माझे रिकामपणाचे उद्योग - मधुबनी चित्रकला
विकीवरची माहिती खरी मानायची तर, मधुबनीची पाळंमुळं नेपाळ आणि बिहारच्या उत्तर भागातली. बिहारमध्ये मधुबनी नावाचा जिल्हा आहे , पण हिचं मूळ ते नेपाळच्या मधुबनी-जनकपुर नगरीतलं. जनक राजानं म्हणे सीतेच्या स्वयंवराच्या वेळेस नगर सुशोभित करायला सांगितलं आणि या भित्तीचित्रकलेचा उगम झाला. पूर्वी फक्त लग्नकार्याच्या वेळेस सीमीत असलेली ही कला मुख्यतः ब्राह्मण, कायस्थ व दुसाध (पास्वान) स्त्रियांकडून जोपासली गेली. नंतर मग विसाव्या शतकात भूकंपाच्या वेळेस विल्यम आर्चर नावाच्या एका ब्रिटिश अधिकार्याच्या नजरेस पडली. त्याने त्यावर एका भारतीय-नेपाळी मासिकामध्ये एक लेखही लिहिला. काही काळानंतर मग दुष्काळानंतर अर्थार्जनासाठी म्हणून या कलेला भिंतींवरून कागदांवर आणण्यात आलं.
मधुबनी चित्रे पाहता त्यात कृष्ण-राम-सीतेची, मासे, साप, सूर्य, पक्षी आणि झाडं-झुडूपं यांची चित्रं अधिक दिसतात. चित्रांना दिलेली बॉर्डर हेही एक गोड प्रकरणच आहे. हा एक नमुना-

तर, नवीन काहीतरी चित्रं काढण्याच्या खुमखुमीत मी पहिलंच चित्र हे निवडलं.

घरी ड्रॉईंगबुक होतं साधं. त्याच्याच एका पानावर तीन सूर्य अदमासे बसवले.
नंतर पहिल्या सूर्यावर प्रयोग करताना लक्षात आलं की एक चेहर्याची एक बाजू छान जमलीय पण नेमकी तशीच दुसरी बाजू काढणं अवघड आहे. थोडीशी पेन्सिल आणि बरंचसं खोडरबर वापरून एक सूर्यमुख काढलं आणि लक्षात आलं की या मापाचे तीन चेहरे या पानावर बसणार नाहीत. केलेली मेहनत फुकट न घालवता जर्राशी अॅडजस्टमेंट केली आणि कसेबसे तिन्ही सूर्य एका पानावर आले.

इंटरनेटवरची माहिती वाचून कुणीतरी पोस्टर कलर्स चांगले म्हटल्यावरून ते आणले होते. पण मला रंगकाम कितपत नीट जमेल याची खात्री नसल्याने स्केचपेन्स, मार्कर्स यांची मदत घेऊन आधी असं अर्धवट व नंतर घेतलेल्या चित्राबरहुकूम रंगकाम संपवलं.


नंतर मात्र आधीचं हिरवं चित्रच लै भारी होतं असं वाटत राहिलं.
पहिल्या चित्रानं तितका दगा न दिल्यानं आता जरा यूटयूबकडे मोहरा वळवला. तिथे भारती दयाल या मधुबनी शैलीतल्या प्रसिद्ध बाईंनी एक दहा-बारा मिनिटांच्या चित्रफितीत चित्र कसं काढायचं हे दाखवलंय.
 मूळ मधुबनी चित्रं जरा ओबडधोबड असल्याने मला अगदी तशीच काढायची नव्हतीच. दयालबै हाती थेट मार्कर घेऊन सरसर चित्र काढत गेल्या आणि मी पेन्सिलीच्या मागे खोडरबर घेऊन परत एकदा चित्राक्षरं गिरवायला लागले. चित्र ९०% पूर्ण झालं आणि मास्तरीणबैंनी दगा दिला. हाती घेतलेलं चित्र सोडून त्यांनी दुसर्याच चित्राने शेवट केला. मग त्यांनी अर्धवट सोडलेलं चित्र आंतरजालावर खूप शोधलं पण ते नेहमीप्रमाणं मी हातातलं चित्र कसंबसं पूर्ण केल्यावरच सापडलं. या चित्रावर आपण लहानपणी चित्रात काढायचो तसे पार्श्वभूमीवर खवले होते. मी शक्य तितका कंटाळा टाळत त्यांना माझ्यापरीने नाजूक करायचा प्रयत्न केला होता. आणि मी पुढचं चित्र काढेपर्यंत मला माझ्या चित्रकारीचं लै कौतुक वाटलं होतं.

