२०२६ दिवाळी अंकावरच्या प्रतिक्रिया
२०२६च्या दिवाळी अंकावरच्या प्रतिक्रियांसाठी हा धागा काढला आहे.
अंकातले सगळे धागे इथे बघता येतील.
होऊन जाऊ दे!
+१
>>की तुम्ही हिंदूंविषयी बोलता व त्यात मुस्लिमांचा उल्लेख नसतो, याचा अर्थ तुम्ही हिंदूद्रोही आणि मुस्लिमांचा अनुनय करणारे स्यूडो-सेक्युलर आहात. यात एक सुंदर बिनडोकपणा आहे, हे उघडच आहे. तरीही अशा कुतर्कवाद्यांसाठी येथे हे नमूद करून ठेवायला हवे, की –
विशेषत: या वाक्यातील सुंदर बिनडोकपणा हा शब्दप्रयोग फारच आवडला.
रवी आमले यांचा लेख आवडला.
वस्तुनिष्ठ आकडेवारी दिली हे फार आवडले. भाजपा आणि संघ दोन वेगळे आहेत की नाहीत हे आकडेवारी दाखवून समजणार नाही. संघ सामाजिक संघटना आहे भाजपा राजकीय पक्ष.
दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सामाजिक आणि राजकीय! हे व्यवस्थित समजून घेतले पाहिजे.
निवडणुकीत जनता भाजपाच्या नेत्यांची निवड करते मतदान करून ही राजकीय व्यवस्था झाली. जनता संघाचे नेते पदाधिकारी सरसंघचालक वगैरे जनता निवडते का? नाही. संघाचे जे कोणी असतील ते निवड करतात. जनतेवर सक्ती केली जाते का संघाचे स्वयंसेवक व्हावे म्हणून? जनतेचा चॉईस आहे भाजपा आणि जनतेकडे ऑप्शन आहे संघ!
सध्या सुगीचा काळ सुरू आहे त्यामुळे राजकीय फायद्यासाठी अठरा छत्तीस ताग्यातील पांढरा शर्ट, खाकी पॅंट, काळी टोपी घालून बरीचशी मंडळी फोटोशूट रील्सशूट वगैरे करतात.
जरी सुरवातीच्या काळात बरीच वर्षे संघाचे सदस्य असलेल्या मंडळींनी बरेचदा संघातून बाहेर पडून कायमचा राम राम ठोकला आहे. टिका टिप्पणी केली शिव्याशाप दिल्या आहेत संघाला! म्हणजे संघ ठोकून ठोकून सगळ्यांचेच मेंदू घडवत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना फक्त आणि फक्त हिंदू संघटन करणे हेच होते. कारण काय तर त्याकाळी हिंदू मुस्लिमांसारखा धर्माच्या नावावर हुकूमी एकजूट करत नव्हता आजही करत नाही भविष्यात पण करणार नाही!
मुस्लिम लीगला जसा मुस्लिमांचा राजकीय पाठिंबा मिळाला होता तसा हिंदू महासभेला मिळाला नाही. संघ तर हिंदू महासभा स्थापन झाल्यानंतर खूप वर्षांनी अस्तित्वात आला. मुस्लीम समाज राजकीयदृष्ट्या प्रगल्भ होता आहे आणि कायमस्वरूपी असणार आहे. तसा हिंदू समाज नाही हे ऐतिहासिक सत्य आहे. संघाचे समाजकारण इथे सुरू झाले. सर्वात आधी हिंदू म्हणून समाज संघटन करून घेतले तर हिंदू राष्ट्र म्हणून आपण पुढे जाऊ. आज शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत सगळेच हिंदू संघाचे समर्थक आहेत का? नाहीत! का नाही? कारण हिंदू धर्माला प्रमाण मानत नाही. त्यामुळे संघाला अभिप्रेत हिंदू राष्ट्र सहजासहजी होणार नाही.
मात्र सलगपणे तीन वेळा सत्तेत आल्यानंतर हिंदुत्ववादी राजकीय विचार म्हणून प्रभावी झाला हे मान्य केले पाहिजे का?
