सोशल मिडीयावरील माझा मैत्र परिवार

#संकल्पनाविषयक #समाजमाध्यम #ललित #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२४

सोशल मिडीयावरील माझा मैत्र परिवार
- मंजुषा देशपांडे

मी फेसबुकवर अधूनमधून काहीबाही लिहीत असल्यामुळे आणि इतरांच्या आवडलेल्या पोस्टवर काही प्रतिक्रिया देत असल्यामुळे त्यातले काही जण माझे छान मित्रमैत्रिणी बनलेले आहेत. अधूनमधून फेसबुकवर आम्ही इतर विषयांवरही गप्पा मारतो. आता तर फोन नंबरही एकमेकांना दिलेले आहेत. पण मी अजून त्यांपैकी कोणालाही प्रत्यक्ष भेटलेले मात्र नाही. पण त्यांच्याशी बोलताना हे आपले कधीही न भेटलेले स्नेही आहेत असे अजिबात जाणवत मात्र नाही.

आज जे मला ज्यांच्याबद्दल सांगायचे आहे, तो मैत्र परिवार मला मिळाला तो म्हणजे साधारण २००८चा सुमार असेल. त्या वेळी मला माझ्या याहू मेलवर रायपूरच्या दीपेश परमार यांची फ्रेंड रिक्वेस्ट आली. खरे सांगायचे तर त्या वेळी माझी मनःस्थिती फारच वाईट होती. माझी अगदी जवळची मैत्रीण, आमच्यातली मैत्री अगदी खरोखरच तुटली. माझ्या आयुष्यातल्या अगदी बिकट काळात ती माझ्यासाठी खंबीरपणे उभी होती. आज या, सामाजिक विकास क्षेत्रात मी जे काही करू शकते आहे, त्याचा संकल्पनात्मक आणि तात्त्विक विचार आणि अभ्यास करण्याची सवय तिनेच मला लावली. पण काही कारणाने आमच्यातली मैत्री संपली. मी भावनिकदृष्ट्या तिच्यावर फारच अवलंबून असल्यामुळे, त्या वेळी माझ्या आयुष्यात एक भयंकर पोकळी निर्माण झाली. मला त्या वेळी प्रचंड एकटेपण आलेले होते.

अगोदरच मला पटकन कुणाशी मैत्री करता येत नाही. मला पाहून माझ्याशी कोणी सहज मैत्री करत नाही. शाळा कॉलेजमध्येही मी कधीही कोणत्या ग्रूपचा भाग नव्हते. तरीही मैत्रीच्या बाबतीत मी भाग्यवान आहे असे मला वाटते कारण अनेकदा एखादी कोणी तरी आणि बहुधा वर्गातली एखादी हरहुन्नरी मुलगी माझ्याशी मैत्रीचा हात पुढे करायची. मग हळूहळू ती मैत्री वाढत जायची. आणि पुढे घट्ट मैत्रीही व्हायची. तशा माझ्या बऱ्याच मैत्र्या अजूनही टिकलेल्या आहेत. पण त्या काळात, माझ्या त्या सर्व मैत्रिणी आपापल्या संसारातल्या जबाबदाऱ्या निभावण्यात व्यग्र होत्या. त्यामुळे दीपेश परमार या मला अनोळखी असलेल्या माणसाची फ्रेंड रिक्वेस्ट मी स्वीकारली. मला ऑनलाईन मैत्र्यांमधील फसवणुकीबद्दल माहीत नव्हते असे नाही; पण मी काही त्यावेळी अगदी तरुण नव्हते आणि तसे काही विचित्र वाटले तर सरळ त्या व्यक्तीला ब्लॉक करायचे एवढाच विचार मी त्या वेळी केला होता.

हा दीपेश नामक माणूस साधारण पस्तिशीचा, कुठल्या तरी स्थानिक, बहुधा रायपूर स्टेट बँकेत काम करत असलेला रायपूरचाच तरुण होता. फावल्या वेळात त्याने मला ती रिक्वेस्ट पाठवली होती. ऑनलाईन मैत्रीचा तो त्याचाही पहिलाच प्रयत्न होता. हा मारवाडी कुटुंबातला मुलगा. त्याचे तसे वयाच्या मानाने लवकर लग्न झालेले होते. त्याला दोन मुली होत्या. पण त्यांच्या एकत्र कुटुंबात बाकीच्यांना आणि मुलांना सांभाळून त्याच्या बायकोला त्याच्यासाठी अजिबात वेळ नसायचा. त्यात त्याची बदली कुठल्या तरी अगदी लहान खेड्यात झाली आणि तिथे तो एकटाच राहायला लागला.

कोणत्या तरी मित्राच्या सांगण्यावरून त्याने इमेलवर एक random friend request पाठवली आणि नेमकी ती, मी स्वीकारली. मग एका रात्री साधारण नऊ वाजता आमचे बोलणे सुरू झाले. त्याने प्रथम मला विचारले, "तुम पैसे-वैसे तो नही मांगते हो ना?" मी म्हणाले, "नही". तो 'आप' म्हणाला नव्हता; तिथेच माझ्या मनात एक ओरखडा उमटला. मी काहीच बोलले नाही, म्हणजे लिहिले नाही.

त्यावर तो म्हणाला, "आप कोई गलत काम करनेवालों में से तो नही ना, अच्छे घर की महिला ऑनलाईन फ्रेंडशिप नही करती." अर्थातच मला राग आला आणि मी म्हणाले, "अगर आप को ऐसा लगता है तो आप ने किसी अनजान महिला को फ्रेंडशिप रिक्वेस्ट क्यो भेजी?" यावर तो म्हणाला, "क्या करे यार, अकेलेपन खाये जा रहा है..." आणि त्याने त्याची रामकहाणी मला सांगितली.

बहुतेक त्याच्या शेजारी बसून त्याला कुणीतरी सांगत असल्याप्रमाणे त्याने मला माझे वय आणि वैवाहिक स्थिती विचारली आणि मी काहीही उत्तर न देता सरळ कंप्युटर बंद केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने मला एक भली मोठी मेल पाठवून त्यात 'तो कसा खरोखरच चांगला माणूस आहे आणि त्याला नव्या माणसांच्या, विशेषतः स्त्रियांच्या ओळखी करून घ्यायला आवडतात; आणि त्याचा हेतू कसा पाक आहे', हे त्याने त्या मेलमध्ये पुन्हा पुन्हा पटवून सांगितले. त्या काळात संध्याकाळी तसंही माझ्याकडे काही करण्यासारखे नसे. मी त्याच्याशी मैत्री करायला होकार दिला. सुरुवातीला इतक्या अनोळखी आणि अनभिज्ञ असलेल्या माणसाशी काय बोलावे, हे आम्हांला दोघांनाही कळत नसे. पण जगात कुठे तरी त्या वेळी आपल्याशी बोलायला कोणी आहे, या विचारांनी संभाषणातील मोकळ्या जागाही भरल्या जात असाव्यात.

आमचे बोलणे सुरू झाल्यानंतरच्या काळात त्याने एकदा, मला असे परक्या पुरुषाशी, रात्री (म्हणजे नऊ वाजता,) बोलण्याचा संकोच वाटत नाही का, असे विशिष्ट घोगऱ्या आवाजात विचारले. मी अर्थातच स्वच्छ नाही म्हणाले. त्या बाब्याला शाळा-कॉलेजातही कधी मैत्रीणही नव्हती. त्याला त्याच्या बायकोशीही काय बोलावे हे त्याला समजत नसे. याशिवाय बायकोशी उगीच गप्पा मारायची काय गरज आहे, असेही त्याला वाटायचे. (तसे केल्यास बायका डोक्यावर चढून बसतात असेही त्याचे मत होते!)