हा सगळा प्रकार साधारण फेब्रुवारीच्या आसपास चालू होता आणि मार्चमध्ये आजपर्यंत कधीही न पाहिलेल्या आणि प्रचंड हुषार अशी ख्याती असलेल्या एका आंतरजालीय मैत्रिणीला भेटायचा योग आला. साधारण वावरावरून तिला कला प्रकारात रस असेल असं वाटत होतं. त्यामुळं तिच्यासाठी एक मधुबनी फ्रेम बनवून न्यावी असं ठरवलं. या वेळेस पुन्हा एकदा भारती दयाल बाईंचंच चित्र घेतलं. ते आधीच्या चित्रासारखंच , फक्त थोडासा फरक असलेलं असं होतं. एका चित्रावरून काय चुका करायच्या नाहीत हे कळालं होतं. मध्येच कधीतरी केतकीनं पोस्टर कलर्सऐवजी अक्रिलिक कलर्स वापरायला सुचवलं होतं त्यामुळं रंगही बदलले होते. हे चित्र खूप मनापासून,अगदी नाजूकपणे कोरून काढलं आणि आता भेट म्हणून बाजारातून दुसरं काहीतरी आणून द्यावं की काय असं वाटेपर्यंत खूपच आवडलं. पण इतकाही हलकटपणा बरा नव्हे म्हणत काचेची ती फ्रेम  मुंबई ते खडगपूर आणि खड्गपूर ते कोलकाता जीवापाड जपून नेल्याचं चीज झालं. :-)
घरी काचेच्या टेबलावर वस्तूंचे डाग पडतात म्हणून मोठ्या आकाराचे कोस्टर्स आणले होते. ते इकडेतिकडे पडलेले पाहावले नाहीत. म्हणून मग एका चॉकलेटबॉक्सचा बळी दिला. परंतु त्याचं झाकण मोठं तर डबा आकाराने थोडा लहान होता. मग त्याला सगळीकडून पांढरा कागद चिकटवून दोन्ही बॉक्सेसना एकत्र आणलं. आणि बाल वॉशिंग्टनच्या जोशात त्या बॉक्सलाही रंगवून टाकलं. जशी मानवी चेहरे आणि मागे खवले ही भारती दयालांची स्टाईल, तशीच अशी पक्षी आणि झाडांची चित्रे ही विदुषिनी प्रसाद यांची खासियत.


ही अशा प्रकारची चित्रेही त्या काढतात. यांना पारंपारिक मधुबनी म्हणता यायचं नाही, पण अशा छापाची गणपती इत्यादींची चित्रे त्यांनी पुष्कळ काढली आहेत.

