Skip to main content

पिकू! - असंच आपलं एक मत.

धोका! धोका! धोका!
चित्रपट पाहिला नसेल तर वाचू नका, मजा जाण्याची शक्यता आहे.
धोका! धोका! धोका!

तर सहज म्हणून पिकूचा ट्रेलर पाहिला होता. माझ्या दीपिकादूषित पूर्वग्रहाला बरोबर घेऊन पाहिला, तरीही इरफान आहे म्हटल्यावर चित्रपट बघणं आलंच.
हा माणूस पडद्यावर जे काही करतो ते आम्हास अतिप्रिय आहे. १००० वॉटची अभिनयक्षमता असलेले त्याचे डोळे जेव्हा इकडून तिकडे बघतात तेव्हासुद्धा आम्ही रोमांचित होतो. ते असो.
.
तर ट्रेलरचा सारांश असा कळला की -
.
भारतातलीच रोड ट्रिप.
इरफान आणि अमिताभ एकत्र- आणि अमिताभही अमिताभत्वापासून लांब गेलेला वाटला.
त्यात परत बंगाली फ्यामिली.
.
ही तर पहिल्या फटक्यात रमी लागली- तेव्हा सिनेमा चुकवणं शक्यच नाही.

=======================
पूर्ण चित्रपटाबद्दल लिहीत नाही आणि त्यातली सौंदर्यस्थळं वगैरे सांगायची औकात नाही- तेव्हा काही गोष्टी ज्या जाणवल्या आणि आवडल्या त्या सांगीन म्हणतो. बरंसचं यादृच्छिक असणार आहे. आणि खूप सारं रोड ट्रीप बद्दल!

.
आपला साला एवढा मोठा देश. नुसता काश्मीरातून केरळापर्‍यंत यायचं झालं तरी विश्वरूपदर्शन घडू शकतं! पण अशा देशात प्रवासावर काढलेले बॉलिवूडी चित्रपट कितीसे असावेत?
फारसा प्रयत्न न करता मला रोड -द मूवी, नुसताच रोड, दिल चाहता है चा काही भाग, जब वी मेट, हायवे... ही सगळी संपदा आठवते आहे.
.
तेव्हा चित्रपटात जेव्हा भास्कोर(अमिताभ) आपण कलकत्त्याला बाय रोड जाणार असल्याचं जाहीर करतो, तेव्हा मला दणकून आनंद झाला! दीपिकाला काही का वाटेना.
भास्कोर एक विक्षिप्त, कमालीचा टोकेरी आणि त्यात भर म्हणून विकारचिंतक (hypochondriac). त्यात परत बंगाली. हे बंगाली लोक पैदाइशी विक्षिप्त असतात का? की चित्रपटातच त्यांना तसं दाखवतात?
पण फार कुतूहलजनक जमात! त्यात त्यांचं मासेप्रेम. पुढल्या जन्मी बंगाली व्हावं म्हणतो.

त्याची लेक पिकू!(दीपिका) - का कोण जाणे, मला पिकू! लिहिताना त्यापुढचं उद्गारवाचक चिन्ह हा नावाचाच भाग वाटतो.
आता पिकू! हे तिचं खरं नाव आहे का? माहिती नाही. पण प्रचंड गोड नाव आहे. नुसतं पिकू! म्हणायलाच भारी वाटतं.
पिकू एकदम मुफाट, डबल विक्षिप्त आणि काहीशी त्रासलेली. भास्कोरदांच्या रोजच्या कटकटीमुळे तिला मर्यादेपलीकडे त्रास होतोय, सहाजिक आहे. असल्या विक्षिप्त म्हातार्‍याला सांभाळणं हे खायचं काम नोहे.
आणि ह्या बापलेकीच्या जगात चुकून अपघाताने आलेला टॅक्सीकंपनीचा मालक राणा(इरफान).

