबरोबरच्या जवळीकीमुळे त्यांच्यावर मतांचा वर्षाव होणार, याची त्यांना पक्की खात्री असते. विद्यार्थ्यांना मोफत दिलेल्या लॅपटॉपच्या स्क्रीनसेव्हरवरही तिचाच चेहरा चिकटवलेला असतो. डेस्कटॉपचीही तीच तऱ्हा. ठिकठिकाणी असलेल्या 'अम्मा' फार्मसीमध्ये स्वस्तात महागडी औषधं मिळण्याची सोय 'अम्मा'ने केली आहे. 'अम्मा' कँटीनमध्ये फक्त पाच रुपयात जेवण! अजून काही दिवसांतच ठिकठिकाणी पाच रुपयांत चित्रपट दाखविणाऱ्या स्वस्त अम्मा चित्रपटगृहांची योजना कार्यान्वित झाल्यास नवल वाटून घेण्याचे कारण नाही; कारण तमिळनाडूमध्ये काहीही घडू शकते. काही चिकित्सकांना तिचा हा चेहरा एखाद्या डिक्टेटरच्या व्यंगचित्रासारखा दिसत असल्यामुळे, ते थोडीशी भुणभूण करतात. एवढे सोडल्यास 'अम्मा'च्या एकाधिकारशाहीला कुणापासूनही धोका नाही.

तमिळनाडूची अम्मा

खरे पाहता चेन्नई, तंजावूर, मदुराई, रामेश्वरम ही शहरं बुद्धिजीवी वर्गांची, कुणाच्या अध्यात ना मध्यात न पडणाऱ्या सुसंस्कृत नागरिकांची शहरे म्हणून ओळखली जातात. त्यामुळेच 'अम्मा'ची ही टोकाची व्यक्तिपूजा त्यांना अस्वस्थ करते. चेन्नई हे राजधानीचे शहर तमिळ चित्रपटउद्योगाची नगरी असून मुंबईच्या हिंदी बॉलिवुडनगरीशी त्याची तुलना करता येईल. ब्लॉकबस्टर्स म्हणवून घेण्याच्या लायकीचे व करोडो रुपयांचा गल्ला भरू शकणाऱ्या तमिळ चित्रपटांच्या तुलनेत, हिंदी चित्रपट सुमारच म्हणावे लागतील. रजनीकांतच्या प्रत्येक चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशी त्याचे फॅन्स, एखाद्या देवाच्या मूर्तिपूजेप्रमाणे त्याला दुधाने आंघोळ घालतात; परंतु एमजीआरएवढी प्रसिद्धी त्यालाही मिळत नाही. चित्रपट यशस्वी होण्यासाठीचा सर्व मसाला – व्हिलनबरोबरची स्टंटबाजी, हिरॉईनबरोबरचे गाणे, प्रेम सादर करण्याची स्टाइल, गावंढळपणा, शहरीपणा, विनोद, संवादफेक, इत्यादी – ठासून सर्व आघाड्यांवर एमजीआरचे प्रभुत्व होते. विशेषकरून जयललिताबरोबरच्या प्रेमप्रकरणाच्या दृश्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत होता.

१९४८ साली जन्मलेली जयललिता एमजीआरच्या सुवर्णकाळात वाढली. ती दोन वर्षांची असताना तिचे वडील वारले. तिची आई, संध्या, तमिळ चित्रपटांत नगण्य भूमिका करून पोटापुरते पैसे कमावत होती. चित्रपटक्षेत्रात असल्यामुळे वेळी–अवेळी, रात्री–बेरात्री ती घरी येत असे. त्यामुळे तिच्या एकुलत्या एका मुलीची आबाळ होत असे. जयललिता १६ वर्षांची झाली. एक चांगली नर्तिका म्हणून शेजारी-पाजारी तिची वाहवा करत असत. संध्याची मित्रमंडळी जयललिताला चित्रपटसृष्टीत ओढण्यासाठी प्रयत्न करू लागली. मुळात जयललिताला वकील व्हायचे होते. आईने तिच्या कॉलेजचा प्रवेश आणि शिष्यवृत्ती मिळण्यात खो घातला. कॉलेज सोडून देण्यास भाग पाडले. चित्रपटसृष्टीतील फँटसीच्या गोष्टी सांगून जयललिताचे कान भरले आणि तिला स्टुडिओतील प्रकाशझोतात उभे केले. तिच्या पहिल्याच चित्रपटातील हिरो एमजीआर होता.