(हे मूळ चित्र खूप नाजूक आणि सुंदर आहे, मी त्याला ओबडधोबडपणाचं कोंदण दिलंय) 
जाता जाता तोडलेले अकलेचे तारे:-
१. थोडा हलका हात सोडून मुक्तपणे आकार येऊ द्यावेत. मधुबनी ही लोककला असल्याने आणि त्यातही ही चित्रे थेट भिंतीवर काढली जात असल्याने तिथे खाडाखोड होत नसावी. सहज आलेले आकार थोडे अनियमित असले तरीही सुंदर दिसतात.
२. मु़ळात फक्त पारंपारिक रंग वापरले जातात. पण उपलब्धतेनुसार आणि प्रयोग अधिक काळ टिकावेत असं वाटत असेल तर अक्रिलिक रंग अधिक उत्तम.
३. चित्राच्या आरेखनास उठाव देण्यासाठी मार्कर किंवा पायलटचा काळा पॉईंट पेन वापरता येईल पण मोठे चित्र काढायचे असल्यास काळा रंगच वापरावा. मोठ्या चित्रात मार्करच्या काळेपणात कुळकुळीतपणा न दिसता ब्राऊन शेड दिसते.
४. नको तिथे शहाणपणा करून जिथे दोन्ही बाजूला समतोल साधायचा आहे असं चित्र नमनालाच न घेता इतर चित्रांपासून सुरूवात करावी.  
स्पर्धा का इतर?
दंडवत.
आम्हांला दोन त्रिकोणी डोंगर आणि त्यातून निघणारा सूर्यरूपी गोळा आणि फारच झालं तर मधूनच निघणारा नदीरूपी एक फराटा, एव्हढीच चित्रकला येत असल्याने कोणी चित्र काढलेय म्हणताक्षणी आमचे डोळे विस्फारतात. ही तर एक अवघड शैली. लोकचित्रकला म्हटली तर ओबडधोबड. पण नागरी चित्रकारांना मुद्दामहून तो ओबडधोबडपणा चित्रात आणणे अवघड जाते. सफाईदार ओबडधोबडपणामुळे चित्राचा पोतच बिघडून जातो. शिवाय यात आकारांचे स्वातंत्र्य एका ठराविक मर्यादेबाहेर घेता येत नाही, फार कल्पकताही दाखवता येत नाही. पण इथे छानच जमलेली दिसताहेत मधुबनी चित्रे.
मस्त आहे रिकामेपणाचा उद्योग!
छान आहेत चित्रे, राही म्हणतात तसे आमची चित्रकला म्हणजे "खाली ठळक ठश्यांत कशाचं चित्र आहे ते लिहावं लागणार्या" प्रकारातली असल्याने चित्रं काढता येणार्यांबद्दल आदर वाटतो. या मधुबनी चित्रपध्दतीत आणि पारंपारिक मेहंदीच्या डिजाईन्समधे जरा साम्य वाटलं, हा योगायोगच असावा का?
छान चित्रे
छान चित्रे आहेत आणि तुमची मेहनत पण खूप कौतुकास्पद आहे. चित्रातील टप्पोरे डोळे बघून यामिनी रॉय यांच्या चित्रांची आठवण झाली. http://www.kamat.com/kalranga/artifact/stamps/5076.htm आणि http://www.kamat.com/kalranga/art/5075.htm
ऐसीकरांचे माझ्या घरी काढलेले मधुबनी
मस्त चित्रे आहेत मके! नवीन बॉक्सवरची कलाकारी माहिती नव्हती.!
===
माझा आणि मधुबनी चित्रांचा संबंध बर्यापैकी प्रेक्षकाच्या भुमिकेतून होता - आहे. मकीच्या डोक्यात हे खुळ शिरायच्या (की ही टूम निघायच्या? ;)) सुमारासच, ऐसीवरच्या अनेकांनाही त्याची लागण झाली होती हे आता सांगायला हरकत नाही. आणि या मधुबनी चित्रकलेच्या आणि एकुणच रंगकामाच्या उत्साहात अनेकांना एकत्र येऊन काहितरी करावेसे वाटू लागले होते. बर्याच व्य्नींचा मारा सुरू झाला आणि त्यातून एक अनौपचारिक आणि अघोषित "रंगकाम कट्टा" संपन्न झाला.
यात माझा संबंध इतकाच की हा माझ्या घरी झाला आणि माझ्या घरच्या एका भिंतीवर अनेक (जवळ्जवळ १३-१४) ऐसी अक्षरेचे सदस्य आणि त्यांचे कुटुंबिय यांच्या सहभागाने एक झक्कसा मधुबनी मोर अवतरला आहे. हा मोर चितारण्याआधी भिंतीवर डिस्टेंपर देण्यापासून ते मोर चितारणे, तो रंगवणे इत्यादी सगळे प्रकार या मित्रमंडळींनी एकत्रपणेकेले आहेत. आधी नाही नाही म्हणणार्या प्रत्येकाचे हात या मोरातील रेषांना शेवटी लागले. खरे वाटणार नाही पण या अख्ख्या टोळक्यापैकी अनेकांशी कितीतरी वर्षांनी (काहिंनी तर शाळा सोडल्यानंतर) पहिल्यांदा ब्रश हाती धरला होता, तर भिंतीवर चित्रकला करण्याचा अनुभव एकालाही नव्हता.
आधी हे उद्योग जाहिर दाखवावेत का नाही कळत नव्हते. या १३-१४ जणांच्या टोळक्यात मकी होतीच म्हणून तिच्याच धाग्यावर या सगळ्यांनी मिळून केलेले उद्योग दाखवावे असे आता वाटू लागल्याने ते पूर्ण झालेले काम दाखवतो आहे.