त्यामुळेही (आणि इकडचे तिकडचे ऐकूनही असेल कदाचित) न पाहिलेल्या बाईशी बोलण्याचे त्याला एक थ्रिल होते. तो मला माझा फोटो पाठवायचा आग्रह करायचा. पण मी त्याला कधीच दाद दिली नाही. माझ्याकडे काहीतरी मागणी केल्यास मी त्याच्याशी बोलणे बंद करीन, असाही त्याला धाक होता.

आम्ही हळूहळू एकमेकांना रुळलो. दिवसभरात घडलेल्या गोष्टी एकमेकांना सांगू लागलो. याहू मेसेंजरवर वाट पाहू लागलो. तो त्याची बायको, मुली, आणि त्याचे कुटुंब यांच्याबद्दल भरभरून बोलायचा. माझ्याकडे व्यक्तिगत सांगण्यासारखे काही नसले तरी माझ्याकडे दिवसभरात घडलेल्या गोष्टीचा भरपूर ऐवज असे. मी वाचलेल्या कथा, लेख याबद्दलही मी त्याला सांगत असे. मी पाहिलेल्या सिनेमांबद्दल, ठिकाणांबद्दल बोलत असे. हळूहळू आम्ही फोनवरही बोलायला लागलो. मी बोलत असताना त्याला न पाहताही त्याचे विस्फारलेले डोळे मला दिसत असत.

हिंदी घेऊन कसेबसे बी. ए. झालेल्या त्या बाबाला वशिला न लावता बँकेची नोकरी मिळाली होती; त्याचा त्याला सार्थ अभिमान होता. त्याचे वडील आणि भाऊ स्क्रॅपच्या व्यवसायात जम बसवू पाहत होते. हा मुलगा घरच्या धंद्यात मदत न करता नोकरी करतो आहे याचा त्यांना राग होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबात राहत असलेल्या त्याच्या पत्नीला त्याचा त्रास व्हायचा. त्या मुलाला त्याची जाणीव होती.

त्यामुळे तो प्रत्येक वेळी घरी जाताना बायकोची खास आवडती मिठाई, तिच्यासाठी कधीतरी बांगड्या, कानातली असे काहीतरी घेऊन जायचा. घरात त्याच्या बहिणी होत्या त्यामुळे त्याच्या खास भेटी लपवताना बायकोची तारांबळ उडे. कधी तरी त्याची बायको बाहेर कुठे तरी जाऊन त्याला फोन करायची. त्या वेळी ती फक्त "घर कब आ रहे हो?" एवढे विचारायची. तेवढ्यानेही तो पठ्ठ्या त्या दिवशी आनंदात असायचा. त्याचा आवाज छान होता. अधून मधून तो गाण्याच्या लकेरी मारी. नोकरी करण्याच्या अगोदर त्याला त्यांच्या समाजातल्या कार्यक्रमात गाण्यासाठी बोलवत. अनेक सार्वजनिक उत्सवातही तो गाणे गायला जायचा.

पण नोकरी लागल्यानंतर गाणे जवळपास बंदच झाले. त्याचा आवाज आणि गाणी म्हणण्याची धाटणी चांगली असली तरी त्याने गाणे शिकावे असे त्याला आणि घरच्यांनाही अजिबात वाटत नसे. त्याला स्वैपाकही चांगला करता येई. आईचे कष्ट कमी व्हावे म्हणून तो घरी असताना रोज रोट्या भाजायचेही काम करी. पण बायकोला घरकामात मदत करायची त्याची हिंमत नव्हती. "समाज मे लोग क्या कहेंगे?" असे तो म्हणत असे. त्यांच्या समाजाची त्याला खरोखरच भीती होती.

'तो असे परक्या बाईशी तासन्‌तास बोलतो याबद्दल समाज काही म्हणत नाही का'; असे मी त्याला विचारले. "अगर पता चला तो बोलेंगे ना !" असे तो म्हणाला. पण तसंही पुरुषांना फार काळ कुणी टोचत नाही याची त्याला खात्री होती.

एकंदरीत तो मुलगा भला होता. त्याने त्याच्या बायकोशी कशी मैत्री केली पाहिजे, तिच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या पाहिजेत असे मी त्याला सारखे सांगत असे. त्यावर "ऐसा भी होता है क्या!" असे तो आश्चर्याने विचारायचा. पण त्यालाही ते पटायचे. त्या काळात एकदा एका सुट्टीत तो घरी जाऊन आला आणि त्याला त्याच्या बायकोला गुलजार आणि किशोर कुमारची गाणी खूप आवडतात, असा शोध लागला. मग मी आणि त्याने मिळून त्यांच्या गाण्यांची एक यादी तयार केली. त्याने तिच्या वाढदिवसाला त्या सगळ्या गाण्यांची सीडी भेट द्यायची ठरवले.

गंमत म्हणजे लग्नाला दहा वर्षे झाल्यानंतर तो बायकोला एकटीला घेऊन गावाबाहेरच्या एका मंदिरात फिरायला गेला आणि त्याने बायकोला ती सगळी गाणी त्याच्या आवाजात म्हणून दाखवली. हळूहळू त्याच्या बायकोचे फोन वाढायला लागले त्याची बायकोही कधीकधी त्याच्या नोकरीच्या ठिकाणी त्याच्याकडे राहायला येऊ लागली. त्यांचा संसार खऱ्या अर्थाने सुरू झाला. त्याने त्याच्या बायकोशी माझी ओळख करून दिली. पण हळूहळू माझ्याशी त्याचा संवाद कमी झाला. पण अजूनही वाढदिवस, दिवाळी, संक्रांत, नववर्ष अशा निमित्ताने तो आवर्जून फोन करतो. त्याच्या मुलींच्या लग्नाच्या पत्रिकाही त्याने मला धाडल्या. तो यथावकाश नोकरी सोडून त्याच्या वडिलांच्या व्यवसायात उतरला आणि एके काळी अगदी भाबडा असलेला दीपेश आता एक बडा असामी बनलेला आहे. ही मैत्री केवळ ऑनलाईन होती म्हणूनच झाली. इतक्या विरुद्ध व्यक्तिमत्वाच्या माणसाशी एरवी माझी मैत्री झालीच नसती.


समाजमाध्यम जोडण्या

त्या मैत्रीने माझे एकटेपण काही संपले नव्हते पण त्यानंतर मी मेलवर आलेल्या अशा कोणत्याही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्या नाहीत. हळूहळू माझे कामही वाढत होते. झारखंडला एका प्रकल्पात काम करत असताना माझ्याबरोबर आणंदच्या 'रुरल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट'मधून एमबीए झालेली बरीच तरुण मुले होती. मी एकटीच त्यांच्यात बुजुर्ग होते. दिवसभर काम झाले की आम्ही रात्री एकत्र गप्पा मारत असू. त्यांतल्या बहुतेकांची लग्नेही झाली होती. त्यांच्यातला एक मुकेश यादव नावाचा एक मुलगा आमच्या ग्रूपमध्ये होता. त्याचे आणि माझे फार छान जमायचे. आम्ही दोघेही आपापल्या रुममध्ये बऱ्याच रात्री उशिरापर्यंत कामे करत असू. कधी पाय मोकळे करायला रुमच्या बाहेर आले तर आमची भेट होई. मग आम्ही एकत्र कॉफी पीत असू. एकदा त्याने मला विचारले, "आप को कोई फ्रेंड नाही है क्या... आपको कभी किसी का फोन नही आता?" मी काहीच बोलले नाही. तो म्हणाला, "अरे, मंजूषाजी मेरे भी कोई खास फ्रेंड्स नही है, लेकिन मेरे पास एक नुस्खा है!"

त्या मुकेशला सख्खी आई नव्हती आणि त्याच्या बाबूजींनी दोन मुले असलेल्या एका बाईशी दुसरे लग्न केलेले होते त्यामुळे त्याचे घरच्यांशी फार जमत नसे. तसा तो एकलकोंडाच मुलगा होता. पण अतिशय भावनिक होता. त्याच्या कविता म्हणजे त्याच्या मित्रांच्या चेष्टेचा विषय होता.

