Skip to main content

फास्टर फेणे रिटर्न्स – फेसबुकवरून ब्लॅकमेलिंग!

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संपादक/परीक्षक - भा. रा. भागवतांच्या १०५ व्या जन्मदिनानिमित्त 'ऐसी अक्षरे'वर आयोजित केलेल्या कथास्पर्धेतील विजेती कथा इथे समाविष्ट करत आहोत.
स्पर्धापरीक्षक – राजेश घासकडवी

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
.

फास्टर फेणे रिटर्न्स – फेसबुकवरून ब्लॅकमेलिंग!

.
.
परवा - म्हणजे दिनांक ३१ मेला मोठी गंमतच झाली! पण गंमत सांगण्याआधी मी तुम्हांला माझी ओळख करून देते.

माझं नाव आरोही. आरोही आबेकर. मी पुण्यातल्या 'अक्षरनंदन' या शाळेत सहावीत शिकते. मला सगळे जण 'टॉमबॉय' असं म्हणतात. कारण मी मुळ्ळीच मुलींसारखी वागत नाही. मला नटणंथटणं आवडत नाही की छान छान गुलाबी रंगाचे कपडे आवडत नाहीत. तर मला आवडतो, हॅरी पॉटर, शरलॉक होम्स, फेलूदा आणि हो, एक महत्त्वाचं नाव राहिलंच – फास्टर फेणे. मी त्याची जबरदस्त फॅन आहे. इतकी की, मीही त्याच्यासारखाच चौकड्या-चौकड्यांचा शर्ट आणि हाफ पँट घालते. मी माझ्या केसांचाही मुद्दामहून बॉयकटच करते आणि त्याच्यासारखेच मुद्दामहून माझे केस थोडे विसकटलेलेच ठेवते. वर्गातले मित्रमैत्रिणी मला 'आ.आ.' असं म्हणतात. म्हणजे मी वर्गात गेले रे गेले की, मुलं – 'आला आला आ.आ. आला!' असंच म्हणू लागतात मोठ्याने. खरंतर मला ते चिडवत असतात, पण मला त्याचं फार काही वाटत नाही. उलट, मस्त हसू येतं 'आआआआआ'ने! कारण मी फास्टर फेणेसारखीच काडीपैलवान असले आणि मुलींसारखी अजिबातच वागत नसले, तरी डोक्याने एकदम भारीये!

माझ्या बाबाचंही तेच म्हणणंय, पण आईला मात्र जरा काळजी वाटते माझी. बाबा म्हणतो, "तू काळजी नको करूस गं, अश्विनी. ही पोरगी एक दिवशी नाव काढेल बघ आपलं!"

तर ३१ मे हा दिवस आमच्या फाफे म्हणजे फास्टर फेणेच्या भा. रा. भागवतांचा बर्थ डे. फास्टरच्या फास्ट ब्रेनचा ब्रेन म्हणजे भा.रा.भा.! त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या सोसायटीच्या लायब्ररीत आम्ही भा.रा.भां.च्या गोष्टी वाचून दाखवण्याचा कार्यक्रम करणार होतो आणि त्यात मी फास्टर फेणेची एक कथा वाचून दाखवणार होते. संध्याकाळी बरोब्बर सहा वाजता कार्यक्रम सुरू होणार होता. म्हणून दुपारी मी हॉलमधल्या बुकशेल्फमधून फाफेची सगळी पुस्तकं काढली आणि विचार करू लागले, 'कोणती गोष्ट वाचायची बरं, त्याच्या जन्माची वाचायची की चिनी गुप्तहेरांची की आणखी कुठली तरी?'

समोर सोफ्यावर ताई बसली होती. ती दोन्ही हातात मोबाइल धरून काहीतरी टाइपत होती. ती आयटीत, म्हणजे बाबाच्या भाषेत 'काचेच्या गारेगार बंदिस्त कपाटात', काम करते! मी तिला हाक मारली, तरी तिचं डोकं त्या मोबाइलमध्येच खुपसलेलं. ती त्रासल्यासारखी वाटत होती आणि थोडीशी घाबरल्यासारखीही. मी उठून तिच्याशेजारी बसले. तशी ती चिडून ओरडलीच – "काय गं, काय पाहतेयस? डोन्ट बी नोझी, कळलं ना!" मला जरा आश्चर्यच वाटलं. कारण सहसा माझी ताई माझ्या अंगावर अशी डाफरत नाही. तरी मी म्हणाले, "आज मी फाफेची एक गोष्ट वाचून दाखवणार आहे ना सोसायटीत. कोणती वाचू? मला काही समजतच नाहीये. सगळ्याच भारी वाटताहेत. प्लीज, मला मदत करशील का गोष्ट निवडायला?" खरंतर माझ्यावर उगाच ओरडली असूनही मी तिला फारच सभ्यपणे विचारलं होतं, तरी ती तिरसटपणे म्हणाली, "मदतबिदत काही करणार नाही तुला. ऑलरेडी डोक्याला ताप झालाय तो काय कमीये!" मग ती सरळ निघूनच गेली तिच्या खोलीत. ताईचं काहीतरी बिनसलं होतं हे नक्की. हां, आलं आता लक्षात. आईबाबा तिच्या लग्नाचं बघताहेत नं आता. बरोबर, त्याचमुळे वैतागली असेल ती.