हे मधुबनी माझ्या घरी आहे, मात्र ते फक्त माझे नाही. नि ते माझ्यासाठी नुसते चित्रही नाही, त्या ३० तासात केलेली धम्माल, गप्पा, खादाडी, रात्र जागवून ऐकलेली (ऐसीकरांपैकीच काहिंनी गायलेली) गाणी, चित्रे काढताना झालेल्या चर्चांची आवर्तने, ऐसीकरांपैकीच कोणी आणलेली कलिंगडे, कोणी बनवलेले दडपे पोहे वगैरे अनेक गोष्टींचे प्रतिक ते चित्र झाले आहे. माझ्या मुलीची तर ते दोन दिवस नुसती चंगळ चालु होती. (तिलाही एक दारामागची भिंत रंगवायला दिलेली. ती सुद्धा तीने मकीच्या मदतीने थोडी रंगवली) नुसत्या त्या चित्राकडे बघितले की कितीतरी क्षणचित्रांचा कोलाज समोर झळकतो
योगायोगाने हे चित्र मधुबनी आहे, किंवा मधुबनी चित्रांमध्ये ही जादु असावी ;)
फ्रेम केलेल्या बाई आजकाल
फ्रेम केलेल्या बाई आजकाल माझ्या ऑफिसाची भिंत शुशोभित करताहेत! इथे मधुबनी चित्रं खूप बघायला मिळतात, आणि अनेकांना त्यातील खूबी चांगल्याच ओळखता येतात. सगळ्यांना मला ते आर्टिस्टकडून भेट मिळाले हे आवर्जून सांगायला आनंद वाटतो! :-) त्यातील पिवळ्या रंगाचा पोत मला खूप आवडतो, त्याच्याकडे बघत राहिलं तर कापडासारखा सळसळण्याचा भास होतो.
शेवटच्या चित्रातली रंगसंगती खल्लास आहे. आजकाल टसर किंवा मूगा सिल्क वर मधुबनी चित्र काढलेल्या साड्या मिळतात. अशाच सॉलिड ब्लॉक भडक रंगावर काळ्या-पांढर्या रंगांची बारीक रेखाटणी असते. अशा कॉम्बिनेशन मधे साडी फारच सुंदर दिसेल. (त्याला नीधप चे तांब्याचे नक्षीदार कानातले दागिने सुद्धा छान मॅच होतील...)
ओह! भलताच जोक झालेला दिसतोय,
ओह! भलताच जोक झालेला दिसतोय, पण मला कळला नाही. शुशोभित वापरण्यात काय चुकलं नीट सांगाल का?व्यनीतून सु-शू क्लॅरिफाय केल्याबद्दल रुचीचे आभार :-)
"फ्रेम केलेल्या बाई" - वर म.क. ने स्त्रीच्या चित्राला फ्रेम केल्याबद्दल लिहीलं होतं.... ("फ्रेम लावणे" बरोबर होईल का?)
अंदरकी बात..
त्यातील पिवळ्या रंगाचा पोत मला खूप आवडतो, त्याच्याकडे बघत राहिलं तर कापडासारखा सळसळण्याचा भास होतो.
चित्र रंगवायला घेतलं खरं पण माझ्याकडे रंग थोडे होते आणि पोस्टर कलर्स वापरायचे नव्हते. मूळ चित्रात पार्श्वभूमीवर फिकट गुलाबी रंग आहे. तो नसल्याने आधी गडद निळा रंग दिला. पण मग मोरामुळे चित्र आख्खंच निळं होऊ लागलं म्हणून निळ्यावर पिवळा रंग दिला. आधीचा रंग वाळला असला तरी खालचा रंग काही ठिकाणी दिसून एकदम तलम पोत आला नाहीय.
खवले काढायला दोन संध्याकाळ लागली. आधीच्या चित्रावरून शहाणी झाले होते. हे खवले कुठूनही कुठेही सुरूवात करायची नाही. एका बाजूने पूर्ण करून एक आडवी ओळ पूर्ण करायची. दोन चित्रांची तुलना केली तर आधीच्या चित्रात दोन खवल्यांमधून सूर्यासारखं डोकावणारं खवलं दिसतं, तसं नंतरच्या चित्रात दिसत नाहीय.
हे पहा..

