यावेळी मात्र, आपणच लघुग्रह आहोत!
यावेळी मात्र, आपणच लघुग्रह आहोत!
- उमेश घोडके
पाश्चात्त्य इतिहासाचे ढोबळमानाने तीन मुख्य कालखंड मानले जातात - पहिला म्हणजे प्राचीन काळ (इ. स. पूर्व ८०० - इ. स. ५००), दुसरा म्हणजे मध्ययुग (इ. स. ५०० - इ. स. १५००) आणि तिसरा म्हणजे इ. स. १५०० नंतरचा आधुनिक कालखंड. पंधराव्या शतकाच्या शेवटाला आधुनिकीकरण येण्याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत झाल्या – जहाजबांधणीतल्या सुधारणा, वसाहतवादाची सुरुवात, गुटेनबर्गचा मुद्रणयंत्राचा शोध, ऑटोमन तुर्कांनी केलेला कॉन्स्टन्टिनोपलचा पाडाव, प्रॉटेस्टन्ट विचारांचा उदय, वगैरे अनेक गोष्टी.
आधुनिकीकरण आल्यानंतरचा माणसाच्या प्रगतीचा वेग अक्षरशः थक्क करणारा आहे. गेल्या पाचशे वर्षांत उद्योगाच्या जगात अनेक घडामोडी झाल्या. अनेक औद्योगिक क्रांत्या झाल्या.
सन १७६५च्या आसपास जेम्स वॉटनं वाफेच्या इंजिनाची सुधारित आवृत्ती शोधली आणि पहिली औद्योगिक क्रांती आणली. त्यानंतर शंभर वर्षांनी एडिसन आणि टेस्लानं घराघरांत वीज आणण्याबरोबर दुसरी औद्योगिक क्रांती आणली. नंतर साधारण शंभर वर्षांनी, म्हणजे १९७०च्या सुमारास सिलिकॉन व्हॅलीनं इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार, कॉम्प्युटर आणि इंटरनेटच्या डिजिटल बदलांनी तिसरी औद्योगिक क्रांती आणली. सिलिकॉन व्हॅलीनं पुढच्या चक्क वीस-तीस वर्षांत इंटरनेटचं महाजाल, मोबाईल, वगैरे चमत्कारांनी चौथी औद्योगिक क्रांती आणली. आणि आता त्यानंतरच्या दशकातच सिलिकॉन व्हॅलीनंच जगाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि पाचव्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं आहे.
गेल्या काही वर्षांतला औद्योगिक बदलांचा वेग तर इतका अविश्वसनीय आहे, की पाचशे तर सोडाच, पण अगदी पाचच वर्षांपूर्वी आपण कितीतरी मागासलेले होतो असं वाटू लागलं आहे. तिसऱ्या औद्योगिक क्रांतीपर्यंत मोठाले बदल व्हायला साधारण शंभर वर्षं जात होती. सिलिकॉन व्हॅलीनं १९६०नंतर जेव्हा तिसरी औद्योगिक क्रांती आणली, त्यानंतरच्या साठ वर्षांतले बदल खरोखरच अविश्वसनीय आहेत.
या सगळ्या औद्योगिक क्रांत्यांमुळं माणसाच्या भौतिक सुखाच्या दृष्टीनं पाहिलं तर अनेक चांगल्या गोष्टी घडल्यात खऱ्या. पण या घडामोडींचे पृथ्वीच्या वातावरणावर, पर्यावरणावर, समुद्रांवर, आणि जीवसृष्टीवर काय दुष्परिणाम होत आहेत, हे गेल्या साठ वर्षांतच लक्षात येऊ लागलं आहे. १९५७-५८च्या सुमारास शास्त्रज्ञांना लक्षात आलं, की औद्योगीकरणामुळे हवेतलं दूषित वायूंचं प्रमाण, विशेषतः कार्बन डायॉक्साईड आणि याशिवाय मिथेन, नायट्रस ऑक्साईड यांचं प्रमाण, हाताबाहेर चाललं आहे. हे वायू पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ गर्दी करतात आणि त्यामुळे सूर्याकडून पृथ्वीला मिळणारी उष्णता पुन्हा अवकाशात परावर्तित होण्याऐवजी पृथ्वीवरच अडकून राहते. या हरितगृहासारख्या (greenhouse) परिणामामुळे पृथ्वीवरची उष्णता आणि पृथ्वीवरचं तापमान वेगानं वाढत चाललं आहे. पृथ्वीवरच्या जीवसृष्टीसाठी ही फार मोठी धोक्याची घंटा आहे.