त्याचा नुस्खा म्हणजे 'फ्रॉपर डॉट कॉम' ही वेबसाईट. एक दिवस त्याने मला सांगितले, त्या साईटवर भेटलेल्या गोव्याच्या एका मुलीशी त्याची छान मैत्री झालेली होती. ती मुलगी मुंबईला जे. जे. आर्ट्स कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. त्याने मला एकदा त्या मुलीची ओळखही करून दिली.

त्या दोघांनीही मला त्या फ्रॉपर साईटवर चांगले शिकलेले, चांगल्या पदावर काम करत असणारे लोक, चांगल्या मैत्रीच्या शोधात असतात असे खात्रीने सांगितले. फक्त त्यासाठी मला वेगळा मेल अकाऊंट काढावा लागेल असे मात्र निक्षून सांगितले. मला त्या वेळी त्यात काहीच रस वाटला नाही. पण आमचा प्रकल्प थोडा लांबला. बाकीची मुले त्यांचे काम झाले की परत जायची. काही नवीन यायचीही.

माझ्या बरोबरीचे कोणीच नव्हते. मग मी कधीतरी सहज म्हणून नवा इमेल अकाउंट काढला आणि फ्रॉपर वेबसाईट उघडली. तिथल्या प्रवेश फॉर्मवर आपले रंग, रूप, बांधा, आपली शैक्षणिक पात्रता, आपली वैवाहिक स्थिती आणि आपल्याला कशा आणि काय प्रकारची मैत्री हवी आहे, हे लिहायचे होते. मी तो फॉर्म अगदी काटेकोरपणे भरला होता.

मी त्या साईटवर लॉगिन केल्यावर सुरुवातीला तर मला कोणाचेही interests आलेच नाहीत. बराच वेळ वाट पाहिल्यावर एका दिल्लीस्थित डोळ्यांच्या डॉक्टरने माझ्याशी बोलण्याची तयारी दाखवली होती. त्याच्या सांगण्यावरून तो एक चांगला व्यवसाय असलेला मध्यमवयीन माणूस होता. पण त्याला त्याच्या आयुष्यातल्या एकसुरीपणाचा कंटाळा आलेला होता. त्याची बायकोही डॉक्टर होती. त्याला ऑनलाईन मैत्री सुरक्षित वाटायची. तो कोणत्याही एका मुलीशी फार काळ बोलत नसे. उगीच भावनिक गुंतवणूक करून बायकोच्या मनात संशय निर्माण करावा आणि त्यावरून संसारात वादळ निर्माण करावे, अशी त्याची मुळीच इच्छा नव्हती.

पण बायकोला कळू न देता फक्त बोलण्याच्या पातळीवर कोणत्याही थरापर्यंत मजा देण्याघेण्याची त्याची तयारी होती. त्याच्याशी संवाद करताना तो कोट्या करत बोले त्यामुळे मजा यायची पण त्याचे आणि माझे इंटरेस्टस् वेगवेगळे असल्याने आमची मैत्री अगदीच लवकर संपली.

फावल्या वेळात मीही लोकांच्या प्रोफाईल पाहत असायचे. मला एक 'बुलबुल ६४' नावाची, एका बाईची प्रोफाईल दिसली. त्या वेळी एका सेमिनारमध्ये रोहतकमधल्या एका इतिहासाच्या प्राध्यापिकेची माझी तोंडओळख झाली होती. ती वयाने माझ्याएवढीच असेल. ती छान आकर्षक राहाणारी आणि दिसणारी बाई होती. ती अगदी सहज सफाईदार, सुंदर इंग्रजी बोलायची. खरे तर माझ्या अगदी विरुद्ध तिचे व्यक्तिमत्त्व होते. तिच्या मैत्रिणी तिला बुलबुल म्हणत. त्या सेमिनारमध्ये माझ्याशी झालेली ओळख तिच्या फारशी लक्षातही नव्हती.

पण ती प्रोफाईल तिचीच होती. कारण तिनेही सरळपणाने तिची खरीच माहिती भरलेली होती. मी तिला पाठवलेली 'मैत्री विनंती' तिने स्वीकारली. माझी ओळख सांगितल्यावर तिला आश्चर्यच वाटले. कारण तिला म्हणे मी 'अशी ऑनलाईन मैत्री करणारी' तिच्या मते outgoing अशी अजिबात वाटलेली नव्हते. पण त्या रात्री तिला भयंकर कंटाळा आलेला होता आणि कुणाशी तरी बोलावेसे वाटत होते. नेमकी तिला मी भेटले. ती घटस्फोटित होती.

तिची मुले दिल्लीला त्यांच्या वडिलांकडे राहायची. ती एकटीच राहायची. तिला बागकाम, घर सजवणे, मित्र-मैत्रिणींसोबत पार्ट्या करणे, ट्रेकिंगला जाणे, वाचणे, सिनेमे आणि नाटके पाहणे अशा अनेक गोष्टींत रस होता. तिचे आणि तिच्या गाईडचे काहीतरी अफेअर असल्याचा तिचा नवऱ्याला सतत संशय यायचा. रोजच्या भांडणांना कंटाळून तिने शेवटी घटस्फोट घ्यायचे ठरवले.

तिच्या माहेरी आणि सासरी प्रचंड सांस्कृतिक धक्का बसला. आणि तिच्यासाठी अक्षरशः दोन्ही घरे तुटली. दिवस कामात जायचा पण सुट्ट्या आणि रात्री खायला उठायच्या. नवरा होता तोपर्यंत मित्रमैत्रिणी घरी यायचे पण एकट्या बाईकडे कसे जावे, म्हणून लोक तिच्या घरी जायचे टाळत, त्यातून लहान गाव, कुटुंबे माहितीची. तिथे कुणाशी दोस्ती करणे तिला शक्यच नव्हते. त्यामुळे कोणीतरी, तात्पुरता का होईना दोस्त हवा, म्हणून तिने फ्रॉपरवर अकाऊंट उघडला होता. आम्ही रोज गप्पा मारायचो. फोनवरही बोलायचो.

तिला ऑनलाईन मैत्रीचा फारच आणि बराचसा वाईटच अनुभव होता. आमची छान वेव्हलेंग्थ जुळली. तिथेच तिला एक मराठी मुसलमान व्यावसायिक भेटला. तोही घटस्फोटित होता. त्याचा कापडाचा मोठा व्यवसाय होता. तिने त्या माणसाची माझ्याशीही ओळख करून दिली. त्यांची मैत्री प्रत्यक्ष भेट आणि लग्नापर्यंत पोचली. तिने तिची चांगली प्राध्यापिकेची नोकरी सोडून दिली आणि त्या माणसाशी लग्न करून ती अगदी बुरखा वगैरे घालून त्याच्या घरी राहते आहे. तिचा इतिहासाचा अभ्यास सोडून तिच्या बाकीच्या आवडींना त्या माणसाने न्याय दिला, असे ती म्हणत असते. तिच्या लग्नानंतर आमच्या रोजच्या गप्पा कमी झाल्या.

मग मला भेटली बिदरच्या एका शाळेतली मुख्याध्यापिका; ती होती हिंदू, तिने अगदी सोळा वर्षांची असताना एका ख्रिश्चन मुलाबरोबर पळून जाऊन लग्न केलेले होते. पण लग्नानंतर शिक्षण पूर्ण करून ती तिथल्याच एका खाजगी शाळेत शिकवायला लागली. तिला दोन मुले झाली. हळूहळू मुख्याध्यापिका झाली. तिचा संसार चांगला चालू होता पण नवऱ्याला दारूचे व्यसन जडले. त्यातच त्याचे यकृत खराब होऊन अगदी तरुण वयातच त्याचा मृत्यू झाला. ही मुलगी दिसायला सुरेख होती; आवाजही छान होता; गाणे उत्तम म्हणायची. नवऱ्याच्या पश्चात तिच्या गोव्याच्या सासरच्यांनी तिला भक्कम आर्थिक आधार दिला होता. पण तिला कोणी हिंदू साथीदार हवा होता. त्याच्याशी लग्न करायचे होते. तिच्या आजूबाजूच्या लोकांना तिच्याबद्दल आदर होता पण तिचे एकटेपण कोणाच्या लक्षात यायचे नाही.