तमिळनाडूची अम्मा

एमजीआरचा दरारा एवढा होता की चित्रीकरणच्या सेटवर त्याने पाय ठेवल्या-ठेवल्या झाडून सर्व जण उभे राहून मानवंदना देत असत. त्या दिवशी मात्र जयललिता उठून उभे न राहता पुस्तक वाचण्यात मग्न होती. एमजीआरला आश्चर्य वाटले. दोघांमध्ये ३०-३५ वर्षांचे अंतर असूनसुद्धा चित्रपटाच्या पडद्यावरील त्या दोघांच्या रोमान्सला ऊत आला होता. राग, लोभ, प्रेम, विनोद, सेन्सॉरच्या कचाट्यात न सापडत केलेले लैंगिक चाळे अशा सर्व मालमसाल्याने भरलेल्या या जोडीचा चित्रपट म्हणजे तमिळ प्रेक्षकांना अभूतपूर्व पर्वणी वाटत असे. चित्रपटाच्या प्रसंगात दोघेही हिरव्यागार गवतावर लोळत होते, गात होते, बागडत होते. ओठ जवळ आणून चुंबनाच्या बेतात असतानाच फूल मध्ये आडवे आल्यामुळे, ती पाकळ्या चावणार व तो स्वतःचे ओठ चावणार. एमजीआरचे लग्न जानकी नावाच्या त्या काळच्या नटीशी झालेले असूनसुद्धा जयललिता व एमजीआरच्या प्रणयलीला तेवढ्या गुप्त नव्हत्या. पुढील आठ वर्षांत तिने एमजीआरबरोबर २८ चित्रपट केले.

तमिळनाडूची अम्मा

जयललिता-एमजीआर प्रकरणाच्या या काळात एमजीआर हा 'द्रविड मुनेत्र कळघम' या वंचितांच्या उद्धारासाठीच्या चळवळीचा सक्रिय कार्यकर्ता होता. त्या काळात खालच्या जातीतील तमिळ लोकांची परिस्थिती अगदीच वाईट होती. उच्चवर्णीयांसमोर ते चप्पल घालून फिरू शकत नव्हते, त्यांच्यासमोर सायकलीवर जाण्यास प्रतिबंध होता. या पक्षाचे कार्यकर्ते ब्राह्मणवर्गाच्या या मानसिकतेच्या विरोधात लढत होते. त्यांचा हिंदी बोलणाऱ्या, उत्तरेतून आलेल्या व्यापाऱ्यांवरही राग होता. डीएमके पक्षात चित्रपटसृष्टीतील अनेक जण काम करत होते. त्यामुळे या पक्षाला ग्लॅमर होते व तमिळ चित्रपटातील संवादलेखन करणारा एम. करुणानिधी एमजीआरचा घनिष्ट मित्र होता.

डीएमके पक्षाची स्ट्रॅटेजी अगदीच साधी होती. तमिळ स्वाभिमान रुजवण्यासाठी चित्रपटातील गाणी, शत्रूंची विनोदी अंगाने केलेली टिंगल-निंदा-नालस्ती आणि सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात ठिकठिकाणी लंब्याचौड्या भाषणांच्या माऱ्याच्या जोरावर, हा पक्ष बघता-बघता गरीब-दलितांचा पक्ष झाला. डीएमकेने एमजीआरला स्टारपद बहाल केले व एमजीआर यांनी चित्रपटाच्या माध्यमातून स्वतःच्या करिश्म्याचा वापर करून डीएमकेला मोठे केले. एमजीआरच बघता-बघता दलितांचा कैवारी झाला. एमजीआरच्या चित्रपटांच्या यशात संवादांचा मोठा वाटा होता. याच उपकाराची परतफेड म्हणून एम. करुणानिधीला प्रमुखपद मिळवून देण्यात एमजीआरने प्रयत्न केले.

या दोघांची जोडी चांगलीच जमली होती; एक जण सुपरस्टार व दुसरा संवादलेखक. पांढरा शर्ट, पांढरी स्वच्छ लुंगी, डोळ्यावर काळा चष्मा व ओठावर कायमचे कोरलेले हास्य यांच्या जोरावर त्यांच्या पक्षाने सत्ता मिळवली. परंतु सत्तेत आल्यानंतर दोस्तीला ओहोटी लागली. १९७२मध्ये एमजीआर यांनी डीएमके पक्षातून बाहेर पडून ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. त्यामुळे मूळ डीएमके पक्षातील चित्रपटाचे ग्लॅमर बघताबघता नष्ट झाले.

