Skip to main content

नावात काही आहे का?

६०-७० वर्षांपूर्वीच्या जमान्यात अशी पद्धत होती की मराठी (आणि भारतात अन्य प्रांतातहि) शिक्षित आणि मध्यमवर्गी समाजात नव्या जन्मलेल्या मुलामुलींची नावे बहुतांशी पुराणातील आणि रामायण-महाभारत-भागवतासारख्या ग्रंथातील देवदेवतांच्या नावावरून घेतलेली असत - जसे की शंकर, राम, विष्णु, लक्ष्मण, सीता, गंगा, पार्वती, उमा इत्यादि. माझा असा तर्क आहे की १९३०-४०च्या सुमारास शरच्चन्द्र, रवीन्द्रनाथ अशा लेखकांच्या प्रभावामुळे की काय आपल्याकडे नव्या धाटणीची नावे कानावर पडू लागली. १९३०च्या पुढेमागे जन्मलेल्या माझ्या तीन काकांची नावे चित्तरंजन, चैतन्य आणि चन्द्रशेखर अशी होती तर आत्याचे नाव होते कलावती. अशा धाटणीच्या दिलीप, आनंद, संतोष, प्रफ़ुल्ल, अरुणा, निर्मला, शैला, सुनंदा अशा नावांनी नंतरच्या चाळीस-पन्नास वर्षे आपला जम बसविला होता. माझे स्वत:चे नाव ’अरविंद’ अशाच प्रकारचे. हे नाव १९व्या शतकातील महाराष्ट्रात कोठे कानावर पडले असते असे वाटत नाही.

अलीकडच्या दिवसात असे दिसू लागले आहे की हीहि नावे आता कालबाह्य होऊ लागली आहेत. अलीकडचे तरुण आईवडील अधिक नव्या नावांच्या शोधात भारतीय परंपरेमध्ये आणि जुन्या वाङ्मयात अधिक खोल जाऊन नवनवी नावे शोधू लागले आहेत. आर्य, जय, वेद, अन्वय, अनुजा, यश, तेजस् अशी नावे अलीकडे सरसहा दिसू लागली आहेत आणि त्यांनी शंकर-विष्णु-सुनील-प्रकाश आणि अरुणा-शैला-सुनंदा-रंजनांना पूर्ण हद्दपार करून टाकले आहे.

ही नवी नावे शोधतांना आईवडील ह्याकडेहि विशेष लक्ष्य देतांना दिसतात की मराठी किंवा भारतीय नसलेल्यांनादेखील ते नाव सहज उच्चारता येते, कानी पडताच समजते आणि उच्चरणात त्यांच्याकडून त्याची फार मोडतोड होऊ शकत नाही. भारताबाहेर राहणार्‍यांना ह्याचे विशेष महत्त्व वाटते.

ह्याला माझा विरोध आहे असे अजिबात नाही. माझ्या एका भाच्याने आपल्या मुलीचे नाव ठेवले ’सानिका’. हा शब्द माझ्या माहितीचा नव्हता आणि म्हणून मी थोडया साशंकतेनेच त्याला नावाचा अर्थ विचारला. ह्या नावाचा अर्थ ’बासरी’ आहे असे त्याने मला सांगितले. मोनियर-विल्यम्सकडे चौकशी केल्यावर तो अर्थ योग्य निघाला आणि एक नवे, उच्चारायला सोपे, भारतीय परंपरेतले आणि सार्थ नाव प्रचारात येऊ पाहात आहे हे मला जाणवले.

सगळ्याच ठिकाणी अशी नवी आणि अर्थपूर्ण नावेच ऐकायला मिळतात असे म्हणता येत नाही. अंधुक प्रकारे संस्कृत/भारतीय परंपरेतील वाटणारी आणि कानाला गोड लागणारी नावे शोधण्याचा हा प्रयत्न नेहमीच यशस्वी होतो असे नाही. नाव सुचविणार्‍यांना आणि निवडणार्‍यांना नावाचा अर्थ कळत नाही अथवा जाणून घ्यायची आवश्यकता वाटत नाही. अशी ’पोकळ’ नावे सुचविणार्‍या डझनावारी वेबसाइट्स् समोर असल्याने त्यातून एक ’रेडीमेड’ नाव उचलण्य़ाचा सुलभ मार्ग असे आईवडील चोखाळतात आणि त्यातून हास्यास्पद/वाईट/निरर्थक/ अशी नावे दिली जातात.

हास्यास्पद वाटू शकणार्‍या शब्दाचे एक उदाहरण देतो. ’स्वप्निल’ असे नाव मी अलीकडे दोनचार जागी ऐकले. खरे पाहता असा शब्दच मुळात अस्तित्वात नाही आणि आपणच तो पाडलेला आहे पण ते ठीक आहे असे म्हणून सोडून द्या कारण ’स्वप्न’ ह्या शब्दाशी त्याचा संबंध सहज दिसतो आणि 'deamy-eyed' असा त्याचा अर्थहि लागू शकतो. मला अडचण दुसरीच दिसत आहे. आजचा गोड मुलगा स्वप्निल ६०-७० वर्षांनी आजोबा होईल तेव्हा त्याची नातवंडे त्याला ’स्वप्निलआजोबा’ अशी हाक मारू लागतील ह्याची मला काळजी वाटत आहे!

वाईट अर्थाचे पण सर्वत्र बोकाळलेले आजचे एक नाव म्हणजे ’वृषाली’. ’वृषल’ ह्या शब्दाचे सर्व अर्थ अप्रिय वाटणारे आहेत. उदाहरणार्थ ’वृषल’ म्हणजे दासीपुत्र. (माझ्यामुळे चन्द्रगुप्त सम्राट् झाला अशी चाणक्याची मुद्राराक्षसातील दर्पोक्ति आहे आणि तिची जाणीव प्रत्येकाला व्हावी म्हणून चाणक्य चन्द्रगुप्ताला ’वृषल’ असे मुद्दाम संबोधतो.) वृषली/वृषाली म्हणजे दासीपुत्री. अर्थ जाणून घेतला तर कोणी आपल्या मुलीला बुद्ध्याच हे नाव ठेवेल असे वाटत नाही. ’अहन्’ (दिवस) असेहि नाव माझ्या कानावर आलेले आहे तसेच मुलीचे नाव ’सनेयी’. (म्हणजे काय देव जाणे. संस्कृत असावे असे वाटत आहे आणि कानाला गोड लागत आहे. आईवडिलांना एव्हढे बस्स आहे!)

प्रत्यक्षातील परिस्थिति ह्याच्याहि पार पलीकडे जाऊन पोहोचली आहे. अलीकडेच वेबसाइटवरून उचललेली ’आरुष’ आणि ’रेधान’ अशी नावे माझ्या कानावर आली. ’आरुष’ म्हणजे ’सूर्याचे पहिले किरण’ इति वेबसाइट. ’आरुष’वाल्यांनी ह्या नावाला काही अर्थ आहे का असे मला विचारले म्हणून मी त्याच्या थोडा खोलात गेलो. ’आरुष’, ’आरुष्’, ’आरुश’ किंवा ’आरुश्’ असा कोणताच शब्द कोषात मिळत नाही. (’आरुषी’ म्हणजे मनूची मुलगी आणि और्वाची आई असा अर्थ मिळतो.) ’अरुष’ असा मात्र शब्द आहे आणि त्याचे अर्थ ’प्रकाशमान्’, ’अग्निदेवतेचा तांबडा अश्व’, ’सूर्य’, ’उष:काल’ असे दिलेले आहेत, ह्याचा ’सूर्याचे पहिले किरण’ ह्याच्याशी दूरान्वयाने का होईना काही संबंध पोहोचतो. तेव्हा हे नावच द्यायचे असले तर ते ’अरुष’ असे हवे, ’आरुष’ असे नको. शब्द अचूकपणे वापरणे ज्यांना महत्त्वाचे वाटते त्यांनाच ह्याची आवश्यकता पटणार.

’रेधान’ मात्र माझ्या बुद्धीपलीकडे आहे. हे पूर्णत: अर्थशून्य नाव आहे. हे नाव म्हणे सिनेतारा ऋतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान ह्यांनी आपल्या मुलास दिले आहे आणि त्यांच्या नावांतून एकेक भाग उचलून ते नाव निर्माण केले आहे. ह्यापलीकडे त्याला काही अर्थ नाही. तरीहि माझी खात्री आहे की आपले सर्व विश्व सिने/दूरदर्शन तारे/तारकांभोवती फिरत असल्याने हे अर्थशून्य नाव लवकरच सर्वत्र कानी येऊ लागेल.

तरुण आईवडील अपत्यांना नाव देण्यासाठी आपल्या पारंपारिक ठेव्याकडे आणि वाङ्मयाकडे वळत आहेत ही नक्कीच उत्तेजनार्ह आणि आनंदाची बाब आहे पण तसे करतांना त्यांनी दाखविलेल्या उथळपणामुळे ओशाळवाणे वाटते हेहि तितकेच खरे असे मी म्हणतो.

मन Thu, 12/04/2012 - 21:36

निधी हे नाव मुलींचे म्हणून ऐकल्यावर अशीच मौज वाटते. भाशेमध्ये इतरत्र "त्याने तो निधी परत केला नाही" अशा वाक्यांसकट पुरुषी रुपातच वापरतातंआवठेवताना मुलीला ठेवतात.

अरविंद कोल्हटकर Sat, 12/05/2012 - 02:12

In reply to by ............सा…

निधि म्हणजे समुद्र नव्हे तर साठा, समुच्चय इ. पयोनिधि म्हणजे पयसां निधि: पाण्याचा साठा, पर्यायी समुद्र.

चेन्नई संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीतकलानिधि ही पदवी एका मान्यवर गायकाला देते ह्याची येथे आठवण येते.

धनंजय Thu, 12/04/2012 - 21:52

निरर्थक नाव असले, तर काही हरकत नाही. "कैय्यट", "मम्मट", वगैरे निरर्थक नावे असलेले लोक आपल्या कार्याने संस्कृत-प्रेमींमध्ये चिरायू झालेले आहेत. असाधु नावात काहीही अपमान नाही, ही चर्चा पतंजलीने "यार्वाण" या सभ्य व्यक्तीच्या नावाच्या संदर्भात केलेली आहे.

"वृषाली" नावाचा वाईट अर्थ अप्रचलित असेल, तर नवा वाटेल तो चांगला अर्थ आईवडलांनी मानला तर चालेल. किंवा नुसता मधुर निरर्थक ध्वनी आहे, असे मानले तरी चालेल.

प्रचलित वाईट अर्थाचे नाव मात्र (प्रचलित प्रेमळ रूढी असल्याशिवाय*) ठेवू नये. मुलीचे नाव "नकोशी" ठेवणे म्हणजे क्रूरपणा होय.

(*प्रचलित प्रेमळ रूढी म्हणजे "नजर लागू नये"म्हणून प्रेमाखातर अभद्र नाव ठेवणे. "धोंडू", "भिकू", "गुंडो", "चिंधी" वगैरे. त्या समाजात सर्वांना ती रूढी माहीत असली, तर कोणी नाव अपमानास्पद मानत नाही.)

चेतन सुभाष गुगळे Thu, 12/04/2012 - 21:57

अमित आणि आशा पटेल यांच्या मुलीचे नाव अमिशा पटेल आणि मुलाचे नाव अश्मित पटेल असे आहे. दोघेही अभिनयक्षेत्रात आहेत. अमिशाचे नाव प्रसारमाध्यमांत अनेकदा अमिषा असे लिहीलेले आढळते. अमिष या शब्दाचा अर्थ लक्षात घेता अमिषा या शब्दालाही वावगा अर्थ प्राप्त होऊ शकतो. अर्थात, वाईट अर्थ काढायचा असेल तर कोणी तो 'सुलभा' या साध्या शब्दातही शोधू शकेलच.

घरांच्या नावांना पती पत्नीची नावे एकत्र करून देण्याची फॅशन आहे. प्रदीप व प्रज्ञा यांच्या घराचे नाव प्रज्ञादीप आहे म्हणून कोणा अभिजीत व सारिका या जोडप्याने स्वतःच्या घरास "अभिसारिका" असे नाव दिले तर किती अनर्थ होईल.

