Skip to main content

माझ्याजवळची काही नाणी

नाणक शास्त्राचा माझा काही अभ्यास आहे किंवा मजजवळ जुन्या आणि संग्राह्य नाण्यांचा मोठा संग्रह आहे असे बिलकुल नाही. तरीहि गेल्या कित्येक दशकात काही वैशिष्टयपूर्ण नाणी सहजगत्या माझ्यापाशी जमा झाली आणि त्यांचा परिचय येथे करून देत आहे. ह्या नाण्यांपैकी काही माझ्याकडे कशी आली ते मी लिहू शकतो. काही अन्य नाणी माझ्याजवळ का आहेत हे आता मला आठवत नाही.

१) सॉवरिन नाणे.

माझ्याजवळच्या नाण्यांपैकी सर्वात मनोरंजक गोष्ट १८९१ मध्ये पाडण्यात आलेल्या विक्टोरिया राणीच्या सॉवरिन नाण्याची आहे. काही वर्षांपूर्वी माझ्या पाकिटातील सुटी नाणी पहात असता मला असे जाणवले की एका सेंटहून थोडेसे मोठे दिसणारे एक नाणे काहीसे वेगळे वाटत आहे. त्याला स्वच्छ करून भिंगाखाली पाहिल्यावर पुढील बाजूस विक्टोरिया राणीचे चित्र, परिघावर Victoria D: G: Britt: Reg: F: D: असे शब्द, मागील बाजूस ड्रॅगनचा वध करणार्‍या सेंट जॉर्जचे चित्र आणि त्याच्या पायाशी १८९१ असा आकडा असे दिसून आले.

जालावर अधिक शोध घेतल्यावर आणखी माहिती मिळाली ती अशी. हे नाणे १८९१ साली पाडलेला सॉवरिन आहे. दोन सेंटिमीटर व्यासाचे हे नाणे आकाराने निकलच्या (५ सेंट) सारखे असून सोन्याचे आहे. सोन्याचे प्रमाण २२ कॅरट असून त्यातील शुद्ध सोने सुमारे ७.३ ग्रॅम इतके आहे. नाण्याच्या पुढील बाजूचे शब्द Victoria Dei Gratia Britanniarum Regina Fidei Defensor (Victoria by the Grace of God Queen of Britain Defender of the Faith) ह्याचे संक्षिप्त रूप आहे. त्यातील सोन्याची आजच्या बाजारातील किंमत आणि नाण्याचा दुर्मिळपणा ह्यामुळे त्याची बाजारातील आजची किंमत सुमारे ६०० डॉलर्स इतकी असावी.

गमतीची बाब अशी की हे नाणे केव्हातरी मला सुटया पैशांमध्ये म्हणून मिळाले. टांकसाळीतून बाहेर पडल्यावर कोणाच्यातरी नजरचुकीमुळे कोठेतरी हे नाणे कमी किंमतीच्या नाण्यांमध्ये चिल्लर नाण्यांमध्ये जाऊन पडले आणि अनेक अज्ञात व्यवहारांमध्ये ते तसेच एकाकडून दुसर्‍याकडे जात गेले. केव्हातरी त्याने अटलांटिकहि पार केला. केवळ अपघातानेच त्याचे खरे मूल्य माझ्या ध्यानात आले आणि आता त्याचा प्रवास थांबला आहे.

२ - ५) स्वातन्त्र्यपूर्व काळातील नाणी. ही माझ्यापाशी कशी आली आणि केव्हापासून आहेत हे मला आजमितीस सांगता येत नाही

हा १९१४चा पाचव्या जॉर्जचे चित्र असलेला चांदीचा रुपया आहे आणि तो १९१४ साली पाडण्यात आला आहे. रोमन आणि पर्शियन लिपीत नाण्याची किंमत त्यावर लिहिली आहे. देवनागरीमध्ये काहीहि मजकूर नाही हे ध्यानात घेण्याजोगे आहे. ह्याची आजची किंमत पाच-सहा हजार रुपये असू शकेल. सुरुवातीस दाखविलेल्या आणि ब्रिटनमध्ये चलनात असलेल्या सॉवरिनमध्ये विक्टोरियाला 'Regina' म्हणजे 'राणी' असे म्हटले आहे. ह्या हिंदुस्तानात वापरायच्या नाण्यावर मात्र जॉर्जचे वर्णन 'King Emperor' 'राजा बादशहा' असे केले आहे. १८७७ च्या दिल्ली दरबारात ब्रिटिश राजांनी ’हिन्दुस्तानचा बादशहा’ हा किताब आपल्याला घेतला.