'आमच्याच जमिनीवर किती दिवस तुम्ही आम्हाला मूर्ख ठरवणार आहात?' हे या नवीन पक्षाचे घोषवाक्य होते. पूर्ण तमिळनाडूतील त्यांच्या चित्रपटांचे फॅनक्लब्स त्यांच्या पक्षाची ऑफिसेस म्हणून कार्यरत झाले. १९७७मध्ये या पक्षाच्या हातात सत्ता आली. १९७७, १९८० व १९८४च्या निवडणुका अण्णा-डीएमके पक्षाने जिंकल्या आणि एमजीआर यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सतत १२ वर्षे – त्यांच्या मृत्यूपर्यंत – सांभाळली. त्यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेली, शाळेतल्या मुला-मुलींसाठीची फुकट सकस आहार योजना यशस्वीरीत्या राबवली. श्रीमंतांना व उच्चवर्णीयांना अडचणीची ठरणारी ध्येयधोरणं व पोलिसी अतिरेक, या गोष्टी असूनसुद्धा त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर व चित्रपटात दाखवल्याप्रमाणे, औदार्याच्या काही तुरळक उदाहरणांच्या जोरावर पक्षप्रतिमा उंचावली. खेड्यापाड्यांतील गोरगरीबांना ते अगदी जवळचे वाटू लागले. शेवटच्या निवडणुकीपर्यंत त्यांना लोकांनी निवडून दिले.

त्यांच्या सत्तेच्या काळात, एमजीआरच्या आग्रहामुळे एआयएडिएमके पक्षात जयललिता सामील झाली. खरे पाहता तिला राजकारणाचा तिटकारा होता. ती जन्माने ब्राह्मण असल्यामुळे या ब्राह्मणद्वेष्ट्या पक्षातील तिचा प्रवेश अनपेक्षित होता. परंतु तिच्याकडे उपजतच नेतृत्वगुण होते. तिचे सुंदर, मादक रूप; हजरजबाबी चातुर्य आणि हिंदी व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यामुळे पक्षातर्फे ती खासदार म्हणून निवडणूक जिंकली व दिल्लीमध्ये मिरवू लागली. एमजीआरच्या आतल्या गोटातील कार्यकर्ते अस्वस्थ होत होते. ती डोईजड होऊ नये म्हणून इतर कार्यकर्त्यांनी भरपूर प्रयत्नही केले.

२४ डिसेंबर १९८७ रोजी एमजीआरचा मृत्यू झाला, आणि त्याच दिवसापासून जयललिता तिची महत्त्वाकांक्षा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे व्यक्त करत आग्रहाने मांडू लागली. एमजीआरचा मृतदेह शोकाकुल जनतेसमोर अंत्यदर्शनासाठी ठेवलेला असताना सर्व कॅमेऱ्यांसमोर आपला चेहरा कायम दिसावा, या दृष्टीने ती एमजीआरच्या डोक्यापाशी ठाण मांडून बसली होती. एमजीआरची पत्नी, जानकी, हिचा विसर पडावा इतपत कॅमेरे जयललितावर रोखलेले होते. दोन दिवस हा तमाशा चालला होता. प्रेतयात्रेच्या वेळी जयललिता एमजीआरच्या कुटुंबियांसमवेत गाडीत बसण्याच्या प्रयत्नात होती. परंतु एमजीआरच्या नातेवाईकांनी तिला अक्षरशः ढकलून दिल्यामुळे तिचा नाईलाज झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व घडामोडी टीव्ही कॅमेऱ्यासमोर घडत होत्या!

पुढील चार वर्षे ती पक्षातील व पक्षाबाहेरील विरोधकांचा सामना करत होती, संघर्ष करत होती. परंतु तिची महत्त्वाकांक्षा तसूभरही कमी झाली नाही. १९९१ सालात शेवटी ती मुख्यमंत्रीपदी विराजमान झाली. चेन्नईच्या मरीना बीचवर एआयएडिएमके पक्षाचे फाटके–तुटके झेंडे बघायला मिळतात. तेथील मासेमारीवर जगणाऱ्या लोकांशी संवाद साधल्यास 'अम्मा'च्या औदार्याच्या कथा ऐकायला मिळतील. त्सुनामीनंतर पुनर्वसनासाठी तिने केलेल्या प्रयत्नाबद्दल ते सर्व चिरऋणी आहेत. 'जेव्हा अम्मा जेलमध्ये गेली तेव्हा आम्ही सर्व अनाथ झालो. ती आमच्या पोटापाण्याची व्यवस्था करणाऱ्या एका अथांग दर्यासारखी आहे,' एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया. समुद्राकाठी झोपडीत राहणाऱ्या या लोकांची तिच्यावर अफाट श्रद्धा आहे. 'तिने लाच घेतली व भरपूर माया जमवली हे नक्कीच चुकीचे आहे. परंतु आजकाल कोण लाच घेत नाही?' हा त्यांचा प्रतिप्रश्न. 'ती एक बाई आहे म्हणून तिला एवढा त्रास!', त्यातल्याच एका बाईची प्रतिक्रिया.

