Skip to main content

समाजसेवकांमुळे समाजाचा नक्की कोणता फायदा होतो?

अखेर या लेखनातील या प्रतिक्रियेचा आवाका, वेगळी विस्ताराने चर्चा करण्याइतका मोठा वाटल्याने वेगळा धागा काढत आहोत. -- संपादक

या लेखनावरून आणि इतरही चर्चांमधून एक मूलभूत प्रश्न मला पडला आहे. त्यावर वेगळी चर्चा झाली तरी चालेल.
तो प्रश्न असा की - "समाजसेवकांमुळे समाजाचा नक्की कोणता फायदा होतो?"

या प्रश्नाला अनेक पैलू आहेत. हा प्रश्न मी कोणतीही भूमिका घेऊन किंवा कसल्याही अभिनिविशाने करत नाही.
त्याला आजच्या काळाचाही पदर आहे. समाजसेवा ही आता पदरमोड करून करायची गोष्ट राहिलेली नाही.
कोणतेही एन.जी.ओ. ही अत्यंत व्यावसायिक पद्धतीने चालते. एम.एस. डब्ल्यू. केलेल्या कार्यकर्त्यांच्या फळ्या या समाजसेवेकडे आयुष्यभराचे एक करियर म्हणून पाहतात.
त्यांच्यातही 'जॉब' बदलणे, सेवाज्येष्ठता, भविष्याची तरतूद, स्वतःची संघटना काढणे या व्यावसायिक बाबी आलेल्या आहेत.
ज्यांच्यासाठी ही सेवा केली जाते ते बाहेरून अशिक्षीत, गरीब, अडाणी वगैरे वाटत असले तरी जोवर त्यांचा या 'सेवेतून' होणारा 'फायदा' त्यांना स्पष्टपणे कळत नाही
तोवर ते या कार्यात सहभागी होत नाहीत. शिवाय हा फायदाही बर्‍याच वेळा एका विशिष्ट प्रश्नापुरताच आणि काळापुरताच मर्यादित असतो.
एन.जी,ओ. सुद्धा बर्‍याच वेळेला उद्योजक आणि जनता यांच्यातला (बरा-वाईट) दुवा म्हणून काम करतात. त्यात विविध मार्गांनी भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप होत असतात.

थोडक्यात कोणत्याही व्यवसायापेक्षा हे कार्य वेगळे नाही. तरीही 'समाजसेवा - समाजकार्य' हे क्षेत्र पवित्र असल्याचे एक सर्वसाधारण चित्र लोकांच्या मनात असते.
पण असे असेल तर एखाद्या सामाजिक घटकासाठी बाहेरून आलेले समाजसेवक नक्की काय करतात? ते असल्याने त्या-त्या समाजाचा नक्की कोणता फायदा होतो? ते नसले तर (म्हणजे त्यांच्यावर होणारा खर्च झाला नाही तर) जी आर्थिक बचत होईल त्यामुळे एकूण समाजाचा जास्त विकास करता येईल काय?

असे म्हणतात की एकूण सरकारी खर्चातले रुपयातले दहा पैसे प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोचतात. बाकीच्या पैशांची गळती सरकारी यंत्रणेमुळे होते.
असेच एन.जी.ओ. आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या यंत्रणेच्या बाबतीत होत आहे का?

नितिन थत्ते Thu, 26/04/2012 - 17:11

एनजीओंचे प्रकार असतात.

काही एनजीओ या प्रशिक्षित समाजसेवकांनी काढलेल्या असतात त्यामध्ये काम करणारेही प्रशिक्षित समाजसेवक असतात. अर्थात त्यातल्या अ‍ॅडमिनच्या कामासाठी साधे लोकही असतात.

काही एनजीओ या विशिष्ट कॉजसाठी काढलेल्या असतात. संस्थाचालकांना त्या कॉजविषयी वाटणारी कळकळ आणि कधीकधी अभिनिवेश यांच्या जोरावर संस्था चालते. यांना खरेतर प्रशिक्षित समाजसेवकांची गरज भासत नसते. पण काही बाबतीत सरकारी नियमांसाठी त्यांना प्रशिक्षित समाजसेवक ठेवावे लागतात.