नितिन थत्ते Thu, 12/04/2012 - 22:08

पूर्वीचे लोक मंदा हे नाव का ठेवत असावेत?

मंदा याचा अर्थ 'मंद' असलेली असा होतो. (मंदा हे मंदाकिनीचे लघुरूप असू शकेल. परंतु मंदा असे स्टॅण्ड-अलोन नाव ठेवलेलेही पाहिले आहे).

चेतन सुभाष गुगळे Thu, 12/04/2012 - 22:19

In reply to by नितिन थत्ते

मंद म्हणजे नेहमीच वाईट अर्थ नव्हे. मंद म्हणजे सौम्य. जसे की, चंद्राचा प्रकाश मंद असतो.

तसेही, पुरुषप्रधान संस्कृतीत मंद स्त्रीस पत्नी म्हणून प्राधान्य मिळण्याचा संभव जास्त असणारच, नाही का?

राजन बापट Thu, 12/04/2012 - 22:26

सुनीता देशपांड्यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेला एक किस्सा आठवतो. त्या आणि पु ल एका घरात रहायला गेले त्याचं नाव "रसना" असं होतं. नंतर त्यांना कळलं की मूळ जागेची मालकी तीन भावांकडे होती आणि त्यांच्या नावांच्या पहिल्या अक्षरांना मिळून र-स-ना असं नाव बनवलं होतं. पुलंनी (अर्थातच) पुढील सेकंदाला उद्गार काढले : "घराचं नाव रसनाच्या ऐवजी नासर ठेवलं नाही हा चांगलाच योग आहे म्हणायचा !"

असो. उपरोक्त लिखाणात निरर्थक नावे ठेवू नयेत असा काहीसा सूर दिसला तो रोचक वाटला. माझं मत असं आहे की नवजात अपत्याचे पालक - मग ते कोट्याधीश सिनेस्टार्स असोत की कुणीतरी सामान्य परिस्थितीतले - त्यांना शब्दांच्या नेमक्या अर्थाची जाण, समज असेलच असं मानणं चुकीचं होईल. आईबाप प्रेमापोटी आपल्या अपत्याचं काही नामकरण करतात. दरवेळी ते अर्थपूर्ण असेलच असं नाही, तसा आग्रह धरलाच पाहिजे असं नाही.

आतिवास Thu, 12/04/2012 - 22:27

लेखाचे शीर्षक वाचून हा नेहमीच्या "नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा" या अंगाने जाणारा लेख असेल की काय अशी शंका आली होती. नावांचा अर्थ आणि तो समजून घेणे यावरचा तुमचा भर रोचक वाटला.

केवळ शहरी भागातच नावे बदलत चालली आहेत असे नाही. कपिल, आशिष, प्रियांका, ऐश्वर्या .. अशी नावे आता अगदी दुर्गम भागातही दिसतात - आणि का दिसू नयेत? आजी आजोबांना नातवंडाचे नाव नीट उच्चारताही न येणे हा केवळ कौटुंबिक नव्हे तर सामाजिक मनोरंजनाचा भाग असतो.

कमल, सुहास, रौनक.. अशी नावे मुलांचीही दिसतात आणि मुलीचीही दिसतात. एका संस्कृततज्ज्ञाने माझ्या नावावरून मला अक्षरशः पीडले होते - कारण सविता हे मुळात पुल्लिंगी नाव आहे - पण महाराष्ट्रात ते सरसकट मुलींचे नाव आढळते - आढळायचे. अनेक लोकांना त्यांच्या नावाचा नेमका अर्थ माहिती नसतो असा नेहमीच अनुभव आहे.

पण प्रचलित अर्थपूर्ण नाव घेणे आणि असलेल्या नावाला अर्थ प्राप्त करून देणे - हे दोन्हीही मार्ग योग्यच आहेत.

चेतन सुभाष गुगळे Thu, 12/04/2012 - 22:38

In reply to by आतिवास

एका संस्कृततज्ज्ञाने माझ्या नावावरून मला अक्षरशः पीडले होते - कारण सविता हे मुळात पुल्लिंगी नाव आहे - पण महाराष्ट्रात ते सरसकट मुलींचे नाव आढळते - आढळायचे. >>

होय, आमच्या संस्कृतच्या अध्यापकांनी हे नाव पुल्लिंगी आहे असे सांगितले तेव्हा मी त्यांचा प्रतिवाद केल्याचे आठवते. मी त्यांना सांगितले की तुमच्या आधी संस्कृत शिकविणार्‍या बाईंनी अकारान्त नावे पुल्लिंगी व आकारान्त नावे स्त्रीलिंगी असतात असे सांगितले होते, मग सविता पुल्लिंगी कसे? तर ते उत्तरले की, सविता हे संबोधन रूप (आठवी विभक्ती) आहे. मूळ नाव सवितृ (ऋकारान्त) आहे. ते सूर्याचे नाव आहे. त्यांनी पुढे असे सांगितले की गोविंदा हेही संबोधन रूप आहे गोविंद या मूळ पुल्लिंगी नावाचे. अर्थातच, त्यांचा हा युक्तिवाद मान्य करावाच लागला.

अरविंद कोल्हटकर Thu, 12/04/2012 - 22:50

In reply to by चेतन सुभाष गुगळे

'सविता' हे सवितृ (पु.) ह्याचे संबोधन नसून प्रथमा विभक्तीचे एकवचन आहे, जसे 'भ्रातृ' चे भ्राता अथवा 'पितृ' चे पिता.

सविता भावे हे एक जुने पुरुष लेखक आहेत आणि त्यांच्या नावात 'सविता'चा योग्य उपयोग आहे.

धनंजय Fri, 13/04/2012 - 00:25

In reply to by अरविंद कोल्हटकर

येथील ज्या सदस्येचे नाव "सविता" आहे, किंवा माझ्या ओळखीच्या काही स्त्रियांचे नाव सविता आहे, तिथे उपयोग अयोग्य आहे काय?

या स्त्रियांचा आजपुढे योग्य नामनिर्देश करायचा असेल, तर तो आम्ही कसा करावा? "सावित्री" म्हणून?
- - -

मी लहानपणी एका हिंदीभाषक मित्राला पिडले होते, त्याच्या बहिणीचे "गरिमा" हे नाव संस्कृतात पुंल्लिंगी आहे म्हणून. त्याने मला "कैच्याकै" म्हणून गप्प बसवले होते. मी त्याला सांगितले की तुलसीदासाने "गरिमा" शब्द पुंल्लिंगात वापरला आहे. तरी त्याने मला गप्प बसवले. त्याचे म्हणणे बरोबर होते. "गरिमा" शब्द हिंदीत स्त्रीलिंगात सुद्धा वापरतात. आधुनिक भाषेत स्त्रीलिंगातच जास्त वापरतात. शब्दकोशात बघून मी हे सांगतो आहे. माझ्या मित्राने शब्दकोशात बघायला सुद्धा नकार दिला. हिंदी बोलणारे सभ्य लोक "गरिमा" ज्या लिंगात वापरतात, तोच वापर त्या सभ्य समाजात योग्य आहे. व्याकरणातले लिंग हे फक्त रूढीपुरते असते. त्याला फारसा वाच्य अर्थ नसतो. संस्कृतातल्या व्याकरणकारांना हे ठाऊक होते. आपण संस्कृताचा दाखला देताना संस्कृत व्याकरणकारांची शहाणी मते विसरू नयेत. "सविता" हा मराठीत स्त्रीलिंगी शब्द मानणेच शहाणपणाचे आहे. मराठी सभ्य समाजात "सविता" नावाच्या बाईचा स्त्रीलिंगात उल्लेख केला, तर लोक सहज मानतील. पुंल्लिंगात उल्लेख केला तर सभ्य लोक "हे काय विचित्र" असा चेहरा करतील. तस्मात् मराठीभाषक सभ्य समाजात आरामात वावरायचे असेल, तर मराठीतले स्त्रीलिंग वापरणे योग्य आहे.

आतिवास Fri, 13/04/2012 - 11:53

In reply to by धनंजय

माझ व्याकरण कच्चं असल्याने व्याकरणदृष्ट्या अयोग्य नाव माझ्यासाठी योग्यच आहे :-)
त्यामुळे कृपया "सावित्री" वगैरे नवे नाव न देता सविता अथवा आतिवास - यातले जे सोयीचे असेल ते - म्हणावे :-)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 13/04/2012 - 23:23

In reply to by धनंजय

माझा एक मित्र आहे, आईवडलांनी त्याचं नाव ठेवलं निस्सीम. त्याच्या मते त्याचं नाव निसिम आहे. माझ्या मराठी वळणाच्या जिभेवर निस्सीम येतं, प्रयत्नपूर्वक निसिम म्हणावं लागतं.

तसं माझं कागदोपत्री नाव, संहिता. शाळेत मराठीच्या शिक्षिकेलाही नीट उच्चारता येत नसे (सैहिता असं काही म्हणायच्या) आणि वर माझ्या नावाचा मी करते तो उच्चार कसा चूक आहे हे त्या मला पटवायचा (क्षीण) प्रयत्न करायच्या. त्या वयात असलेल्या समजेप्रमाणे मी त्यांना संस्कृतचं उच्चशिक्षण घेतलेल्या आईचा हवाला देऊन हे माझं नाव नाही हे सांगितलं. आता मी सरळ "हे माझं नाव आहे आणि असंच आहे" असं सांगते. अलिकडच्या काळात कधीमधी भारतीय आणि सरसकट अभारतीय लोकांना माझ्या नावाच्या उच्चारात अडचण येते. त्यामुळे "फार कष्ट घेऊ नका, मला 'सन्हीता' अशी हाक मारलीत तरी समजतं" असं सांगते. आणि खरंच मला अशी सवयही झालेली आहे.

राजन बापट Fri, 13/04/2012 - 23:32

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या पाठभेदातून आणखी एक गमतीची गोष्ट पुढे येते : मराठी भाषेमधे अन्य प्रादेशिक नावांचे झालेले मराठी करण. "झाँसी" ची होते "झाशी". "वारानसी"/"बनारस" ची होते वाराणशी. "वडोदरा"चं होतं "बडोदे". कदाचित "सबरी" मराठीत आलेली असेल तेव्हा "शबरी" झाली असेल. तमिळनाड मधे "सबरीमलई" असं एक ठीकाण आहे. तेही सबरीच . शबरी नव्हे.

मिहिर Sat, 14/04/2012 - 01:01

In reply to by राजन बापट

जसे आपण फार्सी ’राज़ी’, ’मर्ज़ी’ वगैरेंचे ’राजी’ आणि ’मर्जी’ करतो, तशाच प्रकारे इकारातील 'स'चा 'श' करणे ही मराठीची प्रवृत्ती असावी. म्हणूनच नसीब चे नशीब, सिफारिश चे शिफारस वगैरे होते. हिंदीमध्ये माझ्या माहितीनुसार 'वारानसी' नसून 'वाराणसी' आहे.
तमिळबद्दल बोलायचे तर आज तमिळमध्ये 'स', 'श' साठी अक्षरे असली तरी पूर्वी आणि आजही जुन्या शब्दांत 'च', 'स' आणि 'श' साठी 'च' हेच अक्षर वापरले जाते. त्या 'च' चा उच्चार कधी 'च' (चहा वाला) किंवा 'स' असा होतो. 'शिवाजी' हे विशेषनाम तमिळमध्ये 'चिवाजी' असे लिहिले जाते. त्यामुळे 'शबरी'चे तमिळमध्ये 'सबरी' असेही असू शकते.

अवांतरः माझ्या एका तमिळ मित्राचे नाव शिवचिदंबरम आहे. तो तमिळमध्ये लिहिताना 'चिवचिदंबरम' लिहितो. आम्ही त्याला 'शिवा' म्हणतो, तर बाकीचे काही तमिळ मित्र त्याला 'सिवा' म्हणतात.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 13/04/2012 - 01:11

नद्यांची आणि नगरींची (शहर हा शब्द मुद्दामच टाळला) नावं मुलींना देणं हा प्रकारही मला मजेशीर वाटलं. एक आत्या होती, तिचं नाव मथुरा. मग लक्षात आलं काशी, वाराणशी, मथुरा, अशी स्त्रियांची नावं आहेत. कदाचित या देवींच्या नावांवरून नगरींची नावं पडली असतील. नर्मदा, सिंधु, गंगा, गोदावरी, कावेरी ही नद्यांची नावं जुन्या पिढीतली वाटतात पण झेलम, सतलज, शरयू या नावांच्या मुली, स्त्रिया तरूणही असू शकतात. मग आधुनिक काळात स्त्रियांची नावं डोंबिवली, मुंबई, ठाकुर्ली किंवा मिठी, वैतरणा, तानसा अशी पडतील का?