१९५६च्या सुमारास न्यू जर्सीच्या बेल लॅब्जमध्ये मॅनेजर असलेला विल्यम शॉकली तिथल्या आठ तरुण शास्त्रज्ञांना घेऊन बाहेर पडला आणि कॅलिफोर्नियाच्या पालो अल्टोला त्यानं शॉकली सेमिकंडक्टर्स नावाची कंपनी सुरू केली. पण अवघ्या दोन वर्षांत ही सगळी तरुण मंडळी त्याला सोडून गेली आणि त्यांनी फेअरचाईल्ड सेमिकंडक्टर्स सुरू केली. पुढे दहा वर्षांत त्यांतल्याच काहींनी इंटेल नावाची कंपनी सुरू केली. दहा-वीस वर्षांतच एकेकाळी फळबागांसाठी प्रसिद्ध असलेला हा प्रदेश अल्पकाळातच तंत्रज्ञान, शोध आणि उपक्रमशीलतेची जागतिक राजधानी म्हणून ओळखला जाऊ लागला.
भौतिक प्रगतीचा वायुवेगानं पाठलाग पाठलाग करणाऱ्या सिलिकॉन व्हॅलीनं पर्यावरणाच्या प्रश्नाकडे मात्र सुरुवातीपासून थोडंफार दुर्लक्षच केलं. सिलिकॉन चिप्सच्या उत्पादनात चिप्स स्वच्छ करण्यासाठी ट्रायक्लोरोएथिलीन (TCE) यासारखी विषारी रसायनं वापरली जात असत. त्यांचा साठा करण्यासाठी मोठाले हौद बांधलेले होते. या हौदांमधून जमिनीत झालेल्या गळतीमुळे संपूर्ण सिलिकॉन व्हॅलीत पुढे कॅन्सर, पार्किन्सन्स, नवजात अर्भकांमधले जन्मदोष वगैरेंचं प्रमाण वाढलेलं आढळलं. १९८०-९०च्या दशकांत व्हॅलीमधल्या रासायनिक गळतीची अमेरिकेच्या प्रदूषण महामंडळानं दाखल घ्यायला सुरुवात केली. या रासायनिक गळत्यांची दुरुस्ती करण्यासाठी अमेरिकन सरकारनं सुपरफंड नावाची एक योजना चालू केली. सिलिकॉन व्हॅलीच्या सांता क्लारा कौंटीत अख्ख्या अमेरिकेतल्या सर्वांत जास्त (२३) सुपरफंड गळतीच्या जागा आहेत. कालांतरानं त्यांतल्याच अनेक जागांवर नवीन उद्योगधंदे चालू झाले आहेत. सध्या जगाला सुपरिचित असलेल्या अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांच्या नव्या इमारती याच जागांवर उभ्या आहेत. यांतल्या काही जागांवर कालांतरानं रिअल इस्टेट डेव्हलपर्स मंडळींनी लोकांना राहण्याची घरंसुद्धा बांधली आहेत. अगदी गूगलची मुख्य जागासुद्धा पूर्वीच्या अशाच सुपरफंड जागेवर बांधली गेली आहे. २०१२-१३ मध्ये साधारण तीन महिन्याच्या काळात गूगलच्या माऊंटन व्ह्यू ऑफिसमध्ये व्हेंटिलेशन सिस्टीममधून विषारी वायू येत असल्याचं लक्षात आलं. अजूनही व्हॅलीतल्या पूर्वीच्या सुपरफंड गळतीच्या जागांवर उभारलेल्या अनेक नवीन कंपन्यांना हा धोका कायम आहे.
एके काळी सेमिकंडक्टर चिप आणि हार्डवेअरच्या उत्पादनामुळे झालेली पर्यावरणाची किंवा वातावरणाची गळचेपी पुढे सॉफ्टवेअर कंपन्यांच्या काळामध्ये होणार नाही अशा अपेक्षा फोल ठरत चालल्याची लक्षणं दिसू लागली आहेत. एकंदरीत तंत्रज्ञानाच्या प्रांतात आणि नवीन औद्योगिक उपक्रमांच्या बाबतीत संपूर्ण जगात अग्रणी असलेल्या सिलिकॉन व्हॅलीच्या कंपन्यांनी पर्यावरणाला मदत करण्याऐवजी त्याचा ऱ्हास व्हायलाच हातभार लावल्याचं दिसत आहे.