हा चर्चेचा मुद्दा आहे. भाजपाला राजकीय प्रभावशाली करण्यामागे संघाचे जेवढे योगदान आहे त्यापेक्षा जास्त योगदान इतर पक्षांचे सामाजिक संघटनांचे पण आहे. ढोंगीपणा आणि वैचारिक हाराकिरी ही सर्वात महत्त्वाची बाब! भारतीय राजकारणात सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणजे जो सत्ताधारी परत परत सत्तेत टिकून राहतो आणि सत्ता टिकवून ठेवतो तोच प्रभावी असतो. कधीकाळी ही किमया कॉंग्रेसच्या नेत्यांनी केली होती आता भाजपाने केलेली आहे.
कॉंग्रेस सत्तेत असतानाच सक्षम विरोधी पक्ष म्हणून भाजपा मजबूत झाला हे सर्वश्रुत आहे म्हणजे कॉंग्रेस नसेल तर सर्वात प्रभावी सत्ताधारी म्हणून जनतेने भाजपला निवडले होते नव्वदीनंतर. मात्र भाजपला तेव्हा सत्ता टिकवून ठेवता आली नाही ती संधी मिळाली मोदी शहांच्या भाजपाला गेल्या पंधरा वर्षांत!
“… दुसरीकडे भारतातून फुटून स्वतंत्र होऊ इच्छिणाऱ्या त्रावणकोर (केरळ) संस्थानला सावरकर आशीर्वाद देत होते, हे अखंड हिंदुस्थानच्या कोणत्या तत्त्वात बसते असा प्रश्नही विचारला जात नाही….”
या लेखातून सावरकरांचा उल्लेख आणि संदर्भ दिला आहे. त्याबद्दल थोडक्यात…
सावरकरांनी हिंदुत्व हा राजकीय विचार मांडला होता. त्याकाळी सावरकरांनी हिंदू महासभेची राजकीय बाजू मांडली होती. तत्कालीन जनतेने सावरकरांना किंवा हिंदू महासभेला झिडकारले होते आणि कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता. असा पाठिंबा मुस्लिम लोकांनी कॉंग्रेसला दिला नाही मुस्लिम लीगला दिला होता हे कायमस्वरूपी लक्षात ठेवावे. त्यानंतर जुनागड भोपाळ आणि हैदराबादमध्ये असलेले नवाब निझाम यांना काउंटर करण्यासाठी सावरकरांना शस्त्रसज्ज हिंदू संस्थाने हवी होती. त्यासाठी सावरकरांनी १९४७ सालचे पत्रव्यवहार केले होते. त्यामागे असलेले धागे दोरे वेगळे होते. तशी राजकीय सामाजिक परिस्थिती निर्माण झाली होती. असो यावर वेगळा धागा काढावा लागेल चर्चेसाठी!
पण एक गोष्ट नक्की आहे की, सावरकरांच्या पाठीशी ना राजकीय कॅनव्हास होता ना धार्मिक एकजूट. राजकीय कॅनव्हास मिळाला कॉंग्रेसला तर धार्मिक एकजूट मिळाली मुस्लिम लीगला! बट्ट्याबोळ झाला तो इथेच!
असो!
लेखनविश्रांती!
©️भूषण वर्धेकर
२ नोव्हेंबर २०२६
.
आमलेंचा लेख आवडला. त्यांना जे काही नवीन मांडायचे आहे ते त्यांनी शेवटच्या दोन परिच्छेदांत, आणि खास करून शेवटच्या वाक्यात, मांडले आहे. कुजबूज आघाडी कशी चालते हे इतरत्र वाचून ऐकून साधारण माहीत होते. पण या लेखाच्या निमित्ताने रुची पाठकबद्दल थोडा शोध घेतला. मी ते वक्तव्य ऐकले होते. ती भाजयुमोची प्रमुख होती हे मात्र माहीत नव्हते. तिच्या आत्मविश्वासामागे आमलेंनी वर्णन केलेल्या कुजबूज आघाडीच्या कार्यपद्धतीचाही वाटा असू शकतो. त्या मुलीने आता सोशल माध्यमांपासून संन्यास घेतल्यासारखे दिसते. या सगळ्याबद्दल तिची आज भूमिका काय आहे? ती अपप्रचाराची बळी ठरली होती हे तिला समजले का? समजले असेल तर तिला व्यासपीठ देऊन बोलते केले पाहिजे. जसं "अमेरिका क्या कहता था?" या मुलाच्या बाबतीत झालं. काही महिन्यांपूर्वी त्याची मुलाखत पाहिली होती. आता त्याचे विचार पूर्ण वेगळे आहेत. बाकी "सुंदर बिनडोकपणा" करणाऱ्या "धूर्तांबरोबर" वाद घालण्यात अर्थ नसतो.