काही संस्था खरोखरच विसुनानांनी म्हटल्याप्रमाणे सरकारच्या फ्रंट म्हणून काम करतात. म्हणजे सरकारी योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी या संस्था करतात. उदा. क्षयरुग्णांचे उपचार मॉनिटर करणे वगैरे.

वैयक्तिक पदरमोड करून कुठलीही संस्था चालत नाही. बहुतेक वेळा सार्वजनिक देणग्या, सरकारी अनुदाने आणि संस्थात्मक अनुदानांवर (उदा. फोर्ड फाउंडेशन) या संस्था चालतात.

प्रत्यक्ष ज्याच्यासाठी काम करायचे आहे त्यासाठी किती पैसा खर्च होतो हे मोजणे बहुधा अशक्य आहे (आणि कदाचित अन्यायकारक). स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करणारी संस्था (उदा. स्त्रियांच्या छळाबाबत) ही प्रत्यक्ष त्या स्त्रियांसाठी काहीही पैसा खर्च करत नसू शकेल. तसा खर्च करण्याची अपेक्षाही त्या संस्थेकडून कोणी करणार नाही. ती संस्था फारतर आणीबाणीच्या प्रसंगी तिला मदत उपलब्ध करून देणे, तिचे आणि तिच्या कुटुंबियांचे समुपदेशन करणे वगैरे कामे करीत असेल. म्हणजे होणारा खर्च हा सगळा त्या समाजसेवकांच्या वेतनावरच होत असेल.

पांढरा ठसा सुरू मुंबईत एक अर्भकालय आहे. त्याचे ध्येय अनाथ मुले मिशनर्‍यांकडे जाण्यापासून रोखणे असे होते. त्या संस्थेने ३० वर्षांत हजार मुले हिंदू पालकांकडे सोपवली. ३० वर्षांत त्या संस्थेने कोट्यवधी रुपयांचा व्यवहार (देणग्या, खर्च) केला असेल. एवढा खर्च आणि ३० वर्षांत म्हटले तर फक्त १००० मुले ख्रिश्चन होण्यापासून वाचली असा ताळेबंद मांडला जाऊ शकेल. पण तसा मांडणे अयोग्य असेल कारण या तीस वर्षांच्या काळात संस्थेने विविध मार्गाने समाजात जागृती केली आहे. उदा. मूल नको असल्यास त्याला कचराकुंडीत टाकायची गरज नाही. अशा संस्था त्या मुलांना अधिकृतपणे सांभाळायला घेऊ शकतात. त्या मुलाच्या मातेला कसलाही त्रास होत नाही. आज प्रसूती करणारे डॉक्टरही त्या मातेला हा मार्ग दाखवतात. या जागृतीतून डॉक्टर लोकांनी आणखीच वेगळे मार्ग निर्माण केले आहेत ही बाब अलाहिदा. पांढरा ठसा संपला.

आतिवास Thu, 26/04/2012 - 18:49

विसुनाना, एक चांगला प्रश्न चर्चेसाठी मांडल्याबद्दल आभार. वेळ थोडाच आहे सध्या हाताशी त्यामुळे माझे या विषयावरचे (विस्कळीत) विचार थोडक्यात मांडायचा प्रयत्न करते आहे.

'समाजसेवकांमुळे समाजाचा नक्की कोणता फायदा होतो?' या प्रश्नात अनेक उपप्रश्न आहेत. हे प्रश्न मी तुम्हाला विचारते असे नाही हे कृपया लक्षात घ्यावे. हे माझ एक स्वगत आहे जे मी मोठयाने बोलते आहे इतकंच - गैरसमज नसावा. या प्रश्नांची माझी उत्तरं वेळोवेळी बदलतात त्यामुळे मी अद्याप निष्कर्षाला आलेली नाही - येऊ शकलेले नाही.

१. समाज हा काही एकसंध घटक नाही - कधीच नसतो, नसणार. समाजातल्या विविध घटकांचे हितसंबंध अनेकदा एकमेकांच्या विरोधात असतात. त्यामुळे नक्की कोणत्या समाजाचा फायदा असा प्रश्न संदर्भाने विचारावा लागतो. समाजातल्या हितसंबंधात एक सत्तासंबंध असतो - तो फक्त आर्थिक सत्तेतून येतो असे नाही - तो धर्म, जात, शिक्षण, जमिनीची मालकी, वय, लिंग अशा अनेक स्तरांवर असतो. व्यक्तीची ओळख एकपदरी नसून अनेकपदरी असते आणि हे अनेक पदर गुंतागुंत निर्माण करतात पण ते एक बलस्थानही असते.

