जुनी मैत्री
- गणेश मतकरी
.
मला मराठी मिडीअमला घातल्याचा म्हणावासा तोटा झाला नाही. म्हणजे, शैक्षणिक दृष्टीने किंवा व्यावसायिकही. कदाचित इंग्लिश मिडीअमचा फायदा अधिक झालाही असता, कारण मराठी मिडीअममध्ये असल्याने इंग्रजी साहित्याची दारं माझ्यासाठी बऱ्याच उशिरा उघडली. पाचवीमध्ये इंग्रजीची सुरुवात, मग सवय करणं अशी सगळी परिस्थिती असल्याने शाळेचा बराच काळ हा केवळ मराठी साहित्याच्या वाचनात गेला. कॉमिक बुक्स, सिनेमे हे इंग्रजी वाचणं, पाहणं होत असे. शिवाय आमच्या आणि माझ्या आजोबांच्या घरची इंग्रजी पुस्तकंही (जी चिकार होती) चाळली जायची. पण इंग्रजी वाचनाची शिस्त बऱ्याच उशिरापर्यंत आली नाही.
मराठी मी पुष्कळच वाचत असे. काहीही. नाटकं चिकार. कथा-कादंबऱ्याही, पण सरसकट साहित्यमूल्याच्या विचाराने असं नाही. करमणूक हाच प्रमुख विचार. मराठी पुस्तकंही घरात - दोन्ही घरांत - होतीच; शिवाय मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा मी सभासदही होतो. घरी बाबांची आणि इतर लेखकांची पुस्तकंही येतच असायची. अशातच कधीतरी एक छोटं पार्सल आल्याचं आठवतं. पॉप्युलर प्रकाशनामधून. या पार्सलमध्ये सहा पुस्तकांचा एक गठ्ठा होता.
बऱ्याचदा आपल्या डोळ्यासमोर प्रसंग जसेच्या तसे उभे राहिले नाही, तरी अनेक तुकड्यांमधून त्या वेळचा फील लक्षात राहतो. भा. रा. भागवतांच्या फास्टर फेणेच्या, माझ्या या पहिल्या भेटीचंही असंच काहीसं आहे. मला त्या वेळी घरी कोण होतं, नक्की पुस्तकांचा गठ्ठा कोणी सोडला, मी ती तेव्हाच वाचायला घेतली का नंतर, असा तपशील आठवत नाही. पण काहीसं ढगाळ वातावरण होतं, हे आठवतं, पुस्तकांची कव्हर्स स्पष्ट आठवतात, कव्हर्सना असणारं कसलंतरी बारीक टेक्श्चर, कव्हरच्या आतल्या पानावर असणारी, बनेश उर्फ फास्टर फेणेची वेगवेगळ्या अॅक्शनमधली चित्रं, अतिशय ग्रेसफुल स्ट्रोक्समध्ये, पण स्केचच्या सहजतेने, वाईरकरांनी काढलेली आतली इलस्ट्रेशन्स, छपाईचा उत्तम दर्जा (हा मला आजूबाजूची अनेक पुस्तकं पाहून आणि त्यांवरच्या चर्चा एेकून अतिशय लहान वयातच कळायला लागला होता) अशा बारीकसारीक अनेक गोष्टी आठवतात. अाता कोणी असंही म्हणेल, की ही तेव्हाची आठवण कशावरून? पुढे ती पुस्तकं वाचताना त्या आठवणीत तपशिलाची भर कशावरून पडत गेली नसेल? पण नाही. त्या पुस्तकांनी असं पुरतं इम्प्रेस करून टाकलं होतं, ते त्या पहिल्या भेटीतच; हे मी अगदी खात्रीने सांगू शकतो. पुढे वाढलेलं प्रेम होतं ते त्यातल्या गोष्टींचं आणि अर्थात त्यातल्या कथानायकाचं.

मराठी साहित्यात फास्टर फेणेचं स्थान अगदी युनिक म्हणण्यासारखं आहे. त्याआधी मी ताम्हनकरांच्या 'गोट्या'सारखी, लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवणारी, साहित्यमूल्य असणारी उत्तम मालिका वाचली होती. नंतरही प्रभावळकरांनी बोक्या सातबंडेची या वळणाची आधुनिक मालिका तयार केली. पण फास्टर फेणेचा प्रकारच वेगळा होता. किशोरवयीन नायकाची या शैलीतली (अनेकदा हार्ड कोअर म्हणण्यासारखी) साहसं मी मराठीत याआधी पाहिलीच नव्हती आणि त्यापुढेही क्वचितच पाहिली. नाही म्हटलं तरी काही स्वतंत्र कथाकादंबऱ्यांमध्ये या प्रकारची हुशार पोरं येऊन गेली. स्वत: भागवतांच्याच 'तैमूरलंगाचा भाला', 'जयदीपची जंगलयात्रा' किंवा 'ब्रह्मदेशातला खजिना'मध्ये या वळणाचे उचापतखोर नायक-नायिका होते, इतर लेखकांच्या लिखाणातही ते क्वचित डोकावत असत; पण या प्रकारची चालू (म्हणजे ऑनगोईंग हं!) साहसमालिका इतर कोणाच्या वाट्याला आली नाही.