मी समोर असताना आई बाबाशी ताईच्या लग्नाबद्दल मुद्दाम कोड्यात बोलते. तिला वाटतं, मला कळत नाही, पण मला सगळं कळतं. पण यात लपवण्यासारखं काये? आणि अशीही मोठी झालेय आता मी!

तर ताईचा फणकारा पाहून मी सगळी पुस्तकं घेऊन सरळ माझ्या खोलीत गेले. माझ्या खोलीला दोन खिडक्या आहेत. एक मोठी – चार स्लायडिंग विंडोज् असलेली. आणि दुसरी खिडकी ही छोटीच आहे, म्हणजे दोन स्लायडिंग विंडोज् असलेली. ती जमिनीकडे मुद्दाम वाढवली आहे. आणि खालच्या बाजूला मस्तपैकी जाड, ज्यावर ऐसपैस बसता येईल असा काळा ओटा बांधला आहे. या खिडकीतून बाहेर हात काढला, की हाताला सोनचाफ्याचं झाड लागतं. त्यामुळे मला इथे बसून वाचायला खूप आवडतं.

फुलांचा सीझन असल्याने खोलीभर सोनचाफ्याचा गंध दरवळत होता. मी मस्तपैकी ओट्यावर बसून फाफेच्या गोष्टी वाचत बसले. आणि काय आश्चर्य! – मला तो ओळखीचा, टाळूला जीभ लावून काढलेला 'ट्टॉक्क' असा आवाज आला! मी लगेच समोर पाहिलं, तर साठीच्या आसपासचा एक माणूस माझ्यासमोर उभा होता. त्यानेही माझ्यासारखाच चौकड्या-चौकड्यांचा शर्ट घातला होता, बर्म्युडा पँट घातली होती. त्याचे हातपाय काटकुळे होते. त्याचं नाक बांकदार होतं, आणि चंदेरी-काळे केस विसकटल्यासारखे दिसत होते. डोळ्यांत हुशारीची चमक होती. हा दुसरा-तिसरा कोणी असणं शक्यच नाही!

मी डोळे विस्फारून विचारलं, "तू? म्हणजे तुम्ही... फाफे – फास्टर फेणे?"

तो म्हातारा म्हणाला, "अगदी बरोब्बर ओळखलंस माझ्या शिष्योत्तमे!"

मी विचारलं, "मला तर वाटलं की तुम्ही कायमचे निघून गेलात - फुरसुंगीला!"

त्याने पुन्हा 'ट्टॉक्क' असा आवाज काढला आणि म्हणाला, "पहिली गोष्ट - मी जरी म्हातारा झालो असलो तरी पूर्वीच्यासारखाच तुझा मित्र फाफे आहे, कळलं? तेव्हा मला उगाच अहोजाहो करू नकोस. मी शरीराने आजोबा झालोय, पण डोक्याने नव्हे; आणि मनाने तर नव्हेच नव्हे!"

मलाही त्याला 'अहोजाहो' म्हणायला नकोच होतं. पण मोठ्या माणसांना 'अरेतुरे' करायचं नाही, असं आईने बजावलं असल्याने मी तसं म्हणाले होते. पण आता फाफे स्वतःच मला तसं म्हणायला सांगत होता. त्यामुळे मी चटकन म्हणाले, "ओके बॉस!"

मग तो म्हणाला, "असा कसा जाईन कायमचा? पण भा.रा.भा. गेल्यानंतर पुण्यात जीव रमेना माझा. इथे असलं की त्यांची सारखी आठवण यायची मला. म्हणून मग काही दिवस जरा येऊन-जाऊन करत होतो. पण आता मात्र तुझ्यासारख्या हुशार मित्र-मैत्रिणींना भेटायला नेहमी येणार बरं का आपण!"

"एक, एक मिनिट थांब हा..." असं म्हणून मी माझ्या खिशातला मोबाइल काढला. खरंतर माझ्या शाळेत मोबाइल अलाउड नव्हता. पण क्लासेसला सायकलवरून लांब जावं लागत असल्याने मला बाबांनी एक स्मार्टफोन घेऊन दिला होता.

मी त्याच्या शेजारी उभी राहिले. त्याला थोडं वाकायला सांगितलं. मग आमच्यासमोर मोबाइल धरला.

तोच तो म्हणाला, "हे काय सेल्फी विथ फास्टर फेणे, वाटतं!"

मी म्हणाले, "शप्पथ! तुला सेल्फीबिल्फी सगळं माहितेय?"