१९९०नंतर कॉम्प्युटर्स, माहिती महाजाल आणि मोबाईल उपकरणांच्या वाढलेल्या वापरामुळे तयार होणाऱ्या माहितीची व्याप्ती भयानक झाली आहे. १९६९च्या ऑक्टोबर महिन्यात इंटरनेटवरचा पहिला संदेश पाठवला गेला, तेव्हा त्या संदेशात LOGIN ही एवढी अक्षरं सुद्धा मावली नाहीत (फक्त LO अक्षरं पाठवली गेली आणि सर्व्हरनं मान टाकली). आजमितीला जगात एका दिवसात चक्क चाळीस कोटी टेराबाईट डेटा तयार होतो. हा एवढा डेटा पाठवणं, साठवणं, त्यावर प्रक्रिया करणं ह्या सगळ्यासाठी डेटा सेंटर्सची गरज लागते आणि ही सगळी डेटा सेंटर्स, त्यातली मशीनरी वगैरे गोष्टी तापू नयेत म्हणून, वातानुकूलित ठेवावी लागतात. एकेक डेटा सेंटरची विजेची गरज ही जवळजवळ एक लाख घरांच्या विजेच्या गरजेइतकी असू शकते. गेल्या काही वर्षांत अशा डेटा सेंटर्सचा विजेचा वापर हा जगाच्या वीज वापराच्या जवळजवळ पाच टक्क्यांपुरता पोचला आहे. काळजीची गोष्ट अशी की यातली बहुतेक वीज ही जीवाष्म इंधनांवर (fossil fuels) आधारलेली आहे. त्यातून होणारं प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे.
सिलिकॉन व्हॅलीनं तयार केलेली आणखी एक समस्या म्हणजे कॉम्प्युटर्स, मोबाईल, टेलीव्हिजन, व्हिडिओ गेम वापरणाऱ्यांना सातत्यानं नव्या आवृत्त्यांची खरेदीची करण्याची लावलेली चटक. दर काही वर्षांनी नवा कॉम्प्युटर, नवा मोबाईल, नवा टीव्ही, वगैरेंमुळे संपूर्ण जगात इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचा भयंकर प्रश्न तयार झाला आहे. या कचऱ्यातल्या गोष्टींमध्ये घातक रसायनसुद्धा असतात, आणि त्यापायी विषारी आणि घातक गोष्टी पुन्हा जमिनीत कायमच्या जाण्याची भीतीही वाढली आहे. सध्या दरवर्षी अंदाजे सात कोटी टन इलेक्ट्रॉनिक कचरा तयार होतो. यातला फक्त एक चतुर्थांशच पुन्हा वापरला जातो आहे, बाकी सगळा कायमचा जमिनीच्या आत गाडून टाकला जातो. अशा कचऱ्यात साधारण हजार-एक प्रकारची दूषित रसायनं असतात, आणि ती वातावरणात पुढची कितीतरी वर्षं टिकून राहतात.
सिलिकॉन व्हॅलीतले कितीतरी उद्योग क्रिप्टोकरन्सीचं डिजिटल चलन वापरतात. बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सींमागे प्रचंड प्रमाणात विजेचा वापर होतो. बिटकॉईनपायी खर्च होणाऱ्या विजेचं प्रमाण काही देशांच्या एकंदरीत वीजवापरापेक्षा जास्त आहे. यातल्या बहुतेक विजेचं उत्पादन हे पारंपारिक जीवाष्म प्रकारानंच होतं. क्रिप्टोचं खाणकामच काय, त्यापेक्षाही गंभीर म्हणजे इलेक्ट्रॉनिक भागांना लागणाऱ्या खनिजांचं खाणकाम. व्हॅलीच्या गरजांसाठी लागणाऱ्या तांबं, लिथियम, निकेल आणि कोबाल्ट या खनिजांच्या खरेदीसाठी आफ्रिकेतल्या कानाकोपऱ्यात जाऊन, वाट्टेल ते कायदेशीर अथवा बेकायदेशीर मार्ग वापरून, हे धातू मिळवले जातात. आफ्रिकेतल्या अशा बेकायदेशीर उद्योगांमध्ये ४० टक्के वेठबिगार बालकामगार आहेत, याबद्दल तर बोलायलाच नको.
कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence) हे सिलिकॉन व्हॅलीचं सगळ्यात नवीन बाळ. गेल्या ५ वर्षांत या बाळानं चांगलंच बाळसं धरलं आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेमागच्या गणनेच्या क्रिया (algorithms) एखाद्या खादाड भस्मासुरासारख्या वीज खातात. सोप्या किंवा अवघड प्रश्नांना उत्तर देताना कृत्रिम बुद्धिमत्तेला लक्षावधी किंवा कोट्यवधी गणनांमधून जावं लागतं. यापायी पर्यावरणाच्या आणि जागतिक तापमानवाढीच्या प्रश्नांकडे संपूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गणनांसाठी लागणाऱ्या प्रचंड ऊर्जेचा प्रश्न सोडवण्यासाठी अगदी अलीकडे गूगल, फेसबुक, अमेझॉन वगैरे कंपन्यांनी सौर, पवन, आणि (अगदी अलीकडच्या काळात) आण्विक ऊर्जा वापरायला सुरुवात केली आहे.
