आमचं 'ग्लोबल' स्वयंपाकघर – मुंबई स्वयंपाकघर

#संकल्पनाविषयक #समाजमाध्यम #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२४

आमचं 'ग्लोबल' स्वयंपाकघर – मुंबई स्वयंपाकघर
- स्नेहल बनसोडे-शेलुडकर
कोॲडमिन मुंबई स्वयंपाकघर (मुक्त पत्रकार आणि 'स्वादांकुर फूडस'ची संचालक)

'Good food, good mood' असं म्हणतात, ते माझ्या बाबतीत तरी शंभर टक्के खरं आहे. पदार्थ काय राजेशाही आणि महागडाच हवा असं नाही, पण चवीला मात्र उत्तम हवा, त्यात तडजोड नको. साधा गरमागरम पहिल्या वाफेचा वरणभात, त्यावर तुपाची धार आणि लिंबाची फोड, किंवा गरम, पापुद्रा सुटलेली भाकरी आणि त्यावर तुपाची धार आणि मिठाची जाणवेल न जाणवेलशी कणी हे माझं आजही सगळ्यात भारीवालं कम्फर्ट फूड आहे. लहानपणीपासून साधंसुधं घरगुतीच पण उत्तम चवीचं खाणं खायची सवय, आईच्या हातचे, मसाल्याचा मारा नसलेले सात्त्विक पदार्थ – जसं की ज्वारीचं थालीपीठ किंवा वांग्याची-सांडग्याची भाजी तर बाबांच्या हातची गरमागरम पावभाजी, वाफाळतं सांबार हे त्या काळात अप्रूप वाटणारे पदार्थ. आईइतकाच वडलांचाही स्वयंपाकघरातला कर्ता प्रसन्न वावर, वाचनातूनही पदार्थांचे आणि रेसिप्यांचे संदर्भ आल्यावर जास्तच रसिकतेने वाचणारी मी आणि मुळातली माझी खवय्यी प्रवृत्ती या सगळ्यातून मी मनापासून स्वयंपाककला शिकण्याकडे वळले नसते तरच नवल. शेंगा चटणीशिवाय न जेवणाऱ्या सोलापूरचं माझं माहेर. पण बॉस अमरावतीची; तिथली मऊ लुसलुशीत पुरणपोळी, खुसखुशीत सांभारवडी आणि तेजतर्रार आलूवांग्याची भाजी खाऊन माझी खरोखरच विकेट पडली आणि माझं लग्न झालं ते अमरावतीच्या विदर्भाच्या मुलाशी – अंकुरशी! देवाने आपल्याला इतकं खाद्यसौंदर्य आणि पाकवैविध्य असलेल्या भारतात, महाराष्ट्रात जन्माला घातलं याबद्दल मी वारंवार त्याचे आभार मानत असते. या पाकवैविध्याचा आनंद इतरही अनेकांना घेता यावा या आंतरिक इच्छेतून मी महाराष्ट्राचे प्रांतिक खासियत असणारे पदार्थ जसं की अमरावतीची सांभारवडी, पाटवडी रस्सा किंवा सोलापुरची शेंगापोळी मेड टू ऑर्डर करून द्यायचा माझा व्यवसायही पुण्यात सुरू केला — स्वादांकुर फूडस.

पण आजचा विषय तो नाही. मुळात तुमचा मूड एलिव्हेट करणारी, शरीराचं नि मनाचं पोषण करणारी पाककला ही सहज घडत नाही. "पदार्थ बनवताना त्याला तुमच्यातलं काहीतरी द्यावं लागतं तेव्हा तो चविष्ट आणि अविस्मरणीय बनतो," अशा आशयाचा 'गुलाबजाम' या चित्रपटातला संवाद माझ्या फारच आवडीचा आणि शंभर टक्के पटणारा. मग आपसूकच या विषयातलं वाचन, भारतातल्या महाराष्ट्रातल्या आणि जगभरातल्या खाद्यसंस्कृती, परंपरा, शेफ, पाकस्पर्धा, अन्नातले पोषक घटक, जेवण वाढण्याच्या पद्धती या सगळ्याविषयी जिथून म्हणून माहिती मिळेल, तिथून ती मिळवत राहणं हा एक चाळाच लागून जातो. सोशल मीडियावर वावरतानासुद्धा आपल्या आवडत्या विषयांतली नवनवी इंटरेस्टिंग माहिती कशी मिळेल, हा माझा प्रयत्न असतो. याच प्रयत्नात असताना मला फेसबुकवर गवसलेलं रत्न म्हणजे –- मुंबई स्वयंपाकघर ग्रुप.