"माहिती असणारच, नावातच फास्टर आहे माझ्या. तुमचं ते फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर सगळं माहितेय मला."

"सॉल्लिड! प्लीज, मग एक फोटो काढू दे ना मला. आमचा एक ग्रुप आहे - फा.फे.फॅ. म्हणजे फास्टर फेणे फॅन्स नावाचा. त्यावर टाकेन मी आपला फोटो. ग्रुपवर भाव वाढेल माझा त्याने!" असं म्हणून मी क्लिक केलं आणि लगेच फोटो पाहिला, तर माझा एकटीचाच हसताना फोटो आला होता. फास्टर फेणे गालातल्या गालात हसत होता. माझा रडवेला चेहरा पाहून तो म्हणाला, "मी फक्त तुलाच दिसू शकतो. आणि यानंतरही मी फक्त तुलाच दिसेन, तुलाच भेटायला येईन. पण तेही एकाच अटीवर..."

"कोणती?" मी काकुळतीने विचारलं.

"मी तुला भेटतो हे तू कधीही, कुणालाही सांगायचं नाही. ते आपल्यातच सीक्रेट राहील. आणि जर तू कोणाला सांगितलंस तर मग मी तुला त्यानंतर कधीही भेटणार नाही. कबूल?"

मी रडवेली होत म्हणाले, "ए, असं रे काय करतोस? आमचा स्टार, आवडता फास्टर फेणे इतक्या वर्षांनंतर मला भेटला, तरी मी ते कुणालाच सांगायचं नाही? जरा टू मच होतंय यार हे..."

त्याने मला जवळ घेऊन खिडकीच्या कठड्यावर बसवलं आणि समजावत म्हणाला, "हे बघ, मी आता म्हातारा झालोय. म्हणजे अजूनही मी सपासप चालतो, झपाझप टेकडी चढतो, रपारप सायकल चालवतो, पण आता यानंतर मी तुझ्यासारख्या हुशार मुलांना मदत करायचं ठरवलंय. हां, एके काळी मी होतो हिरो. पण आता तुझ्यासारख्या तल्लख यंगिस्तानचा जमाना आहे हा! आता तुम्हीच धडाडी दाखवली पाहिजे, अॅडव्हेंचर्स केली पाहिजेत. नाही का?"

मी नुस्तंच 'हं' केलं. मला ते अजूनही फारसं पटलं नव्हतं. पण फास्टर फेणे आपल्याला 'तल्लख' म्हणाला याचा आनंद झाला.

तो म्हणाला, "चल, आता मी निघतो."

मी विचारलं, "निघतो म्हणजे?"

"म्हणजे आता इथून जातो आणि तुझ्यासारख्याच दुसऱ्या कुणालातरी भेटतो."

"पण मला तुला भेटायचं असेल किंवा मला तुझी मदत हवी असेल तर? तुला कसं कळणार ते?"

"सोप्पंय, 'आमची झाली फेफे, लवकर ये फाफे!' हे वाक्यं मनातल्या मनात तीनदा म्हटलंस की मी हजर!"

"ओके! हे मस्तंय."

जाता जाता तो म्हणाला, "मला थोडा वेळ तुझा मोबाइल देशील? मला तो 'कँडी क्रश सागा' गेम खेळायचाय. खूप ऐकतोय मी त्याबद्दल."

मी लगेच त्याला मोबाइल दिला. मग उत्साहात त्याला कँडी क्रश कसा भारीये, तो कसा खेळायचा, मी कशा फटाफट लेव्हल्स पार केल्या आहेत, हे सांगू लागले. मग मला आठवलं की, आज आपण त्याचीच गोष्ट सांगणार आहोत. म्हणून मी त्याला पुस्तकं दाखवायला वळले, तर तेवढ्यात तो गायब झाला होता.

000

आमचा कार्यक्रम अगदी झकास झाला. मी फास्टर फेणेच्या जन्माची गोष्ट वाचून दाखवली. त्यात वाचताना मी मस्त ड्रामा आणला. काही ठिकाणी आवाजात मुद्दाम चढउतार केले. फास्टरने मुठी मारून मारून रेडिओ कसा चालू केला, हे सांगितल्यावर तर सगळे जण पोट धरून हसू लागले. 'वन्समोअर'ही मिळाला. सुश्रुत आणि राही, दोघं जण बिपिन बुकलवारच्या गोष्टी वाचणार होते. म्हणून मग मी त्यांच्या अध्येमध्ये दोन-तीन गोष्टी आणखी वाचून दाखवल्या. सहाला सुरू झालेला आमचा कार्यक्रम चांगला आठ वाजेपर्यंत रंगला. मग आमच्यावर खूश होऊन शिंत्रे काकूंनी आम्हांला प्रत्येकाला एकेक कॉर्नेट्टो आइस्क्रीम दिलं. मग काय, आमची स्वारी खूश झाली आणि आनंदात तरंगतच घरी आली.