स्वत: भागवतांनी 'नंदू नवाथे' किंवा 'बिपिन बुकलवार'सारख्या इतर काही रिकरिंग व्यक्तिरेखाही आपल्या साहित्यातून जन्माला घातल्या; पण त्यांना फास्टर फेणेची सर आली नाही. नंदू तर एक प्रकारे फाफेचाच अॅन्टीथिसीस म्हणता येईल - ज्याचा पूर्ण भर स्वत:ला नायक कल्पिण्यावर होता, अन् जेव्हा ते जमत नसे, तेव्हा थापा मारून तसा आभास तयार करण्यावर. त्यामुळे फाफेच्या खऱ्याखुऱ्या पराक्रमांनी या व्यक्तिरेखेभोवती जसं वलय तयार केलं, तसं नंदूने कधीच केलं नाही. उलट एका कथेत (बलून चालून फास्टर फेणे!) जेव्हा तो आणि फाफे समोरासमोर आले, तेव्हा तो बन्याच्या एका साहसासाठी कारणीभूतही ठरला. बुकलवार तर भागवतांच्या जागतिक साहित्यवेडाचंच (ज्यापायी त्यांनी अनेक गाजलेल्या आणि मुलांनी आवर्जून वाचण्यासारख्या परभाषक साहित्याची मराठी रूपांतरंही केली) एक्स्टेन्शन होता. त्या काळात सातत्याने बालसाहित्य वाचणाऱ्यांना या व्यक्तिरेखा निश्चितच माहीत आहेत. पण हे नाकारता येणार नाही, की या व्यक्तिरेखांचा आपल्या वाचकांवरचा अंमल हा कायम मर्यादितच राहिला; त्याला फाफेची सर कधीच आली नाही.
इंग्रजी साहित्यात या प्रकारच्या साहस/रहस्यभेद करणाऱ्या छोट्या ऍक्शन नायक/नायिकांना तोटा नाही. फाफेच्या काळात (म्हणजे त्याची धाडसं नव्याने लिहिली जात होती त्या काळात), ते जसे होते तसेच ते आजही आहेत आणि तिथे त्यांना वाचकही आहे, हे अलीकडच्या काळात आयकॉनिक ठरलेल्या हॅरी पॉटर/ हन्गर गेम्स/ मेझ रनर सारख्या मालिकांवरून दिसतं. या साऱ्यांचे साहित्यप्रकार वेगवेगळे आहेत हे उघड आहे. त्यांच्याकडेही 'फाईव फाईन्ड आऊटर्स', 'फेमस फाईव', 'सिक्रेट सेवन'सारख्या जुन्या मालिका प्रामुख्याने डिटेक्टिव्ह फिक्शन वळणाच्या होत्या, पुढे आलेले हार्डी बॉईज, नॅन्सी ड्रू, थ्री इन्वेस्टिगेटर्स यांचंही वळण तेच पण अधिक अॅक्शन-ओरीएन्टेड. पण हल्लीच्या काळात त्यांच्या बालसाहित्याचा जेनेरीकली वाढत चाललेला आवाका दिसतो, तो फॅन्टसी, विज्ञान, सुपरहीरो अशा विविध साहित्यप्रकारांच्या यात होत गेलेल्या वापराने. आपल्याकडे मात्र दुर्दैवाने मराठी बालवाचक कमीच होतोय. काही प्रमाणात दृश्य माध्यमं आणि इन्टरनेटसारख्या वेडाने त्याचा वाचनावरचा रोखही कमी केलाय, अन त्याचबरोबर अधिकाधिक सुखवस्तू कुटुंबातल्या, वाचनसंस्कृती जपणाऱ्या कुटुंबातल्या मुलांचं शैक्षणिक माध्यम बदलून इंग्रजी होणं, हेदेखील मराठी वाचनावर परिणाम करणारं ठरलंय. या सर्वांवर उपाय काय हे माहीत नाही, पण या बदललेल्या काळातही परकीय साहित्याशी टक्कर देण्याची हिंमत असलेल्या भागवतांच्या मराठमोळ्या नायकाला आपण विसरू शकत नाही, हे खरं.