काय नाही इकडे?

साधना तिप्पनाकजेच्या मंगलोर डायरीतल्या भूतकोदलू आणि जास्वंदाचे दोसे या अतिशय युनिक पदार्थांपासून उमा कुलकर्णी नाईक यांच्या सावरडो ब्रेडपासून तेपाचेपर्यंत, गोव्याच्या प्रज्ञा शिरवईकरच्या पोस्टमधून फेमस झालेला शंकरछाप हिंग आपल्या स्वयंपाकघरात पण असावा आणि कधीतरी गोव्याचा तोराद पाव आपल्यालाही खायला मिळावा, असं वाटावं इतकं वैविध्य या ग्रुपवर रोजच असतं. या ग्रुपची मेंबर तर मी अगदी सुरुवातीपासूनच आहे, आणि कधी ॲडमिन ग्रुपमध्ये सहभागी झाले ते आठवतही नाही इतकं मुंबई स्वयंपाकघर आयुष्याचा हिस्सा बनलंय.

तर आजच्या काळात रेसिप्यांची चर्चा करणारे फेसबुक-व्हॉटसॲप ग्रुप, ऑनलाईन कम्युनिट्या, अत्यंत देखणी क्रोकरी घेऊन, सुंदर, शिडशिडीत स्त्री-पुरुष रील्स किंवा यूट्यूबवर करत असलेले तितकेच नेत्रसुखद पदार्थ यांची अजिबात वानवा नसतानाच्या काळात 'मुंबई स्वयंपाकघर' ग्रुप फेसबुकवर आपलं विशिष्ट स्थान का टिकवून आहे? त्यासाठी आपल्याला या ग्रुपची जडणघडण समजावून घ्यावी लागेल. हा ग्रुप सुरू झाला ८ मार्च २०१६ रोजी. 'मुंबई स्वयंपाकघर' या नावावरून बऱ्याच जणांना केवळ मुंबईतील लोकांसाठी असलेला ग्रुप असणार, असं वाटेल, पण ते तसं नाही. या ग्रुपचं नाव पडलं ते ग्रुप संस्थापक भक्ती चपळगांवकर हिच्या आई नंदिनी चपळगांवकर यांच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील ''स्वयंपाकघर' या घरगुती खाद्यपदार्थांच्या व्यवसायावरून. भक्तीच्या मित्रमैत्रिणींना, आणि नव्याने झालेल्या फेसबुक कम्युनिटीतल्या मित्रमैत्रिणींना नंदिनीकाकूंच्या हातचे पापड, लोणची, मसाले, कुरडया मिळाव्यात, नंदिनीकाकूंची रेसिपीज सांगायची हौस पुरवता यावी, त्यांच्या पाककृती शेअर करता याव्यात, इतरही उत्सुक आणि सुगरण मित्रमैत्रिणींनी आपापल्या पाककृती वा खाद्य आठवणी शेअर कराव्यात म्हणून औरंगाबादच्या 'स्वयंपाकघर' उद्योगाचं एक व्हर्च्युअल एक्स्टेन्शन म्हणून हा 'मुंबई स्वयंपाकघर' ग्रुप सुरू झाला. सुरुवातीला नंदिनीकाकूंच्याच रेसिप्या प्रामुख्याने येत होत्या तरी भक्तीच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेक मित्रमैत्रिणींनी हा ग्रुप फुलवायला सुरुवात केली, आणि भक्तीच्याच भाषेत "…और कारवां बनता गया!"