सहाव्या जॉर्जचे चित्र असलेले आणि १९४६ साली पाडलेले हे आठ आण्याचे नाणे आहे. ह्याला अधेली असेहि म्हणत असे आठवते.

हा १९२७ साली पाडलेला आणि पाचव्या जॉर्जचे चित्र असलेला तांब्याचा १/४ आणा म्हणजेच एक पैसा आहे. हा बराच हाताळला गेलेला दिसतो कारण मागची बाजू बरीच झिजलेली आहे.

हा १९४५ सालचा ’भोकाचा पैसा’ आहे. देवळांमध्ये वगैरे पणतीतील वातीला आधार म्हणून ह्याच्या भोकाचा छान उपयोग होई असे आठवते.

६-९) ओमानमध्ये मस्कतच्या दक्षिणेस निझवा नावाचे बर्‍यापैकी मोठे गाव आहे. तेथील ’सूक’मध्ये मला पुढील नाणी मिळाली.


हा ऑस्ट्रियाची सम्राज्ञी मारिया थेरेसा हिचा शिक्का असलेला ’मारिया थेरेसा थेलर’ (डॉलर) आहे. तो चांदीचा असून ज्या प्रदेशामध्ये स्वत:ची स्थिर अशी चलनपद्धति नव्हती अशा जगातील सर्व भागात विश्वासार्ह नाणे म्हणून ह्याचा चलनात उपयोग होत असे. अरबस्तान, उत्तर आफ्रिका अशा प्रदेशातून १०० वर्षांपूर्वीपर्यंत ह्याचा खूप प्रसार होता आणि त्या कारणाने तेथील जुन्या वस्तूंच्या दुकानांमधून आजहि हे डॉलर सहज उपलब्ध आहेत. ह्याच्यावरचे ’१७९१’ हे सालहि दिशाभूल करणारे आहे. नाण्याच्या विश्वासार्हतेमुळे हे नाणे साल न बदलता कित्येक वर्षी पाडण्यात आले आहे आणि त्यामुळे ’१७९१’ हेच त्याचे निर्माण होण्याचे वर्ष आहे असे निश्चितीने म्हणता येत नाही. ह्या नाण्याच्या सहज उपलब्धतेमुळे त्याची आजची बाजारातील किंमतहि त्याच्या चांदीच्या किंमतीपेक्षा फार अधिक नाही. २०-२५ डॉलर्सहून त्याची किंमत जास्त नाही.

ह्याच्यावरचा लेख असा आहे: पुढील बाजू् "M. THERESIA D. G. R. IMP. HU. BO. REG." (Maria Theresia, Dei Gratia Romanorum Imperatrix, Hungariae Bohemiaeque Regina.) "Maria Theresa, by the grace of God, Empress of the Romans, Queen of Hungary and Bohemia."
मागील बाजू "Archid. Aust. Dux Burg. Co. Tyr. 1780 X" (Archidux Austriae, Dux Burgundiae, Comes Tyrolis. 1780 X) "Archduchess of Austria, Duchess of Burgundy, Countess of Tyrol. 1780."