फास्टर फेणेचं साहित्य हे लघुकथांच्या फॉरमॅटमध्ये अधिक मोठ्या प्रमाणात आहे, अर्थात ते एपिसोडीक आहे. कादंबऱ्यांमधून लोकप्रियता मिळवणाऱ्या परदेशी नायकांमधला आणि फाफेमधला हा मोठा फरक. याचं साधं कारण असंही आहे, की भागवतांच्या कथा ज्या काळात लिहिल्या गेल्या, तो काळ मुलांच्या मासिकांसाठी खूप चांगला होता. किशोर, कुमार, आनंद, यांसारखी महत्त्वाची आणि वर्षानुवर्षं मुलांसाठी दर्जेदार साहित्य छापणारी मासिकं तेव्हा होती. त्याखेरीज वृत्तपत्रांच्या पुरवण्यांमधेही सकस बालसाहित्याला जागा होती. भागवतांचा हा लोकप्रिय नायक या साऱ्या ठिकाणांहून मुलांच्या भेटीला आला नसता तरच नवल. आता मासिकां/वृत्तपत्रांमधूनही क्रमश: कादंबरी छापणं शक्य असतं; नाही असं नाही. फाफेने ती वाटही चोखाळली, पण तो शॉर्ट स्टोरी फॉरमॅटमध्ये अधिक रमला, असं वाटतं. तो आणि त्याची विद्याभवनची (सुभाष देसाई/ शरद शास्त्री वगैरे) गँग, मामेबहीण माली, आणि इंद्रू इनामदार, उत्तम टण्णू, लडकत कंपू सारखे दुश्मन यांनी बन्याच्या बऱ्याच गोष्टींमध्ये मजा आणली आहे. छोटेखानी (बऱ्याचदा, नेहमीच नाही - कारण बन्याच्या साहसात पाकिस्तानी हेर पकडण्यापासून ते पानशेतच्या पुरात अडकण्यापर्यंत सर्व प्रकारच्या घडामोडी आहेत) स्वरूपाचं साहस, भागवतांची वाचकांशी थेट संवाद साधणारी गमतीदार शैली, दर व्यक्तिरेखेचे आपापले अॅटीट्यूड, फाफेभोवती कायम असणारं वलय, 'ट्टॉक्' या पालुपदासारखे त्याचे मॅनरिझम्स, या सगळ्यामधून फास्टर फेणेच्या गोष्टी भलत्याच रंजक बनलेल्या आहेत.
माझा या मित्राशी पहिला परिचय करून देणाऱ्या त्या पहिल्या सहा पुस्तकांच्या संचात, प्रामुख्याने अशा कथाच होत्या. 'फुरसुंगीचा फास्टर फेणे'मध्ये बन्याच्या जन्मापासून ते विद्याभवनमधल्या प्रवेशापर्यंत घडणाऱ्या, थोड्या या व्यक्तिरेखेची ओळख करून देणाऱ्या, पार्श्वभूमी मांडणाऱ्या कथा होत्या. सुपरहिरो ग्रामरमध्ये बोलायचं, तर या पुस्तकातल्या साऱ्या एपिसोड्सना मिळून ओरिजिनल कथानक म्हणता येईल, कारण त्याचा शेवट हे उचापतखोर बनेशचं 'फास्टर फेणे' हे नामकरण होण्यात, त्याला आपण काय रसायन आहोत याची जाणीव होण्यात; म्हणजेच फाफे, फाफे बनण्यात होतो. वाचकाने या पोराबरोबर या सुरुवातीच्या कथांमधून केलेला प्रवास, हा त्याला या नायकाची पूर्ण ओळख करून देतो आणि पुढल्या पुस्तकांमधून काय अपेक्षा करायची, याची जाणीव करून देतो. इतर पुस्तकं त्या अपेक्षा यथायोग्य पुऱ्या करतात, हे वेगळं सांगायला नको.