कुबेर सरांबरोबरची चर्चाही चांगली आहे. आताच्या परिस्थितीला काही प्रमाणात डाव्या वर्तुळातील "इंटेलेक्च्युअल टेररिझम" कारणीभूत आहे, या त्यांच्या म्हणण्यात तथ्य असावे असे वाटते. मात्र एका ठिकाणी त्यांनी समाजवादी, साम्यवादी आणि कम्युनिस्ट विचारधारांना एकाच गटात टाकल्यासारखे वाटले. शुद्ध साम्यवादाचे मॉडेल आजच्या जगात फारसे प्रभावी राहिलेले दिसत नाही. आणि थोड्याफार फरकाने पाहिले तर आजच्या घडीला कुठलीही राजकीय वा आर्थिक व्यवस्था १००% कॅपिटलिस्ट, १००% कम्युनिस्ट किंवा १००% सोशलिस्ट नाही. प्रत्येक व्यवस्थेमध्ये या तिन्ही प्रवाहांचे काही ना काही घटक आढळतात. अगदी विकसित देशांमध्येही बाजारव्यवस्था, सरकारी हस्तक्षेप आणि सामाजिक कल्याण या तिन्ही गोष्टी एकत्र नांदताना दिसतात. फरक इतकाच की काही देश तुलनेने अधिक कॅपिटलिस्ट असतात, तर काही अधिक सोशलिस्ट.
रुपयांवरचा लेख...
...आढावा म्हणून एकंदरीत चांगला आहे. फक्त एकच त्रुटी जाणवली (परंतु ती तितकीही गंभीर नाही).
म्हणजे, कंपनी सरकारच्या तथा त्यानंतरच्या ब्रिटिश हिंदुस्थानी (वसाहती) रुपयासोबतच एकसमयावच्छेदेकरून चलनात असलेल्या विविध (मोठ्या) संस्थानांच्या (अर्थात ब्रिटिशांनी चालू दिलेल्या) चलनांचाही जर ज़िक्र आहे (आणि, ते योग्यच आहे), तर त्यासोबत समकालीन (आणि समतुल्य) Portuguese Indian Rupia (तथा कदाचित नंतरच्या काळात Portuguese Indian Escudo?), झालेच तर French Indian Roupie यांचाही जर ज़िक्र होता, तर (१) तो औट-ऑफ-सिलॅबस न ठरता, तथा, (२) अधिक बहार येती.
(Portuguese Indian Escudoला प्रश्नांकित अशासाठी केले, की कदाचित त्याला ब्रिटिश हिंदुस्थानी (वसाहती) रुपयाच्या समकालीन किंवा समतुल्य मानता येईल की नाही, याबाबत साशंक आहे, म्हणून. दोन कारणांसाठी. एक तर, ब्रिटिशांची राजवट हिंदुस्थानातून जातेवेळी Portuguese Indian Rupia हे पोर्तुगीज हिंदुस्थानातील चलन होते, तथा ते ब्रिटिश हिंदुस्थानी (वसाहती) रुपयाच्या समतुल्य होते. त्यामुळे, त्यास ब्रिटिश हिंदुस्थानी (वसाहती) रुपयाचे समकालीन तथा समतुल्य चलन मानता येईल. त्यानंतरही बरीच वर्षे ते पोर्तुगीज हिंदुस्थानातील चलन म्हणून चालू राहिले. मात्र, १९५०च्या दशकाच्या मध्याकडे कधीतरी (नक्की साल पाहावे लागेल, परंतु बहुधा १९५४-५५च्या सुमारास असावे. (चूभूद्याघ्या.)) ते बाद करून त्याऐवजी (मुख्यभूमी पोर्तुगालच्या चलनाशी मिळतेजुळते असे) Portuguese Indian Escudo हे चलन जारी करण्यात आले. (कदाचित, पोर्तुगीज हिंदुस्थानास स्वातंत्र्य देऊन त्याचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण करण्याकरिता येणार्या भारत सरकारच्या दबावाच्या पार्श्वभूमीवर, 'Estado da India ही आमची वसाहत नसून, सातां समुद्रांपारची