राजकारणातील प्रारंभीच्या काळात एमजीआरच्या चित्रपटकारकिर्दीमुळे पक्षावरील चित्रपटाचा पगडा दूर करण्याचे काम तिला प्रथम करावे लागले. चित्रपटतारका जेव्हा सार्वजनिक व्यवहारात वावरतात तेव्हा त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले जातात, बदनामी केली जाते; अफवांना ऊत येतो व राजकारणातून पळ काढण्यास दबाव आणला जातो. त्यामुळे तिला आपली चित्रपटातील प्रतिमा पुसायची होती. म्हणूनच ती जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाली तेव्हा अंग संपूर्णपणे झाकण्यासाठी साडीच्या आत चिलखतसदृश कपडे घालू लागली, आणि तिने मतदारांना ताई म्हणून संबोधण्यास सांगितले. दुसऱ्या टर्मच्या वेळी तिने अंगावर चिलखत घालण्याचे सोडून दिले. आता तिला मतदार 'अम्मा' म्हणून ओळखू लागले. ताईच्या ऐवजी 'अम्मा' हे संबोधन फिट बसले आणि मतदारांना एक आई मिळाली.

'अम्मा'ची सत्ता राबविण्याची पद्धत हुबेहूब एमजीआरसारखी आहे. लोकानुनय, एकाधिकारशाही आणि कशातही सहजपणे (व त्यातल्या त्यात कायद्याच्या कचाट्यात) न अडकण्याचं कसब, यामुळे ती अजूनही तग धरून आहे. तिच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या टर्मच्या काळात तिच्या निर्णयाच्या विरोधात भाष्य करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या तोंडावर अॅसिडचा मारा केला गेला. जयललिता मात्र असे काही घडलेच नाही, यावर ठाम होती. 'तुम्ही माझ्याविरोधात काही भाष्य केल्यास तुमच्या सर्व भानगडी जाहीर करेन' अशी धमकी देऊन तिने विरोधकांचे तोंड बंद केले आहे. तिला तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदावर बसलेला तिचा 'चमचा' पन्नीरसेल्वन, ढसाढसा रडत होता. ती बसत असलेल्या खुर्चीवर तो शेवटपर्यंत बसला नाही. रामायणातील भरताप्रमाणे अम्माच्या पादुकांची पूजा तेवढी करायचे राहून गेले असेल! त्या वर्षीच्या अर्थसंकल्पाची कागदपत्रं ठेवलेल्या ब्रीफकेसवर अम्माच्या चेहऱ्याचा फोटो ठळकपणे दिसण्याची व्यवस्था त्याने केली होती. 'पुरुषांच्या वर्चस्वाला आव्हान देऊ शकणारी स्त्री' म्हणून कदाचित तमिळ स्त्रिया तिला मत देत असाव्यात, असा एक अंदाज वर्तविला जातो.