मग पुढला सगळा वेळ -
पिकू! vsभास्कोर
राणा vs पिकू
भास्कोर vs राणा
असल्या छोट्यामोठ्या चकमकींत जातो- ते बघण्यासारखं आहे.
======================================
गाडीतल्या गाडीत हालचालींना आणि शारीर अभिनयाला फारसा वाव नाही, कारण तेवढी जागाच नाहीये. मग डोळ्यांतूनच खूपसे संवाद होतात. इथे इरफान आणि दीपिकाने झकास रंग भरलाय.
अमिताभ जरी सगळ्याच्या केंद्रस्थानी असला तरी हे दोघे कमी नाहीत.
रिअर व्यू मिररमधूनच भास्कोरशी बोलणारा राणा, कावळ्यासारख्या तीक्षण नजरेने आपलं श्रवणयंत्र सांभाळत सगळं टिपणारा भास्कोर, ह्या प्रवासाला सुरूवातीला कंटाळलेली पण नंतर थोडीफार मोकळी झालेली पिकू!, आणि ह्या सगळ्या धबाडग्यातही आपलं अस्तित्व ठेवणारा बोधन (नोकर) - एवढाच परीघ आहे.

चौथं व्यक्तीमत्त्व आहे बद्धकोष्ठता. भास्कोरचा -आणि म्हणूनच सगळ्यांचा - हरएक संवाद, प्रत्येक विचार या एवढ्या गोष्टीभोवती गुरफटलेला आहे. भास्कोरच्या विकारचिंतक स्वभावाच्या अगदी मधोमध असलेल्या बद्धकोष्ठतेवरच्या उपायांसाठीच त्याचा सारा अट्टाहास आहे. सुरूवातीपासून अगदी शेवटपर्‍यंत बद्धकोष्ठता आहेच आहे - पण ते उल्लेख प्रसंगी बालीश, तपशीलवार असले तरी एकदम प्रॅक्टीकल!
तेव्हा भास्कोरच्या बद्धकोष्ठतेसाठी युद्धपातळीवर राबणार्‍या बोधनने एक "स्पेशल" खुर्ची तयार ठेवली आहे- गाडीच्या टपावर.
======================================

कितीसे चित्रपट एखादी प्रासंगिक गोष्ट सांगतात? तात्पर्य नाही, जीवनविषयक भाष्य नाही. समाजासाठी संदेश नाही आणि थिल्लर करमणूकही नाही. निव्वळ एक गोष्ट, किस्सा. मित्रमंडळींच्या गप्पांमधे जशी एखादी गोष्ट रंगते तशी- तिला शेंडाबुडखा नसतो. हा चित्रपट बहुतेक काळासाठी तसा वाटला. एक इंट्रेस्टिंग गोष्ट सांगायची एवढाच उद्देश.

केवळ योगायोगाने भेटलेल्या दोन व्यक्तींची (राणा आणि पिकू!) गाठभेट जन्माची करण्याचा खटाटोप इथे दिग्दर्शकाने केला नाहीये.
तसंच मुलांनी आईबापांचा सांभाळ करायलाच हवा, भारतीय परंपरा, किंवा आधुनिकता असल्या जडजंबाल गोष्टींवरही आडून आडून भाष्य केलं नाहीये. ना पिकू कुणाला काही सुनवते ना दुसरं कोणी तिला काही ऐकवतं. एकूण, नो उपदेश बिझनेस. लई आवडलं आपल्याला हे.
तसंच मृत्यू, आजार वगैरे विषयांवरच्या चित्रपटांत अतिशय टिपिकल अशी एक गंभीर आणि दु:खी झालर बहुतेकवेळा डोकावते- तीही टाळलिये. त्याची जागा इथे फटकळ विनोद, तोडून टाकणारे संवाद आणि एकूण विक्षिप्तपणाला दिलीये, त्याबद्दल दिग्दर्शकाला धन्यवाद!
शिवाय कोलकाता दर्शनाबद्दल मेजर पॉईंट्स!
तशा चित्रपटात चुका, गडबडी वगैरे झाल्या असतीलही, पण ते समीक्षकांकडे सोडून देऊ.
एकूण पिकू! आपल्याला आवडला/ली.
जर चित्रपटांना उपमा देता आली असती तर पिकूला मी "एखाद्या दुपारी निवांत बसून प्यालेल्या कॉकटेलची" उपमा देईन. का? माहीती नाही. पण तसं वाटलं म्हणून. मेरे को वैसा लगा.
.
ओके, ओवर अँड आऊट!
====================================