युरोपात स्त्री-पुरूषांची नावं सहसा बायबलातली असतात. मायकल (मिशाईल, मिखाईल), सायमन, जेम्स, जॉन नाहीतर फिलीपा, जेनिफर, हानाह अशी. माझ्या माहितीतली ज्यू आणि मुसलमान लोकांचीही नावं अशीच ठरलेली, धर्मग्रंथातून आलेली आहेत. अजूनही यात फार फरक दिसत नाही. आपल्याकडे मात्र लोकं वेगवेगळे शब्द नावं म्हणून वापरत आहेत. संगीताची आवड असणार्‍या घरांत मुलांची नावं सारंग, गंधार असल्याचं माहित आहे. एका मित्राच्या मुलाचं नाव राजन्य आहे; मृग नक्षत्रातला सर्वात तेजस्वी तारा राजन्य.

नावांमधे वैविध्य असण्याचा मुख्य फायदा म्हणजे लोकांची आडनावं लक्षात ठेवावी लागत नाहीत. दीपाली, स्मिता, स्वाती, हृषिकेश, शैलेश या नावांचे एवढे लोक ओळखीचे आहेत की प्रत्येकाचं आडनाव लक्षात ठेवावं लागतं किंवा बोलताना ओळखीचा संदर्भ. स्वातीताई म्हणजे आपली, केकांची आणि इतर पाश्चात्य रेसिप्या देणारी, ती, असं म्हणावं लागतं. टोपणनावांचाही मर्यादित उपयोग होतोच. अगदीच वाईट अर्थ निघत नसल्यास काहीही नाव ठेवावं. त्रास करूनच घ्यायचा असेल तर काय देवांची आई असा अर्थ असणार्‍या माझ्या एका नावाचाही करून घेता येईल.

अवांतरः काही लोकांना आडनावामुळेही त्रास होतोच. आमचे काही नातेवाईक आहेत, त्या कुतुंबातल्या सगळ्यांनी त्यांचं जंगली हे आडनाव बदलून घेतलं. मी शाळेत असताना केळकर, बापट, जोशी लोकांनाही आडनावावरून चिडवायचे; माझ्या त्या 'जंगली' भावंडांना किती छळ सहन करावा लागला असेल कोण जाणे!

अनामिक Fri, 13/04/2012 - 01:54

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या त्या 'जंगली' भावंडांना किती छळ सहन करावा लागला असेल कोण जाणे!

हे तरी बराय, आमच्या शेजारीच 'डूकरे' रहात होते. त्यांच्या मुलांचा अक्षरशः छळ झाला शाळेत.

असो, बाकी नावाचा अगदीच वाईट अर्थ निघत नसेल तर काहीही नाव ठेवावं ह्या मताशी सहमत!

पण वर लेखात दिलंय तसं काळाप्रमाणे नव्या नावांची लाट येते भारतात. मी जन्मलो तेव्हा अमोल नाव प्रचलीत असावं बहूतेक. माझ्या वर्गातच मला वगळता इतर ४ अमोल होते. सध्या आर्या, सानवी असल्या नावांची चलती आहे असे दिसते. ही पिढी मोठी झाली की अजून एक नवीन लाट येईल.

............सा… Fri, 11/05/2012 - 21:57

In reply to by अनामिक

अरेच्च्या सान्वी माझ्या भाचीचे नाव आहे. मला वाटले ते अगदी "एकमेवाद्वितीय" असेल. पण तसे दिसत नाही.

विसुनाना Fri, 13/04/2012 - 14:16

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

(बाकी माहीत नाही पण) मिठीबाई हे नाव आहेच की. (पारसी म्हणा, पण मिठीबाई कॉलेजने अजरामर केलेले नाव आहे ते.)

ऋषिकेश Fri, 13/04/2012 - 14:25

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अवांतरः
माझं नाव 'ऋषिकेश' आणि Rushikesh असं लिहून घ्यायला म्युनिसिपाल्टीतले तयारच नव्हते म्हणे! माझ्या आई-बाबांना हे कसं चुकीचं आहे हे पटवण्यात त्यांनी काही वेळ घालवला. शेवटी माझ्या जन्मदाखल्यावर नाव Hrishikesh आणि 'हृषिकेश' असंच लिहिलं आहे :(
अर्थात नंतर शाळेत (शाळेपासून) ऋषिकेश असे आल्याने नंतर कधी प्रश्न पडला नाही.

बाकी लहानपणी माझं नाव अगदी एकमेवाद्वितीय असल्याचं मला वाटायचं.. कालिजात गेल्यावर माझ्याच वर्गात ३ ऋ आले आणि भ्रभोफु

इनिगोय Tue, 17/04/2012 - 10:51

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नाटकात विनोदनिर्मितीसाठी वापरलेली 'भाण्डूप' आणि 'मुळुंद' (मुलुंडवर बेतलेले) अशा नावांची पात्रे आहेत.

बाकी माझ्या ऐकण्यात स्वाहा आणि श्लेष्मा अशी २ कहर नावं आली आहेत :~ !
स्वाहाच्या आईवडिलांनी सर्वांशी 'हे लक्ष्मीचं नाव आहे' असा वाद घातला होता. श्लेष्माला मात्र तिच्या नावाचा अ(न)र्थ कधीही 'न' कळो अशा शुभेच्छा द्याव्याशा वाटल्या..

'न'वी बाजू Tue, 17/04/2012 - 20:09

In reply to by इनिगोय

श्लेष्माला मात्र तिच्या नावाचा अ(न)र्थ कधीही 'न' कळो अशा शुभेच्छा द्याव्याशा वाटल्या..

का बुवा?

चित्रवीर्य-विचित्रवीर्य छानपैकी खपून गेले. बिचार्‍या श्लेष्मानेच काय घोडे मारले आहे?

(अतिअवांतर: 'निरोध' नावाच्या एका भारतीय वंशाच्या दक्षिण आफ्रिकी सहकर्मीबरोबर काम करण्याचा योग पूर्वी एकदा आलेला आहे. सदर सद्गृहस्थाची दक्षिण आफ्रिकेतील ही बहुधा किमान तिसरी पिढी असावी, आणि भारताशी संबंध बहुधा राहिलेला नसावा.)

............सा… Sat, 12/05/2012 - 09:43

In reply to by इनिगोय

श्लेष्म म्हणजे बुळबुळीत असावे कारण मला जीवशास्त्रात कोण्या प्राण्याच्या त्वचेवर श्लेष्मल थर असतो असे वाचल्याचे स्मरते.

मी Wed, 18/04/2012 - 12:07

In reply to by 'न'वी बाजू

>>चित्रवीर्य-विचित्रवीर्य छानपैकी खपून गेले
कुठे खपले? ही नावे ठेवणारे पालक(शंतनू आणि सत्यवती सोडून) आहेत की काय? बहूदा ही नावे वर्णनात्मक असावीत.

राजेश घासकडवी Fri, 13/04/2012 - 05:41

एकेका पिढीत काही काही नावांची फार फॅशन आलेली असते. आमच्या वेळी मुलींमध्ये अपर्णा, अनीता आणि वैशाली या तीन नावांत शाळेतल्या दहा टक्के मुली यायच्या. ही तीनही नावं तशी आक्षेपार्हच आहेत. नीतीहीन किंवा पर्णहीन शुष्क ही काय नावं आहेत? असा विचार मी केल्याचं आठवतं. नंतर मात्र त्या नावांच्या प्रादुर्भावामुळे अर्थ निघून गेला आणि 'एक नाव' असा वेगळा संदर्भ प्राप्त झाला. माझं नावही तसं बोकाळलेलंच होतं. राजेश किंवा राज पासून सुरू होणारी राजीव, राजेंद्र, राजन ही नावंही खूप होती.

मन Wed, 18/04/2012 - 19:53

In reply to by राजेश घासकडवी

भगवान शंअकरास प्रसन्न करून घेण्यासाठी हिमालयपुत्री पार्वती हिने कठोर तप केले.(तपाचे शेकडो प्रकार आहेत म्हणे.)
अशा काही कठोर तपांत अगदिच काही न खाता राहता येत नाही म्हणून काही हठयोगी साधूही झाडाची पाने खात तपश्चर्या पुन्हा चालू ठेवत.
तिने मात्र तप एके तप एवढेच एक ध्येय ठेवले. झाडाचे एक पानही (पर्ण) खाले नाही म्हणून ती अपर्णा.

ही कथा भारतीय पुराणांत कुठेतरी ऐकली आहे.
बादवे वैशाली म्हणजे काय? वैशाली नगरी होती ना म्हणे?(उज्जैन्,कोसल्,श्रावस्ती,कुशावती,काशी/वाराणशी,कनौज) अशा कोणे एकेकाळी समृद्ध असणार्‍या नगरिंत हिचाही समावेश होता. बरोबर काय?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 18/04/2012 - 20:17

In reply to by मन

वैशाली या नावाच्या हिंदी भाषिक उच्चारावरून 'अब तक छप्पन'मधे साधु आगाशे (नाना पाटेकर, मुख्य पात्र) त्याच्या ज्युनियरला झाडतो; गर्लफ्रेंडलाच काय वेश्या म्हणतोस, म्हणून.

अरविंद कोल्हटकर Wed, 18/04/2012 - 21:00

In reply to by मन

'अयोध्या मथुरा माया काशी काञ्ची अवन्तिका|
पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका:।|"

अयोध्या, मथुरा, माया (हरिद्वार), काशी, कांची, अवंतिका, आणि द्वारकापुरी ह्या सात मोक्षदायक आहेत असा एक श्लोक स्मरणात आहे.

ह्यांपैकी मथुरा, काशी, द्वारका ह्या तीन नगरांवरून नावे ठेवण्याच प्रघात जुनाच आहे. हरिद्वारला 'माया' म्हणतात हा सार्वत्रिक माहितीचा विषय नसल्याने पूर्वीच्या काळात 'माया. हे नाव नसे. अलीकडे ते दिसू लागले आहे पण 'हरिद्वार' म्हणून नाही तर 'माया - ब्रह्म' अशा तात्त्विक अर्थाने. अवंतिका हेहि नाव पूर्वी नसे पण अलीकडे दिसू लागले आहे. (अवंतिकाबाई गोखले मार्ग - अवंतिकाबाई गोखले ह्या जुन्या गांधीवादी कार्यकर्त्या होत्या.) श्लोकातील 'पुरी' म्हणजे जगन्नाथपुरी नाही (कारण तसे असल्यास संख्या आठ होते) तर द्वारकापुरी आहे (लग्नाला जातो मी द्वारकापुरा...).

ह्या गणतीमध्ये वैशाली, श्रावस्ती अशी बौद्ध काळात पुढे आलेली नगरे नाहीत. अलीकडच्या काळात बौद्ध धर्माचा सांस्कृतिक महाराष्ट्राशी परिचय वाढल्यामुळे 'वैशाली', 'कुणाल', 'राहुल' अशी नावे दिसू लागली आहेत.

वित्रवीर्य-विचित्रवीर्य ही नावे चित्रविचित्र वाटली तरी येथे 'वीर्य' ह्याचा अर्थ 'पराक्रम' असा असल्याने शंतनु-सत्यवतीला ती नावे आपल्या मुलांना देणे विचित्र वाटले नाही. आज ह्याच शब्दाचा अर्थ अधिक संकुचित झाल्यामुळे सुजाण पालक त्यांपासून दूरच राहतील! (वित्रवीर्य-विचित्रवीर्य नावालाच वित्रवीर्य-विचित्रवीर्य होते. त्यांच्यासाठी बायका जिंकून आणण्याचे काम भीष्मावर पडले. एव्हढे करूनहि त्यांना पुढचे काम नीट करता आलेच नाही. त्यासाठी वेदव्यासांना पाचारण करावे लागले. Born losers! दुसरे काय?)