हे नाणे फैजल बिन तुर्की (१८६४-१९१३, सुलतान १८८८-१९१३), सध्याचे ओमानचे सुलतान काबूस बिन साईद ह्यांचे पणजोबा, ह्यांच्या नावाचे आहे. नाण्याच्या पुढील बाजूस त्यांचे नाव आणि पदवी ’Fessul bin Turkee, Imam of Muscat and Oman', '1/4 Anna' हे मूल्य आणि अरेबिकमध्ये ’१३१५’ हे साल आपण वाचू शकतो. (१३१५ हिजरी म्हणजे १८९८ इसवी.) (मागील बाजूचे अरेबिक मला वाचता येत नाही. कोणास वाचता आल्यास अवश्य कळवावे,)

ओमान हा देश अलीकडेच गेल्या सुमारे ४ दशकांत तेल सापडल्यानंतरच सुस्थिर झाला आहे. तत्पूर्वी दारिद्रय, मागालसेपणा आणि बंडाळी ह्या नित्याच्याच बाबी होत्या. मस्कतच्या सुलतानाचा देशाच्या अंतर्भागावर नावापुरताच ताबा असे आणि निझवा येथे असलेला इमाम हे एक स्पर्धक सत्ताकेन्द्र असे. मस्कत आणि अंतर्भाग हे वेगळे मानायची पद्धत होती आणि म्हणूनच नाण्यावर ’Imam of Muscat and Oman' असे बिरूद टाकलेले आहे. देश ब्रिटिशांशी अनेक तहांनी बांधलेला होता आणि भारतातील संस्थानाप्रमाणेच तेथेहि दिल्लीहून रेसिडेंट पाठविला जात असे. (हिन्दुस्तान आणि इंग्लंड ह्यांच्यामधील तारायंत्र अरबस्तानातून जात असल्याने ह्या भागात ब्रिटिशांनी आपला मजबूत दबाव नेहमीच ठेवला होता.) आधुनिक चीजा कच्छी व्यापार्‍यांच्या मध्यस्तीने हिन्दुस्तानातून ओमानला मिळत असत आणि ज्या काही थोडयाफार वरच्या स्तरातील लोकांना आधुनिक शिक्षण परवडत होते त्यासाठी ते हिंदुस्तानकडेच पाहात असत. परिणामत: तेथील चलनपद्धति रुपये-आणे-पैसे अशीच होती आणि म्हणून ह्या नाण्याचे मूल्य १/४ आणा असे दाखविले आहे. (ह्याचा अवशेष आजहि ओमानमध्ये शिल्लक आहे. तेथील मुख्य चलन म्हणजे ओमानी रियाल. तो २.६० डॉलर्सबरोबर जोडण्यात आला आहे. १ रियाल = १०० बैजा. हा ’बैजा’ पैसा ह्याचेच अरबी रूपान्तर आहे. अरेबिकमध्ये ’प’ आणि ’ब’ ह्यांच्या उच्चारात फार फरक नाही.)

ह्याच्या पुढचे नाणे संपूर्ण अरेबिकमध्ये आहे पण जालावर शोध घेतला असता ते झांझीबारचा ओमानी सुलतान बंगश बिन साईद (१८३७-१८८८, सुलतान १८७०-१८८८) ह्याचे १ पैशाचे आहे असे दिसले. त्यावर ’१२९९’ असे हिजरी साल आहे ते १८८१ इसवीबरोबरचे आहे. हे नाणे दुर्मिळ दिसते आणि त्याची किंमत ३०-३५ डॉलर्स दाखविण्यात आली आहे.

ओमानच्या सुलतानांच्या एका शाखेने झांझीबारमध्ये आपले बस्तान बसवून १८५६ ते १९६४ असा काळ तेथे राज्य केले - अर्थातच ब्रिटिश देखरेखीखाली. (१९६४ साली उठावात हे राज्य नष्ट होऊन टांगानिकाशी जुळले आणि टांझानिया हा देश निर्माण झाला.) ह्या राज्याचे पहिले काही सुलतान आफ्रिकेतील काळ्या जनतेला गुलामगिरीमध्ये विकण्याच्या कामात बरेच व्यस्त असत पण बंगशच्या काळापर्यंत गुलामगिरीविरोधी चळवळीचा प्रभाव तेथपर्यंत पोहोचला होता.