आण्विक ऊर्जेसाठी व्हॅलीचा कल छोट्या आकाराच्या आण्विक अणुभट्ट्या वापरण्याकडे आहे. या अणुभट्ट्यांमधून कार्बन डायॉक्साईड फेकला जाणार नाही ही तशी जमेची गोष्ट आहे. मात्र या अणुभट्ट्या जागतिक तापमानवाढीचा प्रश्न सोडवतील याची शक्यता जवळपास शून्य आहे. सध्या जगात अशा छोट्या आकाराच्या अणुभट्ट्या फक्त दोनच ठिकाणी आहेत – एक चीनमध्ये आणि दुसरी रशियात. याशिवाय अर्जेंटिनात आणि अमेरिकेत टेनेसी राज्यातही नव्या अणुभट्ट्या तयार होत आहेत. एक अडचण म्हणजे या अणुभट्ट्या तयार व्हायला प्रचंड खर्च येतो आणि चिक्कार वेळही लागतो. गूगल जी अणुभट्टी वापरणार आहे, ती तयार व्हायला किमान तीन-चार वर्षं लागणार आहेत. आण्विक ऊर्जेचा पर्याय आकर्षक वाटत असला तरी त्यामध्ये धोकेपण पुष्कळ आहेत. या महागड्या अणुभट्ट्यांच्या सुरक्षिततेसाठीही प्रचंड खर्च असणार आहे. त्यात कपात किंवा निष्काळजीपणा झाला तर आण्विक उत्सर्जनाचा धोकासुद्धा संभवू शकतो. सौर पॅनेल किंवा पवनऊर्जेसाठी पवनचक्क्या कमी वेळात वाढवता येतात, तशा अणुभट्ट्या वाढवायला वर्षानुवर्षं जावी लागतील. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे अणुभट्ट्यांमधून कार्बनचं प्रदूषण अगदी कमी असलं तरी, या भट्ट्यांसाठी लागणाऱ्या खनिजांचं (युरेनियम), त्यांचा साठा, दळणवळण आणि आण्विक कचरा साठवण्यामागचे प्रचंड धोके लक्षात घेता, आण्विक ऊर्जेचा पर्याय सौर किंवा पवन ऊर्जेइतका प्रभावी नसण्याचीच शक्यता आहे. सगळ्यांत मोठा धोका म्हणजे आण्विक भट्ट्यांच्या किंवा कच्च्या मालाच्या नियंत्रणाचा. हे नियंत्रण फक्त स्वतःच्या गुंतवणूकदारांच्या फायद्यासाठी काम करणाऱ्या कंपन्यांकडे गेलं तर, एखादा वेडसर गुंतवणूकदार जेम्स बॉण्डच्या एखाद्या खलनायकासारखा वागणार नाही याची खात्री कोण देईल?
थोडक्यात सांगायचं तर आण्विक ऊर्जेचा जुनाच पर्याय चाचपून बघण्यापलीकडे व्हॅलीच्या अगदी मोठ्या कंपन्यांकडेही काही उत्तरं नाहीत. अख्ख्या जगातली कितीतरी हुशार मंडळी एकवटली असताना व्हॅलीलासुद्धा तापमानवाढीच्या प्रश्नावर अजून उत्तर सापडलेलं नाही. व्हॅलीत राहणाऱ्या किंवा इथे काम करणाऱ्या बहुतेकांना हा प्रश्न चांगलाच ठाऊक आहे, त्याची त्यांना चांगलीच जाणीव आहे. असं असतानाही इतक्या वर्षांमध्ये व्हॅलीला या प्रश्न गांभीर्यानं घ्यावासा वाटलं नाही, याचं मुख्य कारण म्हणजे इथं ज्यांच्या मर्जीनं सगळा कारभार चालतो, त्या धनाढ्य सावकारांची पर्यावरणाच्या समस्येबद्दल असणारी काहीशी अनास्था. आज गुंतवलेले पैसे उद्या पन्नास पटीनं वाढणार नसतील तर व्हॅलीच्या भांडवलदारांना या विषयात स्वारस्य असण्याची शक्यता कमीच आहे.