धनंजय Thu, 19/04/2012 - 20:10

In reply to by राजेश घासकडवी

अपर्णा, अनीनिता आणि वैशाली

माझ्या ओळखीच्या अनिता होत्या, अनीता तितक्याश्या ओळखीच्या नव्हत्या. "अपर्णा"ची कथा मन यांनी दिलेली आहे. ती लहानपणी ऐकल्यामुळे ते नाव शुभ संदर्भातले वाटे, वाटते.

"अनिता" मधून मला काही विशेष अर्थ कळून येत नसे. (अनीती शब्दाची आठवण येत नसे.) लावला तर अर्थ लागतो - "अनित"चे स्त्रीलिंगी रूप. "न-गेलेली" या अर्थी. माझ्या घरगुती बोलीत "नीऽतीऽ" असा उच्चार आहे. पण काही बोलींमध्ये "निती" असा उच्चार असल्यास त्या लोकांना "अ-निती->अनिता" असा भास होणे सहज शक्य आहे.

"वैशाली" हे नगरीचे नाव म्हणून ठाऊक होते. (या शब्दाचा "वेश्या" शब्दाशी कुठलाच थेट संबंध नसावा. "विशाल", "विशाला" वगैरे शब्दांशी संबंध जास्त आहे. "विशाल" शब्दात मोठ्या आकारमानाचे शुभ संदर्भ जास्त आहेत - "अतिविशाल महिला मंडल" सारखा हास्यास्पद उपयोग अपवादात्मक आहे.)

Nile Thu, 19/04/2012 - 21:14

In reply to by धनंजय

अनिता हे नाव स्पॅनिश लोकांमध्येही आढळून येते. आपल्याकडे हे नाव तिकडूनच आले असावे का?

धनंजय Fri, 20/04/2012 - 03:30

In reply to by Nile

प्रेमळ लघुत्वदर्शक असे काही प्रत्यय असतात - उदाहरणार्थ मराठीत -उकला/ली; धीट->धिटुकला/ली

तसे स्पॅनिशमध्ये -ईतो/ईता प्रत्यय आहेत. त्या प्रत्ययाच्या योगाने
आना -> आनीता

अर्थात काही मुलींना मुळातच आनीता नाव ठेवतात. मग ते लघुरूप मानता येत नाही.

सन्जोप राव Fri, 13/04/2012 - 06:56

नावांविषयी चर्चा करणारा हा लेख आवडला. मुलामुलींची नावे ठेवताना लोकांनी तारतम्य वापरावे ही अपेक्षा बाकी अवाजवी वाटते. नावे शोधताना जनतेने कानाला फ्याशन काय आहे ते बघणे, नाव कानाला गोड वाटते आहे का ते बघणे, आणि काहीतरी जगावेगळे करणे यापलीकडे काही करावे ही कसली भलती अपेक्षा? सुनील गावसकरच्या माझ्या ओळखीच्या एका फ्यानने त्याच्या मुलाचे नाव हौसेने 'सनी' ठेवले आहे. आता हा सनी चांगला लग्नाचा मुलगा झाला आहे. त्याच्या बायकोने एकदा 'समोरच्या कोनाड्यात उभी व्हिंदमाता, सनीचं नाव घ्यायला माझा नंबर पयला' असा उखाणा घेतलेला बघीतला की मी डोळे मिटायला मोकळा झालो. माझ्या एका मित्राच्या घराचे नाव 'ऋत्विज' आहे. म्हणजे काय तर म्हणे धर्मगुरु. मग घराला ते नाव का, तर म्हणे असेच. माझ्या परिचयाच्या आणखी एका गृहस्थांच्या प्रयोगशाळेचे नाव 'पुरु' लॅब असे आहे. कारण त्या प्रयोगशाळेच्या भागीदारांची आडनावे पुजारी आणि रुईकर अशी आहेत. (त्यावरुन रुईकरांच्या जागी पुण्यातील एका प्रसिद्ध मिठाईउत्पादकांचे आडनाव असते तर त्या प्रयोगशाळेचे नाव तसे ठेवले असते का, हा त्यावेळी विचारला गेलेला खवचट प्रश्नही आठवतो!) . दुसरे एक असेच गृहस्थ. त्यांच्या घराचे नाव 'प्रगंपा'. आता हे कसले जळ्ळे नाव? असे कोणा काकूबाईंनी त्या घराच्या वास्तुशांतीच्या वेळी विचारले. त्यावेळी ते गृहस्थ काहीसे प्रौढीने आणि काहीसे लाजत (चांगला पन्नाशीचा गृहस्थ!) म्हणाले की या नावाला काही अर्थबिर्थ नाही, हे बायकोच्या नावाची अक्षरे घेऊन केले आहे - प्रतिभा गंगाधर पारगावकर! खेड शिवापूरजवळ 'शोगिनी' इंडस्ट्रीज अशी एक फ्याक्टरी आहे शोगिनी म्हणजे काय हे मला ठाऊक नाही, पण ते नाव त्या भागीदारांच्या बायकांची नावे - शोभा आणि योगिनी - ही एकत्र बांधून केलेले आहे असे समजल्यावर मी निपचिपच पडलो. मग शोगिनीच का? ही दोन्ही नावे एकत्र करुन त्यातून फक्त 'गि' एवढे एक अक्षर वगळले की एक झकास नाव तयार होते की!
तर अशी सगळी मजा आहे.

रोचना Fri, 13/04/2012 - 11:41

In reply to by सन्जोप राव

उखाणा घेताना "सनीराव" म्हटलं तर त्याहून उत्तम! पण खरंय. "सनी" साठी व्हिंदमातेचा मॉडर्नपणाच हवा. "सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, चंद्रभागा झुरते सनंभटासाठी" हा काही पचणारा उखाणा नव्हे.

"शोगिनी" बद्दल मीही ऐकलंय - माझा एक मामा तिथे नोकरीला होता. शो-गि-नि हे मालकाच्या बायको आणि दोघी मुलींच्या नावावरून ठेवलंय असं ऐकलं होतं - शोभा-गीता-नीता.

आजकाल एखाद्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेलं तर ४-५ इशान, ५-६ अनन्या, २-३ अनुष्का, हमखास असतात. पुण्यात आमच्या सोसायटीत २-३ केदार, वरद आणि ओंकार आहेत. रोहित राहुल तर आहेतच, इथे कलकत्त्यात अमर्त्य सेन यांना नोबेल मिळाल्यावर मुलांची नावं अमर्त्य ठेवलेली डझनावरी मुलं आता शाळेत जाऊ लागली आहेत. अमेरिकेत राहणार्‍या मित्र-मैत्रिणींमध्ये मुलांसाठी रोहन आणि अर्जुन, आणि मुलींसाठी आन्या, अनाया ही नावं चांगलीच लोकप्रिय आहेत असं दिसतात - मीच ४ अर्जुन, ३ रोहन आणि ४ आन्यांना ओळखते, सगळी मुलं १० वर्षांच्या आतली आहेत.

बॉस्टन मध्ये आमच्या घरमालकीण नर्स होत्या - त्यांच्याकडे आई-वडिलांनी निवडलेल्या भन्नाट नावांची एक यादीच होती. पण त्यात सर्वात मजेशीर - "प्लॅसेंटा" (अपरा, गर्भाभोवतीचे पाणी). नाव अलिकडेच ऐकण्यात आलं, छान वाटलं म्हणून आई-वडिलांनी मुलीसाठी निवडलं होतं... नर्सबाईंनी त्याचा संदर्भ समजावून सांगितल्यावर त्यांनी "जेसिका" निवडले.

ऋषिकेश Fri, 13/04/2012 - 08:42

नाव ठेवणार्‍यानी नाव ठेवत जावे.. त्याचा अर्थ आहे नाही याची चिंता करू नये.. राजहंसाचे चालणे... वगैरे वगैरे
शेवटी तुम्ही ठेवलेल्या नावाला कुण्णी कुण्णी नावं ठेवणार नाहीय याची काय खात्री? ;)

माझी वैयक्तीक अपेक्षा इतकीच असते की नाव किमान त्या वक्तीच्या घरात नीट उच्चारले जावे - उच्चारता येईल असे ठेवावे. माझ्या परिचितांच्या मुलाचे नाव त्यांनी अथर्व ठेवले आहे. त्या अथर्वची आई त्याला सतत 'अर्व!! एऽऽ अर्व' अशा हाका मारताना आम्ही ऐकत असतो

रमाबाई कुरसुंदीकर Fri, 13/04/2012 - 15:19

मजेशीर माहिती. आमच्या घरात सर्वांचीच नावे साधी आणि सरळ नानांनी ठेवली होती.शंकर्,राम्,रमा,माला.

अरविंद कोल्हटकर Sat, 14/04/2012 - 02:02

In reply to by रमाबाई कुरसुंदीकर

तरीहि नाना रसिकच मानले पाहिजेत. 'माला' काही शंकर, राम, रमा च्या लायनीत बसणारे नाव वाटत नाही. ते नव्या घाटाचे आहे.

विरोचन Fri, 13/04/2012 - 16:28

नाव आणि उच्चार यांची वाट लावलेली सर्रास आढळते.
.
अदिती- आदिती, अमेय- अमय

माझ्या बॅच मधल्या दोन मित्रांची SSC बोर्डाने पार वाट लावली होती. भयानक स्पेलिंगच्या चुका केल्या होत्या.
ऋषभ- (स्पेलिंग बदलानंतर) वृषभ
भूषण - (स्पेलिंग बदलानंतर) वृषण

इंग्रजीत 'ध चा मा' होणे हे त्या दिवशी कळलं.

अनामिक Sat, 14/04/2012 - 02:10

ह्यावरून अरूण दाते ह्यांनी पुण्यातल्या एका संगिताच्या कार्यक्रमात सांगीतलेला त्यांच्या नावाचा किस्सा आठवला. त्यांचं खरं नाव अरविंद दाते. त्यांना जेव्हा सगळ्यात पहीले रेडीओवर गायची संधी मिळाली तेव्हा तिथे ते गाणे रेकॉर्ड करायला गेले आणि रेकॉर्ड करून घरी आले. रेडीओवर संचालकाला गाणं प्रक्षेपीत करतेवेळी ह्यांचं नाव आठवेना, फक्तं दाते असं आठवत होतं. त्यावेळी तिथल्याच एकाने त्या संचालकाला सांगीतलं की सकाळी ते आले तेव्हा त्यांचे वडील त्यांना अरु म्हणून हाक मारत होते. मग काय, त्या संचालकाने दिलं ठोकून 'अरूण दाते' हे नाव. ते गाणं त्यावेळी बरंच गाजलं म्हणून मग त्यांनी त्यांच अरूण दाते हेच नाव कायम ठेवलं.

नंदन Sat, 14/04/2012 - 03:41

लेख आणि प्रतिसाद आवडले. पंकज हे लाक्षणिक अर्थाने समजू शकतो, पण तिमीर हे नाव असणारी व्यक्तीही माझ्या परिचयात आहे. हेतल ह्या उभयलिंगी गुर्जर नावाचा नेमका अर्थ कोणी सांगितल्यास मी आजन्म उपकृत होईन :). लेखात बंगाली लेखकांच्या प्रभावाचा उल्लेख आलाच आहे. 'सचिन' ह्या नावाचाही बंगालीत शचीन्द्र ते सचीन असा प्रवास होऊन मग ते मराठीत आल्याची व्युत्पत्ती एके ठिकाणी वाचली होती.

काही वर्षांपूर्वी लोकसत्तेत अविनाश बिनीवाल्यांचं एक भाषाविषयक सदर येत असे, त्यात त्यांनी आईचं नाव शालिनी म्हणून मुलीचं नाव त्याच्या उलट - नीलिशा असा एक किस्सा सांगितला होता. उत्तर भारतातल्या रामचीज किंवा अरविंदर सिंग लव्हली ह्या नावांची निराळीच तर्‍हा.