ही मुलगीही कित्येकदा ऑनलाईन मैत्रीच्या जाळ्यात फसता फसता वाचलेली होती. पण वेळ चांगला जातो आणि न जाणो कधीतरी कोणी भला माणूस भेटेल, या आशेवर ती रात्रीचा बराचसा वेळ फ्रॉपरवर घालवायची. ती कोल्हापूरला आमच्या घरीही येऊन गेली. तिच्या आणि माझ्या गप्पा फार रंगत नसत. पण बरेचदा तीच बोलायची. तिची प्रेमकहाणी, तिची शाळा, आजूबाजूचे लोक, तिची मुले यांच्याबद्दल ती भरभरून सांगायची.
"मी कसे आकर्षक राहायला हवे", याबद्दल ती मला सतत सांगत असायची. काही टिप्स द्यायची. पण माझ्या इतर कोणत्याही विषयात तिला तसा फारसा रस नसायचा. अजूनही आम्ही संपर्कात आहोत. पण ती मैत्री नाही.

त्या दरम्यान मला त्याच ठिकाणी एक 'बंगाली बाबू' भेटला. तो बोलपूरचा होता आणि शांतिनिकेतनचा विद्यार्थी. तो 'रवींद्र संगीत' उत्तम म्हणायचा. संथाली लोकगीतांवर त्याचा अभ्यास आहे. तो त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. अगदी बाविसाव्या वर्षी 'न्यू इंडिया इन्शुरन्स' या कंपनीत ऑफिसर म्हणून रुजू झाला होता. आणि वर्षभरातच त्याच्या ऑफिसमधल्या एका सहकारी मुलीशी त्याचा प्रेमविवाह झाला. ती बिगर बंगाली मुलगी त्याच्या आईला अजिबात आवडली नाही. त्या मुलीला कंपनीत भराभर प्रमोशन्स मिळत होती आणि हा आपला जिथल्या तिथेच होता. त्यांना दोन मुले झाल्यानंतरही तिच्यासाठी सासूची कटकट कमी झाली नव्हती.

शेवटी त्या दोघांनी वेगळे व्हायचे ठरवले. त्यांचा घटस्फोट झाला. त्याच्या बायकोने ती नोकरीही सोडली. त्यानंतर त्याने कलकत्त्याहून मुंबईला बदली मागून घेतली. त्याच्या मुलांना सांभाळायला त्याचे आईवडील त्याच्या जवळ राहायला आले. हा बाबूही वेळ घालवायला फ्रॉपरवर तात्पुरती मैत्री शोधायचा. त्याच्या माँची त्याच्यावर कडी नजर असायची. त्यामुळे तो बोलता बोलता एकदम गायब व्हायचा. पहिल्या भेटीतच मी no Physical असे सांगून टाकायचे; त्यामुळे तशी गरज असलेले लोक मला सोडून जायचे. त्याने मात्र माझ्याशी बोलायला सुरुवात केली. अगोदरच बंगाली म्हणल्यावर माझे हृदय उडायला लागते; त्यात त्याला रवींद्र संगीत, साहित्य यात प्रचंड रुची. मी अगदी विद्यार्थिनीच झाले त्याची. आम्ही एरवीही वेळ मिळेल तशा गप्पा मारायचो. एक दिवस त्याचा फोन आला. त्यावर त्याची आई बोलत होती.

तिने मला रागवायलाच सुरुवात केली. ती म्हणत होती, "माझ्या मुलाचा नाद सोड; मला बंगाली बहू आणायची आहे." मी काहीच बोलत नाही असे पाहून मग तिने रडायला सुरुवात केली. त्या दिवशी ऑफिसला जाताना तो घरी फोन विसरला होता. त्यातल्या कॉल लिस्टमध्ये वारंवार येणारे माझे नाव पाहून तिने मला फोन करून झापले होते.

मी त्यानंतर त्याच्याशी संपर्क तोडून टाकला. त्याने मग मला एक दिवस आमच्या विद्यापीठात फोन केला. त्याला सगळे कळले होते. त्याने पुन्हा पुन्हा माफी मागितली. मी त्याच्या घराचा पत्ता मागितला. त्याला म्हणे माझ्याशी गप्पा मारायची इतकी सवय झाली होती. रोजचे बोलणे अचानक असे एकाएकी बंद झाल्यामुळे त्याला फारच त्रास झाला होता.

मी नेमकी त्याच्या पुढच्या आठवड्यात मुंबईला जाणारच होते. त्या वेळी मी त्याच्या घरी गेले. आम्ही एकमेकांना पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहत होतो. त्यालाही मला पाहून खरे तर धक्काच बसला असावा. त्याच्या घरी, त्याचे आई-वडीलही होते. त्याची आई म्हणजे अगदी टिपिकल बंगाली बाई होती, अगदी सिनेमात दाखवतात तशी लाल काठाची पांढरी साडी नेसलेली, लांब केस मोकळे सोडलेली तशाच त्या होत्या.

मी त्यांच्या घरी पोचले तेव्हा त्या पूजा करत होत्या. मला पाहिल्यावर मी त्यांच्या मुलाला नादाला लावणार नाही किंवा मी लावले तरी तो माझ्या नादाला लागणार नाही अशी त्यांना खात्रीच पटली. मी तो पूर्ण दिवस त्यांच्या घरी होते. यथावकाश त्यांच्या इच्छेनुसार त्या मुलाचे लग्न आईच्या पसंतीच्या बंगाली मुलीशी झाले आणि सर्व कुटुंब परत कलकत्त्याला गेले. आता माझा त्या कुटुंबाशी फारसा संपर्क नाही.

मी साधारण दोन-तीन वर्षे तरी त्या फ्रॉपरवर मैत्री शोधायचे. मला शारीरिक पातळीवर बोलायचे नाही म्हटल्यावर काही प्रामाणिक माणसे आपण होऊन माझ्या खिडकीतून निघून जात. काहीजण निव्वळ उत्सुकतेपोटी गप्पा मारत पण त्यांचे बोलणे शारीर पातळीवर यायचेच. वास्तविक मला काही तसे बोलण्याचे वावडे नव्हते. पण एकमेकांना जाणून न घेता सुरुवातीलाच तसे बोलणे सुरू झाले की मला प्रतिसादच देता यायचा नाही.

मला त्या काळात बरीच माणसे भेटली. त्यापैकी जवळपास प्रत्येकजण उच्चशिक्षित होते. प्रत्येकाला स्वत:चे कुटुंब होते. मित्रपरिवार होता. पण तरीही तात्पुरते का होईना पुरुषांना मैत्रिणी आणि बायकांना मित्र हवे होते. त्यांचे तसे सोशल मीडियावर मैत्री शोधण्याचा उद्देश म्हणजे फार पैसे किंवा इतर शक्ती न घालवता थोडक्या काळासाठी टाईमपास आणि थोडेसे थ्रिल एवढेच असायचे.

तसल्या डेटिंग साईटवर येणाऱ्या जवळ जवळ नव्वद टक्के माणसांना त्यांच्या संसारात अजिबात वादळे येऊ न देता, थोडा बाहेरख्यालीपणा आणि थोडासा रंगेलपणा करायचा असतो. कदाचित त्यामुळे त्यांच्या स्वत:च्या संसारात त्यांना नवा रंग भरता येत असेल. त्यामुळे बहुतेक माणसे स्वत:ची ओळख लपवून 'फेक प्रोफाइल' तयार करतात.