२. 'सेवा' शब्दही दोन अर्थांनी साधारणपणे वापरला जातो - निरपेक्ष सेवा, त्यागमयी सेवा हा एक अर्थ आणि 'service' - पोस्टाची सेवा, दळणवळणाची सेवा या अर्थाने. त्यातली कोणती समाज'सेवा' आम्हा लोकांना आज अपेक्षित आहे? त्याग करून सेवा? की मोबदल्याचा योग्य परतावा देणारी सेवा? सेवेच्या पहिल्या अर्थापासून दुस-या अर्थाकडे आमचा प्रवास कसकसा झाला?

३. फायदा कशात मोजायचा? पैशांत? ज्ञानात? आत्मविश्वासात? स्व-प्रतिमेत? सबलीकरणात? सामाजिक ताकदीत? नव्या कौशल्यात? समजा पैसा मिळाला पण आत्मविश्वास नाही वाढला तर त्याला फायदा म्हणायच का? आत्मविश्वास वाढला पण गरीबी कायम राहिली तर त्याला फायदा म्हणायचं की नाही? फायद्याची परिभाषा जे त्या प्रक्रियेतून जातात त्यांनी ठरवावी की त्या प्रक्रियेच्या बाहेर असणारांनी? त्याचे पुन्हा काय फायदे-तोटे?

४.अल्पकालीन फायदा आणि दीर्घकालीन फायदा - याचे तारतम्य कोणी राखायचे? कोणी मोजमाप करायचे?

५.सामाजिक प्रश्नांचे आकलन होण्यासाठी नेमकी काय कौशल्ये लागतात आणि त्यातले प्रशिक्षणाने नेमके काय काय मिळवता येते? हे आकलन जे त्या प्रश्नांत अडकलेले असतात त्यांच्याकडे नसते (किंवा कमी असते) हे गृहितक वस्तुस्थितीवर आधारित आहे? की ती आपण निर्माण केलेली एक प्रतिमा आहे?

६. नैसर्गिक/मानवनिर्मित आपत्तीच्या काळात असणा-या कामाची गरज, रचनात्मक कामाची गरज, संघर्षात्मक कामाची गरज, धोरणात्मक परिवर्तन घडवून आणण्याची गरज .. यातली गुंतागुंत, त्यांचे एकमेकांशी नाते रोचक आहे.

७.आंतरराष्ट्रीय स्तरावर विकासाच्या संकल्पनेत जे बदल होते गेले - त्यातून सामाजिक कामाची आमची संकल्पना कशीकशी बदलत गेली हे पाहणेही रंजक आहे. जागतिकीकरणाचा रेटा या सगळ्याला कशी दिशा देतो याचाही नीट अभ्यास करायला हवा - (कोणीतरी!)

८. 'कल्याणकारी राज्य'ही संकल्पना आता अडचणीची ठरत आहे त्यामुळे सरकारचाही कल दिवसेंदिवस 'व्यवस्थापन' इतकाच होत चालला आहे का? सरकारने योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी एन.जी.ओ.क्षेत्राला कसे पाठबळ दिले हेही तपासून पाहायला हवे.

९. एन. जी. ओ. आणि त्यातले लोकही याच समाजातून येतात त्यामुळे त्यांच्या कामात, कार्यशैलीत एक मोठी रेंज दिसते. एन.जी.ओ आणि 'समाज' यांचा एक प्रकारचा सत्तासंबंध गेल्या काही काळात प्रस्थापित झालेला दिसतो आहे. यातून नेमका कोणाचा काय फायदा झाला - हा प्रश्न आहेच. एन. जी.ओंच्या हितसंबंधांबाबत अनेकदा लिहिले, बोलले गेले आहेच.

१०. समजा (कल्पना करायला काय हरकत?) सामाजिक काम आणि तथाकथित समाजसेवक यावर कायद्याने बंदी आणली तर त्याचे काय काय परिणाम होतील? समाजाचा त्यातून नक्की काय फायदा होईल? काय नुकसान होईल?