अर्थ माहीत नसतानाही कानावर शब्द पडला, म्हणून नाव ठेवलं अशी काही उदाहरणं आफ्रिकन नावांत पहायला मिळतात. (उदा. हॅपिनेस, टुमॉरो). तीच गत शहाद्याजवळच्या आदिवासी भागातली. तिथे अनेक रिकी पाँटिंग वावरताना दिसतील. (पहा - श्रामोंचा हा लेख)

उलट्या बाजूने विचार केला, तर नावातला लपलेला अर्थ हुडकायलाही मजा येते. उदा. थाई राजांच्या किंवा पंतप्रधानांच्या नावामागचा मूळ शब्द तसा सहज ओळखता येतो. पण इतर नावं कधीकधी थोडी अवघड असतात. जसं की, कंपनीतल्या दोन थाई मित्रांची नावं सुपारोक आणि सोंगक्रान होती. त्यांचं काही मूळ शोधता येईना. सुदैवाने त्यांना त्याचा अर्थ ठाऊक होता. पहिल्या नावाचा अर्थ 'चांगल्या वेळी जन्मलेला' आणि दुसर्‍याचा अर्थ 'नववर्ष' असा सांगितल्यावर ती अनुक्रमे 'सुप्रहरिक' आणि 'संक्रांत' यांची तद्भव रूपं आहेत, ही ट्यूब पेटली :)

नगरीनिरंजन Tue, 17/04/2012 - 13:22

In reply to by नंदन

मीही काही विचित्र नावं ऐकली आहेत. पृथा हे नाव ठेवलेले ऐकले आहे. पृथा हे कुंतीचे नाव होते म्हणे पण त्याचा अर्थ जाड/रुंद असा होतो असा माझा समज आहे. भविष्यात वृथा हे नाव ठेवलेले आढळले तरी आश्चर्य वाटायला नको.
पूर्वी अनसूया नाव असलेल्या मुलीला अनुसयाच म्हटले जायचे. पल्लवी हे नावही मला फार विचित्र वाटायचे. आमच्या वर्गात दोन-चार पल्लव्या होत्या.
अनिकेत/दिगंबर ही नावं ऐकली की अशीच गंमत वाटायची.
आजकाल तर अनन्या, गार्गी, अनुष्का, अनुशा अशा नावांचा सुळसुळाट झाला आहे.
शाळेत आमच्या वर्गात एक बकुळ होता. बिचार्‍या बकुळचं जगणं हराम केलं होतं पोरांनी. त्याच्या भावाचं नाव नीलम होतं
थाई आणि इंडोनेशियन नावांचं मूळ बर्‍याचदा संस्कृत शब्दांमध्ये सापडते. आमच्या हापिसात एक तनुआत्मजा आडनावाचा इंडोनेशियन होता.
इथे एका थाई रेस्टॉरंटवर मोठ्ठ्या अक्षरात Porn असे लिहीलेले वाचून चमकलो होतो, मग कळले ते थाई नाव आहे आणि बर्‍यापैकी कॉमन आहे.

आतिवास Sat, 14/04/2012 - 06:04

दिल्लीत एका सरकारी कार्यालयात 'हिटलर सिंह' नावाचे अधिकारी आहेत. त्यांच्या नावाची पाटी त्यांच्या ऑफिसच्या केबिनच्या दरवाजावर आहे. दर वेळी तो दरवाजा ओलांडून पुढे जाताना 'आत जावं आणि या गृहस्थांना भेटून त्यांच हे नाव कुणी आणि का ठेवलं, या नावामुळे त्यांना काय काय अनुभव आले' - अशा गप्पा मला माराव्याशा वाटतात त्यांच्याशी.

पण माझी आजवर हिंमत नाही झाली. काही नावांचा 'महिमा' असा जबरदस्त असतोच :-)

मिहिर Sat, 14/04/2012 - 07:24

माझ्या एका अमराठी मित्राच्या बहिणीचे नाव तर 'शिंपी' आहे! असे का नाव ठेवले आहे विचारल्यावर म्हणाला, की ते तिच्या जन्मावेळी नाशिकमध्ये राहत होते आणि कानावर पडलेला 'शिंपी' शब्द गोड वाटला म्हणून तेच नाव ठेवले. :)

सन्जोप राव Sat, 14/04/2012 - 07:48

नाव, त्याचा उच्चार आणि अर्थ ही चैन काही सगळ्यांनाच परवडते असे नाही. काही आदिवासींमध्ये ही अगदी नगण्य, क्षुल्लक बाब असते. तिथल्या मुलामुलींची नावे सायकल्या, पिस्तुल्या, सायब्या अशी काहीही असतात. नाव हा त्या लोकांबाबत अगदी नगण्य मुद्दा आहे. त्या लोकांमध्ये जीवनाचा संघर्ष किती तीव्र असतो हे यावरुन कळते. एरवी आपण सगळेच आपल्या नावांबाबत ज्या तर्‍हेने संवेदनशील असतो ते पाहिले तर अधिकच.

रमताराम Mon, 16/04/2012 - 15:47

In reply to by सन्जोप राव

पुल म्हणतात तसे नावं शोधण्यात वेळ न दवडता पुढच्या मुलाच्या तयारीला लागत असतील ते. (ह.घ्या हे वे.सां.न.ल.)

सुनील Sun, 15/04/2012 - 01:18

लेख आणि प्रतिसाद मनोरंजक!

नावाला काही अर्थ असलाच पाहिजे असे नाही. उच्चारायला सोपे आणि सुटसुटीत असले की झाले. मुलाला धृष्ट्यदुम्न असे नाव ठेवणार्‍या द्रुपदाला त्रिवार वंदन!

नावावरून बहुधा लिंगबोध होतोच. परंतु काही वेळेस फसगतदेखिल होऊ शकते.

रश्मी हे गुजरातखेरीज अन्यत्र मुलीचे नाव असले तरी गुजरातेत तो मुलगा असतो. तीच गोष्ट किरण ह्या नावाची. दक्षिणेत तो असणारा किरण उत्तरेत ती होते!

शिखांची तर न्यारीच तर्‍हा! त्यांच्यात मुलगा की मुलगी हे नावापुढे सिंग आहे की कौर यावरून ठरवायचे. कारण जसप्रीत सिंग असू शकतो तसेच जसप्रीत कौरदेखिल!

शीतल, स्नेहल, गुलाब ही नावे कायमच उभयलिंगी आहेत.

वर अनामिक यांनी अरुण दाते यांच्याविषयीचा किस्सा सांगितला आहे. हाक मारायच्या अरु ह्या नावावरून त्यांचे मूळ नाव अरुण असावे असे निवेदकाला वाटले असेल तर त्यात चूक नाही. कारण टोपण नाव आणि मूळ नाव यांच्यातील असंदिग्ध असा संबंध आपल्याकडे नाही. सदू हा मूळचा सदानंद असू शकतो किंवा सदाशिवदेखिल! पाश्चिमात्यांनी मात्र असे काही संकेत रूढ केले आहेत. बिल हा विल्यमच असायचा आणि बॉब हा रॉबर्टखेरीज अन्य असणाराच नाही!

बंगाल्यांच्यात तर बारशाला नावाबरोबरीनेच टोपण नावदेखिल हौसेने ठेवले जाते. ह्या टोपण नावाचा आणि मूळ नावाचा काही संबंध असतोच असे नाही (बहुधा नसतोच). ही प्रथा अगदी बंगाली मुस्लीमांतदेखिल पाळली जाते. टोपण नावे हिंदू-मुस्लीमांत सारखीच असतात.

असे म्हणतात की बर्‍याच रेड इंडियन जमातीत मूल जन्माला आले की घरातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती घराबाहेर जाते आणि जे काही सर्वप्रथम दृष्टीला पडेल, ते नाव त्या मुलाला ठेवले जाते. म्हणून त्यांच्यात "उडता पक्षी", "पिवळे फूल" अशी नावे आढळतात!

एकाऐवजी दोन नावे ठेवण्याची प्रथादेखिल पाश्चिमात्यांत आहे. दोहोंपैकी वापरायच्या प्रमुख नावला पहिले नाव (first name) तर दुसर्‍या नावाला मधले नाव (middle name) असे म्हणतात. आपल्याकडे मधले नाव हे वडिलांचे (विवाहित स्त्रीबाबत नवर्‍याचे) ठेवण्याची प्रथा आहे. त्यांच्यात तशी प्रथा नाही. (जॉर्ज बुशच्या मुलाचे नाव जॉर्ज डब्ल्यू बुश कसे हे मला पडलेले कोडे, ही प्रथा समजल्यावर सुटले!)

असो, शेवटी नावात काय आहे? गुलाबाला गुलाब न म्हणता दुसरे काही म्हटले तरी त्याचा सुगंध तसाच राहणार!

मन Sun, 15/04/2012 - 11:07

In reply to by सुनील

गुलाबाला गुलाब न म्हणता दुसरे काही म्हटले तरी त्याचा सुगंध तसाच राहणार!
नावावर भाषेचे काहीएक संस्कार असतात, तेच चित्र/अनुबह्व शब्द/नाव डोळ्यासमोर उभे करतात.
ओंजळित गुलाबगंध घेत ती हल्केच बाहेर आली हे वाक्य
ओंजळित जुलाबगंध घेत ती हल्केच बाहेर आली असं वाचलं तर कसं वाटेल?

म्हणूनच मजह्या जुन्या कंपनीतील काही चुतिया,गांडू अशा नावांच्या परप्रांतिय मित्रांना हाक मारताना कसेतरीच व्हायचे सुरुवातीला.
त्यांना तो अर्थ माहित नसावा किंवा सवय झाली असावी.

वैमानिक हत्ती Sat, 12/05/2012 - 10:02

In reply to by सुनील

असे म्हणतात की बर्‍याच रेड इंडियन जमातीत मूल जन्माला आले की घरातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती घराबाहेर जाते आणि जे काही सर्वप्रथम दृष्टीला पडेल, ते नाव त्या मुलाला ठेवले जाते. म्हणून त्यांच्यात "उडता पक्षी", "पिवळे फूल" अशी नावे आढळतात!

म्हणजे तिथेही एखादा "पिसाळलेला हत्ती" असेलच की :)

शहराजाद Sun, 15/04/2012 - 16:53

काही नावं गमतीदार असतात खरी. माझ्या एका शाळेतल्या मैत्रिणीचे नाव प्रणया होते. शाळेत असताना लहानपणापासून हे नाव वापरल्यामुळे पुढे अर्थ कळून चिडवाचिडवीचा प्रश्न आला नाही. मात्र कॉलेजात तिला नावावरून त्रास झाला की काय ते माहित नाही.

एका परिचितांकडच्या बारशाला जमलेले सगळे पाहुणे यजमानांच्या नकळत एकमेकांशी कुजबुजत होते. बाळाचं नाव ठेवलं होतं "कृतांत". हे म्हणे बाळाच्या आजीने विष्णुसहस्रनामातून शोधून काढलं होतं. "म्हणजे यमच ना हो?" असं एकमेकांना विचारून पाहुणे खात्री करून घेत होते. पुढे काही दिवसांनी सर्व पाहुण्यांना पत्रे आली. "चिरंजीव 'कृतार्थ'च्या बारशाला उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद". :)

रोचना Mon, 16/04/2012 - 11:24

In reply to by शहराजाद

हाहाहा, किस्सा खूप आवडला. "म्हणजे यमच ना हो?" मस्त!

आमच्या आजोळी एका बारशाला आजीला बोलावलं होतं. परत आल्यावर विचारलं, आजी काय नाव ठेवलं मुलीचं? आज म्हणाली "ननगेन तिळ्युदुल्लवा ईगिन फॅशन्नु - "दशमी" हेसर इट्टरु, ईग मुंदिन हुडुगी हेसर "भक्क्री" इडतार काणस्तदं" (मला काही कळत नाही बाई आजकालचे फॅशन - दशमी नाव ठेवलं, आता पुढच्या मुलीचं "भाकरी" ठेवतील वाटतं) मुलीचं नाव "रश्मी" ठेवलं होतं असं नंतर कळलं.

"स्रोनित" शब्दाचा अर्थ नेमका काय हे कोणी सांगू शकेल का? अरविंद? धनंजय?