घरी आले तर ताई कुठेतरी गायब होती आणि आई फोनवर बाबाशी काहीतरी बोलत होती. बाबा कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. मधूनच, "कुठे गेलीये कुणास ठाऊक? फोनही उचलत नाहीये," असं आई बोलल्याचं माझ्या कानावर आलं.

कार्यक्रम कसा झाला हे सांगण्यासाठी मी माझ्या खोलीत जाऊन मनातल्या मनात फाफेला बोलवायचं वाक्य म्हणणार तोच स्वतः फाफेच माझ्यासमोर हजर!

"आणखी शंभर वर्षं जगशील तू!" मी त्याला म्हणाले, "काय सॉल्लिड सांगितली मी तुझ्या जन्माची गोष्ट माहितेय..." पण त्याने त्यावर काहीही रिप्लाय दिला नाही. उलट त्याचा चेहरा थोडा गंभीरच वाटला. माझ्यात हातात मोबाइल देत तो म्हणाला, "हा व्हिडिओ पाहा."

मोबाइल घेऊन मी स्क्रीनवरच्या आडव्या त्रिकोणावर टच केलं. व्हिडिओ सुरू झाला. त्यात एक कॉम्प्यूटरचा कीबोर्ड दिसत होता. मग एक हात आला. तो एका मुलीचा होता. कारण एका बोटात नाजूक अशी अंगठी घातलेली होती आणि नेलपेंट लावलं होतं. त्या हाताने काहीतरी टाइप केलं आणि मग जोरात एंटरचं बटण दाबलं. मी विचारलं, "हे काये?"

फास्टर फेणे म्हणाला, "काय आहे ते सांगतो नंतर, पण पहिल्यांदा तो हात ओळख."

मी पुन्हा व्हिडिओ पाहिला. ती अंगठी तर मला ओळखीची वाटत होती. शप्पथ, काळं नेलपेंट! "अरे, हा तर ताईचाच हात आहे. परवाच तिने काळं नेलपेंट लावलं, तेव्हा खूप भंकसही केली मी आणि बाबाने तिची. पण तिच्या हातांचा हा व्हिडिओ...?"

"झालं असं की, मी तुझ्याकडून कॅंडी क्रश खेळण्यासाठी मोबाइल घेऊन निघालो खरा, पण थोड्या वेळातच मला त्या गेमचा कंटाळा आला. सारखं ते आपलं फोडायचं. पॉइंट्स मिळवायचे. बोअर झालं. म्हणून तुझा मोबाइल ठेवून देण्यासाठी मी परत आलो, तर तुझी ताई या खोलीत येऊन कोणाशीतरी फोनवर बोलत होती – "तू इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला... मी झालं-गेलं विसरून फ्रेंड म्हणून अॅड केलं, पण तू... काय? हॅलो... बंटी..." मग तिने मोबाइलच्या स्क्रीनकडे पाहिलं. फोन कट झाला असावा. तिने खोलीतला कॉम्प्यूटर सुरू केला आणि मग तोंड धुवायला बाहेर गेली. ती रडत होती. मला जरा शंका आल्याने मी पटकन तुझ्या मोबाइलमधलं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं. कॅमेरा कीबोर्डवरचं शूट करेल अशा पद्धतीने तुझा मोबाइल टेबलाच्या टॉपवरती ठेवला. तेवढ्यात ताई आलीच. आणि मग हे रेकॉर्ड झालं."

"फ्रेंड म्हणून अॅड केलं असं म्हणाली म्हणजे नक्कीच फेसबुक असणार! थांब..." असं म्हणून मी कॉम्प्यूटर सुरू केला. ताईचं काहीतरी बिनसलं होतं, आणि त्याचा नक्कीच फेसबुकशी काहीतरी संबंध असेल असं मला राहून राहून वाटू लागलं. मी व्हिडिओ पॉज करत करत ताईने टाइप केलेली अक्षरं लिहून काढली. ती होती – archana24889.

फाफे म्हणाला, "तुझ्या ताईचा वाढदिवस 24 ऑगस्टला असतो का गं?"

मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. "बरोब्बर! मधल्या काळात तुला मॅजिकल पॉवर्सही मिळाल्याहेत की काय फाफे?"

तो म्हणाला, "छे गं आआ, तू आत्ता जे लिहिलंस त्यावरून ओळखलं! नाव-आडनाव-वाढदिवसाच्या तारखा यांचे पासवर्ड ठेवू नयेत, हे तुम्हां मॉडर्न काळातल्या पोरांनाही कळू नये म्हणजे आता काय बोलायचं! पुन्हा त्यात कॅपिटल अक्षरही वापरलेलं नाहीये...!" खरंच फास्टर फेणे डोक्याने अजूनही तितकाच फास्ट होता.