'जवानमर्द फास्टर फेणे'
नाही म्हणायला या सहातली दोन पुस्तकं थोडी वेगळी होती- 'जवानमर्द फास्टर फेणे' आणि 'फास्टर फेणेचा रणरंग'. वेगळी अशासाठी की, फाफे भारत-चीन युद्धात सामील होतो अशी कल्पना करून ('महाराष्ट्र टाईम्स'च्या शंकर सारडांचा या कथा लिहिल्या जाण्यामागे हात होता, असं एेकलंय) रंगवलेली बन्याची आघाडीवरली साहसं इथे होती. हे सारं मिळून एक कथानक, अशी कल्पना केली, तर हा कादंबरीचा एेवज मानला जाऊ शकतो; तरीही भागवतांनी संकल्पनेत या कथाभागाची रचना कादंबरीसारखी ठेवलेली नाही. या कथा तशा सेल्फ-कन्टेन्डच आहेत, स्वतंत्र वाचण्यासारख्या. 'क्रमश:'चा धाक वाचकाला न घालणाऱ्या. पुढल्या काळात भागवतांनी कादंबरीची रचना वापरली, पण मोजक्या ठिकाणी.
त्या पहिल्या सहा पुस्तकांच्या मी जशा वाचून-वाचून चिंध्या केल्या, तशा पुढच्या पुस्तकांच्या झाल्या नाहीत; पण मी बराचसा फास्टर फेणे वाचत राहिलो, जसा तो पुस्तकरूपाने प्रकाशित होत राहिला तसा. आमच्या शेजारी रहाणाऱ्या सुमती भालेराव उर्फ सुमनताई, 'प्रेस अॅन्ड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स' नावाच्या सरकारी संस्थेत काम करत. त्यांचं कामच असायचं की नव्या प्रकाशित होणाऱ्या सर्व मजकुराची (वृत्तपत्र / पुस्तकं इन्क्लुडेड) नोंद ठेवायची. मला घरातले पुस्तकांचे ढीग कमी पडायला वागले की मी सुटीचा मुहूर्त पाहून त्याच्याबरोबर त्यांच्या ऑफिसला जायचो. त्या मला मुलांची पुस्तकं नोंदवणाऱ्या विभागात घेऊन जायच्या आणि मी दिवसभर तिथे बसून वाचन करायचो. फास्टर फेणेच्या पुढल्या इन्स्टॉलमेन्टमधली, 'गुलमर्गचे गूढ आणि फास्टर फेणे'; किंवा 'फास्टर फेणे डिटेक्टीव', यांसारखी काही पुस्तकं मी अशी सरकारी कृपेने वाचली. त्याशिवाय वर्गात (शाळेच्या वाचनालयाच्या मुलांचं कल्याण पाहणाऱ्या कृत्रिम सिलेक्शनपलीकडे जाणारी) माझ्यासह काही मुलांची व्यक्तिगत कलेक्शन्सही असायची. प्रामुख्याने कॉमिक्स, पण इतर लोकप्रिय पुस्तकंही कोणा ना कोणाकडे असायची; जी सर्क्युलेट व्हायची. यातही काही माल मिळून जायचा. तेव्हापासून कलात्मक पायरसीची आवड लागली, ती कायमचीच.
अपवाद वगळता, फास्टर फेणेच्या कादंबऱ्या, या बऱ्याचशा विस्तारित कथेसारख्या आहेत. अधिक मोठी घटना, अधिक तपशिलात लिहिल्यासारख्या. उदाहरणार्थ, 'प्रतापगडावर फास्टर फेणे'. कदाचित एक विशिष्ट वयाचा वाचक डोळ्यापुढे असल्याने भागवतांनी लिखाण सोपं ठेवलं असेल. या कथानकांना टप्पे आहेत, पण कादंबरीत अपेक्षित असलेली अनेककेंद्री रचना किंवा गुंतागुंत नाही. तरीही 'गुलमर्गचे गूढ'सारख्या कादंबऱ्या, या बालवाचकाला गोष्ट म्हणून निश्चितच आवडण्यासारख्या. मला आजच्या वाचकाचा, या कादंबऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असेल हे मात्र नीटसं कळत नाही. ही मुलं आज जे पाहतात, वाचतात, एेकतात ते खूपच लेअर्ड आहे. अगदी मुलांसाठी रचलेलंसुद्धा. त्यांना कदाचित या कादंबऱ्या फार सोप्या वाटतील. कथांचं मात्र तसं होणार नाही नक्कीच.