आज तापमानवाढीच्या संकटामुळे जीवसृष्टीच्या जीवनमरणाचा, अगदी अस्तित्त्वाचाच प्रश्न उभा राहिला आहे. ज्यांच्याकडे अमाप संपत्ती, बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता आहे, अशांनी एकत्र येऊन या प्रश्नाला प्राधान्य दिलं तर, कदाचित आपल्या डोळ्यांसमोर तापमानवाढीच्या संकटातून काही मार्ग निघण्याची शक्यता तरी तयार करता येईल. आणखी दोनतीनशे वर्षांनी मानवजात खरोखरच नामशेष होण्याची जर वेळ आली, तर त्याचा काहीसा तरी दोष, आजच्या मानवजातीवर ज्यांचा सर्वात जास्त प्रभाव आहे, त्या सगळ्यांचा असणार आहे.
बऱ्याच लोकांचा असा ठाम समज आहे, की अशा प्रश्नासारखा मोठा आणि व्यापक प्रश्न आता फक्त सरकारी पातळीवरच सोडवला जाऊ शकतो. खरं तर आपण जर सरकारं आणि तिथले निर्णय घेणाऱ्या राजकारणी लोकांवर विसंबून राहणार असलो, तर दोनतीनशे वर्षांनी होणारं वाटोळं खूपच लवकर होईल. सिलिकॉन व्हॅलीसारखी प्रभावशाली आणि ताकदवान परिसंस्था आज तरी जगात दुसरीकडे कुठे नाही. आणखी पंचवीस-पन्नास वर्षांनी जगात काय होणार आहे, हे ठरवणारी ही मंडळी आहेत. आपल्यापेक्षा कमनशिबी असलेल्या आपल्या बांधवांसाठी या मंडळींनी थोडा वेळ दिला आणि थोडं लक्ष घातलं, तर जगाचं कल्याण केल्याचं पुण्य तर त्यांना निश्चितच मिळेल.
खरंतर जागतिक तापमानवाढीबद्दल व्हॅली अगदीच गप्प राहिली आहे अशातलाही भाग नाही. इथले काही उद्योजक आणि काही भांडवलदार थोडाफार प्रयत्न करत राहिले आहेत. पण आज कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवण्यामागे जशी इथली सगळी परिसंस्था धावते, तशी घाई किंवा निकड पर्यावरणाच्या बाबतीत कमीच जाणवताना दिसते. काही नवीन उद्योजक मंडळी भू-अभियांत्रिकी तंत्रांवर आधारित काही कल्पनांशी खेळून बघताहेत (न्यू यॉर्क टाईम्समधला या संदर्भातला एक लेख: Silicon Valley Renegades Pollute the Sky to Save the Planet). काहींनी हवेतला कार्बन शोषून घेऊन त्याचा भूगर्भात साठा करण्याच्या पद्धती शोधल्या आहेत. काहींनी यांत्रिक झाडं लावण्याची कल्पना मंडळी आहे. इलॉन मस्कसारख्यांनी इलेक्ट्रिक वाहनं यशस्वीरीत्या बाजारात आणली खरी, पण तापमानवाढीच्या समस्येवर त्याचा होणारा परिणाम फार कमी आहे. जोवर इलेक्ट्रिक वाहनं संपूर्णपणे अपारंपरिक ऊर्जेचा वापर करू शकत नाहीत, तोवर वातावरणातला एकंदरीत कार्बन डायॉक्साईड कमी होण्याला तेवढा फरक पडणार नाही. शिवाय मस्कसारखी मंडळी दुसऱ्या बाजूला जीवाष्म इंधनांना प्रोत्साहन देणाऱ्या राजकारण्यांच्या मागे आहेत, त्यामुळे पर्यावरणाचे प्रश्न सोडवण्याकडे त्यांचा कल आहे असं मानणं वेडेपणाचं ठरेल.
तापमानवाढीच्या समस्येवर नवीन उपक्रम, नवे शोध लावायला पुष्कळ वाव आहे. सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी सौर पॅनेल्सची कार्यक्षमता वाढवणं, हवेतला कार्बन कमी करणं, हिमनद्यांची वितळणूक थांबवणं, अल्पावधीत अब्जावधी झाडं लावण्याचे नामी उपाय शोधणं अशा किंवा याहून कितीतरी गोष्टी करण्यासारख्या आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अवघड समस्येला प्राधान्य देण्याची असलेली निकड. उद्या एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं भेलकांडत येताना दिसला आणि तो पृथ्वीवर कोसळला तर काय होईल याची कल्पना केली, तर पृथ्वीवरचे उत्तमोत्तम शास्त्रज्ञ, उद्योजक, भांडवलदार, सगळे एकत्र येऊन त्या लघुग्रहाला थांबवण्याचे उपाय शोधण्याच्या मागे लागतील. पृथ्वीचं तापमानवाढ ही अशा लघुग्रहापेक्षाही गंभीर समस्या आहे. सुदैवानं व्हॅलीत जगातली उत्तमोत्तम डोकी, उत्तमोत्तम मेंदू आहेत. वाट्टेल तेवढा पैसा पाण्यासारखा खर्च करू शकतील असे कुबेराचे बापही आहेत. इतकं सगळं असताना आपण हा प्रश्न ऐरणीवर आणलाच नाही, तर मात्र आपण नामशेष होण्याच्याच लायकीचे आहोत.