त्यांपैकी बहुतेक जण 'दोघांनीही अगदी तात्पुरती बोलण्याच्या पातळीवर मजा करावी', कधीतरी जमले तर भेटावे आणि विसरून जावे अशाच विचारांचे असतात. अर्थात हे मी प्रौढ लोकांच्या मैत्रीबद्दल म्हणते आहे. या साईटवर कायम टिकणारी मैत्री मिळणे आणि मिळवणेही अपेक्षितच नसते. त्यामुळे कुणाची मुद्दाम फसवणूक करावी असे बहुतेकांना वाटत तरी नाही. अर्थात त्यांच्यातले काहीजण आकर्षक व्यक्तिमत्त्वाने भुरळ पाडून मात्र मुद्दाम कुणाला तरी फशी पाडावे, जमले तर पैसे उकळावे अशा प्रकारचेही असतात.

बऱ्याच माणसांना भेटल्यावर हळूहळू मलाही त्या आभासी जगाचा कंटाळा यायला लागला. तरीही एकदा असाच कधीतरी कंटाळा आल्यानंतर, बरेच दिवसांनी मी कधीतरी परत एकदा तिथे लॉगिन केले. त्या वेळी मात्र मला माझ्यासारख्याच मैत्रीच्या अपेक्षा असलेला एक माणूस अखेरीस भेटला.

मी त्या माणसाच्या खरोखरीच प्रेमात पडले. तो म्हणजे गोव्यात राहणारा एक साधारण माझ्याच वयाचा केरळी माणूस होता. त्याच्या प्रोफाइलवर त्याचे फोटो होते. त्याने सर्व माहिती व्यवस्थित आणि खरी भरलेली होती. त्याने गणितात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले होते. मला आवडतील असे जवळजवळ सर्व गुण त्याच्याकडे होते. तो उत्तम चित्र काढायचा आणि गिटार वाजवायचा. त्याचे वडील नुकतेच गेलेले होते आणि त्याच्या आईशी त्याचे मुळीच पटायचे नाही. म्हणजे त्याला त्याची आई आवडायची पण तिला त्याचे काहीच पटायचे नाही. (हेही आमच्यातले एक साम्य होते.)

खरे तर त्याचे लग्नही झालेले होते, त्याला मुलगा होता. पण मुलगा बाहेर शिकत होता आणि बायको काही कारणाने त्याला सोडून गेलेली होती. त्याला जोडीदाराची गरज होती पण त्याचा घटस्फोट झालेला नव्हता. त्याने घटस्फोटासाठी बरेच प्रयत्न केले पण काही ना काही कारणामुळे तो लांबणीवर पडत गेलेला होता, असे त्याने सांगितले होते. त्याला विविध विषयांमधील खूप माहिती होती आणि बोलणेही गोड होते. तो संपूर्ण रात्रभरही गप्पा मारायचा.

पणजीच्या समुद्र किनाऱ्यालगत असलेले त्याचे घर... रात्रीच्या वेळचे त्याचे किनाऱ्यावर फिरणे. हे तो मला व्हिडिओ कॉलवर दाखवायचा. ते सगळे खरोखरच इतके स्वप्नवत होते की त्यापुढे, इतक्या रोमँटिक असलेल्या आणि सर्वगुणसंपन्न अशा त्या माणसाच्या आजपर्यंत कुणी प्रेमात कसे पडले नसेल, हा मी विचारही केला नाही. मला त्याच्याशी बोलणे बेहद आवडायचे. मी खरोखरच एकटी आहे आणि मला केवळ गप्पा मारू शकेल आणि बोलण्यातून भावनिक आधार हवा आहे यावर त्याने एकट्यानेच विश्वास ठेवला होता.

आमच्या कोल्हापूरपासून गोवा काही फार लांब नाही. एका कार्यशाळेच्या निमित्ताने मला त्या वेळी गोव्याला जायची संधी मिळाली. मला अगदी कधी एकदा त्याला भेटेन असे झाले होते. त्याने सांगितलेल्या ठिकाणी म्हणजे पणजीला एका कॉफी हाऊसमध्ये मी त्याला भेटले. तो खरोखरच दिसायला एकदम छान होता. त्याचे वागणे आदबशीर होते. त्याने माझ्यासाठी बऱ्याच भेटीही आणल्या होत्या. माझे हृदय तर वेगाने धडधडत होते.

माझ्यासाठीची कॉफी त्यानेच तयार केली होती. बिलही त्यानेच दिले. आणि मग त्याने मला माझ्या कामाच्या ठिकाणी सोडले. तो गाडीतून बाहेर उतरला. त्याचे दोन्ही हात त्याच्या खिशात होते. त्याने साधे माझ्याशी हस्तांदोलनही केले नाही. तो म्हणाला, "तू चांगली मुलगी आहेस, पण परत असे कधी कुणाला ओळखदेख नसताना भेटायला जाऊ नकोस." खरेच सांगते मला भयंकर अपमान वाटला. मला वाटले की मी त्याला माझ्या बाह्यरूपामुळे आवडले नाही आणि म्हणून तो तसे म्हणतोय. एवढ्या लवकर आमची भेट संपवतोय. माझे डोळे भरून आले होते. किती प्रयत्न केला तरी मला रडू आवरेना.

त्याने माझ्याकडे एकदा पाहिले आणि म्हणाला, "गाडीत बस." आम्ही पणजीच्या समुद्रकिनाऱ्याच्या जवळून, जिथे कॅसिनो पार्क आहेत, तिथे गेलो. तो माणूस तिथल्या एका कॅसिनोगृहाचा मालक होता. त्याच्याकडे अनेक सुंदर तरुण मुली नोकऱ्या करत. तो दिवसा झोपायचा आणि रात्री त्याचा व्यवसाय करायचा.

त्याचे बोलणे ऐकून माझे डोळेच पांढरे व्हायची वेळ आली. "बाप रे... कुठे फसत चालले होते मी!" माझ्या घशाला कोरड पडली. 'भूमी पोटात घेईल तर बरं...' असे वाटायला लागले होते. पण त्या माणसाने मला माझ्या कामाच्या ठिकाणी सुखरूप पोचवले.

त्यानंतर कितीतरी दिवस ते सगळे आठवून मला धडधडत असे. कदाचित माझ्या रूपामुळे, कदाचित भाबडेपणामुळे किंवा त्या माणसाच्या चांगुलपणामुळेही मी त्या संकटातून वाचले होते. पण त्यानंतर मात्र मी त्या फ्रॉपर साईटला मी कायमचा रामराम ठोकला. मी त्यावरच्या अनेक जणांशी बोलले होते. त्यापैकी कोणाकोणाचे खरोखरीचे काय व्यवसाय असतील देव जाणे, या विचारानेही कसेसेच व्हायचे.

आता मागे वळून पाहताना मला माझ्या धाडसाचे खूप आश्चर्य वाटते. आताही मी एकटीच आहे. मला त्याची इतकी सवय झाली आहे की कधी कधी जवळच्या लोकांबरोबर राहावे लागले तर माझ्या मूळ ढाच्यात काही प्रमुख बदल करावे लागतात असे वाटते. अर्थातच ती माझी निवड असते. पण कल्पनेत वाटते तेवढे एकटेपण अवघड नक्कीच नाही. त्यासाठी ऑनलाईन न पाहिलेल्या माणसांमध्ये मैत्री शोधणे हा तर पर्याय नक्कीच नाही.

या सर्वांतून एक प्रश्न उरतोच. अगदी अनोळखी माणसांबरोबर आपण एवढे कसे काय बोलायला लागतो. एकत्र हसायला लागतो. त्यांच्या आणि आपल्यात आपुलकीचा धागा लवकर निर्माण होतो. याची कारणे मला परवा डॉ. सिद्धार्थ वारीअर, या न्युरोफिजिसिस्टचे यूट्यूबवरील पॉडकास्ट ऐकताना अचानक कळली. रात्रीच्या शांत वेळी आपण जेव्हा न पाहिलेल्या माणसाशी बोलतो त्या वेळी आपले 'डोपामाईन आणि ॲड्रिनलिन' हे हार्मोन्स जागे होतात आणि तारतम्याने विचार करणाऱ्या सेराटोनिन या हार्मोन्सचे प्रमाण कमी होते. पलीकडच्या व्यक्तीबद्दल आपल्याला आपल्या नकळत आपुलकी/ आकर्षण वाटायला लागते असे त्यांचे म्हणणे होते. कदाचित हळूहळू त्या 'किक'चे व्यसनही लागत असेल.