कालांतराने फास्टर फेणेने दृश्यरूप घेतलं आणि टीव्ही मालिकेतही तो अवतरला. मात्र माझ्या आठवणीप्रमाणे 'किलबिल' वा तत्सम मुलांच्या कार्यक्रमात बन्याने आधीच पदार्पण केलेलं होतं. त्याची 'ट्रिंग ट्रिंग फास्टर फेणे' ही एक गोष्ट टीव्हीवर पाहिल्याचं आणि आवडल्याचं तरी मला नक्की आठवतं. त्यामानाने अधिक सुविहित प्रयत्न असूनही आणि प्रमुख भूमिकेत सुमित राघवनसारखा योग्य नायक मिळूनही, मालिकेशी माझं फार जमलं नाही. त्यात काही आश्चर्यही नाही. अनेकदा साहित्याच्या प्रेमात असलेला वाचक त्याच्या डोक्यात येणाऱ्या गोष्टी पडद्यावर पाहण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा त्या दिसत नाहीत, तेव्हा माध्यमाला दोष देतो. ही गोष्ट फार जुनी आणि मी जागरूकपणे चित्रपट पहायला लागण्याच्या कितीतरी आधीची. त्यामुळे असं झालंच नसेल, असं मी शपथेवारी म्हणणार नाही. पण पहिल्या भागातच कसला तरी इको-फ्रेन्डली मेसेज मांडला गेला आणि माझं मालिकेवरून मन उडालं. पुढे मी काही एपिसोड पाहिले, पण मालिकेने माझ्या डोक्यातली पुस्तकांची जागा कधीच घेतली नाही, एवढं खरं.
आज एक चांगली गोष्ट म्हणजे ज्यांना वाचायचं असेल, त्यांच्यासाठी फास्टर फेणेचा उत्कर्ष प्रकाशनाने काढलेला वीस पुस्तकांचा संपूर्ण संच उपलब्ध आहे. त्याच्या प्रकाशनाचा दर्जा त्या पॉप्युलरच्या पुस्तकांसारखा नाही ही एक त्रासदायक गोष्ट. दुसरी त्रासदायक गोष्ट ही, की आतल्या चित्रांचा जो काही गोंधळ आहे तो! फास्टर फेणे वाचकांच्या डोळ्यासमोर उभा करण्यात भागवतांइतकाच हात होता तो राम वाईरकरांच्या चित्रांचा. सहज वाटणारी, पण उत्तम निरीक्षण असलेली ही चित्रं या नायकाला विनासायास जिवंत करत. फास्टर फेणेच्या पुढल्या आवृत्त्यांमध्ये कव्हर वाईरकरांचं आणि आतली चित्रं दिलीप कदम / मुकुंद तळवलकर यांची असा सरसकट उल्लेख आहे. अगदी आत वाईरकरांची चित्रं असतानाही पुस्तकांवर असाच उल्लेख आहे. यातली कदमांची सही असलेली चित्रं (यांत काही ठिकाणी विजय कदम अशी सहीदेखील आहे) वाईरकरांइतकी खास नसली तरी मेहनतीने काढलेली आणि मूळ हेतूशी प्रामाणिक आहेत.

पण मी नुकत्याच घेतलेल्या नव्या आवृत्तीत तिसऱ्याच एका व्यक्तीची चित्रं आहेत ज्यांखाली सही नाही. शैली आणि ऋणनिर्देश पाहिले, तर ही वाईरकर किंवा कदम यांची नाहीत, म्हणजे तळवलकरांची हवीत. पण हा ऋणनिर्देशही अजिबात भरवशाचा नाही. पण ती कोणाची का असेनात, एक मात्र खरं की या चित्रांचा इतर दोघांच्या शैलीशी दुरूनही संबंध नाही. ती फाफेला कॉम्प्लिमेन्ट न करता कार्टूनीश (वाईट अर्थाने) करतात. आश्चर्य म्हणजे, अनेकदा इतरांची चित्रं असताना ही अनावश्यक चित्रं मध्ये घुसवली आहेत. अगदी पहिल्या पुस्तकापासून. हे का आहे कळायला मार्ग नाही. कितव्या आवृत्तीपासून आहे माहीत नाही.
'जवानमर्द फास्टर फेणे'मध्ये केलेलं फाफेचं रेखाटन
पुढल्या आवृत्तीपासून जर का 'उत्कर्ष' ही घोडचूक सुधारू शकलं आणि छपाईच्या दर्जाचंही काही करू शकलं, तर मी त्यांचा व्यक्तिशः (आजन्म वगैरे) ऋणी राहीन. असो.