आमचीच भूमी आहे, यानी कि पोर्तुगालचे अटूट अंग आहे', असा कांगावा करता यावा, याकरिता ही चाल होती.) हे चलन (१९५४-५५च्या सुमारास म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या बर्याच नंतर जारी केलेले असल्यामुळे) ब्रिटिश हिंदुस्थानी (वसाहती) रुपयाचे समकालीन तर अर्थातच म्हणता येणार नाही, परंतु, ते ब्रिटिश हिंदुस्थानी (वसाहती) रुपयाच्या (किंवा भारतीय रुपयाच्यासुद्धा) समतुल्यदेखील नव्हते. ते मुख्यभूमी पोर्तुगालच्या Portuguese Escudo या चलनाच्या समतुल्य होते. त्या वेळेस Portuguese Escudoचा भारताच्या रुपयाबरोबरचा विनिमय दर एका भारतीय रुपयास सहा एस्क्यूडो इतका होता, तर Portuguese Indian Rupia हा भारतीय रुपयाच्या समतुल्य होता. त्यामुळे, नवे चलन लागू करताना ते एका जुन्या Portuguese Indian Rupiaला सहा Portuguese Indian Escudos या दराने लागू करण्यात आले; इतकेच नव्हे, तर, चमत्कारिक गोष्ट म्हणजे, पूर्वी पोर्तुगीज हिंदुस्थानी वसाहतींत एक (पो. हिं.) रुपया, पाच रुपये, अशा प्रकारची मूल्ये असलेल्या चलनी नोटा असत, त्याऐवजी सहा एस्क्यूडोस, तीस एस्क्यूडोस, अशा प्रकारची (आडनिडी) मूल्ये असलेल्या चलनी नोटा जारी केल्या गेल्या. तर ते एक असो.)
का होतो चे उत्तर
असा टप्याटप्याने का प्रकाशित केला जातो
याचे कारण माझ्या मते असे असावे की एकेक लेख हा फार सघन,सखोल,प्रबंधसम असतो. ऐसी चे संपादक हे जाणून आहेत की एकदम विश्वरूप दर्शन सामान्य वाचक पचवू शकत नाही. त्यासाठी हा दिवाळ सणाचा हेवी बौद्धिक फराळ हा चमचा चमचा ने संपादक माऊली कडून भरवला जातो.
... कारण
पहिल्या वर्षी अख्खा अंक एकदम प्रकाशित केला. अनुभवांतून शिक्षण होतं, त्याचं हेही एक उदाहरण.
वाचकांची सोय होत असेल, हे एक गृहीतक. एका दिवशी ३०-३५ लेख लोक वाचत नसावेत. मी तरी वाचत नाही.
मुख्य कारण - मला एका दिवशी एवढं सगळं काम झेपणारं नाही. अंकासाठी लेखन मागवणं, आलेल्या लेखनाचं संपादन, मुद्रितशोधन वगैरे काम निराळं असतं आणि ते करायला बऱ्याच लोकांची मदत होते. प्रकाशन ही एकमेव काम फक्त मी एकटी करते. त्यासाठी लेख 'लावण्या'चं काम करायलाही वेळ लागतो; तरीही माझ्या हातून चुका राहतात, ते इतर लोक (मुख्यतः चिंतातुर जंतू) सुधारतात. स्वतःची सोय म्हणून हा मार्ग निवडला.
अंक एकदम प्रकाशित करणं ही छापील प्रकाशनांची मर्यादा आहे, असंही म्हणता येतं. काळानुसार, आणि तंत्रज्ञानानुसार आपणही बदलावं.
लक्षद्वीप
गोष्ट आणि एकूणच तिचे भारतीय रूपांतर आवडले. केबलिंग कामाचे तपशील, कामगारांचे जीवन, कोकण वगैरे सगळे बारकावे आवडले.
("खोसला का घोसला" आणि "जो जिता वही सिकंदर" हे चित्रपट परकीय चित्रपटांवर आधारित असूनही सांगितल्याशिवाय तसे वाटत नाहीत, तसेच इथेही वाटले नाही.)