ग्रुप संस्थापक, मुक्त पत्रकार भक्ती चपळगांवकर सांगते, "ग्रुप सुरू करताना सगळ्या प्रकारच्या खाण्यावर नितांत प्रेम असलेली, वेगवेगळ्या खाद्यपद्धती, संस्कृती जाणून घेण्यात रस असलेली मंडळी असतात, त्यांना आपण एकत्र आणूयात, मजा करूयात, नवीन माहिती जाणून घेऊयात इतकाच उद्देश होता. पण अनेक वेगवेगळ्या प्रांतातली उत्साही मित्रमंडळी जमायला लागली, मराठवाडा-सोलापूर-लातूरची वेळा अमावास्या आणि भज्जी कोकणातल्या लोकांसाठी नवी होती तर कोकणातले नरकचतुर्दशीच्या दिवशी खायचे पाच प्रकारचे पोहे उर्वरित महाराष्ट्रासाठी फॅसिनेटिंग होते. परदेशात राहणाऱ्या मित्रमैत्रिणीही जोडल्या गेल्या. बेकिंग, किमची, टोफू, टर्की असे शब्द ग्रुपमध्ये रुळायला लागले आणि हे सगळं शेअर करणाऱ्या बायका जितक्या होत्या तितकेच पुरुषही होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमच्या 'मुंबई स्वयंपाकघर' ग्रुपवर अर्थातच स्त्रिया मोठ्या प्रमाणावर असल्या तरी इथे स्वयंपाक करायला आवडणारे, खाद्यपदार्थांच्या चर्चेत रस असलेले, स्वत: प्रयोग करणारे भरपूर पुरुषही आहेत. पोस्ट पडायला लागल्या तसे लोक शंका वा प्रश्नही शेअर करायला लागले. मग "मैत्रिणींनो, सख्यांनो, भाजीत मीठ जास्त झालंय किंवा तुपात तळताना अनारसे हसायलाच लागलेत, तर काय करू?" असले टिपिकल प्रश्न विचारण्याऐवजी आम्ही सदस्यांना शक्य तितक्या वेळा जाणीव करून देत असतो, 'मैत्रिणींनो / सख्यांनो' असली संबोधनं नकोत, कारण इथं स्वयंपाक उत्तम करणारे, त्यातले बारकावे आणि खाचाखोचा माहिती असलेले पुरुषही आहेत! त्यामुळे 'जेंडर सेन्सिटिव्हिटी' हे मूल्य सहजपणे बाळगत, ओळखीच्या/ अनोळखी अशा अनेक रसिक मित्रमैत्रिणींचा मेळा जमायला लागला, आणि ग्रुप कधी गजबजू लागला हे माझ्या लक्षातही आलं नाही. ग्रुप सुरू करताना काही गोष्टी मात्र डोक्यात पक्क्या होत्या की खाद्यसंस्कृतीबद्दल शेअर करताना इथं कसलीच बंधनं ठेवायची नाहीत. फक्त शाकाहारीच पदार्थ शेअर करा किंवा फक्त महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीचे पदार्थ शेअर करा, किंवा फक्त मराठीतूनच पोस्ट लिहा. असल्या कसल्याही अटी न ठेवता खुल्या मनाने आणि खुल्या दिलाने प्रत्येक पदार्थाचे आणि पोस्टकर्त्याचे/कर्तीचे स्वागत केले. फक्त त्यात भाषा सौहार्दाची हवी, भेदभाव, अंधश्रद्धा, दुसऱ्यांना जज करणं, इतरांचं कॉपी-पेस्ट, वाङ्मयचौर्य हे अजिबात नको, या गोष्टी स्पष्ट होत्या. आणि हे करता करता मुंबई स्वयंपाकघरमधलं 'मुंबई' फक्त आता नावापुरतं राहिलंय आणि ग्रुपमध्ये जळगावपासून जर्मनीपर्यंत, आणि लोणीकंदपासून लखनौपर्यंत विविध जातधर्मप्रांताचे उत्साही लोक आहेत. ग्रुप आता नव्वद हजारांच्या सदस्यसंख्येकडे वाटचाल करतोय. आणि हे सगळं मॅनेज करणं हे एकटीचं कामच राहिलं नाही, त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून मला सागर दामले, अल्पना खंदारे, शुभांगी जोशी आणि स्नेहल बनसोडे-शेलुडकर (अस्मादिक) हेसुद्धा को-ॲडमिन म्हणून मदत करत आहेत."