मराठी मिडीअमला घातल्याचा मला म्हणावासा फायदाही झाला नाही; पण जो झाला त्यात वाचनाचं महत्त्व आहेच. वयाची पहिली पंधरा/सोळा वर्ष हा तसा महत्त्वाचा काळ असतो आणि या काळात तुम्ही जे वाचता ते कायम तुमच्याबरोबर राहतं. कदाचित मी इंग्रजी माध्यमात असतो, तर जागतिक साहित्य माझ्यापर्यंत लवकर पोचलं असतं; कदाचित नसतं. पण फास्टर फेणेसारखा घरचा मित्र भेटला असता की नाही याची शाश्वती देता येत नाही; आणि तो न भेटणं हा तोटा मात्र कल्पनाही न करवण्याइतका मोठा.
***
शेवटचे चित्रः गणेश मतकरी यांच्याकडून
लेखातील इतर चित्रे: जालावरून साभार
विशेषांक प्रकार
छान! काहिशा पुनरुक्तीने
छान! काहिशा पुनरुक्तीने भरलेला असला तरी आवडत्या विषयातील पुनरुक्ती बोचत नाही तसे काहीसे झाले.
चांगले स्वगत/मुक्तक!
===
मराठी लेखात इंग्रजी शब्द वापरू नयेत असे नाही पण मिडीयमला 'माध्यम'यासारखे रुळलेले व सहज वापरात असलेले शब्दही (हाच असे नाही इतरही काही) टाळल्याने थोडा रसभंग होतो हे ही नमूद करायला हवे!
इंग्रजी शब्दांच्या वापराबद्दल
इंग्रजी शब्दांच्या वापराबद्दल - 'रुळलेला आणि सहज वापरातला' या संज्ञेची व्याख्या व्यक्तीव्यक्तीगणिक बदलत असते. म्हणून असा रसभंग होत असावा. माझा असा रसभंग झालाच, तर 'अशा वापरामुळे मराठीत आणिक एखाद्या घासूनपुसून मराठी करून घेतलेल्या प्रतिशब्दाची भर पडेल!' असं म्हणून मी तो वापर 'सरसा करून घेते'!
इंग्रजी वापर
माझं मत आहे की बोलीभाषेत जे शब्द रुळलेले आहेत, ते सहज वापरायला हरकत नाही. माझ्या एकूण लिखाणातच या प्रकारचा दृष्टीकोन आहे. माझ्या घरात आणि आईच्या माहेरच्या बाजूला मराठीवर उत्तम प्रभूत्व असतानाही अन मी मराठी शाळेत असूनही लहानपणापासून जे जे इंग्रजी शब्द बोलण्यात आलेले आहेत त्यातला मिडीअम हा एक आहे. त्यामुळे मला तो परका वाटत नाही. उलट माध्यम हा शब्द कृत्रिम वाटतो. मी जेव्हा लेख सबमिट केला तेव्हा मला एेसी अक्शरे टीमने जे पर्यायी शब्द सुचवले त्यात माध्यम हा शब्द होता. जो वापरु नये असं मी सुचवलं. त्यामुळे हा थोडा भूमिकेचा प्रश्न आहे. सो , सॉरी फॉर रसभंग !
फास्टर फेणेची सर भारांच्या
फास्टर फेणेची सर भारांच्या इतर नायकांना नाही, हे अगदी नेमकं निरीक्षण आहे. पण तसं नक्की का आहे, याबद्दल अधिक विवेचन वाचायला आवडलं असतं. एखादा हीरो नक्की का यशस्वी-लोकप्रिय-पिढ्या ओलांडून लक्षात राहणारा होतो, त्यावर प्रकाश पडला असता. असो.