मला त्या आभासी जगात खूप लोक भेटले. वास्तविक त्यांना कुणालाच मला चांगले म्हणवत नाही. कारण माझ्याशी बोलत नसले तरी ते इतर बायकांशी/ त्यांच्याबाबत कसे बोलत असत हे मी ऐकलेले आहे. त्यापैकी बहुतेकांना 'स्त्री पुरुषांची निव्वळ आणि निखळ मैत्री' ही संकल्पनाच माहिती नव्हती. (निदान ते तसे सांगत.)

त्यांतले किती तरी जण रात्री दारू पिऊन बायकांशी ऑनलाईन का होईना, पण लगट करणारेही होते. अशा लोकांना मी थारा दिला नाही. पण मला जर एखाद्याची माहिती (खरीच असेल असे गृहीत धरून), माझ्या आवडीशी जुळणारी आहे असे वाटले तर मीच त्यांना मैत्री विनंती पाठवत असे. अशा लोकांना मी माझा फोन नंबरही खुशाल देऊन टाकायचे आणि आमचे बोलणे सुरू व्हायचे. त्यातले बरेच जण कसे कोण जाणे पण माझ्या अटीवर, माझ्याशी मैत्री करायला तयार झाले. मला माणसांचे अनेक प्रकारचे नमुने या निमित्ताने पाहायला आणि अनुभवायला मिळाले.

लग्नाच्या अगदी पाचव्या दिवशी बायकोला सोडून रियाधला नोकरीसाठी गेलेला मनू, बायकोला शेवटच्या स्टेजचा कॅन्सर आहे हे कळल्यामुळे वैफल्यग्रस्त असलेले कर्नल चौधरी, मेरठचे आर्किटेक्ट प्रदीपजी, व्यवसायात खोट आल्यामुळे घरात एकटे पडलेले उदयपूरचे किशोरजी, नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून शेवटी घर सोडून एकटी राहण्याने धाडस करणारी हैदराबदची विंध्या, कम्प्युटर्स आणि भरतनाट्यममध्ये पीएचडी असलेली प्राध्यापिका गोपा, भिलईचे व्हेटर्नरी डॉक्टर संजीव, नाशिकचे कापड व्यापारी झिया अन्सारी, ही माणसे खरोखरीच एकटी होती. त्यांना कुणाच्या तरी भावनिक आधाराची गरज होती.

माझ्या त्या नव्या मित्रमंडळीत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या विविध आर्थिक आणि सांस्कृतिक ठरतील मंडळींचाही समावेश आहे. या मंडळींपैकी काहींना मी प्रत्यक्ष भेटले. त्यांची कुटुंबेही मला भेटली. यापैकी काही लोक आमच्या घरीही येऊन गेले. हे सर्व जण अजूनही कधीतरी संपर्कात असतात. त्यांच्या मुलांच्या लग्नांच्या पत्रिका पाठवतात. त्यांतल्या काहींची तर मला अनेकदा अनोळखी गावात मदतही झालेली आहे.

मी एशियाटिक सोसायटीच्या 'स्थलांतरामुळे विसरलेले खाद्यपदार्थ' या प्रकल्पावर काम करत होते; तेव्हा मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या या आभासी मित्रमंडळींची खूप मोठी मदत झाली. तसेच २०१९ साली आमच्या कोल्हापुरात जेव्हा पूर आलेला होता, त्या वेळी त्या प्रत्येकांनी अगदी आवर्जून चौकशी केली. मला एकटे वाटू दिले नाही.

मी असे ऐकले होते, फ्रॉपरसारख्या डेटिंग वेबसाईटस या दलदलीसारख्या किंवा खरे तर कृष्णविवरासारख्या असतात. एकदा त्यात फसले की बाहेर पडणे मुश्कील. पण मी तशी फसले नाही कारण कदाचित त्या वेळी मी फार तरुण आणि भाबडी नव्हते. माझ्या अपेक्षा स्वच्छ होत्या. मी माझी खरी ओळख लपवून ठेवली नाही.

मला माझे फोटो मात्र अजिबात पाठवायला आवडायचे नाही किंवा मी व्हिडिओ कॉलवरही सहसा बोलायचे नाही. खरे तर मी रूपाने चांगली नाही. माझ्या एकूण हालचाली आणि माझे एकंदर वर्तन खरोखरच कुणालाही प्रथमदर्शनी आवडेल असे अजिबात नाही. पण मला न पाहता फक्त माझा आवाज फोनवर ऐकून माझ्याशी मला अगदीच अप्राप्य असणाऱ्या अनेक गुणवान लोकांनी माझ्याशी मैत्री केली आणि ती जेवढ्यास तेवढी या स्वरूपात दीर्घकाळ टिकूनही आहे.

फ्रॉपरवरच मैत्री झालेले आणि नंतर प्रत्यक्षातही मला भेटलेले एक धारवाडचे मानसशास्त्राचे प्राध्यापक मला म्हणाले होते, "फोनवर येणारा तुमचा आवाज वेगळा आणि आश्वासक आहे, त्यापुढे तुमच्या बाह्यरूपाकडे आपोआप दुर्लक्ष होते." त्यांनी पुढे मला सांगितले, माझे मन अतिशय तीक्ष्ण (sharp mind) आहे, त्यामुळे माझ्याशी चॅटिंग आणि फोनवर किंवा प्रत्यक्ष गप्पा मारणे, हा एक आनंददायी अनुभव असतो. मी तसा कधी विचारच केलेला नव्हता. त्या फ्रॉपरमुळेच मला तो शोध लागला.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे सगळे रामायण इथे लिहिण्याऐवजी, तुम्ही ‘मेरा नाम जोकर’-टैप्स एखादा लांबलचक, छानपैकी रटाळ सिनेमा का काढीत नाही?

I mean, who the hell do you suppose is interested?

(‘मेरा नाम जोकर’मधली गेला बाजार गाणी तरी बरी होती.)

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

लांबलचक, रटाळपणाबद्दल तुम्ही तक्रार करताय! किमान या लेखातला निरागसपणा बघूनतरी जरा आरश्यासमोर बघायचंत!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमचा लांबलचक रटाळपणा वेगळा. तो जाणूनबुजून असतो.

किमान या लेखातला निरागसपणा बघूनतरी

तेच तर म्हणतोय ना! त्या निरागसपणाबद्दलच तर आक्षेप आहे.

एक वेळ त्यांनी जाणूनबुजून, पब्लिकला पकविण्यासाठी (आणि कदाचित त्यातून स्वतःचेच मनोरंजन साधण्यासाठी) लांबलचक रटाळपणा केला असता, तर गोष्ट वेगळी असती. त्या परिस्थितीत, माझ्यासारखे दुसरे कोणीतरी भेटले, म्हणून आनंद झाला असता, नि कौतुकही वाटले असते. परंतु, इथे तर निरागसपणा ओतप्रोत (नि ओसंडून) वाहून राहिला आहे. त्याचेच तर दुःख वाटते.

काय करणार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या लेखाच्या निमित्तानं नबांनी कधी अशी पत्रमैत्री केली आहे का हे जाणून घ्यायला आवडेल. आंतरजाल नवीन होतं तेव्हा एका मुलानं मला त्यांचं नाव ऋषिकेश कानिटकर आहे असं सांगितलं होतं. आम्ही सहा महिने बोललो आणि मग रुपाली किंवा तत्सम कॉफी शॉपमध्ये भेटलो. तेव्हा त्यानं डोळ्यात पाणी आणून मला त्याचं खरं नाव काहीतरी काटदरे आहे असं सांगितलं. आणि मला फसवल्याबद्दल माझी माफी मागितली.
किती गोड होते ते दिवस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख कंटाळवाणा वाटला नाही. (सॉरी नबा.)