ऋषिकेश Fri, 27/04/2012 - 08:36

In reply to by आतिवास

बापरे! केवढे कंगोरे आहेत.. तुमचं हे स्वगत - लाऊड थिंकिंग - वाचून पुढील चर्चा वाचायची उत्सूकता वाढलीये..
बाकीचे (नेहमीचे) यशस्वी कलाकार कुठे आहेत?

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 05/05/2012 - 04:36

In reply to by ऋषिकेश

आतिवास, नितिन आणि विसुनाना यांच्याकडून पुढे वाचायला निश्चितच आवडेल.

विसुनाना Fri, 04/05/2012 - 15:44

In reply to by आतिवास

क्षमस्व! गेले १० दिवस सतत प्रवासात असल्याने या चर्चेत पुढे भाग घेता आला नाही. पण ही चर्चा इथेच का खुंटली हेही कळले नाही. :(

विसुनाना Mon, 07/05/2012 - 11:36

In reply to by नितिन थत्ते

अतिवास यांनी उभे केलेले प्रश्न हे माझ्याच प्रश्नाचे उपप्रश्न आहेत असे म्हणता येईल. किंबहुना मला जे जाणवत होते ते असेच काहीसे होते, त्याला त्यांनी शब्दरूप दिले आहे.
सध्या जे सामाजिक कार्य म्हणून चालले आहे ते मुळात प्रत्येक गोष्टीतील अर्थकारणावर (आणि पर्यायाने सत्ताकारणावर) अवलंबून आहे. समाजसेवक आणि कार्यकर्ते आपल्या फायद्याकडे पाहून समाजकार्य/चळवळी/संघर्ष करत असतात. किंबहुना मूळ प्रश्नाची सोडवणूक करण्यापेक्षा त्यावरून उठणार्‍या गदारोळामुळे आपली काय भौतिक प्रगती होते याकडेच त्यांचे जास्त लक्ष असते की काय? असे अनेक उदाहरणांवरून दिसते.(अपवाद असतील, नाकारत नाही.) पण 'निरलस समाजसेवा' नावाचा प्रकार अस्तित्त्वात आहे की नाही? असा प्रश्न पडतो. (कदाचित तो पूर्वीही नव्हता असे कोणी म्हणेल. पण त्याचे इतके नग्न, बकाल रूप जाणवत नव्हते.) मध्यंतरी आनंदवनाला मिळालेल्या एका काळ्या देणगीचा काही (सच्च्या) लोकांनी निषेध केला तो या प्रकारच्या स्पॉन्सर्ड समाजसेवेविरोधातच होता असे वाटते. पुढे लिहीन...