दुसरा - मला सगळ्यांत महत्त्वाचा वाटलेला - मुद्दा, बालसाहित्यातल्या दृश्य भागाचा. एका विशिष्ट वयापूर्वी वाचलेल्या / पाहिलेल्या पुस्तकांमधली चित्रं डोक्यात इतकी घट्ट रुतून बसलेली असतात, की कितीही वर्षांनंतर कुठेही ती पाहिली, तरी त्याच्याशी जुळलेला मजकूर-त्या वयातले विशिष्ट गंध-पुस्तक वाचतानाचा मूड हे सगळं जादू केल्यासारखं डोक्यात जागं होतं. ताम्हनकरांच्या 'खडकावरला अंकुर'मधली काही चित्रं आणि त्यासोबतची रेखाटनं आठवतात - 'अक्का, मी आलो!' असं म्हणत उंबर्यात आलेला तरुण पंडित आणि त्याचा शालीन-गोड चेहरा, किंवा ताटातल्या जिलब्या भिरकावून उद्विग्नपणे जाणारा पोरवयातला पंडित आणि सोबत 'उपाशी मेलेलं बरं!' हे त्याचे उद्गार. किंवा व्हिक्तर द्रागून्स्कीच्या 'देनिसच्या गोष्टी'मध्ये समुद्रावरच्या वाळूत लोळणारे देनिस आणि मिष्का आठवतात. काय ऊबदार रसरशीत रंग होते ते, माय गॉड... तूर्तास बाजारात असलेलं श्रीनिवास पंडितांनी अनुवादित केलेलं 'देनिस..' परकं आणि निर्जीव वाटतं, ते बव्हंशी चित्रांच्या अनुपस्थितीमुळेच. फास्टर फेणेच्या बाबतीतही तेच. वाईरकरांचा फाफे भारांच्या फाफेशी इतका एकरूप झालेला आहे, की पुढे पुढे ठणठणपाळाच्या रेखाचित्रानं जिवंत होऊन दळवींना जी प्रेरणा पुरवली, तीच प्रेरणा वाईरकरांच्या फाफेनं भारांना पुरवलेली असल्याची कथा ऐकली तरी मला नवल वाटणार नाही. त्या चित्रांच्या ऐवजी ही अशी कमअस्सल चित्रं का बरं वापरावीत? इथे तर निर्मितिमूल्यांमध्येही फार फरक पडत नसावा. मग हे कळाहीनतेकडे जाणारे बदल नक्की कशासाठी, असा प्रश्न पडतो. या लेखाची दखल प्रकाशकांनी घेतली, तर फार बरं होईल.
अंमळ अवांतर
चित्रे आणि मजकुराचे लहान वयात खास अद्वैत होऊन जाते. बाबासाहेब पुरंदर्यांच्या राजा शिवछत्रपतीमधील आणि चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातील काही चित्रे, पळणीटकरांनी लिहिलेल्या समर्थचरित्रातील काही चित्रे ही आजही त्या त्या प्रसंगाशी अतिशय घट्टपणे निगडित आहेत. ते ते प्रसंग व्हिज्युअलाईझ होतात ते त्या काही चित्रांनिशीच. महाभारत-रामायणाबद्दलही असेच म्हणता यावे. त्यामुळे लेखात मांडलेल्या चित्रांबद्दलच्या मताशी अतिशयच सहमत आहे. मूळ प्यूरिटी टिकवलीच पाहिजे.
त्या फाफेच्या चित्रांची खास
त्या फाफेच्या चित्रांची खास आठवण म्हणजे डोईच्या तेलावरुन फिरवून घेतलेला तो टिपिकल हिरवा कडक खोडरबर (कॅम्लिन कंपासमधे येणारा) दोनतीन मिनिटं फाफेच्या पुस्तकातल्या चित्रावर दाबून धरला की ठसठशीत प्रतिमा खोडरबरावर उमटायची. काळ्या शाईचा, आणि त्या खास प्रकारच्या छपाईचा परिणाम असणार. त्यामुळे माझी अनेक खोडरबरे फाफेचे चेहरे बाळगून असत. (आणि पुस्तकातले अनेक फाफे तेलाची चौकट "ऑरा"प्रमाणे चेहर्याभोवती वागवत)
खुद्द या लेखात दिलेलं एक चित्र त्या खोडरबर फेमपैकी आहे, त्यावरुन ही आठवण तीव्रतेनं झाली.
आज डाऊन द मेमरीलेन सफर चालली आहे सकाळपासून या अंकामुळे.
मराठी मिडीअमला घातल्याचा मला
मराठी मिडीअमला घातल्याचा मला म्हणावासा फायदाही झाला नाही; पण जो झाला त्यात वाचनाचं महत्त्व आहेच. वयाची पहिली पंधरा/सोळा वर्ष हा तसा महत्त्वाचा काळ असतो आणि या काळात तुम्ही जे वाचता ते कायम तुमच्याबरोबर राहतं. कदाचित मी इंग्रजी माध्यमात असतो, तर जागतिक साहित्य माझ्यापर्यंत लवकर पोचलं असतं; कदाचित नसतं. पण फास्टर फेणेसारखा घरचा मित्र भेटला असता की नाही याची शाश्वती देता येत नाही; आणि तो न भेटणं हा तोटा मात्र कल्पनाही न करवण्याइतका मोठा.