काय सुरेख चित्रं आहेत! ते
काय सुरेख चित्रं आहेत! ते प्रसन्न सूर्य, खवल्यांच्या चित्रांमधल्या बायकांची प्रसाधनं आणि बटा, केशरी रंगावर उठून दिसणारा ब्लॅक-अँड-व्हाइट मोर, त्याचा तुरा आणि सगळ्याच चित्रांमधलं बारीक काम - आवडलं. प्रतिसादातला भिंतीवरचा मोरही अप्रतिम!
स्त्रियांच्या चित्रांतल्या मोर आणि माशांच्या संदर्भात...तो काही खास संकेत आहे का?
खुप छान !
मस्त. मलापण मोर विशेष आवडला. मधुबनी चित्रकलेविषयी आणखी जाणून घ्यायला आवडेल.
ह्या प्रकारात एक भारतीय कथा सांगणारी चित्रमालिका पण करता येईल. पण अर्थातच प्रचंड चिकाटीच काम दिसतंय .
एक शंका - कॅनवासवर करता येईल का हे ? मला असं  वाटतंय कि खडबडीत सरफेसवर रेघा मारायला अडथळा होईल . तुमचा काय अनुभव ?
तुमच्या ह्या धाग्याने इन्स्पायर होवून ( नुकतीच परीक्षा संपल्याने आणि स्वघोषित १ वीक ऑफ घेतला असल्याने वेळच वेळ होता.  ) मी एक चित्र काढलं . ह्याला पारंपारिक मधुबनी म्हणता नाही येणार कदाचित पण इन्स्पिरेशन इथलीच होती म्हणून इथे टाकते. अयोग्य वाटल्यास प्रतिसाद संपादित करेन.

व्यवस्थापकः height="" टाळावे त्यामुळे काही ब्राउझर्सवर चित्र दिसत नाही.
खूप उशीर झालाय प्रतिसाद
खूप उशीर झालाय प्रतिसाद द्यायला पण ह्याच लहरीमध्ये काढलेली आणखी तीन चित्रे :



अदिती : :) बागकामप्रेमी ऐसीकर सारखा चित्रकलाप्रेमी ऐसीकर असा धागा काढायची कल्पना चांगली आहे. आपापले अनुभव आणि चित्रं शेअर करायला !!
व्यवस्थापकः width="" टाळावे त्यामुळे काही न्याहाळकांतून चित्रे दिसत नाहीत
हे मस्तच आहे. हे मी तुला
हे मस्तच आहे. हे मी तुला इतरत्र कुठेतरी सांगितलंय बहुतेक.
आख्खी भिंत रंगवणे हा काय प्रकार असतो ते मला चांगलंच माहितीये. त्यामुळे पेशन्सला सलाम. 
सिद्धी चित्रे मस्त.
तुमच्या दोघींसाठी आणि ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांच्यासाठी एक इंटरेस्टिंग लिंक
मध्यंतरी सुपारीच्या खोडापासून
मध्यंतरी सुपारीच्या खोडापासून बनलेल्या ताटलीवरती चित्रे काढायचा प्रयोग केला. ताटलीवरच्या ओबडधोबड रेषांमुळे सुबकपणा तितकासा साधता येत नाही, पण मला चित्र आवडलं. दोन्ही मोर विदुषीनी प्रसाद यांच्या शैलीतल्या चित्रांसारखेच आहेत.

