जागतिकीकरणामुळे मुळं तुटायची गरज नाही - प्राची दुबळे यांची मुलाखत

आदिवासी संगीत प्राची दुबळे संकल्पना नव्वदोत्तरी

जागतिकीकरणामुळे मुळं तुटायची गरज नाही

- प्राची दुबळे यांच्याशी आदिवासी संगीत आणि अन्य अभ्यासाबद्दल मारलेल्या गप्पा

पुण्यात राहणाऱ्या, 'ललित कला केंद्रा'त शिकवणाऱ्या, 'ऐसी'सदस्या दिलतितली / प्राची दुबळे गेली काही वर्षं आदिवासी संगीतावर संशोधन करत आहेत. दिवाळी अंकाच्या निमित्ताने त्यांच्याशी ऋषिकेश व चिंतातूर जंतु यांनी केलेली बातचीत.

तुम्ही आदिवासी भागात नक्की काय काम करता याबद्दल थोडं सांगाल का? ह्या कामाची सुरुवात कशी व कुठे झाली?​

​हे काम मुद्दाम ठरवून सुरू झालेलं नाही. ​​गणेश देवी हे माझे गुरू​.​ बडोद्याला ​एम. ए​स. विद्यापीठात ते आम्हाला इतर अनेक विषयांबरोबर भारतीय साहित्य​ही शिकवायचे. १९९० पासून​ ​मी त्यांची विद्यार्थिनी. ​त्या काळात 'गद्यपर्व' नावाचं एक नियतकालिक चालायचं. मी ​गुजराती-​मराठी ​दोन्ही ​बोलणारी असल्यामुळे त्या नियतकालिकाच्या भाषांतर​-कार्यशाळांत सर आम्हांला घेऊन ​गेले होते; कारण आम्ही ​काही मुलं ​तीन-चार भाषा बोलणारी​ ​होतो. तेव्हापासूनच, सर हा निराळा विचार करणारा, वेगळाच माणूस आहे; हे आम्हांला माहीत होतं. ​पण ​ते नक्की काय करतात हे समजून घेण्याची फार शक्यता नव्हती, कारण सर स्वतःसुद्धा काहीतरी शोधत होते​ असं वाटायचं​. ​१९९५ मध्ये मी गाणं शिकायला म्हणून पुण्याला आले. नंतर तिथेच माझं शिक्षण, काम सुरू होतं. पुढे ​सरांनी तेजगढला 'आदिवासी अकादमी' सुरू केली. ​माझा त्यांच्याशी संपर्क होता, पण अकादमीत जाणं होत नव्हतं.​ २०१० मध्ये मी तिथे पहिल्यांदा गेले. तिथला अनुभव फारच अद्भुत होता. ती वास्तू, ​कोराज डोंगर, ​छोटाउदेपुरचे भिल्ल आदिवासी, त्यांची जत्रा (हाट हा त्यांचा शब्द), बाजार हे पाहून मला भुरळ पडल्यासारखं झालं. सर त्यांच्या कामात होते​ पण ​त्यांनी मला ​​नारण राठवाला भेट असं सुचवलं. नारण हा ​एक स्वत:च शिकलेला संग्रहालयशास्त्रज्ञ (self-taught museologist) आहे. एतद्देशीय कला, शिल्प, वाद्यं, चित्रं ​ह्यासोबत त्याने आत्तापर्यंत पन्नास हजार फोटो जमा केले आहेत. त्यांचं खुलं ​संग्रहालय त्याने तयार केलं​य​.

प्राची दुबळे आदिवासी संगीत

​नारण आणि त्याच्या सहकारी आदिवासी मित्राने ​संगीताचंही बरंच डॉक्यूमेंटेशन केलं आहे. त्याच्याकडून घेऊन आदिवासींचं संगीत ​मी ऐकावं, असे सरांनी सुचवलं. ते ऐकलं तेव्हा ते कानाला माझ्या कर्कश म्हणावं असं ​वाटलं. "हे संगीत आहे का काय आहे?" असं​ही वाटलं. पण तरीही नारण खूप मनोभावे मला ​ती गाणी ​ऐकवत राहिला. आम्ही दोन-तीन तास एकत्र होतो. तेव्हा त्याने आजूबाजूच्या भागातल्या (मध्यप्रदेश-गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेचा हा भाग. तेजगढ, छोटा उदेपूर या परिसरात साधारण १२०० आदिवासी पाडे, खेडी आहेत.) ​आदिवासींचं संगीत ऐकवलं. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या पट्ट्यात ​मिळून अंदाजे ​दोन कोटी भिल्ल आहेत. त्यांच्यात राठवा, गामीत, चौधरी, कुंकणा, देहवाली असे वेगवेगळे ​समाज आहेत. त्या सगळ्यांचं संगीत ​नारणकडे होतं.

​ऐकत गेल्यावर माझ्या लक्षात आलं, आपल्या कानाला खूप सुखद, सुसंस्कारित आणि मनोरंजनात्मक गाणं ऐकायची सवय आहे; म्हणून हे संगीत तापदायक वाटतंय. वरवर पाहता ते सरळ, पुन्हा-पुन्हा येणारं आणि कंटाळवाणं वाटत असलं तरी​ही जटिल आहे​; कारण ​ते तसंच्या तसं मला गाता आलं नाही. त्यातूनच त्याची जटिलता माझ्या लक्षात आली. मला कळलं, की ​this music demands a lot from the listener. ​लक्षपूर्वक ऐकायला पाहिजे ते.

​​मी थोडंफार ​गाणं शिकलेली आहे, गाण्याबद्दल मला ममत्व आहे. म्हणून वाटलं की या​ संगीताकडे ​दुर्लक्ष करून चालणार नाही. ​मग मी नारणकडून काही सीडीज घेतल्या. ​तेजगढवरून परतीच्या वाटेवर मी त्यातलं ​एक ​गाणं गुणगुणत होते. तेव्हा मात्र सरांना वाटलं​ असावं​ की गेल्या चार-पाच तासांत माझं त्या संगीताशी काहीतरी नातं जुळलंय. ​सर नेहमीच सगळ्यांनाच ​चांगल्या कार्याशी जोडायचा प्रयत्न करतात. ते म्हणाले, "तू गाणं लिहितेस का?" मला वाटलं, गाणं लिहिणं ही तर मोठी गोष्ट आहे. पाश्चा​त्य​ संगीतात 'गाणं लिहिणं' अशी शब्दरचना करतात, आपल्याकडे नाही. मी सरांना म्हटलं, "मी लिहीत नाही. मी गाते." मग त्यांनी विचारलं, "तुला नोटेशन लिहिता येतं का?" ​मी म्हणाले, ​"अर्थातच ते मला येतं." आपल्या संगीतात नोटेशन शिकवलं जातंच. ललित कला केंद्रात मी 'Principles of notation writing' असा अभ्यासक्रमही शिकवत होते. त्यांनी मला आदिवासी संगीत लिहून काढायला सांगितलं. आत्तापर्यंत कोणीही हे काम केलं नव्हतं. सरांनी मला कल्पना दिली, "आपण ​ह्या संगीताला मान दिला पाहिजे, ​आदिवासींचं असं काही निराळं संगीत आहे. ​ही गोष्ट जर आपण लिखित स्वरूपात आणू शकलो​ तर ते एक महत्त्वाचे कार्य ठरेल. आम्ही ते पुस्तकं स्वरूपात ​प्रकाशित करू शकतो..."​ मी हो म्हणाले, आणि काम सुरू झालं.