श्रावण मोडक Mon, 07/05/2012 - 12:15

'समाजसेवक' हा शब्द 'समाजसेवा' शब्दावरून घ्यायचा की 'समाजसेवा' हा शब्द 'समाजसेवक' शब्दावरून घ्यायचा?
पत्रकारितेच्या व्यवसायात होतो तेव्हाचं आठवतं. ज्येष्ठांनी सांगितलं होतं की, समाजसेवक हा शब्द कोणालाही जोडायचा नाही. मला वाटतं, त्या काळात बाबा आमटे यांनाच आम्ही हा शब्द लावत असू*. बाकी कोणीच नाही. त्या सर्वांसाठी त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रानुसार 'कार्यकर्ता' असेच म्हणत असू (उदा: मेधा पाटकर - सामाजिक कार्यकर्त्या, सुंदरलाल बहुगुणा - सामाजिक कार्यकर्ते). 'व्यावसायीक सामाजिक कार्यकर्ते' असाही शब्दप्रयोग वाचला आहे. त्याचेच एक रूप 'व्यावसायीक समाजसेवक' (यातील अंतर्विरोधाकडे दुर्लक्ष करूया, शब्द स्वस्त होतात ते असेच) असेही पाहिले आहे. सामाजिक कार्य आणि सामाजिक सेवा यात असा काही तरी सुप्त भेद असतो, दिसतोही.
आधी समाजसेवा, मग, ती करणारा तो समाजसेवक असेच असावे आणि असे असेल तर समाजाचा समाजसेवकांमुळे फायदाच झालेला असणार हे नक्की.
समाजसेवा या शब्दाची व्याख्या करताना आपण चारेक मापदंड टाकू, मग त्या मापदंडात बसणारी प्रत्येक कृती ही समाजसेवा ठरवू आणि त्या फायद्या-तोट्यांकडे पाहू... असे झाले की फजिती होणारच. ती टाळायची असेल तर मात्र मी सारासार विवेक वापरूनच समाजसेवा कशाला म्हणायचे हे ठरवेन.
वृक्षारोपण हे एकच काम समाजसेवा म्हणता येईल आणि समाजाचे अहित करणारेही म्हणता येते. मोनोटोनस जंगलं उभी राहणारं वृक्षारोपण गैर, नगदी वृक्षारोपण गैर... खरं जंगल उभं करणारं वृक्षारोपण योग्य, नगदीपणाचा हेतू नसलेलं वृक्षारोपण योग्य... असे हे करता येतेच. पुन्हा यात नगदी वृक्षारोपण सरसकट गैर असेलच असंही नाही.
सारासार विवेक वापरून पाहिलं तर, व्यावसायीक सामाजिक कार्यकर्तेदेखील समाजाचा फायदा करून देतातच. आता, त्यांनी सामाजिक कार्य (आपल्या चरितार्थाची कमाई त्यातूनच मिळवत) करावयाचे ठरवले असताना आपण त्यांना 'सामाजिक सेवा' या मापदंडात पाहू जावं आणि मग कुठं तरी खुट्ट होऊन 'ही कसली समाजसेवा?' असा प्रश्न आपल्याला पडावा हे घडणारच. मग तिथं ते व्यावसायीक रीतीनं होणारं सामाजिक कार्यही आपण नाकारणार का? ते न नाकारता, मापात पाप न करता त्याचे मूल्यमापन करणे हिताचे.
उद्या प्रकाश आमटे, विकास आमटे, अभय बंग (ही नावे उदाहरणादाखल) यांनाही आपण समाजसेवक म्हणू लागलो तर तो आपला दोष आहे. त्याबद्दल त्यांना जबाबदार ठरवण्यात अर्थ नाही. ते काम करतात, त्यातूनच त्यांचा चरितार्थही** चालतो. अशी माणसं समाजात गरजेचीच असतात. त्या भूमिकेसाठी त्यांनी काही त्याग केला असतोच. त्या त्यागाची भरपाई त्यांना मिळणाऱ्या मानसन्मानातून होत असते. तो मानसन्मान समाजाने त्याला दिला नाही तरी ती सेवा ठरत नाही, तर तो समाजाचा करंटेपणा असतो. अशा स्थितीत उद्या त्यांच्याकडून काही चूक झाली तर त्यापोटी समाजसेवा या शब्दाला वावगे ठरवण्यात अर्थ नाही, कारण आपणच तो शब्द अस्थानी वापरलेला असतो.
पदरमोड करून काम केले जाते यात मला तथ्य वाटत नाही. तसे काम केले जाऊ नये असेही माझे मत आहे.
सेवा आणि कार्य/काम यातील तफावत नेमकी पकडली तर, मला वाटतं, बऱ्याच गोष्टी, निदान वैयक्तिक धारणांसाठी, स्पष्ट होतील.
* बाबांचाही असा उल्लेख सरसकट केला जायचा नाहीच. त्यांची पूर्वपुण्याईच समाजसेवा सदरात बसते, एरवी आता ते समाजसेवक वगैरे नाहीत, असे एका ज्येष्ठांनी काही दाखले देत पटवून दिल्याचे आठवते. हे अर्थातच माझ्या वैयक्तिक अनुभवातले आहे. त्याचे सार्वत्रिकीकरण नको.
** चरितार्थाचा स्केल बदलतो. गांधीवादी म्हणून अंगावर खादीची बंडी असते, पण माणूस लक्झरियस म्हणता येईल अशा चारचाकीत असतो (पुण्यातले असे 'समाजसेवक' कुणाला आठवले तर तो योगायोग समजावा). अंगावर रीतसर व्यावसायीक कपडेच असतात आणि एसटीने प्रवास करतो असाही माणूस असतोच (कुणाला एकदम विदर्भातले कोणी आठवले तर तोही योगायोग समजावा). १९९० च्या मध्यावर अचानक अशी माणसं विमानप्रवास करू लागली होती, तेव्हा असे काही प्रश्न उपस्थित झाले होते, त्या चर्चा आठवल्या. पूर्वी असा विमानप्रवास बहुदा सरकारकडून तिकीट काढून मिळाले की व्हायचा. खाऊजाचा सामाजिक कार्याच्या स्केलवर असाही एक परिणाम झाला आहे हे फक्त त्यावेळी लक्षात आले.