आपल्या आयुष्याबद्दल, आपल्या स्वभावाबद्दल, इतकंच नव्हे तर आपल्या स्व-प्रतिमेबद्दलचं इतकं प्रांजळ कथन क्वचितच सापडतं. "दिल ढूंढता है" ह्या गाण्याचं वर्णन करताना गुलजार म्हणाले - "मिस्रा गालिब का है, और कैफियत अपनी अपनी". म्हणजे शब्द कुण्या कवीचे आहेत पण जणू तो माझंच मर्म सांगतोय. तसं हे लेख वाचताना झालं. की आपण ह्या परिस्थितीमधे कधी नव्हतो. पण काही गोष्टी आयुष्यात न घडत्या - किंवा काहीतरी वेगळ्या घडत्या - तर आपणही ह्या बाईंच्या जागी असेच असतो. आणि असेच भांबावलेले, असेच गोंधळलेले, असेच चाचपडणारे असतो.

मात्र लेखामधे,

एकाकीपणाचं काय करावं? माणसांचं एकाकीपण ही काही आजची घटना नव्हे पण २१व्या शतकातल्या जगामधे व्यक्ती अधिकाधिक एकाकी आहेत का?

इत्यादिवगैरे प्रश्नांना भिडण्याचा प्रयत्न केलेला नाही.

म्हणजे तसा प्रयत्न करायलाच हवा; किंवा ह्या लेखाने तसा दावा केला आहे असं माझं म्हणणं नाही. पण घटनांची, व्यक्तींची, सिचुएशन्सची जंत्री त्यात आहे. स्वत:च्या आयुष्याबद्दलचा प्रांजळपणा तर ओतप्रोत आहे. पण काही प्रश्न अनुत्तरित राहातात.

लेखिकेने इथे येऊन काही परिशिष्टवजा लिहावं असं मनापासून वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

नबांसारखी प्रतिक्रिया मला अपेक्षितच होती. माझा भाऊ पण त्याबद्दल तसेच काहीसे म्हणाला.  मूळात मला तो लेख लिहून खूप मोकळे वाटले.‌ पण त्यासाठी अर्थातच दुसऱ्यांना‌ पकवणे योग्य नाही. क्षमस्व.
राजन बापटांची प्रतिक्रिया वाचून मला थोडे  "माझ्या संदर्भात एकाकीपण आणि एकटेपणा" याबद्दल म्हणावेसे वाटले. ते दोन्हीही माझे आवडीचे आणि अभ्यासाचे विषय आहेत. WHO ने " loneliness" हा global pandemic म्हणून जाहीर केला आहे. एकटेपणा ही सामाजिक तर एकाकीपण ही मानसिक आणि भावनिक स्थिती आहे, हे सर्वज्ञात आहे. आपल्यामधील adrenaline आणि endorphins ही दोन हार्मोन्स कमी झाले की आपल्याला एकाकीपण येते. आपण दहा माणसात राहूनही आपण एकाकीपण अनुभवतो.
माझ्या दैवाने मला अनेक वर्ष एकटेपणा आणि एकाकीपण दोन्हीही अनुभवायला लागले. त्याची कारणे वेगवेगळी आहेत. पण अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर "चूकीची आणि चूकीच्या वेळची निवड" ही दोन मुख्य कारणे आहेत.
अगदी खरेच सांगते मला dating app वरची मित्रमंडळी मिळेपर्यंत मला आहे तशी स्वीकारणारे कोणीच नव्हते. माझे एकंदर रंग, रूप, बेढब आणि वजनदार शरीरयष्टी, आत्मविश्वास नसलेली depressive and apprehensive personality यामुळे माझ्याशी कोणीही मैत्री करत नसे.
एवढेच कशाला अगदी माझ्या कामाच्या ठिकाणीही मी कोणत्याही team चा कधीच भाग नसायचे.‌ या लेखात उल्लेख केलेली माझी मैत्रीण, तिच्याशी असलेल्या मैत्रीला मैत्री म्हणावे का, असा जेव्हा मी आज विचार करते तेव्हा उत्तर नकारार्थी येते. मी तिच्यावर अनेक बाबतीत अवलंबून होते आणि ती माझ्यासाठी कॅप्टन निमोच्या चालत्या खडकासारखा आधार होती. 
पण मला मैत्रीची आणि साथीदाराचीही तहान होती. कदाचित दैव, कदाचित माझे वर्तन आणि व्यक्तीमत्व यामुळे ते प्रत्यक्षात शक्य झाले नाही. अर्थातच एकटेपणा आणि एकाकीपण दूर करण्यासाठी डेटिंग अॅप्सचा आधार घेणे हा मूर्खपणा आहे.
समविचारी आणि समानशील मित्र शोधण्याचे इतर अनेक मार्ग असतात. थोड्या प्रयत्नांनी ते आपल्याला मिळू शकतात.  मित्र मैत्रिणींमुळे किंवा‌  समूहात एकत्र काम केल्यामुळे आपला एकटेपणा दूर होऊ शकतो.
पण एकाकीपण दूर करण्यासाठी मात्र आपल्याला आहे तसे स्वीकारणारी, आपला आत्मसन्मान जपणारी आणि दिवसाच्या शेवटी जिथे विश्वासाने विसावता येईल आणि आपल्या कोणत्याही संकटात आपल्याला खंबीर आधार देईल अशी कोणीतरी व्यक्ती हवी असते. अर्थातच काही विशेष प्रकारच्या एकाकीपणावर असा कोणताही उपायही चालत नाही.
एकटेपणा/ एकाकीपणा घालवण्यासाठी डेटिंग अॅपचा वापर' किंवा आभासी जगातील मैत्री हे 'उत्तर' निश्चितच नाही.
तरीही मला माझी " स्वप्रतिमा" उंचावण्यासाठी त्या अॅप्सवर भेटलेल्या माणसांचा मला खूप उपयोग झाला. मी त्यातल्या कोणामध्येच वाहवत गेले नाही. ना कुणी मला जाळ्यात पकडायचा प्रयत्न केला. कदाचित माझा so called निरागसपणा आणि बावळटपणा ही त्याची कारणे असावीत.‌
मला मात्र माणसांचे निरनिराळे स्वभाव आणि त्यांचे विभ्रम कळले. मला कोणाशी तरी सहज निखळ गप्पा मारता येतात, ह्याचा मला शोध लागला. एकदा आपला self esteem उंचावला की assertiveness ही आपोआप येतो. आपल्याला हव्या त्या व्यक्तीशी आपल्याला मैत्री करता येते हे मी अनुभवलेले आहे.
मी अगदी दहावीत असताना आमच्या शेजारच्या मुलाचे लग्न झाले, ती नवी नवरी देखणी आणि ब-याच बाबतीत कर्तृत्ववान होती. मला ती फारच आवडायची. अजूनही आवडते. पण ती मला अगदी तुच्छ समजत असे. माझ्याशी फारशी कधी बोलायची नाही. बोलली तर टोचून किंवा अपमानास्पद बोलायची.
या सोशल मिडियावरच्या " मैत्र" शिकवणीनंतर मी तिच्याशी योजनापूर्वक ( हे बरोबर नाही..पण माझा हेतू वाईट नव्हता) मैत्री करण्याचा प्रयत्न केला आणि आज ती माझी अतिशय चांगली मैत्रीण आहे. 
पूर्वी माझ्या एकंदर रूप आणि वर्तनामुळे माझ्याकडे अविश्वासाने पाहणारे लोक आता माझ्या संपर्कात राहण्याचा  आणि माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात.
आपल्या समविचारी लोकांशी मैत्री मलाही सहज साध्य होऊ शकेल, अर्थातच त्यासाठी माझ्या व्यक्तीमत्वात मी काही सकारात्मक बदल करावा लागेल.‌ मुख्य म्हणजे माझा स्वतःकडे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, हे सर्व त्या डेटिंग साईटवरच्या लोकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे होऊ शकले.‌
आपला एकटेपणा दूर करायचा असेल तर उशीत डोके खुपसून रडून काही होत नाही. त्यासाठी एखाद्या गोष्टीत प्रावीण्य मिळवावे लागते. ते जगासमोर आणावे लागते. आपला आहार, विहार, व्यवस्थित ठेवून स्वतःला शिस्तीत बांधावे लागते. मग आपण एकटे रहात नाही कारण आपल्या भोवती अनेक जण जमा होतात. अनेकदा एकटी माणसे धास्तावलेली आणि असुरक्षित असतात. त्यासाठी आपली आपण सपोर्ट सिस्टीम आपल्याला जाणीवपूर्वक उभारावी लागते.‌ त्यासाठी अर्थातच आपणही कुणाच्या तरी सपोर्ट सिस्टीमचा भाग बनावे लागते.‌  अनुरोध या सिनेमातले अशोककुमार यांच्या तोंडी असलेले " तुम बे सहारा हो तो किसी का सहारा बनो, हे गाणे त्यासाठी फार समर्पक आहे. एकट्या माणसांच्यातले "एकाकीपण" दूर करण्यासाठी मात्र स्वतःच स्वत:चे मित्र होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.‌