किमची

किमची (फोटोश्रेय : उमा कुलकर्णी)

खाणं ही बहुतेकांची जिवाजवळची गोष्ट असल्याने लोकही आमच्या बहुतांश सगळ्या थीमना उत्तम प्रतिसाद देतात. भारतीय माणूस उत्सवप्रिय आणि समाजशील असल्याने, आणि चार लोकांना बोलावून खाऊ घालणे याला आपल्या संस्कृतीत महत्त्व असल्याने गेटटुगेदरच्या स्टार्टर्सपासून गणेशोत्सवाच्या मेन्यू प्लॅनिंगपर्यंत आणि सूप-सॅलड अशा डाएट रेसिप्यांपासून परदेशी डेलिकस्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीची ग्रुपवर तितक्याच उत्साहाने चर्चा होते. 'मुंबई स्वयंपाकघर'ने प्रांतीय पदार्थांची वैशिष्ट्ये सांगणारे अनेक फेसबुक लेखक घडविले असं म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. सगळ्यांची नावं घेणं अशक्य आहे पण मंगलोर किचन डायरीजमधून कर्नाटकातल्या दक्षिण कन्नडा जिल्ह्यातली, समुद्रकिनाऱ्यावरची हव्याका समाजाची अतिशय वेगळी खाद्यसंस्कृती उलगडून दाखविणारी आमची मैत्रीण साधना तिप्पनाकजे, 'या मंग जेवाले' म्हणत आलूवांग्याची भाजी, बिट्टी, बरबटीची उसळ खाऊ घालणारी गोवास्थित विदर्भकन्या सोनल गांवकर, 'वड्याचवड्या' हॅशटॅग जोरदार चालवत अनेकांना गूळपापडीच्या वड्यांपासून श्रीखंड वड्यांपर्यंत तरबेज करणारे वैभव भाल्डे, अंबिकाआज्जीच्या आणि येश्वदेच्या तहानलाडू-भूकलाडूपासून राजगिऱ्याच्या गाठोड्यांपर्यंत भन्नाट मराठवाडी पाककृती सांगणारी माया ज्ञानेश, साबुदाण्याच्या खिचडीला हेल्दी पर्याय देणाऱ्या ज्वारीच्या खिचडीची लाट आणणारी मधुरा गानू, अलवरच्या मिल्ककेकपासून 'खुरचन की बर्फी'पर्यंत प्रत्येक भारतीय पदार्थांचे कूळ, मूळ, तो उत्तम बनावा यासाठीच्या टिप्स आणि त्या पाठीमागचं विज्ञान 'in search of Indian Sweets ' या सदरातून देणारा आमचा मित्र शेफ इंजिनिअर सागर दामले, बालपणीच्या कोकणच्या आठवणीत रमलेल्या आणि सासरच्या पंढरपुरी संस्कृतीत दुधात साखर विरघळावी तसं विरघळून गेलेल्या आणि प्रत्येक गोष्ट अतिशय नजाकतीने, सौंदर्य जपत करणाऱ्या शुभांगीताई जोशींची पंढरपूरची बाजार आमटी ते उंडेऱ्याची खीर, मराठवाड्याची लेक आणि पंजाबची सून असलेल्या अल्पना खंदारेची ऑथेंटिक पंजाबी घरातली मुंगी मसर की दाल, शलगम की सब्जी हे सगळे पदार्थ आणि इतरही अनेकांची लेखणी तुम्हाला वारंवार 'मुंबई स्वयंपाकघर'कडे वळवेलच वळवेल.