विसुनाना Mon, 07/05/2012 - 15:51

In reply to by श्रावण मोडक

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

सामाजिक कार्य आणि सामाजिक सेवा यात असा काही तरी सुप्त भेद असतो, दिसतोही.

-एकदम योग्य.

आधी समाजसेवा, मग, ती करणारा तो समाजसेवक असेच असावे आणि असे असेल तर समाजाचा समाजसेवकांमुळे फायदाच झालेला असणार हे नक्की.

-'आधी' कशाला? माझ्या पहाण्यात आजही असे 'समाजसेवक' आहेत. निदान दोन तरी.

ते काम करतात, त्यातूनच त्यांचा चरितार्थही** चालतो. अशी माणसं समाजात गरजेचीच असतात. त्या भूमिकेसाठी त्यांनी काही त्याग केला असतोच.

- त्यागाची 'गरज' कोणाला असते? समाजाला की कार्यकर्त्याला? 'आपण समाजकार्य करत आहोत' याचे स्वसमाधान असणे ही त्या व्यक्तीची गरज असावी. मग त्यापोटी केलेल्या कोणत्याही गोष्टीला त्याग कसे म्हणावे?

त्या त्यागाची भरपाई त्यांना मिळणाऱ्या मानसन्मानातून होत असते.

-त्यागाची भरपाई? हे काही समजले नाही.

पदरमोड करून काम केले जाते यात मला तथ्य वाटत नाही. तसे काम केले जाऊ नये असेही माझे मत आहे.

-हो, केले जाते. अशा लोकांना इतर लोक 'वेडे' म्हणतात हेही पाहिले आहे आणि त्याची खंतही वाटते. मानसन्मान - देणग्या - सत्कार -थैल्या यांची थोडीही कदर न करता सातत्याने काम करणारा एक माणूस पाहिला आहे. (पगार सुरू असताना त्यातून खर्च करून आणि आता पेन्शनीत निघाल्यावरही त्यातून खर्च करून.) पण त्याला कोणीही समाजसेवक म्हणत नाही. पुढे त्या कार्यकर्त्याची 'नाही चिरा नाही पणती' अशी अवस्था होणार हेही स्पष्ट दिसते आहे. या उदाहरणासमोर इतर कितीही मोठमोठी नावे आली की त्यांच्यामागे असलेला बाह्य (भलाबुरा) मदतीचा ओघ आठवतो, इन्कमटॅक्स मधून सूट देणार्‍या दान - आवाहनांच्या आकर्षक जाहिराती आठवतात आणि मग त्या नावांचे वलय काळवंडू लागते.

श्रावण मोडक Mon, 07/05/2012 - 19:46

In reply to by विसुनाना

त्यागाची 'गरज' कोणाला असते? समाजाला की कार्यकर्त्याला? 'आपण समाजकार्य करत आहोत' याचे स्वसमाधान असणे ही त्या व्यक्तीची गरज असावी. मग त्यापोटी केलेल्या कोणत्याही गोष्टीला त्याग कसे म्हणावे?

त्यागाची 'गरज' नसावी. मला वाटत नाही गरज असते असं. त्या स्थितीचं एक वर्णन तसं केलं जातं इतकंच. कोणी त्याग करो वा न करो, समाज ही प्रक्रिया आपापली उत्तरं शोधत असतेच. रादर, ही उत्तरं ही मंडळी देत असतात तेव्हा ती समाजाचाच एक भाग असतात. त्या प्रक्रियेचाच एक भाग असतात. त्यांना वेगळं काढून विचार करता येणार नाही. त्यामुळं, स्वसमाधान ग्राह्य धरले की विषयच संपतो.

त्यागाची भरपाई? हे काही समजले नाही.