म्हणून मी फेसबुकच्या लॉगइन पेजवर ताईचा इमेल टाकला, जो मला माहिती होता आणि मग पासवर्ड भरला. लॉगइन झालं. पासवर्ड बरोबर होता! मी तिच्या वॉलवर गेले. स्टेटसेस, फोटो, त्यावरच्या कमेंट्स पाहिल्या, पण तिथे काही वेडंवाकडं किंवा संशय यावा असं नव्हतं. मग फास्टर फेणे म्हणाला, "आआ, ते मेसेजेस पाहा बरं जरा."

मी मेसेजेसवर क्लिक केलं. तर पहिलंच कॉन्व्हर्सेशन होतं – 'बनेल बंटी'शी केलेलं. मी सहजच ते वाचत गेले आणि चाटच पडले! आणि सर्वांत शेवटी फोटो पाहिल्यावर तर उडायचीच बाकी होते! आणि हे सगळं चॅटिंग फास्टरने जेव्हा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं होतं त्याच वेळात झाल्याचं दिसत होतं.

"शप्पथ!" मी फास्टर फेणेकडे पाहिलं. तो म्हणाला, "आपल्याला झपाझप निघायला हवं." त्याने घड्याळात पाहिलं. नऊला पाच मिनिटं कमी होती. "आपल्याकडे मोजून २० मिनिटं आहेत आणि नळ स्टॉपला जायला आपल्याला तेवढा वेळ तर लागेलच, नाही का?"

मी कसंबसं 'हो' म्हणून लॉगआउट केलं आणि कॉम्प्यूटर बंद करून पळतच बाहेर गेले. की-होल्डरवरची सायकलची चावी घेत आईला म्हणाले, "आई, मी येते लगेच."

आई म्हणाली, "आरू, कुठे निघालीस आत्ता या वेळेला? ताईपण आलेली नाही अजून. जिवाला घोर लावता तुम्ही मुली!"

मी घाईघाईत तिला एव्हढंच म्हटलं, "आई, मी ताईला आणायलाच चाललेय! आल्यावर सगळं सांगते मी तुला." तिने पुढे काही बोलायच्या आतच मी एका वेळी तीन-तीन पायर्‍यांवरून उड्या मारत जिना उतरून खाली गेले. सायकल काढून जोरजोरात पायडल मारू लागले. गिअर टाकू लागले. वेळ खरंच कमी होता. फास्टर फेणे त्याच्या घोडा सायकलवरून माझ्याबरोबर येत होता, माझ्याच स्पीडने!

000

साधारणतः साडेदहाच्या सुमारास ताई आणि मी, आम्ही घरी पोचलो. फाफेही आमच्यासोबत होता, पण तो मलाच दिसत होता.

काळजीने आईचा चेहरा रडवेला झाला होता. घरी पाऊल टाकताच तिने आमच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला. "कुठे होतात तुम्ही दोघी? केव्हाची फोन करतेय तुम्हाला? पण तुमचा काही पत्ताच नाही. त्यात बाबाही घरी नाहीये, वेड लागायची पाळी आली होती मला..."

ताईने मान खाली घातली होती. मी खुणेनेच आईला शांत राहायला सांगितलं आणि म्हणाले, "सांगते, सगळं सांगते." मी किचनमध्ये जाऊन फ्रिजमधलं गारेगार पाणी घटाघट प्याले आणि मग बाहेर आले तेव्हा ताई मुसुमुसु रडू लागली होती. ती का रडतेय, हे न कळल्याने आईच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हं होती. तिने रागाने विचारलं, "काय झालं हे सांगाल का नाही मला?" ताईचं रडू आणखीनच वाढलं. ते पाहून मलाही रडू येईल असं वाटलं, पण तोच फास्टरचा हात माझ्या खांद्यावर पडला. त्याने मला थोपटलं. मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा त्याने खुणेनेच मला 'सांग आता' असं सांगितलं.

मग मी सांगू लागले, "आई, आज दुपारी मी कार्यक्रमाची तयारी करत होते, तेव्हा ताई मला फारच अस्वस्थ वाटली. तिचं काहीतरी बिनसलंय असं वाटलं. ती रागाने मोबाइलवर सारखं काहीतरी टाइपत होती, चिडली होती. म्हणून मी ताईच्या फेसबुकवर लॉगइन केलं. आणि तिचा मेसेज बॉक्स पाहिला, तर तेव्हा मला कळलं की, एक मुलगा तिला ब्लॅकमेल करता होता..."

"काय?" आईने तर कपाळाला हातच लावला. "अर्चना, हे खरंय? आणि तू मला सांगितलं का नाहीस?"

मग डोळे पुसून ताई बोलू लागली, "हो खरंय, कॉलेजात असताना एका मुलाला मी आवडायचे, त्याचं नाव होतं अभिषेक. पण सगळे त्याला बंटी म्हणायचे. मला तो मुळीच आवडायचा नाही. तसं मी त्याला सांगितलंही होतं. पण तरी तो सारखा माझ्या मागे लागायचा. मग हळूहळू मी त्याच्याकडे दुर्लक्षच करू लागले आणि जास्त झालंच तर कंप्लेंट करायची असं ठरवलं."