चिरोटे

चिरोटे (फोटोश्रेय : सागर दामले)

या ग्रुपवर गेली चार-पाच वर्षं मी को-ॲडमिन म्हणून मी काम करतेय. एक पत्रकार, खाद्य व्यावसायिक आणि उदारमतवादी व्यक्ती म्हणून या ग्रुपची मला सगळ्यात भावणारी गोष्ट म्हणजे 'मुंबई स्वयंपाकघर' हा ग्रुप खाद्यसंस्कृती जपणारा, त्याविषयी अगदी मनापासून चर्चा करणारा तर आहेच, पण त्याहीपलीकडे स्वयंपाक या गोष्टीकडे आम्ही फार प्रगल्भपणे आणि विचारपूर्वक आचरणात आणायची गोष्ट म्हणून बघतो. शिवाय अत्यंत उदारमतवादी आणि प्रागतिक विचारसरणी ठेवून ॲडमिन्ससह बहुतांश सदस्य इथे वावरतात, याचा मला विशेष आनंद आहे. म्हणजे इथं वर उल्लेख केला तसं स्वयंपाक म्हणजे स्त्रियांचंच कार्यक्षेत्र, पुरुषांना त्यातलं काय कळतं? किंवा "अगं बाई, तुझा नवरा भांडीपण घासतो! पुऱ्या तळून पोरांचा डबा भरून देतो. तुला गिल्ट येत नाही का?" असल्या गोष्टींना आम्ही ॲडमिन्सच काय, मेंबर्सही सहज उडवून लावतील इतकी स्वयंपाककला हे अत्यावश्यक जीवनकौशल्य आणि आनंद देणारी क्रिया आहे हे आम्ही मानतो. किंवा या ग्रुपवर "पाळी असताना नैवेद्याचा स्वयंपाक केला असशील म्हणून पुरणपोळ्या फसल्या" किंवा दर दिवाळीच्या काळात व्हॉटसअप युनिव्हर्सिटीवर पाठवलं जाणारं तळण आणि भरतीओहोटीच्या वेळांचं वेळापत्रक वगैरे अशास्त्रीय गोष्टींना पोस्टच काय, कमेंटमध्येही थारा नसतो. आम्ही अंधश्रद्धांना प्रोत्साहन देत नाही, पाळीचा विटाळ मानत नाही, किंवा "अधिक मासाच्या काळात तुम्हाला किंवा जावयाला आवडतात, वेळ-ताकद आहे म्हणून अनारसे जरूर करा, जावईच काय, सुना-लेकींनाही खिलवा पण प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन किंवा आर्थिक ताकद असतानादेखील जावयाचा मान म्हणून त्याचे पाय धुणं, चांदीचे ताट-निरांजन देणं यांसारखे हुंडासदृश प्रथांना प्रोत्साहन देणारे प्रकार टाळा," हे ॲडमिन म्हणून आम्ही आवर्जून लिहू शकतो आणि आमच्या सजग सदस्यांचा आम्हांला पाठिंबाही मिळतो, याचा सर्वाधिक आनंद आहे.