हं... हे थोडं धूसरच झालंय माझ्याकडून.
एमबीबीएस केल्यानंतर शहरात डॉक्टरकी न करता ग्रामीण भागात बुद्ध्याच स्थिरावणारी व्यक्ती, तिथं वेगळ्या रीतीनं वृत्ती सांभाळणारी व्यक्ती. तिनं शहरातील सुखोपभोगांचा त्याग केला असं, क्वचितच ती व्यक्ती सोडून, इतर सर्वच म्हणतात. त्या त्यागाचं रिकग्नीशन समाज करतो तो त्या व्यक्तीचा सन्मान करून.
हे आणि एवढंच मला म्हणायचं आहे. यात इतर पोटभेद खचितच आहेत. पण माझा मुद्दा नाही तो.

(पदरमोड करून काम केले जाते). अशा लोकांना इतर लोक 'वेडे' म्हणतात हेही पाहिले आहे आणि त्याची खंतही वाटते.

हो. अशी माणसं मीही पाहिली आहेत. आजही आहेत. मी त्यांचा विचार केला नाही. मी रूढ अर्थाने विषयानुरूप समाजसेवक किंवा कार्यकर्ते यांचा विचार करून लिहिलं की, "पदरमोड करून काम केले जाते यात मला तथ्य वाटत नाही. तसे काम केले जाऊ नये असेही माझे मत आहे."

आतिवास Mon, 07/05/2012 - 23:43

In reply to by श्रावण मोडक

'त्याग' शब्द कोण वापरतं यावर बरंच काही अवलंबून असतं.

म्हणजे एखादी व्यक्ती 'मी त्याग केला' असे म्हणते की समाज (किमानपक्षी समाजातले काही लोक) म्हणतो की 'या व्यक्तीने समाजासाठी त्याग केला'? यावर बरेच काही ठरते. म्हणजे 'मी त्याग केला' असे फक्त मीच म्हणत असेन तर तो अनेकदा समाजाच्या मतानुसार त्याग नसतोही. शिवाय त्यागाची कल्पना काळानुसार बदलते - आज ज्याला त्याग समजले जात नाही त्याला उद्या त्याग मानले जाईल किंवा नेमके त्याच्या उलटेही घडेल.

एखादेवेळी समाजाला मी त्याग केला असे वाटते पण वास्तविक मी फक्त माझे नावडते क्षेत्र बाजूला ठेवून माझे आवडते क्षेत्र निवडलेले असते - त्यात कदाचित लौकिक यश कमी असेल पण माझे समाधान असेल - तर तो माझ्या मते मी साधलेला स्वार्थ असतो तर इतरांच्या मते त्याग.

अशी ही एकंदर गुंतागुंतीची संकल्पना आहे 'त्यागा'ची.

'त्याग' हा सामाजिक कामाचा अपरिहार्य भाग आहे, ही संकल्पना बाजूला ठेवून पुढे विचार करता येईल का? त्याचे फायदे -तोटे दोन्ही आहेतच जसे सगळ्या गोष्टींत असतात तसे :-)

श्रावण मोडक Tue, 08/05/2012 - 10:28

In reply to by आतिवास

गुंतागुंत हा शब्द वापरणं बंद केलं आहे मी. ;-) म्हणून तुमच्याइतकं स्पष्ट लिहिलं नाही.

'त्याग' हा सामाजिक कामाचा अपरिहार्य भाग आहे, ही संकल्पना बाजूला ठेवून पुढे विचार करता येईल का? त्याचे फायदे -तोटे दोन्ही आहेतच जसे सगळ्या गोष्टींत असतात तसे

माझं तेच म्हणणं आहे. त्याग वगैरे काही नसतं, असं मी म्हणतोय तटस्थपणे. खरं तर, काही वेळेस मी याला ' 'अल्टरनेट' करियरची निवड ' असंही म्हणतो आणि त्याबद्दल फटके खातोही. प्रत्येक गोष्टीचा एक लाभ असतो आणि एक हानी असते. हानीला त्याग म्हणता येते. लाभाला हानीची प्रतिपूर्ती म्हणता येते... हे असे चालू राहू शकते.
तारतम्य :-) हा शब्द इथंही कामी येतोच... तेव्हा थांबतो. :-)

विसुनाना Tue, 08/05/2012 - 11:06

In reply to by श्रावण मोडक

'तारतम्य' शब्दावर मोडकांची गाडी येऊन थांबली म्हणजे काय? ते समजून चुकलो. चलो. ये ही ठीक है...!