​नारणनी आणखी सीडीज पाठवल्या. मी जसजसं ते ऐकत गेले तसतसं माझ्या लक्षात आलं, याच्यात स्वर, ​लगाव निराळे आहेत. ​कधी आधार स्वर आहे तर कधी नाही. त्यात त्यांनी डिझाईन्स ​निराळ्या तऱ्हेनेे ​केलेली आहेत. ​त्रिस्वरीय, चतुःस्वरीय आणि पंचस्वरीय सप्तकं ​आहेत, काही ठिकाणी ​पूर्ण सप्तकसुद्धा आहे. वर्षभर मी ते संगीत ऐकत होते.

​पुढे ​२०११ मध्ये मी ​आदिवासी ​अकादमीत राहायला गेले. तेव्हा सगळा सुखाचा कारभार होता. अकादमी​त भिल्ल मित्र-मैत्रिणी ​येतात, तिथे येऊन गातात. रेकॉर्डेड संगीत आहे. ​ह्या सगळ्यामुळे ​माझ्या अभ्यासासाठी ​एक ​मोठा​च मोकळा पट तयार झाला. मला स्वतःला त्यात काही करायचं नव्हतं. फक्त ऐकायचं आणि विश्लेषण करायचं. ​सुरुवातीला​ पन्नास गाणी ​नोटेट करूया, असं आम्ही ठरवलं. तीन-चार ​समाजांची गाणी घेतली आणि ती लिहायला सुरुवात केली. या कामाला सुरुवात केल्यावर माझ्या लक्षात आलं, ​या गाण्यांतून जे विषय मांडतात त्यातून एक निराळाच आसमंत समोर येऊन उभा राहतो. माझं शहरी ​​अस्तित्व​ आणि त्यांचं आदिवासी ​​अस्तित्व​, ह्या​ दोन्हीत ​एक मोठी तफावत आहे हे ​ही ​माझ्या लक्षात आलं. ​त्यांच्या गायनातील सहजता आणि माझ्या गळ्यावर पडत आलेला माझ्या गाण्यांचा ताण, ह्या सर्व गोष्टी ध्यानात आल्यावर ​माझ्या संगीताचा पायाच हलायला लागला.

​मला आत्तापर्यंत वाटत होतं, ​फक्त ​शास्त्रीय संगीता​नंच मोठ्ठं काम करून ठेवलेलं आहे. परंतु त्या​च्याही मर्यादा माझ्या लक्षात यायला लागल्या. ​आदिम संगीतातील वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म आणि जटिल असणारे स्वरांचे अवकाश, ​लगाव ​- जे एका ​शास्त्रीय ​सप्तकात ​सामावू शकत नाहीत - हे ​वास्तव ​माझ्या अंगावर येऊ लागलं. ​आदिवासींचे संगीत ​त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक अस्तित्वातून येतं. हे सगळं दिसायला लागलं​ आणि ​तिथपासून माझ्या कामा​ला निराळी दिशा मिळाली.

तुम्ही भारतातल्या वेगवेगळ्या भागांत काम केलं आहे. तेव्हा आदिवासी समाजातील विविधता तुम्ही अनुभवली आहे. प्रत्येक प्रांतातल्या आदिवासींमध्ये वैविध्य आहे. दक्षिण, उत्तर, ईशान्य, पश्चिम, पूर्व सर्वच भागांत तुम्ही फिरला आहात. या सगळ्या आदिवासींमध्ये काही समान सूत्र तुम्हांला दिसतं का?

पश्चिमी पट्ट्यापासून सुरू केले तर इथे प्रामुख्याने भिल्ल; तर गोंड, मुंडा, कुरबा, पंडो, उरांव, घांसी हे मध्य भारतातले ​समूह निराळे आणि ​ईशान्यातील ​मंगोलाईड ​आदिवासी निराळे. ​ह्या सर्व आदिवासींचं शरीर वेगळं आहे​, भोवताल वेगळे आहेत. त्यामुळे त्यांची voice culture​s पण निराळी आहे​त. तुम्ही पश्चिम पट्ट्यात काम करत असाल आणि पेंटाटोनिक स्केलमध्ये काम करत असाल, तर ​इथे आरोही स्वररचना आढळतात; पण ईशान्येकडे गेलात तर ते डिसेंडिंग गाताना दिसतात, ज्याला अवरोही असं म्हणतात. जेव्हा मी​ आदिमसंगीताचे प्रात्यक्षिक देते तेव्हा ते गाऊन दाखवते. ​शास्त्रोक्त संगीतात ज्याला भूप, धानी किंवा दुर्गा ​अशी नावे आहेत, अश्या रचना ईशान्येकडे मुख्यत्वे अवरोहीच गायलेल्या/ वाजवलेल्या ऐकू येतात. ईशान्य भारताच्या संस्कृतीचा जो संबंध दक्षिणपूर्व आशियाशी, तोच संगीतातही प्रतिबिंबित होतो. मध्य भारतात आरोही-अवरोही (असेंडिंग-डिसेंडिंग) मिश्र​ण ​असतं. त्यावरून असा तर्क मांडता ​येईल का की माणसा​ची मूळ चेतना ​- प्राइमिव्हल कॉन्शसनेस - आहे, ​ती या प्रकारच्या सुरावटींमध्ये रमण्या​ची आहे. ​अर्थातच आदिवासींना त्याला ​भूप म्हणतात ​की धानी ​हे माहीत नाही​, ते त्यांच्या संगीताचे उद्दिष्टदेखील नाही. परंतु शास्त्रोक्त संगीत जेव्हा ह्या सर्व धून व रचनांची व्यवस्था लावते, तेव्हा ​आपल्याला हे साम्य​, एक समान सूत्र दिसून येतं.

आदिम संगीत आणि अन्य संगीतविधांचा अन्योन्यसंबंध शोधून काढण्यासाठी खूप डेटा गोळा करावा लागतो. फक्त भारता​च्याच नाही, तर भारताबाहेर​च्या संस्कृतींचा / संगीताचादेखील विचार करावा लागतो. उदाहरणार्थ, झेंद अवेस्था आणि वेदातल्या ऋचा यांमध्ये ​खूप साम्य आहे. त्यांची सूत्रं समान आहेत. झेंद अवेस्थामध्येही ट्रायटॉनिक ​रचना ​आहे​त. आता मी जर पेंटाटोनिक​ स्केल​चा विचार केला तर ग्रीसच्या आयंबिक पेंटामीटर - ​पाच पाच मात्रांमध्ये लिहिलेल्या काव्यापर्यंत जावं ​लागेल. ग्रीस, टर्की, इजिप्त इथले समूह, ​त्यांची संस्कृती आणि ​​त्यांची गायनपद्धती घेऊन हिमालयाच्या पवर्तरांगांमध्ये आले. त्या वेळचं त्यांचं संगीत कसं असेल? पर्वतीय समूहांचं ​आणि मैदानी क्षेत्रातील समूहांचं ​गायन वेगळं असेल​ ना? कारण त्यांच्या ​भोवतालाचा, त्यांच्या जगण्याच्या पद्धतीचा संगीतावर परिणाम होतो. एथ्नोम्युझिकॉलॉजीमध्ये या सर्वांचा ​खोलात ​अभ्यास होतो. त्यात ​संगीताची व्याख्या लवचीक आणि विस्तृत करत ​असंही म्हटलं जातं की भाषेच्याही आधी संगीत आहे. ​हे संगीत ​म्हणजे काय? तर ह्या सर्व आदिम समूहांच्या चालण्याबोलण्यातलं, हातवारे करण्यातलं, ​उदा: ​मेंढ्यांसाठी आवाज देतानाचं संगीत आहे. हे सर्व ​संगीत भाषेचा शोध लागण्याआधीपासून माणसासोबत आहे. ​गुराखी आदिवासी समाज वेगवेगळे आवाज ​लावतात, ज्यांमुळे मेंढ्यांना समजतं की हा आवाज झाला की थांबायचं, हा आवाज झाला की चालायचं. या आवाजांत काही ठिकाणी संपूर्ण पट्ट्यांचाही वापर होतो.