मूळ कथा वाचलेली असूनही ही गोष्ट वाचताना डीटेलिंग मुळे वाचनात रस टिकून राहिला
राशीभविष्य विशेष आवडलंय
ग्रह स्वामी योग दशा महादशा वगैरे वर विशेष भर देऊन अभ्यासोनी प्रकटले आहेत लेखक महोदय! लै आवडलय!
हे राशिभविष्य वाचून उगीउगी रेशीमबागप्रेमी अंकीललोग दुखावण्याची जास्त शक्यता आहे लेखकानु!
बाकीचे लेख पण वाचनीय आहेत राजकीय शिक्षण वैचारिक हिंदुत्व वगैरे मांडलेले मुद्दे चर्चा करण्यासाठी उत्तम आहेत!
ताजा कलम: सक्काळी सक्काळी असं बौद्धिक खुराक म्हणजे दिवसभरात मेंदूत प्रतिक्रियाप्रसुती कळा वेदना यांना डांबून ठेवणं अवघड होत चाल्लंय गेले आठवडाभर!
वेळ मिळाल्यास आवडलेल्या आणि न आवडणाऱ्या मुद्द्यांवर अस्मादिकगुरूस्वामीद्वितत्वराशी लिहू म्हणतोय!
जाता जाता उगाचंच:
सगळ्या राशींमध्ये मग ती ब्बाई असो वा बाब्ब्या - संधी न मिळाल्याने आम्ही चारित्र्यवान आहोत अशी मर्दुमकी मिरवतात.
(न झेपलेला) बाहेरख्याली पणा ही असंस्कृत असंसदीय अनैतिक अनैसर्गिक प्रवृत्ती आहे म्हणून कांगावाखोर लोकांच्या राशीला कधीच जाऊ नये!
लक्षद्वीपावरचे साप
खास लक्षद्वीपावर पाठविण्याकरिताचे विशिष्ट जातीचे सर्वोत्कृष्ट तथा खात्रीलायक साप हे मुंबईतील ग्रांटरोड पुलाखालील चटर्जी नावाच्या गुजराती व्यापाऱ्याच्या दुकानी मिळतात, ही माहिती जगजाहीर असताना, स्वप्निल परबाने त्याकरिता रत्नागिरीतील कोठल्यातरी दुय्यम प्रतीच्या कॉलेजातील प्राणिशास्त्र विभागावर का अवलंबून राहावे, हे अनाकलनीय आहे. ठीक आहे, आतल्या ओळखीमुळे फुकटात मिळाला असेल, वगैरे, परंतु, दर्जा नावाचासुद्धा काही प्रकार असतो की नाही? विशेषतः, इतक्या चांगल्या कामासाठी इतका चिंगूसपणा करायचा, म्हणजे… शिवछत्रपतींचा वारस म्हणविणाऱ्यास शोभते का हे? घरच्या हलाखीचा कितीही आव आणला, तरी, खिशात चार पैसे खुळखुळू लागल्यावर (‘वातानुकूलित दुसऱ्या वर्गाच्या जागा उपलब्ध असतानासुद्धा’) रत्नागिरी ते कोची प्रवास पहिल्या वर्गाने करण्याची दौलतजादा करू शकणाऱ्याला रत्नागिरी ते मुंबईचे साधे एसटीच्या लालडब्याचे भाडे परवडले नसते, हे पटत नाही. (शिवाय, मुंबईत झाले, तरी, सापाची किंमत असूनअसून अशी कितीशी असणार? तरी बरे, कोची ते रत्नागिरी प्रवास जनरल बोगीतून करून पैसे वाचविलेच होते. कोकणातील आहोत, एवढे सिद्ध करायला तेवढे पुरेसे नव्हते काय? मग उधळले असते थोडे पैसे जरा बऱ्या ब्राण्डच्या सापावर, तर नक्की काय बिघडले असते?)
बाकी, रत्नागिरीच्या कॉलेजात आजकाल ‘सूरज’ नावाचे मित्र सर्रास भेटतात, म्हणायचे. तेही ठीकच, परंतु, हा ‘सूरज’ म्हणे आजकाल अलीबागला प्राणिमित्र संघटनेची कार्यकर्तागिरी करतो. रत्नागिरीत राहून हे करायचे म्हणजे रोज अपडाऊनमध्ये किती वेळ जात असेल, कोणास ठाऊक.