माझ्या एका पुतण्याचं हे नाव ठेवलं गेलंय - त्याच्या आजोबांचं म्हणणं आहे की स्रोनित म्हणजे "रक्ताचा". पण त्यांच्या भावाचं (कुचकट) म्हणणं आहे की त्याचा अर्थ "ढुंगणातून आलेला" असा होतो, कारण 'स्रोन' चा अर्थ नितंब असा आहे. यावरून बरीच बाचाबाची झाली, डिक्षनर्‍यांची फेकाफेक झाली, खूप हशा पिकला. वर बंगाल्यांचा आवडता "स की श?" हा संस्कृतोत्पन्न शब्दांसंदर्भित आवडता वाद ही झाला, आणि कुचकट भावांच्या मते स्रोन हे चुकीचे असून श्रोन हा मूळ शब्द आहे, स्रोन म्हणून शब्दच नाही. पण ठाम निर्णय निघाला नाही. अर्थात मुलगा अद्याप लहान असून त्याला "फुचकू" एवढेच म्हणतात.

रमताराम Mon, 16/04/2012 - 15:41

In reply to by रोचना

शोणित असा शब्द असावा. जसराजजींची बिलावलमधली सुरेख बंदिश आठवते 'मै हरी सो शस्त्र धराऊं'. त्याचा अंतरा 'पांडवसेना समेत सारथी, शोणित पूर बहाऊं' असा आहे. याचा अर्थ (शत्रु-)रक्ताचा पूर वाहवीन असा घेतला मी. खरेखोटे तज्ञ जाणोत.

अरविंद कोल्हटकर Mon, 16/04/2012 - 18:05

In reply to by रोचना

आजोबा आणि काका दोघेहि वेगेवेगळ्या पद्धतीने चुकीचे बोलत आहेत.

'स्रोनित' (रक्त) असा शब्द नाही पण 'शोण' (तांबडया रंगाचा) ह्यावरून साधलेला 'शोणित' (रक्त - blood) असा शब्द आहे. त्यात 'र' नाही. शोण नदीचे नाव तिचे पाणी तांबूस असते अशा समजुतीवरून पडलेले आहे. (शब्दाच्या उपयोगासाठी पहा - स्त्यानावनद्धघनशोणितशोणपाणि:| उत्तंसयिष्यति कचांस्तव देवि भीम:|| वेणीसंहार १.२१ - हे देवि, (दुर्योधनाच्या) चिकट आणि घट्ट झालेल्या रक्ताने हात रंगलेला हा भीम तुझे केस आवरेल.)

'स्रोन' असाहि शब्द नाही तर 'श्रोणी' (नितंब) असा शब्द आहे. (पहा - श्रोणीभारादलसगमना स्तोकनम्रा स्तनाभ्याम् (उत्तरमेघ २२ - यक्षाने केलेले पत्नीचे वर्णन) नितंबभारामुळे सावकाश चालणारी, स्तनभारामुळे थोडी नमलेली.

बंगाली भाषेतील 'स' आणि 'श' चा गोंधळ आहेच!

रोचना Tue, 17/04/2012 - 11:07

In reply to by अरविंद कोल्हटकर

आता खुलासा झालाय थोडासा. मला वाटतं काका जाणून-बुजून थोडा खवचटपणा करत असावेत... पण त्यांचंच म्हणणं सत्याच्या अधिक जवळ आहे असं दिसतंय, बिचारा श्रोनू-मोनू...

तिरशिंगराव Sun, 15/04/2012 - 18:12

नांवांबद्दल चर्चा चालली आहे म्हणून एक शंका विचारतो. शहरांची/ राज्यांची नांवे उदा.- पंजाबराव, नाशिकराव ही कशी पडली असतील ?
नवीन नांवांमधे, लवासा, अँबी अशीही नांवे ठेवावीत. झालंच तर टुजी, थ्रीजी, कॅग अशीही नांवे ठेवता येतील.

नितिन थत्ते Mon, 16/04/2012 - 16:37

In reply to by तिरशिंगराव

>>झालंच तर टुजी, थ्रीजी, कॅग अशीही नांवे ठेवता येतील.

लालूप्रसाद यांच्या एका कन्येचे नाव मिसा [Maintenance of Internal Security Act] ठेवलेले आहे.
एका सरकारी कंपनीतील संचालकांचा जन्म २६ जाने १९५० रोजी झाला त्यांचे नाव गणतंत्र असे ठेवले आहे.

रमताराम Mon, 16/04/2012 - 15:46

नावात काही आहे? या प्रश्नावर कणेकरांचे उत्तर आठवले? (समजा गुलाबाचं नाव....., नाही दरवळला असता का... सुगंध?)

हल्ली नावीन्यपूर्ण नाव शोधण्याच्या हट्टापायी काय काय मूर्खपणा घडतो याची अनेक उदाहरणे पाहण्यात आहेत. कृशा(बिचारी चांगली गुटगुटीत आहे) नि श्लेष्मा(ईक्स) या नावाच्या मुली माझ्या पाहण्यात आहेत. शांभवी हे तर फार पूर्वीपासून प्रचलित आहेच.

............सा… Fri, 11/05/2012 - 21:49

In reply to by रमताराम

श्लेष्मा ......ईईईईईईईईईईईईईईईईईईईईई!!!!!!
पण रमरताराम, शांभवी का नको? माझ्या मते हे पार्वतीचे नाव आहे.
शांभवी देवमाता च चिंता रत्नप्रिया सदा ..... अशी काहीशी ओळ आहे कोणत्या तरी स्तोत्रात. मला वाटते शंभूपत्नी ती शांभवी. चू. भू. द्या. घ्या.

प्रभाकर नानावटी Mon, 16/04/2012 - 20:52

माझ्या एका मित्राने आपल्या मुलाचे नाव ब्रुस् ली असे ठेवले होते. (त्याकाळी ब्रुस् ली चे चित्रपट चांगला धंदा करत होते)
आंध्र प्रदेशमध्ये १९४७- ५० च्या दरम्यान जन्मलेल्या मुलांची नावं चक्क नेहरू, गांधी असे होते. उदा: नेहरू श्रिनिवास रेड्डी, गांधी मधुसूदन राव....(राष्ट्रभाक्ती!)

सुनील Tue, 17/04/2012 - 02:03

In reply to by प्रभाकर नानावटी

गोव्याच्या राजकारणात एक चर्चिल आलेमाव आहे तर करुणानिधींच्या मुलाचे नाव स्टॅलीन असे आहे.

वास्तविक चर्चिल, स्टॅलीन ही आडनावे. पण इथे ती नावे म्हणून दिली गेली आहेत.

धनंजय Tue, 17/04/2012 - 03:03

In reply to by सुनील

अमेरिकेतील एका विद्यापीठाच्या नावामुळे "जॉन्स हॉप्किन्स" या गृहस्थाचे नाव बर्‍याच लोकांनी ऐकले असेल. विद्यापीठ असलेल्या बॉल्टिमोर गावातसुद्धा बरेच लोक "जॉन हॉप्किन्स" असे म्हणतात. त्या गृहस्थाचे (वैयक्तिक) नाव "जॉन्स" ठेवलेले होते, आणि ते त्याच्या आजीच्या "जॉन्स" या आडनावावरून दिलेले होते.

मात्र ही प्रथा कितपत प्रमाणात होती, ते मला सांगता येत नाही.

रोचना Tue, 17/04/2012 - 11:12

In reply to by धनंजय

- आईच्या घराण्याची खूण पहिल्या किंवा मिडलनेम द्वारे चालू ठेवण्याची पद्धत - काही समाजात (वॉस्प लोकांमध्ये) बर्‍यापैकी प्रमाणात आहे असे माझ्या एका स्कॉट-अमेरिकन मैत्रिणीनी सांगितले होते. रसेल, वेलिंगटन, वेलेस्ली, मॅकार्थर, इत्यादी... मुलांची पहिली नावंही असतात.

विसुनाना Tue, 17/04/2012 - 11:28

In reply to by प्रभाकर नानावटी

१. आंध्र प्रदेशात 'नाव' हा भलताच रंजक प्रकार आहे.
झांशीरानी, टिळक अशी 'नावे' आहेत हे वर प्रतिसादात आलेच आहे.
पण इथे एकाच व्यक्तीची मालगाडीप्रमाणे अनेक नावे असतात. व्ही.व्ही.एस. लक्ष्मण = वांगीपरिपु 'वेंकट साई लक्ष्मण' हे त्यातल्यात्यात कमी लांबीचे नाव. माझ्या पहाण्यात 'साईचैतन्य वेंकटप्रसाद षण्मुखावतार' या नावाचा एक आठ वर्षांचा मुलगा आहे. त्याला 'षण्मुखा' असे बोलावले जाते.

२. एका प्रसिद्ध नक्षलवादी नेत्याचे आडनाव गांधी (कोबाड गांधी) हा विरोधाभास की क्रूर विनोद?

श्रावण मोडक Tue, 17/04/2012 - 14:16

In reply to by विसुनाना

एका प्रसिद्ध नक्षलवादी नेत्याचे आडनाव गांधी (कोबाड गांधी) हा विरोधाभास की क्रूर विनोद?

छे, दोन्ही नाही. नावांत काहीही नाही इतकेच.

विसुनाना Tue, 17/04/2012 - 11:17

थोडे विषयांतर म्हणा किंवा वेगळा पैलू म्हणा - "माय नेम इज खान" चित्रपट.
शाहरूख खान आणि इर्रफान खान या दोन अभिनेत्यांना नावामुळे युएसेत बरेच छळले गेले आहे.

खवचट खान Tue, 17/04/2012 - 21:02

लेख आणि प्रतिक्रिया रोचक आहेत.

ही नवी नावे शोधतांना आईवडील ह्याकडेहि विशेष लक्ष्य देतांना दिसतात की मराठी किंवा भारतीय नसलेल्यांनादेखील ते नाव सहज उच्चारता येते, कानी पडताच समजते आणि उच्चरणात त्यांच्याकडून त्याची फार मोडतोड होऊ शकत नाही. भारताबाहेर राहणार्‍यांना ह्याचे विशेष महत्त्व वाटते.

हे समजण्यासारखे आहे. भारतीय वंशाचा कॅनेडियन स्टँडप कॉमेडियन (मराठी?) रसेल पीटर्स याची 'हार्दिक' या नावावरची मल्लीनाथी बहुतेकांनी ऐकली असेल. 'मनोज अत्रे' नावाच्या व्यक्तिनेही पाश्चिमात्य देशांत आपले नाव ऐकताच खुसखुस झालेली ऐकण्याची तयारी ठेवावी.

आजचा गोड मुलगा स्वप्निल ६०-७० वर्षांनी आजोबा होईल तेव्हा त्याची नातवंडे त्याला ’स्वप्निलआजोबा’ अशी हाक मारू लागतील ह्याची मला काळजी वाटत आहे!

'स्वप्निलआजोबा' चे त्या वेळेपर्यंत कुणाला काही वाटणार नाही याची खात्री आहे. तुमच्या बारशाच्या वेळी देखील 'तसं नाही हो, 'अरविंदआजोबा' असं ऐकायला विचित्र वाटतं!' असं बारशाला आलेले कुणी त्र्यंबककाका किंवा भागिर्थीआजी म्हणाल्या असतीलच. आजच्या 'तरूण' नामक गृहस्थांना मात्र काही दशकांनी त्यांची नातवंडे काय हाक मारतील, याचं मला कुतुहल आहे.

'न'वी बाजू Thu, 19/04/2012 - 21:32

In reply to by चेतन सुभाष गुगळे

मुळात 'टीना'चा 'टीन एज'शी काय संबंध?

(माझ्या कल्पनेप्रमाणे "टीना' हे 'ख्रिस्टिना' अथवा तत्सम कशाचेतरी लघुरूप असावे.)

सबब, 'टीनाआजी' म्हणण्यात नेमके काय गैर असावे?

मंदार Fri, 11/05/2012 - 21:21

मस्त लेख आणि प्रतिसाद.

मागं एकदा दाक्षिणात्यांकडे स्वातंत्र्यसैनिकांची नावं सरसकट ठेवत असल्याचं ऐकलं होतं. म्हणजे सुभाषचंद्रबोस हेच नाव. त्याच्यापुढे आडनाव, गावाचं नाव वगैरे!