महत्त्वाची गोष्ट अशी की ​काळ आणि अवकाशाचा वापर आपण वेगळा करतो, ​आदिवासी वेगळा करतात. ​उदा: ​माझा चहा ​गॅसवर ​दोन मिनिटांत ​तयार ​होतो. याउलट माझ्या आदिवासी मैत्रिणीला चहा करायचा तर लाकडं गोळा करण्यापासून खूप वेळ द्यावा लागतो. तिचं संगीत तीन स्वरांतदेखील रमू शकतं. कारण वेळ भरून काढायचा प्रश्न तिच्यासमोर नव्हे तर माझ्या शहरी अस्तित्वासमोर अधिक मोठा असतो. वेळ भरून काढणारी साधनंदेखील मला अधिक लागतात आणि मला उगाच वाटतं की ह्या साधनांद्वारे मी वेळ वाचवत आहे. मग मला पडणारा ​प्रश्न असा की ​माझं संगीतदेखील हा अखंड काळ आणि वेळ भरून काढण्या​साठी तर स्वतःला विस्तृत करत नेत नाही?

​गंमत अशी की शहराच्या जवळ वावरणारे भटके, विमुक्त ह्यांचे संगीत देखील विस्तृत असते.​ आता बंजारांचं उदाहरण घ्या. त्यांच्या वेगवेगळ्या ​समाजांनी प्रचंड मोठा परिसर व्यापला आहे. ते हिमालयातून आले, ते राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि खाली कर्नाटक एवढ्या मोठ्या S आकाराच्या पट्ट्यात आहेत. प्रत्येक ठिकाणची भाषा, भवताल, परिसर यांचा त्यांच्यावर परिणाम होत आलेला आहे. त्यामुळे बंजारांचा अभ्यास करायचा तर एक आयुष्य पुरणारच नाही. मला जर अनुदान मिळालं आणि इतर जबाबदाऱ्यांमधून मुक्तता झाली तर मी असं करू शकेन की एकेक वर्ष एकेक राज्यातल्या बंजारांबरोबर राहायचं, त्यांच्याबरोबर फिरून त्यांचं संगीत शिकून घ्यायचं.

खाली द्रविड मूल, इथे भिल्ल, ​ईशान्येचे मंगोलॉइड आणि ​मध्य भारतात गुंतागुंतीची सरमिसळ असणारे समूह आहेत - ज्यामध्ये ​गोंडी, मुंडा​री​, हलबी, सांथाळी अशा स्वतंत्र भाषा ​बोलणाऱ्या मोठ्या ​आदिवासी ​संस्कृती आहेत. त्यांचं महाभारत वेगळं आहे, रामायण वेगळं आहे; त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे.

प्राची दुबळे आदिवासी संगीत

​​आदिवासी संगीतात आणि संस्कृतीत तुम्हाला काय बदल आढळला आहे?

आदिवासींमध्ये ​बदल होतो म्हणजे नक्की काय होतं? तर आपणच त्यांच्या जवळ​जवळ ​जायला लागतो. रस्ते झाले, ​त्यांची डोंगर-​जंगलं कापली गेली. ​नद्यांचे पाणी शोषले गेले. संगीताबद्दल सांगायचं तर माझ्याकडे फारतर गेल्या पन्नास वर्षांचा डेटा आहे. त्यातून दिसतं की ​त्यावर शहरात बोलल्या जाणाऱ्या ​भाषेचा पगडा बसतो. म्हणजे गुजराती प्रदेशातल्या भिल्लांमध्ये गुजराती शब्द, इंग्रजी शब्द शिरलेले दिसतात. ​गाण्याचे विषयही बदलायला लागतात. राठवा (रठविस्तार - राठवा म्हणजे जंगलं आणि टेकड्या यांच्यामध्ये राहतात ते) भिल्लांचं एक ​जरा जुनं म्हणता येईल असं एक ​गाणं आहे - 'बेनीने सासेरी घणी दूर रे - वाटे सूरज उगसे' असं. ​एक बाप मुलीला म्हणतो आहे, "मुली मला जरी तुला भेटायची इच्छा झाली तरी तुझं सासर इतकं दूर आहे, की रात्रभर चालत राह्यलो तरी डोक्यावर सूर्य येईल तेव्हाच मी ​तुझ्याकडे ​पोचेन." अशा प्रकारचे हे पायी ​चालणारे समूह आहेत, पितृप्रधानही आहेत - मुलीचं लग्न करून ​सासरी पाठवण्याच्या उल्लेखावरून ते कळतं. बापाचं मुलीशी असलेलं नातं, त्याला होणाऱ्या विरहाचं चित्र त्या गाण्यात दिसतं. ​पण ​याच राठवांच्या गेल्या पंचवीसेक वर्षांतल्या गाण्याचं उदाहरण म्हणजे -
'रोडे रोडे फरो
बेनी, एकला​ ​मा फरो​ ​बेनी, रोडे मारुती आवे... रोडे भायबंद आवे'
यात रोड शब्द आला आहे. ​मला ​आधी मारुती हा देवाचा उल्लेख वाटला होता, पण नंतर लक्षात आलं की ​राठवा लोक कुठच्याही ​कारला ​'​मारुती​'​ म्हणतात. ती गाडी येईल आणि तुला उडवेल, असं त्या गाण्यात सुचवलं आहे. तसंच भायबंदांपासून जपायला सांगितलं आहे. हे भायबंद म्हणजे बहुधा रस्त्याने फिरणारे दांडगे, राजकारणी, मवाली-टपोरी लोक जे आदिवासी तरुणींना उचलून नेतात. ​त्यांच्या जगण्यावर ​टीव्हीमुळेही प्रचंड परिणाम झालेला ​दिसतो. त्यांचं हिंदीदेखील बॉलिवूड आणि टीव्हीवर ऐकू येणाऱ्या हिंदीचं तोडकंमोडकं स्वरूप आहे. त्यामुळे आसामसारख्या प्रदेशात मला त्यांच्याशी तुटक का होईना, पण निदान संवादतरी साधता आला. दक्षिणेकडे मात्र हिंदीचा काहीच प्रभाव दिसला नाही. त्यामुळे माझी पंचाईत झाली.

'भिलाला' नावा​चा एक ​समूह आहे, मध्यप्रदेशात ​मथवाड - अलिराजपूरमध्ये. मी त्यांना ​भेटले होते. ​भिलाला तरुणांमध्ये एक नवीन ट्रेंड असा आहे की ते काळा चष्मा लावतात सलमान खानसारखा. अगदी रात्री एक वाजतासुद्धा. नृत्याच्या वेळी ते संपूर्ण आदिवासी पोषाखात असले तरी डोळ्याला चष्मा लावून होते. 'दबंग'मध्ये तो हीरो मानेच्या कॉलरला लावतो तसाही चष्मा काहींनी लावला होता. प्रत्येक जण स्वतःचा टेंपो आणि डीजे घेऊन आला होता. आणि त्यांचीच काही ट्रायबल गाणी, पण इलेक्ट्रॉनिकली टेंपर केलेली होती. काही गाणी लोकप्रिय बॉलिवुडी गाण्यांच्या चालींवर बसवली होती, आणि ते सगळे तो काळा चष्मा लावून त्यांचं पारंपरिक नृत्य करत होते. त्यांचं दस्तवेजीकरण करण्यात माझ्या अभ्यासाच्या दृष्टीने काही अर्थच राहिला नव्हता.​ पण तरी ​मला नाही वाटत हा त्या तरुणांचा दोष आहे. शहरीकरणाचे प्रेशर इतके जबरदस्त आहे त्यांच्यावर की नकळत तरुण त्यात ओढले जातात.