"एकदा कँटीनमध्ये आमचा ग्रुप गप्पा मारत बसला होता. तोच कोणीतरी मला हाक मारली. मी पाहिलं तर बंटी गुडघ्यावर बसलेला. त्याच्या हातात हार्ट बलून. मला त्याचा इतका राग आला की, एक सणसणीत कानाखालीच लगावली मी त्याच्या आणि तरातरा निघून गेले. पण नंतर मला कळलं की, त्या दिवशी सगळं कँटीन खूप हसलं त्याच्यावर. त्याच्या मनालाही ते फारच लागलं असावं. कारण नंतर त्याने कॉलेजच सोडून दिलं. मग मध्ये एकदा मला 'बनेल बंटी' या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली फेसबुकवर. बरेच म्युच्युअल फ्रेंड्स होते म्हणून मी ती अॅक्सेप्टही केली. नंतर कळलं की, हा तोच बंटी. त्याने कितीही काही केलं असलं तरी मी तेव्हा त्याला मारलं हे चूक होतं, याचा गिल्टही मनात होता. म्हणून त्याला 'सॉरी'ही म्हणाले मी फेसबुकवर. पण मग एके दिवशी त्याने एक फोटो टाकला माझ्या मेसेज बॉक्समध्ये. त्यात त्याने फोटोशॉप करून माझा साडीतला फोटो वापरून त्यात त्याचा फोटो टाकून दोघांनाही मुंडावळ्या लावल्या होत्या. जणू आमचं लग्न झालंय असा हुबेहूब भास निर्माण केला होता त्याने आणि मग तो ब्लॅकमेल करू लागला…" ताईला आता जास्त रडू फुटलं.

आईचं तोंड आश्चर्याने उघडं पडलं होतं. ती रडकुंडीला आली होती, रागावली होती. "काय तुम्हा मुलांचं हल्ली चाल्लेलं असतं त्या इंटरनेटवर रात्रंदिवस... बाप रे..."

मग मी बोलू लागले, "आज ताईला त्या बनेलने नळस्टॉपच्या बीएसएनेलच्या गल्लीत रात्री सव्वानऊला २५ हजार रुपये घेऊन बोलावलं होतं. मी हे सगळं चॅटिंगमध्ये पाहिलं आणि लगेचच तिथे गेले. जाण्याआधी माझा शाळेतला मित्र आहे ना आहान, त्याच्या बाबांना – पाचपुते काकांना फोन केला. मला माहिती होतं की, ते सायबर क्राइम सेक्शनमध्ये पोलीस आहेत म्हणून. घडला प्रकार सांगताच त्यांनी लगेचच येण्याचं वचन दिलं.

"जाताना, 'आयपीएल'मध्ये विराटची टीम जिंकली तर वाजवायच्या फटाक्यांमधली एक डांबरी माळ घेऊन गेले. बंटी चांगलाच बनेल होता. त्याने हुशारीने रात्री बीएसएनेलच्या मागच्या गल्लीत ताईला बोलावलं होतं. कारण संध्याकाळनंतर तिथे फारशी रहदारी नसते आणि अंधारही असतो. पुन्हा काही गडबड झालीच, तर कर्वे रोड लागूनच असल्याने पटकन पळूनही जाता आलं असतं. पण मी पण फास्टर फेणेची शिष्या आहे म्हटलं! मी हॉटेल 'समुद्र'च्या गल्लीतून बीएसएनेलमागच्या गल्लीत गेले. एखाद-दुसरी गाडी येत-जात होती. तिथल्याच एका बोळात मला हे दोघं दिसले. बोळात गाड्या पार्क केल्या होत्या. त्यातलाच एका 'एसयूव्ही'च्या मागे मी लपून राहिले. ताई त्याच्याशी तावातावाने बोलत होती. तो विचित्र हसत म्हणाला, "जर तू मला पैसे दिले नाहीस तर हा फोटो तुझ्या घरी तर पोचेलच, पण थोड्याच दिवसांत तुझ्या होणाऱ्या नवऱ्याकडे जातील, फेसबुकवरून सगळ्या जगापर्यंत पोचतील, कळलं! मला थोबाडीत मारतेस काय सगळ्यांसमोर!"

"मग मी माचीस पेटवून डांबरी माळ पेटवली आणि ती सुरसुरायला लागताच बरोब्बर त्याच्या पायाजवळ फेकली. फाट-फाट-फटाक् असा आवाज येताच तो घाबरला, थयथय नाचू लागला. ताईनेही किंकाळी फोडली. ती माझ्या दिशेने येताच मी तिला धरून गाडीमागे घेतलं. तो बिथरला. काहीतरी गडबड झाल्याचं लक्षात आल्याने तो कर्वे रोडकडे जाणाऱ्याच गल्लीकडे धावत जाऊ लागला. तेवढ्यात तिथून पाचपुतेकाका आले आणि त्यांनी त्याची गचांडी धरली!"