मुंबई स्वयंपाकघर ग्रुपचं आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे सामाजिक भान जपण्याचा आमचा प्रयत्न. कोव्हिडकाळात आम्ही 'संपर्क' या संस्थेसोबत 'माता बाल पोषणाची शिदोरी' हा अभिनव उपक्रम केला. आपल्या अंगणवाड्यांमध्ये बालकांना आणि गर्भवती तसेच नवजात मातांना ताजा पोषक आहार शिजवून दिला जातो, पण कोव्हिडकाळात हे शक्य नव्हते तेव्हा घरपोच मिळणाऱ्या मोजक्या कोरड्या शिध्यातून भरपूर पोषणमूल्ये मिळतील असे कोणते पदार्थ आपण बनवू शकतो, हे आम्ही ग्रुप सदस्यांना विचारले. त्याचे व्हिडिओज तयार केले आणि त्या पदार्थातून मिळणारी प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे आहारतज्ज्ञांकडून जाणून घेऊन त्यांचाही समावेश व्हिडिओत केला. याच काळात आम्ही कमी आणि स्वस्त घटक पदार्थांतून जास्तीत जास्त पोषण देणाऱ्या रेसिपीजची पोषक पाककृती स्पर्धाही घेतली. या सगळ्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि संपर्क संस्थेच्या माध्यमातून त्या काळात या रेसिपीज प्रत्यक्ष फील्डवर काम करणाऱ्या अंगणवाडी तायांपर्यंतही पोहोचल्या. आमच्या ग्रुपवर एका वर्षी आम्ही एक मे या कामगार दिनाच्या निमित्तानं कष्टकरी महाराष्ट्र / कामगारांचं खाणं ही थीमसुद्धा घेतली होती. मुंबई स्वयंपाकघरचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गेल्या तीन-चार वर्षांपासून आम्ही चालवत असलेली 'बझार' ही थीम. खाद्यपदार्थांच्या ग्रुपवर अर्थातच खाद्य व्यावसायिकही असतात, त्यांना आपल्या व्यवसायाची जाहिरात करायची असते. जनरली फेसबुकवर जाहिरात करण्यासाठी ग्रुप ॲडमिन्स आपल्या ग्रुपसाठी काहीतरी विशिष्ट रक्कम आकारतात. पण मुंबई स्वयंपाकघर ग्रुपचं वैशिष्ट्य आणि त्यातही भक्ती चपळगांवकरचं कौतुक यासाठी की आम्ही बिझनेस प्रमोशनसाठी आजवर एकदाही 'मुंबई स्वयंपाकघर' ग्रुप किंवा आम्हांला वैयक्तिक देणगी कधीही स्वीकारलेली नाही. उलट सामाजिक उपक्रमांना मदत करून त्याची पावती दाखवून मुंबई स्वयंपाकघरवर व्यावसायिकांना जाहिरात करता येते. त्यात छत्रपती संभाजीनगरची साकार संस्था, मुंबईची संपर्क संस्था किंवा टाटा मेमोरियल ट्रस्ट, मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांना आजवर मदत दिलेली आहे.

सर्वसामान्य स्त्री आणि पुरुष सदस्यांना आपल्या मनातली दुखरी नस आणि त्या वेळचा तात्पुरता अथवा दीर्घकाळ सापडलेला उपाय असा स्वयंपाकघरापेक्षाही वेगळा विषय असलेली 'सुकून' ही थीमसुद्धा मुंबई स्वयंपाकघरवर अतिशय गाजली. त्यात बहुतांश स्त्रियांनी स्वयंपाकघर, सातत्याने बायकांकडून केली जाणारी अपेक्षा, सतत राबल्याने शरीर-मनावर होणारे दुष्परिणाम, स्वत:ला आणि आपल्या आरोग्याला प्राधान्य द्यायला हवं, याची झालेली जाणीव, सुपरवुमनपणा बाजूला ठेवण्याची, घरातील सदस्यांना सर्व प्रकारच्या घरकामात मदतीला सोबत घ्यायची निकड, वेळेच्या नियोजनाचे आणि कधीकधी कसलेच नियोजन न करता शांतपणे आराम करण्याचे महत्त्व अशा अनेक बाबींवर, वैयक्तिक अनुभवांवर या 'सुकून' हॅशटॅगखाली लिहिले.