(सुलतान बंगशची बहीण सय्यिदा सल्मा हिने जर्मन व्यापारी Rudolph Heinrich Ruete रुडॉल्फ हैन्रिख रुएटे ह्याच्याशी १८६७ मध्ये पळून जाऊन विवाह केला आणि एमिली रुएटे असे नाव तिने घेतले. १९२४ मध्ये मृत्यूपर्यंत ती युरोपात राहिली. आपल्या आयुष्याबद्दलचे तिचे पुस्तक 'Memoirs of an Arabian Princess' हे archive.org मध्ये http://archive.org/details/memoirsanarabia00ruetgoog येथे, तसेच http://digital.library.upenn.edu/women/ruete/arabian/arabian.html येथे उपलब्ध आहे. असल्या ’एक्झॉटिक’ वाचनाची ज्यांना आवड आहे त्यांना ते वाचनीय वाटेल.)

ह्याच्या पुढचे नाणे संपूर्ण झिजलेले असून त्यावरचे जवळजवळ काहीच वाचता येत नाही. मागील बाजूस ’संवत’ आणि ’एक पैसा" अशी अक्षरे देवनागरीत दिसतात त्यावरून हे नाणे कोणत्यातरी संस्थानाचे स्वातन्त्र्यपूर्व काळातील एका पैशाचे नाणे आहे असा तर्क करता येतो.

क्र. १० -१९) ह्यापुढची भारतीय नाणी अनेकांनी पाहिली आणि वापरलीहि असतील कारण ती १९५७ सालापासून सुरू झालेल्या दशमान पद्धतीतील नाणी आहेत. त्यातील १० पैशांपर्यंतची नाणी आता जवळजवळ वापरातून गेल्यामुळे ती संभाळून ठेवण्याची कल्पना मला सुचल्यानंतर हाती लागली ती येथे आहेत.

अगदी सुरुवातीचे १९५७ सालचे दोन पैसे. दशमान पद्धति नवी असल्याने त्यांना 'नये पैसे' असे विशेषेकरून वर्णिले आहे. जुन्या ६४ पैशांचा नव्या १०० पैशांशी मेळ घालून देणारे अधिकृत कोष्टकहि तेव्हा वापरात असे.

१९६८ सालचे पाच पैसे. एव्हाना 'नये पैसे' 'पुराने' झाल्यामुळे येथे नुसते पैसे म्हटले आहे.

१९७० सालचे तीन पैसे.

१९७३ सालचे दोन पैसे.

आन्तरराष्ट्रीय बालक वर्ष १९७९ सालचे पाच पैसे. ’बच्चे की मुस्कान - राष्ट्र की शान’ आणि 'HAPPY CHILD - NATION'S PRIDE' असे संदेश त्यावर आहेत.

आन्तरराष्ट्रीय बालक वर्ष १९७९ सालचे दहा पैसे. ’बच्चे की मुस्कान - राष्ट्र की शान’ आणि 'HAPPY CHILD - NATION'S PRIDE' असे संदेश त्यावर आहेत.

१९८२ सालचे पाच पैसे.

अज्ञात वर्ष. दहा पैसे. नाण्याची बरीच झीज झालेली असल्यामुळे ते अगदी सुरुवातीच्या काळापासूनचे असू शकेल.

इंदिरा गांधींच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९८५ साली काढलेले ५ रुपयांचे नाणे. हे हल्ली क्वचितच हाताशी येते.

क्र. २०) न्यूयॉर्क प्रवासी टोकन

शेवटचे हे ’नाणे’ नाणे नसून New York City Transit Authority चे Bull's Eye टोकन आहे. त्याच्यावर कोठलेच साल नाही आणि ते माझ्याकडे केव्हा आले हेहि मी सांगू शकत नाही. जालावर शोधल्यानुसार ते १९८६ सालचे असू शकेल.