हे पटले. फास्टर फेणे ला मी लहानपणी ईनिड ब्लायटन, थ्री इन्वेस्टिगेटर्स वगैरे वाचत होते तेव्हा भेटले नाही हे माझे दुर्दैव आहे. तेव्हा कोणी तुम्हाला पॅकेट पाठवलं असतं तसं मलाही पाठवलं असतं तर छान झालं असतं! पुढे मी काही कथा वाचल्या, पण ज्या वयात वाचनाची गोडी निर्माण होत होती, आणि तासंतास पुस्तकात नाक खुपसून बसायला वेळ होता, तेव्हा वाचायची मजा वेगळीच असावी. त्यामुळे या विशेषांकाचा खर्या "भारा"वलेल्यांसारखा तेवढा आनंद मला घेता येत नाही याची जाणीवही आहे. पण आता संपूर्ण मालिका मागवून माझ्या मुलाबरोबर पुन्हा वाचेन.
कॉमिक्स मधे फास्टर फेणे आजही उपलब्ध आहे का?
लहानपणची एकेक करुन जमवलेली
लहानपणची एकेक करुन जमवलेली फाफे मालिका मित्रांनी उसनी नेऊन, वेगवेगळी गावं बदलताना वगैरे गळून गेली होती. पाचेक वर्षांपूर्वी पुन्हा एकदा संपूर्ण सेट मिळतोय म्हणून घेऊन ठेवला आहे.
अर्थात त्याला आता निव्वळ "कलेक्टर्स व्हॅल्यू" उरलेली आहे. आपल्याला अर्थातच आता ती पुस्तकं वाचणं सुरुवातीच्या काही मिनिटांच्या वर रसपूर्ण वाटत नाहीत, आणि नवीन पिढीला ती पूर्ण कालबाह्य वाटत असल्याने "त्या काळात मागे जाऊन" त्या काळाच्या संदर्भात ती वाचणं वगैरे इतके परिश्रम ती पिढी घेईल, किंवा त्यांनी घ्यावे असं वाटत नाही. किंबहुना माझं मत म्हातारडं वाटण्याचा धोका पत्करुन मी सांगतो की सध्याच्या काळाचे लेटेस्ट संदर्भ घेऊन असा साहसी कथानायक लिहीला तरीही फाफेचा निष्पापपणा त्यात आणणं आणि पोरांना तो अपील होणं कठीण आहे. कारण कुमारवयीन "इनोसन्स" हाच मुळात खूपसा आउटडेटेड झाला आहे. त्यात काही वाईट आहे असं नव्हे.. पण तसं भासतं हे खरं.
फुरसुंगीलाही आयटी पार्क झालाय..
काढा धागा.. इनोसन्सवर. मी
काढा धागा.. इनोसन्सवर.
मी म्हणतोय तो वेगळा मुद्दा आहे. वाडवडिलांचा धाक कमी किंवा त्यामुळे आगाऊपणा इत्यादि हा भाग इथे म्हणत नाहीये. प्रचंड कम्युनिकेशन, माहिती मिळण्याचे भरपूर वाढीव मार्ग आणि अशा अनेक नवीन फॅक्टर्समुळे पोरं स्मार्ट झाली आहेत, आणि याचा साईड इफेक्ट म्हणून पूर्वी जो चांगला समजला जायचा असा "इनोसन्स" आता तितकासा चांगला गुण वाटत नाही आणि तो टिकतानाही दिसत नाही. यात कोणी मुद्दामहून काही चुकीचं करतंय किंवा त्यात अपाय आहे असं नव्हे. काळानुरुप होतंय फक्त.
मुलं भयंकर स्मार्ट झालेली
मुलं भयंकर स्मार्ट झालेली आहेत इतकी की भीती वाटावी.
.
परवा मुलीला तिचं पहीलं सुडोकु सोडवायला दिलं. अन सांगीतलं की जर हे सोडवलस तर २० रुपये बक्षीस देइन. तिने सोडवलं पण मागे उत्तर बघत अन हे वर म्हणाली की "मी कॉपी केलेलं नाही, मी फक्त भरकटू नये या हेतूने रि-चेक करत होते." मला माहीत होतं त्यात काही तथ्य नाही अन तरीही ढिसाळ काँट्रॅक्ट मुळे खिशाला १० रुपयाचा फटका बसला.
.
आईला इमोशनल ब्लॅकमेल कसं करायचं , केव्हा अन किती रडवा चेहरा करायचा वगैरे सर्व नीट कळतं. हे पूर्वीही होतं का माहीत नाही पण मी तरी असलं कधी केलं नाही.
.
याला स्ट्रीट्-स्मार्ट्नेस म्हणायचा की क्रुकेडनेस हे ठरवता येत नाही.
हा त्या लेखाचा दुवा.
हा त्या लेखाचा दुवा.
आमच्या शेजारी रहाणाऱ्या सुमती
काय नशीबवान माणूस!