बाकी मला सर्वाधिक हसू प्रणय आणि विनोद या नावांबद्दल येतं. 'विनोद झाला' किंवा 'प्रणय झाला' वगैरे म्हणणं म्हणजे =)) =))

............सा… Fri, 11/05/2012 - 22:06

सध्या मला "आहूत" हे मुलाचे नाव खूप आवडते आहे :) मी हे एका स्तोत्रात वाचले. हा हा एक विचार आला नवर्‍याचे नाव आहूत आणि बायकोचे "समीधा" कशी वाटते जोडी? ;)

धनंजय Wed, 23/05/2012 - 22:47

In reply to by ऋषिकेश

"नम्र" हा अर्थ मराठीत विशेष. संस्कृतात "जोडून/मिसळून गेलेली, त्या प्रकारे लय पावलेली" असा अर्थ आहे.
(स्वत्व लय पावल्यामुळे) नम्र असा विशेष अर्थ मराठीत आहे.

अर्थात नावाचा संस्कृतात अर्थ काय, त्याचे काही महत्त्व नाही. (मराठीत काय अर्थ आहे, त्याचेसुद्धा थोडेसेच महत्त्व आहे. ज्या समाजात व्यक्ती राहाते, त्या समाजात ते नाव ऐकून लोकांच्या मनात शुभ विचार येतील, अशुभ विचार येतील, इतपत महत्त्वाचे. विशेषनामांचा सामान्यनाम म्हणून तोच शब्द वापरता कळणार्‍या अर्थाशी काहीच अवश्य-संबंध नसतो.)

अमुक Tue, 15/05/2012 - 18:00

लीन = नम्र (पु.) म्हणून लीना = नम्रच पण स्त्रीलिङ्गी.
दुसरा काही अर्थ असेल असे वाटत नाही.
(हे तर्क टीन / टीनाला लागू पडत नाहीत. टीना हे ख्रिस्तिना चे स्वल्परूप; जसे मॅगी/रीटा ही मार्गारेटपासून, लिझ/लिझी/एलिझा/लिबी/बेथी/बेथ ही एलिझाबेथपासून बॉब/रॉब रोबर्टपासून, रिची/रिकी/रिक/डिक ही रिचर्डपासून आली आहेत, वगैरे.)

अमुक Sun, 20/05/2012 - 01:41

लीना हे युरोपातही (विशेषतः ईतालीत) वापरले जाते. तेथे 'Paulina' या नावाचे ते स्वल्परूप आहे.
तसेच 'सोनिया' ह्या आपल्याकडच्या नावाच्या जवळचे नांवही तिकडे आहे - Sogna. 'सोन्या' हा त्याचा उच्चार('सो' वर जोर देऊन). त्याचा तिथला अर्थ 'स्वप्न' असा आहे. (म्हणजे त्याञ्ची ती सोन्या आपली ती स्वप्ना हो..) आता 'सोन्या' तिकडून इकडे येताना 'सोनिया' झाली की 'सोनिया' आधिपासून इथे होती ते मात्र माहीत नाही. माझा अन्दाज आहे की हे तिकडून इकडे आलेले नांव आहे. आपण इथे ते 'सोने' या अर्थाने वापरतो.

अतिशहाणा Tue, 22/04/2014 - 23:43

In reply to by मी

हा हा... चौथ्या डिलीवरीचे फळ. या अंकगणितावरुन 'मिठीतला 'मि' पहिला की दुसरा?' हा फेमस शुद्धलेखनविषयक प्रश्न आणि त्याचे 'तिसरा' हे दणदणीत उत्तर आठवले.

राही Wed, 23/04/2014 - 20:26

In reply to by अतिशहाणा

आरवी की कारवी? आरवी म्हणजे अळकुडी, अळवाचे कंद हे माहीत आहे पण ते बहुधा -नव्हे नक्कीच- अरवी आहे.
कारवी बारा वर्षांनी फुलते.

अतिशहाणा Wed, 23/04/2014 - 20:29

In reply to by राही

आरवी नसून कारवीच असावे. किल्ल्यांवर जाणाऱ्या पायवाटांवर आजूबाजूला ही झुडुपे पाहिली आहेत.

ॲमी Tue, 22/04/2014 - 18:23

In reply to by ॲमी

अवांतर: प्रीती झिंटाचं लघुरूप केलं असेल प्रिंटा. >> हा हा हा. सगळेजण तिला हेच विचारायचे ,पण प्रीती झिँटाचा काही संबध नाही. युरोपमधे आहे म्हणे हे नाव. तिच्या आँटीने ऐकल आणि घरातल्या सगळ्यांना आवडलं म्हणुन ठेवून दिलं.

----------------

चार्वी चा अर्थ 'सुंदर' असा काही आहे का? मग असेल चार्वी. मलातर नेहमी चारवीच ऐकु येतं.

सापडला अर्थ उच्चार 'चारवी' चा www.babynamesworld.parentsconnect.com/meaning_of_Charvi.html

अजुन काही हटके नावं प्रिना, आमि.

नंदन Tue, 22/04/2014 - 12:45

या नावामागचा आशय कोणी समजावून सांगू शकेल का? :)
तीच गत Rhium ह्या वंगकन्यानामाची.

अतिशहाणा Tue, 22/04/2014 - 18:08

आमचे येथे एका व्यवस्थापकाचे प्रथमनाव टेलिकॉम असे आहे.

सुशान्त Wed, 23/04/2014 - 14:35

लेख आणि प्रतिसाद खूपच रंजक आहेत.
नावं ठेवण्यासंदर्भात बऱ्याच गंमतीच्या गोष्टी दिसून येतात. काही वेळा समाजातील प्रसिद्ध व्यक्ती उदा. चित्रपटांतील नट-नट्यांवरून नावं ठेवतात. आमच्या एका परिचितांनी आपल्या मुलाचं नाव सुनीलदत्त असं ठेवलं होतं.
नावांची लघुरूपं वापरताना सहजपणे काही गंमती घडून येतात. आमच्या एका मित्राचं नाव मधुसूदन आहे. पण त्याला सगळे मधूच म्हणतात. मधुसूदन म्हणजे मधु नावाच्या दैत्याला मारणारा म्हणजे विष्णू. पण इथे केवळ त्या दैत्याच्याच नावे हाक मारतात असं दिसतं.
मराठीत सामासिक पदातलं पहिलं पद लघुरूप म्हणून वापरण्याचा प्रघात आहे. त्यातून हा प्रकार घडत असावा. उदा. शिवाजीमंदिर = शिवाजी, रवींद्र नाट्यमंदिर = रवींद्र. सामासिक पदात अधिक पदं असली तर क्वचित् सुरुवातीची दोन पदं वापरतात. उदा. मुंबई-मराठी-ग्रंथसंग्रहालय = मुंबई-मराठी.
आजोबांचं नाव नातवाला ठेवण्याची चाल असल्याने एकाच घरात बाबाजी भिकाजी पवार आणि भिकाजी बाबाजी पवार नांदत असल्याचं पाहिलं आहे. आजीचं नाव नातीला ठेवण्याची अशी काही चाल आहे का?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 23/04/2014 - 22:00

In reply to by सुशान्त

पण मधु याचा संस्कृत अर्थ मध असाही होतो.

सामासिक पदाबद्दल लक्षात आलं नव्हतं. ठाण्यात गडकरी रंगायतन = गडकरी, दादोजी कोंडदेव स्टेडियम = दादोजी कोंडदेव असंच कानावर यायचं. शाळा, कॉलेजांच्या नावांबाबतही हेच म्हणता येईल.

आजीचं नाव नातीला ठेवण्याची अशी काही चाल आहे का?

ठेवलं अगदी कोणी घरातल्या बाईची आठवण ठेवून तरी ते लग्नानंतर उरवण्याची परंपरा थोडीच होती. आमच्याकडे पणजोबांचं नाव एका चुलतभावाला ठेवलं होतं. पणजीचं नावही मला माहित नाही. आजोबा, पणजोबा, खापरपणजोबा ... अशी पाच-सहा पिढ्या मागची पुरुषांची नावं जुनाट कागदावर जतन केलेली लहानपणी कधीतरी पाहिलेली होती.
(असे निरागस प्रश्न मलाही बरेचदा पडायचे. मग वाचन करायला लागल्यावर सगळा निरागसपणा संपून एक खवचट, cynic कोडगेपणा आला.)

सुशान्त Fri, 25/04/2014 - 13:56

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

संस्कृतात मधु ह्या शब्दाचा मध असाही अर्थ होतो हे बरोबर आहे. मला मधुसूदन ह्या नावातला त्याचा अर्थ अभिप्रेत होता. कारण मधुसूदनचं लघुरूप मधू असं करतात. अर्थात लघुरूप करणारे ते अन्वर्थक असावं असा विचार करत असतील असं वाटत नाही. सामासिक पदाचा उपयोग करण्यासंदर्भातली भाषिक समूहाची सवय तिथे काम करत असावी.

(असे निरागस प्रश्न मलाही बरेचदा पडायचे. मग वाचन करायला लागल्यावर सगळा निरागसपणा संपून एक खवचट, cynic कोडगेपणा आला.)

खरं आहे. माझ्या पणजोबांचं आणि खापरपणजोबांचं नाव मला माहीत आहे. पण पणजी आणि खापरपणजी ह्यांचं नाही. त्यांची नावं आपल्यापर्यंत पोहचतील अशी व्यवस्थाच नाही.

बॅटमॅन Fri, 25/04/2014 - 14:09

In reply to by सुशान्त

खरं आहे. माझ्या पणजोबांचं आणि खापरपणजोबांचं नाव मला माहीत आहे. पण पणजी आणि खापरपणजी ह्यांचं नाही. त्यांची नावं आपल्यापर्यंत पोहचतील अशी व्यवस्थाच नाही.

नक्की तुमच्या घराण्यात वंशावळ कशी लिहिली जायची त्याची कल्पना नाही. पण मला माझ्या पणजोबांसकट पणजीचं नावही ठौक आहे. बाप ते मुलगा हा मेन प्रवास असला तरी बायको कोण, मुली किती व कोण हेही लिहिलेलं असतं. असो.

मन Fri, 25/04/2014 - 14:31

In reply to by बॅटमॅन

लोच्या असा आहे की मुलाचा मुलगा -- त्याचा मुलगा आणि त्याची मुलगी असं हे नातं आहे.
म्हणजे वडिलांकडिल पणजीचे डिटेल्स तितके relevant नसतात.
जेनेटिकली मी माझ्या वडिलांचं पर्यायानं त्यांच्या वडिलांचं आणि पर्यायानं माझ्या वडिलांकडिल पणजोबांचं dna मार्फत
प्रतिरुप, वंशसाखळीतला दुवा आहे.
माझी बहिण ही काही तितकी पणजोबांचं प्रतिरुप नाही.
ती तिची आई, तिच्या आईची आई, आणि असे दोन चार पिढ्या मागे गेल्यावर जी स्त्री येते तिचं प्रतिरुप,dna अंश आहे.
तिचं नाव माझ्या बहिणीला माहित असण्याची शक्यता नगण्य आहे.
(पुरुष वारसा साखळी जितकी सहज जतन होते, तितकी स्त्री वारसा साखळी होत नाही.
फ्याक्ट रिमेन्स द्याट स्त्रीला आपण कुणाचं खरं प्रतिरुप आहोत हे कळायचं मार्ग नाही; असलाच तर लै लै अवघड आहे.)

मुलींचे उल्लेख असतीलही वंशावळीत ; पण ते वडिलांच्या साखळीसंदर्भातच.
पुरुषप्रधान व्यवस्थेत गुंत होते; ती ह्या ठिकाणी होते.

वेळ कमी आहे; अधिक टंकता येत नाही; आशय समजून घेशील ही आशा.
वेळ असता तर उदाहरणासकट लिहिलं असतं.

बॅटमॅन Fri, 25/04/2014 - 14:43

In reply to by मन

?

ज्या फॅमिलीची वंशावळ आहे त्याच फॅमिलीचे स्त्रीपुरुष नोंदवलेले असतील ना? बाप-ते-मुलगा अशी वंशावळ असली तरी त्या अनुषंगाने स्त्रियांचे उल्लेख येतातच. अन्य फॅमिलीचे उल्लेख का येत नाहीत या म्हणण्याला अर्थ काय आहे? एकदा फॅमिली कशी डिफाईन करायची हे ठरलं की ते लेबल धारण करणारे सर्वच स्त्रीपुरुष त्यात येतात. अन्य लेबलांचा उल्लेख येत नाही यात अन्याय आहे असे मला वाटत नाही. फॅमिलीचे लेबल मान्य केल्यावर त्यातील स्त्रियांचे उल्लेख नसतील तर तो अन्याय झाला, अदरवाईज नाही.