अरविंद कोल्हटकर Wed, 11/04/2012 - 04:13

In reply to by अज्ञात

ह्यामागचे कारण काय असेल ते शोधणे माझ्या मर्यादित ज्ञानाच्या कक्षेबाहेर आहे. मला क्रोम आणि फायरफॉक्स ह्या ब्राउजर्सवर चित्रे दिसत आहेत पण इंटरनेट एक्स्प्लोअररवर दिसत नाहीत असे का?

संस्थळाच्या होमपेजवरील विक्षिप्त आदिति ह्यांचे फुलांचे चित्रहि मला इंटरनेट एक्स्प्लोअरवरच केवळ दिसत नाहीत.

(ही स्थिति माझ्या दोन्ही संगणकांवर अशी समान आहे.)

Nile Wed, 11/04/2012 - 05:55

In reply to by अरविंद कोल्हटकर

माझा अंदाज बहुतेक, कंपॅटिबिलीटीचा प्रॉब्लेम असावा. कोणतं आय ई वापरत आहात? (आई ७ किंवा जुन्या व्हर्जनवर कोणी असेल तर त्यांना दिसत आहेत का?)
मलाही आई ९ वर दिसत नाहीएत.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/04/2012 - 06:30

In reply to by Nile

मूळ लेखात हे चित्र वापरलेले आहे, ते दिसतंय का?
तांत्रिक गोष्टींत काही दुरूस्ती शक्य आहे का हे पहाते.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/04/2012 - 08:54

In reply to by अज्ञात

एकापेक्षा अधिक लोकांची तक्रार असल्यामुळे इथेच लिहीत आहे. इंटरनेट एक्सप्लोरर आणि इमेज टॅगचा काही घोटाळा असावा असं दिसत आहे. अधिक शोधून काही उपयुक्त माहिती सापडल्यास काही करता येईल का ते पहाते. व्हाईट बर्च, अरविंद कोल्हटकर आणि नाईल यांनी हे लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/04/2012 - 06:29

रोचक आहेत ही नाणी.
ऑस्ट्रीयन चलन इतर देशांत वापरण्यावरून आठवलं, झिंबाब्वेतल्या हायपर इन्फ्लेशनमुळे तिथे अमेरिकन डॉलर वापरायला सुरूवात झालेली होती.

नजरचुकीने पोर्तुगीज लिरा, फ्रेंच फ्रँक्सची कमी किंमतीची नाणीही माझ्याकडेही आलेली होती. जुन्या वीस पैशांचं नाणंही आजोबांकडून मिळालेलं होतं; कथलाच्या रंगाच्या या नाण्यावर कमळ होतं. तुम्ही दाखवलेली एक, दोन, पाच, दहा पैशांची नाणी आठवतात. माझ्या कळत्या वयात यांतली कोणतीच नाणी वापरात नव्हती, पण पाच पैसे चलन म्हणून रद्दबातल झालं नसावं. घरी येणारं कोणतंतरी नियतकालित पाच पैशांच्या स्टँपावर यायचं. ती जुनी नाणी काढल्यावर कोणीतरी भोकाच्या पैशाचा उल्लेख करायचेच, तो आज बघायला मिळाला. काही वर्षांपूर्वी डेनिश नाणी पाहून याची आठवण झाली होती; १क्रोनंच्या (डेनिश चलनाचं नाव क्रोनं, १०० ओरे=१ क्रोनं) नाण्यांना मधे भोकं असतात. तशाच स्कॉटीश नोटा बघितल्यावरही गंमत वाटली होती.
कालच अमेरिकेतल्या विविध राज्यांचे चाराणे (क्वार्ट्स) बघायला मिळाले. दोन-चार राज्यांचे नसतील, पण वेगवेगळे चाराणे पाहून मौज वाटली.

राजेश घासकडवी Wed, 11/04/2012 - 08:09

मस्त लेख. दोन पैसे, तीन पैशाची वर दाखवलेली नाणी देऊन जिरागोळ्या घेतल्याच्या आठवणी आहेत. त्यावेळी पैशाला एक मिळायच्या. एक पैशाचंदेखील नाणं असायचं. मला वाटतं पाच पैशांप्रमाणेच चौकटच्या आकाराचं असायचं, फक्त छोटं.