तमिळनाडूची अम्मा

या सर्व गोष्टी वाचत असताना कदाचित तमिळनाडू हे एक मागासलेले, अराजकतेने ग्रासलेले राज्य आहे, असे वाटत असेल. परंतु तसे अजिबात नाही. Human Development Index च्या अनुसार तमिळनाडू आठव्या तर महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे. तमिळ भाषकांच्या द्रविड संस्कृतीचा इतिहास इ‌‌.स. पू २००० सालापर्यंत जातो. येथील चोळ, चेर, पांड्य या राजघराण्यांनी इ‌‌.स. ६०० पासून १६५०पर्यंत तमिळ प्रदेशावर राज्य केले. आपल्या राज्याच्या सीमा व संस्कृती श्रीलंका, जावा, सुमात्रा इत्यादी देशांपर्यंत नेल्या. या राज्याची शिल्पकला, साहित्य, कर्नाटक संगीत जगभर प्रसिद्ध आहे. चांगल्यापैकी सत्ता राबवत असलेले एक उत्तम राज्य, अशी पावती देता येईल, इतपत येथील प्रशासनव्यवस्था चांगली आहे. अमर्त्य सेन यांच्या An Uncertain Glory या पुस्तकात (पा. क्र. २११ – २२०) दिलेल्या आकडेवारीची महाराष्ट्राबरोबर तुलना केल्यास, तमिळनाडू हे मागासलेले राज्य नाही हे लक्षात येईल. माणशी सरासरी उत्पन्न, जन्म-मृत्यूचा दर, कुटुंबनियोजन, साक्षरता व शिक्षण, शाळेतील हजेरीपट, शाळेतील सोयीसुविधा, राज्यातील स्त्री–पुरुष प्रमाण, सार्वजनिक आरोग्य, बालकांचे आरोग्य, शौचालय, पिण्याचे पाणी, वीज, मोबाइल, दुचाकी, टीव्ही, निवडणुकीत जनतेचा सहभाग इत्यादी सर्व आघाड्यांवर तमिळनाडू महाराष्ट्राच्या बरोबरीने किंवा काही बाबतीत महाराष्ट्राच्या दोन पावलं पुढेच आहे. या पुस्तकात तमिळनाडूची प्रशासकीय व्यवस्था, कल्याणकारी उपक्रम व सार्वजनिक सेवांचा लाभ तळागाळापर्यंत चांगल्या प्रकारे पोचवणारे राज्य, म्हणून उल्लेख केला आहे. आलटून पालटून सत्तेवर येणाऱ्या करुणानिधी वा अम्मा यांच्या कालखंडात विकासाची उपेक्षा झाली नाही. चेन्नई शहर 'डेट्रॉइट ऑफ इंडिया' या नावाने ओळखले जाते; कारण सर्वात जास्त कार्सचे उत्पादन तिथे होत आहे. राजकीय अस्तित्वासाठी जे काही करायला हवे, ते सर्व करण्यासाठीचा मुत्सद्दीपणा तिच्यात ठासून भरलेला आहे. मोडके-तोडके शिक्षण असूनसुद्धा प्रशासनातील बारकावे समजून घेणे, ध्येयधोरणांची काटेकोर अंमलबजावणी करणे, कायदेनियम यांबद्दलची इत्थंभूत माहिती व संदर्भ यांचा योग्य वापर करणे इत्यादींवर तिचे प्रभुत्व आहे.

परंतु मतदारांवर तिच्या व्यवस्थापनकौशल्यापेक्षा, ज्या प्रकारे ती प्रत्येक गोष्टीचं ब्रँडिंग करते याचाच प्रभाव जास्त आहे व मतदार त्याचेच कौतुक करतात. २००६च्या निवडणुकीत जयललिताचा कित्ता गिरविल्याप्रमाणे करुणानिधीने घरोघरी फुकट टीव्हीचे आमिष दाखवून निवडणूक जिंकली. वस्तू फुकट वाटण्याचे हे लोण अजूनही जिवंत आहे. २०११ साली अम्मा सत्तेवर आल्यानंतर साड्या, त्यानंतर सीलिंग/टेबल फॅन, तांदूळ, गाय/म्हैस, शेळी, मिक्सर्स, सायकल अशी रांगच लागली. यातील प्रत्येक वस्तूच्या पुढे 'अम्मा' हा ब्रँड ठळकपणे लावलेला आहे; अम्मा मीठ, अम्मा सिमेंट, अम्मा वॉटर फिल्टर इ. इ. काही वेळा ग्रामीण भागातील गरीब गर्भवती स्त्रियांना बाळंतिणीला लागणाऱ्या वस्तू देणे हा स्तुत्य उपक्रम असला, तरी ज्या प्रकारे सार्वजनिक पैसा उधळला जात आहे; त्याबद्दल तिच्या व इतर पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे व उघडपणे त्याची चर्चाही होत आहे. पुढच्या निवडणुकीत कदाचित घरोघरी रेफ्रिजरेटर वा एअर कंडीशनर देणार, असे आश्वासन ती देईलही. परंतु ग्रामीण भागात २४ तास वीजपुरवठा नसल्यामुळे साध्या लोखंडी कपाटावर तिला समाधान मानावे लागेल.

प्रत्येक कल्याणकारी उपक्रमाचे ब्रँडिंग फक्त अम्माच्या नावे होत असल्यामुळे तमिळ भाषकांची ती आई झाली आहे. 'जे काही चांगले घडत आहे ते तिच्यामुळे व तिच्या आग्रहाखातर' हा संदेश घरोघरी पोचविण्यात ती यशस्वी झालेली आहे. तिला शिक्षा झाली तेव्हासुद्धा अनेकांना तिच्या कृतीत काहीच चूक नव्हती, असेच वाटत होते. ६६ कोटींची अफरातफर ही काही फार मोठी रक्कम नाही. (आणि न्यायालयानेही ते मान्य केले आहे.) तमिळनाडूत जे काही घडत असते; ते तद्दन फिल्मी असते, नाट्यमय असते, भावनात्मक असते. मिथकं व अफवांवर विश्वास ठेवून इथले राजकीय व्यवहार चालतात.