मातृसत्ताक पद्धतीतही पुरुषांनी अशी अपेक्षा ठेवणं चुकीचंच आहे असं मला वाटतं. जिथेतिथे अन्याय अन्याय करत ओरडण्यात मला तरी अर्थ वाटत नाही. ज्यांचे जालीय अस्तित्व त्याने सिद्ध होते त्यांना अवश्य वाटूदे तसे. असो.

मन Fri, 25/04/2014 - 14:47

In reply to by बॅटमॅन

मला काहीही म्हणायचे नाहिये अन्याय वगैरे.
फक्त समोरुन कोणता तर्क मांडला जाउ शकतो; किंवा
समोरच्याला काय म्हणायचं असावं ह्याबद्दलचा माझा अंदाज होता.
मी विदुर,बलराम (आणि बहुतेक रुक्मिसुद्धा) ह्यांच्याप्रमाणं महाभारतीय युद्धातून बाजूला होत
आपली झाकली मूठ सव्वालाखाची मानत आहे.

बॅटमॅन Fri, 25/04/2014 - 14:56

In reply to by मन

अहो तर्क काय काहीही मांडतील. ते एक असोच.

बाप-मुलगा-नातू ही साखळी तरी किती लोकांना आपल्या पणजोबांपलीकडे माहिती असते? इतकी वंशावळ इ. लिहूनसुद्धा? तीच कथा आई, तिची आई आणि तिच्या आईची आई यांबद्दल. माझे सुदैव की दोन्ही बाजूंचे पूर्वज मला माहिती आहेत, आणि माझ्या खापरपणजीस(सख्ख्या नव्हे पण अगदी जवळच्या-पणजीच्या माहेरच्या घराण्यातील) तिच्या जितेपणी पाहण्याचे भाग्य मिळालेले आहे. पणजीलाही जितेपणी पाहिलेले आहे.

सुनील Fri, 25/04/2014 - 15:06

In reply to by बॅटमॅन

बाप-मुलगा-नातू ही साखळी तरी किती लोकांना आपल्या पणजोबांपलीकडे माहिती असते? इतकी वंशावळ इ. लिहूनसुद्धा?

मला आहे! मागील जवळपास २० पिढ्यांपर्यंतची!

(टीप - हा विनोदी प्रतिसाद नाही)

बॅटमॅन Fri, 25/04/2014 - 15:10

In reply to by सुनील

नक्कीच असू शकते. पण अशा केसेस विरळा, इतकेच सांगावयाचे आहे. बाकी आमच्या मागील आठेक पिढ्यांपर्यंतची माहिती मिळते, त्याआधीची मिळत नाही.

ऋषिकेश Fri, 25/04/2014 - 15:14

In reply to by सुनील

+१
२० नाही पण १६ पिढ्यांची माहिती आहे (आमचे आडनाव बदलण्यापूर्वीचीही)

मी familyecho या वेबसाईटवर हा विदा मेंटेन करतो. माझ्या वडिलांकडीलच नाही तर आई, आत्या, बायको, सासरे, साउबाई वगैरेंकडील कित्येक पिढ्यांचा डेटा तिथे अपडेटवून ठेवला आहे. त्यामुळे नात्यांचे एक थ्रीडी जाळे डोळ्यांसमोर नेमके उभे राहते :)

ॲमी Sat, 26/04/2014 - 09:02

In reply to by ऋषिकेश

२० किँवा १६ पिढ्या म्हणजे साधारण कोणत्या इ. स.पासुन? मलातर वंशावळ असा काही प्रकार असतो हेदेखील माहित नव्हतं.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 26/04/2014 - 05:48

In reply to by मन

माझी बहिण ही काही तितकी पणजोबांचं प्रतिरुप नाही.

तुम्ही मात्र पणजोबांचं (वडलांच्या वडलांचे वडील) १/४६ एवढं तसंच्या तसं प्रतिरूप आहात. १/४६ हा आकडा किती छोटा आहे याचा विचार सोडून देऊ या.

(पुरुष वारसा साखळी जितकी सहज जतन होते, तितकी स्त्री वारसा साखळी होत नाही.
फ्याक्ट रिमेन्स द्याट स्त्रीला आपण कुणाचं खरं प्रतिरुप आहोत हे कळायचं मार्ग नाही; असलाच तर लै लै अवघड आहे.)

हे मात्र तितकसं खरं नाही. आपण सगळेच एका आदीम ईव्हचे वारस आहोत असं मानण्याइतपत पुरावा शास्त्रज्ञांकडे आहे. याचं कारण मायटोकॉंड्रिअल डीएनए. तो फक्त आईकडूनच येतो. त्यात आईच्या, आईच्या, ... आईची माहिती साठवलेली असते. पण वडलांच्या आईच्या घरातल्या स्त्रियांची माहिती समजत नाही. तशी ती आईच्या वडलांकडच्यांचीही समजत नाही.

आयडी नपुसकलिंगी शब्द असेल तरीही तुम्ही पुरुष आहात हे गृहीत धरून.

मस्त कलंदर Wed, 23/04/2014 - 22:38

सांगली साखराकारखान्याच्या आसपासच्या भागात एका घराचं नांव 'सनमुका' आहे. मला कित्येकदा त्यांच्या घरी जाऊन हा काय प्रकार आहे हे विचारावंसं वाटलं आहे.

सोलापूरच्या वालचंद कॉलेजमधले एक एल एम आर जे लोबो या नावाचे गृहस्थ आम्हाला पाहुणे शिक्षक म्हणून आले होते. आता नक्की लक्षात नाही, पण एक नांव आईच्या बाबांच्या आवडत्या फुटबॉल खेळाडूचे, एक नांव बाबांच्या आईने ठेवलेले आणि नंतरची दोन बहुधा आई बाबांनी ठेवलेली आहेत. म्हणजे हे आख्ख्म त्यांचं एकट्याचंच नांव आहे. ते गमतीने स्वतःला लैला-मजनू-रोमिओ-ज्यूलिएट लोबो म्हणतात.

मनवा नाईकच्या बहिणीचं नांव शारीवा आहे म्हणे. मुळात मनवा म्हणजे मन आणि तत्सम असा काहीतरी ओढून ताणूनचा संबंध सोडला तर त्याचा काय अर्थ आहे हेही मला कळत नाही तिथे शारीवा म्हणजे काय असेल याचा विचारच मी करत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 23/04/2014 - 22:43

In reply to by मस्त कलंदर

शारीवा म्हणजे काय ...

शारापोव्हाचं पर्शियनीकरण. फारसी म्हटलं की नाही, पण पर्शियन म्हटलं की कसा दिमाख वाटतो नै!

वरदा Wed, 23/04/2014 - 23:04

In reply to by मस्त कलंदर

सनमुका हे देवनागरीत लिहिलेले आहे की रोमन लिपीत? रोमन लिपीत असेल तर त्याचा अपेक्षित अर्थ कदाचित सन्मुख असा असू शकतो. किंवा सन(सूर्य) ज्याचे मुके घेतो ते घर असा अर्थ असेल :)

मस्त कलंदर Thu, 24/04/2014 - 21:50

In reply to by वरदा

ते देवनागरीमध्ये 'स न मु का' असं लिहिलेलं आहे. येण्याजाण्याच्या रस्त्यावर असल्याने एसटीतून जाताना नेहमी दिसते.

वरदा Wed, 23/04/2014 - 23:20

भारतीय नावांना सहसा अर्थ असतो ह्याची पाश्चात्यांना कल्पना असल्याने भारतीय लोकांना ते त्यांच्या नावांचा अर्थ हमखास विचारतात असा माझा अनुभव आहे. अमेरिकेत मी भारतीय वंशाचे अनेक जय, नील आणि शान (एस इ अ एन) पाहाते. इथल्या लोकांच्या थोडेफार ओळखीची नावे म्हणून अनेक भारतीय ह्या नावांना पसंती देताना दिसतात. अर्थात जय चा उच्चार अमेरिकन लोक जे असाच करतात. अमेरिकेत आलेल्या तरूण भारतीय पालकांनी त्यांच्या अमेरिकी मुलांना पाश्चात्य नावे देण्याचे प्रमाण वाढत आहे असे मला वाटते. उदाहरणार्थ मी ऐकलेली नावे - मायरा, कायरा, अलीना, आहाना, एलीना.

अनिता, अपर्णा, मिलिंद ही नावेही मुलामुलींना का दिली जातात ह्याचे मला कुतूहल वाटते. अपर्णा ह्या शब्दाचा शब्दार्थ विचारात न घेता केवळ पार्वतीचे नाव एवढाच विचार करतात असे वाटते. तेच वृषाली ह्या नावाचे. कर्णाच्या पत्नीचे नाव वृषाली होते एवढीच माहिती लोकांना असते, शब्दार्थाचा विचार होतोच असे नाही.

आमच्या वर्गात एक मानवी नावाची मुलगी आणि एक सजीव नावाचा मुलगा होता. ही दोन्ही नावे अर्थाच्या दृष्टीने वाईट नसली तरी विचित्र वाटतात खरी.

काही नावांविषयी प्रशन - दिलिप ह्या नावाचा अर्थ काय होतो? भवानी, शिवानी हे शब्द अनुक्रमे भव आणि शिव ह्या शब्दांवरून आले आहेत का? भवानी, शिवानीचे शब्दशः अर्थ काय होतात?

अतिशहाणा Wed, 23/04/2014 - 23:47

In reply to by वरदा

दिलीप नावामागे हिंदू पुराणातील दिलीप राजाचा संदर्भ आहेः http://en.wikipedia.org/wiki/Dil%C4%ABpa

शिवानी - शिवाची पत्नी असा अर्थ दिसतो. मास्तर-मास्तरीण, शिव-शिवानी असे.

अस्वल Wed, 23/04/2014 - 23:47

नावांना अर्थ का हवा? एखाद्या शब्दाचा नाद सुंदर आहे, म्हणून तो शब्द उच्चारणे ह्यात काहीच वाईट नाही.
एखाद्या शब्दामुळे आपल्यासमोर सुंदर प्रतिमा येत असेल तर तो देखील छानच आहे!
आणि आपल्या मनात एक bias असतोच. त्याप्रमाणे आपण नावे स्वीकारतो किंवा नाकारतो.
उदा. मुर्धोष / निर्विलक / भर्मारक / विक्रनील असे random पण संस्कृताधारित आणि कदाचित म्हणूनच अर्थपूर्ण वाटणारे शब्द आपण फारशी चिकित्सा न करता आनंदाने स्वीकारू.
पण टेलीटोक, बाबाषेक / विलीहान / शेझाम अशा random परंतु इंग्रजाळलेल्या शब्दांना आपण बाचकून दूर ठेवू.

नंदन Sat, 26/04/2014 - 06:29

या नकाशानुसार, मुलांच्या नावांत, 'आरव' हे भारतातलं सर्वात लोकप्रिय नाव दिसतं आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 26/04/2014 - 08:08

In reply to by नंदन

नकाशा मजेशीर आहे. आख्ख्या भारत, चीनसाठी एकच नाव पण यूके, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेसाठी बरीच नावं हे रोचक आहे. आईसलंडमध्ये 'सब का मालिक एक' म्हणत असतील काय?

'न'वी बाजू Sat, 26/04/2014 - 08:32

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्या न्यायाने, एवढ्या भल्या मोठ्या सब-सहारन आफ्रिका खंडात एखादा देश वगळता इतरत्र एक तर (१) मुले (= पुल्लिंगी अर्भके) जन्मास येत नसावीत, अथवा (२) मुलांना (पक्षी, पुन्हा, पुल्लिंगी अर्भकांना) नावे देण्याची प्रथा नसावी, या निष्कर्षाप्रत येता यावे.

आख्खे सब-सहारन आफ्रिकाखंड हे (१) स्त्रीराज्य अथवा (२) स्त्रियांचे नंदनवन किंवा (३) स्त्रीवादाची गंगोत्री/मक्का/तुम्ही-जे-काही-म्हणत-असाल-ते यांपैकी काही असेल, याची कल्पना नव्हती.