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याहू मेसेंजर वरून एक किस्सा आठवला. मी कॉलेजात असताना तिथे पडीक असायचो. ASL pl. पासून सुरु होणारं संभाषण, तिथल्या चॅटरूम्स वगैरे भारी वाटायचं. (2012-2014 च्या मध्ये कधीतरी जेव्हा याहू ने मेसेंजर बंद केलं तेव्हा मी आणि माझा एक मित्र (खऱ्या आयुष्यातला )पुढे कितीतरी दिवस हळहळल्याचं आठवतंय ).
तर एक दिवस तिथे बोलताना एका मराठी स्त्रीशी ओळख झाली थोडे दिवस बोलल्यानंतर मला संशय आला की हा पुरुष असावा पण 'जर खरंच स्त्री निघाली तर' या आशेने स्पष्ट विचारणे होईना.
मग शेवटी मी एका टिपिकल नाव असलेल्या मुलीच्या नावाने फेक अकाउंट काढला आणि त्या आयडी शी चॅट सुरु केलं. 5 मिनिटात कळलं की ती हा 'तोच' होता. मी चिरडीला येऊन घाल घाल शिव्या घातल्या आणि त्यानी त्या व्याजासहित परत केल्या. शेवटी दोघेही यथेच्छ शिव्या घालून थकल्यावर तो म्हणाला की इथे एकमेकांना शिव्या घालत वेळ घालवण्यापेक्षा चॅटरूम्स मध्ये जाऊया आणि कोणी भेटतय का बघूया. यावर एकमत होऊन आम्ही दोघांनी निरोप घेतला. असे अनेक किस्से कहाण्या आहेत.
कॉलेजमध्ये, कामाच्या ठिकाणी लोकांच्यात पटकन मिसळू शकत नसल्याने किंवा एखाद्या ठराविक ग्रुप चा भाग होऊ शकत नसल्यानं जी एकाकीपणाची किंवा odd man out ची भावना निर्माण होते ती मी अनुभवली आहे. एखाद्या मुलामुलींच्या ग्रुपमध्ये त्या ग्रुपचा पेंद्या वा अशक्या होऊन राहण्यापेक्षा चार हात लांब राहिलेलं बरं असं वाटणं हे ही ओळखीचं आहे. Anonymous चॅट करताना आपलं रूप, देहबोली, आपला बुजरेपणा कीबोर्ड आणि स्क्रीनमागे लपून जातो. एक पूर्ण नवीन व्यक्तिमत्व म्हणून काहींवेळ का होईना वावरता येतंय असा आत्मविश्वास यायचा. हे आभासी आणि निरर्थक आहे हे कळायचं पण तरी वळायचं नाही. अर्थात याहू मेसेंजर किंवा डेटिंग ऍप्स हा त्यावरचा इलाज अथवा उत्तर नाही हे उशिरा का होईना समजलं आणि नंतर थांबलं. कालांतराने introvert /extrovert, MBTI Assessment या संज्ञा थोड्याफार समजल्या आणि न्यूनगंड बऱ्याच अंशी कमी झाला.
नबांनी उल्लेख केलेला निरागसपणा हा मला वाटतं निरागसपणा नसून अनेकदा सत्य माहित असूनही ते तसं नसावं असा मनाला सांगण्याचा आणि तात्पुरती वेळ पुढे ढकलण्याचा प्रामाणिक प्रयत्न असावा.
सांगण्याचा उद्देश हा की लेखिकेला काय म्हणायचंय हे थोडंफार समजलं. अनेकांना ते relatable वाटणार नाही आणि त्यामुळेच बोरिंग वाटेल तरी सरसकट झिडकारण्यासारखं ते नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख खूप आवडला. निरागस असण्यात तसेही काही कंटाळवाणे किंवा वाईट नाही. पण हा लेख निरागसपेक्षा स्वत:चाच प्रवास तटस्थपणे बघून निरीक्षणे कोणत्याही डिफेन्स शिवाय मांडणारा अशा अर्थाने विलक्षण कौतुकास्पद प्रयोग वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला असे नाही म्हणणार, पण तरीही संपूर्ण वाचला. एकाकीपणाची झळ कधीही आयुष्यात न बसल्याने, आत्तापर्यंत जालावर अशी कोणाशी मैत्री करावी असे कधी वाटले नाही. पण ज्यांना एकाकी आयुष्य काढावे लागते त्यांच्याविषयी कायम सहानुभूति वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्याच्या बाह्यरुपाची जशी चिकित्सा होते तशीच लेखनाची होते. "लोकांना वाचायला द्यायचं" लेखन म्हणजे आखीव, रेखीव, स्वतःचं वर्म झाकून, किंवा ते एखाद्या पात्रात ओतून सुबक कथा रचली की लोकांना आवडते. पण लिहिणारी आणि वाचणारी व्यक्ती, दोघेही लेखनातून validation शोधत असतात. कधीकधी एखाद्या तथाकथित कच्च्या मजकुरातूनही तसं validation मिळतं. या लेखाची वाचनसंख्या बघता तसं झालेलं दिसतं आहे.

एखाद्यानं आपल्याला नाकारलं आहे ही भावना फार कमी व्यक्तींच्या अनुभवला येते असं नक्कीच नाही. काही लोकांना ती तीव्रतेने जाणवते इतकंच. पण अशा परिस्थितीत अनेक लोक कडवट होतात आणि आजूबाजूच्या लोकांना दुखवतात. पुरुषांच्या बाबतीत तर या कडवटपणाचे अनेक आविष्कार बघितले आहेत. अगदी स्त्रीबद्दल नीच पातळीवर जाऊन गॉसिप पसरवण्यापासून ते थेट ॲसिड फेकण्यापर्यंत.
या अशा कडवट, स्वतःबद्दल तटस्थ न राहता चिकित्सा करू न शकणाऱ्या लोकांच्यात जेव्हा असं कुणी सापडतं तेव्हा नक्कीच बरं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे वाक्य च जगतील सर्वात भंकस जोक आहे

सोशल मीडिया वर कधीच मित्र होत नाहीत.

हे सत्य आहे.
ज्यांना घरात, समाजात , रिअल लाईफ मध्ये कवडीची किंमत नसते ते सोशल मीडिया वर माणूस शोधत असतात काही तरी बोलण्यासाठी.
ह्यांना रोबोट पण खुश करतो
स्त्री आयडी चे पुरुष पण खुश करतात..
पुरुष आयडी मधील स्त्रिया पण खुश करतात
कारण रिअल लाईफ मध्ये ह्यांना कोणी ही विचारत नसते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0