प्राची दुबळे आदिवासी संगीत

​फ्लेम विद्यापीठामध्ये ​मी जो अभ्यासक्रम शिकवते त्यातही मी​ मुलांना भोजपुरी स्पायडरमॅनचं गाणं दाखवते. ही चाल जी आहे ती भोजपुरीच आहे, पण त्यात त्यांनी स्पायडरमॅन घातला आहे. त्या व्हीडियोत हीरो स्पायडरमॅनचा वेष घेऊन एक घागरा घातलेल्या मुलीबरोबर रोमान्स करतो आहे. हे भोजपुरी सिनेमात आहे. त्याचं अॅडाप्टेशन केलं आहे. त्यात सिंथेसायझर वापरला आहे.

​​सिंथेसायझरचं तर विचारूच नका. ​खरंतर आदिम संगीताचे जे लगाव आहेत ते आपल्या अभिजात संगीतात​ही नसलेले लगाव आहेत. ते लिहून काढण्यासाठी वेगळ्या प्रकारचं लेखन करावं लागेल. अभिजात संगीताचे ​सर्व ​निकष या संगीताला लागू पडणार नाहीत. ​मी ​हे ​देवी ​सरांना सांगितल्यावर ते म्हणाले, “मग ते ​लेखन ​तुझंच काम आहे.”

मुद्दा असा की आदिम आणि लोकसंगीतातली स्वरांची स्वरस्थानं वेगळी आहेत. तुम्ही जेव्हा ते ​सिंथेसायझरवर वाजवून ​टेंपर करता तेव्हा ते फ्लॅटन होतं. एकदा तुम्ही या टेंपर्ड स्केलवर गायला लागलात की you are deviating from the tribal scale. मी 'कारबी' नावाच्या समाजामध्ये गेले होते ईशान्येमध्ये तेव्हा प्रचंड पाऊस झाला होता. त्यामुळे त्यांची वाद्यं भिजून गेली. ​कारबी मुलगा म्हणाला की आज आम्ही बिनवाद्यांचं​ ​​नर्तन ​करू. मी म्हटलं की काहीतरी वाद्यं लागतीलच ना; निदान हाताने टाळ्या वाजवून, किंवा पायाचा ठेका धरून तरी. तर तो म्हणाला, “आताची नवीन पिढी तसं काही करत नाही, आणि जे जुने लोक करायचे ते तर आता शेतावर गेले आहेत.” मी सगळा जामानिमा, कॅमेरा वगैरे घेऊन आले होते. आता कसं करणार? तर त्याने खिशातून मोबाइल काढला आणि म्हणाला, “आहेत की आमची सगळी गाणी​ ह्यावर.” ती सगळी कारबी समाजाचीच, टेंपर्ड गाणी होती. तो म्हणाला, “वाजवू?” तर मी म्हटलं, “ठीक आहे, वाजव बाबा.”

प्राची दुबळे आदिवासी संगीत

'लामा' समाजाच्या मुलांनीदेखील मोबाइलवर वाजवून दाखवली होती​ त्यांची गाणी​. '​​ठुंगाल कचारी' ह्या समूहातील सत्तर-ऐंशी-नव्वद वर्षांचे​ तीन वृद्ध म्हणाले, ​“बीन वाजवणारी​ ही आमची शेवटची पिढी.” ​त्यांचा आम्ही काढलेला व्हिडियो हे एक ठाव घेणारं प्रतीक आहे. पुढे ते अत्यंत जर्जर झालेले म्हातारे आजोबा बीन वाजवत आहेत आणि ​त्यांच्या ​मागे एक प्रचंड डिश अँटेना आहे. ते ​अंगावर येणारं​ दृश्य आपसूकच तयार झालं. असे काही अनुभव मला बस्तरमध्येही आले. दुर्दैवाने छत्तीसगडमध्ये प्रचंड प्रमाणात वीज तयार होत असूनही ती ते शेजारच्या राज्यांना विकतात. त्यामुळे ​बस्तरमधील खेडी ​बहुतकरून अंधारातच असतात. ​तिथले आदिवासी अंधारातच सरावाने चालतात. चालता चालता गाणी म्हणतात. म्हणजे समोरच्याला कळावं की कोणीतरी येत आहे, जनावरंही दूर राहावी. मी माझ्या साथीदाराच्या मोटरसायकलवर होते, मागे बसलेली. आम्हांला मोटरसायकलच्या दिव्याच्या प्रकाशात ​पायी चालणारे समूह दिसत होते. समोरून सायकलवर एक आदिवासी मुलगा आणि त्याची मैत्रीण येत होते. तो कुठलं तरी आदिवासी गाणं म्हणत होता आणि ती त्याच्यामागे त्याला रस्ता दाखवायला मोबाईलचा टॉर्च धरून होती.

तर हे जे स्थित्यंतर आदिवासी समाजात घडतं आहे ते अनेक बाबतीत दिसतं. इथे पूर्व गुजरात भागातलं एक आदिवासी गाणं आहे "​टेबल उपर लेंबू .. लेम्बानो रंग लीलो, सोखीन बेनी तिकीट पर मारू नाम से ...." त्यात बर्‍याच नव्या गोष्टी आल्यात. ​मुलगी गातेय “टेबल आहे, टेबलावर लिंबू ठेवलं आहे.” इथे तिकीट आलं. “तिकीटावर माझं नाव आहे.” ​पुढे "पिता नोकरी जासे​, टिफिन जोई रडसे." तिचा ​आदिवासी बाप, तो टिफिन घेऊन मजुरीच्या कामावर जातो. ​त्याला टिफिन पाहून तिची आठवण होईल. ​पुढे ती म्हणते, “मी जरी ​लग्न करून गेले असले तरी तिकीटावर माझं नाव आहे. तुम्हाला ​सदैव माझी आठवण येईल.”

आता थोड्या इतर बदलांबद्दल. '​छारा' समाजातील माझा मित्र सांगत होता, ​"पंधरा-वीस वर्षांपूर्वी ​तू आली असतीस प्राची तर, इथे ​पूर्व गुजरात ​आदिवासी ​भागात एकही देवीदेवतेचा फोटो दिसला नसता." ​निसर्गालाच देव आणि धर्म मानणारे हे सर्व आदिवासी होते. पण आता टीव्हीवरून ​अ​विरतपणे होणार्‍या वर्षावातून आणि राजकीय पक्षांच्या जोराच्या प्रसारामुळे संतोषीमाता, हनुमान वगैरे ​वगैरे ​​देवी-देवतांचं प्रस्थ तेथील आदिवासी समाजात निर्माण झालेलं आहे.