हे सगळं वाचून तुम्हांला हे फार गुडी-गुडी आणि सगळं चांगलंच आहे, असं वाटत असेल कदाचित. पण तसं नाही, इतर ऑनलाईन कम्युनिट्यांपेक्षाही अनेक मोठी आव्हानं आमच्यासमोरही आहेत आणि उदारमतवादी विचारसरणीमुळे तर ती जरा जास्तच आहेत. २०२४ सालीच याचा डोक्याला प्रचंड त्रास देणारा अनुभव आम्ही 'रमजान' थीमच्या निमित्ताने घेतला. रमजानच्या महिन्यानिमित्त सूर्योदयाआधीच्या सेहरीचे आणि संध्याकाळच्या इफ्तारीचे कोणते पदार्थ मुस्लिमांच्या घरोघरी बनवले जातात, सेहरीचे पदार्थ जे त्यांना रोजा पाळताना ताकद देतात, भूक लागू देत नाहीत त्यांच्या रेसिपी मुस्लिम आणि इतर मेंबर्सनी शेअर कराव्यात, असं आवाहन आम्ही केलं.‌ सोबतच इफ्तारीसाठी गजबजणाऱ्या तुमच्या गावातल्या वा शहरातल्या प्रसिद्ध खाऊगल्ल्या कोणत्या, तिथले अनुभव, न चुकवण्यासारखे पदार्थ आणि एकूणच ईदनिमित्त केलेल्या खानपानाच्या निमित्तानं वाढणारं सौहार्द, याविषयी व्यक्त व्हा असं लिहिलं. या पोस्टनंतर एखादीच रात्र बरी गेली असेल. दुसऱ्या दिवशी ग्रुपच्या एका सक्रिय सदस्येनं 'माखंडी हलवा' ही साजूक तुपातली, मुस्लिम पद्धतीच्या शिऱ्याची रेसिपी शेअर केली, इतरही लोक वेगवेगळ्या रेसिप्या रमजाननिमित्ताने शेअर करू लागले. त्यानंतर त्या सदस्येवर आणि ग्रुप ॲडमिन म्हणून आमच्यावर कट्टर लोकांची ट्रोलधाडच चालून आली, ''त्यांचे' सण का प्रमोट करता', 'एवढीच हौस असेल तर लांड्यांचा जावई करून घ्या', 'मशिदीत जाऊन नमाज पढा' वगैरे वगैरे गोष्टींनी आमचं आणि त्या सदस्येचं प्रचंड ट्रोलिंग सुरू झालं. सगळ्याचे स्क्रीनशॉट सांभाळत, विखारी कमेंट उडवत, कट्टर लोकांना ग्रुप प्रवेश नाकारत, घाबरलेल्या सदस्यांना धीर देत अशी आमची तारेवरची कसरत सुरू होती. या काळात अनेक सुज्ञ सदस्यांनी आम्हांला पाठिंबा दिला, कारण त्यांना माहीत होतं की आपल्या ग्रुपवर गजानन महाराज प्रकटदिनाचा नैवेद्य आणि श्रावणातल्या पुरणपोळ्या, कटाची आमटी याचीही तितक्याच उत्साहाने चर्चा होते. पण काही सदस्यांना जास्त विखारी ट्रोलिंग झाल्याने आम्ही थीम मागे घेतली, पण रेसिप्यांचं शेअरिंग मात्र चालूच ठेवलं. अनेकांनी अगदी गुरुवारच्या नैवेद्याला आपली गंगा-जमनी तहजीब सांभाळत माखंडी हलवा केला, तर बहुतेकींनी या ट्रोल धाडीला उत्तर देत, "आमच्या स्वयंपाकघरात राजकारण आणू नका" असं म्हणत, बायकांनी बायकांच्याच पाठीशी उभं राहण्यासाठी हा हलवा केला. अनेकांनी आम्हांलाही कमेंट-पोस्टमधून, प्रत्यक्ष फोन करून आधार दिला. लोकसत्तासारख्या वृत्तपत्रानं '...तो सूर बने हमारा!' हा खाद्यसंस्कृतीच्या देवाणघेवाणीचे महत्त्व अधोरेखित करत, मुंबई स्वयंपाकघरचे कौतुक करत अग्रलेख लिहिला. या सगळ्या प्रसंगातून आम्ही तावून सुलाखून बाहेर पडलेलो आहोत.