हुसेनी नावाचा शिक्षक कराटेपटू, शिल्पकार, तिरंदाज व चित्रपटांत काम करणारा नट आहे. स्वतःचे शिल्पकौशल्य वापरून त्याने जयललिताचा अर्धपुतळा बनविला व त्यासाठी त्याचे व त्याच्या विद्यार्थ्यांचे ११ लिटर रक्त वापरण्यात आले, असा त्याचा दावा होता. तरीसुद्धा 'मी इतरांप्रमाणे स्वतःला जाळून घेण्याइतका मूर्ख नाही. मी सुशिक्षित आहे. येथे करोडो स्त्री-पुरुष व मुलं अम्मावर प्रेम करतात. माझ्यापेक्षाही जास्त प्रेम करतात. परंतु या शिल्पमाध्यमातून मी माझे प्रेम व्यक्त करत आहे.', असे तो सांगत होता.

याचीच पुढची पायरी म्हणजे अम्मासाठी त्याला येशू क्रिस्ताप्रमाणे क्रूसावर खिळे मारून घ्यायचे आहे. त्याच्या विद्यार्थ्यांकडून तळहातावर व तळपायावर ६ इंची खिळे मारून घेण्याच्या तो तयारीत होता. क्रूसावर चढून त्याने एक लंबेचौडे भाषणही ठोकले. भाषणात अम्मा व फक्त अम्मा होते. जयललिताने त्याला असे काही करू नको, म्हणून नाराजी व्यक्त करणारे पत्र लिहिले. हुसेनीला त्या पत्रातील मजकुराचेही कौतुक वाटत होते. आता त्याने ते पत्र फोटोफ्रेममध्ये लावून ठेवलेले आहे. हाता-पायांवरील खिळ्याच्या खुणा बाळगून तो हिंडत फिरत आहे. अशा प्रकारच्या उद्रेकाचे विविध प्रकार अम्माच्या उदात्तीकरणास हातभार लावत असतात.

अम्माच्या एआयएडिएमके पक्षातील कुठल्याही व्यवहारात वैचारिकतेचा लवलेश नसतो; सर्व काही शारीरिक, भावनिक. त्याची सुरुवात चित्रपटातून होते व त्यातील एकमेकांचे संबंध, त्यातून मित्रत्व वा शत्रुत्व, त्यासाठीचा झगडा, मारामारी, दोषारोप, आदर-सत्कार या सर्व गोष्टी फिल्मी स्टाइलमध्ये सादर होतात. शारीरिक लगट असते. त्यांच्या या राजकीय नाट्याच्या पहिल्या अंकानंतरच्या पुढच्या अंकात सामान्य जनतेचा सहभाग असतो. एका प्रकारे रक्ताचे नाते त्यातून व्यक्त होत असते. जुन्या काळच्या चित्रपटातील खलनायक एम. आर. राधाने एकदा एमजीआरवर खरेखुरे पिस्तूल रोखून गोळी मारली. गोळी खांद्यापाशी चाटून गेल्यामुळे एमजीआरचा जीव वाचला. फिल्मी स्टाइलच्या सादरीकरणामुळे त्याचाही इव्हेंट करण्यात आला. एमजीआरला रक्त देण्यासाठी त्याचे चाहते मैलोन्‌मैल रांगेत उभे होते. एमजीआर सुखरूपपणे हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर, त्यांनी बाहेर जमलेल्या त्यांच्या चाहत्यांना 'माझ्या रक्तबांधवांनो' अशी हाक मारली. एमजीआरने एआयएडिएमके पक्षाची स्थापना केल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याला स्वतःच्या दंडावर पार्टीचा झेंडा गोंदवून घेण्याचे आदेश दिले. एमजीआरवरील दृढविश्वासाचे ते प्रतीक होते. हजारो कार्यकर्त्यांनी त्या प्रकारे गोंदवून घेतले. जयललिता मरीना बीचवर आंतरराज्य पाणी वाटपाच्या विरोधात ८० तास उपोषणाला बसली, तेव्हासुद्धा लाखो लोक तिच्याबरोबर उपोषणाला बसले. पक्षात खुट्ट काही झाले तरी स्वतःच्या अंगावर रॉकेल/पेट्रोल ओतून, पेटवून घ्यायला कार्यकर्ते तयार!