​'आदिवासी​' ​ही ​संज्ञासुद्धा ​आपल्या ​नागर समाजाने ​स्वतःच्या सोयीकरता ​त्यांना लावलेलं लेबलच आहे​ ना? नाहीतर​ ​आदिवासी ​स्वतःला मी बोडो, मी मुंडा, मी भिल्ल असेच ओळखतात. ​विशेषतः ​नव्वदीच्या दशकानंतर त्यांना ​जोरात ​​'​मुख्य प्रवाहात​'​ ​आणलं जातंय​,​ त्यांच्या ​आदिम धर्मातून आपण त्यांना ​आपल्या सुनियोजित धर्मामध्ये आणत ​आहोत. ​त्यात ​आता त्यांच्या आयुष्यात टीव्ही आहे, राजकारणी लोक आहेत, शहरीकरण आहे. माधुरीताई पुरंदरे गमतीने म्हणतात, “गावाकडे तीन 'एम' आहेत. मोटरसायकल, मोबाईल आणि मैत्रीण.” या तीन गोष्टी म्हणजे गावाकडची स्टेटस सिंबल्स बनली आहेत. हाच प्रकार ​हळूहळू आदिवासींमध्येही आलेला आहे. याच तिन्ही गोष्टी आदिवासींमधली तरुण मुलं मिरवताना दिसतात. हा जो बदल आहे, तो काही सहज, नैसर्गिकपणे घडलेला सेंद्रिय बदल नव्हे. उदाहरणार्थ, मेघालयाच्या खांसी जमातीमध्ये खरं तर मातृसत्ताक पद्धती होती. मुलगा सासरी जायचा आणि घरादाराची काळजी वाहायचा. किंवा मावची समाजाची होळीची एक पद्धत अशी होती - एखाद्या मुलीला एक मुलगा आवडला आणि तिने त्याला ​मागणी घातली आणि तो नाही म्हणाला, तर होळीच्या वेळेला ती सर्व मुलींची एक गँग बनवायची आणि त्या मुलाला पळवून आणायची. आणि मग त्या मुलाला तिच्याबरोबर नांदावं लागे. त्यानंतर तिचं समाधान झालं की त्याला सोडून देत असे. नाहीतर त्या मुलाला घातपाताचा धोका संभवत असे. त्या समाजातला माझा मित्र मला म्हणाला, "बरं झालं प्राचीताई, ज्या मुलीवर मला प्रेम आहे तिलाच माझ्याबद्दलही प्रेम आहे. भलतीच कुणी असती आणि तिचा माझ्यावर जीव आला असता तर मला तिच्याचबरोबर राहावं लागलं असतं!" ही पद्धत अजूनही पाळली जाते. मध्य प्रदेशात 'भगोरिया भिल' नावाचा एक आदिवासी समाज आहे. त्यांच्यात होळीमध्ये अशी जोडपी अगदी ठरवून एकमेकांबरोबर पळून जातात. म्हणून त्यांचं नाव "भगोरिया". ​तर ​विक्रमगढकडचे जे भिल्ल असतात, त्यांच्यात ​काही जोडपी बराच काळ एकत्र राहतात, त्यांना मुलं होतात आणि मग ते म्हणतात की ​चला ​आपलं जमतंय​, गावजेवण घालायला आता आपल्याकडे थोडे पैसेपण जमलेत तर आता लग्न करू. अशी लग्नं​ही त्यांच्यात लागतात. कधी कधी ​त्यांची ​मुलं ​शाळेत येऊन सांगतात की आज आईबाबांचं लग्न आहे, तर आज मला सुटी द्या. तर अशा ​मुक्त परंपरांमध्ये नांदत असलेले ​आदिवासी ​लोक आता बदलत आहेत. एकमेकांना होणार्‍या स्पर्शांबद्दल, शरीरसंबंधांबद्दल एके काळी जी ​निर्भीडता होती, ती लोपते आहे. नव्या पद्धतीचे कपडे घालणं, मोटरसायकल वापरणं, नवी राहणी, नवी भाषा आलेली आहे. अर्थात जुन्यातल्या चांगल्या गोष्टी जाण्याबरोबर नव्या स्वागतार्ह गोष्टीसुद्धा येत आहेत. उदाहरणार्थ माझ्या मैत्रिणीच्या घरी आता गॅस आहे, तिची मुलं शाळेत जातात, तिचं बाळंतपण हॉस्पिटलमध्ये होतं, बालमृत्यूंचं प्रमाण बरंच घटलं आहे. हे चांगलंच आहे. परंतु त्याचबरोबर आदिवासीं​चे एक सेंद्रिय असं जे भान होतं (ऑर्गॅनिक कॉन्शसनेस), त्याला आता वेगळंच परिमाण मिळालं आहे.

कृत्रिम, प्लास्टिक ‌वस्तू वापरण्याबद्दल तुमचं निरीक्षण काय आहे?

त्यांची वस्त्रप्रावरणंदेखील आता कृत्रिम झालेली आहेत. उदाहरणार्थ, एके काळी गोंडी समाजाच्या बायका रेशमाचा एक विशिष्ट धागा बांधायच्या. त्याऐवजी आता त्या जत्रेत मिळणार्‍या रिबिनी बांधतात. तेच गळ्यात घालायच्या हारांबद्दल. त्यांचे जे हाट असतात, त्यात डुप्लिकेट माल असतो. म्हणजे पाँड्स पावडरीसारखी दिसणारी डुप्लिकेट पावडर, जी ५-१० रुपयांत मिळते. अशा पद्धतीने कृत्रिम, डुप्लिकेट मटेरिअयल माल तिथेदेखील पोचला आहे.

प्राची दुबळे आदिवासी संगीत

एके काळी जे बांधणी करणं दिसायचं, ते कमी व्हायला लागलेलं आहे. किंवा ढोलाचं लाकूड एके काळी सागाचं असायचं. आता प्लास्टिक किंवा फायबर वापरून त्यांची सांगीतिक साधनं बनतात. काही काही वाद्यं तर बनणं बंदच झालं. उदाहरणार्थ बीनसारख्या वाद्यात घोड्याच्या शेपटीचा भाग वापरायचे. त्यावर आता बंदी आहे. किंवा पूर्वी शिकार करून जे साहित्य आणलं जायचं त्यावर बंदी आता आहे. तर अशा प्रकारच्या बंधनांमुळे काही गोष्टी बनायच्या बंद झाल्या. .

अजून एक बदल म्हणजे "जगत" आणि "भगत" असे पूर्वी नसलेले संप्रदाय भिल्लांमध्ये आता अस्तित्वात आले. ​माळ घातलेले भिल्ल भगत, जे मांसाहार करत नाहीत. आपल्याकडे वारकरी लोकांना जशी माळ दिली जाते तशी. हे म्हणजे "भगत" संप्रदाय. आणि "जगत" म्हणजे नावाप्रमाणेच आधिभौतिक - मांस खाणारे. ईशान्येकडे एक शंकरदेव नावाचा मोठा संतकवी झाला आणि त्याने '​हट्रो' म्हणजे 'सत्र' नावाची वैष्णवभक्तीची परंपरा ईशान्येकडच्या आदिवासी समाजात निर्माण केली. म्हणजे असं की एकाच घरात बाई 'सत्रात' जाते, वैष्णव बनली आहे आणि तिचा नवरा अ‍ॅनिमिस्ट परंपरेमध्ये आहे, तो डुक्कर मारून खातो. बायको शुद्ध शाकाहारी. मात्र एकमेकांचा त्यांनी अतिशय शांतपणे स्वीकार केला आहे असं बऱ्याचदा दिसतं.​

आदिवासींचे व्यावसायिक कलाकार ग्रुप्स आहेत का? त्यांच्यात परंपरेशी तुलना करता काही बदल दिसतात का?