समीक्षेचा विषय निवडा

ऋषिकेश Tue, 12/05/2015 - 08:59

परिचय छानच
पिकू हे खरेच बंगाली नाव असावे. सत्यजीत रेंची याच नावाची एक डॉक्युमेंटरीसुद्धा होती. त्याचे स्पेलिंग त्यांनी Pikoo असे केले होते इतकेच.

जीवनविषयक भाष्य नाही

याबद्दल काहिसा असहमत* आहे पण "घे! घे! हे घे भाष्य! वाच!!! मोठा हो!!!" छाप हुच्चभ्रू आव नाहीच नी अगदी डोळ्यात बोट घालून "ही घे प्रतिकं, या घे प्रतिमा, हे बघ जीवनविषयक सूत्र" असला मूर्ख प्रकारही नाही हे मला प्रचंडच आवडलं!!

*एकटेपणा आणि शारीरीक बद्धकोष्ठाप्रमाणे नात्यांमध्ये व एकुणच आयुष्यात आलेलं "साचलेपण" यावर ते भाष्य आहे असं मला वाटतं. पण ते अतिशय तरल उतरलं आहे. समजणारा समजून घेतो, त्यावर फार समिक्षकी-चष्मिष्ट- शब्दांतली कमेंट नाही

बॅटमॅन Tue, 12/05/2015 - 12:11

In reply to by ऋषिकेश

*एकटेपणा आणि शारीरीक बद्धकोष्ठाप्रमाणे नात्यांमध्ये व एकुणच आयुष्यात आलेलं "साचलेपण" यावर ते भाष्य आहे असं मला वाटतं. पण ते अतिशय तरल उतरलं आहे. समजणारा समजून घेतो, त्यावर फार समिक्षकी-चष्मिष्ट- शब्दांतली कमेंट नाही

अंमळ विरोधाभास होत नाही काय?

मेघना भुस्कुटे Tue, 12/05/2015 - 13:37

काय झोकात टेम्प्लेटं मोडतं अस्वल! केवळ टेम्प्लेटमोड स्टाईलसाठी पाच तारे बहाल. बाकी सिनेमा इंट्रेष्टिंग वगैरे ओघानं आलंच. होता रहेगा...

ॲमी Wed, 13/05/2015 - 13:35

अमिताभ, इरफान, दिपीका तिघेही आवडत नाहीत. आणि सुजीतचा विकी डोनरदेखील आवडला नव्हता. त्यामुळे पिकू आवर्जुन बघणार नाही.

राही Fri, 15/05/2015 - 00:44

परिचय आवडला. आणि पिकूसुद्धा आवडला.एकदा पाहाण्याजोगा आहे.अमिताभचे बंगाली बेअरिंग मस्तच.प्रणव मुखर्जीच बोलताहेत की काय असे वाटले.भेरी गुड! पण इतकी सटलिटी आहे की ती हुडकताना दमायला होते.प्रत्येक फ्रेम काही तिसराच अर्थ सांगत असते आणि तो लक्षात येईपर्यंत फिल्म पुढे सरकलेली असते.आणि अर्थ पकडण्यासाठी आपला मेंदू मागे धावत असतो.एव्हढी तिरकी सूक्ष्मता झेपत नाही. आणि सतत पोट दाबत बसलेल्या अमिताभ नामक (सिनेमात भास्कर बॅनर्जी)बुड्ढेबाबाला सतत पाहावे लागण्यापेक्षा दीपिकाच्या खळ्यांना स्क्रीन्-स्पेस जास्त मिळाली असती तर आवडले असते.