"बाप रे... हे एवढं सारं घडलं आणि तुम्ही मला एक चक्कार शब्दानेही सांगितलं नाहीत... आणि आता या मुलाचा कायमचा ताप झाला की आपल्या डोक्याला... थांब, मी बाबालाच फोन करते..."

"आई, शांत हो आधी. माझं ऐकून घे आणि मगच बाबाला फोन कर. त्या मुलाच्या बाबतीत मुळीच काळजी करू नकोस तू. तो बंटी आयुष्यात पुन्हा कधीही बनेलपणा करणार नाही, असा धडाच देतो त्याला, असं पाचपुते काकांनी वचन दिलंय मला. तू हवं तर उद्या त्यांना फोन कर!" मी अगदी मोठ्या माणसासारखं बोलले. आईने लगेच बाबाला फोन लावला आणि त्याला घडलेलं सगळं 'रामायण' सांगू लागली.

आता मान खाली घालून बसलेल्या ताईने हळूच माझ्याकडे पाहिलं. ती रडायची थांबली होती. कान पकडत मला म्हणाली, "सॉरी यार आरू, दुपारी तुझ्यावर उगाच चिडले मी."

मी म्हणाले, "चिडलीस? खेकसलीस म्हण!" मग तिला डिवचत खोचकपणे म्हणालो, "ताई, तू एवढी आयटीत काम करतेस, पण तुला फेसबुकच्या प्रायव्हसी सेटिंग माहिती नाहीत?! आणि त्याहीपेक्षा म्युच्युअल फ्रेंड्स आहेत म्हणून कोणालाही अॅड कसं करता तुम्ही? प्रत्येकालाच वाटतं, हा इतक्या जणांचा म्युच्युअल फ्रेंड आहे, म्हणजे आपण अॅड करायला हरकत नाही याला!" मला हे सगळं फास्टर फेणेने सांगितलं होतं. त्यामुळे मी फक्त पोपटपंची करत होते!

"हो, हो, कळलं हो ढुढ्ढाचारिणे! फा.फे.फॅन!" हसत माझ्या केसांतून हात फिरवत ताई म्हणाली, "चल, भूक लागली असेल ना, आई बोलतेय तोवर मी जेवणाचं पाहते. काळजीने आईपण जेवली नसेलच!"

ती किचनमध्ये जायला निघाली तसं मी तिला म्हणाले, "आणखी एक, पासवर्डमध्ये स्वतःची बर्थडेट आणि नाव टाकण्यापेक्षा स्पेशल कॅरेक्टर घालत जा आणि हो, एक कॅपिटल लेटरपण!"

ताईने चमकून पाहत विचारलं, "होय गं, कारटे, तुला माझा पासवर्ड कसा काय कळला? पाहिलास ना चोरून...?"

मी ऐटीत मोठ्या माणसासारखं म्हणाले, "ए, ढ असतात ते चोरूनबिरून पाहतात, पण बुद्धिमान माणसं सत्य शोधून काढतात कळलं!" फास्टर फेणेकडे पाहून डोळा मारत मी म्हटलं, "तुझा पासवर्ड मी कसा शोधला ते मुळीच सांगणार नाही. कारण ते सीक्रेट आहे माझं!" फास्टर फेणेनेही माझ्या खांद्यावर हात ठेवून थम्सअप केला.

ताई खोटं खोटं रागवत म्हणाली, "वाजवू का एक फटाका त्या डांबरी माळेसारखा!" पण तिने लगेच मला जवळ घेतलं. माझ्या शेजारी असलेला फास्टर फेणे आता गायब झाला होता, पण त्याचा हात आपल्या खांद्यावर असल्याचं मला बराच वेळ जाणवत राहिलं.

- फ्रेंक उर्फ फ्रेंडली कवडे
friendlykavade@gmail.com

***

काव्या Sat, 16/05/2015 - 17:37

मस्त आयडीया वापरली आहे. कथा छान फुलवलीये. विशेषतः मुंडावळ्या लावलेला फोटो :)
अन ते पासवर्ड वरुन ओळखलेली जन्मतारीख तर सॉल्लिड!!!!
आरोहीचे व्यक्तीचित्रण हा देखील प्लस पॉइन्ट आहेच. पण फाफे भेटतो तो प्रसंगही मस्त फुलवला आहे -

फुलांचा सीझन असल्याने खोलीभर सोनचाफ्याचा गंध दरवळत होता. मी मस्तपैकी ओट्यावर बसून फाफेच्या गोष्टी वाचत बसले. आणि काय आश्चर्य! – मला तो ओळखीचा, टाळूला जीभ लावून काढलेला ‘टॉक्’ असा आवाज आला! मी लगेच समोर पाहिलं, तर एक साठीच्या आसपासचा माणूस माझ्यासमोर उभा होता. त्यानेही माझ्यासारखाच चौकड्या-चौकड्यांचा शर्ट घातला होता, बर्म्युडा पँट घातली होती. त्याचे हातपाय काटकुळे होते. त्याचं नाक बांकदार होतं, आणि चंदेरी-काळे केस विसकटल्यासारखे दिसत होते. डोळ्यांत हुशारीची चमक होती. हा दुसरा-तिसरा कोणी असणं शक्यच नाही!
मी डोळे विस्फारून विचारलं, “तू? म्हणजे तुम्ही... फाफे – फास्टर फेणे?”