या चित्रात काही पानं आणि फळं काढायची बाकी आहेत.. आता महिन्याहून अधिक काळ लोटला, अजूनही कंटाळ्यामुळे ते तसंच पडून आहे..


गंमत म्हणजे दोन्ही चित्रातल्या पानांचे रंग दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे आणि एकाच नावाने विकले जाणारे असे आहेत. मला नंतरच्या चित्रातली थोडी ताजीतवानी वाटणारी शेड अधिक आवडली.
@सिद्धी:- नुकतेच कॅनव्हासवरही प्रयोग झाले. काढायला अवघड नाही, पण हात लागून चित्र काळं होणं किंवा पेन्सिलीचं काळं खोडूनही पूर्णतः न निघणं हा तोटा आहे. घरात भिंतीवर लावायचं असेल तर कॅनव्हासवरचं चित्रं अधिक स्वस्त पडेल, फ्रेमिंगचे निदान मुंबईत तरी कैच्या कैच दर आहेत. मला फ्रेम आणि कॅनव्हास दोन्ही प्रकार आवडतात. काहीवेळेस छानशा फ्रेममुळे चित्राला अधिक चांगला उठाव येतो.
मस्त दिसतायत गं
मस्त दिसतायत गं चित्रं.
गेल्याच विकेंडला एक प्रयोग करून बघितला. कपांवर पर्मनंट मार्करने चित्र काढलं आणि कप अर्धा तास बेक केला (तापमान ४२५ फॅ किंवा २२५ से). साधारण २० मिनीटं तापमान एवढं जास्त होतं, कप भट्टीतच गार होऊ दिला, (त्यामुळे एकूण वेळ साधारण अर्धा तास). आता तो डिशवॉशरमधून काढला तरीही चित्र होतं तस्संच आहे.
हे चित्र मधुबनी नाही हे वेगळं सांगायला नको. पण असे प्रयोगही मस्त कलंदरला करता येतील.

(कपावर चित्र काढताना एक चूक केली, वर थोडी जास्त जागा सोडायला हवी होती.)
(अतिअवांतर - पाव करताना किंवा पिझ्झा भाजताना दोन-दोन करत घरातले सगळे कप रंगवून टाकणार आहे. एकरंगी, एकसाची कप बघून कंटाळा आलाय. आहेत ते छान कप टाकवतही नाहीत.)
अपडेट
अपडेट - आता ह्या कपावरचं चित्र अगदी फिकट झालं आहे. डिशवॉशरची कृपा. हाताने घासून किती दिवस टिकेल कोण जाणे!
बेक करावं लागेल कारण मुळात कपाचा रंग पक्का असतो. त्यावर आणखी काही रंग चढवायचा आणि तो टिकवायचा तर वरून दिलेला थर कपावर चिकटून राहण्यासाठी इतर काही इलाज नाही.
 
         



शेवटचे चित्र फारच आवडले. काय
शेवटचे चित्र फारच आवडले. काय तरी दिमाखदार डोळा आहे त्या मोराचा :). आवडला. तुरा अन चोच देखील प्रचंड गोड आली आहे.
अवांतर - डेलावेअर मध्ये उन्हाळ्यात पक्ष्यांची पिल्ले अतोनात पडत अर्थात उडायला शिकत. तेव्हा एक रॉबिनचे पिल्लू जवळून पहायचा योग आलेला होता. त्या पिल्लाला मारे भुवईसारखी रेखिव रेष अन पापण्यांसारखे केस होते. फार गोड होतं ते.
____
अन त्या केशरी रंगाने वेड लावलं.
__
मूळ चित्रातील डोळ्यापेक्षा तू काढलेला डोळा सुरेख आहे.