मेघना भुस्कुटे Fri, 15/05/2015 - 11:38

In reply to by राही

इतकी सटलिटी आहे की ती हुडकताना दमायला होते.प्रत्येक फ्रेम काही तिसराच अर्थ सांगत असते आणि तो लक्षात येईपर्यंत फिल्म पुढे सरकलेली असते.आणि अर्थ पकडण्यासाठी आपला मेंदू मागे धावत असतो.एव्हढी तिरकी सूक्ष्मता झेपत नाही.

अगदी अगदी. काही काही सिनेमे एका बघण्यासाठी नसतातच. त्यातला हा वाटला.
अस्वलानं नोंदलेली सगळी वैशिष्ट्यं आहेतच. पुनरावृत्ती नको. दीपिकाबद्दलच्या पूर्वग्रहापासून ते इरफानप्रेमापर्यंत. पण अभिनय - साला अभिनय. विशेषतः मुद्राभिनय. इकडे बघू, की तिकडे बघू, अशी नुसती तारांबळ होते.

नंदन Fri, 15/05/2015 - 11:01

परिचय आवडला, भालो! संधी मिळताच चित्रपट पाहिला जाईल.
(टिपिकल कंजूस बंगाली म्हातार्‍याचे चित्रण पाहून एस. डी. बर्मनांचे काही ऐकीव किस्से आठवले.)

तिरशिंगराव Sun, 17/05/2015 - 09:30

चित्रपट पाहिला आणि परत लेख वाचला. चित्रपट आवडला, काही वेळेस ते बद्ध्कोष्ठाचे चर्वितचर्वण अति वाटते, पण पुढे दीपिकालाही ते अति वाटते हे ऐकल्यावर हुश्श झाले. अभिनय सर्वांचाच चांगला, अमिताभचा विशेष! म्हातार्‍या बंगाल्यांचा विचित्रपणा आणि सुपिरिऑरिटी कॉंप्लेक्स छान दाखवलाय. आक्षेप नेहमीप्रमाणेच, फक्त प्रेक्षकांबद्दल! नको तिथे हंसायचे, ही खोड काही जात नाही.

गवि Sun, 17/05/2015 - 17:20

..अतिशय उत्कृष्ट सिनेमा.बहुतांश प्रेक्षकांना फक्त " संडास " आणि "शी"च दिसले हे दुर्दैव आहे..अर्थात त्यांचं.
...असे सिनेमे येत रहावेत.खूप काळाने सिनेमा पाहून प्रचंड समाधान पावले..

राही Sun, 17/05/2015 - 22:07

In reply to by अजो१२३

विनोदावर ओली कांबळ घातल्याबद्दल क्षमस्व. पण
अ‍ॅक्चुअली जुन्या म्हणजे आताआतापर्यंतच्या मराठीत पावणे म्हणजे मिळणे, (येऊन)पोचणे. पावती किंवा पोचपावती म्हणजे मिळाल्याची नोंदखूण. कोल्हापुरचे अंबाबाई तू मला पाव (फॉक्सपुरचे मँगोलेडी यू मला ब्रेड वगैरे) किंवा धाव-पाव सावळे विठाई म्हणजे हे देवी-देवांनो, माझ्याकडे पोहोचा, मला भेटा, मला मिळा. 'भेटीगाठी, आईवडिलांना भेटलो' यामधला भेटणेचा अर्थ सामान्यबोलीमध्ये वस्तूसाठीही वापरला जातो. जसे, खूप धावलो पण गाडी भेटली नाय. मध्येच पाऊस भेटला वगैरे.
त्यामुळे समाधान पावले म्हणजे समाधान मिळाले. (आम्हांस) समाधान पावले किंवा आम्ही समाधानाप्रत पावलो. पण अंतर्धान पावणे याप्रमाणे समाधान पावणे हेही कर्तरि म्हणून वापरले जाऊ शकते.
पुन्हा क्षमस्व कारण 'चुका चालतील, पण प्रतिसाद आवरा' असे व्हायचे.

अजो१२३ Mon, 18/05/2015 - 11:48

In reply to by राही

I just wanted to bring forth that that specific statement can be used to interpret the gender both ways.
----------------------------------------
गविसरांनी योग्य लिहिलं आहेच.