साडेसहा कोटी वर्षांपूर्वी मेक्सिकोच्या युकाटान द्वीपकल्पावर आदळलेल्या लघुग्रहानं पृथ्वीवर हाहाकार माजवला आणि असलेली-नसलेली जीवसृष्टी खलास केली. यावेळी मात्र, आपणच तो लघुग्रह असू.
प्रतिक्रिया
महत्वाचा लेख.
उत्तम लेख. परंतु सिलिकॉन व्हॅली बाबतीत लेखकाला काय नेमके म्हणायचे आहे ते कळले नाही. एका बाजूला - 'याचं मुख्य कारण म्हणजे इथं ज्यांच्या मर्जीनं सगळा कारभार चालतो, त्या धनाढ्य सावकारांची पर्यावरणाच्या समस्येबद्दल असणारी काहीशी अनास्था. आज गुंतवलेले पैसे उद्या पन्नास पटीनं वाढणार नसतील तर व्हॅलीच्या भांडवलदारांना या विषयात स्वारस्य असण्याची शक्यता कमीच आहे.'अस वास्तवदर्शी मत. तर पुढे 'सिलिकॉन व्हॅलीसारखी प्रभावशाली आणि ताकदवान परिसंस्था आज तरी जगात दुसरीकडे कुठे नाही.' अशी स्तुती आणि शेवटी 'आपल्यापेक्षा कमनशिबी असलेल्या आपल्या बांधवांसाठी या मंडळींनी थोडा वेळ दिला आणि थोडं लक्ष घातलं, तर जगाचं कल्याण केल्याचं पुण्य तर त्यांना निश्चितच मिळेल.' अशी हतबल विनवणी.
माझ मत थोड वेगळ आहे, सिलिकॉन व्हॅली ह्या प्रश्नांवर उत्तर शोधेल असा काही समजणे म्हणजे भाबडा आशावाद होईल कारण लेखकानेच लिहिलेल थोड बदलून म्हणावस वाटत - आज गुंतवलेले पैसे उद्या पन्नास पटीनं वाढणार नसतील तर व्हॅलीच्या भांडवलदारांना या विषयात स्वारस्य असण्याची शक्यता नाहीच आहे. अणुउर्जा, भू-अभियांत्रिकी किंवा इतर तत्सम उपाय ज्यात व्हॅली पैसे गुंतवते आहे त्या गोष्टी एकतर त्यांचे अद्योग विनासायास चालत रहावे व आपण काहीतरी करत आहोत असे good will भासवण्यासाठी आहे. भू-अभियांत्रिकी प्रयोगांबद्दल बोलायचे तर ते अजूनही किती उपयोगी आहे आणि महत्वाचे म्हणजे त्यांचे काही दुष्परिणाम नाहीत ह्याची अजून खातरजमा झालेली नाहीय.
स्तुती?
ही स्तुती का वाटली?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अस वाटल खर, व्हॅलीचा इतिहास
अस वाटल खर, व्हॅलीचा इतिहास देवून अशी प्रभावशाली आणि ताकदवान परिसंस्था जगात कुठे नाही हे सांगण स्तुती वाटली. कदाचित,माझ्या माहितीतले बहुतेक लोक व्हॅलीबद्दल कौतुकानेच बोलतात म्हणून इथे लेखकाला तसच वाटत असेल असा समज झाला.
प्रतिसादाबद्दल आभार
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. हा विषय मुळातच रूक्ष आहे. आणि दिवसेंदिवस आणखीनच रूक्ष होत चालला आहे (सॉरी, श्लेषाचा मोह आवरू शकलो नाही). त्यामुळे, यात थोडा रस घेऊन त्यासाठी वेळ देणाऱ्यांबद्दल मला प्रचंड आदर आहे.
तापमानवाढीच्या संकटाबद्दल कुणीतरी, काहीतरी लवकरात लवकर केलं पाहिजे हे तर खरं आहे. संकटाची व्याप्ती इतकी वाढली आहे, की आता हे सामान्य मंडळींच्या हाताबाहेर गेलं आहे. धोक्याची घंटा बडवून बडवून तज्ज्ञांचे आणि शास्त्रज्ञांचे हात तुटायची वेळ आली आहे. राजकारणाचे वारे कुठे चालले आहेत, ते आपण सगळे पाहतो आहोतच.