पक्षसदस्यांची खरोखरच एवढी भक्ती, एवढा गाढ विश्वास असू शकेल का; याबद्दल अनेकांच्या मनात शंका-कुशंका आहेत. राजकारणाच्या रंगमंचावरील अम्माच्या माकडचाळ्यांना खरोखरच एवढा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद कसा काय मिळू शकतो? खरे पाहता जयललिता असो वा करुणानिधी, येथील राजकीय नेत्यांसमोर दुसरा पर्याय नाही; हीच तर या राज्याची शोकांतिका आहे. त्यामुळे या दोघांपैकी कुणाची तरी हांजी-हांजी करण्याशिवाय गत्यंतरच नाही. म्हणूनच या राज्याची सत्ता एकदा जयललिताकडे व नंतर करुणानिधीकडे, अशी आलटून पालटून जात असते. त्यांच्या प्रतिमा वेगळ्या असल्या तरी कार्यशैली सारखीच असते.

तरीही इथले लोक स्वतःला जाळून घेण्याच्या टोकाला का जातात, हे अजूनही न सुटलेले कोडे आहे. आत्मघातकी कृतीत कुठलेही पारंपरिक शहाणपण नाही; तरीसुद्धा हे घडत आहे. अण्णादुराईच्या मृत्यूनंतर, एमजीआरच्या अपघाताच्या वेळी व त्याच्या मृत्यूनंतर आणि अम्माच्या कारकिर्दीच्या काळात याचा प्रत्यय आला आहे. एका पुढाऱ्याच्या मते पक्षकार्यालयातूनच याला फूस मिळते आणि वरिष्ठ कार्यकर्तेच या दुर्घटना स्टेजवर आणणे मॅनेज करतात. यात उत्स्फूर्तता, भावनावेग, मान्यता असे काहीही नसते. आत्महत्येला प्रेरित करणे इतके सोपे नसते. हे पक्ष अशा प्रसंगी कुठल्याही थराला जाऊ शकतात. पैशाचा वापर, दमदाटी वा ब्लॅकमेल करण्यास हे पक्ष मागे-पुढे पाहणार नाहीत. आत्महत्या करून घेतलेल्या कुटुंबाला पुढील काही पिढ्या खाऊन-पिऊन आरामात सुखी राहण्याएवढे पैसे मिळत असल्यास कुणीही मरायला तयार होतील, हा कयास त्यामागे असेल. एवढेच नव्हे तर आत्महत्या केलेल्यांचे आकडेसुद्धा फुगवून सांगितलेले असतात. उद्रेकाच्या काळात कुणीही कुठल्याही कारणाने मेले तरी अम्मासाठी आत्महत्या करून मेला, या छापाच्या बातम्या प्रसृत केल्या जातात व त्याचबरोबर 'अम्माला फार वाईट वाटले' अशा प्रकारचे निवेदनही छापवून आणलेले असते.

सरकारी जाहिराती म्हणजे या नेत्यांचे एक कुरणच असते. अम्माच्या उदात्तीकरणाच्या गोष्टी अगदी रंगवून सांगितल्या जातात. एका जाहिरातीमध्ये एक जख्ख म्हातारी 'पाऊस नाही, पाणी नाही' म्हणून हळहळत असताना दुसरी एक (फॅशनेबल) तरुणी 'काळजी नको करू. अम्माने लाखो झाडं लावलेली आहेत; आता लवकरच पाऊस येईल' असे सांगते. शेवटी एमजीआरच्या चित्रपटातील 'उद्याचा दिवस आमचा' हे गाणे म्हणत माहितीपटाची सांगता होते.

चेन्नईच्या एका पोलीस निरीक्षकाची तीन बोटं कापलेली दिसत होती. कारण विचारल्यानंतर, अम्माची जेलमधून सुटका होण्यासाठी देवीपुढे बोट कापून घेण्याचा नवस, असे त्याने सांगितले.
"ही गोष्ट अम्माला कळली का?"
"हो, कळली."
"तिने काय केले?"
"मला नोकरीतून काढून टाकले. तरीसुद्धा तिने माझ्या हॉस्पिटलचा पूर्ण खर्च परत दिल्यामुळे मी तिचा ऋणी आहे."
एका आडगावातील खेड्याला अम्मा भेट देणार होती. काही कारणामुळे ती वेळेवर पोचू शकली नाही. हजारोंचा जमाव अस्वस्थ झाला. घोषणा–प्रतिघोषणांना ऊत आला. लोक पांगतील की काय वा वाटेत मोडतोड करतील की काय, अशी भीती स्थानिक नेत्याला वाटू लागली. त्यांनी त्यावेळी एक शक्कल लढवली. स्पीकरवरून जयललिताच्या एका जुन्या चित्रपटातील गाणे ऐकवले. जमाव शांत झाला व सर्वजण अम्माची वाट पाहू लागले.