(शिवाय, मूळ कथेत — ती कितीही भिकार असली, तरी — (माझ्या आठवणीप्रमाणे) (१) कथानायक जेव्हा मालकाच्या खिशात साप सोडतो तेव्हा, झालेच तर, (२) साप जेव्हा मालकास चावतो तेव्हा, त्या घटनांना कोणीही साक्षीदार नसतो. किंबहुना, या सगळ्या भानगडीत सापाचे काही किरदार आहे, याची उपस्थितांपैकी (कथानायक वगळता) कोणाला कल्पनादेखील नसते. त्यामुळे (आणि त्याला ‘आयर्लंडात साप नाहीत’ या ‘सामान्यज्ञाना’ची जोड मिळून) कोणालाही कसलाही संशयदेखील येत नाही. इथे मात्र, मालकाच्या खिशात काहीतरी सोडलेले आहे याला (खुद्द मालकाव्यतिरिक्त) किमान एक साक्षीदार आहे. झालेच तर, ते जे काही आहे, ते सापसदृश आहे, हेदेखील त्या साक्षीदाराने पाहिलेले आहे; इतकेच नव्हे, तर त्या सापसदृश कशालातरी हाताळल्यावर काही तासांनी (!) मालकाचा मृत्यू ओढवतो, म्हटल्यावर, कितीही ‘लक्षद्वीपावर साप नाहीतच्च, मुळी!’ म्हणून कंठशोष जरी केला, तरीसुद्धा, त्या साक्षीदारास (दोन अधिक दोन मिळवून) कसला संशयही येऊ नये, म्हणजे तो साक्षीदार, आजकालच्या आयटीसेलच्या वात्सप्पी प्रचारावरसुद्धा डोळे झाकून विश्वास ठेवण्याइतका भोळसट असला पाहिजे. (फुरसे चावल्यानंतर माणूस तडकाफडकी मरतो, की काही तासांनंतर फुरसतीने (pun intended) मरतो. की अधलेमधले काही, याबद्दल मला (अनुभवाअभावी) काडीमात्र कल्पना नसल्याकारणाने, त्याबद्दल आपण अनुवादकास संशयाचा फायदा देऊ.))
तेही सोडून द्या. फ्रेडेरिक फोरसाइथने त्याच्या उभ्या आयुष्यात कितीतरी बऱ्यावाईट कथाकादंबऱ्या लिहिल्या असतील. पैकी, ‘द डे ऑफ द जॅकल’, झालेच तर. ‘द ओडेसा फाइल’. वगैरे कादंबऱ्या सुप्रसिद्ध तर आहेतच, परंतु उत्कृष्टसुद्धा आहेत. परंतु, भाषांतर करून दिवाळी अंकात छापण्याकरिता त्या अंमळ जास्तच दीर्घ आहेत, ही अडचण समजू शकतो. मात्र, त्याने अनेक लघुकथासुद्धा लिहिल्या असाव्यात. खुद्द प्रस्तुत कथा ज्या ‘नो कमबॅक्स’ या संग्रहातून घेतलेली आहे, त्यातसुद्धा इतर अनेक लघुकथा असतील, नि त्या कदाचित याहून बऱ्या असू शकतील. असे असताना, सन्जोप रावांना अनुवादाकरिता फ्रेडेरिक फोरसाइथची ही भिकारोत्तम कथाच तेवढी का निवडावीशी वाटली असेल, हेदेखील समजत नाही. ज्ञानेश्वरांचा वारसा सांगणाऱ्यास शोभते का हे?
थोडक्यात, एका (नावाजलेल्या लेखकाच्या, परंतु) भिकार मूळ कथेचा भिकार अनुवाद. अधिक काय लिहावे?
(एक वाइल्ड गेस: कदाचित, मूळ कथेतील अचाट अतार्किकपणा अनुवादात जसाच्या तसा जपून ठेवण्यासाठी सन्जोप रावांनी तितकाच अतार्किकपणा अनुवादित कथेत घुसडला असावा काय? Or, am I giving the translator too much credit?)