गरज ही खरोखरच शोधाची जननी असेल, तर हे बाळंतपण आता अनिवार्य आहे. ते कोण करणार हा मुद्दा आहे. ज्यांच्याकडे हे घडवून आणायची ताकद आणि संसाधनं आहेत, अशांनी थोडी तोशीस घेतली, थोडा वेळ दिला, खिसे हलवून थोडे सुट्टे रस्त्यावर सांडले, तर या प्रश्नातून मार्ग सापडू शकतील. या मंडळींना हा विषय अजूनही प्रेरणेचा, ऐरणीचा किंवा आणीबाणीचा वाटत नाही, ही गोष्ट मला तरी मन विषण्ण करणारी आणि वैषम्याची वाटते.
मॅस्लोनंसुद्धा १९४३ चा आपला मानवी गरजांचा मूळचा पिरॅमिड १९७० साली थोडासा बदलला, कळसावर आणखी थोड्या विटा जोडल्या, आणि पारलौकिकाकडे आणि परोपकाराकडे लक्ष वेधायचा प्रयत्न केला. पिरॅमिडच्या अगदी शेवटापर्यंत पोचलेली मंडळी जर त्या शेवटच्या पायऱ्यांवर अडखळली, तर सगळ्यांचे सगळे पिरॅमिड कोसळून पुन्हा सगळे हवापाण्याच्या पहिल्या पायरीवर घसरलेले दिसणार आहेत.
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. पण
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. पण तुमच्या उत्तराने पूर्ण समाधान झाले नाही. म्हणजे 'हा विषय मुळातच रूक्ष आहे.', 'गरज ही खरोखरच शोधाची जननी असेल, तर हे बाळंतपण आता अनिवार्य आहे.', 'तापमानवाढीच्या संकटाबद्दल कुणीतरी, काहीतरी लवकरात लवकर केलं पाहिजे हे तर खरं आहे.' ही सगळी मते पटतातच. पण - 'संकटाची व्याप्ती इतकी वाढली आहे, की आता हे सामान्य मंडळींच्या हाताबाहेर गेलं आहे.' हे काही पटत नाही. एकट्या माणसाने करून काही होणार हे खरच, पण सगळ्यांनी एका दिशेने प्रयत्न केले, आपपला खारीचा वाटा उचलला तर? मुख्य मुद्दा सामान्य लोकांना ह्या प्रश्नाबद्दल पुरेशी जाणीव नाही असा असावा. पण परिस्थिती बदलेल अशी मला आशा वाटते. अचानक सगळ्याना सदबुद्धी सुचेल म्हणून नाही तर लोक परिणाम भोगत आहेत म्हणून. तुम्ही या विषयात काम करत आहातच (गेल्यावेळच्या दिवाळी अंकातील लेखानंतर गुगलून पाहिलेल), तुम्हाला अस वाटत का ह्या जटील प्रश्नावर एकच एक grand solution आहे, जे करायची ताकद फक्त सिलिकॉन व्हॅलीतील धनदांडग्यांकडे आहे? हो उत्तर असेल तर कसे तेही ऐकायला आवडेल. थोड अवांतर आहे पण एक उदाहरण देते जेव्हा स्त्रिया (किंवा कृष्णवर्णीय) त्यांच्या हक्कासाठी लढल्या तेव्हा त्यांच्याकडे मोठे बदल घडवून आणायची ताकद आणि संसाधन नव्हतीच ना. पण चिवटपणे एका दिशेने केलेले प्रयत्न हळूहळू का होईना काम करतात हयाबद्दल तुम्हाला काय वाटत?
अजून एक अतिअवांतर - नंदा
अजून एक अतिअवांतर - नंदा काकांच्या (खरे) नांगरल्याविण भुई ह्या पुस्तकात त्यांनी एक कविता आणि त्याचा अर्थ एका पात्राच्या तोंडी दिलाय वेगळ्याच संदर्भात पण मला वाटत ते तापमानवाढीच्या संकटाला लागू होत. ते पुस्तकातून copy करून खाली देत आहे .