महाराष्ट्रातसुद्धा असे अनेक स्वयंघोषित बाबा, दादा, आबा, ताई, माई आहेत. परंतु त्यांपैकी एकही अम्माच्या जवळपासही जाऊ शकत नाही. कारण हे आबा, दादा, बाबा फक्त आपली व आपल्या जातभाईंची सोय पाहतात व (अवैध मार्गाने) कमावलेली संपत्ती फक्त आपल्या कुटुंबियांच्या सुखसोयीसाठी वापरतात. त्यामुळे अम्मासारखी व्होट बँक तयार करण्यास ते कमी पडतात.

अशी आहे ही तमिळनाडूची अम्मा व अम्माचा हा तमिळनाडू!

संदर्भः न्यू यॉर्क टाइम्समधील लेख

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

सुरस आणि चमत्कारिक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अगदी हेच मनात आलं होतं लेख वाचून. 'सुरस आणि चमत्कारिक'.

लेखातली मख्खपणे चिमटे काढणारी शैलीही आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अगदी हेच म्हणतो. 'सुरस आणि चमत्कारिक'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

हे अम्मा फॅनडम लटकं नसावं असं मला छोट्याशा अनुभवावरून वाटलं.

एका परीक्षेसाठी २०११ मध्ये चेन्नैला गेलो होतो. मरीना बीच / चेपाकजवळ एका हॉटेलमध्ये राहिलो होतो. तिथलं जेवण तसं बरं होतं, पण आसमंतात कुठेही पानाचं दुकान नव्हतं. बर्‍याच प्रयत्नांती जरा दूरवर ते सापडलं.

पानवाला बिहारी होता (सर्प्राई़ज सर्प्राई़ज). त्याच्या टपरीवर जागा मिळेल तिथे ऑल इंडिया अण्णा द्रमुकचा झेंडा, त्यावर सुपरएंबॉस केलेली अम्मांची औटलाईन वगैरे रीतसर होतं. मला वाटलं, इथे धंदा करायचा असेल तर हे आवश्यक असावं म्हणून त्याने केलंय की काय. तसं त्याला म्हणालो तर त्याने वेगळाच किस्सा सांगितला.

हा बिहारमधून 'जगायला' चेन्नैत आला आणि छोटीमोठी अंगमेहनतीची कामं करत होता. अम्मांचं लहान उद्योजकांना प्रोत्साहन देणारं काहीतरी पॅकेज होतं त्यातून याला सीड कॅपिटल मिळालं आणि त्याने ही टपरी टाकली. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो परप्रांतीय होता तरी त्याला ते अम्मा पॅकेज मिळालं.

"आप के मुल्क में ऐसा होता क्या?" या प्रश्नाला मी सोयिस्कर कल्टी दिली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तमिळनाडूतील केळीच्या पानातील जेवणाबद्दलची ही मनोरंजक माहिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकुणच या मुन्नेत्र कळघमचा परिणाम असा झाला की अय्यर/अय्यंगार मंडळींना पोटापाण्यासाठी तमिळनाडूबाहेर पडावं लागलं, नी त्यामुळे मुंबईत "लुंगी हटाव" ला जोर आला नि शिवसेनेला बळ मिळालं!

अम्मा/करुणानिधी यांचा अशाप्रकारे शिवसेना मोठी करण्यात अप्रत्यक्ष वाटा आहेच Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान आहे लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक लेख. वाचल्यावर आपल्याकडे लोकशाही आहे याचा नेमका अर्थ काय असा प्रश्न पडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दाक्षिणात्यांची ही चित्रपट अभिनेत्यांना डोक्यावर घेण्याची प्रवृत्ती आणि राजकारणात आल्यावर केली जाणारी व्यक्तिपूजा प्रचंड डोक्यात जाते !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खिक्!
मला तर कोणत्याही नेतृत्त्वाची (मग छाती भले ५६इंची का असेना) 'भक्तांनी' अशी केलेली भक्ती डोक्यात जाते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तेही खरच.. पण यांच्या चित्रपटाप्रमाणे व्यक्तिपूजेतही एक बटबटितपणा जाणवतो.. जो या लेखातील सुरस आणि चमत्कारीक गोष्टित नेमका व्यक्त होतोय...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0