आहेत ना. आदिवासी इंडियाचं प्रतिनिधित्व करायला २६ जानेवारीला, १५ ऑगस्टला अशी कलापथकं जातात.​ ​संयोजक ​ह्या संगीताला सजवून, त्यात मनोरंजन आणून ते बाजारात आणता येईल अश्या ठरावीक पद्धतीची व्यवस्था आणतात. ठरावीक प्रकारचे कपडे घातले जातात. ​उदा: ​'बोडो' ​म्हटले म्हणजे ठरावीक गोष्टी असल्या पाहिजेत, असं काही. आसाम म्हटलं की 'जापि'चं एक सांस्कृतिक असोशिएशन तयार झालेलं आहे. सगळे समुदाय 'जापि' घालतातच असं नाही. जापि घालून नृत्य केलं की ​झाले ​ते आसामचे प्रतिनिधी. 'मेखेला ​सादोर' ​- कमरेला गुंडाळायचे वस्त्र म्हणजे मेखेला आणि वरून गुंडाळली जाते ती चादर. ​परंतु हे ​वस्त्र गुंडाळणारे समाज आता शिवलेले ​कपडे घालायला लागले. आता ते ब्लाऊज वापरतात. मी त्यांना विचारलं, “तुम्ही ब्लाऊजला काय म्हणता?” तर ते म्हणाले “ब्लाऊज.” अशा प्रकारची जार्गन सापडते. ब्लाऊजच म्हणतात, कारण तो प्रकारच बाहेरून आला आहे. त्यांच्याकडे त्या कपड्यासाठी शब्दच नाही. प्रत्येक समाजाला विचारलं. याच मेखेलाला ​मिसिंग भाषेत 'एगे' म्हणतात, पण ब्लाऊजला ब्लाऊजच.​ ईशान्येत विणकाम आलंच पाहिजे, असा एक सामाजिक संकेत आहे. स्त्रियांना विणकाम येतंच, त्या स्वतःचे कपडे स्वतःच विणतात.

प्राची दुबळे आदिवासी संगीत

​परंतु ​काही आदिवासी समाजात ड्रग्जसेवनाचं प्रमाण बरंच जास्त आहे. आपलं मद्य स्वतः बनवून, उत्सव किंवा दैनंदिन जीवनात श्रमपरिहारासाठी ते घेणं हे निराळं आणि ड्रग्जमध्ये अडकणं निराळं. मला ​काही तरुण मुलं दिसली जी कॉलेजमध्ये ​शिक्षण घ्यायला उत्सुक होती, पण तिथे ड्रग्जमध्ये अडकली. ​असे का? ह्याची कारणं मला नीट समजली ​नव्हती.

पण ​आसाममध्ये असताना ​पत्रकार मित्रांकडून एक प्रतिक्रिया ​मात्र ​आली. “बरं झालं, तू इथे आलीस. इथल्या आदिवासींची अवस्था काय आहे, हे तूच पाहा.” ​एक पत्रकार मित्र तावांग, अरुणाचलमध्ये होता. त्याचं म्हणणं, तिथे नवं धरण तयार होतंय. ब्रह्मपुत्रेचं पाणी चीन आणि आपण - आसाम, अरुणाचल - वाटून घेत आहोत. तिथे लामा ​आदिवासींची ​वस्ती होती. त्यांना तिथून हटावं लागलं, पण ​त्यांचं ​पुनर्वसन झालंच नाही. त्यामुळे ​अंदाजे ५००० लामा खाली खिंडीत उतरून चीनमध्ये गेले, ३०-३५ किमीवर. ​पत्रकार मित्र म्हणाला, "तुला काय वाटतं? ​चीन त्यांना अन्न-वस्त्र-निवारा, शिक्षण, संस्कृती ​देईल की त्यांच्या हातात शस्त्र​ देईल?" हे ऐकून मी बधिर झाले. विस्थापन व अस्थैर्य ह्यातून जी अशांतता निर्माण होते, ती या समाजामध्ये दिसते.​ ​बोडो, कारबी,​ रा​भा अश्या अनेक समाजांत ​निरनिराळ्या कारणांमुळे ​अशांतता आहे. माझं हायपोथिसीस असं की या अशांततेतून मार्ग शोधताना ​आदिवासींच्या ​​तरुण पिढीत identity crises निर्माण होत असावेत.

तुमच्या भाषणांमधून तुम्ही आदिवासी संगीत चोरण्याचे प्रकार, त्यांना मोबदला न देता ते उचलणं, याबद्दल बोलता. हे प्रकार आधीपासून होत होते का?

होय, आधीपासून. सप्रयोग व्याख्यानात त्याचे दाखले ऐकवता येतील. ​​आपल्याकडे देशीय ​संगीत ​आणि मार्गी​य संगीत असं विवेचन केलेलं आहे. ​'​बृहद्देशीय​'​मध्ये सातव्या शतकात प्रथम मतंगाने देश आणि मार्ग, ​व ​त्यात राग नावाची संकल्पना मांडली. पण सातव्या शतकापर्यंत हा देश गात नव्हता का? मार्गामध्ये वेद आणि ऋचा यांचं गायन ​होतं. जे प्रामुख्याने ​ट्रायटोनिक होते, ते ट्रायटोनिक आलं कुठून! ​त्यांचा संबंध आदिमसंगीताशी नक्कीच आहे. एकवटलेल्या, समुच्चयित जाणिवेमधूनच व्यक्तीच्या सर्जनशील निर्मितीकडे संगीत गेलेलं आहे. ही शास्त्रांमध्ये मांडली गेलेली ​सिद्ध गोष्ट ​आहे.​ मजेची गोष्ट अशी की आता पुन्हा ​देश मार्गाकडून गोष्टी घेतंय. यात एक वर्तुळ पूर्ण होतंय. ज्या पद्धतीने ​आदिवासी व लोकसंगीतकार ​हार्मोनियम​, बेंजो, व्हायोलीन ही वाद्य वाजवतात​, हे खूप सुंदर आहे. लांगा, मांगनि​या​र आणि​ ​भोपा ही राजस्थान​ची केवढी मोठी ​संगीत परंपरा आहे! त्यांच्या ​स्वरांना विशिष्ट नावं आहेत, रागरागिण्यांना त्यांनी नावं दिलेली आहेत. मलंग, मांड, खमाज, देश, पिलू ​ह्या धुना ह्या आदिवासींकडे सापडतात.

नागरी संस्कृतीचा परिणाम म्हणून गोरं दिसण्याचा सोस, मेकप असं काही आदिवासींमध्ये दिसतं का?

​हो. माझ्याकडे फोटो आहे. माझी ​आदिवासी ​मैत्रीण आणि मी आम्ही दोघी ​कार्यक्रमासाठी ​तयार होत होतो. मी गहूवर्णीयच आहे, ​आणि तीपण सावळी. आम्ही दोघी पावडर लावत होतो. पांढऱ्या रंगाची पावडर ​तिने लावली. तिच्या तुकतुकीत त्वचेवर आणि तेजस्वी ​सावळ्या ​कांतीवर पांढऱ्या रंगाची पावडर विचित्र दिसत होती. पण पावडर लावायलाच पाहिजे, असा समज करून दिलाय टीव्हीने आम्हा बायकांचा.

प्राची दुबळे आदिवासी संगीत

ती माझ्यासमोर गात होती. तिला माझ्यासोबत गाण्याबद्दल अप्रूप होतं. 'एक शहरी मॅडम माझ्याबरोबर, माझ्यासारखा वेष घालून गाणार आहे' असं काहीसं ते अप्रूप होतं. मेनस्ट्रीमच्या प्रेशरमधून होणारं अनुकरण होतं.

​जेव्हा ह्या स्त्रिया त्यांच्या सहज स्वाभाविक रूपात वावरतात ​तेव्हाचं त्यांचं सौंदर्य उत्सव करावा असं​ ​असतं, अद्भुत​ ​असतं​. शेलाट्या स्त्रियांचे कपडे, जत्रेतलं​ ​त्यांचं​​ उन्मुक्त वागणं​ खूप ​विलोभनीय​ असतं​.

प्राची दुबळे आदिवासी संगीत

आपला तृप्तीकडून अतृप्तीकडे प्रवास चालू आहे असे तुम्ही नेहमी म्हणता. जागतिकीकरणानंतर आदिवासींचा प्रवास तृप्तीकडे आहे की अतृप्तीकडे?