.
शेवटची बंटीची फजिती देखील चित्रमय रंगवली आहे.

“मग मी माचिस पेटवून डांबरी माळ पेटवली आणि ती सुरसुरायला लागताच बरोब्बर त्याच्या पायाजवळ फेकली. फाट-फाट-फटाक् असा आवाज येताच तो घाबरला, थयथय नाचू लागला.

पण अजुन जरा बंटीचा आगावपणा अन माजुर्डेपणा अन मग एकदम उडालेली फेफे असा कॉन्ट्रास्ट असता तर बहोत मझा आता.

माझ्या शेजारी असलेला फास्टर फेणे आता गायब झाला होता, पण त्याचा हात आपल्या खांद्यावर असल्याचं मला बराच वेळ जाणवत राहिलं.

अतिशय छान अन भावनेस हात घालणारा शेवट.

आदूबाळ Fri, 15/05/2015 - 21:23

जबरी लिहिलंय! मझा आ गया!

एक गोष्ट खटकली कमी आवडली. ताईचा पासवर्ड फाफेने व्हीडियो शूट करण्याऐवजी आआने + फाफेने डोकं लावून शोधून काढला असता तर जास्त आवडलं असतं. त्यातून आआला भेटणारा फाफे हे काल्पनिक कन्स्ट्रक्ट आहे, म्हणून त्याने शूटिंग करणं तर्काला धरून होत नाही.

अवांतर स्वगतः पासवर्ड बदलायला हवा.

काव्या Sat, 16/05/2015 - 00:55

In reply to by आदूबाळ

अवांतर स्वगतः पासवर्ड बदलायला हवा.

अर्र्र्र्र ..... आता आदूबाळांचे व्यनि वाचता येणार नाहीत ;) :)

बॅटमॅन Sat, 16/05/2015 - 01:07

In reply to by आदूबाळ

अगदी असेच म्हणतो. फाफे चा फा देखील न वाचलेल्या, मात्र त्याबद्दल अगोदरपासूनच बरेच कै ऐकलेल्या मलाही खूप आवडली कथा.

फ्रेंक उर्फ फ्… Sat, 16/05/2015 - 18:09

सगळ्यांचे मनसे आभार.
आदूबाळ आणि काव्या - शब्दमर्यादेमुळे मर्यादा आली. आदूबाळ - कथेत फाफे आआला म्हणतो की, आता यंगिस्ताननी धाडस करायचं असं त्यामुळे फाफे आता मागे राहून नव्या मुलांना पुश करणारे असं दाखवायचंय. पुन्हांदा आभार. :) :)

काव्या Sat, 16/05/2015 - 18:42

In reply to by फ्रेंक उर्फ फ्…

आता यंगिस्ताननी धाडस करायचं असं त्यामुळे फाफे आता मागे राहून नव्या मुलांना पुश करणारे असं दाखवायचंय

:) होय फार छान आहे ती कल्पना.

प्रणव सखदेव Sun, 17/05/2015 - 11:36

आवडली, फ्रेंक.

धनंजय Sun, 17/05/2015 - 20:04

कथा आवडली.
(मुळात फाफे वाचला नसल्या कारणाने स्वतःहून आवडली.

फ्रेंक उर्फ फ्… Mon, 18/05/2015 - 11:01

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.

फ्रेंक उर्फ फ्… Fri, 22/05/2015 - 11:07

ऋषिकेश आभार.

फ्रेंक उर्फ फ्… Sun, 31/05/2015 - 12:05

पहिल्यांदा संपादक, परीक्षकांचे या भारा आजोबांच्या मानसपणतूकडून लैच लैच आभार.
विशेषांक मस्त झाला आहे. आता एकेक वाचतो आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने मराठीत लहान मुलांसाठी अधिकाधिक लेखन करण्याची ऊर्मी माझ्यासारख्या नव्या लेखकूला मिळणार आहे, हे माझ्यासाठी खूप आहे. लिहीत राहीनच.
8) :) :D

ता.क. आदूबाळ तुमची कथाही आवडली. असंच अजून लिहावं ही या कवड्याची विनंती.

नील Tue, 14/09/2021 - 14:41

भारी आवडली कथा.
आगे बढो फा. फे. आपलं फ्रें. क.

एकच सूक्ष्म तक्रार: कदाचित नावातून कथेचा पंच रिव्हील होतोय असं वाटलं.