मुंबई स्वयंपाकघरचा आणखी एक महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणजे २०२३ साली मुंबईतल्या मुलुंडमध्ये भरवलेलं 'सुगी द विंटर फेस्टिव्हल' हे प्रदर्शन. हिवाळ्यातला हुरडा, बोरं, पेरू असा रानमेवा, मुंबई स्वयंपाकघर ग्रुपमध्ये जमलेल्या खाद्य व्यावसायिकांचं सशक्त नेटवर्क, याशिवाय उत्तम प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू, दागिने, वस्त्रंप्रावरणं विकणाऱ्या व्यावसायिकांचा एकदिवसीय मेळा गेल्या वर्षी ३ डिसेंबर २०२३ रोजी आम्ही घेतला. संपर्क, मुलुंडची महाराष्ट्र सेवा संघ ही संस्था आणि खुद्द 'मुंबई स्वयंपाकघर' यांच्या संयुक्त विद्यमानं झालेल्या या सुगी महोत्सवाला आमच्या कल्पनेच्या पलीकडे प्रतिसाद मिळाला. यासोबतच आम्ही त्या दिवशी पाककला स्पर्धा आणि 'दीड शतकाचं मेन्यूकार्ड – इतिहासातलं आणि साहित्यातलं!' हा परिसंवादही घेतला.

सुगी महोत्सवाच फ्लायर

यात खाद्याभ्यासकचिन्मय दामले आणि लेखिका मेघना भुस्कुटे यांना बोलतं केलं ते भक्ती चपळगांवकर हिनं. या प्रदर्शनातील व्यावसायिक, खाद्यरसिक, स्पर्धक, प्रेक्षक, खरेदीला आलेले मुंबई स्वयंपाकघर सदस्य यांपैकी प्रत्येक जण या सुगी फेस्टिव्हलवर बेहद्द खुश होतं. व्यावसायिकांचा उत्तम व्यवसाय झाला होता, तर रसिकांना चविष्ट पदार्थ खायला आणि समृद्ध करणारी चर्चा ऐकायला मिळाली. मात्र अशा प्रकारचे प्रदर्शन करताना ॲडमिन म्हणून आमचा मात्र कस लागला. व्यावसयिकांचे स्टॉल बुक करा, प्रायाेजक मिळवा, हिशोब ठेवा, कार्यक्रमांचं नियोजन, स्पर्धेची तयारी, उत्कृष्ट परिसंवादाची तयारी आणि नंतर पारितोषिक वितरण हे सगळंच आम्ही सर्व ॲडमिन-लोकांनी आणि मुंबई स्वयंपाकघरच्या काही हितचिंतकांनी मिळून केलं. या महोत्सवाला लोकांचा इतका उत्तम प्रतिसाद आहे, की यंदा किमान दोन दिवसांचं प्रदर्शन ठेवा अशी लोकांची मागणी आहे!

सुगी महोत्सव

सुगी महोत्सव - भक्ती चपळगांवकर आणि एक सहभागी.

बाकी नव्वदेक हजार जनतेला सोबत घेऊन ग्रुप चालवणं हे काही 'खायचं' काम नाही. ग्रुपवर वावरण्यासाठी नियम करणं, त्या नियमांत बसणाऱ्या पोस्ट मंजूर करणं, बसत नसल्यास बहुतांश वेळा कारणांसह पोस्ट नाकारणं, आमची पोस्ट का घेत नाही, असा रडका सूर लावणाऱ्यांना कधी गोंजारणं, कधी कडक शब्दांत समज देणं, सुमारे दहा हजारांची वेटिंग लिस्ट असलेल्या लोकांना पारखून ग्रुप सदस्य बनवणं, बझारमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यावसायिकांना मार्गदर्शन करणं, त्यांनी दिलेल्या देणगीची खातरजमा करून त्यांना प्रमोशनल पोस्ट करू देणं, कमेंटमध्ये कोणी धिंगाणा तर घालत नाहीये ना, ट्रोल तर करत नाहीये ना हे सातत्याने पाहत राहणं आणि हे सगळं बिनपगारी, आपापलं काम सांभाळून करणं, ही सोपी गोष्ट नाही. भविष्याचं माहिती नाही, पण सध्या तरी मजा येतेय. हे महत्त्वाचं.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ग्रूपचे नियम अटी उद्देश बनवणे गरजेचं असतं. पण एकूण फेसबूक ग्रूप कंटाळवाणा प्रकार होऊ शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0