तृप्ती-अतृप्ती ​ही ​माझी ​बोलायची रीत ​आहे. आपल्याकडे तीन स्वर होते आणि त्यात माणूस शेकडो वर्षं तृप्त होता​, होय की नाही? पण ऑक्टेव्हमध्ये गेल्यापासून ​माणूस तृप्त झालाय का? की त्यात अजूनच एक अस्वस्थता आली आहे? ऑक्टेव्हच्या पलीकडे जाता येणार नाही असा निर्बंध निसर्गाने घालून ठेवलाय​ आपल्यावर​. त्यामुळे आपण परतपरत तिथेच येऊ लागतो. त्यातून ​एक कलात्मक ​असंतोष तयार होतो, त्याची दुसरी ​अशी ​बाजू आहे की एका निराळ्या दिशेने प्रवास सुरू होतो. आतापर्यंतचं जे काही ​सांगीतिक ​संचित आहे, त्यातून आणि त्याहून निराळं काही तयार करू पाहतो​ आपण.


बहुतांशी ​आदिवासींचाही प्रवास अतृप्तीकडेच सु​​रू आहे,​ असं दिसतं. त्यांना ​आपण काही पर्याय शिल्लक ठेवलाय का? ​समजा माझा बोडो आदिवासी मित्र असे म्हणाला की शेकडो वर्षं माझे पूर्वज ह्या जंगलात झोपडी ​बांधून राहायचे, मला माझी झोपडी इथेच बांधायची आहे, इथेच राहायचं आहे. ​पण ​जंगल-कायद्यामुळे ​त्याला तसं करता येणं शक्य ना​ही​​, बरोबर? मी तक्रार नाही​ करत​; ​आदिवासींच्या समोर कोणती आणि कशी आव्हाने आहेत हे नमूद करतेय फक्त.


एक शहरी व्यक्ती म्हणून माझ्यासमोरही बरीच आव्हानं आहेत. मला त्यांचा सामना करावाच ​लागतो. तसं ​आदिवासी ​त्यांच्यासमोरील आव्हान कसं पेलतील? मला वाटतं 'भाषा'सारख्या ज्या संस्था आहेत, ​त्या एक उत्तर आहेत. त्यात ​आधुनिकता आणि परंपरेचा सुंदर मिलाफ आहे. माझे सगळे आदिवासी मित्र ​अकादमीत कंप्यूटर चालवतात. ​आदिवासी गावे स्वयंचलित करणाऱ्या​ सामाजिक व शैक्षणिक योजना राबवतात, आदिवासी ​जत्रा आणि महोत्सवांचं आयोजन​ ​करतात​, ज्यात त्यांच्या जीवनपद्धतीचा उत्सव असतो. त्याच​​बरोबर त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवतात​, पुस्तकं लिहितात, स्वतःचं अन्न स्वतः रांधून खातात, जगभरात फिरतात. इंडिजिनस असणं म्हणजे काय याची ओळख जगाला ​करून ​देतात.

Baba Pithora Painting

​​

उदा: ​पिठोरा हे ​राठवा समूहाचं स्थानिक चित्र आहे. बाबा पिठोरा त्यांचा देव आहे. त्याच्या आशीर्वादाने गोष्टी करायच्या. घराची पूर्ण भिंतभर ​पिठोरा चित्रं ​काढायची कारण ​तो स्वतःच्या असण्याचं एक प्रतीक आहे. ​नंतर ​आदिवासी अकादमीमध्ये येऊन त्याची माहिती साठ​वायची.

प्राची दुबळे आदिवासी संगीत

जगभर फिरून, इंग्लिश शिकले​ले असले तरीही स्वतःच्या ​आदिवासी ​भाषेत लिहू शकणारे, त्याचा उत्सव करणारे, असे ​हे ​​आदिवासी अकादमीचे प्रतिनिधी आहेत. ​हे फार महत्त्वाचे आहे असं मला वाटतं. गणेश देवींसारख्या माणसांनी एक विधायक पर्याय निर्माण केला आहे. जागतिकीकरण होऊ दे, पण त्यामुळे स्वतःच्या मुळापासून तुटून जाण्याची गरज नाही. आदिवासींमध्येही काही भयानक चालीरीती ​होत्या, आहेत. ​उदाः ​पशूबळी, ​बालविवाह इत्यादी. पण ​त्यातूनही​ ​बाहेर येण्यासाठी त्यांना ​आधुनिक जगण्यातून व शिक्षणातून ​नवा विचार मिळतो आहे. शहरीकरणामुळे त्यांचा सगळा ऱ्हासच होतोय असं मला वाटत नाही. त्यांचे सांस्कृतिक संचित आणि त्यांना प्राप्त होणारी आधुनिक विद्या ह्यांच्या मिलाफातून एक वेगळ्या प्रकारची भाषा, वेगळ्या प्रकारचं जगणं निर्माण होऊ घातलंय.

ह्या प्रकारचं जगणं काही ​आदिवासींनी मान्य केलेलं असल्यामुळे माझा त्यांच्याशी संवाद होऊ शकला​, मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले. ​त्यांचं संगीत काय आहे​, समजून घेऊ शकले. ​"आदिमसंगीत संगी​ताची मूळ विधा आहे." अशा प्रकारचं सोशियो-कल्चरल-पोलिटीकल विधान उभं करू शकते; याचं कारण हेच आहे की एक पाऊल ​आदिवासी माझ्या दिशेनं पुढे आले आणि मी एक पाऊल त्यांच्या दिशेला गेले. ज्यायोगे आमच्यात​ मैत्री आणि संवाद ​घडू शकला.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

मी दौर्यावर असल्यामुळे नीट लक्ष देउ शकले नाही मुलाखतीच्या खरड्याकडे. त्याबद्दल क्षमस्व.

१) नारण हा आदिवासी सेल्फ-टॉट म्युझियोलोजिस्ट आहे. म्युझिकॉलॉजिस्ट नव्हे, माझे बोलणे नीट ऐकु आले नसावे. Smile

२) टेबल उपर लिम्बु .. हे गाणे पूर्व गुजरातमधले आदिवासी गातात.

३) शेवटच्या उत्तराला 'बाबा पिठोरा' हे आदिवासी चित्र जोडले होते मी ते मुलाखतीत दिसत नाहिये.
इथे पहाता येइल - https://picasaweb.google.com/105535961256258845884/PithoraPaintings#5631...

इतकी लांबलचक मुलाखत छापल्याबद्दल 'ऐसी'चे आभार :glasses:
- दिलतितली / प्राची

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

आभार! सूचनेनुसार दुरुस्त्या केल्या आहेत. आणि लेखक म्हणून तुमचं नाव दिलं आहे. त्यामुळे स्वसंपादन वापरता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी लॉग इन कसे करायचे इथे ते विसरून गेले होते..
ह्या मुलाखतीच्या निमित्ताने 'दिलतितली' पुनर्जीवित झाली पण मराठी लिहितांना अडचण येतेच. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

तुमचे पूर्वीचे लेख आवडलेले आहेत व प्रतिसादही. आत्ता या लेखातून बरीच माहीती कळली व आदर दुणावला. प्लीज लिहीत जा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह! एक नंबर आहे मुलाखत. सावकाश व्हीडियो पाहतो.

तुमच्या भाषणांमधून तुम्ही आदिवासी संगीत चोरण्याचे प्रकार, त्यांना मोबदला न देता ते उचलणं, याबद्दल बोलता. हे प्रकार आधीपासून होत होते का?