आत्ता एकदम विचार आला... भारत स्वतंत्र झाल्यानंतर नवीन दशमान पद्धतीची नाणी काढली हे चांगलंच झालं. मात्र हिंदी ही राष्ट्रभाषा मानली तरी नाण्यांवर देवनागरीत आकडे कधी आले नाहीत. असं का असावं?

अज्ञात Wed, 11/04/2012 - 08:36

माझ्याकडेही बरीच नाणी संचयात आहेत ( अमेरिकन क्वार्टरस चा पूर्ण संच आणि निकेल्स चा सुद्धा ). ज्या ज्या देशात मी फिरायला जाते तिथली काही नाणी आठवणी म्हणून नक्की ठेवते. याला अपवाद फक्त सौदी अरेबियाचा... आता फक्त तेवढ्यासाठी तिथे जाईन असं वाटत नाही. :)

ऋषिकेश Wed, 11/04/2012 - 08:56

लेख मस्तच.. तुमच संकलन चांगले आहेच, त्याचबरोबर त्या नाण्यांचा इतिहास आणि/किंवा इतर पार्श्वभूमी तुम्ही शोधून काढल्याने या संकलनाक्ष्हे महत्त्व अधिक जाणवते. इथे माहिती दिल्याबद्दल आभार!

@ राजेशः
१. देवनागरी आकडे बहुदा केवळ उत्तर+मध्य भारतात वाचता येतील. दक्षिण, पूर्व, पुर्वोत्तर राज्यात ते वाचता येतीलच असे नाही
२. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही.
३. आता नव्या नाण्यांवर अशिक्षितांसाठी हाताची चिन्ह्र आहेत जसे एक रु. ला एक बोट, २ ला दोन बोटे, झाकली मुठ पन्नास पैशाची :)
४. रोमन आकडे जगात सर्वत्र परिचित असल्याने ते ठेवणे आंतरराष्ट्रीय दृष्ट्या अधिक श्रेयस्कर असावे (हा अंदाज)
५. नोटांवर मात्र २२ आधिकृत कामकाजांच्या भाषांमधे नोटेचे मुल्य दर्शवले असते.

विसुनाना Wed, 11/04/2012 - 11:37

सॉवरीन नाणे अगदी योगायोगानेच तुमच्याकडे आले हे वाचून आश्चर्य वाटले.

१९१४चा पाचव्या जॉर्जचे चित्र असलेला चांदीचा रुपया आहे आणि तो १९१४ साली पाडण्यात आला आहे.

हे नाणे काही (८-१०) वर्षांपूर्वी सिटीबँक क्रेडिट कार्डने दिवाळीची भेट म्हणून पाठवले होते. त्यामुळे ते आपोआप माझ्याकडे आले आहे.
काही नाणी माझ्या मुलाने जमवली आहेत. त्यात एक शिवकालीन देवराई आहे. ('छ' अक्षर छापलेले तांब्याचे नाणे).
हे नाणे आम्हाला कैलास लेण्याजवळ एका फिरत्या विक्रेत्याकडून विकत मिळाले.
अशी नाणी जुन्या धार्मिक स्थळांजवळ विकली जातात.
आजकाल काही दुकानांतून फार दुर्मिळ नसलेल्या नाण्यांचे सेटही विकत मिळतात.

नंदन Wed, 11/04/2012 - 12:07

नाण्यांचे संकलन आणि त्यासोबतच त्यांची पार्श्वभूमी वाचायला आवडली.

नितिन थत्ते Wed, 11/04/2012 - 12:55

>>अज्ञात वर्ष. दहा पैसे. नाण्याची बरीच झीज झालेली असल्यामुळे ते अगदी सुरुवातीच्या काळापासूनचे असू शकेल.

हे नाणे फार जुने नाही १९८० च्या उत्तरार्धातले असावे. अ‍ॅल्युमिनिअमचे असल्याने झिजले असेल.