कविता -
"इतुके का सोपे रे बंध तोडणे
तू साखळदंड थोर, तोडशील करूनि जोर
शैवाली गुरफटता, कठीण पोहणे||
इतुके का सोपे रे बंध तोडणे
श्वापद तू घोर वनी, नमविशील तव चरणी|
उठता परि मोहळ का तुज निभावणे||
इतुके का सोपे रे बंध तोडणे
तोडशील वृक्ष एक, खोल मुळ्या परि अनेक|
फुटतिल त्या जोमाने, धरूनि नव जिणे||
इतुके का सोपे रे बंध तोडणे"
अर्थ -
"आज मला वाटत राज्यकर्ते, महात्मे, सेनापती, सगळेच 'तू' असतात. आणि साधी माणस त्यांना 'इतुके का' मधून सावध करत असतात. त्यांना आपण स्वतः सुटं, वेगळ जाणवूनच नको असत. शेवाळाच्या गुच्छातला एक धागा, मुळ्यांच्या जंजाळातला एक केस, रोरावणार्या महापुरातला एक थेंब- असच त्यांना रहायच असत. त्यांची स्वप्न वाघ मारण, झाडं तोडण, नदी पार करणं अशी नसतात. त्यांना तग धरून रहायच असत, फक्त.
आपल यंत्र एकावर एक नाहिये. ते घडवायला, वापरायला, सुधारायला, अनेकांची समांतर कामं लागतात. ते लक्ष्य आपोआप कवितेतला 'तू' होतं! ते सगळ्यांवर मात करू पाहतं. जाणीवपूर्वक नाही, पण स्वभावच असा असतो त्या 'तू' चा की एका दोघांना वश होत नाही. अशा वेळी मोहोळ उठवाव लागतं - आपण इथे उठवतोय तसं!"
मला वाटत ह्यात राज्यकर्ते, महात्मे, सेनापती ह्यांच्या बरोबरीला सिलिकॉन व्हॅलीतल्या बलाढ्य लोकांना ठेवू शकतो. आणि नंतर जे यंत्र तयार करायच लक्ष्य बदलून तापमानवाढीचा प्रश्न सोडवण्याचे उपाय अस ठेवल तर...
सकारात्मक भूमिका हवी हे बरोबर आहे
तुम्ही सकारात्मक विचारांनी या प्रश्नाकडे पाहत आहात ते अगदी योग्यच आहे. पण तापमानवाढीचा प्रश्न त्याच्या निकडीमुळे आणि व्याप्तीमुळे इतर सामाजिक प्रश्नांपेक्षा थोडासा वेगळा आहे. वैयक्तिकरीत्या करण्यासारखं खूप आहे. शंकाच नाही. पर्यावरणाची इतकी मोठी अपरिवर्तनीय हानी अगोदरच झाली आहे, की लोकजागृतीतून काही साधायला जो एक शंभरएक वर्षांचा कालावधी लागेल, तेवढा पृथ्वीकडे असण्याची शक्यता दुर्दैवानं फार कमी आहे. कामाच्या निमित्तानं या विषयातली काही आकडेवारी गेली काही वर्षं सातत्यानं पाहत आल्यानं आलेली निराशा कदाचित या लेखात उमटली असावी.
'पर्यावरणाची इतकी मोठी
'पर्यावरणाची इतकी मोठी अपरिवर्तनीय हानी अगोदरच झाली आहे, की लोकजागृतीतून काही साधायला जो एक शंभरएक वर्षांचा कालावधी लागेल, तेवढा पृथ्वीकडे असण्याची शक्यता दुर्दैवानं फार कमी आहे.' - हे दुर्दैवाने खर आहे. मलाही हया विचाराने खूप विषण्ण वाटत.
माहिती जालाची नवीन बाळे
माहिती जालाची नवीन बाळे जन्माला येत आहेत आणि ...
भरपूर खादाड आहेत. वीज खातात. विज निर्मितीसाठी जे काही पर्याय आहेत ते एकत्र अपुरे पडणार/खनिज तेल कोळसा खाणार/ आण्विक प्रक्रियेतील क्रांतीत पदार्थ टाकायचे कुठे आणि कसे हे प्रश्न आहेत.
दुसऱ्या अंगाने विचार केल्यास माहिती मिळवणे आणि सादर करणे हेच कमी केल्यास इंधन वापरावर बराच आळा बसेल. ते कुठे आणि कसे याचा विचार करावा. कारण तीच तीच माहिती बरेच लोक शोधत असतात. त्यांची वाचनालयेच ठेवावीत आणि विद्यार्थी, गृहिणी यांनी तिथून वाचावी इंटरनेट न वापरता. सामान्य ज्ञानाची पुस्तके उपयोगी पडतील. ऐतिहासिक,भौगोलिक, पाककला, कायदा, पीकपाणी यांची माहिती जुनी वाचली तरी चालेल. बदल होत असतात मान्य पण त्यासाठी प्रारंभिक माहितीचा प्रत्येकाने डोंगर उपसण्याची गरज नाही .