होय, आधीपासून. सप्रयोग व्याख्यानात त्याचे दाखले ऐकवता येतील. ​​आपल्याकडे देशीय ​संगीत ​आणि मार्गी​य संगीत असं विवेचन केलेलं आहे.... मलंग, मांड, खमाज, देश, पिलू ​ह्या धुना ह्या आदिवासींकडे सापडतात.

हे जरा अर्धवट वाटतं आहे. पुढेच एक व्हीडियो डकवला आहे, त्यात पुढचं आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

दिल्ली ६ मधलं "ससुराल गेंदा फूल " हे मूळ "करार गोन्दा फूल" असे गाणे आहे..
जे छत्तीसगढी आदिवासी आणि लोक कलाकार गातात, ते ऐकवते मी सप्रयोग व्याख्यानात.
पांडे सिस्टर्स म्हणून गायिका भेटल्या होत्या रायपूरला , त्या म्हणाल्या "अहो हे गाणे घेऊन गेले आमच्याकडून पण आम्हाला काही मोबदला नाही मिळाला धड.. बॉलीवूडला गेल्यावर ह्या गाण्याने कोट्यावधी रुपये मिळवले म्हणून आम्ही कोर्टात गेलो पण काहीच सिद्ध करू शकलो नाही.." हीच कथा लांगा मांगनियार लोकांची "निमुडा " ह्या गाण्याबद्दल घडली.

पाकिस्तान आणि भारतातील लोक कलाकार 'निमुडा' असे गातात.. https://www.youtube.com/watch?v=BC1PgcP2U_s

गोची अशी आहे.. कि 'लोक' म्हंटल्यावर ते लोकांचे होऊन जाते.. कुणा एकाचे उरत नाही.. म्हणतात ना " जो सबका है वो किसीका नही "म्हणून उचलेगीरीला आळा घालणे कठीण. पण आता अनीशभाई प्रधान आणि शुभादीदी मुद्गल हे दोघे कलावंतांच्या कॉपी राईट साठी खूप काम करत आहेत.. त्या त्या समाजाच्या नावाने संगीत कोपी राईटेड करता येईल अश्या शक्यता तपासून बघितल्या जात आहे. जिथे प्रचंड मोठा व्यवसाय होतो तिथेच ही अडचण होते, मी वर्गातल्या मुलांना आदिवासी गाणी शिकवते त्याला कुठल्याही आदिवासी मित्राने विरोध केला नाही अजून तरी.

चार वर्षांनी 'दिलतितली' म्हणून लिहितांना मला मजा वाटतेय.
बाय द वे, आदूबाळ म्हणजे काय? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

अच्छा. धन्यवाद!

(आदूबाळ हे कॉलेजमध्ये माझं टोपणनाव होतं Smile )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

" आदूबाळ म्हणजे आद्य बाळ" - शुचि
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

आदूबाळ म्हणजे आद्य बाळ Wink
___
दिलतितली या शब्दाला काही विशेष अर्थ आहे का? मला नाव आवडलही होतं अन कुतुहलही होतं. पण तुम्ही फारशा दिसला नाहीत मग विचारायचं कोणाला? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"आदूबाळ म्हणजे आद्य बाळ."
वा.
मग बरोबरे.

शुचि.. लिहिणे ही अडचण वाटते मला म्हणून ऋषिकेश आणि जंतू ह्यांनी मुलाखत घेतली.
पण नक्की प्रयत्न करेन.

दिल आणि तितली हे शब्द जोडून घेतलेत Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

ओके थँक्स Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ससुराल गेंदा फूल', 'निंबुडा' या गाण्यांच्या उल्लेखावरून आठवलं.
दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित 'ओये लक्की, लक्की ओये' या चित्रपटात स्नेहा खानवलकरने संगीत दिलेलं 'तू राजा की राजदुलारी' हे गाणं हरयाणा-चंदीगढ प्रांतातल्या 'रागिणी' या लोकगानप्रकारातून घेतलं आहे. हा रागिणी प्रकार रात्रभर चालतो. एका पाठोपाठ एक गायक रंगमंचावर येतात नि प्रेक्षकांसाठी रागिणी गातात. स्नेहा खानवलकर या गाण्यासाठी त्या प्रांतांत खूप भटकली नि संशोधन करून तिथल्याच एका रागिणी गाणार्‍या मुलाला चित्रपटातलं गाणं गायला दिलं. ते गाणं तयार होत असताना दिबाकरने ऐकलं नि त्याला एक पट्टी वर गायला सांगितलं. त्या पट्टीत त्याचा आवाज खरखरीत होत होता, चिरकत होता नि त्यामुळे चित्रपटाच्या प्रसंगासाठी ते अधिक चपखल झालं.

तू राजा की - मूळ रागिणी

तू राजा की - स्नेहा खानवलकर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्नेहाने 'लोक'ते 'लोकप्रिय'ची नस घट्ट पकडली आहे..
रागिणी मस्तच.
M TVचा sound trippin हा कार्यक्रम स्नेहाचा खास शो.
निरनिराळ्या प्रदेशात जाऊन तिथल्या कलाकारांना भेटून तिथले विशिष्ट ध्वनी मुद्रित करायचे..
प्रादेशिक संगीत पण मुद्रित करायचे आणि त्यातून नवीन कंपोझिशन तयार करायचे..
https://www.youtube.com/playlist?list=PL9C6D0636DFB902D3
ह्या कार्यक्रमामुळे आणि gangs of वस्सेपूरमुळे स्नेहा आपल्या सर्वांना माहित झाली.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

स्नेहाच्या या प्रकल्पाबाबत माहिती नव्हती. धन्यवाद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलाखत आवडली. सकारात्मक शोधण्याचा दृष्टिकोनही आवडला. फीती आणि फोटो जोडल्यामुळे वाचताना आणखीनच मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आणि मी जुने धागे उसवत बसलेय इथे काल पासून..
स्मरणरंजनात रमलेय.. मस्त वाटतेय..
श्रामो होते तेंव्हा इथे .. लिहायला भाग पडायचे मला. Smile

खूप आभार अदिती.
दिवाळी शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

एकेकाचं अनुभवविश्वं माझ्या सारख्या सामान्यालाही काही अंशी समृद्ध कसं करतं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा लेख! दिलतितली ह्यांना मनापासून धन्यवाद!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

अनामिक,
तुमचे खूप आभार..
ऐसी वर अधिक वेळ थांबता येईल अश्या प्रयत्नात आहे सध्या.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

ऋषिकेश व चिंतातूर जंतु

तुम्ही घेतलेल्या ह्या मुलाखतीची लिन्क सर सि व्हि रमन पुरस्कार समितीला कुणीतरी पाठवली..
ही मुलाखत वाचून निवड समितीने मी आदिवासी संगीतात करत असलेल्या सन्शोधनाबद्दल मला हा पुरस्कार दिला..
https://www.facebook.com/prachidublay/posts/10208243700631687

ऐसीचे अनेक आभार
दिलतितली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

अभिनंदन प्राचि!! अतिशय चांगली बातमी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्राची, अभिनंदन.

(दिवाळी अंक काढल्यावर तो लोकांपर्यंत पोहोचत आहे, कोणीतरी अंक वाचतात हे वाचून आनंद झाला तो निराळा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जबरदस्त! हार्दिक अभिनंदन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अभिनंदन!
आम्ही केवळ निमित्तमात्र!
==

पण तरी... एक ऐसीकर म्हणून खूपच छान वाटलं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अभिनंदन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अभिनंदन दिलतितली ! आणि पुढल्या संशोधनासाठी अभीष्टचिंतन.
पुरस्काराचे स्वरूप नि संबंधित बातम्या इथे आणि इथे सापडतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक आभार मित्रांनो ..
Smile Smile Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!